व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या मुलाला शांतीप्रिय असण्यास शिकवा

आपल्या मुलाला शांतीप्रिय असण्यास शिकवा

आपल्या मुलाला शांतीप्रिय असण्यास शिकवा

निकोल आठ वर्षांची आहे. तिचे कुटुंब दुसरीकडे राहायला जाणार होते. ती याबाबतीत खूप खूष होती. आपली सख्खी मैत्रीण गेब्रीएला हिला ती सर्व बारीकसारीक माहिती देत होती. एकदा गेब्रीएला अचानक निकोलला म्हणाली, की तिला तिच्या जाण्याचं काहीही वाटत नाहीए. निकोलला हे ऐकून खूप वाईट वाटलं. आणि तिला तिचा रागही आला. ती आपल्या आईला म्हणाली: “मला गेब्रीएलाचं तोंडही पुन्हा पाहायचं नाहीए!”

निकोल आणि गेब्रीएला सारख्या लहान मुलांची भांडणे सोडवायला सहसा पालकांना मध्ये पडावे लागते. फक्‍त दुखावलेल्या भावनांवर मलमपट्टी करण्यासाठी नव्हे तर मतभेद कसे सोडवायचे हे दाखवण्यासाठी. लहान मुले साहजिकच ‘पोरपणाचे’ गुण दाखवतात आणि त्यांच्या शब्दांची व कार्यांची इतरांना किती हानी होते याची त्यांना सहसा जाणीव नसते. (१ करिंथकर १३:११) कुटुंबाच्या आत व बाहेर शांतीसंबंध राखून ठेवण्यास महत्त्वाचे असलेले गुण विकसित करायला त्यांना मदत करावी लागते.

ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना ‘शांती प्राप्त करून ती धरून’ ठेवण्याचे प्रशिक्षण अगदी गांभीर्याने देतात. (१ पेत्र ३:११) शांतीमय असल्यामुळे मिळणाऱ्‍या परिणामांमुळे, संशय, निराशा आणि द्वेष या सारख्या भावनांवर मात करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न वाया जात नाहीत. तुम्ही जर पालक आहात तर तुम्ही आपल्या मुलांना शांतीप्रिय बनण्यास कशाप्रकारे मदत करू शकता?

मुलांच्या मनात ‘शांतिदात्या देवाला’ आनंदित करण्याची इच्छा जागृत करा

यहोवाला “शांतिदाता देव” असे संबोधण्यात आले आहे आणि तो “शांतीचा देव” आहे अशीही त्याची ओळख करून देण्यात आली आहे. (फिलिप्पैकर ४:९; रोमकर १५:३३) त्यामुळे, आपल्या मुलांमध्ये देवाला आनंदित करण्याची व त्याच्या गुणांचे अनुकरण करण्याची इच्छा जागृत करण्यासाठी सुज्ञ पालक देवाचे वचन बायबल याचा कुशलपणे उपयोग करतात. जसे की, आपल्या मुलांना प्रेषित योहानाने कोणता दृष्टांत पाहिला होता त्याची कल्पना करण्यास सांगा. यहोवाचे राजासन. राजासनाच्या सभोवती हिरव्या रंगाच्या पाचूसारखा दिसणारा भव्य मेघधनुष्य. * (प्रकटीकरण ४:२, ३) हा मेघधनुष्य यहोवाच्या सभोवती असलेल्या शांत व धीरगंभीर वातावरणाला सूचित करतो आणि अशाप्रकारचे आशीर्वाद तो त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्‍या सर्वांना देणार आहे.

यहोवा आपला पुत्र येशू याच्याद्वारे देखील मार्गदर्शन पुरवतो. त्याच्या पुत्रालासुद्धा “शांतीचा अधिपति” असे म्हणण्यात आले आहे. (यशया ९:६, ७) तेव्हा, आपल्या मुलांबरोबर भांडण-तंटे सोडवण्याविषयी बायबलमधील येशूने दिलेले धडे वाचून त्यावर चर्चा करा. (मत्तय २६:५१-५६; मार्क ९:३३-३५) एकेकाळी “जुलमी” असलेल्या पौलाने आपला मार्ग बदलून ‘प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, . . . सहनशील असावे’ असे का लिहिले ते समजावून सांगा. (१ तीमथ्य १:१३; २ तीमथ्य २:२४) तुमच्या मुलाची प्रतिक्रिया पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल.

ईवानला आठवते, की तो सात वर्षांचा होता तेव्हा एकदा त्याच्या शाळेतल्या बसमधला एक मुलगा त्याला कसा चिडवत होता. तो म्हणतो: “मला त्या मुलाचा इतका राग येत होता, की त्याला चांगला धडा शिकवावा असं मला वाटत होतं. पण मग मला, आपल्याला जे खिजवतात त्यांच्याशी कसं वागायचं याबद्दल घरी शिकलेली एक गोष्ट आठवली. मी ‘वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नये’ व ‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहावे,’ अशी यहोवा माझ्याकडून अपेक्षा करत होता, हे मला माहीत होतं.” (रोमकर १२:१७, १८) ईवानला या स्फोटक परिस्थितीला निकामी करण्याकरता सौम्यपणा दाखवण्याचे बळ व धैर्य मिळाले. त्याला शांतीच्या देवाला आनंदित करायचे होते.

शांतीप्रिय पालक असा

तुमच्या घरातील वातावरण कसे असते, शांत आणि प्रसन्‍न? असल्यास, तुमची मुले, तुम्ही त्यांना काहीही न सांगताच बरेच काही शिकू शकतात. शांतीमय असण्याकरता तुम्ही तुमच्या मुलांना देत असलेली शिकवण ही, तुम्ही स्वतः देवाच्या व ख्रिस्ताच्या शांतीमय मार्गांचे अनुकरण किती करता त्यानुसार प्रभावी ठरते.—रोमकर २:२१.

रस आणि सिंडी आपल्या दोन मुलांना वाढवण्याचा बराच प्रयत्न करीत आहेत. दुसऱ्‍यांनी आपल्याला कितीही चिडवायचा प्रयत्न केला तरी, आपण प्रेमळपणे वागले पाहिजे, अशी शिकवण ते आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिंडी म्हणते: “कठिण परिस्थिती येते तेव्हा रस आणि मी, मुलांबरोबर आणि इतरांबरोबर कसं वागतो याचा, आमची मुलं जेव्हा अशाच परिस्थिती येतात तेव्हा ते कसे वागतात यावर खूप मोठा प्रभाव पडतो.”

तुमच्या हातून एखादी चूक झाली तरी (आणि कोणत्या पालकाच्या हातून चुका होत नाहीत?) तुमच्याजवळ महत्त्वपूर्ण धडे शिकवण्याची संधी आहे. “कधीकधी माझी पत्नी टेरी आणि मी लगेच चिडायचो, सर्व पुरावे मिळण्याआधीच आम्ही आमच्या तिन्ही मुलांना शिक्षा करायचो. पण असं झाल्यावर आम्ही क्षमा मागायचो,” असे स्टीफन म्हणतो. टेरी म्हणते: “आम्ही आमच्या मुलांना हे समजू दिलं, की त्यांचे आईबाबासुद्धा अपरिपूर्ण आहेत, त्यांच्या हातूनही चुका होतात. यामुळे आमच्या कुटुंबात फक्‍त शांतीच नांदत नाही तर शांती टिकवून कशी ठेवायची हेही आमची मुलं शिकली आहेत.”

तुम्ही आपल्या मुलांशी ज्याप्रकारे वागता त्यावरून तुमची मुले शांतीने कसे वागायचे हे शिकत आहेत का? येशूने असा सल्ला दिला: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) तुमच्याही कमतरता असल्यातरी तुम्ही ही खात्री बाळगू शकता, की तुमच्या मुलांना तुम्ही दाखवत असलेल्या प्रेम व ममतेचे चांगले परिणाम होतील. तुम्ही तुमच्या मुलांना प्रेमळ मार्गदर्शन देता तेव्हा ते लगेच प्रतिसाद देतील.

मंदक्रोध असा

नीतिसूत्रे १९:११ मध्ये म्हटले आहे: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो.” तुम्ही आपल्या मुलांना अशाप्रकारचा विवेक अर्थात समंजसपणा विकसित करण्यास कशाप्रकारे मदत करू शकता? डेव्हीड एका व्यावहारिक मार्गाचे अवलंब केल्याचे वर्णन करतो ज्याचा फायदा त्याला व त्याची पत्नी, मरीयन हिला आपल्या मुलाला व मुलीला वाढवताना झाला. तो म्हणतो: “कोणी त्यांच्याशी वाईटपणे वागल्यावर जेव्हा ते चिडतात तेव्हा आम्ही त्यांना सहानुभूती दाखवण्यास शिकवतो. आम्ही त्यांना साधे साधे प्रश्‍न विचारतो. जसे की, ‘जी व्यक्‍ती त्यांच्याशी वाईटपणे वागली होती, तिचा दिवस वाईट गेला होता का? ती ईर्ष्यावान आहे का? तिला कुणीतरी दुखवलं होतं का?’” मरीयन म्हणते: “यामुळे मुलं शांत होतात. त्यांच्या मनात नकारात्मक विचार घोळत राहत नाहीत. कोण बरोबर होतं आणि कोण चूक होतं, यावर ते वाद घालत बसत नाहीत.”

अशाप्रकारच्या प्रशिक्षणाचे उत्तम परिणाम मिळू शकतात. या लेखाच्या सुरुवातीला जिचा उल्लेख करण्यात आला होता त्या निकोलचे उदाहरण पुन्हा घ्या. तिला तिच्या आईने मदत केली. यामुळे निकोल आणि गेब्रीएला यांच्यात फक्‍त समझोताच झाला नाही तर आणखी फायदा झाला. निकोलची आई, मिशेल म्हणते: “मी निकोलसोबत, थोर शिक्षकाकडून शिका (इंग्रजी) या पुस्तकाचा १४ वा अध्याय वाचून काढला. * आपण एखाद्याला ‘साताच्या सत्तर वेळा’ क्षमा केली पाहिजे असे जे येशूने म्हटले त्याचा काय अर्थ होतो हे मी तिला समजावून सांगितलं. निकोलनं आपल्या मनातील भावना मला बोलून दाखवल्या तेव्हा मी तिचं लक्षपूर्वक ऐकून घेतलं. गेब्रीएलाची सख्खी मैत्रीण तिच्यापासून दूर जात आहे म्हणून तिला किती वाईट वाटत असेल हे समजून घेण्यास मी निकोलला मदत केली.”—मत्तय १८:२१, २२.

गेब्रीएला अशी अचानक का चिडली असावी हे निकोलला नव्यानेच उमगल्यामुळे निकोलला तिची सहानुभूती वाटली. तिने लगेच तिला फोन करून तिची क्षमा मागितली. “तेव्हापासून निकोलला इतरांच्या भावनांची कदर करण्यात व त्यांना खूष करण्यासाठी छोट्यामोठ्या गोष्टी करण्यात आनंद होतो,” असे मिशेल म्हणते.—फिलिप्पैकर २:३, ४.

चुका किंवा गैरसमज होतात तेव्हा क्रोधीत होण्याची गरज नाही, असे मुलांना शिकवा. असे केल्याने तुम्हाला, तुमची मुलं इतरांबद्दल सदिच्छा व कोमल स्नेहभाव दाखवत असल्याचे पाहून समाधान मिळेल.—रोमकर १२:१०; १ करिंथकर १२:२५.

क्षमा करण्यात असलेले भूषण मिळवण्याचे उत्तेजन द्या

‘अपराधाची गय करण्यात भूषण आहे,’ असे नीतिसूत्रे १९:११ मध्ये म्हटले आहे. येशू जेव्हा त्याच्या सर्वात क्लेशदायक क्षणांत होता तेव्हा देखील त्याने आपल्या पित्याचे अनुकरण केले व क्षमाशील वृत्ती दाखवली. (लूक २३:३४) तुम्ही आपल्या मुलांना क्षमा करता तेव्हा त्या तुमच्या क्षमेतून मिळणारे सांत्वन जेव्हा ते अनुभवतील तेव्हा ते क्षमाशील असण्यात किती भूषण आहे हे शिकतील.

उदाहरणार्थ, पाच वर्षांच्या विलीला आपल्या आजीबरोबर चित्रांत रंग भरायला आवडते. एकदा, त्याच्या आजीने अचानकच रंग भरायचे थांबवले आणि ती विलीवर जोरात खेकसून निघून गेली. विलीला खूप वाईट वाटले. त्याचे वडील सॅम म्हणाले: “विलीच्या आजीला अल्झायमर्सचा विकार आहे. त्यामुळे आम्ही त्याला समजेल अशा भाषेत, आजी असं का वागली ते समजावलं.” तुलाही अनेकदा क्षमा करण्यात आलेले आहे तेव्हा तूही दुसऱ्‍यांना क्षमा केली पाहिजे याची विलीला आठवण करून दिल्यानंतर विलीची प्रतिक्रिया पाहून सॅम आश्‍चर्यचकित झाला. तो म्हणतो: “आमचा हा चिमुकला त्याच्या ८० वर्षांच्या आजीकडे जाऊन लाडीक स्वरात तिची क्षमा मागतो आणि मग तिच्या हाताला धरून तिला पुन्हा टेबलाकडे आणतो, हे पाहून मला आणि माझ्या पत्नीला कसं वाटलं असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.”

मुले जेव्हा इतरांच्या कमतरता आणि चुका “सहन” व क्षमा करण्याचे शिकतात तेव्हा ते खरोखरच एक भूषण आहे. (कलस्सैकर ३:१३) कधीकधी लोक मुद्दामहून वाकडे वागतात तेव्हाही आपली शांतीमय प्रतिक्रिया प्रभावी ठरू शकते, याची आपल्या मुलाला खात्री द्या. कारण, “मनुष्याचे मार्ग परमेश्‍वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंसहि त्याच्याशी समेट करावयास लावितो.”—नीतिसूत्रे १६:७.

आपल्या मुलाला शांतीमय असण्यास मदत करीत राहा

पालक जेव्हा “शांतीत” आणि ‘शांती करणारे म्हणून’ प्रशिक्षण देण्याकरता देवाच्या वचनाचा उपयोग करतात तेव्हा त्यांच्या मुलांना याचा बराच लाभ होतो. (याकोब ३:१८) असे पालक आपल्या मुलांना अशाप्रकारचे शिक्षण देतात जे, मतभेद मिटवून सलोखा करण्यास आवश्‍यक असते. यामुळे मुले संपूर्ण जीवनभर अपरिमित आनंद व समाधान अनुभवतील.

डॅन आणि कॅथीला तीन किशोरवयीन मुले आहेत जी आध्यात्मिकरीत्या उत्तम प्रगती करत आहेत. डॅन म्हणतात: “मुलांना लहानाचं मोठं करताना आम्हाला बरंच कठीण गेलं असलं तरी, आमची मुलं यहोवाच्या सेवेत सक्रिय आहेत हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो. ते इतरांबरोबर चांगलं वागतात, जर कोणाकडून चूक झाली असेल तर ते त्याला क्षमाही करतात. यामुळे शांती टिकून राहते.” कॅथी म्हणतात: “आमच्या मुलांचं वर्तन पाहून आम्हाला उत्तेजन मिळतं कारण शांती ही देवाच्या आत्म्याचे एक फळ आहे.”—गलतीकर ५:२२, २३.

यास्तव ख्रिस्ती पालक या नात्याने तुमच्याजवळ, आपल्या मुलांना शांतीने राहण्यास शिकवताना ‘कंटाळा न करण्यास’ व ‘खचून न जाण्यास’ उत्तम कारणे आहेत. तुमच्या मुलांमधील प्रगती कधीकधी पटकन दिसून येत नसली तरीसुद्धा हार मानू नका. तुम्ही ही खात्री बाळगू शकता, की आपल्या मुलांना शांतीने राहण्यास शिकवताना “प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील.”—गलतीकर ६:९; २ करिंथकर १३:११. (w०७ १२/१)

[तळटीपा]

^ परि. 6 यहोवाच्या साक्षीदारांनी छापलेले प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पुस्तकातील पृष्ठ ७५ वरील चित्र पाहा.

^ परि. 16 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[२० पानांवरील चौकट/चित्र]

लाभदायक प्रभाव?

प्रसारमाध्यम जनजागृती नेटवर्कने, “प्रसारमाध्यमातील मनोरंजनात हिंसाचार” अशा शीर्षकाचा एक निबंध प्रकाशित केला. त्यात असे म्हटले होते: “समस्या सोडवण्याचा मार्ग म्हणजे हिंसेचा अवलंब करणे, या धारणेवर मनोरंजनात भर दिला जातो. खलनायक आणि नायक हे दोघंही सतत हिंसेचा अवलंब करत असल्याचे चित्रपटात किंवा टीव्हीवर दाखवले जाते.” टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रपट व संगीत व्हिडिओ यांचे जेव्हा परीक्षण करण्यात आले तेव्हा वर सांगितलेल्या केवळ १० टक्के कार्यक्रमांत हिंसाचाराचे वाईट परिणाम दाखवण्यात आले. उलट, “हिंसाचार हा योग्य, स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे—समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे, असेच बाकीच्या कार्यक्रमांत दाखवले जाते,” असे त्या निबंधात पुढे म्हटले होते.

तुमच्या घरात टीव्ही पाहण्यात तुम्हाला काही फेरबदल करण्याची आवश्‍यकता आहे, असे तुम्हाला वाटते का? तुमच्या मुलांना तुम्ही शांतीमय बनवण्याचा जो प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांवर, प्रसारमाध्यमाला पाणी ओतू देऊ नका.

[१७ पानांवरील चित्र]

‘शांतीदाता देवाला’ संतुष्ट करण्याची इच्छा आपल्या मुलांच्या मनात रुजवा

[१८ पानांवरील चित्र]

तुमच्या मुलांच्या तोंडून तुम्ही जेव्हा हानीकारक बोलणे ऐकता किंवा हानीकारक कृती पाहता तेव्हा ती सुधारण्याचा प्रयत्न करा

[१९ पानांवरील चित्र]

तुमच्या मुलांनी क्षमा मागण्यास व क्षमा करण्यास शिकले पाहिजे