व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिष्य बनवण्यास तुम्हाला साहाय्य करणारे गुण विकसित करा

शिष्य बनवण्यास तुम्हाला साहाय्य करणारे गुण विकसित करा

शिष्य बनवण्यास तुम्हाला साहाय्य करणारे गुण विकसित करा

“जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.”—मत्तय २८:१९.

१. गत काळातील देवाच्या काही सेवकांना कोणती कौशल्ये व मनोवृत्ती विकसित करावी लागली?

यहोवाच्या सेवकांना कधीकधी अशी कौशल्ये आणि मनोवृत्ती विकसित करावी लागते जी त्यांना त्याची इच्छा पूर्ण करण्यास साहाय्य करू शकेल. उदाहरणार्थ, देवाच्या आज्ञेचे पालन करून अब्राहाम व साराने, ते ज्या धनाढ्य शहरात राहात होते ते ऊर शहर सोडले आणि ते तंबूत राहू लागले. तंबूत राहणाऱ्‍या लोकांसारखे गुण आणि कौशल्ये त्यांना शिकून घ्यावी लागली. (इब्री लोकांस ११:८, ९, १५) वचनयुक्‍त देशात जाताना इस्राएली लोकांचे नेतृत्त्व करण्याकरता यहोशवाला खूप खंबीर असावयास हवे होते, यहोवावर भरवसा ठेवावयाचा होता आणि त्याच्या नियमशास्त्राचे पालन करावयाचे होते. (यहोशवा १:७-९) बसालेल व अहलियाब यांच्याजवळ आधीपासूनच कौशल्ये असली तरी, देवाच्या आत्म्यामुळे ती कौशल्ये आणखी सुधरली असावीत कारण हे दोघेजण निवासमंडपाच्या बांधकामात व त्याजशी संबंधित असलेल्या इतर कामात यशस्वीरीत्या भाग घेऊ शकले आणि कामावर देखरेख करू शकले.—निर्गम ३१:१-११.

२. शिष्य बनवण्याच्या कार्याशी संबंधित असलेल्या कोणत्या प्रश्‍नांची आपण चर्चा करणार आहोत?

अनेक शतकांनंतर, येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) इतिहासात पूर्वी कधीच लोकांना इतकी मोठी कामगिरी देण्यात आली नव्हती. पण शिष्य बनवण्याच्या कार्यासाठी कोणत्या गुणांची आवश्‍यकता आहे? आपण या गुणांचे संवर्धन कसे करू शकतो?

देवाबद्दल तुम्हाला गहिरे प्रेम असल्याचे दाखवा

३. शिष्य बनवण्याच्या आज्ञेमुळे आपल्याला कोणती संधी मिळते?

लोकांशी बोलण्याकरता व त्यांना खऱ्‍या देवाची उपासना करण्यास त्यांची खात्री पटवण्याकरता आधी आपल्याला यहोवाबद्दल गहिरे प्रेम असले पाहिजे. इस्राएली लोक, यहोवाच्या आज्ञांचे मनःपूर्वक पालन करण्याद्वारे, स्वीकारयोग्य बलिदाने अर्पण करण्याद्वारे व गीत गाऊन त्याची स्तुती करण्याद्वारे देवाबद्दल त्यांना किती प्रेम आहे हे दाखवू शकत होते. (अनुवाद १०:१२, १३; ३०:१९, २०; स्तोत्र २१:१३; ९६:१, २; १३८:५) शिष्य बनवणारे या नात्याने आपणही देवाच्या आज्ञांचे पालन करतो पण त्याबरोबर आपण इतरांना त्याच्याविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी सांगून त्याच्याबद्दल आपल्याला किती प्रेम आहे हे दाखवून देतो. आपण लोकांशी बोलताना पूर्ण आत्मविश्‍वासाने बोलले पाहिजे, देवाने दिलेल्या आशेबद्दल आपल्या प्रामाणिक भावना काय आहेत हे व्यक्‍त करण्यासाठी योग्य शब्दांची निवड केली पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर १:५; १ पेत्र ३:१५.

४. येशूला, लोकांना यहोवाविषयी शिकवताना आनंद का होत असे?

येशूचे यहोवावर गहिरे प्रेम होते त्यामुळेच त्याला देवाच्या उद्देशांविषयी, राज्याविषयी आणि खऱ्‍या उपासनेविषयी बोलायला खूप आनंद व्हायचा. (लूक ८:१; योहान ४:२३, २४, ३१) वास्तविक पाहता, येशूने असे म्हटले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) स्तोत्रकर्त्याने काढलेले पुढील उद्‌गार येशूला लागू होतात: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले; हे परमेश्‍वरा, मी आपले तोंड बंद ठेविले नाही हे तू जाणतोस.”—स्तोत्र ४०:८, ९; इब्री लोकांस १०:७-१०.

५, ६. शिष्य बनवण्यासाठी आपल्याजवळ कोणता प्रमुख गुण असला पाहिजे?

देवाबद्दल मनात प्रेम असल्यामुळे नव्याने बायबल सत्य शिकणारे कधीकधी यहोवाविषयी आणि त्याच्या राज्याविषयी इतक्या आत्मविश्‍वासाने बोलण्यास प्रवृत्त होतात की ते इतरांना शास्त्रवचनांचे परीक्षण करून पाहण्यास अगदी प्रभावीपणे त्यांची खात्री पटवून देतात. (योहान १:४१) शिष्य बनवण्याच्या कार्यात भाग घेण्यास आपल्याला प्रवृत्त करणारा प्रमुख गुण आहे देवाबद्दलचे प्रेम. तेव्हा, देवाच्या वचनाचे नियमित वाचन व त्यावर मनन करून आपण आपल्या मनातील त्याच्याबद्दलचे प्रेम जिवंत ठेवू या.—१ तीमथ्य ४:६, १५; प्रकटीकरण २:४.

यहोवाबद्दल प्रेम असल्यामुळेच तर येशू ख्रिस्त एक आवेशी शिक्षक झाला. पण एक प्रभावी राज्य प्रचारक होण्याचे तेवढेच एक कारण नव्हते. येशू ख्रिस्ताजवळ असा दुसरा कोणता गुण होता ज्यामुळे तो यशस्वीरीत्या शिष्य बनवू शकला?

लोकांबद्दल चिंता दाखवा

७, ८. येशूचा लोकांबद्दल कसा दृष्टिकोन होता?

येशूला लोकांची चिंता होती. त्याने त्यांच्यामध्ये आवड घेतली. पृथ्वीवर मानव म्हणून येण्याआधीसुद्धा देवाचा “कुशल कारागीर” या नात्याने त्याला मानवजातीशी संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये आनंद मिळे. (नीतिसूत्रे ८:३०, ३१) पृथ्वीवर आल्यावर त्याला लोकांबद्दल कळवळा वाटे आणि जे त्याच्याजवळ यायचे त्यांना तो विसावा देत असे. (मत्तय ११:२८-३०) येशूने यहोवाचे प्रेम आणि त्याची दया हुबेहूब प्रतिबिंबित केल्यामुळे लोक खऱ्‍या देवाच्या उपासनेकडे आकर्षित झाले. सर्व प्रकारचे लोक येशूचे बोलणे ऐकत असत कारण तो त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या परिस्थितीबद्दल प्रेमळ काळजी व्यक्‍त करत असे.—लूक ७:३६-५०; १८:१५-१७; १९:१-१०.

एकदा एका मनुष्याने त्याला सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता मी काय केले पाहिजे, असे जेव्हा विचारले तेव्हा “येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले, व त्याच्यावर त्याने प्रीति केली.” (मार्क १०:१७-२१) बेथानी येथे येशूने काही विशिष्ट व्यक्‍तींना शिकवले त्यांच्याविषयी आपण असे वाचतो: “मार्था, तिची बहीण व लाजर ह्‍यांच्यावर येशूची प्रीति होती.” (योहान ११:१,) येशूला लोकांची इतकी काळजी होती, की त्यांना शिकवण्याकरता तो स्वतःचा आराम सोडून द्यायचा. (मार्क ६:३०-३४) सहमानवांबद्दल अशाप्रकारच्या गहिऱ्‍या व प्रेमळ काळजीमुळेच तर येशू लोकांना खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित करण्यात इतका यशस्वी होता.

९. शिष्य बनवणारा या नात्याने पौलाने कोणती मनोवृत्ती बाळगली?

प्रेषित पौलाला देखील त्याने ज्या लोकांना प्रचार केला त्यांच्याबद्दल काळजी होती. जसे की, थेस्सलोनिकामध्ये ख्रिस्ती झालेल्यांना त्याने असे सांगितले: “आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.” पौलाच्या प्रेमळ प्रयत्नांमुळेच तर थेस्सलोनिकातील काहीजण ‘मूर्तीपासून देवाकडे वळाले’ होते. (१ थेस्सलनीकाकर १:१०; २:८) आपणही येशू आणि पौलाप्रमाणे लोकांची खरी काळजी केली तर आपल्याला देखील “सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्या लोकांच्या हृदयापर्यंत सुवार्ता पोहचवल्याचा आनंद अनुभवता येईल.—प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW.

आत्म-त्यागी मनोवृत्ती दाखवा

१०, ११. आपण जेव्हा शिष्य बनवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपली आत्म-त्यागी मनोवृत्ती का असली पाहिजे?

१० शिष्य बनवण्यात यशस्वी ठरलेले आत्म-त्यागी असतात. धनसंपत्ती गोळा करण्याला तर ते मुळीच महत्त्वाचे समजत नाहीत. उलट, येशूने आपल्या शिष्यांना असे शिकवले: “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे!” शिष्यांना हे ऐकून जरा आश्‍चर्यच वाटले. पण येशूने पुढे म्हटले: “मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे! धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्‍यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” (मार्क १०:२३-२५) शिष्य बनवण्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर त्याच्या अनुयायांनी आपली जीवनशैली अगदी साधी-सोपी ठेवली पाहिजे, असे येशू सुचवत होता. (मत्तय ६:२२-२४, ३३) आत्म-त्यागी मनोवृत्ती आपल्याला शिष्य बनवण्याच्या कार्यात का मदत करू शकते बरे?

११ येशूने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी शिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जो ख्रिस्ती, शिष्य बनवू इच्छितो तो सहसा एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीबरोबर दर आठवडी बायबलचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिक लोक सापडण्याच्या संधी वाढवण्याकरता काही राज्य प्रचारकांनी आपले पूर्ण-वेळेचे काम सोडून देऊन अर्धवेळेचे काम घेतले आहे. हजारो ख्रिश्‍चनांनी दुसरी भाषा शिकून घेतली आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या भागातील विशिष्ट भाषेच्या लोकांना सुवार्ता सांगता येईल. शिष्य बनवणाऱ्‍या काही बंधूभगिनी आपले घरदार सोडून कापणीच्या कार्यात अधिक सहभाग घेता येईल अशा दुसऱ्‍या एखाद्या क्षेत्रात किंवा देशात गेले आहेत. (मत्तय ९:३७, ३८) असे करण्यासाठी आत्म-त्यागी मनोवृत्तीची गरज आहे. परंतु शिष्य बनवण्याच्या कार्यात यशस्वी होण्याकरता इतकेच पुरेसे नाही.

धीर धरा, परंतु वेळ वाया घालवू नका

१२, १३. शिष्य बनवताना धीर दाखवणे महत्त्वाचे का आहे?

१२ धीर हा असा आणखी एक गुण आहे जो आपल्याला शिष्य बनवण्यास मदत करतो. आपला ख्रिस्ती संदेश ऐकल्याबरोबर त्वरीत कार्य करणे आवश्‍यक असते, पण शिष्य बनवण्याकरता बराच वेळ लागतो आणि धीर दाखवावा लागतो. (१ करिंथकर ७:२९) येशू आपला सावत्र भाऊ याकोब याच्याबाबतीत अधीर झाला नाही. याकोबाला येशूच्या प्रचार कार्याविषयी माहीत होते तरीपण तो काही वेळेपर्यंत शिष्य बनला नाही. (योहान ७:५) परंतु, ख्रिस्ताचा मृत्यू आणि सा.यु. ३३ चा पेंटेकॉस्ट या दरम्यानच्या थोड्या काळात याकोब, शिष्य बनला असे दिसते. कारण, शास्त्रवचनांत असे सुचवण्यात आले आहे, की आपली आई, आपली भावंडे आणि प्रेषित प्रार्थना करायला जमत असत तेव्हा तोही तेथे जात असे. (प्रेषितांची कृत्ये १:१३, १४) याकोबाने उत्तम आध्यात्मिक प्रगती केली आणि नंतर ख्रिस्ती मंडळीत भारी जबाबदाऱ्‍या सांभाळल्या.—प्रेषितांची कृत्ये १५:१३; १ करिंथकर १५:७.

१३ शेतकरी जसे हळूहळू वाढणाऱ्‍या पिकांची जोपासना करतो तसेच ख्रिस्ती जनही देवाच्या वचनाबद्दलची समज, यहोवाबद्दलचे प्रेम आणि ख्रिस्तासारखी मनोवृत्ती याची जोपासना करतात. यासाठी धीराची गरज आहे. याकोबाने लिहिले: “अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीहि धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.” (याकोब ५:७, ८) याकोब बांधवांना “प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा,” असे आर्जवत होता. शिष्यांना जर एखादी गोष्ट समजली नसेल तर येशू ती त्यांना अगदी धीराने समजावून सांगत असे किंवा उदाहरणाद्वारे समजावत असे. (मत्तय १३:१०-२३; लूक १९:११; २१:७; प्रेषितांची कृत्ये १:६-८) आताही प्रभू उपस्थित असल्यामुळे शिष्य बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण अशाचप्रकारचा धीर दाखवला पाहिजे. आपल्या दिवसांत येशूचे अनुयायी होणाऱ्‍यांना धीराने शिकवले पाहिजे.—योहान १४:९.

१४. आपण धीर दाखवत असलो तरी, शिष्य बनवताना आपण आपल्या वेळेचा सदुपयोग कसा करतो?

१४ आपण धीर दाखवत असलो तरी, ज्यांच्याबरोबर आपण बायबलचा अभ्यास करतो त्यापैकी बहुतेक लोक फळ देत नाहीत. (मत्तय १३:१८-२३) त्यामुळे, त्यांना मदत करण्याकरता पुरेसे प्रयत्न केल्यानंतर आपण अशा लोकांबरोबर अभ्यास करण्याचे सोडून देतो आणि बायबल सत्याची ज्यांना खरोखरच किंमत वाटते अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करतो. (उपदेशक ३:१, ६) अर्थात ज्यांना बायबल सत्याची किंमत वाटते अशा लोकांनासुद्धा, त्यांचे दृष्टिकोन, त्यांची मनोवृत्ती, जीवनात ते कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतात याबाबतीत बदल करण्यास आणखी मदतीची गरज असू शकते. यास्तव आपण धीर दाखवतो. येशूच्या शिष्यांनासुद्धा योग्य मनोवृत्ती विकसित करायला वेळ लागला. येशूने त्यांच्याबाबतीत धीर दाखवला.—मार्क ९:३३-३७; १०:३५-४५.

शिकवण्याची कला विकसित करणे

१५, १६. शिकवताना आपले बोलणे स्पष्ट का असले पाहिजे आणि आपण पूर्वतयारी का केली पाहिजे?

१५ देवाबद्दल प्रेम, लोकांबद्दल चिंता, आत्म-त्यागी मनोवृत्ती आणि धीर या गोष्टींमुळे आपण शिष्य बनवण्यात यशस्वी होऊ शकतो. आपण शिकवण्याची कला देखील विकसित केली पाहिजे कारण त्यामुळे आपण गोष्टी स्पष्ट आणि साध्यासोप्या मार्गाने समजावून सांगू शकतो. जसे की, महान शिक्षक येशू ख्रिस्त याचे अनेक उद्‌गार प्रभावशाली होते कारण ते समजायला साधेसोपे होते. कदाचित तुम्हाला येशूचे असे काही उद्‌गार आठवत असतील, जसे की, “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ति साठवा.” “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका.” “ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते.” “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” (मत्तय ६:२०; ७:६; ११:१९; २२:२१) पण येशू नेहमीच अशा थोडक्याच शब्दांत बोलला नाही. उचित प्रसंगी त्याने सोप्या शब्दांत लोकांना शिकवले आणि गोष्टींची फोड करून सांगितली. तुम्ही येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीचे अनुकरण कसे करू शकाल?

१६ स्पष्ट व सोप्या भाषेत शिकवण्यात महत्त्वाची गोष्ट आहे काळजीपूर्वक केलेली पूर्वतयारी. जो प्रचारक चांगली पूर्वतयारी करत नाही तो खूप बोलतो. त्याच्या तोंडून जणू काय शब्दांचा महापूरच कोसळत असतो. त्या विषयावर त्याला जे जे माहीत असते ते सर्व तो बोलून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या शब्दांच्या महापुरात जे मुख्य मुद्दे असतात ते अक्षरशः बुडून जातात. परंतु, ज्याने चांगली पूर्वतयारी केलेली असते असा सेवक, आपल्या विद्यार्थ्याचा विचार करतो, तो ज्या विषयावर बोलणार आहे त्यावर मनन करतो आणि जितके आवश्‍यक असते तितकेच तो स्पष्टपणे बोलतो. (नीतिसूत्रे १५:२८; १ करिंथकर २:१, २) आपल्या विद्यार्थ्याला आधीपासून किती माहिती आहे आणि अभ्यासाच्या वेळी कोणत्या मुद्द्‌यांवर जोर दिला पाहिजे ही गोष्ट तो ध्यानात ठेवतो. प्रचारकाला त्या विषयाचे अनेक बारीकसारीक बारकावे माहीत असतील पण विषयाला धरून नसलेली अनावश्‍यक माहिती जेव्हा तो सांगत नाही तेव्हाच कुठे तो एखादा मुद्दा स्पष्टपणे सांगू शकतो.

१७. आपण लोकांना शास्त्रवचनांवर तर्क करायला कशाप्रकारे मदत करू शकतो?

१७ येशू लोकांना फक्‍त माहितीच पुरवत राहिला नाही तर तो त्यांना विचार देखील करायला प्रवृत्त करत असे. उदाहरणार्थ, एके प्रसंगी त्याने असे विचारले: “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून?” (मत्तय १७:२५) बायबलचा एखादा मुद्दा समजावून सांगताना आपण, बोलत राहण्याचा मोह आवरला पाहिजे. यामुळे, विद्यार्थ्याला त्याच्या मनातील विचार व्यक्‍त करायला किंवा गृह बायबल अभ्यासाच्या वेळी ज्यावर चर्चा चालली आहे तो विषय समजावून सांगण्याची संधी मिळेल. अर्थात आपण लोकांवर प्रश्‍नांचा भडिमार करू नये. त्याऐवजी, व्यवहारकुशलतेचा, उत्तम उदाहरणांचा आणि विचार करायला प्रवृत्त करणाऱ्‍या प्रश्‍नांचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांना आपल्या बायबल आधारित प्रकाशनांतील शास्त्रवचनीय मुद्दे समजण्यास मदत करू शकतो.

१८. ‘बोध करण्याच्या’ अर्थात शिकवण्याच्या कलेत काय काय गोवलेले आहे?

१८ शास्त्रवचनांत, ‘सुशिक्षणाने बोध करण्याविषयी’ अर्थात शिकवण्याच्या कलेविषयी सांगण्यात आले आहे. (२ तीमथ्य ४:२; तीत १:९) शिकवण्याच्या कलेत केवळ, एखाद्याला माहिती लक्षात ठेवण्यास मदत करणे इतकेच समाविष्ट नाही. आपण विद्यार्थ्याला, सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, ज्ञान आणि मूर्खपण यांतील फरक समजण्यास मदत केली पाहिजे. (मत्तय ६:५, ६) असे करण्याचा प्रयत्न करत असताना आणि विद्यार्थ्याच्या मनात यहोवाबद्दल प्रेम उत्पन्‍न करत असताना त्याला, आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन का केले पाहिजे हे समजेल.

शिष्य बनवण्याच्या कामात आवेशाने भाग घेणे

१९. सर्व ख्रिस्ती शिष्य बनवण्याच्या कार्यात कशाप्रकारे गोवलेले आहेत?

१९ ख्रिस्ती मंडळी ही शिष्य बनवणारी संस्था आहे. एक नवीन व्यक्‍ती जेव्हा शिष्य बनते तेव्हा ज्या यहोवाच्या साक्षीदाराला ही व्यक्‍ती भेटलेली होती आणि ज्याने तिला बायबल काय शिकवते ते शिकायला मदत केली होती केवळ त्यालाच आनंद होतो असे नाही. एक शोध पथक जेव्हा हरवलेले मूल शोधायला निघालेले असते तेव्हा गटातील केवळ एकालाच ते मूल कदाचित सापडेल. परंतु जेव्हा ते मूल त्याच्या आईवडिलांकडे सोपवले जाते तेव्हा शोधात गोवलेल्या सर्वांनाच आनंद होतो. (लूक १५:६, ७) तसेच, शिष्य बनवण्याचे काम हे एकजुटीने करावयाचे काम आहे. येशूचे शिष्य बनणाऱ्‍यांना शोधायच्या कामात सर्वच ख्रिश्‍चन भाग घेतात. आणि जेव्हा एक नवीन शिष्य राज्य सभागृहातील सभांना हजर राहू लागतो तेव्हा तेथे उपस्थित असणारी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍ती खऱ्‍या उपासनेबद्दल या नवीन व्यक्‍तीचा आदर वाढवण्यात हातभार लावते. (१ करिंथकर १४:२४, २५) त्यामुळे, सर्वच ख्रिस्ती या गोष्टीवर आनंद करू शकतात, की दरवर्षी हजारो नवे शिष्य केले जातात.

२०. लोकांना सत्य शिकवण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय केले पाहिजे?

२० अनेक विश्‍वासू ख्रिश्‍चनांना, एखाद्याला तरी, यहोवाविषयी आणि खऱ्‍या उपासनेविषयी शिकवण्याचा आनंद वाटेल. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले असावेत पण त्यांना यश मिळाले नसावे. तुम्ही अशांपैकी एक असाल तर, यहोवाबद्दलचे तुमचे प्रेम कमी होऊ देऊ नका. लोकांबद्दल काळजी करा, आत्म-त्यागी मनोवृत्ती ठेवा, धीर दाखवा आणि आपल्या शिकवण्याच्या कलेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला लोकांना सत्य शिकवायचे आहे ही आपली इच्छा प्रार्थनेत बोलून दाखवा. (उपदेशक ११:१) यहोवाच्या सेवेत तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाचा देवाचे गौरव करणाऱ्‍या शिष्य बनवण्याच्या कामात हातभार लागतो, या विचारातून सांत्वन मिळवा. (w०७ ११/१५)

तुम्ही समजावून सांगू शकाल?

• शिष्य बनवण्याच्या कार्यातून देवावर आपले किती प्रेम आहे हे कसे दिसून येते?

• शिष्य बनवणाऱ्‍यांकडे कोणकोणते गुण असणे आवश्‍यक आहे?

• ‘बोध करण्याच्या’ अर्थात शिकवण्याच्या कलेत काय काय गोवलेले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

शिष्य बनवण्याद्वारे ख्रिस्ती जन देवाबद्दल आपली गाढ प्रीती व्यक्‍त करतात

[२३ पानांवरील चित्र]

शिष्य बनवणाऱ्‍यांनी इतरांविषयी आवड का बाळगली पाहिजे?

[२४ पानांवरील चित्र]

शिष्य बनवणाऱ्‍यांकडून कोणत्या काही गुणांची अपेक्षा केली जाते?

[२५ पानांवरील चित्र]

शिष्य बनवण्याचे अंतिम परिणाम पाहून सर्व ख्रिश्‍चनांना अत्यानंद होतो