व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिश्‍चनांचे गव्हासारखे चाळले जाणे

ख्रिश्‍चनांचे गव्हासारखे चाळले जाणे

ख्रिश्‍चनांचे गव्हासारखे चाळले जाणे

आपला मृत्यू होण्याच्या थोड्याच काळाआधी येशूने आपल्या शिष्यांना हा इशारा दिला होता: “पाहा! तुम्हांस गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली.” (लूक २२:३१) येशूच्या असे म्हणण्याचा काय अर्थ होता?

येशूच्या काळात, गव्हाच्या कापणीचे काम अतिशय वेळखाऊ व मेहनतीचे काम होते. सर्वात आधी कापणीचे कामगार शेतातून गव्हाच्या पेंढ्या गोळा करायचे. मग, या पेंढ्या कोणत्याही कठीण पृष्ठभागावर आपटल्या जायच्या. किंवा त्यांवर बैलांची पात धरून धान्याचे देठ मोडले जायचे. या प्रक्रियेमुळे धान्य त्याच्या टरफलापासून वेगळे केले जात. यानंतर हे धान्य वाऱ्‍यावर पाखडले जाई. असे केल्यामुळे धान्यातली तूस वाऱ्‍याबरोबर उडून जाई व धान्याचे दाणे खळ्यात पडत. शेवटी, धान्य चाळून त्यातले खडे व बाकीचा कचरा काढून टाकला जाई.

येशूने दिलेल्या इशाऱ्‍याप्रमाणेच, त्याकाळी सैतानाने येशूच्या शिष्यांवर निर्दयतेने हल्ला केला. आणि आजही तो आपल्यावर हल्ला करतो. (इफिस. ६:११) अर्थात, आपल्यासमोर येणारा प्रत्येक कठीण प्रसंग सैतानानेच आणलेला असतो असे म्हणता येणार नाही. (उप. ९:११, पं.र.भा.) तरीपण, आपल्याला विश्‍वासातून पाडण्यासाठी तो कोणत्याही मार्गाचा उपयोग करण्यास उत्सुक असतो हे मात्र खरे. उदाहरणार्थ, तो आपल्याला मोहात पाडून धनसंपत्तीच्या मागे लागण्यास, निकृष्ट दर्जाचे मनोरंजन निवडण्यास किंवा लैंगिक अनैतिकता आचरण्यास उद्युक्‍त करू शकतो. तसेच तो शाळासोबती किंवा सहकर्मचाऱ्‍यांचा उपयोग करून, जगातील शिक्षणाच्या व व्यवसायाच्या सुवर्णसंधींचा पुरेपूर उपयोग करण्याचा आपल्यावर दबाव आणू शकतो. शिवाय, प्रत्यक्षरित्या छळाच्या माध्यमानेही तो देवाप्रती आपली एकनिष्ठता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतो. अर्थात, इतरही बरेच मार्ग आहेत ज्यांद्वारे सैतान आपल्याला जणू चाळण्याचा प्रयत्न करतो.

या शक्‍तिशाली वैऱ्‍याला आपण तोंड कसे देऊ शकतो? स्वतःच्या सामर्थ्याने आपण हे करू शकत नाही कारण सैतान आपल्यापेक्षा शक्‍तिशाली आहे. पण यहोवा सैतानापेक्षा कैक पटीने शक्‍तीशाली आहे हे आपल्याला माहीत आहे. जर आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला, बुद्धी व धैर्य देण्याची त्याच्याकडे विनंती केली आणि त्याच्या मार्गदर्शनावर पूर्णपणे विसंबून राहिलो, तर तो आपल्याला सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य देईल.—स्तो. २५:४, ५.

परीक्षांना तोंड देताना आपल्याला ‘चांगले व वाईट समजण्याची’ क्षमता असली पाहिजे जेणेकरून आपण सैतानाच्या कुयुक्‍त्‌यांना बळी पडणार नाही. (इब्री ५:१३, १४) यहोवा आपल्याला ही क्षमता विकसित करण्यास मदत करू शकतो. चांगले काय आहे हे ओळखल्यानंतर, काही झाले तरी आपण त्या चांगल्या मार्गाला चिकटून राहिले पाहिजे. जर आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन केले तर, पूर्ण धैर्यानिशी चांगले ते करण्याच्या आपल्या निर्धाराला जडून राहण्यास तो आपले साहाय्य करेल.—इफिस. ६:१०.

सैतान आपल्याला गव्हासारखे चाळण्याचा प्रयत्न करेल. पण यहोवाच्या साहाय्याने आपण त्याच्याविरुद्ध खंबीर भूमिका घेऊ शकतो व विश्‍वासात दृढ राहू शकतो. (१ पेत्र ५:९) यहोवाचे वचन आपल्याला हे आश्‍वासन देते: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.”—याको. ४:७.