व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेले जाण्यास योग्य असे गणलेले

जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेले जाण्यास योग्य असे गणलेले

जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेले जाण्यास योग्य असे गणलेले

“कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेईल.” —प्रकटी. ७:१७.

१. देवाच्या वचनात अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना काय म्हणण्यात आले आहे आणि येशूने त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली?

 पृथ्वीवर ख्रिस्ताच्या संपत्तीची देखरेख करणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना बायबलमध्ये ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ म्हणण्यात आले आहे. १९१८ साली ख्रिस्ताने तपासणी केली तेव्हा हा ‘दास’ अर्थात पृथ्वीवरील अभिषिक्‍त जन “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याचे कार्य विश्‍वासूपणे करत असल्याचे त्याला आढळले. तेव्हा धन्याने, म्हणजेच येशूने संतुष्ट होऊन त्यांना “आपल्या सर्वस्वावर” नेमले. (मत्तय २४:४५-४७ वाचा.) अशारितीने, अभिषिक्‍त जन स्वर्गीय जीवनाचे प्रतिफळ मिळण्याअगोदर पृथ्वीवर यहोवाच्या इतर उपासकांची सेवा करतात.

२. येशूच्या संपत्तीचे वर्णन करा.

धन्याला आपल्या संपत्तीवर अधिकार असतो आणि त्याला योग्य वाटेल तसा तो या संपत्तीचा उपयोग करतो. यहोवाने नेमलेला राजा, येशू ख्रिस्त याच्या संपत्तीत, पृथ्वीवर त्याच्या राज्याशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. योहानाने दृष्टान्तात पाहिलेला “मोठा लोकसमुदाय” देखील या संपत्तीचा एक भाग आहे. मोठ्या लोकसमुदायाचे वर्णन योहानाने या शब्दांत केले: “ह्‍यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला, मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.”—प्रकटी. ७:९.

३, ४. मोठ्या लोकसमुदायाला कोणते अद्‌भुत आशीर्वाद लाभले आहेत?

येशूने ज्यांना आपली “दुसरी मेंढरे” म्हटले, त्यांत या मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य सामील आहेत. (योहा. १०:१६) त्यांना पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ जगण्याची आशा आहे. त्यांना खातरी आहे की येशू “त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेईल” आणि “देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” म्हणूनच, त्यांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.” (प्रकटी. ७:१४, १७) येशूच्या बलिदानावर त्यांनी विश्‍वास प्रदर्शित केल्यामुळे देवाच्या नजरेत जणू त्यांनी ‘शुभ्र झगे’ परिधान केले आहेत. अब्राहामाप्रमाणेच त्यांनाही देवाचे मित्र या नात्याने नीतिमान ठरवले जाते.

शिवाय, देव या दुसऱ्‍या मेंढरांच्या वाढत चाललेल्या मोठ्या लोकसमुदायाला नीतिमान लेखत असल्यामुळे, ‘मोठ्या संकटाच्या’ वेळी सध्याच्या व्यवस्थीकरणाचा नाश होईल तेव्हा ते जिवंत बचावण्याची आशा बाळगू शकतात. (याको. २:२३-२६) ते यहोवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतात आणि एक समूह या नात्याने त्यांना हर्मगिदोनातून बचावण्याची अद्‌भुत आशा आहे. (याको. ४:८; प्रकटी. ७:१५) ते स्वतंत्रपणे कार्य करत नाहीत, तर त्यांचा स्वर्गीय राजा व पृथ्वीवरील त्याचे अभिषिक्‍त बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेच्छेने सेवा करतात.

५. मोठ्या लोकसमुदायातील सदस्य ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बंधूंना कशाप्रकारे साहाय्य करतात?

अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांनी आजवर सैतानाच्या जगाकडून होत असलेल्या कड्या विरोधाला तोंड दिले आहे आणि पुढेही त्यांना हा विरोध सहन करावा लागणार आहे. पण मोठ्या लोकसमुदायातील त्यांचे साथीदार सदैव त्यांच्या पाठीशी आहेत. अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांची संख्या आता बरीच रोडावली असली तरी, मोठ्या लोकसमुदायाच्या संख्येत मात्र दरवर्षी हजारो जणांची भर पडत आहे. सबंध जगात आज जवळजवळ १,००,००० ख्रिस्ती मंडळ्या कार्य करत आहेत. साहजिकच, या सर्व मंडळ्यांची व्यक्‍तिशः देखरेख करणे अभिषिक्‍त जनांना शक्य नाही. त्यामुळे, दुसऱ्‍या मेंढरांकडून अभिषिक्‍त जनांना मिळणाऱ्‍या साहाय्याचा एक पैलू हा आहे, की मोठ्या लोकसमुदायातील सुयोग्य पुरुष मंडळ्यांमध्ये वडील यानात्याने सेवा करतात. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासावर’ ज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अशा लाखो ख्रिश्‍चनांची काळजी घेण्यात ते साहाय्य करतात.

६. अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना, दुसऱ्‍या मेंढरांतील त्यांचे साथीदार साहाय्य करतील हे कशाप्रकारे पूर्वीच भाकीत करण्यात आले होते?

अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना दुसऱ्‍या मेंढरांतील त्यांचे साथीदार स्वेच्छेने साहाय्य करतील हे संदेष्टा यशयाने भाकीत केले होते. त्याने असे लिहिले: “यहोवा असे म्हणतो, ‘मिसराचे बिनपगारी मजूर, आणि कुशाचे व्यापारी आणि सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्य आहेत ते तुझ्याकडे येतील व ते तुझे होतील; ते तुझ्यामागे चालतील.’” (यश. ४५:१४, NW) लाक्षणिक अर्थाने, पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणारे ख्रिस्ती आज अभिषिक्‍त दास वर्ग व त्याच्या नियमन मंडळाच्या मागे चालत आहेत, म्हणजेच त्यांच्या नेतृत्त्वाखाली कार्य करत आहेत. ख्रिस्ताने पृथ्वीवर आपल्या अनुयायांवर जे जागतिक प्रचाराचे कार्य सोपवले होते, त्याला हातभार लावण्याकरता ते ‘बिनपगारी मजुरांप्रमाणे’ स्वेच्छेने व मनःपूर्वक श्रम घेतात आणि त्याकरता आपल्या साधनसंपत्तीचाही उपयोग करतात.—प्रे. कृत्ये १:८; प्रकटी. १२:१७.

७. मोठ्या लोकसमुदायाला कशासाठी प्रशिक्षित केले जात आहे?

अभिषिक्‍त बांधवांना साहाय्य करत असतानाच, मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांना आज प्रशिक्षित केले जात आहे, जेणेकरून ते हर्मगिदोनानंतर एका नव्या मानवसमाजाचा पाया घालू शकतील. हा पाया भक्कम असला पाहिजे आणि या नव्या समाजाच्या सदस्यांनी आपल्या धन्याच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यास उत्सुक व सक्षम असले पाहिजे. म्हणूनच, आपला राजा, ख्रिस्त येशू याच्याद्वारे निरनिराळ्या कार्यांसाठी वापरले जाण्यासाठी आपण योग्य आहोत, हे सिद्ध करण्याची प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला आज संधी दिली जात आहे. आपला विश्‍वास व एकनिष्ठा प्रदर्शित करण्याद्वारे प्रत्येकजण आताच हे दाखवू शकतो की नव्या जगात राजा ज्या काही सूचना देईल, त्यांचे तो आनंदाने पालन करेल.

मोठा लोकसमुदाय आपल्या विश्‍वासाची प्रचिती देतो

८, ९. मोठ्या लोकसमुदायातील सदस्य कोणकोणत्या मार्गांनी आपल्या विश्‍वासाची प्रचिती देत आहेत?

अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांच्या मंडळीचे दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेले साथीदार निरनिराळ्या मार्गांनी आपल्या विश्‍वासाची प्रचिती देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याच्या कार्यात अभिषिक्‍त जनांना साहाय्य पुरवतात. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) दुसरे म्हणजे, ते नियमन मंडळाने दिलेल्या मार्गदर्शनाचे आपखुशीने पालन करतात.—इब्री १३:१७; जखऱ्‍या ८:२३ वाचा.

तिसरे म्हणजे, मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य यहोवाच्या नीतिमान तत्त्वांनुसार आचरण करण्याद्वारे आपल्या अभिषिक्‍त बांधवांना पाठबळ देतात. ते “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे गुण आत्मसात करण्याचा सतत प्रयत्न करतात. (गलती. ५:२२, २३) आजच्या जगात “देहाची कर्मे” न करता, वर उल्लेखलेले गुण प्रदर्शित करण्याची कल्पना कदाचित सर्वसामान्य लोकांना रुचणार नाही. तरीपण मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य “जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मुर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी” आवर्जून टाळतात.—गलती. ५:१९-२१.

१०. मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य कोणत्याही परिस्थितीत काय घडू देणार नाहीत?

१० आपण अपरिपूर्ण असल्यामुळे, आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणारे गुण आपल्या जीवनात प्रदर्शित करणे, देहाची कर्मे टाळणे आणि सैतानाच्या कह्‍यात असलेल्या या जगाच्या दबावाला तोंड देणे साहजिकच आपल्याला सोपे जात नाही. तरीपण, आपण स्वतःच्या दुर्बलतांमुळे, आपल्याकडून नकळत होणाऱ्‍या चुकांमुळे किंवा शारीरिक मर्यादांमुळे निराश होऊन, आपला विश्‍वास किंवा यहोवाबद्दल आपल्याला असलेले प्रेम कधीही कमकुवत होऊ देणार नाही. आपल्याला माहीत आहे की यहोवाने मोठ्या लोकसमुदायाला मोठ्या संकटातून वाचवण्याचे जे अभिवचन दिले आहे ते तो अवश्‍य पूर्ण करेल.

११. सैतानाने ख्रिश्‍चनांचा विश्‍वास कमकुवत करण्याच्या प्रयत्नात कोणकोणत्या कुयुक्‍त्‌यांचा वापर केला आहे?

११ त्याचवेळी, आपण सतत जागरूकही राहतो कारण आपल्याला माहीत आहे की आपला खरा शत्रू दियाबल आहे आणि तो इतक्या सहजासहजी आपल्याला सोडणार नाही. (१ पेत्र ५:८ वाचा.) धर्मत्यागी व्यक्‍तींचा व इतरांचा उपयोग करून त्याने कित्येकदा आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे, की आपले ख्रिस्ती विश्‍वास खोटे आहेत. पण बहुतेकदा त्याची ही कुयुक्‍ती यशस्वी ठरली नाही. त्याचप्रकारे, छळामुळे कधीकधी प्रचार कार्य काहीसे मंदावले तरीही, प्रत्यक्षात मात्र छळ झालेल्या बांधवांचा विश्‍वास आणखीनच मजबूत झाला. हे सर्व प्रयत्न फसल्यामुळे सैतान जास्तीजास्त वेळा एका खास हत्याराचा वापर करतो. आपला विश्‍वास कमकुवत करण्यात हे हत्यार हमखास यशस्वी ठरेल हे सैतानाला माहीत आहे. हे हत्यार म्हणजे निराशेच्या भावना. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना या धोक्याविषयी सावध करण्यात आले होते. त्यांना असे सांगण्यात आले: “तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा.”—इब्री १२:३.

१२. निराशेच्या गर्तेत सापडलेल्यांना बायबलमधील सल्ला कशाप्रकारे बळ देतो?

१२ तुम्हाला कधी यहोवाची सेवा सोडून द्यावेसे वाटले आहे का? आपण हरलो, किंवा आपण काहीच व्यवस्थित करू शकत नाही असे कधीकधी तुम्हाला वाटते का? जर अशा भावना तुमच्या मनात येत असतील, तर सैतानाला त्यांचा गैरफायदा घेऊन तुम्हाला यहोवाच्या सेवेपासून परावृत्त करण्यास कधीही यशस्वी होऊ देऊ नका. बायबलचा सखोल अभ्यास, मनःपूर्वक प्रार्थना, सभा व ख्रिस्ती बांधवांसोबत सहवास या गोष्टी तुम्हाला बळ देतील आणि तुम्ही “थकून जाऊ नये” म्हणून तुम्हाला साहाय्य करतील. जे यहोवाची सेवा करतात त्यांना शक्‍ती देण्याचे तो वचन देतो आणि त्याने दिलेल्या या वचनावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. (यशया ४०:३०, ३१ वाचा.) निराशेच्या भावनांवर मात करण्यासाठी, राज्याच्या सेवाकार्यात स्वतःला झोकून द्या. तुमचा वेळ ज्यामुळे विनाकारण वाया जाईल अशा गोष्टी टाळा आणि इतरांना मदत करण्याकडे जास्तीतजास्त लक्ष द्या. असे केल्यास, तुम्हाला निराशेवर मात करून धीराने यहोवाची सेवा करत राहण्याचे बळ मिळेल.—गलती. ६:१, २.

संकटातून वाचून नव्या जगात पाऊल ठेवणे

१३. हर्मगिदोनातून बचाव झालेल्यांसमोर कोणती मोठी कामगिरी असेल?

१३ हर्मगिदोनानंतर, पुनरुत्थान झालेल्यांना यहोवाच्या मार्गांविषयी शिकवण्याची गरज असेल. (प्रे. कृत्ये २४:१५) त्यांना येशूच्या खंडणी बलिदानाविषयी सांगण्याची गरज असेल; त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्या बलिदानापासून आशीर्वाद मिळवण्याकरता त्यावर विश्‍वास प्रदर्शित करण्यास त्यांना शिकवावे लागेल. त्यांना पूर्वीच्या खोट्या धार्मिक समजुतींचा आणि पूर्वीच्या अयोग्य सवयींचा व प्रथांचा अव्हेर करावा लागेल. खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख करून देणारे नवे मनुष्यत्त्व काय आहे हे शिकून, ते त्यांना धारण करावे लागेल. (इफिस. ४:२२-२४; कलस्सै. ३:९, १०) दुसऱ्‍या मेंढरांपैकी ज्यांचा हर्मगिदोनातून बचाव झालेला असेल त्यांच्यासमोर तेव्हा एक मोठी कामगिरी असेल. सध्याच्या दुष्ट जगाचे ताणतणाव व लक्ष विचलित करणाऱ्‍या सर्व गोष्टींपासून मुक्‍त होऊन, यहोवासाठी ही सेवा करणे खरोखर किती आनंददायक असेल!

१४, १५. मोठ्या संकटातून बचावलेले आणि पुनरुत्थान झालेले नीतिमान जन यांच्यात कोणत्या माहितीची देवाणघेवाण होईल याचे वर्णन करा.

१४ येशू पृथ्वीवर येण्याअगोदर, यहोवाच्या ज्या विश्‍वासू सेवकांचा मृत्यू झाला होता, त्यांनाही तेव्हा बरेच काही शिकायला मिळेल. ते प्रतिज्ञात मशीहाची वाट पाहत होते, पण त्याला ते कधीही पाहू शकले नाहीत. नव्या जगात मात्र, हा मशीहा कोण होता हे त्यांना समजेल. त्यांच्या पूर्वीच्या जीवनातच त्यांनी यहोवाच्या अधीन होऊन त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची तयारी दाखवली होती. अशा व्यक्‍तींना मदत करणे ही किती आनंदाची व सन्मानाची गोष्ट असेल याची कल्पना करा! उदाहरणार्थ, दानीएलाने ज्या भविष्यवाण्या लिहिल्या पण ज्यांचा अर्थ त्याला उमगला नाही, त्या भविष्यवाण्यांचा त्याला खुलासा करून सांगण्याची आपल्याला सुसंधी मिळेल.—दानी. १२:८, ९.

१५ अर्थात, पुनरुत्थित लोकांना ज्याप्रमाणे आपल्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असेल, त्याचप्रमाणे आपल्याजवळही त्यांना विचारण्यासारखे बरेच प्रश्‍न असतील. बायबलमध्ये ज्या घटनांविषयी केवळ उल्लेख केला आहे पण ज्यांचे सविस्तर वर्णन केलेले नाही अशा घटनांविषयी ते आपल्याला कितीतरी गोष्टी सांगू शकतील. येशूचा मावसभाऊ बाप्तिस्मा देणारा योहान याच्याकडून येशूच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल बारीकसारीक गोष्टी जाणून घेणे किती रोमांचक असेल! या विश्‍वासू साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीमुळे आपल्याला देवाच्या वचनाचे सध्याच्या तुलनेत कितीतरी पटीने आणखी चांगल्याप्रकारे आकलन होईल यात शंका नाही. यहोवाच्या ज्या विश्‍वासू सेवकांचा मृत्यू झाला आहे, तसेच अंतसमयादरम्यान ज्यांना मृत्यू येईल त्या सर्वांना “अधिक चांगले पुनरुत्थान” मिळेल. त्यांनी सैतानाच्या नियंत्रणात असलेल्या जगात यहोवाची सेवा करण्यास सुरुवात केली होती. पण नव्या जगातील अनुकूल परिस्थितीत पुन्हा एकदा त्याची सेवा करण्यास त्यांना किती आनंद वाटेल!—इब्री ११:३५; १ योहा. ५:१९.

१६. भविष्यवाणीनुसार, न्यायाच्या दिवसादरम्यान नंतर काय घडेल?

१६ न्यायाच्या दिवसादरम्यान कधीतरी, पुस्तके उघडली जातील. तेव्हा जिवंत असलेल्या सर्वांचा न्याय करण्याकरता, म्हणजेच सार्वकालिक जीवन मिळवण्यास ते पात्र आहेत किंवा नाही हे ठरवण्याकरता बायबलच्या व्यतिरिक्‍त ही पुस्तके देखील एक आधार बनतील. (प्रकटीकरण २०:१२, १३ वाचा.) न्यायाचा दिवस संपेपर्यंत, प्रत्येकजणाला या विश्‍वाच्या सार्वभौमत्त्वाच्या वादात आपण कोणाचा पक्ष घेऊ इच्छितो हे दाखवण्याची पुरेशी संधी मिळालेली असेल. तो देवाच्या राज्याला अधीन होईल का, आणि कोकरा जेव्हा त्याला “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ” नेईल तेव्हा तो त्याच्यासोबत जाईल का? की तो विरोध करेल, आणि देवाच्या राज्याच्या अधीन होण्यास नकार देईल? (प्रकटी. ७:१७; यश. ६५:२०) एव्हाना, पृथ्वीवर असणाऱ्‍या सर्वांना एक वैयक्‍तिक निर्णय घेण्याची संधी मिळालेली असेल. शिवाय, हा निर्णय घेताना त्यांच्यासमोर उपजत पापी स्वभावाचा किंवा दुष्ट वातावरणाचा अडथळा नसेल. कोणीही यहोवाचा अंतिम न्याय योग्य होता की नाही याविषयी शंका घेऊ शकणार नाही. केवळ दुष्ट व्यक्‍तींचा कायमचा सर्वनाश केला जाईल.—प्रकटी. २०:१४, १५.

१७, १८. अभिषिक्‍त ख्रिस्ती व दुसरी मेंढरे न्यायाच्या दिवसाची आनंदाने वाट का पाहात आहेत?

१७ आज अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना राज्य मिळवण्यास योग्य असे गणण्यात आले आहे व ते न्यायाच्या दिवसादरम्यान राज्य करण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. तो किती मोठा बहुमान असेल, याची कल्पना करा! तो बहुमान मिळवण्याची आशा त्यांना, पेत्राने पहिल्या शतकातील बांधवांना दिलेल्या या सल्ल्याचे पालन करण्याची प्रेरणा देते: “बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीहि होणार नाही; आणि तशा प्रकारे आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्‍याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल.”—२ पेत्र १:१०, ११.

१८ अभिषिक्‍त बांधवांना मिळणार असलेल्या अद्‌भुत आशीर्वादांबद्दल दुसऱ्‍या मेंढरांना आनंदच वाटतो. या बांधवांना पाठबळ देत राहण्याचा त्यांचा निर्धार आहे. देवाचे मित्र या नात्याने ते देवाच्या सेवेत आपल्याने होईल तितके करू इच्छितात. न्यायाच्या दिवसादरम्यान जेव्हा येशू त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेईल, तेव्हा ते देवाच्या सर्व व्यवस्थांना पूर्ण मनाने व आनंदाने सहकार्य करतील. सरतेशेवटी, त्यांना सर्वकाळासाठी यहोवाचे पृथ्वीवरील सेवक असण्यास योग्य असे गणण्यात आलेले असेल!—रोम. ८:२०, २१; प्रकटी. २१:१-७.

तुम्हाला आठवते का?

• येशूच्या संपत्तीत कशाकशाचा समावेश होतो?

• मोठ्या लोकसमुदायातील सदस्य आपल्या अभिषिक्‍त बांधवांना कशाप्रकारे साहाय्य पुरवतात?

• मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांना कोणते बहुमान मिळतील व त्यांना कोणती आशा आहे?

• तुम्ही न्यायाच्या दिवसाकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्र]

मोठ्या लोकसमुदायातील सदस्यांनी आपले झगे धुऊन ते कोकऱ्‍याच्या रक्‍तात शुभ्र केले आहेत

[२७ पानांवरील चित्र]

पुनरुत्थान झालेल्या विश्‍वासू जनांकडून तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल?