व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवले तुम्हीही असे करू शकता का?

त्यांनी आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवले तुम्हीही असे करू शकता का?

त्यांनी आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवले तुम्हीही असे करू शकता का?

कॅ नडात राहणारा एक भाऊ मार्क, हा स्पेस एजन्सीजमध्ये वापरल्या जाणाऱ्‍या अत्याधुनिक रोबोट यंत्रणा निर्माण करणाऱ्‍या कंपनीत कामाला होता. ही त्याची अर्धवेळेची नोकरी होती आणि सोबतच तो सामान्य पायनियर सेवा देखील करत होता. मग त्याच्या एका सुपरव्हायजरने त्याला बढतीची ऑफर दिली. कंपनीने त्याला पूर्णवेळेची आणि लठ्ठ पगाराची नोकरी देऊ केली होती. मार्कने ऑफर स्वीकारली का?

एमी ही फिलिपाईन्समध्ये राहणारी एक बहीण, महाविद्यालयीन शिक्षणासोबत सामान्य पायनियर सेवा करत होती. पदवीधर झाल्यावर तिला पूर्णवेळेच्या नोकरीची ऑफर मिळाली. ही नोकरी स्वीकारल्यास तिला दररोज बरेच तास काम करावे लागणार होते, पण पगार मात्र भरपूर मिळणार होता. एमीने काय निर्णय घेतला?

मार्क व एमी या दोघांनी वेगवेगळे निर्णय घेतले. त्यांनी निवडलेल्या वेगवेगळ्या मार्गांमुळे जे परिणाम निष्पन्‍न झाले, त्यांवरून प्राचीन करिंथ येथील ख्रिश्‍चनांना देण्यात आलेल्या एका सल्ल्यातील सुज्ञता आपल्याला दिसून येते. प्रेषित पौलाने त्या ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “जे ह्‍या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे.”—१ करिंथ. ७:२९-३१.

जगाचा उपयोग करा पण पूर्णपणे नाही

मार्क व एमी यांच्यासोबत काय घडले हे जाणून घेण्याअगोदर आपण करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने ‘जग’ (किंवा, ग्रीक भाषेत कॉस्मॉस) हा जो शब्द वापरला होता त्याविषयी थोडा विचार करूया. बायबलच्या या विशिष्ट उताऱ्‍यात, कॉस्मॉस हा शब्द सध्या आपण ज्या जगात राहात आहोत त्याच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. अर्थात, एकंदर मानवी समाज. यात दैनंदिन जीवनातील अन्‍न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गोष्टींचा समावेश आहे. या जीवनावश्‍यक गरजा पूर्ण करण्याकरता आपल्यापैकी बहुतेकांना काहीतरी काम करावेच लागते. किंबहुना, बायबलमध्ये आपल्याला स्वतःची व आपल्या घरच्यांची तरतूद करण्याची आज्ञा देण्यात आली आहे, त्याअर्थी या जगाचा उपयोग करण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही. (१ तीम. ५:८) पण त्याच वेळेस, हे ‘जग नाहीसे होत आहे’ हे ही आपल्याला माहीत आहे. (१ योहा. २:१७) म्हणूनच, आपण जगाचा उपयोग आवश्‍यकतेपुरताच करतो, पण “पूर्णपणे” नाही.—१ करिंथ. ७:३१.

जगाचा कमीतकमी उपयोग करण्यासंबंधी बायबलमधील या सल्ल्याने प्रवृत्त होऊन कित्येक बंधूभगिनींनी आपल्या वैयक्‍तिक परिस्थितीचा आढावा घेतला, नोकरी व्यवसायाकरता घालवला जाणारा वेळ कमी केला आणि एकंदरीतच आपल्या जीवनशैलीतली गुंतागुंत कमी केली. लवकरच त्यांच्या लक्षात आले की हे फेरबदल केल्यामुळे त्यांचे जीवन पूर्वीपेक्षा जास्त अर्थपूर्ण बनले होते. कारण आता त्यांच्याजवळ आपल्या कुटुंबासोबत आणि यहोवाच्या सेवेत घालवण्याकरता जास्त वेळ होता. शिवाय, साध्या राहणीमानामुळे त्यांना या जगावर कमी आणि यहोवावर जास्त विसंबून राहावे लागले. तुम्हीही या बंधुभगिनींच्या पावलांवर पाऊल ठेवून, देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांना अधिक वेळ देण्याकरता आपल्या जीवनात काही फेरबदल करू शकता का?—मत्त. ६:१९-२४, ३३.

“आम्हाला यहोवाच्या आणखी जवळ आल्यासारखं वाटू लागलंय”

प्रस्तावनेत ज्याच्याविषयी उल्लेख केला होता त्या मार्कने, जगाचा पूर्णपणे उपयोग न करण्यासंबंधी बायबलमधील सल्ल्याचे पालन केले. त्याला देऊ करण्यात आलेली बढतीची ऑफर त्याने नाकारली. मार्कने आपला निर्णय बदलावा म्हणून काही दिवसांनंतर त्याच्या सुपरव्हायजरने पगारात आणखी वाढ करू असे त्याला सांगितले. मार्क म्हणतो, “ती एक परीक्षाच होती, पण पुन्हा एकदा मी त्यांची ऑफर नाकारली.” आपल्या या निर्णयामागचे कारण तो सांगतो: “माझी पत्नी पॉला व मी यहोवाची जास्तीत जास्त सेवा करू इच्छित होतो. त्यामुळे आम्ही आपली राहणी अगदी साधी ठेवण्याचा निर्णय घेतला. आमचं ध्येय साध्य करण्यासाठी यहोवाने आम्हाला बुद्धी द्यावी अशी आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली आणि एक निश्‍चित तारीख ठरवून घेतली. या तारखेपर्यंत, यहोवाची अधिक प्रमाणात सेवा करण्यास सुरुवात करण्यासाठी आवश्‍यक पावलं उचलायची असं आम्ही ठरवलं.”

पॉला सांगते: “मी आठवड्यातले तीन दिवस एका दवाखान्यात सेक्रेटरीचं काम करत होते आणि मला चांगला पगार मिळत होता. त्याचवेळेस, मी सामान्य पायनियर सेवाही करत होते. पण मार्कसारखीच माझीही इच्छा होती की आपण राज्य प्रचारकांची जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन यहोवाची सेवा करावी. जेव्हा मी माझ्या सुपरव्हायजरला राजीनाम्याचं पत्र दिलं, तेव्हा तिनं मला सांगितलं की दवाखान्यात नुकतीच एक्झेक्युटिव्ह सेक्रेटरीची एक जागा रिकामी झाली आहे. तिचं म्हणणं होतं की या पदासाठी लागणारी आवश्‍यक पात्रता माझ्याजवळ होती. ही दवाखान्यातल्या सर्व सेक्रेटरी पदांपैकी सर्वात जास्त पगाराची नोकरी होती. पण तरीसुद्धा मी राजीनामा देण्याचा आपला निर्णय बदलला नाही. या नव्या पदासाठी अर्ज न करण्याचं माझं कारण मी सुपरव्हायजरला समजावून सांगितलं तेव्हा तिनं माझ्या विश्‍वासाची प्रशंसा केली.”

यानंतर लवकरच मार्क व पॉला यांना कॅनडाच्या एका दूरच्या क्षेत्रात, एका लहानशा मंडळीत खास पायनियर म्हणून सेवा करण्यास नियुक्‍त करण्यात आले. ही नियुक्‍ती स्वीकारल्यानंतर त्यांना कसे वाटले? मार्क सांगतो: “जवळजवळ अर्धे आयुष्य चांगल्या पगाराची नोकरी केल्यावर ती सोडून देताना मला थोडी भीती वाटली. पण यहोवाने आमच्या सेवाकार्यावर आशीर्वाद दिला आहे. इतरांना देवाची सेवा करायला मदत करताना आम्हाला अवर्णनीय आनंद मिळतो. पूर्ण वेळेच्या सेवाकार्यामुळे वैवाहिक जीवनातही आम्ही जास्त आनंदी आहोत. आमची संभाषणं सहसा, खरोखर महत्त्वाच्या, अर्थात आध्यात्मिक गोष्टींवरच केंद्रित असतात. आम्हाला यहोवाच्या आणखी जवळ आल्यासारखं वाटू लागलंय.” (प्रे. कृत्ये २०:३५) पॉला सांगते: “जेव्हा तुम्ही आपली नोकरी, राहते घर सोडून नव्या ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला पूर्णपणे यहोवावर भरवसा ठेवावा लागतो. आम्हीही हेच केलं आणि यहोवाने आम्हाला अनेक आशीर्वाद दिले. आमच्या नव्या मंडळीतले भाऊबहीण आमच्यावर खूप प्रेम करतात आणि आमच्या मदतीची कदर करतात. आधी जी शक्‍ती मी माझ्या कामासाठीच खर्च करत होते ती आज मी लोकांना आध्यात्मिकरित्या मदत करण्यासाठी खर्च करते. या सेवेत मी अतिशय आनंदी आहे.”

‘कशाचीच कमी नव्हती, पण जीवनात आनंद नव्हता’

आधी जिच्याविषयी उल्लेख केला होता, त्या एमीने मात्र वेगळा मार्ग निवडला. भरपूर पगाराची जी नोकरी तिला ऑफर करण्यात आली होती ती तिने स्वीकारली. एमी सांगते: “पहिल्या वर्षी मी सेवाकार्यात नियमित होते पण हळूहळू मला जाणवलं की ज्या गोष्टींना जीवनात पहिलं स्थान दिलं पाहिजे त्यांविषयी माझा दृष्टिकोन बदलला होता. यहोवाच्या सेवेपेक्षा मला आपल्या करियरमध्ये पुढे जाण्याची ओढ लागली होती. मला बऱ्‍याच ऑफर्सही येऊ लागल्या आणि मी आपल्या व्यवसायातील यशाची एकेक पायरी चढून वर जाण्यासाठी खटाटोप करू लागले. नोकरीच्या जबाबदाऱ्‍या जसजशा वाढत गेल्या तसतसा मला सेवाकार्यासाठी वेळ मिळेनासा झाला. शेवटी तर मी प्रचार कार्याला जाण्याचं पूर्णपणे बंद केलं.”

तेव्हाच्या परिस्थितीकडे मागे वळून पाहताना एमी सांगते: “आर्थिकदृष्ट्या विचार केला, तर मला कशाचीच कमी नव्हती. कामानिमित्ताने मला बऱ्‍याच ठिकाणी प्रवास करायला मिळायचा. शिवाय, माझ्या पदामुळे मला समाजात प्रतिष्ठा लाभली होती. पण माझ्या जीवनात आनंद नव्हता. इतका पैसा असूनही माझ्यासमोर कितीतरी समस्या होत्या. याचं काय कारण असावं, असा मी बरेचदा विचार करायचे. शेवटी मला जाणीव झाली की या जगात करियरच्या मागे लागून, मी ‘विश्‍वासापासून बहकले होते.’ आणि त्यामुळे अगदी देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे माझी अवस्था झाली होती. माझ्या जीवनात ‘पुष्कळशे खेद’ होते.”—१ तीम. ६:१०.

एमीने मग काय केले? ती सांगते: “आध्यात्मिक जीवनात पुन्हा एकदा सुदृढ होण्यासाठी मी वडिलांची मदत मागितली आणि सभांना उपस्थित राहायला सुरुवात केली. एका सभेत एक विशिष्ट गीत गाताना मला रडू कोसळलं. मी पायनियर सेवा करत होते, व आध्यात्मिक कापणीच्या कार्यात सक्रिय होते तो पाच वर्षांचा काळ मला आठवला. आर्थिकदृष्ट्या गरीब असूनही त्या काळात आपण किती आनंदी होतो हे मला आठवलं. आणि त्याच क्षणी मी मनाशी निश्‍चय केला की आता पैशाच्या मागे धावून आपला वेळ वाया घालवण्याऐवजी, राज्याच्या कार्यांना प्राधान्य द्यायचे. यासाठी लगेच मी आपल्या कंपनीत, सध्याच्या पगाराच्या तुलनेत ५० टक्क्यांनी कमी पगार असलेली निम्न दर्जाची नोकरी स्वीकारली. आणि पुन्हा एकदा मी प्रचार कार्यात सहभाग घेऊ लागले.” एमी आनंदाने सांगते: “मला काही वर्षे पायनियर सेवा करण्याचा आनंद लाभला. आज मला जे समाधान अनुभवायला मिळालं आहे ते या जगासाठी राबताना मला कधीही मिळालं नव्हतं.”

तुम्ही आपल्या परिस्थितीत फेरबदल करून आपल्या जीवनशैलीतली गुंतागुंत कमी करू शकता का? यामुळे मिळणारा वेळ जर तुम्ही राज्याच्या कार्यांसाठी उपयोगात आणला तर तुम्हालाही आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवता येईल.—नीति. १०:२२.

[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]

तुम्ही आपल्या परिस्थितीत फेरबदल करून आपल्या जीवनशैलीतली गुंतागुंत कमी करू शकता का?

[१९ पानांवरील चौकट/चित्र]

“मी या कार्याच्या अक्षरशः प्रेमात पडलोय”

डेव्हिड, हे अमेरिकेत राहणारे एक ख्रिस्ती वडील आहेत. आपल्या पत्नी व मुलांसोबत पूर्णवेळेच्या सेवेत उतरण्याची त्यांची केव्हापासूनच इच्छा होती. त्यानुसार, त्यांनी आपल्याच कंपनीत अर्धवेळेची नोकरी स्वीकारली आणि सामान्य पायनियर म्हणून सेवा करू लागले. हा बदल केल्यामुळे त्यांच्याही जीवनाला नवा अर्थ लाभला आहे का? काही महिन्यांनंतर डेव्हिड यांनी आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले: “माझ्या कुटुंबासोबत पूर्णपणे यहोवाच्या सेवेत स्वतःला झोकून दिल्यामुळे मला इतकं समाधान मिळालं आहे की ते दुसऱ्‍या कशानेही मिळू शकणार नाही. मला तर वाटलं होतं की पायनियर सेवेची सवय व्हायला काही काळ लागेल, पण मी तर आताच या कार्याच्या अक्षरशः प्रेमात पडलोय! खरंच ही सेवा अतिशय आनंददायक आहे!”

[१८ पानांवरील चित्र]

सेवेमध्ये भाग घेताना मार्क आणि पॉला