व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या राज्यास योग्य असे गणलेले

देवाच्या राज्यास योग्य असे गणलेले

देवाच्या राज्यास योग्य असे गणलेले

“ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे; तो न्याय हा की, . . . त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.”—२ थेस्सलनी. १:५.

१, २. मानवजातीचा न्याय करण्यासंबंधी देवाने काय ठरवले आहे आणि हा न्याय कोण करेल?

 सामान्य युगाच्या पन्‍नासाव्या वर्षाच्या आसपास, प्रेषित पौल अथेन्स येथे होता. तेथे त्याला सर्वत्र दिसलेल्या मूर्तिपूजेमुळे तो इतका अस्वस्थ झाला की त्यामुळे त्याला तेथील लोकांना खऱ्‍या देवाविषयी साक्ष देण्याची प्रेरणा मिळाली. आणि त्याने अतिशय निपुणतेने त्यांना ही साक्ष दिली. आपल्या उत्कृष्ट व्याख्यानाचा शेवट त्याने अशा एका विधानाने केला, की ज्याने त्याच्या मूर्तिपूजक श्रोत्यांना निश्‍चितच विचार करण्यास भाग पाडले असेल. तो म्हणाला: “आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी [देव] माणसांना आज्ञा करितो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्‍याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.”—प्रे. कृत्ये १७:३०, ३१.

मानवजातीचा न्याय करण्याकरता देवाने भविष्यात एक दिवस नेमला आहे ही गोष्ट खरोखर किती गांभीर्याने विचार करण्याजोगी आहे! तो न्याय ज्या व्यक्‍तिद्वारे केला जाणार आहे, तिचा उल्लेख पौलाने अथेन्समध्ये आपल्या व्याख्यानात केला नव्हता. पण आपल्याला माहीत आहे की हा दुसरा तिसरा कोणी नसून, पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त आहे. येशूने केलेल्या न्यायाचा परिणाम एकतर जीवन असेल किंवा मृत्यू.

३. यहोवाने अब्राहामासोबत करार का बांधला आणि या कराराच्या पूर्णतेत कोणाची विशेष भूमिका आहे?

हा न्यायाचा दिवस १,००० वर्षांच्या कालावधीचा असेल. देवाच्या राज्याचा राजा या नात्याने येशू, यहोवाच्या वतीने न्यायाच्या दिवसाच्या सर्व कार्यांची देखरेख करेल. पण तो एकटाच नसेल. यहोवाने मानवजातीतून इतरांनाही निवडले आहे, व ते येशूसोबत त्या १,००० वर्षांच्या दिवसादरम्यान राज्य करतील आणि न्याय करतील. (पडताळून पाहा लूक २२:२९, ३०.) जवळजवळ ४,००० वर्षांपूर्वी यहोवाने अब्राहाम या आपल्या विश्‍वासू सेवकासोबत एक करार बांधून जणू त्या न्यायाच्या दिवसाचा पाया घातला होता. (उत्पत्ति २२:१७, १८ वाचा.) तो करार सा.यु.पू. १९४३ साली अंमलात आला. अर्थात या कराराचा मानवजातीशी कसा काय संबंध आहे हे अब्राहामाला पूर्णपणे कळले नाही. पण आज आपल्याला मात्र समजले आहे की मानवजातीचा न्याय करण्यासंबंधी देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत अब्राहामाच्या संततीची एक विशेष भूमिका आहे.

४, ५. (क) अब्राहामाच्या संततीतील मुख्य भाग कोण आहे आणि त्याने देवाच्या राज्याबद्दल काय म्हटले? (ख) राज्य व्यवस्थेत सहभागी होण्याची आशा केव्हा बहाल करण्यात आली?

अब्राहामाच्या संततीचा मुख्य भाग येशू असल्याचे सिद्ध झाले. सा.यु. २९ मध्ये त्याला पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले आणि तो मशीहा किंवा ख्रिस्त बनला. (गल. ३:१६) त्यानंतर साडेतीन वर्षांपर्यंत येशूने यहुदी राष्ट्रात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला. बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाला अटक झाल्यानंतर येशूने हे स्पष्ट केले की इतरजणही त्या राज्यात सहभागी होण्याची आशा बाळगू शकतात. त्याने म्हटले: “बाप्तिस्मा करणारा योहान ह्‍याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत.”—मत्त. ११:१२.

लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे, स्वर्गाचे राज्य ‘बळकावणाऱ्‍यांबद्दल’ बोलण्याआधी नुकतेच येशूने असे विधान केले होते: “मी तुम्हास खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्‍याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” (मत्त. ११:११) असे का म्हणता येत होते? कारण सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतण्यात आल्यानंतरच देवाच्या राज्यव्यवस्थेत सहभागी होण्याची आशा खऱ्‍या अर्थाने बहाल करण्यात आली. पण तोपर्यंत, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचा मृत्यू झाला होता.—प्रे. कृत्ये २:१-४.

अब्राहामाच्या संततीचे नीतिमान ठरवले जाणे

६, ७. (क) अब्राहामाची संतती कशाप्रकारे “आकाशातील ताऱ्‍यांइतकी” होणार होती? (ख) अब्राहामाला कोणता आशीर्वाद मिळाला आणि त्याप्रमाणेच त्याच्या संततीलाही कोणता आशीर्वाद मिळतो?

अब्राहामाला सांगण्यात आले होते की त्याची संतती “आकाशातील ताऱ्‍यांइतकी” व समुद्रतीरीच्या वाळूच्या कणांइतकी वाढेल. (उत्प. १३:१६; २२:१७) साहजिकच, अब्राहामाच्या संततीत नेमक्या किती जणांचा समावेश असेल हे जाणून घेणे त्या काळात कोणालाही शक्य नव्हते. पण त्याच्या आत्मिक संततीची नेमकी संख्या नंतर प्रकट करण्यात आली. येशूच्या व्यतिरिक्‍त अब्राहामाच्या संततीत १,४४,००० जणांचा समावेश असणार होता.—प्रकटी. ७:४; १४:१.

अब्राहामाच्या विश्‍वासाच्या संदर्भात देवाचे वचन असे म्हणते: “अब्रामाने परमेश्‍वरावर विश्‍वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्‍वास परमेश्‍वराने त्याचे नीतिमत्त्व गणिला.” (उत्प. १५:५, ६) कोणताही मनुष्य पूर्णपणे नीतिमान असू शकत नाही हे कबूल आहे. (याको. ३:२) तरीसुद्धा, अब्राहामाच्या उल्लेखनीय विश्‍वासामुळे यहोवाने त्याला नीतिमान लेखून त्याच्याशी व्यवहार केला आणि त्याला आपला मित्रही म्हटले. (यश. ४१:८) येशूसोबत जे अब्राहामाच्या आत्मिक संततीचे भाग आहेत त्यांनाही नीतिमान ठरवण्यात आले आहे. किंबहुना, यामुळे त्यांना अब्राहामालाही मिळाले नाहीत अशाप्रकारचे अद्‌भुत आशीर्वाद मिळतात.

८. अब्राहामाच्या संततीमधील सदस्यांना कोणते आशीर्वाद लाभतात?

अभिषिक्‍त ख्रिस्ती येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवत असल्यामुळे त्यांना नीतिमान ठरवले जाते. (रोम. ३:२४, २८) यहोवाच्या लेखी, ते पापाच्या दोषापासून मुक्‍त झाले आहेत आणि त्याअर्थी देवाचे आत्मिक पुत्र, व येशू ख्रिस्ताचे बंधू होण्याकरता पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त केले जाण्यास ते पात्र ठरतात. (योहा. १:१२, १३) ते नव्या कराराचे भागीदार बनतात आणि एक नवे राष्ट्र, अर्थात ‘देवाचे इस्राएल’ बनतात. (गलती. ६:१६; लूक २२:२०) हा त्यांच्याकरता केवढा मोठा बहुमान आहे! पण, देवाने त्यांच्याकरता या सर्व गोष्टी केल्यामुळे अभिषिक्‍त ख्रिस्ती पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा बाळगत नाहीत. न्यायाच्या दिवसादरम्यान येशूसोबत असण्याच्या व स्वर्गात त्याच्यासोबत मिळून राज्य करण्याच्या अवर्णनीय आनंदासाठी ते पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेचा त्याग करतात.—रोमकर ८:१७ वाचा.

९, १०. (क) ख्रिस्ती जनांना पवित्र आत्म्याने सर्वप्रथम केव्हा अभिषिक्‍त करण्यात आले आणि त्यांच्याकरता ही केवळ एक सुरुवात का होती? (ख) अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना कोणती मदत पुरवण्यात आली?

सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी विश्‍वासू जनांच्या एका गटाला, न्यायाच्या दिवसादरम्यान येशूसोबत राज्य करणाऱ्‍यांपैकी असण्याची संधी देण्यात आली. त्या दिवशी येशूच्या जवळजवळ १२० शिष्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आणि अशारितीने ते पहिले अभिषिक्‍त ख्रिस्ती बनले. पण त्यांच्याकरता ती केवळ एक सुरुवात होती. तेव्हापासून, त्यांना सैतानाने आणलेल्या सर्व परीक्षांना तोंड देऊन यहोवाप्रती आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी झटायचे होते. स्वर्गीय जीवनाचा मुकुट मिळवण्याकरता त्यांनी मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहणे गरजेचे होते.—प्रकटी. २:१०.

१० याकरता, यहोवाने आपल्या वचनाच्या व ख्रिस्ती मंडळीच्या माध्यमाने अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना आवश्‍यक असलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन पुरवले. उदाहरणार्थ, पौलाने थेस्सलनीका येथील अभिषिक्‍त ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले: “बाप आपल्या मुलांना करितो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो, की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.”—१ थेस्सलनी. २:११, १२.

११. यहोवाने ‘देवाच्या इस्राएलाकरता’ कोणत्या लिखित अहवालाची तरतूद केली?

११ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीच्या पहिल्या सदस्यांची निवड करण्यात आली, त्यानंतरच्या दशकांत यहोवाने त्यांच्याकरता आणखी एक तरतूद केली. येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्याचा तसेच पहिल्या शतकातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसोबतच्या त्याच्या व्यवहारांचा व त्यांना दिलेल्या मार्गदर्शनाचा एक कायमस्वरूपी लिखित अहवाल तयार करून घेणे यहोवाला योग्य वाटले. त्यानुसार, आधीच अस्तित्वात असलेल्या इब्री शास्त्रवचनांत देवप्रेरित ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची भर घालण्यात आली. इब्री शास्त्रवचने ही मुळात शारीरिक इस्राएली, ज्यांचा देवासोबत एक खास नातेसंबंध होता, त्यांच्याकरता लिहिण्यात आली होती. तर ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने ही मुख्यतः ‘देवाच्या इस्राएलाकरता’ म्हणजेच, ख्रिस्ताचे बंधू व देवाचे आत्मिक पुत्र होण्याकरता ज्यांना अभिषिक्‍त करण्यात आले होते त्यांच्याकरता लिहिण्यात आली. अर्थात, यहुद्यांव्यतिरिक्‍त इतर कोणीही इब्री शास्त्रवचनांचा अभ्यास करून त्यापासून फायदा मिळवू शकत नव्हता अशातला भाग नाही. त्याचप्रमाणे, ज्यांना पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आलेले नाही असे ख्रिस्ती देखील ग्रीक शास्त्रवचनांतील मार्गदर्शनाचा अभ्यास करून व त्याचा अवलंब करून पुष्कळ फायदे मिळवू शकतात.—२ तीमथ्य ३:१५-१७ वाचा.

१२. पौलाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कशाविषयी आठवण करून दिली?

१२ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना नीतिमान ठरवून पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले ते या उद्देशाने की त्यांना त्यांचे स्वर्गीय वतन मिळवता यावे. अभिषिक्‍त या नात्याने, त्यांना पृथ्वीवर असताना इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांवर राजे म्हणून अधिकार चालवण्याचा हक्क नव्हता. पण असे दिसते की सुरुवातीच्या त्या ख्रिश्‍चनांपैकी काहीजणांना या गोष्टीचा विसर पडला होता आणि त्यामुळे ते मंडळीतल्या आपल्या बांधवांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू लागले होते. म्हणूनच पौलाला त्यांना असे म्हणण्याची वेळ आली, की “तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहा! इतक्यातच धनवान झाला आहा! आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनला आहा! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीहि तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.” (१ करिंथ. ४:८) याच कारणास्तव पौलाने आपल्या काळातल्या अभिषिक्‍त जनांना ही आठवण करून दिली: “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो.”—२ करिंथ. १:२४.

पूर्वभाकीत संख्या पूर्ण केली जाणे

१३. सा.यु. ३३ सालानंतर अभिषिक्‍त जनांचे निवडले जाणे कशाप्रकारे सुरू राहिले?

१३ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या सर्वच १,४४,००० सदस्यांना पहिल्या शतकात निवडण्यात आले नाही. त्यांचे निवडले जाणे, प्रेषित जिवंत होते त्या सबंध काळादरम्यान सुरू होते आणि मग काहीसे धीमे पडले असे दिसते. पण, पुढील शतकांदरम्यान आणि थेट आजच्या आधुनिक काळापर्यंत ते सुरू राहिले आहे. (मत्त. २८:२०) कालांतराने, १९१४ या वर्षी येशू राज्य करू लागल्यानंतर घटनाचक्राला वेग आला.

१४, १५. अभिषिक्‍त जनांना निवडण्यासंबंधी आपल्या काळात काय घडले आहे?

१४ सर्वप्रथम येशूने स्वर्गातून, देवाच्या राज्यत्त्वाचा विरोध करणाऱ्‍या सर्व घटकांचे नामोनिशाण मिटवले. (प्रकटीकरण १२:१०, १२ वाचा.) त्यानंतर त्याने आपल्या राज्य शासनाच्या भावी सदस्यांपैकी उर्वरित जनांना एकत्रित करण्याकडे लक्ष वळवले, जेणेकरून १,४४,००० ही संख्या पूर्ण व्हावी. १९३० या दशकाच्या मध्यापर्यंत हे कार्य जवळजवळ पूर्ण होत आले होते आणि प्रचार कार्याला प्रतिसाद देणाऱ्‍यांपैकी बऱ्‍याच जणांना स्वर्गात जाण्याची इच्छा नव्हती. पवित्र आत्मा त्यांना, ते देवाची मुले असल्याची साक्ष देत नव्हता. (पडताळून पाहा रोमकर ८:१६.) उलट, आपण पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ आहोत अशी त्यांना जाणीव झाली. (योहा. १०:१६) त्यामुळे, १९३५ नंतर प्रचार कार्याचा रोख प्रेषित योहानाला दृष्टान्तात दिसलेल्या व ‘मोठ्या संकटातून’ बचावणाऱ्‍या एका ‘मोठ्या लोकसमुदायाला’ एकत्रित करण्याकडे वळाला.—प्रकटी. ७:९, १०, १४.

१५ पण, १९३० चे दशक उलटून गेल्यानंतरच्या वर्षांतही, काही तुरळक व्यक्‍तींना स्वर्गीय आशेकरता निवडण्यात आले आहे. का? काहींच्या बाबतीत, अभिषिक्‍तांपैकी कोणी अविश्‍वासू ठरल्यामुळे त्यांची जागा भरण्याकरता या व्यक्‍तींना निवडण्यात आले असण्याची शक्यता आहे. (पडताळून पाहा प्रकटीकरण ३:१६.) पौलाने स्वतःच्या ओळखीतल्या अशा काही व्यक्‍तींचा उल्लेख केला, ज्यांनी सत्याचा त्याग केला होता. (फिलिप्पै. ३:१७-१९) अशा व्यक्‍तींची जागा भरण्यासाठी यहोवा कोणाला निवडेल? अर्थात हा त्याचा निर्णय आहे. तरीपण, तो अलीकडेच ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारलेल्यांना नव्हे तर स्मारकविधीची सुरुवात करून देताना येशू ज्यांना उद्देशून बोलला त्या शिष्यांसारख्या व्यक्‍तींना, म्हणजेच ज्यांनी काही प्रमाणात तरी आपली एकनिष्ठा आधीच सिद्ध करून दाखवली आहे अशा व्यक्‍तींना निवडेल हेच तर्कशुद्ध वाटते. *लूक २२:२८.

१६. अभिषिक्‍तांच्या संदर्भात आपण कृतज्ञ का असू शकतो आणि आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?

१६ पण, असे भासते की १९३० नंतर स्वर्गीय आशेकरता ज्यांना निवडण्यात आले आहे, ते सर्वच जण, अविश्‍वासू ठरलेल्या अभिषिक्‍तांची जागा भरण्यासाठी निवडण्यात आलेले नाहीत. या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसांत, ‘मोठ्या बाबेलचा’ नाश होईस्तोवर अभिषिक्‍त ख्रिस्तीजन आपल्यासोबत असावेत अशी यहोवाने तरतूद केली आहे असे दिसते. (प्रकटी. १७:५) आपण खात्री बाळगू शकतो की यहोवाच्या नेमलेल्या वेळी १,४४,००० जनांची संख्या पूर्ण होईल आणि शेवटी ते सर्वजण देवाच्या राज्यशासनात भाग घेतील. तसेच सतत वाढत असणारा मोठा लोकसमुदाय एक गट यानात्याने यापुढेही देवाला एकनिष्ठ राहील असे सांगणाऱ्‍या भविष्यसूचक वचनावरही आपण भरवसा ठेवू शकतो. लवकरच हा लोकसमुदाय सैतानाच्या जगावर येणाऱ्‍या “मोठ्या संकटातून” बचावून, आनंदाने देवाच्या नव्या जगात प्रवेश करेल.

देवाचे स्वर्गीय सरकार जवळजवळ पूर्ण झाले आहे

१७. १ थेस्सलनीकाकर ४:१५-१७ व प्रकटीकरण ६:९-११ या वचनांनुसार मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या बाबतीत काय घडले आहे?

१७ सा.यु. ३३ पासून हजारो अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी दृढ विश्‍वास प्रदर्शित केला व ते मृत्यूपर्यंत आपल्या विश्‍वासात टिकून राहिले. त्यांना राज्य मिळवण्यास योग्य असे गणण्यात आले आणि ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना त्यांचे प्रतिफळ देण्यास प्रारंभ झाला.—१ थेस्सलनीकाकर ४:१५-१७; प्रकटीकरण ६:९-११ वाचा.

१८. (क) अद्याप पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्‍तांना कशाविषयी खात्री आहे? (ख) दुसरी मेंढरे आपल्या अभिषिक्‍त ख्रिस्ती बांधवांविषयी कसा दृष्टिकोन बाळगतात?

१८ अभिषिक्‍तांपैकी जे अद्याप पृथ्वीवर आहेत त्यांना पूर्ण खात्री आहे की जर ते विश्‍वासात टिकून राहिले तर त्यांना लवकरच त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळेल. या अभिषिक्‍त बांधवांच्या विश्‍वासाकडे पाहिल्यावर लक्षावधी दुसरी मेंढरे प्रेषित पौलाच्या या शब्दांशी सहमत होतात, जे त्याने थेस्सलनीका येथील अभिषिक्‍त बांधवांच्या संदर्भात लिहिले होते: “तुमच्या सर्व छळात व तुम्ही सोशीत असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्‍वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यातून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करितो. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.” (२ थेस्सलनी. १:३-५) जेव्हा अभिषिक्‍तांपैकी शेवटल्या सदस्याचा मृत्यू होऊन तो स्वर्गात जाईल, मग हे केव्हाही घडो, तेव्हा देवाचे स्वर्गीय सरकार पूर्ण झालेले असेल. तो स्वर्गात आणि पृथ्वीवरही किती आनंदाचा दिवस असेल!

[तळटीप]

^ टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, १९९८ अंकातील पृष्ठ २० वर परिच्छेद १० पाहावा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• देवाने अब्राहामाला प्रकट केलेल्या कोणत्या माहितीचा न्यायाच्या दिवसाशी संबंध होता?

• अब्राहामाला नीतिमान का ठरवण्यात आले?

• नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे अब्राहामाच्या संततीपैकी असलेल्यांना कोणते आशीर्वाद लाभतात?

• सर्व ख्रिश्‍चनांना कशाविषयी खात्री आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्र]

येशूने आपल्या अनुयायांस राज्य मिळवण्याकरता झटण्याचे प्रोत्साहन दिले

[२१ पानांवरील चित्र]

सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाने अब्राहामाच्या संततीमधील इतर सदस्यांना निवडण्यास सुरुवात केली

[२३ पानांवरील चित्रे]

या शेवटल्या काळात अभिषिक्‍त बंधू अद्याप आपल्यासोबत आहेत याबद्दल दुसरी मेंढरे कृतज्ञ आहेत