व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘प्रभूमध्ये तुला मिळालेल्या सेवेकडे लक्ष दे’

‘प्रभूमध्ये तुला मिळालेल्या सेवेकडे लक्ष दे’

‘प्रभूमध्ये तुला मिळालेल्या सेवेकडे लक्ष दे’

“जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.”—कलस्सै. ४:१७.

१, २. मानवजातीप्रती ख्रिश्‍चनांची काय जबाबदारी आहे?

 आपल्या सभोवती राहणाऱ्‍या लोकांप्रती आपली एक गंभीर जबाबदारी आहे. ते आत्ता जो निर्णय घेतात त्यावर, ‘मोठ्या संकटात’ ते वाचतील अथवा नाश पावतील हे निर्भर आहे. (प्रकटी. ७:१४) नीतिसूत्राच्या ईश्‍वरप्रेरित लेखकाने असे म्हटले: “ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांस सोडीव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर.” किती महत्त्वपूर्ण शब्द आहेत हे! लोकांसमोर असलेल्या निवडींविषयीची चेतावनी देण्याची जबाबदारी आपण पूर्ण केली नाही तर त्यांच्या मृत्यूस आपण जबाबदार ठरू. इतकेच नव्हे तर त्याच वचनात पुढे काय म्हटले आहे ते पाहा: “आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदये तोलून पाहणाऱ्‍यांस हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्‍याला माहीत नाही काय? तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृतींप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय?” तेव्हा, लोकांसमोर असलेल्या धोक्याविषयी ‘आम्हास ठाऊक नव्हते’ असे यहोवाचे सेवक म्हणू शकत नाहीत.—नीति. २४:११, १२.

यहोवा जीवनास मौल्यवान समजतो. तो आपल्या सेवकांना, होता होईल तितक्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यास आर्जवतो. देवाच्या प्रत्येक सेवकाने, देवाच्या वचनात असलेला जीवन वाचवणारा संदेश इतरांना सांगितलाच पाहिजे. आपले काम हे एका पहारेकऱ्‍याच्या कामासारखेच आहे जो, धोक्याची चाहुल लागताच सावधगिरीचा इशारा देतो. नाश होण्याचा धोका असलेल्यांचे रक्‍त आपल्या डोक्यावर यावे असे आपल्याला वाटणार नाही. (यहे. ३३:१-७) यास्तव, आपण “वचनाची घोषणा” करीत राहिले पाहिजे.—२ तीमथ्य ४:१, २,  वाचा.

३. या आणि पुढील दोन लेखांत कोणत्या विषयांची चर्चा करण्यात आली आहे?

जीवन वाचवणारा संदेश सांगताना आपल्यासमोर येणाऱ्‍या अडथळ्यांवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो आणि अधिकाधिक लोकांना मदत कशी करू शकतो याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे. यानंतरच्या लेखात, महत्त्वपूर्ण सत्ये शिकवण्याची कला तुम्ही कशाप्रकारे विकसित करू शकता याचे परीक्षण केले जाईल. तिसऱ्‍या अभ्यास लेखात, संपूर्ण जगभरातील राज्य प्रचारकांना मिळत असलेल्या प्रोत्हासनदायक परिणामांचा अहवाल देण्यात आला आहे. परंतु या विषयांची चर्चा सुरू करण्याआधी आपण, आपला काळ इतका कठीण का होत चालला आहे यावर फेरविचार करूया.

अनेक लोक आशाहीन का आहेत?

४, ५. मानवजात काय अनुभवत आहे आणि अनेक लोक कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवत आहेत?

जगात घडणाऱ्‍या घटना सूचित करतात, की आपण ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात जगत आहोत आणि अंत फार जवळ आला आहे. ‘शेवटल्या काळाचे’ चिन्ह असलेल्या घटना व परिस्थिती मानवजात अनुभवत आहे. या ‘वेदनांमध्ये’ युद्धे, अन्‍नटंचाई, भूमिकंप आणि इतर संकटांचा देखील समावेश होतो ज्यांमुळे मानवजात त्रस्त झाली आहे. अन्याय, स्वार्थ आणि देवाच्या विरोधात असलेली मनोवृत्ती सर्वत्र पाहायला मिळते. बायबलच्या दर्जांनुसार जगू इच्छिणाऱ्‍या लोकांनासुद्धा ‘शेवटल्या काळाची’ झळ पोहचत आहे.—मत्त. २४:३, ६-८, १२; २ तीम. ३:१-५.

परंतु मानवजातीतील बहुतेक लोकांना जागतिक घटनांचा खरा अर्थ समजत नाही. त्यामुळे पुष्कळ लोकांना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी लागली आहे. आपले प्रिय जन मरण पावल्यामुळे व इतर संकटे कोसळल्यामुळे अनेक लोक दुःखी झाले आहेत. या गोष्टी का घडत आहेत आणि यांवर उपाय काय याविषयी अचूक ज्ञान नसल्यामुळे हे लोक आशाहीन आहेत.—इफिस. २:१२.

६. “मोठी बाबेल” आपल्या अनुयायांना मदत का करू शकली नाही?

खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य असलेल्या ‘मोठ्या बाबेलीने’ मानवजातीला कसलेही सांत्वन दिलेले नाही. उलट, आपला ‘जारकर्मरूपी द्राक्षारस’ पाजून तिने अनेक लोकांना आध्यात्मिक अर्थाने गोंधळात पाडले आहे. शिवाय, एका वेश्‍येप्रमाणे खोट्या धर्माने, बहुतेक लोकांना त्यांच्या राजकीय नेत्यांच्या निमूटपणे अधीन राहण्याकरता खोट्या शिकवणी व दुरात्मिक प्रथा यांच्याद्वारे ‘पृथ्वीवरील राजांना’ भुलवले आहे आणि त्यांना आपल्या कह्‍यात घेतले आहे. अशाप्रकारे खोट्या धर्माने सत्ता आणि प्रभाव मिळवला असला तरी, धार्मिक सत्यांचा पूर्णपणे परित्याग केला आहे.—प्रकटी. १७:१, २, ५; १८:२३.

७. बहुतेक मानवजातीचे काय होणार आहे, परंतु काहींना कशाप्रकारे मदत करता येईल?

येशूने असे शिकवले, की मानवजातीतील बहुतेक जण नाशाकडे जाणाऱ्‍या रुंद मार्गावर वाटचाल करीत आहेत. (मत्त. ७:१३, १४) काही लोक या रुंद मार्गावर यासाठी आहेत कारण त्यांनी, बायबल जे शिकवते त्याला नकार देण्याची मुद्दामहून निवड केली आहे; पण, असेही पुष्कळ लोक त्या रुंद मार्गावर आहेत ज्यांची फसवणूक करण्यात आली आहे अथवा यहोवा त्यांच्याकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा करतो याबाबतीत त्यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. अशा लोकांना, त्यांची जीवनशैली त्यांनी बदलली पाहिजे याबद्दलची शास्त्रावर आधारीत कारणे दाखवली तर ते कदाचित बदलतीलही. परंतु जे मोठ्या बाबेलीचा भाग बनून राहतात व बायबलच्या स्तरांचा स्वीकार करण्यास नकार देत राहतात ते “मोठ्या संकटातून” वाचणार नाहीत.—प्रकटी. ७:१४.

प्रचार करणे ‘सोडू नका’

८, ९. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना विरोधाचा सामना करावा लागला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती व त्यांनी अशी प्रतिक्रिया का दाखवली?

आपले शिष्य राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतील आणि शिष्य बनवतील, असे येशूने म्हटले. (मत्त. २८:१९, २०) यास्तव, प्रचार कार्यात भाग घेऊन खरे ख्रिस्ती देवाला एकनिष्ठा दाखवतात व ही आपल्या ख्रिस्ती विश्‍वासातील एक अत्यावश्‍यक बाब आहे असे ते मानतात. म्हणूनच येशूचे आरंभीचे अनुयायी विरोधाला न जुमानता प्रचार कार्य करीत राहिले. प्रचार कार्यासाठी आपल्याला बळ मिळावे आणि “पूर्ण धैर्याने [देवाचे] वचन” बोलत राहावे म्हणून ते यहोवावर विसंबून राहिले व त्याला प्रार्थना करीत राहिले. यहोवाने त्यांची प्रार्थना ऐकून त्यांना भरपूर पवित्र आत्मा दिला आणि ते देवाचे वचन निर्भयतेने बोलत राहिले.—प्रे. कृत्ये ४:१८, २९, ३१.

विरोधाला जेव्हा हिंसक वळण लागले तेव्हा येशूचे अनुयायी, सुवार्तेचा प्रचार करण्याच्या त्यांच्या निश्‍चयात डगमगले का? मुळीच नाही. प्रेषितांच्या प्रचार कार्यामुळे चिडलेल्या यहुदी धार्मिक नेत्यांनी त्यांना अटक केली, ठार मारण्याची धमकी दिली, त्यांना मारहाण केली. तरीपण प्रेषितांनी ‘येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे सोडले नाही.’ आपण “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे,” याची त्यांना चांगल्याप्रकारे जाणीव होती.—प्रे. कृत्ये ५:२८, २९, ४०-४२.

१०. आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांना कोणत्या परीक्षांना तोंड द्यावे लागते; तरीपण त्यांच्या उत्तम आचरणाचा काय परिणाम होऊ शकतो?

१० देवाच्या बहुतेक सेवकांना आज, प्रचार कार्यामुळे मारहाण अथवा तुरुंगवास सहन करावा लागलेला नाही. तरीपण सर्व ख्रिश्‍चनांना या नाही तर त्या मार्गाने परीक्षांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ, तुमचा बायबल प्रशिक्षित विवेक तुम्हाला, जगाप्रमाणे न चालता किंवा जगिक लोकांप्रमाणे न दिसता देवाच्या स्तरांनुसार चालण्यास व जगापासून वेगळे असे राहण्यास प्रवृत्त करेल. तुम्ही बायबल तत्त्वांनुसार निर्णय घेत असल्यामुळे तुमच्याबरोबर काम करणारे तुमचे सहकर्मी, तुमचे शाळासोबती किंवा तुमचे शेजारी तुम्हाला जरा तऱ्‍हेवाईकच समजतील. असे असले तरी, त्यांच्या नकारात्मक प्रतिसादाने तुम्ही हार मानू नका. हे जग आध्यात्मिक अर्थाने अंधकारात आहे परंतु ख्रिश्‍चनांनी “ज्योतीसारखे” चमकले पाहिजे. (फिलिप्पै. २:१५) कदाचित काही प्रामाणिक लोक तुमची चांगली कामे पाहून तुमची प्रशंसा करतील आणि याद्वारे यहोवा देवाचे गौरव होईल.—मत्तय ५:१६ वाचा.

११. (क) काही जण प्रचार कार्याला कसा प्रतिसाद देतील? (ख) प्रेषित पौलाने कोणत्या प्रकारच्या विरोधाला तोंड दिले व त्याची प्रतिक्रिया काय होती?

११ राज्य संदेशाचा प्रचार करीत राहण्याकरता आपल्याला धैर्याची गरज आहे. काही लोक, कदाचित तुमचे नातेवाईक देखील तुमची थट्टा करतील किंवा या नाही तर त्या मार्गाने तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. (मत्त. १०:३६) प्रेषित पौल विश्‍वासूपणे सेवा करीत होता त्यामुळे त्याला अनेकदा मारहाण करण्यात आली. परंतु या विरोधाला त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली ते पाहा. त्याने लिहिले: ‘आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसल्यानंतर, मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.’ (१ थेस्सलनी. २:२) पौलाला पकडून नेण्यात आले, त्याचे कपडे उतरविण्यात आले, त्याला सळयांनी मारण्यात आले आणि मग तुरुंगात टाकण्यात आले. हे सर्व झाल्यावरही सुवार्तेविषयी बोलत राहण्यासाठी पौलाला नक्कीच धैर्याची आवश्‍यकता होती. (प्रे. कृत्ये १६:१९-२४) इतके धैर्य त्याला कोठून मिळाले? देवाने दिलेल्या प्रचार कार्याची नेमणूक पूर्ण करण्याची त्याची तीव्र इच्छा होती त्यामुळे त्याला हे धैर्य मिळाले.—१ करिंथ. ९:१६.

१२, १३. काहींना कोणत्या अडीअडचणींना तोंड द्यावे लागते व यांवर मात करण्यासाठी त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला आहे?

१२ लोक सहसा घरी सापडत नाहीत किंवा राज्य संदेशाला इतक्या उत्साहाने प्रतिसाद देत नाहीत अशा क्षेत्रांमध्ये आपला आवेश टिकवून ठेवणे कठिणच असू शकते. अशा वेळी आपण काय करू शकतो? अशावेळी, जेथे कोठे लोक भेटतात तेथे त्यांच्याबरोबर बोलण्याकरता आपल्याला अधिक धैर्य एकवटावे लागेल. कदाचित आपल्याला आपल्या वेळेच्या आराखड्यात फेरबदल करावे लागतील किंवा अधिकाधिक लोक सापडतील अशा क्षेत्रांत प्रचार करण्याचे प्रयत्न करावे लागतील.—पडताळून पाहा योहान ४:७-१५; प्रे. कृत्ये १६:१३; १७:१७.

१३ इतरांना वाढते वय व आजारपण यासारख्या अडीअडचणींना तोंड द्यावे लागेल. यामुळे प्रचार कार्यात ते पूर्वीसारखा सहभाग घेऊ शकणार नाहीत. तुमच्या बाबतीत असे असेल तर निराश होऊ नका. यहोवाला तुमच्या परिस्थितीची चांगली जाणीव आहे व तुम्ही जितके करू शकता त्याबद्दल तो संतुष्ट आहे. (२ करिंथकर ८:१२ वाचा.) विरोध, लोकांची अनास्था किंवा आजारपण—यांपैकी कोणत्याही संकटाचा तुम्हाला सामना करावा लागत असला तरी इतरांना सुवार्ता सांगण्याकरता तुमच्या परीने होता होईल तितका प्रयत्न करा.—नीति. ३:२७; पडताळून पाहा मार्क १२:४१-४४.

‘सेवेकडे लक्ष’ द्या

१४. प्रेषित पौलाने सहख्रिश्‍चनांकरता कोणता कित्ता घालून दिला आणि त्याने कोणता सल्ला दिला?

१४ प्रेषित पौलाने आपली सेवा पूर्ण मनाने केली आणि आपल्या सहविश्‍वासू बंधूभगिनींना देखील असेच करण्याचे उत्तेजन दिले. (प्रे. कृत्ये २०:२०, २१; १ करिंथ. ११:१) पहिल्या शतकात, आर्खिप्पा नावाच्या एका ख्रिस्ती बांधवाला पौलाने खास प्रोत्साहन दिले. कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने असे म्हटले: “आर्खिप्पाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.” (कलस्सै. ४:१७) आर्खिप्पा कोण होता किंवा तो कोणत्या परिस्थितीत होता हे आपल्याला माहीत नाही. पण त्याने प्रचार करण्याची नेमणूक स्वीकारली होती असे दिसते. तुम्ही जर एक समर्पित ख्रिस्ती असाल तर तुम्ही देखील प्रचार करण्याची नेमणूक स्वीकारली आहे. मग ही नेमणूक पूर्ण करण्याकरता तुम्ही तिच्याकडे सातत्याने लक्ष देत आहात का?

१५. ख्रिस्ती समर्पणात काय काय गोवलेले आहे आणि यामुळे कोणते प्रश्‍न उभे राहतात?

१५ बाप्तिस्म्याआधी आपण मनःपूर्वक प्रार्थनेद्वारे यहोवा देवाला आपले जीवन समर्पित केले. याचा अर्थ आपण त्याची इच्छा पूर्ण करण्याचा निश्‍चय केला. यास्तव आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘देवाची इच्छा पूर्ण करणे ही खरोखरच माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे का?’ यहोवा आपल्याकडून इतरही जबाबदाऱ्‍यांची अपेक्षा करतो जसे की, आपल्या कुटुंबाची काळजी घेणे. (१ तीम. ५:८) परंतु आपण आपला उरलेला वेळ आणि आपली शक्‍ती कशाप्रकारे उपयोगात आणतो? आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व आहे?—२ करिंथकर ५:१४, १५ वाचा.

१६, १७. तरुण ख्रिस्ती अथवा कमी जबाबदाऱ्‍या असलेल्या तरुण बंधूभगिनींपुढे कोणते द्वार खुले आहे?

१६ तुम्ही, शालेय शिक्षण पूर्ण केलेले अथवा शिक्षण संपवण्याच्या बेतात असलेले तरुण समर्पित ख्रिस्ती आहात का? कदाचित तुमच्या खांद्यावर अजूनतरी कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या आल्या नसतील. मग, जीवनात तुम्ही काय करू इच्छिता? कोणते निर्णय तुम्हाला, यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचे तुम्ही दिलेले वचन पाळण्यास मदत करू शकतात? अनेक तरुणांनी पायनियरींग करता यावे म्हणून आपल्या जीवनशैलीत फेरबदल केले आहेत आणि यामुळे त्यांनी पुष्कळ आनंद व समाधानही अनुभवले आहे.—स्तो. ११०:३; उप. १२:१.

१७ तुम्ही कदाचित एक प्रौढ तरुण आहात. तुमच्याजवळ पूर्ण वेळेची नोकरी आहे परंतु तुमच्यावर जास्त जबाबदाऱ्‍या नाहीत; तुम्हाला फक्‍त तुमच्यापुरताच खर्च करावा लागतो. तुम्हाला जसा वेळ मिळतो तसे तुम्ही मंडळीच्या कार्यांत भाग घेता आणि यांतून तुम्हाला आनंदही मिळतो. तुम्हाला अधिक आनंद अनुभवायला आवडेल का? सेवेमध्ये अधिक सहभाग घेण्याविषयी कधी तुम्ही विचार केला आहे का? (स्तो. ३४:८; नीति. १०:२२) काही क्षेत्रांत, सत्याचा जीवनदायक संदेश सर्वांपर्यंत पोहचवणे अद्याप बाकी आहे. तुमच्या जीवनशैलीत बदल करून तुम्ही राज्य उद्‌घोषकांची गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करू शकाल का?—१ तीमथ्य ६:६-८ वाचा.

१८. एका तरुण जोडप्याने कोणते बदल केले आणि याचा परिणाम काय झाला?

१८ अमेरिकेतील केव्हन आणि एलनाचे उदाहरण घ्या. * त्यांच्या भागात नवीनच लग्न झालेल्या दांपत्याला सहसा जसे वाटते तसेच यांनाही आपले स्वतःचे एक घरकुल असावे, असे वाटले. दोघेही पूर्ण वेळ नोकरी करत असल्यामुळे आरामात राहत होते. पण, नोकरी आणि घर दोन्ही सांभाळावे लागत असल्यामुळे क्षेत्र सेवेसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नव्हता. आपण सर्व वेळ आणि शक्‍ती आपल्या उंची जीवनशैलीतच खर्च करत आहोत, हे दोघांनाही जाणवले. त्यांनी एका आनंदी पायनियर जोडप्याची साधी जीवनशैली पाहिली. तेव्हा केव्हन आणि एलनाने, आपले लक्ष बिन महत्त्वाच्या गोष्टींवरून महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित करण्याचे ठरवले. प्रार्थनेद्वारे यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी आपले घर विकले आणि ते एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. एलनाने नोकरीची वेळ कमी करून घेतली आणि ती पायनियर बनली. आपली पत्नी सेवेमध्ये जो आनंद अनुभवत होती तो पाहून केव्हनने देखील आपली पूर्ण वेळेची नोकरी सोडून दिली आणि पायनियरींग सुरू केली. काही वेळानंतर, ते एका दक्षिण अमेरिकन राष्ट्रात राहायला गेले जेथे राज्य उद्‌घोषकांची अधिक गरज होती. केव्हन म्हणतो: “आमचं वैवाहिक जीवन नेहमी आनंदी होतं, पण जेव्हा आम्ही आध्यात्मिक ध्येये ठेवून ती पूर्ण करू लागलो तेव्हा तर आम्ही अधिकच आनंदी व समाधानी झालो.”—मत्तय ६:१९-२२ वाचा.

१९, २०. आज सुवार्तेचे प्रचार कार्य हे जगाच्या पाठीवर चाललेले सर्वात महत्त्वाचे कार्य का आहे?

१९ आज, सुवार्तेचे प्रचार कार्य हे जगाच्या पाठीवर चाललेले सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. (प्रकटी. १४:६, ७) यामुळे यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण होते. (मत्त. ६:९) दर वर्षी जे हजारो लोक बायबलमधील संदेश स्वीकारतात त्यांचे जीवन सुधारते आणि यामुळे त्यांचा बचाव होऊ शकतो. तरीपण, “घोषणा करणाऱ्‍यावाचून ते कसे ऐकतील?” असे प्रेषित पौलाने विचारले. (रोम. १०:१४, १५) खरेच, कसे ऐकतील? आपली सेवा पूर्ण करण्याकरता शक्य तो प्रयत्न करण्याचा दृढनिश्‍चय करायला काय हरकत आहे?

२० उत्तम शिक्षक होण्याद्वारे आपण लोकांना आणखी एका मार्गाने, या कठीण दिवसांचे महत्त्व आणि ते जीवनात घेत असलेल्या निर्णयांचे परिणाम समजण्यास मदत करू शकतो. हे तुम्ही कसे करू शकता याची पुढील लेखात आणखी चर्चा करण्यात आली आहे.

[तळटीप]

^ नावे बदलण्यात आली आहेत.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• मानवजातीप्रती ख्रिश्‍चनांची काय जबाबदारी आहे?

• आपल्या प्रचार कार्यात येणाऱ्‍या अडथळ्यांवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो?

• आपण स्वीकारलेली सेवा कशाप्रकारे पूर्ण करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चित्र]

विरोधाला न जुमानता प्रचार करीत राहण्याकरता धैर्याची आवश्‍यकता आहे

[७ पानांवरील चित्र]

क्वचितच घरी लोक सापडतात अशा क्षेत्रात तुम्ही प्रचार करत असाल तर तुम्ही काय करू शकता?