व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे

मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे

येशूच्या जीवनाचा व त्याच्या सेवाकार्याचा रोमांचक अहवाल लिहून ठेवणाऱ्‍यांपैकी मत्तय पहिला होता. एकेकाळी जकातदार असणारा हा मत्तय येशूचा जवळचा सोबती होता. मत्तयाचे शुभवर्तमान मुळात इब्री भाषेत लिहिण्यात आले आणि नंतर त्याचा ग्रीक भाषेत अनुवाद करण्यात आला. सा.यु. ४१ सालाच्या सुमारास लिहून पूर्ण झालेले हे पुस्तक जणू इब्री शास्त्रवचने व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने यांना जोडणारा दुवा आहे.

मुख्यतः यहुदी वाचकांना मनात ठेवून लिहिण्यात आलेले हे हृदयस्पर्शी व अर्थभरीत शुभवर्तमान, येशूची प्रतिज्ञात मशीहा व देवाचा पुत्र म्हणून ओळख करून देते. या पुस्तकातील संदेशाकडे लक्ष दिल्यास, खऱ्‍या देवावर व त्याच्या अभिवचनांवर तसेच त्याच्या पुत्रावर आपला विश्‍वास आणखी मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही.—इब्री ४:१२.

“स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे”

(मत्त. १:१–२०:३४)

मत्तय त्याच्या पुस्तकात देवाच्या राज्याच्या मुख्य विषयावर व येशूच्या शिकवणींवर भर देतो. त्यामुळे काहीवेळा या पुस्तकातील घटना त्यांच्या कालक्रमानुसार सादर केलेल्या नाहीत असे आढळते. उदाहरणार्थ, डोंगरावरील प्रवचन हे आपल्याला मत्तयाच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळते. पण मुळात हे प्रवचन येशूने आपले सेवाकार्य सुरू केल्यावर जवळजवळ एका वर्षांनंतर दिले होते.

गालील प्रांतात सेवाकार्य करत असताना येशू अनेक चमत्कार करतो, १२ प्रेषितांना सेवाकार्य कसे करायचे यासंबंधी सूचना देतो, परूशांची निर्भर्त्सना करतो आणि राज्याशी संबंधित असणारे निरनिराळे दृष्टान्त सांगतो. त्यानंतर तो गालीलातून निघून “यार्देनेच्या पलीकडे यहूदीया प्रांतात” येतो. (मत्त. १९:१) वाटेने जात असताना येशू आपल्या शिष्यांना सांगतो: ‘आपण वर यरुशलेमेस जात आहो आणि [मुख्य याजक व शास्त्री] मनुष्याच्या पुत्राला मरणदंड ठरवितील आणि तिसऱ्‍या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.’—मत्त. २०:१८, १९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३:१६—येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी “आकाश उघडले” याचा काय अर्थ होतो? येशूला आपल्या मानवी जीवनापूर्वीच्या अस्तित्वाचे स्मरण झाले असे यावरून सूचित होत असावे.

५:२१, २२—क्रोध व्यक्‍त करणे हे मनात क्रोध बाळगण्यापेक्षा जास्त गंभीर आहे का? येशूने अशी ताकीद दिली की जो आपल्या भावाविरुद्ध मनात क्रोध बाळगतो तो एक गंभीर पाप करतो. पण एखादा तिरस्कारपूर्ण शब्द बोलून आपला क्रोध व्यक्‍त करणे हे त्याहीपेक्षा गंभीर स्वरूपाचे आहे. असे करणारा लहानशा स्थानिक न्यायालयात नव्हे तर वरिष्ठ न्यायालयात आपल्या या गुन्ह्यासाठी जबाबदार ठरेल.

५:४८—‘जसा आपला स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे पूर्ण होणे’ आपल्याला खरोखरच शक्य आहे का? हो, एका अर्थाने हे शक्य आहे. येशू येथे प्रीती या विषयावर चर्चा करत होता आणि त्याने श्रोत्यांना सांगितले की प्रीती दाखवण्याच्या बाबतीत त्यांनी देवाचे अनुकरण करावे आणि याबाबतीत पूर्ण व्हावे. (मत्त. ५:४३-४७) ते कसे? आपल्या शत्रूंवरही प्रीती करण्याद्वारे.

७:१६—खऱ्‍या धर्माची ओळख करून देणारी “फळे” कोणती? ही फळे म्हणजे केवळ आपले आचरण नव्हे. तर यांत आपले विश्‍वास व ज्या शिकवणींचा आपण अवलंब करतो त्यांचाही समावेश आहे.

१०:३४-३८—बायबलमधल्या संदेशामुळे कुटुंबात मतभेद होतात का? मुळीच नाही. उलट, सत्य न मानणाऱ्‍या कुटुंबीयांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे कुटुंबात फूट पडते. कुटंबातील सदस्य ख्रिस्ती विश्‍वासांचा स्वीकार करत नाहीत अथवा त्यांचा विरोध करतात तेव्हा कुटुंबात साहजिकच समस्या निर्माण होतात.—लूक १२:५१-५३.

११:२-६—देवाने येशूविषयी संतुष्टी व्यक्‍त करताना योहानाने ऐकले होते आणि त्यामुळे येशू हाच मशीहा आहे हे त्याला माहीत होते, तर मग ‘जो येणार आहे’ तो येशूच आहे का, असे त्याने का विचारले? योहानाने कदाचित येशूच्या तोंडून या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी हा प्रश्‍न विचारला असावा. शिवाय, योहानाला जाणून घ्यायचे होते की ‘दुसरा’ कोणी राज्याधिकारासह येऊन यहुद्यांच्या सगळ्या आशा पूर्ण करेल का? येशूच्या उत्तरावरून हे स्पष्ट झाले की त्याच्या मागून दुसरा कोणीही येणार नव्हता.

१९:२८—“इस्राएलाच्या [ज्या] बारा वंशांचा” न्यायनिवाडा केला जाईल ते बारा वंश कोणास सूचित करतात? हे बारा वंश आत्मिक इस्राएलाच्या बारा वंशांना सूचित करत नाहीत. (गल. ६:१६; प्रकटी. ७:४-८) येशू या प्रसंगी प्रेषितांशी बोलत होता. हे प्रेषित, आत्मिक इस्राएलाच्या सदस्यांचा न्यायनिवाडा करणारे नव्हे तर स्वतः आत्मिक इस्राएलाचे सदस्य असणार होते. येशूने त्यांच्यासोबत राज्याचा करार केला आणि ते ‘देवासाठी राज्य व याजक’ होतील असे त्यांना सांगितले. (लूक २२:२८-३०; प्रकटी. ५:१०) आत्मिक इस्राएलाचे सदस्य “जगाचा न्यायनिवाडा” करणार आहेत. (१ करिंथ. ६:२) त्याअर्थी, स्वर्गीय सिंहासनांवर बसलेले, ‘इस्राएलाच्या ज्या बारा वंशांचा’ न्यायनिवाडा करतील ते बारा वंश, राजांच्या व याजकांच्या त्या खास गटात सामील नसलेल्या बाकीच्या मानवजातीला सूचित करतात. प्रायश्‍चित्ताच्या दिवशीही इस्राएलाचे बारा वंश, आत्मिक इस्राएलात सामील नसलेल्या मानवजातीचे चित्रण करत होते.—लेवी., अध्या. १६.

आपल्याकरता धडे:

४:१-१०. या अहवालावरून आपल्याला शिकायला मिळते की सैतान म्हणजे फक्‍त दुष्ट प्रवृत्ती नव्हे तर एक वास्तविक व्यक्‍ती आहे. तो आपल्याला मोहात पाडण्यासाठी “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी” यांसारख्या गोष्टींचा उपयोग करतो. पण, बायबलमधील तत्त्वांचे पालन केल्यामुळे देवाला विश्‍वासू राहण्यास आपल्याला मदत मिळेल.—१ योहा. २:१६.

५:१–७:२९. आपल्या आध्यात्मिक गरजांविषयी जागरूक असा. शांतिप्रिय असा. अनैतिक विचारांना मनात थारा देऊ नका. दिलेले वचन पाळा. प्रार्थना करताना भौतिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व द्या. देवाच्या दृष्टीने धनवान व्हा. प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा. कोणाचा न्याय करू नका. देवाच्या इच्छेप्रमाणे वागा. खरोखर, डोंगरावरील प्रवचनातून आपल्याला कितीतरी व्यवहारोपयोगी धडे शिकायला मिळतात!

९:३७, ३८. “धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत” अशी प्रार्थना करण्यासोबतच आपण या प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्यही केले पाहिजे. म्हणजेच, शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण आवेशाने सहभाग घेतला पाहिजे.—मत्त. २८:१९, २०.

१०:३२, ३३. आपल्या विश्‍वासाबद्दल बोलायला आपण कधीही घाबरू नये.

१३:५१, ५२. राज्याविषयीची सत्ये समजून घेणाऱ्‍यांवर ही सत्ये इतरांना शिकवण्याची व ही मौल्यवान सत्ये समजून घेण्यास त्यांनाही मदत करण्याची जबाबदारी येते.

१४:१२, १३, २३. अर्थपूर्ण मनन करण्यासाठी काही काळ एकांतात घालवणे आवश्‍यक आहे.—मार्क ६:४६; लूक ६:१२.

१७:२०. आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गात येणाऱ्‍या डोंगरांसमान अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि जीवनातल्या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी आपला विश्‍वास भक्कम असण्याची गरज आहे. म्हणूनच आपण यहोवावर व त्याच्या प्रतिज्ञांवर आपला विश्‍वास वाढवण्याकडे व तो दिवसेंदिवस दृढ करण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.—मार्क ११:२३; लूक १७:६.

१८:१-४; २०:२०-२८. येशूचे शिष्य मानवी अपरिपूर्णतेमुळे व माणसाच्या मान मरतब्याला अत्यधिक महत्त्व देणाऱ्‍या धार्मिक समाजातून आलेले असल्यामुळे, आपल्यापैकी सर्वात मोठा कोण याचा खूपच जास्त विचार करायचे. पापी प्रवृत्तींपासून सावध राहून व आपल्याला मिळणारे विशेषाधिकार व जबाबदाऱ्‍या यांविषयी योग्य मनोवृत्ती बाळगून आपण नम्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

‘मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल’

(मत्त. २१:१–२८:२०)

सा.यु. ३३ सालच्या निसान ९ या तारखेला येशू ‘गाढवीच्या शिंगरावर बसून’ जेरूसलेमेत येतो. (मत्त. २१:५) दुसऱ्‍या दिवशी तो मंदिरात येऊन ते शुद्ध करतो. निसान ११ रोजी तो मंदिरात शिकवतो, शास्त्री व परूशांना उघडपणे त्यांचे दोष दाखवतो, आणि त्यानंतर शिष्यांना “आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह” सांगतो. (मत्त. २४:३) त्याच्या नंतरच्या दिवशी तो त्यांना सांगतो: “तुम्हास ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरिता धरून दिला जाईल.”—मत्त. २६:१, २.

निसान १४. येशू लवकरच होणार असलेल्या आपल्या मृत्यूच्या स्मारकविधीची सुरुवात करून देतो. त्यानंतर त्याचा विश्‍वासघात केला जातो, त्याला अटक केली जाते, त्याची न्यायचौकशी होते आणि शेवटी त्याला वधस्तंभावर खिळले जाते. तिसऱ्‍या दिवशी त्याचे मृतांतून पुनरुत्थान होते. स्वर्गारोहण होण्याआधी येशू आपल्या अनुयायांना आज्ञा देतो: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.”—मत्त. २८:१९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२२:३, ४, ९—लग्नाच्या मेजवानीसाठी तीन आमंत्रणे केव्हा दिली जातात? पहिले आमंत्रण वधू वर्गास गोळा करण्यासाठी देण्यात आले. येशू व त्याच्या अनुयायांनी सा.यु. २९ मध्ये प्रचार करण्यास सुरुवात केली तेव्हापासून सा.यु. ३३ पर्यंत हे आमंत्रण देण्यात आले. दुसरे आमंत्रण सा.यु. ३३ साली पवित्र आत्मा ओतण्यात आला तेव्हापासून सा.यु. ३६ पर्यंत देण्यात आले. ही दोन्ही आमंत्रणे खास यहुद्यांना, यहुदी मतानुयायांना व शोमरोनी लोकांना देण्यात आली. पण तिसऱ्‍यांदा मात्र चवाठ्यांवर असलेल्या लोकांना, म्हणजेच सुंता न झालेल्या विदेश्‍यांना आमंत्रण देण्यात आले. सा.यु. ३६ साली, रोमी अधिकारी कर्नेल्य याचे मतपरिवर्तन झाले तेव्हापासून हे आमंत्रण देण्यास सुरुवात झाली व आज आपल्या काळातही ते दिले जात आहे.

२३:१५, पं.र.भा.—परूशांचा मतानुयायी किंवा मतपरिवर्तन करून त्यांच्यापैकी झालेला, त्यांच्यापेक्षा दुप्पट असा “गेहेन्‍नाचा मुलगा” ठरतो असे का म्हणण्यात आले? परूशांचे मतानुयायी बनलेल्यांपैकी काहीजण कदाचित पूर्वी घोर पापाचरण करणारे असावेत. पण मतपरिवर्तन करून परूशांचे अतिरेकी विश्‍वास स्वीकारल्यामुळे त्यांची पूर्वीपेक्षा वाईट स्थिती झाली. शिक्षेस पात्र असणाऱ्‍या त्यांच्या शिक्षकांपेक्षाही जास्त टोकाची मते त्यांनी अवलंबली. अशारितीने, यहुदी परूशांच्या तुलनेत ते दुप्पट असे ‘गेहेन्‍नाच्या’ शिक्षेस पात्र ठरले.

२७:३-५—यहुदाला कशामुळे पस्तावा झाला? यहुदाचा पस्तावा हा खरा पश्‍चात्ताप होता असा निष्कर्ष काढण्यासाठी कोणताच आधार सापडत नाही. देवाकडे क्षमेची याचना करण्याऐवजी त्याने आपली चूक मुख्य याजक व वडील ह्‍यांच्याकडे कबूल केली. ‘ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप’ केल्यानंतर साहजिकच यहुदाला अपराधीपणाच्या व निराशेच्या भावनांनी ग्रासले. (१ योहा. ५:१६) त्याला झालेला पस्तावा हा या निराशेच्या भावनांतून उत्पन्‍न झाला होता.

आपल्याकरता धडे:

२१:२८-३१. यहोवा सर्वात जास्त या गोष्टीला महत्त्व देतो, की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो किंवा नाही. उदाहरणार्थ, राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे.—मत्त. २४:१४; २८:१९, २०.

२२:३७-३९. देव त्याची उपासना करणाऱ्‍यांकडून काय अपेक्षा करतो हे दोन सर्वात मोठ्या आज्ञांमध्ये किती संक्षिप्त रूपात व्यक्‍त करण्यात आले आहे!

[३१ पानांवरील चित्र]

तुम्ही कापणीच्या कार्यात हिरिरीने सहभाग घेत आहात का?

[चित्राचे श्रेय]

© २००३ BiblePlaces.com

[३१ पानांवरील चित्र]

मत्तयाने देवाच्या राज्याच्या मुख्य विषयावर भर दिला आहे