व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“योग्य मनोवृत्तीचे” लोक प्रतिसाद देत आहेत

“योग्य मनोवृत्तीचे” लोक प्रतिसाद देत आहेत

“योग्य मनोवृत्तीचे” लोक प्रतिसाद देत आहेत

“जितके सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्तीचे होते तितक्यांनी विश्‍वास ठेवला.” —प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW.

१, २. राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, या येशूने केलेल्या भविष्यवाणीला आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी कशाप्रकारे प्रतिसाद दिला?

 राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, अशी येशूने भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीला आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी कशाप्रकारे प्रतिसाद दिला याबद्दलचा रोमांचकारक अहवाल बायबलमधील प्रेषितांची कृत्ये नावाच्या पुस्तकात जतन करून ठेवण्यात आला आहे. (मत्त. २४:१४) आवेशी प्रचारकांनी त्यांच्या नंतर येणाऱ्‍या शिष्यांसाठी उत्तम कित्ता घातला. जेरूसलेममधील येशूच्या शिष्यांच्या आवेशी प्रचार कार्यामुळे हजारो लोक आणि ‘याजकवर्गातील पुष्कळ लोक’ पहिल्या शतकातील मंडळीत सामील झाले.—प्रे. कृत्ये २:४१; ४:४; ६:७.

पहिल्या शतकातील मिशनऱ्‍यांनी आणखी अनेकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास मदत केली. या मिशनऱ्‍यांपैकी एक होता फिलिप्प. तो शोमरोनास गेला आणि तेथील लोकसमुदायांनी त्याचे भाषण लक्ष देऊन ऐकले. (प्रे. कृत्ये ८:५-८) पौलाने विविध सोबत्यांबरोबर खूप प्रवास केला. सायप्रस, आशिया मायनरमधील काही भागांत, मॅसेडोनिया, ग्रीस आणि इटली येथे त्याने ख्रिस्ती संदेशाचा प्रचार केला. त्याने ज्या ज्या शहरांमध्ये प्रचार केला त्या त्या शहरांतील यहुदी आणि ग्रीक असे दोन्ही प्रकारचे लाखो लोक ख्रिस्ती बनले. (प्रे. कृत्ये १४:१; १६:५; १७:४) तीताने क्रेत येथे सेवा केली. (तीत १:५) पेत्र बॅबिलोनमध्ये प्रचार करण्यात गुंग होता. सा.यु. ६२-६४ सालाच्या सुमारास त्याने त्याच्या पहिल्या पत्राचे लेखन समाप्त करेपर्यंत, ख्रिश्‍चनांचे प्रचार कार्य पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया आणि बिथुनिया येथे बरेच प्रसिद्ध झाले होते. (१ पेत्र १:१; ५:१३) ते किती उत्साहाचे दिवस होते! पहिल्या शतकातील ख्रिस्ती प्रचारक इतके आवेशी होते, की ‘यांनी जगाची उलटापालट केली’ आहे, असे त्यांचे शत्रू त्यांच्याविषयी म्हणू लागले होते.—प्रे. कृत्ये १७:६; २८:२२.

३. राज्य प्रचारक आपल्या प्रचार कार्याद्वारे कोणते परिणाम मिळवत आहेत आणि हे पाहून तुम्हाला काय वाटते?

आधुनिक काळातही ख्रिस्ती मंडळीची असामान्यरीत्या वाढ होत आहे. संपूर्ण जगभरातील प्रचार कार्यामुळे कोणते परिणाम होत आहेत यांच्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचा वार्षिक अहवाल वाचून तुम्ही प्रोत्साहित होत नाही का? राज्य प्रचारकांनी २००७ सेवा वर्षात साठ लाखांपेक्षा अधिक बायबल अभ्यास संचालित केले हे वाचून तुम्हाला आनंद वाटत नाही का? शिवाय, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक दिवसाच्या उपस्थितीवरून असे दिसते, की यहोवाचे साक्षीदार नसलेल्या सुमारे एक कोटी लोकांनी निदान या महत्त्वपूर्ण प्रसंगी हजर राहून सुवार्तेत थोडीबहुत का होईना आस्था दाखवली आहे. यावरून, आणखी पुष्कळ काम बाकी आहे हे सूचित होते.

४. राज्य संदेश कोण स्वीकारत आहेत?

पहिल्या शतकाप्रमाणे आजही, “जितके सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्तीचे” आहेत ते सत्याचा संदेश स्वीकारत आहेत. (प्रे. कृत्ये १३:४८, NW) अशा लोकांना यहोवा आज आपल्या संघटनेकडे आकर्षित करत आहे. (हाग्गय २:७ वाचा.) लोकांना एकत्रित करण्याच्या या कार्याला पूर्ण पाठिंबा देण्याकरता आपण ख्रिस्ती सेवेप्रती कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे?

निःपक्षपणे प्रचार करा

५. कोणते लोक देवाला मान्य आहेत?

“देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे,” हे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी ओळखले होते. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) जी व्यक्‍ती यहोवा देवासोबत चांगला नातेसंबंध जोडू इच्छिते तिने, येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास केला पाहिजे. (योहा. ३:१६, ३६) “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी यहोवाची इच्छा आहे.—१ तीम. २:३, ४.

६. राज्य उद्‌घोषकांनी काय करू नये व का?

सुवार्तेच्या उद्‌घोषकांनी, जात, सामाजिक स्तर, स्वरूप, धार्मिक पार्श्‍वभूमी किंवा इतर गोष्टींच्या आधारावर लोकांबद्दल मनात पूर्वग्रह बाळगणे योग्य नाही. क्षणभर थांबून विचार करा: तुम्हाला ज्या व्यक्‍तीने पहिल्यांदा शास्त्रवचनांतील सत्ये सांगितली तिने तुमच्याबद्दल मनात पूर्वग्रह बाळगले असते तर तुम्हाला सत्याची ओळख पटली असती का? पण तिने असे केले नाही म्हणून तुम्ही तिचे आभारी आहात, नाही का? मग, ज्याने एखाद्याचे जीवन वाचू शकते तो संदेश लोकांना सांगण्यापासून आपण का म्हणून माघार घ्यायची?—मत्तय ७:१२ वाचा.

७. आपण ज्यांना प्रचार करतो त्यांचा न्याय का करू नये?

यहोवाने येशूला न्यायाधीश म्हणून नेमले आहे; त्यामुळे कोणाचाही न्याय करण्याचा आपल्याला अधिकार नाही. हे उचित आहे कारण, आपण तर केवळ जे आपल्या ‘डोळ्यांनी पाहू’ किंवा ‘कानांनी ऐकू तेवढ्यावरूनच न्याय’ करू. परंतु येशू असा नाही. तो मनुष्याचे विचार आणि त्याच्या अंतःकरणातील युक्‍तिवाद जाणतो.—यश. ११:१-५; २ तीम. ४:१.

८, ९. (क) ख्रिस्ती बनण्याआधी शौल कोणत्या प्रकारचा मनुष्य होता? (ख) प्रेषित पौलाच्या अनुभवावरून आपण कोणता धडा घेतला पाहिजे?

यहोवाच्या सेवकांत, सर्व प्रकारचे लोक आहेत. याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे, तार्ससचा शौल जो नंतर प्रेषित पौल बनला. पौल बनण्याआधी तो एक परूशी होता आणि ख्रिश्‍चनांचा कट्टर विरोधी होता. हे ख्रिस्ती यहोवाचे खरे उपासक नाहीत, असे त्याला अगदी मनापासून वाटत असल्यामुळे त्याने ख्रिस्ती मंडळीचा छळ केला. (गलती. १:१३) मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास, शौलाने ख्रिश्‍चन बनणे अगदी अशक्य होते. परंतु, येशूने शौलात काही प्रशंसनीय गुण पाहिले आणि एक खास कामगिरी पूर्ण करण्याकरता त्याला निवडले. यामुळे शौल पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या सर्वात सक्रिय व आवेशी सदस्यांपैकी एक बनला.

प्रेषित पौलाच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकतो? आपल्या क्षेत्रात कदाचित असे लोक असतील जे आपण सांगत असलेल्या संदेशाचा कडाडून विरोध करतात. यांपैकी कोणी खरे ख्रिस्ती बनतील, असा आपण स्वप्नातही विचार करणार नाही. तरीपण, त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न आपण करून पाहिला पाहिजे. कधीकधी, जे लोक कधीच सत्य स्वीकारणार नाहीत असे वाटते तेच आपला संदेश आवडीने ऐकतात. तेव्हा, आपण सर्वांना सुवार्ता गाजवण्याचे आपल्याला दिलेले काम ‘सोडू नये.’—प्रेषितांची कृत्ये ५:४२ वाचा.

प्रचार करण्याचे जे ‘सोडत नाहीत’ त्यांच्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद

१०. भीतिदायक दिसणाऱ्‍या लोकांनाही आपण प्रचार का केला पाहिजे? स्थानीय अनुभव सांगा.

१० स्वरूप फसवे असू शकते. एका दक्षिण अमेरिकन देशात तुरुंगात असताना ईग्नॉस्योने * यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्याच्या हिंसक स्वभावामुळे सगळे त्याला घाबरून असायचे. तुरुंगातील काही कैदी, वस्तू बनवून त्या इतर कैद्यांना विकत असत. विकत घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यास कोणी हयगय केल्यास हे कैदी इग्नॉस्योला त्यांच्याकडे पैसे वसूल करण्यासाठी पाठवत. परंतु, ईग्नॉस्यो जसजशी आध्यात्मिक प्रगती करू लागला व शिकत असलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करू लागला तसतसे एकेकाळी हिंसक असलेला हा हळूहळू दयाळू बनला. लोकांनी त्याला उधारीचे पैसे आणण्यासाठी पाठवणे सोडून दिले. तरीपण ईग्नॉस्यो मात्र, बायबलमधून शिकत असलेल्या सत्यामुळे व देवाच्या पवित्र आत्म्याने आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बरेच बदल केले म्हणून समाधानी आहे. ज्या राज्य प्रचारकांनी मनात कसलाही पूर्वग्रह न बाळगता त्याच्याबरोबर अभ्यास करण्याची तयारी दर्शवली त्यांचेही तो खूप आभार मानतो.

११. आपण लोकांना पुन्हा पुन्हा भेट का देतो?

११ आपण लोकांना आधी सुवार्ता सांगितलेली असते तरीपण आपण पुन्हा पुन्हा त्यांना भेटतो याचे एक कारण हे आहे, की त्यांची परिस्थिती व मनोवृत्ती बदलू शकते, किंबहुना बरेचदा असे झाले आहे. आपण मागच्या वेळी त्यांना भेट देऊन गेल्यानंतर कदाचित काहीजण गंभीरपणे आजारी पडले असतील, त्यांनी नोकरी गमावली असेल अथवा त्यांच्या प्रिय जनाचा मृत्यू झाला असेल. (उपदेशक ९:११ वाचा.) जगातील घडामोडी पाहून काही लोक भविष्याचा विचार करण्यास प्रवृत्त होतील. या बदलांमुळे, पूर्वी आपला संदेश ऐकण्यास तयार नसलेली अथवा विरोध करणारी व्यक्‍ती आता आपला संदेश ऐकून घेईल. यास्तव, प्रत्येक उचित प्रसंगी आपण इतरांना सुवार्ता सांगण्याच्या संधीचा फायदा घेतला पाहिजे.

१२. आपण प्रचार करत असलेल्या लोकांबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे व का?

१२ गट पाडणे आणि इतर लोकांचा न्याय करणे ही मानवाची प्रवृत्तीच आहे, असे दिसते. तरीपण यहोवा प्रत्येकाला एक व्यक्‍ती या नात्याने पाहतो. प्रत्येकातील चांगले गुण तो पाहतो. (१ शमुवेल १६:७ वाचा.) सेवेमध्ये आपणही असेच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक अनुभवांतून दिसून येते, की आपण प्रचार करत असलेल्या सर्व लोकांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर चांगले परिणाम मिळतात.

१३, १४. (क) सेवेमध्ये भेटलेल्या एका स्त्रीत एका पायनियर भगिनीने जास्त आवड का घेतली नाही? (ख) या अनुभवावरून आपण काय शिकतो?

१३ सॅन्ड्रा एक पायनियर आहे. कॅरिबियन द्विपांवर एकदा घरोघरच्या सेवेत असताना तिची भेट रूथशी झाली. रूथ, कार्निव्हलचा उत्सव (नाच-गाणे, धांगडधिंगा व रंगेलपणाचा एक उत्सव) अगदी उत्साहाने साजरा करायची. राष्ट्रीय कार्निव्हल सुंदरी म्हणून रूथला दोनदा मुकूटमंडित करण्यात आले होते. तर, सॅन्ड्रा जेव्हा तिला सुवार्ता सांगत होती तेव्हा तिने खूपच आस्था दाखवली, त्यामुळे तिच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला. सॅन्ड्रा आठवून सांगते: “मी तिच्या घरात गेले तेव्हा मी रूथचा एक खूप मोठा फोटो भिंतीवर लावलेला पाहिला. या फोटोत रूथने कार्निव्हलचा भपकेबाज व उन्मादक पेहराव घातला होता आणि तिने जिंकलेली पदकेही दिसत होती. फोटो पाहिल्याबरोबर माझ्या मनात विचार आला, जो अर्थातच चुकीचा होता. मला वाटलं, की ही इतकी लोकप्रिय व्यक्‍ती आहे, कार्निव्हल सणामध्ये इतक्या उत्साहाने भाग घेते, तिला सत्यात कसली आवड असेल. त्यामुळे मी तिच्याकडे जायचं बंद केलं.”

१४ काही दिवसांनंतर, रूथ राज्य सभागृहात आली आणि सभा संपल्यानंतर तिने सॅन्ड्राला विचारले: “तू आजकाल माझा बायबल अभ्यास घ्यायला का येत नाहीस?” सॅन्ड्राने तिची क्षमा मागितली आणि ती पुन्हा रूथकडे बायबल अभ्यासासाठी जाऊ लागली. रूथने भरभर आध्यात्मिक प्रगती केली, घरातले सर्व कार्निव्हलचे फोटो काढून टाकले, मंडळीच्या सर्व कार्यांत भाग घेऊ लागली आणि यहोवाला आपले जीवन समर्पित केले. आपण सुरुवातीला दाखवलेली प्रतिक्रिया चुकीची होती, हे सॅन्ड्राला जाणवले!

१५, १६. (क) एका भगिनीने आपल्या मेहुण्याला सत्य सांगितल्याचा काय परिणाम झाला? (ख) आपल्या नातेवाईकांच्या कट्टर धार्मिक विश्‍वासांमुळे आपण त्यांच्याशी बायबलमधील सत्याविषयी बोलण्यास का कचरू नये?

१५ सत्य स्वीकारतील अशी आशा वाटत नसलेल्या नातेवाईकांना साक्ष दिल्यामुळे देखील अनेकांना चांगले अनुभव आले आहेत. अमेरिकेतील जॉईस नावाच्या एका ख्रिस्ती भगिनीचे उदाहरण घ्या. तिचा मेहुणा किशोर असल्यापासून अनेकदा तुरुंगाची हवा खाऊन आला होता. जॉईस सांगते: “लोक त्याच्याबद्दल म्हणायचे, ‘अंमली पदार्थांच्या तस्करीत तो गोवलेला आहे, चोरी करतो, सगळ्या वाईटच गोष्टी करतो त्यामुळे हा पूर्ण वाया गेलेला आहे.’ तरीसुद्धा ३७ वर्ष मी त्याला बायबलमधली सत्ये सांगत राहिले.” आपल्या मेहुण्याला मदत करण्यासाठी तिने घेतलेल्या सहनशील प्रयत्नांचे चीज झाले. यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास त्याने सुरुवात केली आणि आपल्या जीवनात जबरदस्त बदल केले. अलिकडेच, वयाच्या ५० व्या वर्षी अमेरिकेतील कॅलिफोर्नियात झालेल्या एका प्रांतीय अधिवेशनात त्याचा बाप्तिस्मा झाला. जॉईस आठवून सांगते: “मी आनंदाने रडले. मी त्याच्याबाबतीत हार मानली नाही, म्हणून मला खूप आनंद होतोय!”

१६ तुम्ही कदाचित तुमच्या काही नातेवाईकांच्या कट्टर धार्मिक विश्‍वासांमुळे त्यांच्याशी बायबलमधील सत्याविषयी बोलण्यास कचरत असाल. परंतु जॉईस आपल्या मेहुण्याशी सत्याविषयी बोलण्यास कचरली नाही. दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या हृदयात काय चालले आहे हे आपण जाणत नाही. ती व्यक्‍ती कदाचित खरोखरच सत्य शोधत असेल. तेव्हा, सत्य सापडण्याची संधी तिच्यापासून रोखून धरू नका.—नीतिसूत्रे ३:२७ वाचा.

परिणामकारक बायबल अभ्यास पुस्तक

१७, १८. (क) बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाच्या महत्त्वाविषयी संपूर्ण जगभरातून आलेले अहवाल काय सूचित करतात? (ख) या पुस्तकाचा उपयोग केल्यामुळे तुम्हाला कोणते प्रोत्साहनदायक अनुभव आले आहेत?

१७ संपूर्ण जगभरातून येणाऱ्‍या अहवालातून दिसून येते, की नेक मनाच्या पुष्कळ लोकांना बायबल नेमके काय शिकवते? हे बायबल अभ्यासाचे पुस्तक खूप आवडले आहे. अमेरिकेतील पेनी नावाच्या एका भगिनीने या प्रकाशनाद्वारे अनेक बायबल अभ्यास सुरू केले आहेत. यांपैकी दोन अभ्यास, वृद्ध लोकांबरोबर होते जे अगदी काटेकोरपणे चर्चला जात होते. बायबल काय शिकवते पुस्तकात सादर केलेल्या शास्त्रवचनांतील सत्यांना हे लोक कशी प्रतिक्रिया दाखवतील, हे पेनीला माहीत नव्हते. तरीपण, ती लिहिते: “या पुस्तकातली माहिती स्पष्ट, तर्काला पटण्याजोगी व थोडक्यात असल्यामुळे त्यांनी ती लगेच सत्य म्हणून स्वीकारली. त्यांनी कसलाही वाद घातला नाही किंवा त्यांच्या मनात कसलाही गोंधळ झाला नाही.”

१८ ब्रिटनमध्ये पॅट नावाची एक प्रचारक, एका स्त्रीबरोबर बायबलचा अभ्यास करू लागली जी आशियाई राष्ट्रातून निर्वासित म्हणून आली होती. बंडखोर सैनिकांनी या स्त्रीच्या पतीचे व मुलांचे अपहरण केले होते. त्यांचा काही पत्ताच नव्हता. त्यामुळे हिला तिचे राष्ट्र सोडून पळून यावे लागले होते. तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, तिचे घर जाळून टाकण्यात आले होते आणि तिच्यावर सामूहिक बलात्कारही करण्यात आला होता. या सर्वांमुळे तिला, जीव नकोसा झाला होता. आत्महत्येचा विचार तिच्या मनात अनेकदा आला होता. परंतु बायबल अभ्यासामुळे तिला आशा मिळाली. “बायबल काय शिकवते पुस्तकातल्या सुगम स्पष्टीकरणांचा व उदाहरणांचा तिच्या मनावर खूप खोल प्रभाव झाला,” असे पॅट लिहिते. या स्त्रीने भरभर आध्यात्मिक प्रगती केली, बाप्तिस्मारहित प्रचारक बनण्याची पात्रता मिळवली आणि पुढील संमेलनात बाप्तिस्मा घेण्याची इच्छा दाखवली. नेक मनाच्या लोकांना शास्त्रवचनांतील आशा समजावून सांगण्यात व त्याची गुणग्राहकता बाळगण्यास मदत करण्यात किती आनंद आहे, नाही का?

“चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये”

१९. प्रचार कार्य इतके तातडीने का केले पाहिजे?

१९ जसजसा एकेक दिवस सरत राहतो तसतसे प्रचार करण्याची व शिष्य बनवण्याची आपल्याला मिळालेली कामगिरी आणखी तातडीची बनते. दर वर्षी हजारो योग्य मनोवृत्तीचे लोक आपल्या प्रचार कार्याला प्रतिसाद देतात. तरीपण, “परेमश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे;” याचा अर्थ जे आध्यात्मिक अंधकारात आहेत ते नाशाकडे वाटचाल करत आहेत.—सफ. १:१४; नीति. २४:११.

२०. आपल्यातील प्रत्येकाने काय करण्याचा निश्‍चय केला पाहिजे?

२० अशा लोकांना मदत करण्यासाठी आपल्याकडे अजूनही वेळ आहे. पण असे करण्यासाठी आपण पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे ‘शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे सोडू नये,’ हे महत्त्वाचे आहे. (प्रे. कृत्ये ५:४२) संकट ओढवले तरीही प्रचार करीत राहून, “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष देऊन व पक्षपात न बाळगता प्रचार करून आपण पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे अनुकरण करू शकतो. “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये,” कारण जर आपण या कामात टिकून राहिलो तर आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव होईल; आपण देवाची संमती प्राप्त करू शकू!—२ तीम. ४:२; गलतीकर ६:९ वाचा.

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आज कोणते लोक सुवार्तेला प्रतिसाद देत आहेत?

• आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्याबद्दल मनात पूर्वग्रह का बाळगू नये?

• बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचे परिणाम काय आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्रे]

नेक मनाचे हजारो लोक सुवार्तेला प्रतिसाद देत आहेत

[१५ पानांवरील चित्रे]

प्रेषित पौलाने स्वतःत जे बदल केले त्यावरून आपण कोणता धडा शिकतो?

[१६ पानांवरील चित्र]

सुवार्तेचे प्रचारक लोकांबद्दल मनात पूर्वग्रह बाळगत नाहीत