व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इस्राएल लोकांच्या चुकांवरून धडा घ्या

इस्राएल लोकांच्या चुकांवरून धडा घ्या

इस्राएल लोकांच्या चुकांवरून धडा घ्या

इस्राएल लोकांनी प्रतिज्ञात देशात प्रवेश केला, तेव्हा यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे त्यांना माहीत होते. मोशेद्वारे देवाने त्यांना अशी आज्ञा दिली होती: “त्या देशातील सर्व रहिवाश्‍यांना तुमच्यासमोरून घालवून द्या; आकृति कोरिलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका.”—गण. ३३:५२.

इस्राएल लोकांना सांगण्यात आले होते की त्यांनी त्या देशातील रहिवाशांशी कोणत्याही प्रकारचा करार करू नये, तसेच त्यांच्यासोबत सोयरीक करू नये. (अनु. ७:२, ३) देवाच्या या निवडलेल्या लोकांना अशी ताकीद देण्यात आली होती: “तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाश्‍यांशी करारमदार करिशील आणि तो तुला पाश होईल.” (निर्ग. ३४:१२) तरीपण, इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञा मोडल्या आणि ते पाशात पडले. त्यांच्या नाशाला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? त्यांच्या बाबतीत जे घडले त्यावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो?—१ करिंथ. १०:११.

मैत्री आणि मग मूर्तिपूजा

प्रतिज्ञात देश हस्तगत करताना, इस्राएल लोकांनी सुरुवातीला तेथील रहिवाशांविरुद्ध अनेक लढाया जिंकल्या. पण इस्राएल पुत्रांनी देवाच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन केले नाही. त्यांनी शत्रूला देशातून घालवले नाही. (शास्ते १:१–२:१०) उलट, इस्राएल लोक त्या देशात राहणाऱ्‍या ‘सात राष्ट्रांच्या’ लोकांसोबत वस्ती करू लागले. या राष्ट्रांतील लोकांशी त्यांचा सतत संपर्क येऊ लागला आणि पाहता पाहता त्यांची या लोकांसोबत मैत्री जमली. (अनु. ७:१) याचा इस्राएल लोकांवर काय परिणाम झाला? बायबल म्हणते: “ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. इस्राएल लोकांनी परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्‍वर ह्‍याला ते विसरले आणि बआल व अशेरा ह्‍या मूर्तींची सेवा करू लागले.” (शास्ते ३:५-७) देशातील लोकांशी मैत्री केल्यामुळे हळूहळू इस्राएल लोकांनी त्यांच्याशी विवाहसंबंध जोडले आणि ते मूर्तिपूजाही करू लागले. विवाहसंबंध जोडल्यानंतर, इस्राएल लोकांनी या मूर्तिपूजक लोकांना देशाबाहेर घालवण्याची शक्यता आणखीनच विरळ झाली. खरी उपासना भ्रष्ट झाली आणि इस्राएल लोक स्वतः खोट्या देवांची उपासना करू लागले.

प्रतिज्ञात देशातील हे रहिवाशी शत्रू म्हणून जितके धोकेदायक नव्हते, तितके ते मित्र बनल्यावर इस्राएल लोकांकरता आध्यात्मिक अर्थाने धोकेदायक ठरले. पण, खरा धर्म भ्रष्ट होण्यामागे आणखी एक कारण होते.

शेती आणि बआल उपासना

इस्राएल लोक पूर्वी भटके जीवन जगत होते. पण प्रतिज्ञात देशात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यापैकी बरेचजण शेतीवाडी करू लागले. आधीपासूनच जे लोक तेथे राहून शेतीवाडी करत होते, त्या लोकांच्या शेतीकामाच्या पद्धती इस्राएल लोकांनी अवलंबल्या असाव्यात. पण असे दिसते की ते कनानी लोकांच्या कार्यपद्धतींचे अनुकरण करण्याच्या एक पाऊल पुढे गेले. त्या लोकांसोबत उठणेबसणे वाढले तसतसे शेतीवाडीशी संबंधित त्यांचे धार्मिक विश्‍वासही इस्राएल लोकांनी स्वीकारले.

कनानी लोक अनेक बआल दैवतांची उपासना करत होते. ही दैवते जमिनीला सुपीक बनवतात अशी त्यांची धारणा होती. कनानी लोकांच्या पद्धतींनुसार जमिनीची मशागत करून पीक काढण्याव्यतिरिक्‍त, हळूहळू इस्राएल लोक त्यांच्यासोबत कनानी दैवतांची पूजाही करू लागले आणि ही दैवतेच आपल्याला भरपूर पीक देतात असे मानू लागले. अशारितीने, बरेच इस्राएल लोक केवळ नावापुरती यहोवाची उपासना करत होते, पण मुळात ते उघडपणे धर्मत्यागी कृत्ये करण्यात गुंतले होते.

आज आपल्याकरता एक जबरदस्त इशारा

इस्राएल लोक प्रतिज्ञात देशातील रहिवाशांच्या पहिल्यांदा संपर्कात आले तेव्हा कदाचित त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, की एके दिवशी आपणही बआल उपासना आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घृणित परंपरा पाळायला लागू. पण त्यांनी अगदी हेच केले. आणि याला कारणीभूत होती त्यांची संगत. आज जर आपण अशा लोकांची संगत धरली की जे स्वभावाने मैत्रिपूर्ण आहेत, पण जे आपले ख्रिस्ती विश्‍वास, नीतिनियम, व तत्त्वे मानत नाहीत, तर आपल्या बाबतीतही इस्राएल लोकांसोबत जे घडले तेच घडणार नाही का? अर्थात, नोकरीच्या ठिकाणी, शाळेत किंवा घरीसुद्धा विश्‍वासात नसलेल्या लोकांशी आपल्याला थोडाबहुत संपर्क ठेवावाच लागतो. पण इस्राएल लोकांना आलेला अनुभव हा जणू आपल्याकरता धोक्याचा इशारा आहे. जर आपण अशाप्रकारची संगत धरली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. बायबल एक त्रिकालाबाधित सत्य सांगते: “कुसंगतीने नीति बिघडते.”—१ करिंथ. १५:३३.

आज आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. यांपैकी बरीच, इस्राएल लोकांना तोंड द्याव्या लागलेल्या आव्हानांसारखीच आहेत. आधुनिक मानवसमाजातही अनेक दैवते आहेत. पैसा, मनोरंजन व क्रीडाविश्‍वातील लोकप्रिय व्यक्‍तिमत्त्वे, राजकीय पक्ष, काही धर्मपुढारी, इतकेच काय तर कधीकधी कुटुंबातील सदस्यांनाही देवाचा दर्जा दिला जातो. यांपैकी कोणतीही गोष्ट आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनू शकते. ज्यांचे यहोवावर प्रेम नाही अशा लोकांसोबत जवळचे संबंध जोडल्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या आपला नाश होऊ शकतो.

अनैतिक लैंगिक संबंध बआल उपासनेचे एक अविभाज्य अंग होते. यामुळेच बरेच इस्राएल लोक बआल उपासेनेकडे आकर्षित झाले व या पाशाला बळी पडले. आजही देवाच्या लोकांपैकी अनेकजण अशाचप्रकारच्या पाशांना बळी पडत आहेत. उदाहरणार्थ, आज इंटरनेटवर अश्‍लील साहित्य अगदी सहजपणे उपलब्ध आहे. एखाद्या अतिउत्सुक किंवा बेसावध व्यक्‍तीने आपल्या कंप्युटरची फक्‍त एक कळ दाबली तरी तो आपला शुद्ध विवेक गमावून बसू शकतो. अशारितीने जर एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती इंटरनेटवरील अश्‍लीलतेला बळी पडली तर ते किती दुःखदायक ठरेल!

‘जे त्याचे निर्बंध पाळतात ते धन्य’

आपण कोणाची संगत धरणार याबाबतीत यहोवाच्या आज्ञांचे पालन करावे किंवा नाही हा प्रत्येकाचा वैयक्‍तिक निर्णय आहे. (अनु. ३०:१९, २०) म्हणूनच आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘फावल्या वेळात करमणुकीसाठी मी कोणासोबत मिसळतो? हे लोक जीवनात कोणते आदर्श व नीतिमूल्ये पाळतात? ते यहोवाची उपासना करतात का? त्यांच्या सहवासात राहिल्याने मला ख्रिस्ती जीवनात प्रगती करण्याची प्रेरणा मिळणार आहे का?’

स्तोत्रकर्त्याने एका भजनात म्हटले: “जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्‍वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करितात ते धन्य.” (स्तो. ११९:१, २) खरोखर, “जो पुरुष परमेश्‍वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!” (स्तो. १२८:१) कोणाची संगत धरावी हे ठरवताना आपण इस्राएल लोकांच्या चुकांवरून धडा घेतला पाहिजे आणि यहोवाला अगदी पूर्णपणे आज्ञाधारक राहिले पाहिजे.—नीति. १३:२०.

[२६ पानांवरील चित्र]

ज्यांचे यहोवावर प्रेम नाही अशा लोकांची संगत धरल्यास आपणही मूर्तिपूजेच्या पाशाला बळी पडू शकतो