व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?

ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?

ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?

“आपल्या उपस्थितीचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?”—मत्त. २४:३, NW.

१. येशूच्या प्रेषितांनी त्याला कोणता लक्षवेधक प्रश्‍न विचारला?

 जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी, येशूच्या प्रेषितांनी जैतूनाच्या डोंगरावर त्याच्याशी एकांतात बोलत असताना त्याला एक प्रश्‍न विचारला. त्यांनी विचारले: “ह्‍या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या उपस्थितीचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्त. २४:३) या प्रश्‍नात प्रेषितांनी दोन लक्षवेधक संज्ञा वापरल्या. ‘आपली उपस्थिती’ आणि ‘या युगाची समाप्ती.’ या दोन संज्ञांचा काय अर्थ होतो?

२. ‘समाप्ती’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.

आधी आपण यांपैकी दुसऱ्‍या संज्ञेतील ‘समाप्ती’ या शब्दाचा विचार करू या. हा शब्द सिन्टेलीया या ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे. यासारख्याच टीलोस या दुसऱ्‍या एका ग्रीक शब्दाचे भाषांतर “शेवट” असे करण्यात आले आहे. या दोन शब्दांतील फरक समजून घेण्याकरता आपण राज्य सभागृहात दिल्या जाणाऱ्‍या भाषणाचे उदाहरण घेऊ शकतो. भाषणाची समाप्ती म्हणजे, भाषणाचा शेवटला भाग, ज्यात वक्‍ता सहसा चर्चेतील मुख्य मुद्द्‌यांची श्रोत्यांना थोडक्यात आठवण करून देतो आणि ही माहिती आपल्याकरता का उपयोगी आहे हे समजावतो. वक्‍ता भाषण संपवून व्यासपीठावरून खाली उतरतो तेव्हा भाषणाचा शेवट होतो. त्याचप्रकारे बायबलमध्ये ‘युगाची समाप्ती’ ही संज्ञा, शेवट होण्याअगोदरच्या कालावधीला सूचित करते. या कालावधीच्या कळसास शेवट होतो.

३. येशूच्या उपस्थितीदरम्यान कोणत्या काही गोष्टी घडतात?

प्रेषितांनी विचारलेल्या प्रश्‍नातील ‘उपस्थिती’ या शब्दाविषयी काय? हा शब्द पारूसिया या ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे. * ख्रिस्ताची पारूसिया म्हणजेच उपस्थिती, १९१४ साली तो स्वर्गात राजासनावर बसला तेव्हापासून सुरू झाली आणि ‘मोठ्या संकटाच्या’ वेळी तो दुष्टांचा नाश करण्याकरता येईल तोपर्यंत सुरू राहील. (मत्त. २४:२१) येशूच्या या उपस्थितीदरम्यान निरनिराळ्या गोष्टी घडतात, उदाहरणार्थ या दुष्ट जगाच्या ‘शेवटल्या काळाशी’ संबंधित घटना, निवडलेल्यांना एकत्रित केले जाणे व त्यांना स्वर्गीय जीवनाकरता पुनरुत्थित केले जाणे. (२ तीम. ३:१; १ करिंथ. १५:२३; १ थेस्सलनी. ४:१५-१७; २ थेस्सलनी. २:१) ‘युगाच्या समाप्तीचा’ काळ (सिन्टेलीया) आणि ख्रिस्ताची उपस्थिती (पारूसिया) म्हटलेला काळ, या दोन्ही गोष्टी एकाच कालावधीला सूचित करतात असे म्हटले जाऊ शकते.

विस्तृत कालावधी

४. येशूची उपस्थिती नोहाच्या काळातल्या घटनांशी कशा प्रकारे जुळते?

पारूसिया हा शब्द एका विस्तृत कालावधीस सूचित करतो. ही गोष्ट, येशूने त्याच्या उपस्थितीच्या संबंधात जे सांगितले होते त्याच्याशी जुळते. (मत्तय २४:३७-३९ वाचा.) येशूने आपल्या उपस्थितीची तुलना, नोहाच्या काळात आलेल्या जलप्रलयाच्या संक्षिप्त काळाशी केली नाही. तर त्याने जलप्रलय घडण्याआधीच्या विस्तृत कालावधीशी आपल्या उपस्थितीची तुलना केली. या कालावधीत नोहाने तारू बांधले व प्रचाराचे कार्य केले. जलप्रलय सुरू होईपर्यंत, अनेक दशके तो ही कार्ये करत होता. त्याचप्रकारे ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या कालावधीत, मोठ्या संकटाच्या आधी घडणाऱ्‍या घटनांचा तसेच मोठ्या संकटाचाही समावेश होतो.—२ थेस्सलनी. १:६-९.

५. प्रकटीकरणातील ६ व्या अध्यायातील शब्दांवरून येशूची उपस्थिती एका विस्तृत कालावधीला सूचित करते हे कशा प्रकारे दिसून येते?

बायबलमधील इतर भविष्यवाण्यांवरूनही हे स्पष्ट होते की ख्रिस्ताची उपस्थिती, फक्‍त तो दुष्टांचा नाश करायला येईल त्या घटनेला नव्हे तर एका विस्तृत कालावधीला सूचित करते. प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशू एका पांढऱ्‍या घोड्यावर स्वार असल्याचे व त्याला एक मुकुट देण्यात आल्याचे वर्णन आढळते. (प्रकटीकरण ६:१-८ वाचा.) १९१४ साली येशूला राजमुकुट देण्यात आल्यावर तो “विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास” जातो असे प्रकटीकरणाच्या पुस्तकात त्याच्याविषयी वर्णन केले आहे. या अहवालात पुढे म्हटले आहे की त्याच्या पाठोपाठ निरनिराळ्या रंगांच्या घोड्यांवर बसलेले स्वार येतात. हे घोडे युद्ध, दुष्काळ व रोगराई यांसारख्या भविष्यात घडणार असलेल्या घटनांना सूचित करत होते. या सर्व गोष्टी ‘शेवटला काळ’ म्हटलेल्या विस्तृत कालावधीदरम्यान घडल्या आहेत. या भविष्यवाणीची पूर्णता आपण आपल्या काळात पाहात आहोत.

६. प्रकटीकरण अध्याय १२ मधील अहवाल आपल्याला ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयी काय समजून घेण्यास मदत करतो?

प्रकटीकरण अध्याय १२ मध्ये स्वर्गात झालेल्या देवाच्या राज्याच्या स्थापनेविषयी आणखी माहिती देण्यात आली आहे. या अहवालात आपण अदृश्‍यरित्या घडलेल्या एका लढाईविषयी वाचतो. मीखाएल, म्हणजेच स्वर्गीय पदी असलेला येशू ख्रिस्त व त्याचे दूत, दियाबल व त्याच्या दुरात्म्यांविरुद्ध लढतात. दियाबल सैतान व त्याच्या सैन्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात येते. हे घडते तेव्हा, प्रकटीकरणातील अहवालात असे म्हटले आहे की “आपला काळ थोडा आहे हे ओळखून” दियाबल अतिशय संतप्त होतो. (प्रकटीकरण १२:७-१२ वाचा.) यावरून हे स्पष्ट होते की ख्रिस्ताचे राज्य स्वर्गात स्थापन झाल्यानंतर असा एक कालावधी येतो ज्यादरम्यान पृथ्वी व तिच्या रहिवाशांवर “अनर्थ” ओढवतो.

७. दुसऱ्‍या स्तोत्रात कशाविषयी सांगितले आहे आणि त्यात कोणत्या संधीचे वर्णन केले आहे?

त्याचप्रकारे २ ऱ्‍या स्तोत्रातही स्वर्गीय सीयोन डोंगरावर येशू राजा म्हणून विराजमान होण्याविषयीचे भविष्यसूचक वर्णन आढळते. (स्तोत्र २:५-९; ११०:१, २ वाचा.) पण या स्तोत्रातही एका कालावधीविषयी सूचित करण्यात आले आहे. या कालावधीत पृथ्वीवरील शासकांना व त्यांच्या प्रजाजनांना ख्रिस्ताच्या राज्याच्या अधीन होण्याची संधी दिली जाते. त्यांना “शहाणे व्हा” व “बोध घ्या” असे बजावले जाते. या कालावधीदरम्यान यहोवाची व त्याने नियुक्‍त केलेल्या राजाची सेवा करण्याद्वारे, “[देवाला] शरण जाणारे सगळे धन्य होत.” त्याअर्थी, येशूला राजपद मिळाल्यावर त्याच्या उपस्थितीदरम्यान जणू संधीचे एक द्वार उघडले जाते.—स्तो. २:१०-१२.

चिन्ह ओळखणे

८, ९. कोण ख्रिस्ताच्या उपस्थितीचे चिन्ह ओळखतील व त्याचा अर्थ समजू शकतील?

देवाचे राज्य केव्हा येईल असे परूशांनी विचारले तेव्हा येशूने त्यांना असे उत्तर दिले की ते “दृश्‍य स्वरूपात” येणार नाही. (लूक १७:२०, २१) म्हणजेच, सत्य न मानणाऱ्‍यांना ख्रिस्ताच्या उपस्थितीचा अर्थ समजणार नाही. कसा समजेल? ते तर येशूला आपला भावी राजा म्हणून ओळखतच नाहीत. तर मग कोण आहेत, की जे ख्रिस्ताच्या उपस्थितीचे चिन्ह ओळखतील आणि त्याचा अर्थही समजू शकतील?

येशूने पुढे सांगितले की त्याच्या शिष्यांना त्याच्या उपस्थितीचे चिन्ह अगदी स्पष्टपणे म्हणजे “जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्‍या बाजूपर्यंत प्रकाशते” तसे दिसेल. (लूक १७:२४-२९ वाचा.) एक विशेष गोष्ट म्हणजे मत्तय २४:२३-२७ यात याच मुद्द्‌याचा ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या संदर्भात उल्लेख केला आहे.

चिन्ह पाहणारी पिढी

१०, ११. (क) मत्तय २४:३४ यात उल्लेख केलेल्या ‘पिढीबद्दल’ यापूर्वी कोणते स्पष्टीकरण देण्यात आले होते? (ख) त्या ‘पिढीत’ कोणाचा समावेश असल्याचे येशूच्या शिष्यांना नक्कीच समजले असेल?

१० यापूर्वी या नियतकालिकाने असे स्पष्टीकरण दिले होते की मत्तय २४:३४ यात उल्लेख केलेली “ही पिढी” “येशूच्या काळात जिवंत असणाऱ्‍या व ज्यांनी त्याला स्वीकारले नाही अशा यहुद्यांच्या पिढीला” सूचित करते. * हे स्पष्टीकरण योग्य वाटले कारण शास्त्रवचनांत येशूने ज्या ज्या ठिकाणी “पिढी” हा शब्द वापरला त्या त्या ठिकाणी त्याचा नकारात्मक अर्थ होता. आणि बहुतेकदा येशूने त्या पिढीचे वर्णन करताना, “दुष्ट” यासारखी नकारार्थी विशेषणे वापरली. (मत्त. १२:३९; १७:१७; मार्क ८:३८) त्यामुळे असे स्पष्टीकरण देण्यात आले की या भविष्यवाणीच्या आधुनिक काळातील पूर्णतेत येशू विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांच्या दुष्ट ‘पिढीविषयी’ बोलत होता. या पिढीतील अविश्‍वासी लोक ‘युगाच्या समाप्तीचे’ (सिन्टेलीया) चिन्ह असणाऱ्‍या घटना तर पाहतीलच पण त्यासोबत ते त्याचा ‘शेवटही’ (टीलोस) पाहतील.

११ येशूने नकारात्मक अर्थाने “पिढी” या शब्दाचा वापर केला तेव्हा तो त्याच्या काळातल्या दुष्ट लोकांशी किंवा त्यांच्याविषयी बोलत होता हे खरे आहे. पण मत्तय २४:३४ यातील विधानाबद्दलही हाच निष्कर्ष काढणे आवश्‍यक आहे का? या घटनेत येशूचे शिष्य “एकांती येऊन” त्याच्याशी संभाषण करत होते हे लक्षात घ्या. (मत्त. २४:३) त्यांच्याशी ‘या पिढीविषयी’ बोलताना येशूने नकारार्थी विशेषणे वापरली नाहीत. त्याअर्थी प्रेषितांना नक्कीच हे समजले असेल की “हे सर्व पूर्ण होईपर्यंत” जी “पिढी” नाहीशी होणार नाही तिच्यात त्यांचा व इतर शिष्यांचा समावेश असेल.

१२. “पिढी” हा शब्द वापरताना येशू कोणाविषयी बोलत होता हे संदर्भाचे परीक्षण केल्यावर कशा प्रकारे स्पष्ट होते?

१२ हा निष्कर्ष आपण कोणत्या आधारावर काढू शकतो? संदर्भाचे लक्षपूर्वक परीक्षण करून. मत्तय २४:३२, ३३ या वचनांप्रमाणे येशूने म्हटले: “अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता; तसेच तुम्हीहि ह्‍या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच, आहे असे समजा.” (मार्क १३:२८-३०; लूक २१:३०-३२ पडताळून पाहा.) मग मत्तय २४:३४ यात तो म्हणाला: “मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.”

१३, १४. ‘पिढीविषयी’ बोलताना येशू आपल्या शिष्यांच्या संदर्भात बोलत असावा असे आपण का म्हणू शकतो?

१३ येशूने म्हटले की त्याच्या शिष्यांनी, ज्यांना लवकरच पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त केले जाणार होते, त्यांनी, “ह्‍या सर्व गोष्टी” पाहून त्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्याअर्थी, “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही” असे विधान येशूने केले तेव्हा साहजिकच तो आपल्या शिष्यांच्या संदर्भातच बोलत असावा.

१४ येशूचे शिष्य अविश्‍वासी लोकांपेक्षा वेगळे असतील कारण ते चिन्ह फक्‍त पाहणारच नाहीत तर त्याचा अर्थही समजू शकतील. त्या चिन्हाचे निरनिराळे पैलू पाहिल्यावर ते त्यांचा खरा अर्थ ओळखतील. “तो जवळ, दाराशीच आहे” हे त्यांना स्पष्टपणे कळेल. येशूच्या या शब्दांची पहिल्या शतकात, काही प्रमाणात पूर्णता झाली तेव्हा अविश्‍वासी यहुद्यांनी व त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांनीही ते पाहिले. पण या घटनांचा अर्थ काय आहे हे फक्‍त त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांनाच समजू शकले.

१५. (क) येशूने ज्या ‘पिढीविषयी’ सांगितले तिच्यात आधुनिक काळात कोणाचा समावेश होतो? (ख) ‘या पिढीचा’ नेमका अवधी आपण का मोजू शकत नाही? (पृष्ठ २५ वरील चौकट पाहावी.)

१५ आज ज्यांना आध्यात्मिक समज नाही त्यांच्या मते येशूच्या उपस्थितीचे चिन्ह “दृश्‍य स्वरूपात” दिसलेलेच नाही. ते म्हणतात की सर्वकाही पूर्वीप्रमाणेच चालले आहे. (२ पेत्र ३:४) दुसरीकडे पाहता, ख्रिस्ताच्या विश्‍वासू अभिषिक्‍त बंधूंनी, म्हणजे आधुनिक काळातील योहान वर्गाने हे चिन्ह ओळखले आहे. आकाशात वीज चमकावी तितक्या स्पष्टपणे त्यांना ते दिसले आहे आणि त्याचा खरा अर्थही त्यांना समजला आहे. एक वर्ग या नात्याने हे अभिषिक्‍त जन, आधुनिक काळातील समकालीन लोकांची ती “पिढी” आहे, जी “हे सर्व पूर्ण होईपर्यंत” नाहीशी होणार नाही. * यावरून असेही सूचित होते की भाकीत केलेले मोठे संकट सुरू होईल तेव्हा ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांपैकी काहीजण अद्याप पृथ्वीवर जिवंत असतील.

“जागृत राहा”

१६. ख्रिस्ताच्या सर्व शिष्यांनी काय केले पाहिजे?

१६ चिन्ह फक्‍त ओळखणेच पुरेसे नाही. येशूने पुढे म्हटले: “जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.” (मार्क १३:३७) हे आज आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाचे आहे, मग आपण अभिषिक्‍तांपैकी असोत किंवा मोठ्या लोकसमुदायापैकी. येशूला १९१४ साली स्वर्गात राजपद देण्यात आले तेव्हापासून नऊ दशके उलटून गेली आहेत. कितीही कठीण वाटत असले तरीही आपण येणाऱ्‍या नाशातून बचावण्याकरता सदैव सिद्ध असले पाहिजे व जागृत राहिले पाहिजे. ख्रिस्त अदृश्‍य स्वरूपात उपस्थित आहे व राज्य करत आहे हे समजल्यामुळे आपल्याला जागृत राहण्यास मदत मिळते. तसेच ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की लवकरच, “[आपल्याला] वाटणार नाही त्या घटकेस” तो त्याच्या शत्रूंचा नाश करण्याकरता येईल.—लूक १२:४०.

१७. येशूच्या उपस्थितीचा अर्थ समजून घेतल्यावर आपल्याला कसे वाटले पाहिजे आणि आपण काय करण्याचा निश्‍चय केला पाहिजे?

१७ ख्रिस्ताच्या उपस्थितीचा अर्थ समजून घेतल्यावर, यहोवाचा दिवस किती जवळ आला आहे याची आपल्याला आणखीनच प्रकर्षाने जाणीव होते. आपल्याला माहीत आहे की येशूच्या उपस्थितीला केव्हाच सुरुवात झाली असून १९१४ पासून अदृश्‍यरित्या तो स्वर्गात राजा या नात्याने राज्य करत आहे. लवकरच तो दुष्टांचा नाश करण्याकरता आणि या सबंध पृथ्वीचा कायापालट करण्याकरता येईल. म्हणूनच, आपण येशूने भाकीत केलेल्या कार्यात पूर्वीपेक्षा जास्त आवेशाने सहभाग घेण्याचा निश्‍चय करू या. येशूने म्हटले होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट [टीलोस] होईल.”—मत्त. २४:१४.

[तळटीपा]

^ पारूसिया या शब्दाच्या सविस्तर स्पष्टीकरणासाठी शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड २, पृष्ठे ६७६-९ पाहावीत.

^ टेहळणी बुरूज, नोव्हेंबर १, १९९५, पृष्ठे ११-१५, १९, ३०, ३१ पाहा.

^ “ही पिढी” अस्तित्वात असण्याचा कालावधी हा प्रकटीकरणाच्या पुस्तकातील पहिल्या दर्शनाची पूर्णता होण्याच्या काळाशी जुळतो असे दिसते. (प्रकटी. १:१०–३:२२) या दर्शनाची पूर्णता प्रभूच्या दिवसादरम्यान, १९१४ पासून सुरू होऊन, विश्‍वासू अभिषिक्‍तांपैकी शेवटल्या व्यक्‍तीचा मृत्यू व पुनरुत्थान होईपर्यंत घडते.—प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे! पृष्ठ २४, परिच्छेद ४ पाहावे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• येशूची उपस्थिती एका विस्तृत कालावधीस सूचित करते हे आपल्याला कसे समजते?

• कोणाला येशूच्या उपस्थितीचे चिन्ह ओळखता आले आहे व त्याचा अर्थ समजला आहे?

मत्तय २४:३४ यात उल्लेख केलेल्या पिढीत आधुनिक काळात कोणाचा समावेश होतो?

• ‘या पिढीचा’ नेमका कालावधी आपण का मोजू शकत नाही?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चौकट]

‘या पिढीचा’ नेमका अवधी आपण मोजू शकतो का?

“पिढी” हा शब्द सहसा विशिष्ट कालावधीदरम्यान किंवा घटनेदरम्यान एकाच वेळी हयात असणाऱ्‍या निरनिराळ्या वयोगटांच्या लोकांच्या संदर्भात वापरला जातो. उदाहरणार्थ, निर्गम १:६ आपल्याला सांगते: “नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्व जण मरण पावले.” योसेफ व त्याच्या भावांच्या वयांत फरक होता पण एकाच कालावधीत त्या सर्वांनी विशिष्ट घटना अनुभवल्या होत्या. ‘त्या पिढीत’ योसेफचे काही भाऊ होते ज्यांचा जन्म त्याच्या आधी झाला होता. त्यांच्यापैकी काही योसेफच्या मृत्यूनंतरही जिवंत राहिले. (उत्प. ५०:२४) ‘त्या पिढीत’ बन्यामीनासारखे इतरजण होते, ज्यांचा जन्म योसेफच्या जन्मानंतर झाला. आणि ते कदाचित योसेफाच्या मृत्यूनंतरही जगले असावेत.

त्याअर्थी, विशिष्ट कालावधीदरम्यान जिवंत असलेल्या लोकांच्या संदर्भात जेव्हा “पिढी” हा शब्द वापरला जातो तेव्हा त्या पिढीचा नेमका कालावधी किती हे सांगता येत नाही. पण, तिचा अंत होईल आणि ती असामान्य लांबीची असणार नाही हे मात्र नक्की. येशूने मत्तय २४:३४ यात “पिढी” हा शब्द वापरून आपल्या शिष्यांना ‘शेवटला काळ’ केव्हा संपेल याचा हिशेब लावण्याकरता एक सूत्र दिलेले नाही. उलट, येशूने नंतर त्यांना स्पष्टपणे सांगितले की “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी” त्यांना समजणार नाही.—२ तीम. ३:१; मत्त. २४:३६.

[२२, २३ पानांवरील चित्र]

येशूला १९१४ साली राजमुकुट देण्यात आल्यानंतर तो “विजय मिळवीत” आहे असे त्याच्याविषयी वर्णन आढळते

[२४ पानांवरील चित्र]

“हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही”