व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मार्क पुस्तकातील ठळक मुद्दे

मार्क पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

मार्क पुस्तकातील ठळक मुद्दे

मार्कचे शुभवर्तमान हे चारही शुभवर्तमानांपैकी सर्वात संक्षिप्त आहे. येशू ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर जवळजवळ ३० वर्षांनी, योहान मार्क याने लिहिलेल्या या शुभवर्तमानात आपल्याला येशूच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्याचा एक वेगवान व उत्साहवर्धक अहवाल सापडतो.

हे शुभवर्तमान मुळात गैर यहुद्यांना, विशेषकरून रोमी लोकांना लक्षात ठेवून लिहिण्यात आले होते. येशू अनेक चमत्कार करणारा देवाचा पुत्र आहे असे हे पुस्तक त्याचे चित्र रेखाटते व त्याने हाती घेतलेल्या प्रचार मोहिमेविषयीही सांगते. पण येशूच्या शिकवणींपेक्षा त्याच्या कार्यांवर या पुस्तकात जास्त भर दिला आहे. मार्कच्या शुभवर्तमानाचे लक्षपूर्वक परीक्षण केल्यामुळे मशीहावरचा आपला विश्‍वास तर मजबूत होईलच पण त्यासोबत ख्रिस्ती सेवाकार्यात जास्त उत्साहाने सहभाग घेण्याची प्रेरणाही आपल्याला मिळेल.—इब्री ४:१२.

गालीलातील उल्लेखनीय सेवाकार्य

(मार्क १:१–९:५०)

बाप्तिस्मा देणारा योहान याच्या कार्याचा आणि येशूने अरण्यात घालवलेल्या ४० दिवसांचा वृत्तान्त अवघ्या १४ वचनांत आटोपून, मार्क गालीलात येशूने केलेल्या सेवाकार्याचा रोमांचक अहवाल द्यायला सुरुवात करतो. “लागलेच” या शब्दाचा वारंवार उपयोग केल्यामुळे मार्कचा वृत्तान्त आपल्या मनात एकप्रकारची तातडीची भावना उत्पन्‍न करतो.—मार्क १:१०, १२.

तीन वर्षांच्या आत येशू गालीलात तीन प्रचार मोहिमा हाती घेतो. मार्कने बहुतेक घटना कालक्रमानुसार मांडल्या आहेत. डोंगरावरील प्रवचन तसेच येशूच्या इतर दीर्घ उपदेशांचा त्याने समावेश केलेला नाही.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१५कोणत्या “काळाची पूर्णता झाली” होती? येशू या ठिकाणी असे म्हणत होता, की काळाची पूर्णता होऊन त्याने आपले सेवाकार्य सुरू करण्याची वेळ आली होती. देवाच्या राज्याचा नियुक्‍त राजा या नात्याने तो स्वतः तेथे उपस्थित असल्यामुळे त्याने म्हटले की देवाचे राज्य जवळ आले आहे. योग्य मनोवृत्तीच्या लोकांना, त्याच्या प्रचार कार्याला प्रतिसाद देऊन देवाची संमती मिळवण्याकरता आवश्‍यक पावले उचलण्याची संधी होती.

१:४४; ३:१२; ७:३६—आपल्या चमत्कारांविषयी फार गवगवा होऊ नये असे येशूला का वाटत होते? लोकांनी सनसनाटी बातम्यांच्या किंवा विपर्यास करून सांगितलेल्या वृत्तांच्या आधारावर आपल्याविषयी निष्कर्ष काढावा अशी येशूची इच्छा नव्हती. तर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींच्या आधारावर आपण ख्रिस्त असल्याचे मानावे आणि या पुराव्याच्या आधारावरच आपले शिष्य होण्याचा वैयक्‍तिक निर्णय घ्यावा अशी येशूची इच्छा होती. (यश. ४२:१-४; मत्त. ८:४; ९:३०; १२:१५-२१; १६:२०; लूक ५:१४) याला एक अपवाद म्हणजे गरेसेकरांच्या देशात दुष्टात्म्याने ग्रस्त असलेल्या माणसाला बरे करण्याची घटना. येशूने या मनुष्याला बरे केल्यानंतर त्याला घरी जाऊन आपल्या नातेवाईकांना या चमत्काराविषयी सांगण्याची आज्ञा दिली. येशूने त्याला अशी आज्ञा का दिली? येशूला त्या प्रांतातून निघून जाण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे तिथल्या लोकांशी आता त्याचा संपर्क येणार नव्हता. डुकरांचा कळप समुद्रात पडून मेल्यामुळे जे नुकसान झाले होते त्याविषयी तेथील लोक येशूची टीका करण्याची शक्यता होती. पण येशूने दया दाखवून ज्याला बरे केले होते तो मनुष्य त्यांच्यात राहिल्यास, तो आपल्या अनुभवाविषयी लोकांना सांगू शकेल आणि यामुळे लोकांचे येशूविषयी नकारात्मक मत बनणार नाही ही त्यामागची कल्पना असावी.—मार्क ५:१-२०; लूक ८:२६-३९.

२:२८—येशूला “शब्बाथाचाहि प्रभु” का म्हणण्यात आले आहे? प्रेषित पौलाने लिहिले, “ज्या पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे.” (इब्री १०:१) नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, सहा दिवस काम केल्यानंतर सातवा दिवस हा शब्बाथ दिवस होता. येशूने शब्बाथाच्या दिवशी अनेक लोकांना बरे केले होते. सैतानाच्या नियंत्रणात असलेल्या दुष्ट जगाचा नाश झाल्यानंतर मानवजातीला ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत जी शांतता, विश्रांती व इतर अनेक आशीर्वाद अनुभवायला मिळतील त्यांचा हा पूर्वसंकेत होता. म्हणूनच त्या राज्याच्या राजाला “शब्बाथाचाहि प्रभु” म्हणण्यात आले आहे.—मत्त. १२:८; लूक ६:५.

३:५; ७:३४; ८:१२—मार्कला येशूच्या नेमक्या भावना कशा कळल्या? मार्क हा १२ प्रेषितांपैकी नव्हता आणि तो येशूच्या निकट सहवासातही नव्हता. प्राचीन परंपरागत धारणा अशी आहे की प्रेषित पेत्र हा मार्कचा जवळचा मित्र होता आणि मार्कच्या शुभवर्तमानात आढळणारी बरीचशी माहिती त्यानेच मार्कला दिली असावी.—१ पेत्र ५:१३.

६:५१, ५२—शिष्यांना न उमगलेली “भाकरीची गोष्ट” काय होती? काही तासांआधीच येशूने फक्‍त पाच भाकरी आणि दोन माशांपासून ५,००० पुरुषांना व त्यांच्यासोबत स्त्रिया व मुलांना अन्‍न पुरवले होते. त्या घटनेवरून त्यांना जी “भाकरीची गोष्ट” उमगायला हवी होती ती ही, की येशूला यहोवा देवाने चमत्कार करण्याचे सामर्थ दिले आहे. (मार्क ६:४१-४४) जर येशूला देण्यात आलेले महान सामर्थ्य त्यांच्या लक्षात आले असते तर तो पाण्यावरून चालला तेव्हा त्यांना इतके आश्‍चर्य वाटले नसते.

८:२२-२६—येशूने एका अंधळ्या मनुष्याला बरे करण्याचा चमत्कार दोन टप्प्यांमध्ये का केला? येशूने कदाचित त्या मनुष्याबद्दल विचारशीलपणा दाखवून असे केले असावे. ज्या मनुष्याच्या डोळ्यांपुढे बऱ्‍याच काळापासून अंधकाराशिवाय काहीही नव्हते त्याची दृष्टी हळूहळू परत आणल्यामुळे त्याच्या डोळ्यांना लख्ख सूर्यप्रकाशाची सवय करायची संधी मिळाली असेल.

आपल्याकरता धडे:

२:१८; ७:११; १२:१८; १३:३. ज्या रूढीपरंपरा, शब्द, विश्‍वास व स्थळे गैरयहुदी वाचकांच्या ओळखीची नव्हती त्यांविषयी मार्क स्पष्टीकरण देतो. परूशी लोक “उपास करीत होते,” कुर्बान म्हणजे “अर्पण,” सदुकी “पुनरुत्थान नाही असे म्हणणारे” लोक होते आणि ‘जैतुनाचे डोंगर’ “मंदिराच्यासमोर” होते हे त्याने स्पष्ट केले. मशीहाच्या वंशावळीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रामुख्याने यहुदी लोकांनाच असल्यामुळे त्याने या वंशावळीचा समावेश केला नाही. या सर्व गोष्टींतून मार्क आपल्याला एक चांगला धडा देतो. ख्रिस्ती सेवाकार्यात भाग घेताना किंवा मंडळीच्या सभांमध्ये भाषण देताना आपण आपल्या श्रोत्यांची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन बोलले पाहिजे.

३:२१. येशूचे नातलग विश्‍वासात नव्हते. त्यामुळे, ख्रिस्ती असल्यामुळे ज्यांचा विश्‍वासात नसलेल्या कुटुंबीयांकडून विरोध होतो किंवा थट्टा केली जाते अशा व्यर्क्‍तिना येशू सहानुभूती दाखवतो.

३:३१-३५. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी तो देवाचा आध्यात्मिक पुत्र बनला. त्याअर्थी, “वर असलेली यरुशलेम” त्याची माता होती. (गलती. ४:२६) तेव्हापासून, येशूला त्याच्या रक्‍ताच्या नात्यांपेक्षा त्याचे शिष्य जास्त जवळचे व प्रिय वाटू लागले. यावरून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण आध्यात्मिक गोष्टींना जीवनात जास्त महत्त्व दिले पाहिजे.—मत्त. १२:४६-५०; लूक ८:१९-२१.

८:३२-३४. जर कोणी आपल्याविषयी दया दाखवून आत्मत्यागी वृत्ती दाखवण्यापासून आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण हे लगेच ओळखले पाहिजे व अशा प्रकारची दया आपण इतरांकडून कधीही स्वीकारू नये. ख्रिस्ताच्या अनुयायाने ‘आत्मत्याग करण्यास’ म्हणजेच स्वतःच्या स्वार्थांचा व इच्छा-आकांक्षांचा त्याग करण्यास तयार असले पाहिजे. त्याने ‘आपला वधस्तंभ उचलण्यास’ तयार असले पाहिजे. याचा अर्थ ख्रिस्ती असल्यामुळे जर वेळ आलीच तर मानहानी सहन करण्यास, छळ सोसण्यास किंवा मृत्यूलाही सामोरे जाण्यास त्याने तयार असले पाहिजे. तसेच त्याने ख्रिस्ताला ‘अनुसरत राहिले’ पाहिजे, म्हणजेच त्याच्या आदर्शाचे अनुकरण करत राहिले पाहिजे. ख्रिस्ताचे शिष्य असण्याकरता आपण ख्रिस्त येशूसारखी आत्मत्यागी प्रवृत्ती उत्पन्‍न केली पाहिजे व ती टिकवून ठेवली पाहिजे.—मत्त. १६:२१-२५; लूक ९:२२, २३.

९:२४. आपण आपल्या विश्‍वासाविषयी इतरांना सांगायला किंवा अधिक विश्‍वासासाठी प्रार्थना करायला कधीही लाजू नये.—लूक १७:५.

शेवटला महिना

(मार्क १०:१–१६:८)

सा.यु. ३२ सालाच्या शेवटीशेवटी येशू “यहूदीया प्रांतात व यार्देनेच्या पलीकडे” जातो आणि पुन्हा लोकांचे समुदाय घोळक्यांनी त्याच्याकडे येतात. (मार्क १०:१) तेथे प्रचार केल्यानंतर तो जेरूसलेमकडे जायला निघतो.

निसान ८ तारखेला येशू बेथानी येथे असतो. तो जेवायला बसलेला असताना एक स्त्री त्या ठिकाणी येते आणि त्याच्या डोक्यावर सुगंधी तेल ओतते. येशू वैभवाने जेरूसलेममध्ये प्रवेश करतो तेव्हापासून त्याच्या पुनरुत्थानापर्यंतच्या सर्व घटना कालक्रमानुसार दिल्या आहेत.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१०:१७, १८—येशूला “उत्तम गुरुजी” म्हणणाऱ्‍या मनुष्याला येशू त्याची चूक का दाखवतो? ही स्तुती स्वीकारण्यास नकार देऊन येशू सर्व गौरव यहोवालाच गेले पाहिजे हे स्पष्ट करतो आणि खरा देवच सर्व उत्तम गोष्टींचा उगम आहे हे सुचवतो. शिवाय, येशू या मूलभूत सत्याकडे लक्ष वेधतो, की सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता या नात्याने केवळ यहोवा देवालाच योग्य व अयोग्य काय हे ठरवण्याचा अधिकार आहे.—मत्त. १९:१६, १७; लूक १८:१८, १९.

१४:२५—“मी देवाच्या राज्याचा नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही” असे येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना का म्हटले? स्वर्गात द्राक्षारस पितात असे येशू येथे सुचवत नव्हता. पण आनंदी असण्याचा संबंध बरेचदा द्राक्षारसाशी जोडला जात असल्यामुळे येशू आपल्या राज्यात आपल्या पुनरुत्थित अभिषिक्‍त अनुयायांसोबत असण्याच्या आनंदाविषयी येथे बोलत होता.—स्तो. १०४:१५; मत्त. २६:२९.

१४:५१, ५२—‘उघडाच पळून गेलेला’ तरुण कोण होता? या घटनेविषयी फक्‍त मार्कनेच उल्लेख केलेला असल्यामुळे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की तो स्वतःविषयी सांगत असावा.

१५:३४—“माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?” या येशूच्या शब्दांवरून त्याचा विश्‍वास डगमगला होता असे म्हणता येईल का? नाही. येशूने असे का म्हटले हे जरी आपल्याला नक्की सांगता येत नाही तरीसुद्धा, यावरून असे दिसते की आपल्या पुत्राच्या विश्‍वासाची पूर्णार्थाने परीक्षा व्हावी म्हणून यहोवाने त्याच्यापासून आपले संरक्षण काढून घेतले होते हे येशूला माहीत होते. कदाचित स्तोत्र २२:१ यात येशूविषयी जे सांगितले होते ते त्याला पूर्ण करायचे असल्यामुळे त्याने असे म्हटले असावे अशीही एक शक्यता आहे.—मत्त. २७:४६.

आपल्याकरता धडे:

१०:६-९. देवाच्या मूळ उद्देशानुसार विवाह जोडीदारांनी एकमेकांना जडून राहिले पाहिजे. त्यामुळे, वैवाहिक जीवनात समस्या उत्पन्‍न होतात तेव्हा, घटस्फोट घेण्याची घाई करण्याऐवजी पती पत्नींनी या समस्यांवर मात करण्यासाठी बायबलमधील तत्त्वांचे पालन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे.—मत्त. १९:४-६.

१२:४१-४४. गरीब विधवेच्या उदाहरणावरून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण निःस्वार्थ भावनेने खऱ्‍या उपासनेला आर्थिक पाठबळ दिले पाहिजे.

[२९ पानांवरील चित्र]

येशूने या माणसाला आपल्यासोबत जे काही घडले ते आपल्या स्वकीयांना जाऊन सांगण्याची आज्ञा का दिली?