व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या मार्गांनी चाला

यहोवाच्या मार्गांनी चाला

यहोवाच्या मार्गांनी चाला

“जो पुरुष परमेश्‍वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!”—स्तो. १२८:१.

१, २. आनंदी होणे हे आपल्या आवाक्याबाहेरचे नाही, असे आपण का म्हणू शकतो?

 आपण आनंदी असावे, असे सर्वांनाच वाटते. पण, आनंदी होण्याची इच्छा बाळगल्याने व त्या दिशेने प्रयत्न केल्याने आपण आपोआप आनंदी होऊ, असा त्याचा अर्थ होत नाही याजशी तुम्ही सहमत व्हाल.

तरीपण आनंदी होणे हे आपल्या आवाक्याबाहेरचे नाही. स्तोत्र १२८:१ मध्ये म्हटले आहे: “जो पुरुष परमेश्‍वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!” आपण जर यहोवाची उपासना केली आणि त्याच्या अपेक्षेनुसार जीवन जगून त्याच्या मार्गांनी चाललो तर आपण निश्‍चितच आनंदी होऊ शकतो. यामुळे आपल्या आचरणावर आणि आपण जे गुण प्रदर्शित करतो त्यावर कोणता परिणाम होतो?

भरवसालायक शाबीत व्हा

३. भरवसालायक होणे आणि देवाला आपण केलेले समर्पण यांच्यात काय संबंध आहे?

यहोवा जसा भरवसालायक आहे तसे त्याची भीती बाळगणारे भरवसालायक होतात. यहोवाने प्राचीन इस्राएलाला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केले. (१ राजे ८:५६) आपले समर्पण हे आपण देवाला दिलेले सर्वात महत्त्वपूर्ण वचन आहे आणि नित्य प्रार्थना केल्याने आपण दिलेले वचन पाळू शकू. स्तोत्रकर्ता दावीद याच्याप्रमाणे आपणही अशी प्रार्थना करू शकतो: “हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहे; . . . तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडीत राहीन.” (स्तो. ६१:५, ८; उप. ५:४-६) आपल्याला जर देवाचे मित्र व्हायचे असेल तर आपण भरवसालायक असले पाहिजे.—स्तो. १५:१, ४.

४. यहोवाला दिलेल्या वचनासंबंधी इफ्ताह आणि त्याच्या मुलीचा काय दृष्टिकोन होता?

इस्राएलच्या न्यायाधिशांच्या काळात, इफ्ताहाने यहोवाला असे वचन दिले, की जर यहोवाने त्याला अम्मोनी लोकांवर विजय मिळवून दिला तर तो, युद्धातून परत जाताना जी व्यक्‍ती त्याला पहिली भेटेल तिला “हवन” म्हणून सादर करेल. झाले असे, की त्याला सर्वात पहिल्यांदा त्याची मुलगीच भेटली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. यहोवावर भरवसा ठेवून इफ्ताह आणि त्याची अविवाहित मुलगी, यहोवाला दिलेले वचन पाळतात. लग्न करून मुले प्रसवण्याला प्राचीन इस्राएलात फार महत्त्व असले तरीसुद्धा, इफ्ताहाची मुलगी अविवाहित राहणे पसंत करते आणि यहोवाच्या मंदिरात त्याची पवित्र सेवा करण्याचा बहुमान स्वीकारते.—शास्ते ११:२८-४०.

५. हन्‍ना भरवसालायक कशी शाबीत झाली?

हन्‍ना देवाला भिऊन वागणारी स्त्री होती. तिने स्वतःला भरवसालायक शाबीत केले. ती, एलकाना नावाच्या आपल्या लेवी पती आणि त्याची दुसरी पत्नी पनिन्‍ना यांच्यासमवेत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशांत राहत होती. पनिन्‍नाला अनेक मुले होती; हन्‍नाला नव्हती. पनिन्‍ना तिला टोमणे मारायची. खासकरून, जेव्हा संपूर्ण कुटुंब मंदिरात जात असे तेव्हा ती तिला टोमणे मारायची. अशाच एका प्रसंगी, हन्‍नाने यहोवाला असे वचन दिले, की जर तिला मुलगा झाला तर ती त्या मुलाला यहोवाच्या सेवेसाठी देईल. यानंतर लवकरच हन्‍नाला दिवस जातात आणि ती एका पुत्राला जन्म देते व त्याचे नाव शमुवेल ठेवते. त्याचे दूध सुटल्यावर हन्‍ना त्याला, यहोवाची “आमरण” सेवा करण्याकरता शिलो येथे आणते. (१ शमु. १:११) आपल्याला नंतरही मुले होतील, हे तिला माहीत नव्हते तरीपण, तिने यहोवाला दिलेले वचन पाळले.—१ शमु. २:२०, २१.

६. तुखिकाचा भरवसालायकपणा कसा दिसून आला?

पहिल्या शतकात तुखिक नावाचा एक ख्रिस्ती बांधव भरवसालायक व “विश्‍वासू सेवक” होता. (कलस्सै. ४:७) तुखिकाने प्रेषित पौलाबरोबर ग्रीसहून मासेदोनिया, आशिया मायनर आणि कदाचित जेरूसलेम येथे प्रवास केला. (प्रे. कृत्ये २०:२-४) हाच तो ‘बंधू’ असावा ज्याने तीताला यहुदियातील गरजू बंधूभगिनींसाठी भेटवस्तू देण्यास मदत केली. (२ करिंथ. ८:१८, १९; १२:१८) पौलाला जेव्हा पहिल्यांदा रोममध्ये बंदिवासात टाकण्यात आले तेव्हा तुखिकाने, इफिसस व कलस्सैमधील बांधवांना पत्रे पोहचवण्याचे भरवसालायक काम केले. (इफिस. ६:२१, २२; कलस्सै. ४:८, ९) पौलाला जेव्हा दुसऱ्‍यांदा रोममधील तुरुंगात टाकण्यात आले होते तेव्हा त्याने तुखिकाला इफिससला पाठवले. (२ तीम. ४:१२) आपण जर भरवसालायक असलो तर, यहोवाच्या सेवेत आपल्याला अनेक विशेषाधिकार मिळतील.

७, ८. दावीद आणि योनाथान जीवलग मित्र होते, असे आपण का म्हणू शकतो?

आपण भरवसालायक मित्र असले पाहिजे, अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (नीति. १७:१७) राजा शौलाचा पुत्र योनाथान दाविदाचा मित्र होता. दाविदाने गल्याथाला ठार मारल्याची बातमी योनाथाने ऐकली तेव्हा “योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.” (१ शमु. १८:१,) शौल जेव्हा दाविदाला ठार मारू पाहत होता तेव्हा योनाथानाने त्याला सावधही केले. दावीद जेव्हा पळून गेला तेव्हा योनाथान त्याला भेटला आणि त्याच्याशी त्याने एक आणभाक केली. शौलाबरोबर दाविदाच्या वतीने बोलल्यामुळे, योनाथान मरता मरता वाचला. पण हे दोन मित्र पुन्हा भेटले आणि त्यांची मैत्री आणखी गहिरी झाली. (१ शमु. २०:२४-४१) त्यांच्या शेवटल्या भेटीच्यावेळी योनाथानाने “देवाच्या ठायी [दाविदाचा] भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली.”—१ शमु. २३:१६-१८.

योनाथान पलिष्ट्यांबरोबर युद्ध करताना मरण पावला. (१ शमु. ३१:६) एका विलापगीतात दाविदाने असे गायिले: “माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे तू मजवर फार माया करीत असस तुझे मजवर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनहि ते अधिक होते.” (२ शमु. १:२६) दावीद आणि योनाथान जीवलग मित्र होते.

नेहमी “नम्र मनाचे” असा

९. शास्ते पुस्तकाच्या ९ व्या अध्यायात नम्र असणे किती महत्त्वपूर्ण आहे हे कशाप्रकारे दाखवण्यात आले आहे?

देवाचे मित्र व्हायचे असेल तर आपण “नम्र मनाचे” असले पाहिजे. (१ पेत्र ३:८; स्तो. १३८:६) शास्ते पुस्तकाच्या ९ व्या अध्यायात नम्र असणे किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवण्यात आले आहे. गिदोनाचा पुत्र योथाम याने म्हटले: “एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणांवर राजा नेमावे म्हणून निघाली.” जैतून, अंजिर आणि द्राक्षवेल यांचा उल्लेख करण्यात आला. ही झाडे अशा लोकांना चित्रित करत होती की जे योग्यताप्राप्त होते परंतु, त्यांना आपल्या सहइस्राएली बांधवांवर अधिकार गाजवण्याची कसलीही इच्छा नव्हती. पण, काटेरी झुडूप ज्याचा उपयोग केवळ जळणासाठी केला जातो ते राज्यत्व स्वीकारण्यास तयार होते. हे काटेरी झुडूप गर्विष्ठ अबीमलेखाच्या राज्यत्वास चित्रित करत होते. अबीमलेख एक खूनी होता जो इतरांवर अधिकार गाजवू पाहत होता. “अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले;” त्यानंतर त्याचा अकाली मृत्यू झाला. (शास्ते ९:८-१५, २२, ५०-५४) तेव्हा, “नम्र मनाचे” असण्यात किती फायदा आहे!

१०. हेरोदाने “देवाला गौरव दिले नाही,” यावरून आपण कोणता धडा शिकतो?

१० सा.यु. पहिल्या शतकात यहुदाचा गर्विष्ठ राजा हेरोद अग्रिप्पा आणि सोर व सिदोनच्या रहिवाशांमध्ये तंग वातावरण होते. सोर व सिदोनचे रहिवाशी हेरोदाबरोबर शांतीसलोखा करू इच्छित होते. हेरोद एकदा एक भाषण देत होता. तेव्हा सर्व लोक ओरडून म्हणू लागले: “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” हेरोदाची छाती गर्वाने फुगली आणि “त्याने देवाला गौरव दिले नाही.” तेव्हा यहोवाच्या देवदूताने त्याच्यावर असा प्रहार केला की तो जागच्या जागी गतप्राण झाला. (प्रे. कृत्ये १२:२०-२३) आपण, एक खूप कुशल वक्‍ता असू किंवा बायबल सत्य शिकवण्यात आपला हातखंडा असेल तर? तर, देव आपला उपयोग करून घेत आहे म्हणून आपण नेहमी त्याचे आभार मानू या.—१ करिंथ. ४:६, ७; याको. ४:६.

धैर्यवान व बळकट व्हा

११, १२. यहोवा आपल्या सेवकांना धैर्य आणि बळ देतो हे हनोखच्या उदाहरणावरून कसे दिसून येते?

११ आपण जर यहोवाच्या मार्गांनी नम्रपणे चालत राहिलो तर तो आपल्याला धैर्य व बळ देईल. (अनु. ३१:६-८, २३) हनोख नावाचा आदामाच्या वंशावळीतला सातवा पुरुष त्याच्या काळातल्या दुष्ट लोकांप्रमाणे न चालता देवाबरोबर धार्मिकतेने व धैर्याने चालला. (उत्प. ५:२१-२४) लोकांचे बोलणे, त्यांची कार्ये अभक्‍त होती, त्यामुळे या लोकांना एक जबरदस्त संदेश सांगण्यासाठी देवाने हनोखला शक्‍ती दिली. (यहूदा १४, १५ वाचा.) देवाच्या न्यायदंडांची घोषणा करण्याकरता तुम्हालाही धैर्याची आवश्‍यकता आहे का?

१२ नोहाच्या दिवसांत संपूर्ण पृथ्वीवरील अभक्‍त लोकांवर जलप्रलय आणून यहोवाने न्यायदंड बजावला. पण, हनोखच्या भविष्यवाणीतून आपल्याला देखील प्रोत्साहन मिळू शकते कारण, आपल्या दिवसांतील अभक्‍त लोकांचा देवाच्या पवित्र सैन्याकरवी लवकरच अंत होणार आहे. (प्रकटी. १६:१४-१६; १९:११-१६) शक्‍तीसाठी जेव्हा आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या संदेशाची—मग तो संदेश त्याच्या न्यायदंडाचा संदेश असो अथवा राज्य शासनात मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा संदेश असो—घोषणा करण्यासाठी आपल्याला धैर्य देऊन यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो.

१३. निराशजनक समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला देवाकडून धैर्य व शक्‍ती मिळू शकते, असे आपण खात्रीने कसे म्हणू शकतो?

१३ निराशजनक समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला देवाकडून धैर्याची व शक्‍तीची गरज आहे. एसावाने जेव्हा दोन हित्ती स्त्रियांबरोबर विवाह केला तेव्हा त्या बायका त्याच्या आईवडिलांच्या अर्थात “इसहाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या.” रिबकेने तर दुःखाने असेही म्हटले: “या हेथीच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; यांच्यासारखी हेथीच्या मुलींतली, ह्‍या देशाच्या मुलींतली एखादी याकोबाने वरिली तर मला जगून काय लाभ?” (उत्प. २६:३४, ३५; २७:४६) इसहाकाने त्वरित पावले उचलली. त्याने याकोबाला, यहोवाच्या उपासकांपैकी एखादी मुलगी शोधून तिच्याबरोबर विवाह करण्यास पाठवले. इसहाक व रिबका, एसावाने जे केले होते ते बदलू शकत नसले तरीसुद्धा, देवाने त्यांना त्याच्याशी विश्‍वासू राहण्याकरता बुद्धी, धैर्य आणि शक्‍ती दिली. आपणही जर मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली तर तो आपल्याला निश्‍चितच अशी मदत देईल.—स्तो. ११८:५.

१४. एका चिमुकल्या इस्राएली मुलीने धैर्य कसे दाखवले?

१४ अनेक शतकांनंतर, एका चिमुकल्या इस्राएली मुलीला एका टोळीने दासी बनवण्यासाठी पळवून नेले. ही मुलगी नामान नावाच्या एका अरामी सैन्याधिपतीच्या घरात मोलकरीण म्हणून कामाला लागली. नामानाला कोड होते. संदेष्टा एलीशा याच्याद्वारे देवाने अनेक चमत्कार केले होते, हे या चिमुकलीने ऐकले होते. त्यामुळे तिने अगदी धैर्याने नामानाच्या पत्नीला असे सांगितले: “शोमरोनातल्या संदेष्ट्यांशी माझ्या धन्यांची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.” नामान इस्राएलास गेला आणि चमत्काराने त्याचे कोड बरे झाले. (२ राजे ५:१-३) शिक्षकांना, शाळासोबत्यांना व इतरांना साक्ष देण्यासाठी धैर्य मिळावे म्हणून यहोवावर अवलंबून राहणाऱ्‍या तरुणांसाठी या चिमुकलीने किती उत्तम उदाहरण मांडले आहे!

१५. अहाबाच्या घराण्याचा कारभारी ओबद्या याने कोणते धैर्यवान कृत्य केले?

१५ देवाकडून मिळणाऱ्‍या धैर्यामुळे आपण छळातही तग धरून राहू शकतो. राजा अहाबाच्या घराण्यात कारभारी म्हणून काम करणाऱ्‍या ओबद्याचे उदाहरण घ्या. ओबद्या, संदेष्टा एलियाच्या काळात हयात होता. ईजबेल राणीने देवाच्या संदेष्ट्यांची कत्तल करण्याचा हुकूम दिला तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन “एका गुहेत पन्‍नास व दुसऱ्‍या गुहेत पन्‍नास असे” लपवून ठेवले. (१ राजे १८:१३; १९:१८) ओबद्याने यहोवाच्या संदेष्ट्यांना जशी मदत केली तशी तुम्हीही छळ सहन करणाऱ्‍या आपल्या बंधूभगिनींना धैर्याने मदत कराल का?

१६, १७. अरिस्तार्ख व गायस यांनी छळाला तोंड देताना कशी प्रतिक्रिया दाखवली?

१६ आपला छळ होत असताना आपण ही खात्री बाळगू शकतो की यहोवा आपल्या पाठीशी आहे. (रोम. ८:३५-३९) इफिससमधील एका खुल्या थिएटरमध्ये पौलासोबत काम करणाऱ्‍या अरिस्तार्ख व गायसला हजारोंच्या संख्येने असलेल्या लोकसमूहाला तोंड द्यावे लागले. देमेत्रिय नावाच्या एका सोनाराने हा दंगा माजवला होता. देमेत्रिय व त्याच्या सोबतचे कारागीर अर्तमी देवीचे रुप्याचे देव्हारे बनवत असत. पौलाच्या प्रचार कार्यामुळे शहरातील अनेक लोकांनी मूर्तीपूजा करण्याचे सोडून दिल्यामुळे या सोनारांचा बक्कळ पैसा कमवून देणारा व्यापार कमी होऊ लागला होता. या लोकसमूहाने अरिस्तार्ख व गायसला नाटकगृहात फरफटत आणले व ओरडत राहिले: “इफिसकरांची अर्तमी थोर!” आपण या लोकांच्या तावडीतून आता जिवंत सुटत नाही, असे या दोघांना कदाचित वाटले असेल, पण नगराच्या शिरस्तेदाराने जमावाला शांत केले.—प्रे. कृत्ये १९:२३-४१.

१७ तुम्हाला जर असा अनुभव आला असता आणि सुखरूप बाहेर आल्यानंतर तुम्ही, नको रे बाबा असले जीवन!, असा विचार केला असता का? अरिस्तार्ख व गायसचे धैर्य खचल्याचा बायबलमध्ये कोठेही उल्लेख नाही. अरिस्तार्ख थेस्सलोनिकाचा होता. त्यामुळे सुवार्तेचा प्रचार केल्यास छळास तोंड द्यावे लागेल हे त्याला माहीत होते. एकदा, पौल जेव्हा थेस्सलोनिकामध्ये प्रचार करीत होता तेव्हासुद्धा एका जमावाने दंगा माजवला होता. (प्रे. कृत्ये १७:५; २०:४) अरिस्तार्ख व गायस यहोवाच्या मार्गांनी चालत होते त्यामुळेच त्यांना छळ सहन करण्याची शक्‍ती व धैर्य देवाकडून मिळाले.

इतरांच्या भल्याचा विचार करा

१८. प्रिस्क व अक्विला हे दोघेही ‘दुसऱ्‍यांचे हित पाहायचे,’ हे कसे?

१८ आता छळ होत असो अथवा नसो, आपण आपल्या बंधूभगिनींच्या भल्याचा विचार केला पाहिजे. प्रिस्क व अक्विला हे दोघेही ‘दुसऱ्‍यांचे हित पाहायचे.’ (फिलिप्पैकर २:४ वाचा.) या अनुकरणीय विवाहित दांपत्याने, इफिससमध्ये पौलाच्या राहण्याची सोय केली असावी. याच इफिससमध्ये आधी उल्लेख केल्याप्रमाणे देमेत्रिय नावाच्या सोनाराने दंगा माजवला होता. या दंगेच्या वेळी अक्विला व प्रिस्काने पौलाच्या जीवाखातर “आपला जीव धोक्यात घातला.” (रोम. १६:३, ४; २ करिंथ. १:८) आज, ज्या बांधवांचा छळ होत आहे त्या बांधवांबद्दल आपल्याला काळजी असल्यामुळे आपण “सापांसारखे चतुर” बनतो. (मत्त. १०:१६-१८) आपण आपले प्रचार कार्य सावधगिरीने करतो. आणि छळकर्त्यांच्या हातात यदाकदाचित सापडलोच तर, आपण बांधवांची नावे किंवा इतर माहिती देऊन त्यांचा विश्‍वासघात करत नाही.

१९. दुर्कस इतरांसाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी करायची?

१९ दुसऱ्‍यांचे हित पाहण्यामध्ये इतरही गोष्टी समाविष्ट आहेत. काही बंधूभगिनींना विशिष्ट गोष्टींची गरज असेल आणि त्या गोष्टी त्यांना देण्याची आपल्यात ऐपत असेल. (इफिस. ४:२८; याको. २:१४-१७) पहिल्या शतकात, यापोमध्ये दुर्कस नावाची एक उदार मनाची स्त्री होती. (प्रेषितांची कृत्ये ९:३६-४२ वाचा.) दुर्कस “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.” तसेच ती, गरीब विधवांसाठी वस्त्र बनवत असे. सा.यु. ३६ मध्ये तिचा मृत्यू झाला तेव्हा अनेक विधवांना खूप वाईट वाटले. देवाने प्रेषित पेत्राद्वारे दुर्कसला पुन्हा जिवंत केले. आणि असे वाटते, की यानंतर तिने पृथ्वीवरील तिचे जीवन, सुवार्तेची घोषणा करण्यात व इतरांसाठी अमूल्य वस्तू बनवण्यात आनंदाने खर्च केले. आज आपल्यामध्ये अशा निःस्वार्थ ख्रिस्ती भगिनींना पाहून आपल्याला किती आनंद होतो!

२०, २१. (क) इतरांचे हित पाहणे आणि प्रोत्साहन देणे यामध्ये काय संबंध आहे? (ख) प्रोत्साहन देण्याकरता तुम्ही काय करू शकता?

२० इतरांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचे हित पाहतो. (रोम. १:११, १२) पौलाचा सहकर्मी सीला हा नेहमी इतरांना प्रोत्साहन द्यायचा. सा.यु. ४९ मध्ये सुंतेचा वाद मिटल्यानंतर जेरूसलेममधील नियमन मंडळाने, इतरत्र असलेल्या ख्रिस्ती बांधवांसाठी एक पत्र पाठवण्याकरता काही प्रतिनिधींना पाठवले. सीला, यहुदा, बर्णबा आणि पौलाने ते पत्र अंत्युखियाला नेले. तेथे सीला व यहुदाने “पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.”—प्रे. कृत्ये १५:३२.

२१ नंतर, पौल आणि सीलाला फिलिप्पै येथे बंदिशाळेत टाकण्यात आले. पण एका भूमिकंपामुळे त्यांना बंदिशाळेच्या नायकाला साक्ष देण्याची संधी मिळाली. या साक्षीनंतर तो नायक आणि त्याचे संपूर्ण घराणे ख्रिस्ती बनले. ते शहर सोडून जाण्याआधी सीला व पौलाने तेथील बांधवांना खूप धीर दिला. (प्रे. कृत्ये १६:१२, ४०) पौल आणि सीलाप्रमाणे आपणही, आपल्या टिपणींद्वारे, भाषणांद्वारे व क्षेत्र सेवेत आवेशाने भाग घेण्याद्वारे इतरांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू या. तुमच्याजवळ “काही बोधवचन” असेल तर ते जरूर “सांगा.”—प्रे. कृत्ये १३:१५.

यहोवाच्या मार्गांनी चालत राहा

२२, २३. बायबलमधील अहवालांतून आपण फायदा कसा मिळवू शकतो?

२२ ‘सर्व उत्तेजनाचा देव’ अर्थात यहोवा याच्या वचनात असलेल्या सत्य घटनांबद्दल आपण किती आभारी असले पाहिजे. (२ करिंथ. १:३, बाईंगटन) या घटनांतून आपण जर लाभ मिळवू इच्छित असू तर आपण बायबलमधील धड्यांचा आपल्या जीवनात अवलंब केला पाहिजे आणि देवाच्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात मार्गदर्शन करू दिले पाहिजे.—गलती. ५:२२-२५.

२३ बायबलमधील अहवालांवर मनन केल्याने आपण देव ज्यामुळे आनंदित होतो असे गुण प्रदर्शित करू शकू. यामुळे, “बुद्धि, ज्ञान व सुख” देणाऱ्‍या यहोवा देवाबरोबरचा आपला नातेसंबंध मजबूत होईल. (उप. २:२६) आणि परिणामतः आपण देवाचे प्रेमळ हृदय आनंदित करू शकू. (नीति. २७:११) यहोवाच्या मार्गांनी सदोदित चालण्याद्वारे आपण यहोवाचे मन आनंदित करण्याचा दृढनिश्‍चय करू या.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• तुम्ही स्वतःला भरवसालायक कसे शाबीत करू शकता?

• आपण “नम्र मनाचे” का असले पाहिजे?

• बायबल अहवाल आपल्याला धैर्यवान बनण्यास कशाप्रकारे मदत करू शकतात?

• कोणकोणत्या मार्गांनी आपण इतरांच्या हिताचा विचार करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्र]

भरवसालायक ईफ्ताहाने आणि त्याच्या मुलीने दिलेले वचन, कठीण असूनही पाळले

[१० पानांवरील चित्र]

तरुणांनो, तुम्ही इस्राएली मुलीकडून कोणता धडा शिकलात?

[११ पानांवरील चित्र]

दुर्कसने बंधूभगिनींच्या गरजा कशाप्रकारे पूर्ण केल्या?