व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वश्रेष्ठ मिशनरी येशू ख्रिस्त याचे अनुकरण करा

सर्वश्रेष्ठ मिशनरी येशू ख्रिस्त याचे अनुकरण करा

सर्वश्रेष्ठ मिशनरी येशू ख्रिस्त याचे अनुकरण करा

“जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.”—१ करिंथ. ११:१.

१. आपण येशू ख्रिस्ताचे अनुकरण का केले पाहिजे?

 प्रेषित पौलाने सर्वश्रेष्ठ मिशनरी येशू ख्रिस्त याचे अनुकरण केले. पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना असा आग्रह केला की “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथ. ११:१) येशूने आपल्या प्रेषितांना नम्रता कशी दाखवावी हे शिकवण्याकरता स्वतः त्यांचे पाय धुतले आणि मग तो त्यांना म्हणाला: “जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” (योहा. १३:१२-१५) सध्याच्या काळात ख्रिस्ती या नात्याने आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या वागण्याबोलण्यात येशूचे अनुकरण करावे, तसेच त्याच्यासारखेच गुण प्रदर्शित करावेत.—१ पेत्र २:२१.

२. तुम्हाला जरी नियमन मंडळाद्वारे मिशनरी म्हणून नियुक्‍त करण्यात आलेले नसेल, तरीसुद्धा तुम्ही कशाप्रकारची मनोवृत्ती बाळगू शकता?

याआधीच्या लेखात आपण शिकलो की मिशनरी म्हणजे ज्याला सुवार्तिकाचे कार्य करण्याकरता पाठवले जाते, किंवा जो दुसऱ्‍यांना जाऊन सुवार्ता सांगतो. याबाबतीत पौलाने काही अर्थपूर्ण प्रश्‍न विचारले. (रोमकर १०:११-१५ वाचा.) प्रेषित पौलाने विचारले: “घोषणा करणाऱ्‍यावाचून ते कसे ऐकतील?” मग त्याने यशयाच्या भविष्यवाणीतील हे शब्द उद्धृत केले: “चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्‍याचे चरण किती मनोरम आहेत!” (यश. ५२:७) तुम्हाला जरी मिशनरी म्हणून नियुक्‍त करून दुसऱ्‍या एखाद्या देशात पाठवण्यात आलेले नसेल, तरीसुद्धा तुम्ही देखील येशूप्रमाणे खऱ्‍या सुवार्तिकाची उत्सुक मनोवृत्ती बाळगून सुवार्तेचे आवेशी उद्‌घोषक बनू शकता. मागच्या वर्षी ६९,५७,८५२ राज्य प्रचारकांनी २३६ देशांत ‘सुवार्तिकांचे काम केले.’—२ तीम. ४:५.

“आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो”

३, ४. येशूने कोणत्या गोष्टींचा त्याग केला आणि त्याचे अनुयायी होण्याकरता आपण काय केले पाहिजे?

पृथ्वीवर आपल्याला सोपवण्यात आलेले कार्य पूर्ण करण्याकरता येशूने स्वर्गातील आपले जीवन व गौरव त्यागून ‘स्वतःला रिक्‍त केले आणि दासाचे स्वरूप धारण केले.’ (फिलिप्पै. २:७) आपण ख्रिस्ताचे कितीही अनुकरण केले तरीसुद्धा, त्याने या पृथ्वीवर येण्याकरता जे त्याग केले त्यांच्याशी त्याची तुलना करता येणार नाही. तरीपण, आपण धीराने त्याचे अनुकरण करत राहिले पाहिजे. सैतानाच्या जगात आपल्याजवळ ज्या गोष्टी होत्या व ज्यांचा आपण त्याग केला त्यांबद्दल आपण खंत बाळगू नये.—१ योहा. ५:१९.

एके प्रसंगी, प्रेषित पेत्राने येशूला म्हटले: “पाहा! आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो.” (मत्त. १९:२७) पेत्र, आंद्रियास व याकोब यांना येशूचे अनुयायी होण्याकरता बोलावण्यात आले तेव्हा त्यांनी लगेच आपली जाळी टाकून दिली. त्यांनी आपल्या मासेमारीचा व्यवसाय सोडून दिला आणि त्यांनी सुवार्ता प्रचाराचे कार्य हाती घेतले. लूकच्या शुभवर्तमानानुसार पेत्राने म्हटले: “पाहा! आम्ही आपले घरदार सोडून तुम्हाला अनुसरलो आहो.” (लूक १८:२८) आपल्यापैकी बहुतेकजणांना येशूला अनुसकरण्याकरता “घरदार” सोडावे लागलेले नाही. तरीपण, ख्रिस्ताचे अनुयायी होण्याकरता व यहोवाची मनःपूर्वक सेवा करण्याकरता आपल्याला “स्वतःचा त्याग” नक्कीच करावा लागला. (मत्त. १६:२४) असे केल्यामुळे आपल्याला अनेक आशीर्वाद मिळाले आहेत. (मत्तय १९:२९ वाचा.) ख्रिस्ताप्रमाणे सुवार्ता प्रचाराविषयी उत्सुक मनोवृत्ती बाळगल्यामुळे, आणि खासकरून जर आपण एखाद्या व्यक्‍तीला देवाच्या व त्याच्या प्रिय पुत्राच्या जवळ येण्यास मदत करण्यात थोडाच का होईना पण हातभार लावला असेल तर त्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो.

५. परदेशी स्थाईक झालेली व्यक्‍ती बायबलमधील सत्य शिकल्यानंतर काय करू शकते हे दाखवणारा एक अनुभव सांगा.

वाल्मीर नावाचा एक ब्राझीलियन माणूस सुरीनाममध्ये राहायचा आणि सोन्याच्या खाणीत काम करायचा. तो दारुडा होता आणि त्याची जीवनशैली अनैतिक होती. एकदा तो शहरात राहात असताना, यहोवाच्या साक्षीदारांनी त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास सुरू केला. तो रोज अभ्यास करायचा. त्याने आपल्या जीवनात अनेक बदल केले आणि लवकरच त्याचा बाप्तिस्मा झाला. जेव्हा त्याला जाणीव झाली की त्याच्या कामामुळे त्याला नुकत्याच शिकायला मिळालेल्या बायबलच्या शिकवणींनुसार वागता येणार नाही तेव्हा त्याने आपला अतिशय किफायतशीर धंदा सोडला आणि तो आपल्या कुटुंबीयांना आध्यात्मिक धन मिळवण्यास साहाय्य करण्याकरता ब्राझीलला परतला. बायबलमधील सत्य समजल्यावर परदेशी स्थाईक झालेले अनेकजण, आपल्या नातेवाईकांना व इतरांनाही आध्यात्मिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने, श्रीमंत देशांतील नोकऱ्‍या सोडून स्वेच्छेने स्वतःच्या मूळदेशी परततात. हे राज्य प्रचारक खऱ्‍या सुवार्तिकाची उत्सुक मनोवृत्ती प्रदर्शित करतात.

६. आपण जर राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याच्या स्थितीत नसलो तर आपण काय करू शकतो?

बरेच साक्षीदार राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी राहायला गेले आहेत. यांपैकी काही तर दुसऱ्‍या देशात सेवा करत आहेत. आपण स्वतः कदाचित अशाप्रकारचे पाऊल उचलण्याच्या स्थितीत नसू, पण तरीसुद्धा सेवाकार्यात आपल्याने होईल तितके करण्याद्वारे आपण येशूचे अनुकरण करू शकतो.

यहोवा आवश्‍यक प्रशिक्षण पुरवतो

७. राज्याचे उद्‌घोषक या नात्याने प्रगती करू इच्छिणाऱ्‍यांना प्रशिक्षण देण्याकरता कोणकोणत्या प्रशाला उपलब्ध आहेत?

येशूने ज्याप्रकारे त्याच्या पित्याकडून मिळालेले प्रशिक्षण स्वीकारले त्याचप्रमाणे आपणही आजच्या काळात यहोवा पुरवत असलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतो. येशूने स्वतःच म्हटले होते: “संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की ‘ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील.’” (योहा. ६:४५; यश. ५४:१३) आज आपल्याला सुवार्तेचे यशस्वी प्रचारक होण्यास सुसज्ज करण्याकरता काही खास प्रशाला आहेत. आपल्या स्थानिक मंडळीत चालवल्या जाणाऱ्‍या ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतून नक्कीच आपल्या सर्वांना काही न काही लाभ झालाच असेल. पायनियरांना खास त्यांच्याकरता तयार केलेल्या पायनियर सेवा प्रशालेला उपस्थित राहण्याचा बहुमान मिळतो. अनेक अनुभवी पायनियरांना या प्रशालेला दुसऱ्‍यांदा उपस्थित राहण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. वडील व सेवा सेवकांना राज्य सेवा प्रशालेला उपस्थित राहिल्यामुळे आपले शिकवण्याचे कौशल्य विकसित करण्याकरता व बांधवांची अधिक चांगल्याप्रकारे सेवा करण्याकरता साहाय्य मिळाले आहे. कित्येक अविवाहित वडील व सेवा सेवकांना सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहिल्यामुळे इतरांना प्रचार कार्यात मदत करण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे. आणि परदेशी जाऊन मिशनरी सेवा करण्याकरता नियुक्‍त करण्यात आलेल्या बऱ्‍याच बंधूभगिनींना वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेतून प्रशिक्षण मिळाले आहे.

८. यहोवाकडून मिळणाऱ्‍या प्रशिक्षणाला काही बांधव कितपत महत्त्व देतात?

या प्रशालांना उपस्थित राहण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांपैकी अनेकांनी बऱ्‍याच तडजोडी केल्या आहेत. कॅनडामध्ये सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहण्याकरता यूगू याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला कारण त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्‍याने त्याची रजा मंजूर केली नाही. यूगू म्हणतो, “मला मुळीच पस्तावा होत नाही. खरं तर, हे एकादृष्टीनं बरंच झालं कारण जर त्यांनी मला रजा दिली असती तर त्यांनी माझ्यावर उपकार केल्यासारखं झालं असतं. आणि मग कर्तव्याच्या भावनेतून कायम त्यांच्याच कंपनीत राहण्याची त्यांनी माझ्याकडून अपेक्षा केली असती. पण आता मला यहोवाकडून कोणतीही नेमणूक मिळाली तर ती स्वीकारण्यास मी मोकळा आहे.” देवाकडून मिळणाऱ्‍या प्रशिक्षणाचा फायदा घेण्याकरता अनेकांनी एकेकाळी त्यांना अतिशय महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या गोष्टींचा स्वेच्छेने त्याग केला आहे.—लूक ५:२८.

९. बायबल आधारित प्रशिक्षणाला मनःपूर्वक प्रयत्नांची जोड मिळाल्यास उत्तम परिणाम घडून येतात हे सिद्ध करणारे एक उदाहरण सांगा.

बायबल आधारित प्रशिक्षणाला जेव्हा मनःपूर्वक प्रयत्नांची जोड मिळते तेव्हा अतिशय चांगले परिणाम घडून येतात. (२ तीम. ३:१६, १७) ग्वातेमाला येथे राहणाऱ्‍या साऊलो याच्याबाबतीत काय घडले ते पाहा. तो जन्मतःच काहीसा मतिमंद होता आणि त्याच्या एका शिक्षिकेने त्याच्या आईला सांगितले की या मुलाला जबरदस्तीने वाचायला शिकवण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही कारण यामुळे तो निराश होईल. वाचायला न शिकताच साऊलोला शाळा सोडावी लागली. पण एका साक्षीदाराने अप्लाय युवरसेल्फ टू रीडिंग ॲन्ड रायटिंग या माहितीपत्रकाच्या साहाय्याने साऊलोला वाचायला शिकवले. हळूहळू साऊलोने प्रगती केली आणि तो ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत भाषणेही देऊ लागला. काही काळाने, घरोघरच्या प्रचार कार्यादरम्यान साऊलोच्या आईला त्याची शिक्षिका भेटली. साऊलो वाचायला शिकला हे समजल्यावर तिने पुढच्या आठवड्यात त्याला घेऊन येण्यास सांगितले. पुढच्या आठवड्यात, शिक्षिकेने साऊलोला विचारले, “मग, तू मला काय शिकवणार आहेस?” साऊलोने बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातून एक परिच्छेद वाचण्यास सुरुवात केली. शिक्षिका म्हणाली, “आज तू मला शिकवतोयस यावर मला विश्‍वास बसत नाहीए.” तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि तिने साऊलोला आनंदाने मिठी मारली.

अंतःकरणाचा ठाव घेणारे शिक्षण

१०. बायबलमधील सत्य शिकवण्याकरता कोणते उत्कृष्ट साधन आपल्याला उपलब्ध आहे?

१० येशूने यहोवाकडून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आणि देवाच्या लिखित वचनातील मार्गदर्शनाच्या आधारावर लोकांना शिकवले. (लूक ४:१६-२१; योहा. ८:२८) आपणही येशूच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याद्वारे व बायबलमध्ये जे सांगितले आहे त्याला जडून राहण्याद्वारे त्याचे अनुकरण करतो. म्हणूनच आपण सर्वजण जे बोलतो व ज्याप्रकारे विचार करतो त्यात तफावत नसते आणि यामुळे आपल्यातील ऐक्य वाढते. (१ करिंथ. १:१०) बायबलचे शिक्षण देताना व सुवार्तिक या नात्याने कार्य करताना आपल्यातील ऐक्य टिकून राहावे म्हणून ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आपल्याला बायबल आधारित प्रकाशने पुरवतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! (मत्त. २४:४५; २८:१९, २०) यांपैकी एक प्रकाशन म्हणजे बायबल काय शिकवते हे पुस्तक, जे आता १७९ भाषांत उपलब्ध आहे.

११. इथियोपिया येथे एका बहिणीने बायबल काय शिकवते या पुस्तकाच्या साहाय्याने कशाप्रकारे विरोधावर मात केली?

११ बायबल काय शिकवते या पुस्तकाच्या साहाय्याने शास्त्रवचनांचा अभ्यास केल्याने विरोध करणाऱ्‍या व्यक्‍तींचेही हृदयपालट झाल्याची उदाहरणे आहेत. एकदा लूला नावाची इथियोपिया येथे राहणारी एक पायनियर बहीण बायबल अभ्यास घेत होती. अचानक, अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीची एक नातेवाईक तिथे आली आणि बायबलचा अभ्यास करण्याची गरज नाही असे म्हणाली. लूलाने शांतपणे बायबल काय शिकवते पुस्तकातील १५ व्या अध्यायात बनावट नोटांचे जे उदाहरण दिले आहे त्याच्या साहाय्याने तिला समजावून सांगितले. तेव्हा ती स्त्री शांत झाली आणि तिने त्यांना पुढे अभ्यास करू दिला. एवढेच नव्हे तर, पुढच्या अभ्यासाच्या वेळी ती स्वतः आली आणि माझाही अभ्यास घ्या अशी तिने विनंती केली. ती त्यासाठी पैसे द्यायला तयार होती! लवकरच तिचा आठवड्यातून तीन वेळा अभ्यास होऊ लागला आणि तिने उत्तम आध्यात्मिक प्रगती केली.

१२. लहान मुलेही बायबलमधील सत्ये परिणामकारकरित्या शिकवू शकतात हे दाखवणारे एक उदाहरण सांगा.

१२ लहान मुलेसुद्धा बायबल काय शिकवते या पुस्तकाचा उपयोग करून इतरांना मदत करू शकतात. हवाई येथे राहणारा ११ वर्षांचा कीॲनू शाळेत हे पुस्तक वाचत होता तेव्हा त्याच्या एका वर्गसोबत्याने त्याला विचारले, “तुम्ही सण का साजरे करत नाही?” कीॲनूने या प्रश्‍नाचे उत्तर सरळ परिशिष्टातील “आपण सण पाळावेत का?” या भागातून वाचून दाखवले. मग त्याने पुस्तकातील अनुक्रमणिका उघडून मुलाला विचारले की त्याला कोणत्या विषयाबद्दल जाणून घेण्यास आवडेल. अशारितीने एक बायबल अभ्यास सुरू झाला. मागच्या सेवावर्षादरम्यान, यहोवाच्या साक्षीदारांनी ६५,६१,४२६ बायबल अभ्यास घेतले आणि यांपैकी बहुतेकांनी बायबल काय शिकवते या पुस्तकाचा चांगला वापर केला. तुम्ही या पुस्तकाचा बायबल अभ्यास घेण्याकरता उपयोग करत आहात का?

१३. बायबलचा अभ्यास केल्यामुळे लोकांच्या मनावर कशाप्रकारे गहिरा प्रभाव पडतो?

१३ बायबल काय शिकवते या पुस्तकाचा वापर करून बायबलचा अभ्यास केल्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा असणाऱ्‍यांवर गहिरा प्रभाव पडतो. नॉर्वे येथे एका खास पायनियर जोडप्याने झांबियाहून आलेल्या एका कुटुंबासोबत बायबल अभ्यास सुरू केला. झांबियन जोडप्याला तीन मुली होत्या आणि त्यांना आणखी मुले नको होती. त्यामुळे जेव्हा ती स्त्री पुन्हा गरोदर राहिली तेव्हा त्यांनी गर्भपात करवून घ्यायचे ठरवले. डॉक्टरकडे जाऊन याविषयी बोलायच्या काही दिवसांआधी त्यांनी “जीवनाविषयी देवाचा दृष्टिकोन” नावाच्या अध्यायातून अभ्यास केला. त्या अध्यायात, आईच्या पोटातील अर्भकाचे चित्र पाहिल्यावर त्या जोडप्याच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी गर्भपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उत्तम आध्यात्मिक प्रगती केली आणि त्यांच्या मुलाचा जन्म झाल्यावर अभ्यास घेणाऱ्‍या बांधवाच्या नावावरून त्याचे नाव ठेवले.

१४. आपण जे शिकवतो त्यानुसार वागल्यामुळे कशाप्रकारे चांगले परिणाम घडून येतात याचे उदाहरण सांगा.

१४ येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य हे होते की तो लोकांना जे शिकवायचा त्याप्रमाणे स्वतः देखील वागायचा. यहोवाचे साक्षीदार याबाबतीत येशूचे अनुकरण करत असल्यामुळे, बरेच लोक त्यांचे उत्तम वर्तन पाहून प्रभावित होतात. न्यू झीलंड येथे चोरांनी एका उद्योगपतीच्या कारमधून त्याची ब्रीफकेस चोरली. त्याने याविषयी पोलिसांकडे तक्रार नोंदवली तेव्हा, एक पोलीस त्याला म्हणाला: “जर एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराला तुझी ब्रीफकेस सापडली तरच तुला ती परत मिळण्याची शक्यता आहे.” एक साक्षीदार वृत्तपत्रांचा वाटप करत असताना तिला ही ब्रीफकेस सापडली. ब्रीफकेसच्या मालकाला याविषयी सूचना देण्यात आली तेव्हा तो या बहिणीच्या घरी आला. ब्रीफकेसमध्ये ठेवलेला एक अतिशय महत्त्वाचा कागद जागेवर आहे हे पाहून त्याला हायसे झाले. बहिणीने त्याला सांगितले: “मला ही ब्रीफकेस व सामान तुम्हाला परत करणे योग्य वाटले कारण मी एक यहोवाची साक्षीदार आहे.” उद्योगपतीला आश्‍चर्य वाटले आणि त्याच सकाळी पोलीस हवालदाराने जे म्हटले होते ते त्याला आठवले. यावरून स्पष्ट होते की खरे ख्रिस्ती आपल्या जीवनात बायबलमधील शिकवणींचे पालन करतात व येशूचे अनुकरण करतात.—इब्री १३:१८.

लोकांविषयी येशूच्या मनोवृत्तीचे अनुकरण करा

१५, १६. आपण आपल्या संदेशाकडे लोकांना आकर्षित कसे करू शकतो?

१५ लोकांप्रती येशूच्या मनोवृत्तीमुळे अनेकजण त्याच्या संदेशाकडे आकर्षित झाले. उदाहरणार्थ, त्याचे प्रेम व नम्रता पाहून गरीब व लाचार लोक त्याच्याकडे आले. त्याने आपल्याकडे येणाऱ्‍या लोकांबद्दल कणव दाखवून, आपल्या दयाळू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले आणि बऱ्‍याच जणांचे रोग बरे केले. (मार्क २:१-५ वाचा.) आपण चमत्कार करू शकत नाही, पण आपण प्रेम, नम्रता व करुणा नक्कीच दाखवू शकतो. याच गुणांमुळे लोक सत्याकडे आकर्षित होऊ शकतात.

१६ करुणा दाखवणे किती महत्त्वाचे आहे हे तारीयुआ नावाच्या एका खास पायनियरच्या अनुभवावरून दिसून येते. तारीयुआ घरोघरच्या कार्यात बीरी नावाच्या एका वृद्ध मनुष्याच्या घरी गेली. बीरी हे दक्षिण प्रशांत महासागरातील किरीबाती बेटांपैकी अगदी एकांत अशा बेटावर राहतात. आपल्याला संदेश ऐकण्याची इच्छा नाही असे त्या मनुष्याने सुचवले. तारीयुआच्या लक्षात आले की त्यांच्या शरीराची एक बाजू लुळी आहे आणि तिला हे पाहून दया आली. तिने त्यांना विचारले: “आजारी व वृद्ध लोकांकरता देवाने दिलेल्या अभिवचनाबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?” मग तिने यशयाच्या भविष्यवाणीतून काही वचने त्यांना वाचून दाखवली. (यशया ३५:५, ६ वाचा.) हे ऐकल्यावर त्यांना इतके आश्‍चर्य वाटले की ते म्हणाले: “मी कितीतरी वर्षांपासून बायबल वाचत आलो आहे आणि माझ्या धर्माचे मिशनरी कित्येक वर्षांपासून माझ्या घरी येतात पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जे सांगितले ते बायबलमध्ये मी कधीच पाहिले नाही.” बीरी यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला आणि त्यांनी उत्तम आध्यात्मिक प्रगती केली. हो, ते पांगळे होते, पण आज त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे. ते एका एकाकी गटाचे नेतृत्व करतात आणि सबंध बेटावर पायी सुवार्तेचा प्रचार करू शकतात.

ख्रिस्ताचे अनुकरण करत राहा

१७, १८. तुम्ही यशस्वी सुवार्तिक कसे बनू शकता? (ख) जे आपल्या सेवाकार्याकडे गांभीर्याने पाहतात त्यांच्याकरता कोणते आशीर्वाद राखून ठेवण्यात आले आहेत?

१७ सेवाकार्यातील आनंददायक अनुभव वारंवार याची आठवण करून देतात की जर आपण येशूचे गुण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात उत्पन्‍न केले व ते प्रदर्शित केले तर आपण यशस्वी सुवार्तिक बनू शकतो. तर मग आवेशी सुवार्तिक या नात्याने आपण ख्रिस्ताचे अनुकरण करावे हे योग्यच नाही का?

१८ पहिल्या शतकात जेव्हा काहीजण येशूचे शिष्य बनले तेव्हा पेत्राने विचारले: “आम्हाला काय मिळणार?” येशूने उत्तर दिले: “ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडिली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” (मत्त. १९:२७-२९) जर आपण सर्वश्रेष्ठ मिशनरी येशू ख्रिस्त याचे अनुकरण करत राहिलो तर हे शब्द आपल्याबाबतीत अवश्‍य खरे ठरतील.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवा आपल्याला सुवार्तिक होण्याकरता कशाप्रकारे प्रशिक्षण देत आहे?

• बायबल काय शिकवते हे पुस्तक आपल्या सेवाकार्यात परिणामकारक का ठरत आहे?

• आपण लोकांप्रती आपल्या मनोवृत्तीत येशूचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

येशूने पेत्र, आंद्रियास, याकोब व योहान यांना आपल्यामागे येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा त्यांनी लगेच प्रतिसाद दिला

[१९ पानांवरील चित्र]

“बायबल काय शिकवते” या पुस्तकासारखी प्रकाशने आपल्याला बायबलचे शिक्षक या नात्याने आपले ऐक्य टिकवून ठेवण्यास साहाय्य करतात