अँडीजच्या उंच डोंगरांत सुवार्ता पोचवणे
अँडीजच्या उंच डोंगरांत सुवार्ता पोचवणे
आम्ही एकूण १८ जण होतो. बोलिव्हियाच्या हद्दीत येणाऱ्या अँडीज पर्वतांतील दूरस्थ क्षेत्रात आम्ही एक खास सफर आयोजित केली होती. जमिनीवर, आमच्या स्लीपिंग बॅग्समध्ये (झोपण्याची उबदार पिशवी) थंडीने काकडत, आम्ही वरती लोखंडी पत्र्याच्या छपरावर आदळणाऱ्या मुसळधार पावसाचा आवाज ऐकत होतो. त्या लहानशा खोलीची अवस्था पाहून वाटत होते की आमच्याआधी इथे पूर्वी कधीच माणसे राहिली नसतील.
पण आम्ही १८ जण या क्षेत्रात का आलो होतो? “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” सुवार्तेचा प्रचार करण्याच्या येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याची आमची इच्छा होती त्यामुळे आम्ही या क्षेत्रात आलो होतो.—प्रे. कृत्ये १:८; मत्त. २४:१४.
पहिले आव्हान
आमच्यासमोर आलेले सर्वात पहिले आव्हान म्हणजे, तिथे पोचायचे कसे? विचारपूस केली तेव्हा असे कळले की इतक्या दूरच्या क्षेत्रात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय असली तरी, या गाड्यांचे येण्याजाण्याचे काही निश्चित वेळापत्रक नाही. शेवटी एकदाची आमची बस आली. पण आम्हाला ज्या बसविषयी सांगण्यात आले होते ती नव्हे, तर भलतीच बस आली होती. ही बस इतकी लहान होती की आमच्यापैकी काही जणांना उभ्यानेच प्रवास करावा लागला. कसेतरी करत, शेवटी आम्ही आपल्या ठिकाणी पोचलो.
आम्हाला बोलिव्हियन अँडीज पर्वतरांगांमधील दूरदूरच्या खेड्यापाड्यांत जायचे होते. त्यामुळे, बसचा
प्रवास संपल्यानंतर आम्ही १८ जण, आवश्यक सामानाचा भरपूर साठा घेऊन, डोंगराच्या उभ्या चढाच्या चिंचोळ्या वाटेवर एका ओळीने हळूहळू चालू लागलो.डोंगरांतील खेडी लहानखुरी असली तरी घरे खूप दूर दूर होती. त्यामुळे सबंध खेड्याला फेरी मारायला बरेच तास लागायचे. कितीही दूरपर्यंत चालत गेले तरी दूर अंतरावर आणखी एखादे घर दिसायचे. शेतांमधल्या वेड्यावाकड्या पायवाटांवरून चालताना कितीदातरी आम्ही वाट चुकलो.
“तुम्ही याआधी का आला नाहीत?”
आम्ही किती दूर चालत आलो हे पाहून एक स्त्री इतकी प्रभावित झाली की तिने आम्हाला दुपारचे जेवण तयार करण्यासाठी तिचे स्वयंपाकघर आणि जळण वापरण्याची परवानगी दिली. मृतांविषयी बायबल काय शिकवते हे जाणून घेतल्यावर एका मनुष्याने विचारले, “तुम्ही याआधी का आला नाहीत?” आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्याला इतक्या आवडल्या की त्याच्या गावातून जेव्हा आम्ही परत जाण्यासाठी निघालो तेव्हा तोही आमच्यासोबत आला आणि वाटेत त्याने आणखी बरेच प्रश्न विचारले. आणखी एकाने यहोवाच्या साक्षीदारांबद्दल पूर्वी कधीच ऐकले नव्हते. त्याला आपली प्रकाशने खूपच आवडली. आम्ही आल्याबद्दल त्याने पुन्हापुन्हा आमचे आभार मानले आणि जाताना आम्हाला त्या रात्रीपुरते राहण्याकरता एका खोलीची चावी दिली.
एका रात्री इतका गुडूप अंधार होता की आम्ही नकळत, मोठाल्या काळ्या मुंग्यांच्या वसाहतीत आपले तंबू उभे केले. या अनपेक्षित आक्रमणामुळे चिडलेल्या मुंग्या आम्हाला चावू लागल्या. पण आम्ही इतके थकलो होतो की उठून दुसरीकडे तंबू ठोकण्याइतका कोणाच्याच अंगात त्राण नव्हता. त्यामुळे आम्ही तिथेच पडून राहिलो. थोड्यावेळाने मुंग्यांनीही आमच्याकडे दुर्लक्ष केले.
जमिनीवर झोपलो तेव्हा सुरुवातीस आम्हाला त्रास झाला. पाठ आणि अंग दुखू लागले. पण काही वेळाने आमच्या पाठीला सवय झाली. आणि पहाटेचे नयनरम्य दृश्य
पाहिल्यावर तर सगळी दुखणी कुठल्याकुठे पळाली. शहरी वर्दळ आणि प्रदूषणाचा स्पर्शही न झालेल्या त्या हिरव्यागार खोल दऱ्यांमधून हळूच वर येणाऱ्या पांढऱ्याशुभ्र ढगांचे आणि दूरवर दिसणाऱ्या बर्फाच्छादित शिखरांचे दृश्य अवर्णनीय होते. त्या नीरव शांततेत आवाज होता, तो फक्त जवळच्याच एका झऱ्याच्या खळखळाटाचा आणि पक्ष्यांच्या मंजूळ गाण्याचा.झऱ्याच्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून दैनिक वचनाची चर्चा केली. न्याहारी उरकल्यावर आम्ही दूरदूरच्या इतर खेड्यांत जाण्याकरता पुन्हा एकदा डोंगराची वाट चढू लागलो. आमच्या मेहनतीचे चीज झाले. कारण त्यादिवशी आम्हाला एक आजी भेटली, जी यहोवा हे देवाचे नाव बायबलमध्ये आहे हे समजल्यावर अक्षरशः रडू लागली. तिला काय बोलावे हेच कळत नव्हते. आता ती देवाचे नाव घेऊन त्याला प्रार्थना करू शकत होती.
एका वृद्ध गृहस्थांनी तर देवानेच तुम्हाला माझ्याकडे पाठवले असेल असे म्हणून चक्क गायलाच सुरुवात केली. त्या गीताचे बोलही, तुम्हाला देवदूतांनी पाठवले आहे अशाच अर्थाचे होते. आणखी एक मनुष्य, जो आजारी होता आणि अंथरुणाला खिळला होता, त्याने आम्हाला सांगितले की त्याच्या स्वतःच्या गावातल्या लोकांपैकी कोणीही आतापर्यंत त्याला भेटायला आले नव्हते. आम्ही इतक्या दूरून, थेट ला-पाझ वरून त्याला भेटायला आलो याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. दुसरा एक मनुष्य हे पाहून अतिशय प्रभावित झाला की यहोवाचे साक्षीदार इतर धर्मांप्रमाणे चर्चच्या घंटा वाजवून लोकांना आपल्याकडे बोलावत नाहीत, तर लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतात.
या क्षेत्रातल्या घरांमध्ये वीजपुरवठा नसल्यामुळे लोक अंधार पडला की झोपी जातात आणि सूर्योदय झाला की उठतात. लोक घरी भेटावेत म्हणून आम्हाला सकाळी सहा वाजताच प्रचार कार्य सुरू करावे लागायचे. कारण त्यानंतर बहुतेक लोक शेतात काम करायला निघून जायचे. दुपारी कधीकधी शेतात काम करणारे लोक, आम्ही देवाच्या वचनातून संदेश सांगत आहोत हे पाहून आपले काम थांबवून आमचे ऐकून घ्यायचे. नांगर ओढून थकलेल्या बैलालाही त्यानिमित्ताने थोडी विश्रांती मिळायची. घरी भेटणारे लोक आम्हाला बसण्यासाठी जमिनीवर मेंढीचे कातडे अंथरायचे आणि आमचा संदेश ऐकण्यासाठी घरातल्या सर्वांना बोलावून आणायचे. काही शेतकऱ्यांनी आम्ही दिलेली बायबल आधारित पुस्तके व मासिके यांबद्दल आपली कृतज्ञता दर्शवण्यासाठी आम्हाला मोठ्या पिशव्या भरून मका दिला.
“तुम्ही मला विसरला नाहीत”
लोकांनी बायबलच्या ज्ञानात प्रगती करावी यासाठी त्यांना फक्त एकदा भेट देणे पुरेसे नाही. बऱ्याच जणांनी, पुन्हा येऊन आम्हाला आणखी शिकवा अशी अक्षरशः विनवणी केली. यामुळे आम्ही बोलिव्हियाच्या या क्षेत्राला अनेकदा भेटी दिल्या आहेत.
काही काळानंतर आम्ही पुन्हा या क्षेत्रात गेलो, तेव्हा एका वृद्ध स्त्रीने आम्ही पुन्हा आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली: “तुम्ही मला विसरला नाहीत. तुम्ही मला अगदी स्वतःच्या मुलांसारखे वाटता.” एका मनुष्याने आमच्या कार्याबद्दल आभार मानले आणि पुढच्या खेपेला माझ्याच घरी मुक्काम करा असे आमंत्रणही दिले. पण आमच्या सगळ्या परीश्रमाचे सर्वात मोठे फळ आम्हाला तेव्हा मिळाले, जेव्हा आम्हाला हे ऐकायला मिळाले की आधीच्या एका भेटीत जिच्याशी आम्ही संपर्क साधला होता, ती स्त्री शहरात राहायला गेली आहे आणि आता तीही सुवार्तेचा प्रचार करत आहे.
आमच्या पहिल्या सफरीच्या शेवटल्या दिवशी आमच्या लहानशा स्टोव्हमधले केरोसिन संपले. खाण्याच्या वस्तूही जवळजवळ संपल्याच होत्या. आम्ही चूल पेटवण्याइतके जळण गोळा केले, उरलेल्या सामानातून शेवटचा स्वयंपाक करून जेवलो, आणि मग परत जायला निघालो. ज्या गावात परतीच्या प्रवासाची बस मिळणार होती, तिथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला अजून बरेच मैल पायी चालायचे होते. शेवटी आम्ही गावात पोचलो तोपर्यंत अंधार पडला होता.
परतीचा प्रवास
परतीच्या प्रवासातही अडचणी आल्या कारण आमची बस बिघडली. पण काही वेळानंतर एक ट्रकवाला आम्हाला आपल्या गाडीत घ्यायला तयार झाला. ट्रकच्या मागच्या बाजूला आधीच लोक खचाखच भरलेले होते त्यात आम्हीही जाऊन बसलो. प्रवासात आम्हाला इतर प्रवाशांना प्रचार करण्याची संधी मिळाली. आम्ही लोक शहरातून या भागात कशासाठी आलो होतो, याबद्दल त्यांना कुतूहल वाटत होते. या भागातले लोक स्वभावाने लाजाळू असले तरी ते प्रेमळ व मनमिळाऊ आहेत.
त्या ट्रकच्या मागे बसून नऊ तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही शेवटी घरी पोचलो. आम्ही ओलेचिंब झालो होतो आणि थंडीने गारठून गेलो होतो. पण तरीसुद्धा, आमचा हा प्रवास व्यर्थ ठरला नव्हता कारण वाटेत, आम्ही शहरात राहणाऱ्या एका स्त्रीसोबत बायबल अभ्यासाची व्यवस्था करू शकलो.
इतक्या दूरदूरच्या क्षेत्रांत राहणाऱ्या लोकांना सुवार्ता सांगण्याची आम्हाला संधी मिळाली, हा आम्ही एक बहुमानच समजतो. चार खेड्यांत आणि वाटेत जिथे कुठे घरे दिसली तिथे आम्ही सुवार्ता सांगितली होती. या सफरीचा विचार करताना आम्हाला हे शब्द आठवले: ‘जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.’—यश. ५२:७; रोम. १०:१५.
[१७ पानांवरील चित्र]
सुवार्ता सांगण्याकरता सुसज्ज