व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक अतिशय महत्त्वाची अपॉईंटमेंट

एक अतिशय महत्त्वाची अपॉईंटमेंट

एक अतिशय महत्त्वाची अपॉईंटमेंट

माझी एक अत्यंत महत्त्वाची अपॉईंटमेंट आहे. माझ्यासारख्या एका तरुण स्पॅनिश आईला ही अपॉईंटमेंट का घ्यावी लागली, ते आधी मी तुम्हाला समजावून सांगते.

माझ्या आईवडिलांच्या घरात शांती आणि ऐक्य नावालासुद्धा नव्हते. माझा धाकटा भाऊ वयाच्या चौथ्या वर्षी एका अपघातात मरण पावला तेव्हा तर आमचं कुटुंब दुःखात पार बुडून गेलं. शिवाय, माझ्या वडिलांच्या वाईट सवयींमुळे माझी आई तिच्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हती. एवढं असूनही तिनं माझ्या थोरल्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये नैतिक मूल्ये बिंबवण्याचं सोडलं नाही.

पुढे माझ्या भावाचं आणि माझंही लग्न झालं. त्यानंतर काही दिवसांनी, आईला कॅन्सर असल्याचं कळलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पण मरण्याआधी तिनं आम्हाला एक अमूल्य ठेवा दिला.

आईच्या ओळखीच्या एका स्त्रीनं तिला बायबलमधील पुनरुत्थानाच्या आशेविषयी सांगितलं तेव्हा आईनं लगेच बायबल अभ्यास स्वीकारला होता. आईच्या जीवनाच्या शेवटल्या दिवसांत बायबलमधील या आशेमुळे तिला जगण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी कारण मिळालं होतं.

बायबलच्या संदेशाचा आईच्या मनावर किती चांगला प्रभाव पडत आहे हे पाहून माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघांनीही बायबलचा अभ्यास सुरू केला. माझ्या दुसऱ्‍या मुलीचा जन्म व्हायच्या एक महिना आधी मी यहोवाची साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. ही माझी दुसरी मुलगी देखणी होती. तिचं नाव आम्ही लुसिया ठेवलं होतं.

माझ्या बाप्तिस्म्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता. कारण, मी त्या दिवसापासून यहोवाची झाले होते आणि चिरकालासाठी त्याची सेवा करण्यासाठी मी त्याला माझं जीवन समर्पित केलं होतं. आणि दुसरं कारण, मी माझ्या लाडक्या मुलाला व मुलीला माझ्या विश्‍वासाविषयी सांगू शकत होते.

पण माझा आनंद जास्त दिवस टिकला नाही. लुसिया चार वर्षांची होती तेव्हा तिच्या पोटात खूप दुखू लागलं. पुष्कळ चाचण्यांनंतर रेडिओलॉजिस्टनं सांगितलं, की संत्र्याच्या आकाराचा एक गोळा तिच्या यकृताला लागून वाढत होता. डॉक्टरांनी सांगितलं, की लुसियाला न्यूरोब्लास्टोमा हा झपाट्यानं वाढणारा कर्करोग होता. तेव्हापासून लुसियाची सात वर्षांची कर्करोगाशी झुंज सुरू झाली. यादरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये खूप दिवस राहावं लागत असे.

निःस्वार्थ मनोवृत्ती

या यातनादायक काळात लुसियानं नेहमी मला, प्रेमानं मिठ्या मारून व चुंबन देऊन प्रोत्साहन दिलं. ती ज्या धैर्याने या आजाराला तोंड देत होती ते पाहून हॉस्पिटलमधले कर्मचारी देखील थक्क होत असत. ती नर्सेस्‌ना नेहमी सहकार्य द्यायची. आजूबाजूच्या वॉर्डांत दाखल केलेल्या मुलांना, दही, फळांचा रस आणि इतर गोष्टींचा वाटप करण्यास नर्सेस्‌ना मदत करायची. नर्सेस्‌नी तर लुसियाला एक पांढरा कोट आणि कोटवर लावण्यासाठी “नर्सची साहाय्यक” असे शब्द लिहिलेलं एक बॅजकार्डही दिलं होतं.

एक कर्मचारी आठवून सांगते: “लुसियानं माझ्या काळजाला हात लावला. ती उत्साही मुलगी होती. तिला नवनवीन गोष्टी करायला आणि चित्रं काढायला आवडायचं. ती बोलकी होती आणि तिच्या वयाच्या मानानं खूप प्रौढ होती.”

लुसिया देवाच्या वचनाचा अभ्यास करायची ज्यातून तिला बळ मिळालं होतं, मानसिक संतुलन प्राप्त झालं होतं. (इब्री ४:१२) नव्या जगात ‘मरण, शोक, रडणे व कष्ट नसतील,’ असे जे वचन देवानं आपल्या वचनात दिलं आहे त्याची तिला खात्री होती. (प्रकटी. २१:४) दुसऱ्‍यांमध्ये ती आवड घ्यायची आणि संधी मिळेल तेव्हा त्यांना बायबलमधील संदेश सांगायची. पुनरुत्थानावर तिचा भक्कम विश्‍वास असल्यामुळेच ती, आजारातून बरं होण्याची जराही आशा नसतानाही आनंदी असायची. (यश. २५:८) कॅन्सरनं तिचा बळी घेईपर्यंत तिची अशीच मनोवृत्ती होती.

अगदी त्याच दिवशी मी ही महत्त्वाची अपॉईंटमेंट घेतली. लुसियाला तिचे डोळे उघडता येत नव्हतेत. तिच्या पप्पांनी तिचा एक हात हातात घेतला होता आणि मी दुसरा. मी तिच्या कानात हळूच म्हणाले: “काळजी करू नकोस, मी तुला सोडून जाणार नाही. हळूहळू श्‍वास घे. तू उठशील तेव्हा तुला बरं वाटेल. तुला दुखणार नाही. मी तुझ्याबरोबरच आहे, रजू.”

पुनरुत्थानाच्या वेळी तिला भेटण्याची मी जी अपॉईंटमेंट घेतली ती मला पूर्ण करायची आहे. हा मधला काळ सोपा नाही, हे मला माहीत आहे. पण मला हेही माहीत आहे, की मी जर धीरानं यहोवावर भरवसा ठेवला आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहिले तर लुसिया पुनरुत्थानात पुन्हा उठेल तेव्हा मी तिला भेटायला तिथं असेन.

लुसियानं मांडलेलं उदाहरण

लुसियाचं धैर्य पाहून व मंडळीतल्या बंधूभगिनींनी आम्हाला दिलेलं सुरेख सहकार्य पाहून लुसियाच्या वडिलांवर जबरदस्त छाप पडली. ते साक्षीदार नव्हते. ज्या दिवशी लुसिया गेली त्याच दिवशी ते मला म्हणाले, की त्यांना काही गोष्टींचा गंभीरपणे पुनर्विचार करावा लागेल. त्यानंतर काही आठवड्यांनी त्यांनी मंडळीतल्या एका वडिलांना त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास करण्याची विनंती केली. आणि काही दिवसांतच ते माझ्याबरोबर सर्व सभांना येऊ लागले. त्यांना धुम्रपान करण्याची सवय होती. पूर्वी त्यांनी खूपदा ही सवय तोडायचा प्रयत्न केला होता. पण यहोवाच्या मदतीनं त्यांना ही सवय तोडता आली.

लुसिया गेल्याच्या दुःखातून मी अजून तरी पूर्णपणे सावरलेले नाही. पण लुसियानं आमच्यासाठी जे उदाहरण मांडलं त्याबद्दल मी यहोवाचे आभार मानते. लुसियाचे वडील आणि मी, आम्ही दोघंही एकमेकांना पुनरुत्थानाच्या अद्‌भुत आशेची आठवण करून देतो. आपण लुसियाला पुन्हा कसं भेटू त्याची कल्पना करत असतो. लुसियाचे बोलके गोल डोळे, हसताना तिच्या गालांवर पडणारी खळी—अशी आम्ही कल्पना करत असतो.

माझ्या मुलीवर जे संकट कोसळलं त्याचा आमच्या शेजारी राहणाऱ्‍या एका स्त्रीवर विशेष परिणाम झाला. एका शनिवारी, खूप पाऊस पडत होता तेव्हा ही स्त्री आमच्या घरी आली. तिचा एक मुलगा लुसियाच्याच शाळेत शिकत होता आणि तिचा दुसरा एक मुलगा जो ११ वर्षांचा होता तो लुसियाला जो आजार झाला होता त्याच आजारामुळे मरण पावला होता. लुसियाला काय झालं होतं, हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिनं आमच्या घराचा पत्ता शोधून काढला आणि ती आम्हाला भेटायला आली. मी दुःखातून सावरले आहे किंवा नाही हे ती पाहायला आली होती. आणि तिनं मला सुचवलं, की आपण अशाच परिस्थितीत असलेल्या इतर मातांना सांत्वन देण्याकरता एक सेल्फ-हेल्प ग्रूप बनवू या.

मी तिला सांगितलं, की मला स्वतःला बायबलमधील अभिवचनांतून खरं सांत्वन मिळालं होतं. कोणताही मानव देऊ शकत असलेल्या सांत्वनापेक्षा बायबलमधलं सांत्वन श्रेष्ठ होतं. मी तिला योहान ५:२८, २९ वचनांतील येशूचे शब्द वाचून दाखवले तेव्हा तिचा चेहरा आनंदानं खुलला. ती बायबलचा अभ्यास करायला तयार झाली आणि “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” अनुभवू लागली. (फिलिप्पै. ४:७) आम्ही जेव्हा बायबलचा अभ्यास करत असतो तेव्हा कित्येकदा थांबून नवीन जगाची, पुनरुत्थानाच्या वेळी आपल्या प्रिय जनांना आपण कसं भेटू त्याची कल्पना करत असतो.

होय, लुसिया काही वर्षांची पाहुणी होती, पण तिनं आमच्या मनावर कायमची छाप पाडली. तिच्या विश्‍वासामुळे आम्ही कुटुंब मिळून ऐक्याने देवाची सेवा करू लागलो आणि विश्‍वासात मजबूत टिकून राहण्याचा माझा निश्‍चय आणखी पक्का झाला आहे. ज्यांच्या ज्यांच्या प्रिय जनांचा मृत्यू झाला आहे त्या सर्वांचीच माझ्यासारखी एक महत्त्वपूर्ण अपॉईंटमेंट आहे. त्या सर्वांना आपल्या प्रिय जनांना भेटायचं आहे!

[२० पानांवरील चित्र]

लुसियानं काढलेलं नंदनवनाचं चित्र