व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे?”

“तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे?”

“तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे?”

“तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी.”—याको. ३:१३.

१, २. ज्यांना ज्ञानी समजले जाते त्यांपैकी बऱ्‍याच जणांविषयी काय म्हणता येते?

 तुम्ही कोणाला खरोखर ज्ञानी म्हणाल? कदाचित तुमचे आईवडील, एखादा वयस्क माणूस किंवा महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक हे तुमच्या मते ज्ञानी असतील. तुम्ही कोणाला ज्ञानी समजता यावर बऱ्‍याच अंशी तुमच्या जीवनातील अनुभवांचा व परिस्थितीचा प्रभाव असतो. पण देवाचे सेवक या नात्याने आपल्याला, या बाबतीत त्याचा काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे वाटते.

जगात ज्यांना ज्ञानी समजले जाते ते सर्वच जण देवाच्या नजरेत ज्ञानी किंवा सुज्ञ नसतात. उदाहरणार्थ, आपण फारच बुद्धिमत्तेच्या गोष्टी बोललो असे समजणाऱ्‍या काही माणसांना ईयोबाने असे म्हटले: “तुमच्यामध्ये मला एकहि सूज्ञ आढळावयाचा नाही.” (ईयो. १७:१०) देवाच्या ज्ञानाचा अव्हेर करणाऱ्‍या काहींना प्रेषित पौलाने असे लिहिले: “स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.” (रोम. १:२२) तसेच यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने स्वतः अगदी स्पष्टपणे असे म्हटले: ‘जे आपल्या दृष्टीने ज्ञानी त्यांस धिक्कार असो.’—यश. ५:२१.

३, ४. खऱ्‍या अर्थाने ज्ञानी कशा प्रकारच्या व्यक्‍तीला म्हणता येईल?

तर यावरून हे स्पष्ट झाले आहे की एखादी व्यक्‍ती खऱ्‍या अर्थाने ज्ञानी कशी बनू शकते हे जाणून घेणे आवश्‍यक आहे; कारण अशाच व्यक्‍तीला देवाची संमती मिळू शकते. नीतिसूत्रे ९:१० यासंदर्भात आपल्याला एक सुगावा देते: “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.” ज्ञानी किंवा सुज्ञ व्यक्‍तीने देवाचे भय मानले पाहिजे आणि त्याला देवाच्या नीतीनियमांबद्दल आदर असला पाहिजे. पण फक्‍त, ‘देव आहे आणि तो आपल्याला चांगले व वाईट काय हे सांगतो’ हे माहीत असणे किंवा मान्य करणे पुरेसे नाही. शिष्य याकोब आपल्याला या विषयावर आणखी खोलवर जाऊन विचार करण्याचे प्रोत्साहन देतो. (याकोब ३:१३ वाचा.) “सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी,” या वाक्यांशाकडे लक्ष द्या. जो खरोखरच ज्ञानी असतो त्याच्या दररोजच्या वागण्याबोलण्यातून त्याची सुज्ञता दिसून आली पाहिजे.

खरी सुज्ञता म्हणजे उत्तम निर्णयशक्‍ती असणे, तसेच आपल्याजवळ असलेली माहिती व समज यांचा रोजच्या व्यवहारात चांगल्या रीतीने उपयोग करणे. तर आपण खरोखरच ज्ञानी किंवा सुज्ञ आहोत हे कोणत्या कृत्यांवरून दिसून येईल? याकोब अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करतो की ज्या खऱ्‍या अर्थाने ज्ञानी असणाऱ्‍यांच्या वागणुकीतून दिसून आल्या पाहिजेत. * त्याने जे सांगितले, त्यापैकी कोणत्या गोष्टी आपल्याला मंडळीतील बांधवांशी तसेच बाहेरच्या लोकांशी चांगले संबंध राखण्यासाठी उपयोगी पडू शकतील?

खऱ्‍या अर्थाने ज्ञानी असणाऱ्‍यांना त्यांच्या कृत्यांवरून ओळखता येते

५. खऱ्‍या अर्थाने ज्ञानी व्यक्‍ती कशा प्रकारे वागेल?

येथे पुन्हा एकदा आठवण करून द्यावीशी वाटते, की याकोबाने ज्ञानाचा संबंध उत्तम आचरणाशी जोडला. यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ असल्यामुळे, ज्ञानी व्यक्‍ती देवाच्या मार्गांनुसार व नीतिनियमांनुसार वागण्याचा सदोदित प्रयत्न करते. देवाकडील ज्ञान अथवा सुज्ञता ही आपल्याजवळ जन्मतःच नसते. पण, नियमित बायबलचा अभ्यास व मनन केल्याने आपण हे ज्ञान मिळवू शकतो. अभ्यास व मनन केल्याने इफिसकर ५:१ यात प्रोत्साहन दिल्याप्रमाणे, आपल्याला ‘देवाचे अनुकरण’ करण्यास साहाय्य मिळते. आपण आपल्या वागणुकीत यहोवाच्या गुणांचे जितके जास्त अनुकरण करू तितकेच आपल्या कृतींवरून आपण खरोखर ज्ञानी असल्याचे दिसून येईल. यहोवाचे मार्ग मनुष्याच्या मार्गांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. (यश. ५५:८, ९) त्यामुळे, जेव्हा आपण यहोवाच्या मार्गांचा आपल्या जीवनात अवलंब करू तेव्हा बाहेरच्या लोकांच्या लक्षात येईल की आपली वागणूक व व्यवहार इतरांपेक्षा वेगळे आहेत.

६. लीनतेने वागल्यास आपण देवाचे अनुकरण करत असतो असे का म्हणता येते आणि लीनतेने वागण्याचा काय अर्थ होतो?

याकोबाने सांगितले की यहोवाचे अनुकरण करण्याचा एक मार्ग म्हणजे, “ज्ञानजन्य लीनतेने” वागणे. लीनतेचा अर्थ सौम्य व शांत असणे असा असला तरी, एक ख्रिस्ती व्यक्‍ती लीन असण्यासोबतच नैतिकदृष्ट्या खंबीर व दृढनिश्‍चयी असू शकते. लीनता आपल्याला संतुलित रितीने वागण्यास मदत करते. यहोवाकडे अमर्याद शक्‍ती असली तरी तो स्वतः लीन व नम्र आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या जवळ येण्यास भीती वाटत नाही. देवाच्या पुत्रानेही याबाबतीत आपल्या पित्याचे अनुकरण केले. त्यामुळेच तो असे म्हणू शकला: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.”—मत्त. ११:२८, २९; फिलिप्पै. २:५-८.

७. नम्रतेने वागण्याच्या बाबतीत मोशे एक उत्तम उदाहरण आहे असे आपण का म्हणू शकतो?

बायबल आपल्याला आणखी काही जणांची उदाहरणे देते, जे अतिशय लीनतेने किंवा नम्रतेने वागले. मोशे हा त्यांपैकी एक. त्याच्यावर फार महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तरीसुद्धा त्याच्याविषयी असे वर्णन केले आहे की तो “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गण. ११:२९; १२:३) यहोवाने आपली इच्छा पूर्ण करण्याकरता मोशेला किती सामर्थ्यशाली बनवले हे तुम्हाला आठवत असेल. आपला उद्देश पूर्णत्वास नेण्याकरता यहोवाने नम्र व्यक्‍तींना निवडले.

८. अपरिपूर्ण मानव देखील “ज्ञानजन्य लीनतेने” कशा प्रकारे वागू शकतात?

मोशेच्या उदाहरणावरून, अपरिपूर्ण मानव देखील “ज्ञानजन्य लीनतेने” वागू शकतात हे स्पष्ट झाले आहे. मग, आपल्याविषयी काय? आपण लीनतेने वागण्याच्या बाबतीत सुधारणा कशी करू शकतो? लीनता म्हणजेच सौम्यता, ही यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या फळात समाविष्ट आहे. (गलती. ५:२२, २३) त्याअर्थी, आपण यहोवाला प्रार्थना करून त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देण्याची विनंती करू शकतो. पण, त्यासोबतच या पवित्र आत्म्याच्या फळात समाविष्ट असलेले गुण प्रदर्शित करण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यास आपण हा भरवसा बाळगू शकतो की देव आपल्याला निश्‍चितच लीनतेने वागण्यास मदत करेल. स्तोत्रकर्ता आपल्याला असे करण्याची जोरदार प्रेरणा देतो. तो म्हणतो: “[देव] दीनांस आपला मार्ग शिकवितो.”—स्तो. २५:९.

९, १०. देवाच्या दृष्टिकोनाने लीन होण्याकरता कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि का?

तरीसुद्धा, या बाबतीत सुधारणा करणे सोपे नाही. त्याकरता आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागतील. आपण ज्या वातावरणात वाढलो त्यामुळे लीनतेने वागणे हे कदाचित आपल्या स्वभावात नसेल. शिवाय, आपण ज्या लोकांमध्ये वावरतो ते देखील कदाचित आपल्याला अगदी उलट दृष्टिकोन बाळगण्याचे प्रोत्साहन देत असतील. ते असे म्हणत असतील की लोकांना जशास तसे वागणूक दिली पाहिजे. पण असा दृष्टिकोन खरोखर सुज्ञतेचा आहे का? नाही. उलट, जशास तसे वागणूक देणे हे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. तुमच्या घरात जर लहानशी आग लागली, तर तुम्ही ती आग विझवण्यासाठी त्यावर तेल ओताल की थंड पाणी? आगीत तेल ओतल्याने साहजिकच ती आणखी भडकेल, पण थंड पाण्याने ती विझण्याची जास्त शक्यता आहे. त्याचप्रमाणे, बायबल आपल्याला असा सल्ला देते: “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीति. १५:१, १८) भविष्यात कधी मंडळीच्या बांधवांशी किंवा बाहेरच्या लोकांशी व्यवहार करताना मतभेद निर्माण झालेच, तर लीनतेने प्रतिक्रिया दाखवण्याद्वारे आपण हे दाखवू शकतो की आपण खऱ्‍या अर्थाने ज्ञानी आहोत.—२ तीम. २:२४.

१० वरती सांगितल्याप्रमाणे, ज्यांच्यावर या जगाच्या आत्म्याचा प्रभाव पडला आहे अशा बऱ्‍याच जणांना नम्र, सौम्य, व शांत वृत्तीने वागताच येत नाही. उलट, कठोर व उद्धट लोकच आपल्याला जास्त आढळतात. याकोबालाही याची जाणीव होती. म्हणूनच त्याने या गोष्टींविषयी ताकीद दिली जेणेकरून मंडळीतील बांधव अशा जगिक आत्म्याच्या प्रभावाखाली येण्याचे टाळू शकतील. त्याने दिलेल्या मार्गदर्शनातून आपण आणखी काय शिकू शकतो?

अज्ञानी व्यक्‍तीची गुणलक्षणे

११. कोणते गुण देवाकडील ज्ञानाच्या अगदी विरोधात आहेत?

११ देवाकडील ज्ञानाच्या अगदी विरोधात असलेल्या गुणांविषयी याकोबाने अगदी सडेतोड शब्दांत लिहिले. (याकोब ३:१४ वाचा.) हेवा व भांडखोरपणा ही आध्यात्मिक वृत्तीची नव्हे तर दैहिक वृत्तीची गुणलक्षणे आहेत. दैहिक वृत्तीमुळे कशा प्रकारचे परिणाम होतात, याचे एक उदाहरण पाहा. जेरूसलेम शहरात, लोकांच्या धारणेप्रमाणे जेथे येशूला ठार मारून पुरण्यात आले होते त्या ठिकाणी चर्च ऑफ द होली सेपल्कर नावाची वास्तू उभारण्यात आली आहे. या वास्तूच्या काही भागांवर सहा “ख्रिस्ती” गटांची मालकी आहे. या सहा गटांमध्ये चर्चच्या मालकी हक्कावरून बऱ्‍याच वेळा भांडणतंटे होतात. २००६ साली टाईम नियतकालिकात आधीच्या एका भांडणाविषयी लिहिले होते, ज्यात तेथील मठवाशांनी “कित्येक तासांपर्यंत बाचाबाची केली, . . . आणि मेणबत्त्या लावण्यासाठी असलेल्या मोठाल्या समयांनी एकमेकांना मारले.” या गटांना एकमेकांवर जराही भरवसा नसल्यामुळे त्यांनी चर्चची चावी एका मुस्लिम माणसाच्या सुपूर्त केली आहे.

१२. देवाकडील ज्ञानाच्या अभावामुळे काय घडू शकते?

१२ अशा प्रकारची भांडणे व मारामारीचे प्रकार खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीत कधीच व्हायला नको, हे तर कबूल आहे. पण, अपरिपूर्ण मानवी स्वभावामुळे कधीकधी काही जण आपल्या वैयक्‍तिक मतांवर अडून राहतात असे दिसून येते. यामुळे थोड्या प्रमाणात का होईना, पण वादावादी व कलह होऊ शकतात. प्रेषित पौलाने करिंथ येथील मंडळीत असे घडताना पाहिले, त्यामुळे त्याने त्यांना असे लिहिले: “ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहा की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही?” (१ करिंथ. ३:३) ही खेदजनक परिस्थिती पहिल्या शतकातील त्या मंडळीत काही काळ अस्तित्वात होती. पण आज आपल्या मंडळीत अशा प्रकारची वृत्ती येणार नाही याची आपण सतत खबरदारी बाळगली पाहिजे.

१३, १४. दैहिक प्रवृत्ती कशा प्रकारे दाखवली जाऊ शकते याची उदाहरणे सांगा.

१३ अशा प्रकारच्या वृत्तीचा शिरकाव मंडळीत कशा प्रकारे होऊ शकतो? अगदी लहानसहान गोष्टींवरून असे घडू शकते. उदाहरणार्थ, राज्य सभागृहाचे बांधकाम हाती घेतले जाते, तेव्हा निरनिराळ्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या जाव्यात यावरून मतभेद निर्माण होऊ शकतात. एखाद्या बांधवाने सुचवलेली एखादी गोष्ट मान्य करण्यात आली नाही, तर त्याला राग येऊ शकतो आणि कदाचित तो आपल्या म्हणण्याविरुद्ध घेतलेल्या निर्णयाची उघडपणे टीका करू शकतो. आणि कदाचित, या प्रकल्पात आता आपण कोणताच सहभाग घेऊ इच्छित नाही असेही तो सांगू शकतो! अशा प्रकारे वागणारी व्यक्‍ती हे विसरत असते की मंडळीशी संबंधित असणाऱ्‍या कोणत्याही कार्याची सफलता ही एखाद्या विशिष्ट पद्धतीने कार्य करण्यावर नव्हे तर सहसा मंडळीतील शांतीपूर्ण वातावरणावर अवलंबून असते. यहोवा लीन व नम्र वागणुकीवर आशीर्वाद देतो, भांडखोर प्रवृत्तीवर नव्हे.—१ तीम. ६:४, ५.

१४ दुसरे एक उदाहरण पाहा. कधीकधी मंडळीतील वडिलांना हे लक्षात येते की एक विशिष्ट वडील बऱ्‍याच वर्षांपासून वडील म्हणून सेवा करत असला तरीसुद्धा, आता तो शास्त्रवचनांतील योग्यतांनुसार वडील म्हणून सेवा करण्यास पात्र नाही. या वडिलाला पूर्वी बऱ्‍याच वेळा स्पष्टपणे सल्ला देण्यात आला असूनही त्याने सुधारणा केलेली नाही हे पाहून, मंडळीतील इतर वडील या वडिलाला त्याच्या पदावरून कमी करण्याची शिफारस करतात. वरील गोष्टी लक्षात घेऊन, विभागीय पर्यवेक्षकही या निर्णयाशी सहमत होतो. आता तो विशिष्ट वडील या निर्णयाकडे कशा दृष्टीने पाहील? सर्व वडिलांनी मिळून घेतलेला निर्णय आणि त्याला दिलेला बायबलवर आधारित सल्ला नम्रपणे व लीनतेने तो मान्य करेल का? आणि पुन्हा एकदा वडील या नात्याने सेवा करता यावी, म्हणून बायबलमधील अटी पूर्ण करण्याचा तो निर्धार करेल का? की आपल्याकडून इतक्या वर्षांचा हा विशेषाधिकार काढून घेतल्याबद्दल तो इतर वडिलांविरुद्ध मनात राग व मत्सराच्या भावना येऊ देईल? जर वास्तवात एखादा बांधव वडील म्हणून सेवा करण्यास पात्र नसेल तर त्याने पात्र असण्याचा आव का म्हणून आणावा? त्यापेक्षा नम्रता दाखवून वडिलांचा निर्णय स्वीकारणे व त्यांच्या सल्ल्याचे पालन करणे हेच सुज्ञतेचे लक्षण नाही का?

१५. याकोब ३:१५, १६ मधील ईश्‍वरप्रेरित सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे असे तुम्हाला का वाटते?

१५ इतरही मार्गांनी अशा प्रकारची वृत्ती दिसून येऊ शकते. पण परिस्थिती कोणतीही असो, आपण अशा प्रकारचे गुण टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. (याकोब ३:१५, १६ वाचा.) शिष्य याकोबाने अशा गोष्टींना ‘ऐहिक व इंद्रियजन्य’ म्हटले कारण त्या गोष्टी देवाच्या ज्ञानाशी नव्हे तर शारीरिक प्रवृत्तींशी व पशुतुल्य गुणांशी संबंधित आहेत. अशा प्रकारच्या प्रवृत्ती ‘सैतानाकडील’ आहेत कारण त्यांत सैतानाची व त्याच्या दुरात्म्यांची लक्षणे दिसून येतात. कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीने अशी गुणलक्षणे दाखवणे किती अयोग्य ठरेल!

१६. आपल्याला कोणते फेरबदल करावे लागू शकतात आणि आपण हे यशस्वीरित्या कसे करू शकतो?

१६ मंडळीतील प्रत्येक व्यक्‍तीने आत्मपरीक्षण करून अशा प्रकारचे गुण आपल्या स्वभावातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंडळीत उपदेश करणारे या नात्याने, वडिलांनीही नकारात्मक प्रवृत्ती झुगारून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे करणे सोपे नाही कारण आपण स्वभावतःच अपरिपूर्ण आहोत. शिवाय, या जगाचाही आपल्यावर प्रभाव पडतोच. त्यामुळे या प्रवृत्तींवर मात करण्याचा प्रयत्न करणे एखाद्या चिखलाच्या निसरड्या उतारावरून कुठल्याही आधाराविना वर चढण्याचा प्रयत्न करण्यासारखे वाटू शकते. पण, जर आपण बायबलमध्ये सापडणाऱ्‍या मार्गदर्शनाला घट्ट धरून ठेवले व देवाच्या पृथ्वीवरील मंडळीकडून मिळणारी मदत स्वीकारली तर आपण पुढे वाटचाल करू शकतो.—स्तो. ७३:२३, २४.

ज्ञानी व्यक्‍तींची ओळख करून देणारे गुण

१७. ज्ञानी व्यक्‍ती वाईट गोष्टींप्रती सहसा कशी प्रतिक्रिया दाखवतात?

१७ याकोब ३:१७ वाचा. ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानामुळे’ निष्पन्‍न होणाऱ्‍या काही गुणांचा विचार केल्याने आपल्याला लाभ होऊ शकतो. शुद्ध असण्याचा असा अर्थ होतो की आपल्या कृती व आपल्या मनातील हेतू निर्मळ व निष्कपट असले पाहिजेत. वाईट गोष्टींना आपण लगेच झिडकारले पाहिजे. ही प्रतिक्रिया स्वाभाविक असली पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या डोळ्यात कोणी बोट घालायचा प्रयत्न केल्यास तुम्ही काय करता? तुम्ही लगेच डोळे बंद करता आणि त्या व्यक्‍तीपासून दूर जाता, नाही का? ही प्रतिक्रिया आपोआप घडते, त्यासाठी तुम्हाला विचार करावा लागत नाही. वाईट गोष्टी करण्याचा मोह होतो तेव्हा आपली प्रतिक्रिया देखील अशीच असली पाहिजे. शुद्धता व बायबलनुसार प्रशिक्षित केलेल्या विवेकाने आपल्याला वाईट गोष्टींना लगेच, कसलाही विचार न करता झिडकारून टाकण्यास प्रवृत्त केले पाहिजे. (रोम. १२:९) अगदी अशाच प्रकारे वागलेल्या व्यक्‍तींची उदाहरणे आपल्याला बायबलमध्ये सापडतात, जसे की योसेफ व येशू.—उत्प. ३९:७-९; मत्त. ४:८-१०.

१८. (क) शांतिप्रिय असणे म्हणजे काय? (ख) आणि शांती करणारे असण्याचा काय अर्थ होतो?

१८ देवाकडील ज्ञान असलेली व्यक्‍ती शांतीप्रिय देखील असली पाहिजे. याचा अर्थ आपण हेकेखोरपणा, भांडखोरपणा किंवा शांतीचा भंग करणारी कृत्ये टाळली पाहिजेत. याकोबाने याच मुद्द्‌याचा खुलासा करून म्हटले: “शांति करणाऱ्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.” (याको. ३:१८) यात “शांति करणाऱ्‍यांसाठी” या संज्ञेकडे लक्ष द्या. मंडळीत आपल्याला शांती करणारे म्हणून ओळखले जाते की शांती भंग करणारे म्हणून ओळखले जाते? आपले वारंवार इतरांशी खटके उडतात का किंवा मतभेद होतात का? कोणी काही बोलल्यास आपल्याला लगेच वाईट वाटते का, किंवा आपण इतरांच्या भावना दुखावतो का? इतरांनी आपण जसे आहोत तसेच आपल्याला स्वीकारले पाहिजे असा आपण अट्टहास करतो का, की आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील इतरांना दुखावणारे गुण व सवयी सोडून देण्याचा आपण नम्रतेने प्रयत्न करतो? आपण सहसा शांतीसंबंध कायम राखण्यास उत्सुक व प्रयत्नशील असतो, तसेच इतरांना क्षमा करण्यास व त्यांच्या चुका विसरून जाण्यास तयार असतो असे लोक आपल्याविषयी म्हणतील का? प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केल्यास, आपल्याला दिसून येईल की या बाबतीत देवाकडील ज्ञानानुसार वागण्यात सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे किंवा नाही.

१९. लोक आपल्याला एक सौम्य व समजूतदार व्यक्‍ती म्हणून केव्हा ओळखतील?

१९ वरून येणारे ज्ञान ज्या गुणांवरून दिसून येते, त्यांत याकोबाने सौम्य अर्थात समजूतदार असण्याचाही समावेश केला. एखाद्या बाबतीत जर बायबलमधील कोणत्याही तत्त्वाचे उल्लंघन होत नसेल तर त्या बाबतीत इतरांचे आपल्यापेक्षा वेगळे मत स्वीकारण्यास आपण सहज तयार होतो का? की स्वतःच्याच मतांवर अडून राहणारी आणि आपल्या पसंतीनुसार सर्वांनी वागावे अशी अपेक्षा करणारी व्यक्‍ती म्हणून लोक आपल्याला ओळखतात? आपण सुस्वभावी आणि मनमिळाऊ आहोत असे लोक आपल्याविषयी म्हणतील का? या काही गोष्टी आहेत ज्यांवरून दिसून येते की आपण सौम्य व समजूतदार असण्यास शिकलो आहोत किंवा नाही.

२०. आपण आतापर्यंत चर्चा केलेले ईश्‍वरी गुण आत्मसात केल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येतील?

२० मंडळीतील बंधूभगिनींनी जर याकोबाने सांगितलेले हे सर्व ईश्‍वरी गुण दिवसेंदिवस आपल्या व्यक्‍तिमत्त्वात व व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला तर मंडळीत किती आनंददायक वातावरण टिकून राहील! (स्तो. १३३:१-३) एकमेकांसोबत वागताना, लीन, शांतिप्रिय व सौम्य असल्यामुळे आपले इतरांशी असलेले संबंध नक्कीच सुधारतील आणि यावरून सर्वांना हे दिसून येईल की आपल्याजवळ “वरून येणारे ज्ञान” आहे. पण असे करण्यासाठी आपण इतरांकडे यहोवाच्या दृष्टिकोनाने पाहायला शिकले पाहिजे. हे आपल्याला कसे करता येईल याविषयी पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत.

[तळटीप]

^ संदर्भावरून दिसते की याकोबाने मुळात मंडळीतील वडीलजनांना किंवा ‘शिक्षकांना’ ध्यानात ठेवून ही माहिती लिहिली होती. (याको. ३:१) या शिक्षकांनी देवाच्या दृष्टिकोनातून सुज्ञ असण्याच्या बाबतीत मंडळीतील इतरांकरता उत्तम आदर्श असले पाहिजे, हे तर निश्‍चित. पण आपण सर्वच जण याकोबाने दिलेल्या सल्ल्याचा उपयोग करू शकतो.

तुम्ही स्पष्ट करू शकाल का?

• ख्रिस्ती व्यक्‍ती खऱ्‍या अर्थाने ज्ञानी किंवा सुज्ञ कशी बनू शकते?

• देवाकडील ज्ञानानुसार वागण्यात आपण सुधारणा कशी करू शकतो?

• ज्यांच्याजवळ “वरून येणारे ज्ञान” नाही त्यांच्यात कशा प्रकारची गुणलक्षणे दिसून येतात?

• तुम्हाला कोणते गुण पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात प्रदर्शित करण्याची प्रेरणा मिळाली आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

कलहाचा शिरकाव कशा प्रकारे होऊ शकतो?

[२४ पानांवरील चित्र]

वाईट गोष्टी झिडकारणे ही तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे का?