व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही यहोवाच्या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहता का?

तुम्ही यहोवाच्या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहता का?

तुम्ही यहोवाच्या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहता का?

“शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.”—१ करिंथ. १२:२५.

१. तुम्ही पहिल्यांदा आध्यात्मिक नंदनवनात प्रवेश केला तेव्हा तुम्हाला कसे वाटले?

 आपण जेव्हा पहिल्यांदा या दुष्ट जगापासून स्वतःला वेगळे करून, यहोवाच्या लोकांसोबत संगती करू लागलो तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल किती प्रेम व काळजी आहे हे आपल्याला पाहायला मिळाले. हे प्रेम व काळजी अनुभवताना आपल्याला किती आनंद झाला! सैतानाच्या ताब्यात असणाऱ्‍या जगातील उद्धट, द्वेषबुद्धीने वागणाऱ्‍या व भांडखोर लोकांपेक्षा हे लोक अगदीच वेगळे होते! या लोकांशी संगती केल्यामुळे आपण शांती व सलोख्याचे वातावरण असलेल्या एका आध्यात्मिक नंदनवनात प्रवेश केला.—यश. ४८:१७, १८; ६०:१८; ६५:२५.

२. (क) इतरांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कशामुळे कालांतराने बदलू शकतो? (ख) आपल्याला काय करावे लागेल?

पण कालांतराने कदाचित आपल्या बांधवांविषयीचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. हळूहळू, आपण त्यांच्याकडे अपरिपूर्णतेच्या चश्म्यातून पाहायला सुरुवात करतो. अपरिपूर्ण स्वभावामुळे, आपल्याला आपल्या बांधवांचे एकंदर आध्यात्मिक गुण दिसण्याऐवजी, त्यांचे दोष जास्त मोठे दिसू लागतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, आपण त्यांच्याकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे हे आपण विसरून जातो. जर आपल्या बाबतीत असे घडत असेल तर आपण लवकरात लवकर आपल्या दृष्टिकोनाचे परीक्षण करून, तो बदलला पाहिजे आणि यहोवाच्या नजरेतून पाहायला व विचार करायला शिकले पाहिजे.—निर्ग. ३३:१३.

यहोवा बांधवांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो?

३. बायबल ख्रिस्ती मंडळीची तुलना कशाशी करते?

पहिले करिंथकर १२:२-२६ यात सांगितल्याप्रमाणे, प्रेषित पौलाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीची तुलना ‘पुष्कळ अवयव’ असलेल्या शरीराशी केली. ज्याप्रकारे शरीरातील अवयव एकमेकांपेक्षा वेगळे असतात त्याचप्रकारे मंडळीतील सदस्य, त्यांचे गुण व त्यांच्या क्षमता इतरांपेक्षा अतिशय वेगळ्या असू शकतात. तरीसुद्धा यहोवा या सर्व सदस्यांना स्वीकारतो. तो प्रत्येक सदस्यावर प्रेम करतो आणि प्रत्येकाची कदर करतो. त्याचप्रकारे, पौल आपल्याला असा सल्ला देतो की मंडळीच्या सदस्यांनीही “एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.” पण हे नेहमीच सोपे नसते, कारण इतरांचे व्यक्‍तिमत्त्व आपल्यापेक्षा वेगळे असू शकते.

४. आपल्याला आपल्या बांधवांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल का करावा लागेल?

कधीकधी, आपल्या बांधवांच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करण्याचा आपला कल असू शकतो. जणू आपण अगदी लहानशाच क्षेत्राचे चित्र टिपू शकणाऱ्‍या कॅमेऱ्‍याच्या लेन्समधून त्यांच्याकडे पाहात असतो. पण यहोवाचा दृष्टिकोन मात्र अगदी वेगळा आहे. तो जणू एखाद्या विशिष्ट वस्तूचेच नव्हे तर आजूबाजूच्या सबंध दृश्‍याचे चित्र टिपू शकणाऱ्‍या मोठ्या लेन्सच्या कॅमेऱ्‍यामधून पाहत असतो. आपण कदाचित आपल्या बांधवांकडे पाहताना त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वातील जो गुण आपल्याला आवडत नाही तो आणखीनच मोठा करून, फक्‍त त्याच्याकडेच पाहात असू. पण यहोवा मात्र त्या पूर्ण व्यक्‍तीकडे व त्या व्यक्‍तीच्या सर्व चांगल्या गुणांकडे पाहतो. आपण यहोवाच्या दृष्टिकोनाने पाहण्याचा जितका जास्त प्रयत्न करू, तितकाच आपल्याला मंडळीतील प्रेम व एकता टिकवून ठेवण्यास हातभार लावता येईल.—इफिस. ४:१-३; ५:१, २.

५. इतरांचे दोष काढणे का अयोग्य आहे?

अपरिपूर्ण व्यक्‍तींची सहसा इतरांवर दोष लावण्याची प्रवृत्ती असते याची येशूला चांगलीच कल्पना होती. म्हणूनच त्याने असा सल्ला दिला: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका.” (मत्त. ७:१) मूळ भाषेत, याठिकाणी येशूने फक्‍त “दोष काढू नका” असे म्हटले नाही. तर तो म्हणाला: “दोष काढायचे थांबवा.” त्याला माहीत होते, की त्याच्या श्रोत्यांपैकी बऱ्‍याच जणांना इतरांची टीका करण्याची आधीपासूनच सवय होती. आपल्यालाही अशी सवय आहे का? जर आपली अशी वृत्ती असेल तर आपण स्वतःला बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर, आपलाही न्याय देव त्याचप्रकारे करेल. वास्तविक पाहता, एका जबाबदारीच्या पदावर सेवा करण्याकरता यहोवा ज्या व्यक्‍तीचा उपयोग करत आहे त्याचे दोष काढण्याचा किंवा तो मंडळीचा सदस्य असू शकत नाही असे म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? एखाद्या बांधवामध्ये काही दोष असतीलही, पण जर यहोवा त्याला मंडळीचा सदस्य म्हणून अजूनही स्वीकारत असेल तर आपण त्याला झिडकारणे योग्य ठरेल का? (योहा. ६:४४) यहोवा स्वतः त्याच्या संघटनेचे नेतृत्त्व करत आहे आणि जर काही पावले उचलण्याची गरज असेलच तर तो आपल्या नियुक्‍त वेळी कार्य करेल याची आपल्याला खरोखरच खात्री आहे का?—रोमकर १४:१-४ वाचा.

६. यहोवा आपल्या सेवकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

यहोवाचा एक अतिशय विस्मयकारक गुण हा आहे की तो आपल्या प्रत्येक सेवकाकडे पाहताना, ही व्यक्‍ती नव्या जगात परिपूर्ण अवस्थेत पोचल्यानंतर कशा प्रकारची व्यक्‍ती बनू शकेल, हे तो पाहू शकतो. तसेच त्या व्यक्‍तीने आतापर्यंत कितपत आध्यात्मिक प्रगती केली आहे हे देखील त्याला माहीत आहे. त्यामुळे, त्या व्यक्‍तीच्या स्वाभाविक अपरिपूर्णतेमुळे आलेल्या प्रत्येक दोषाकडे पाहण्याची त्याला गरज नाही. स्तोत्र १०३:१२ यात आपण असे वाचतो: “पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.” आपल्यापैकी प्रत्येकाने याकरता यहोवाचे किती आभार मानले पाहिजे!—स्तो. १३०:३.

७. यहोवाने दाविदाकडे ज्या दृष्टिकोनाने पाहिले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

एखाद्या व्यक्‍तीच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याच्या यहोवाच्या या अद्‌भुत क्षमतेविषयी बायबलमधील अनेक अहवालांतून आपल्याला पाहायला मिळते. देवाने दाविदाचे वर्णन करताना असे म्हटले, ‘माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा पाळीत असे; तो मला जिवे भावे धरून राहिला व माझ्या दृष्टीने जे योग्य तेच तो करीत असे.’ (१ राजे १४:८) अर्थात, आपल्याला हे माहीत आहे की दाविदाने त्याच्या जीवनात काही चुका केल्या होत्या. तरीसुद्धा, यहोवाने दाविदाच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्यायचे निवडले कारण त्याला माहीत होते की दाविदाचे हृदय हे मुळात चांगले आहे.—१ इति. २९:१७.

तुमच्या बांधवांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा

८, ९. (क) आपण कशा प्रकारे यहोवासारखे होऊ शकतो? (ख) असे केल्याने कोणता चांगला परिणाम घडून येईल हे उदाहरण देऊन सांगा आणि यातून आपण कोणता धडा शिकू शकतो?.

यहोवा हृदयांची पारख करू शकतो, आपण करू शकत नाही. खरे तर याच कारणामुळे आपण इतरांचे दोष काढायचे टाळले पाहिजे. आपल्याला दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या मनात काय आहे, त्याचे हेतू काय आहेत हे माहीत नसते. म्हणूनच, आपण दुसऱ्‍यांच्या स्वाभाविक अपरिपूर्णतेकडे लक्ष केंद्रित न करण्याद्वारे यहोवाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अपरिपूर्णतेमुळे आलेले हे दोष कालांतराने नाहीसे होतील. याबाबतीत यहोवासारखे होण्याचा प्रयत्न करणे हे एक उत्तम ध्येय ठरेल असे तुम्हाला वाटत नाही का? असे केल्यामुळे आपल्याला आपल्या बंधूभगिनींसोबत शांतीपूर्ण संबंध टिकवण्यास साहाय्य होईल.—इफिस. ४:२३, २४.

उदाहरणार्थ, एका जुन्या पडक्या घराची कल्पना करा. घराचा रंग विटला आहे, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत, आणि पाणी झिरपून छतालाही नुकसान झाले आहे. बहुतेक लोक कदाचित या घराकडे पाहून म्हणतील की हे घर किती भकास दिसते! हे पाडून टाकले पाहिजे. पण तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि तो या घराकडे अगदी वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतो. तो वरवर दिसणाऱ्‍या या समस्यांच्या पलीकडे जाऊन पाहतो. त्याच्या लक्षात येते की घराचा पाया अजून मजबूत आहे. त्यामुळे या घराची दुरुस्ती करणे शक्य आहे असे ठरवून तो हे घर विकत घेतो. त्यावर थोडेबहुत दुरुस्तीचे काम केल्यावर, ते लहानमोठे दोष नाहीसे होतात आणि घराचा जणू कायापालट होतो. आता मात्र लोक येताजाता थांबून या घराची प्रशंसा करतात. आपणही घराची दुरुस्ती करून त्याचा कायापालट करणाऱ्‍या या व्यक्‍तीसारखे होऊ शकतो का? आपल्या बांधवांच्या वरवर दिसणाऱ्‍या लहानमोठ्या दोषांवर लक्ष क्रेंद्रित करण्याऐवजी आपण त्यांचे चांगले गुण ओळखून, भविष्यात ते आणखी आध्यात्मिक प्रगती करू शकतील हे आठवणीत ठेवून त्यांच्याशी वागू शकतो का? जर आपण असे केले तर यहोवाप्रमाणेच आपल्यालाही आपले हे बांधव त्यांच्या आध्यात्मिक गुणांमुळे प्रिय वाटू लागतील.—इब्री लोकांस ६:१० वाचा.

१०. फिलिप्पैकर २:३, ४ यातील सल्ला आपल्याला कशा प्रकारे साहाय्यक ठरू शकतो?

१० मंडळीतील सर्वांसोबत चांगले संबंध ठेवण्याकरता प्रेषित पौलाने काही सल्ला दिला होता. त्याने ख्रिश्‍चनांना असा आग्रह केला: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना; तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा.” (फिलिप्पै. २:३, ४) नम्रता आपल्याला इतरांविषयी योग्य दृष्टिकोन बाळगण्यास साहाय्य करते. तसेच इतरांबद्दल वैयक्‍तिक आस्था बाळगल्याने आणि त्यांचे चांगले गुण ओळखण्याचा प्रयत्न केल्यानेही आपल्याला त्यांच्याकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहणे शक्य होईल.

११. कोणत्या बदलांमुळे काही मंडळ्यांवर परिणाम झाला आहे?

११ अलीकडच्या काळात झालेल्या जागतिक घडामोडींमुळे बऱ्‍याच लोकांनी स्थलांतर केले आहे. काही शहरांत आता निरनिराळ्या देशांचे नागरिक स्थायिक झालेले दिसतात. आपल्या परिसरात येऊन राहू लागलेल्या काही लोकांनी बायबलमधील सत्याबद्दल आस्था दाखवल्यामुळे आता तेही आपल्यासोबत यहोवाची उपासना करू लागले आहेत. यांत “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे” समाविष्ट आहेत. (प्रकटी. ७:९) परिणामस्वरूप, आपल्या बऱ्‍याच मंडळ्यांना जणू आंतरराष्ट्रीय स्वरूप आले आहे.

१२. आपण एकमेकांबद्दल कशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि हे कधीकधी आपल्याला जड का जाऊ शकते?

१२ आपल्या मंडळीत, इतरांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्याकडे कदाचित आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज असेल. याकरता आपण ‘निर्दंभ बंधुप्रेम’ दाखवण्याविषयी व “एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति” करण्याविषयी प्रेषित पेत्राने दिलेला सल्ला आठवणीत ठेवण्याची गरज आहे. (१ पेत्र १:२२) निरनिराळ्या देशांचे लोक मंडळीत असतात तेव्हा सर्वांबद्दल मनस्वी प्रेम व मैत्रीभाव उत्पन्‍न करणे आपल्याला कदाचित जड जाऊ शकते. आपले बांधव आपल्यापेक्षा अगदी वेगळ्या संस्कृतीचे असतील, तसेच त्यांची शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक पार्श्‍वभूमीही आपल्यापेक्षा अगदी वेगळी असेल. तुम्हाला कधीकधी त्यांची विचारसरणी व वागण्याची पद्धत समजून घ्यायला कठीण वाटते का? त्यांनाही कदाचित तुमच्याविषयी असेच वाटत असेल. तरीसुद्धा, आपल्या सर्वांनाच हा सल्ला देण्यात आला आहे की आपण “बंधुवर्गावर” म्हणजेच आपल्या सर्व बांधवांवर प्रीती केली पाहिजे.—१ पेत्र २:१७.

१३. आपल्याला आपल्या विचारसरणीत कोणता बदल करावा लागेल?

१३ सर्व बांधवांवर प्रेम करण्याकरता आपली अंतःकरणे विशाल करण्यासाठी कदाचित आपल्याला आपली विचारसरणी काही प्रमाणात बदलावी लागू शकते. (२ करिंथकर ६:१२, १३ वाचा.) “माझं तसं कोणाविषयी वाईट मत नाही, पण . . . ” असे म्हणून आपण एखाद्या विशिष्ट समाजाच्या लोकांमध्ये सहसा आढळणाऱ्‍या नकारात्मक गुणांचा उल्लेख करतो का? जर आपण कधीकधी नकळत असे बोलून जात असू, तर याचा असा अर्थ होतो की आपल्या मनात अजूनही कुठेतरी त्यांच्याविषयी कलुषित भावना आहेत. या भावना आपण मनातून उपटून टाकल्या पाहिजेत. आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘मी माझ्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीच्या बांधवांना आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे का?’ अशा प्रकारे आत्मपरीक्षण केल्यास आपल्याला आपल्या आंतरराष्ट्रीय बंधुवर्गातील सर्व सदस्यांना आपलेसे करण्याच्या व त्यांच्यावर प्रेम करण्याच्या बाबतीत सुधारणा करता येईल.

१४, १५. (क) इतर लोकांविषयी आपल्या दृष्टिकोनात बदल केलेल्या व्यक्‍तींची उदाहरणे सांगा. (ख) आपण त्यांचे अनुकरण कसे करू शकतो?

१४ ज्यांनी प्रत्यक्षात अशा प्रकारे आपल्या विचारसरणीत बदल केले, अशा काही व्यक्‍तींची बायबलमध्ये उदाहरणे सापडतात. त्यांपैकी एक प्रेषित पेत्राचे उदाहरण आहे. पेत्र यहुदी असल्यामुळे त्याने स्वतःहून कधीच एखाद्या विदेश्‍याच्या घरात पाऊल ठेवले नसते. पण त्याला कर्नेल्य या बेसुंती विदेश्‍याच्या घरी जाऊन त्याची भेट घेण्यास सांगण्यात आले तेव्हा त्याला कसे वाटले असेल याची कल्पना करा! ख्रिस्ती मंडळीत सर्व राष्ट्रांतील लोक असावेत अशी देवाची इच्छा असल्याचे पेत्राने ओळखले व आपल्या मनोवृत्तीत बदल केले. (प्रे. कृत्ये १०:९-३५) शौल जो नंतर प्रेषित पौल बनला, त्यालाही आपल्या विचारसरणीत बदल करून मनातील कलुषित भावना काढून टाकाव्या लागल्या. त्याने स्वतः कबूल केले की एके काळी त्याला ख्रिश्‍चनांचा इतका द्वेष होता की, तो “देवाच्या मंडळीचा पराकाष्टेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे.” तरीपण, प्रभू येशूने जेव्हा पौलाला त्याची चूक दाखवली तेव्हा त्याने आपली विचारसरणी पूर्णपणे बदलली. इतकेच काय, तर ज्यांचा तो आधी छळ करत होता त्यांच्या आज्ञांचे आता तो पालन करू लागला.—गलती. १:१३-२०.

१५ यहोवाच्या आत्म्याच्या मदतीने निश्‍चितच आपणही आपल्या मनोवृत्तीत बदल करू शकतो. आपल्या मनातही अशा कलुषित भावना दडलेल्या आहेत, असे लक्षात आल्यास आपण त्या आपल्या मनातून मुळासकट काढून टाकण्याचा प्रयत्न करू या. आणि “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास” आपण नेहमी झटू या. (इफिस. ४:३-६) बायबल आपल्याला प्रोत्साहन देते की “पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”—कलस्सै. ३:१४.

आपल्या सेवाकार्यात यहोवाचे अनुकरण करणे

१६. लोकांकरता देवाची काय इच्छा आहे?

१६ प्रेषित पौलाने लिहिले, “देवाजवळ पक्षपात नाही.” (रोम. २:११) आपल्या उपासनेकरता सर्व राष्ट्रांच्या लोकांना एकत्रित करण्याचा यहोवाचा उद्देश आहे. (१ तीमथ्य २:३, ४ वाचा.) म्हणूनच त्याने “प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक” यांना “सार्वकालिक सुवार्ता” घोषित करण्याची व्यवस्था केली आहे. (प्रकटी. १४:६) येशूने म्हटले: “शेत हे जग आहे.” (मत्त. १३:३८) तुमच्याकरता व तुमच्या कुटंबाकरता या वचनाचा काय अर्थ असू शकतो?

१७. आपण सर्व प्रकारच्या लोकांना मदत कशी करू शकतो?

१७ राज्याचा संदेश इतरांपर्यंत पोचवण्याकरता जगाच्या दूरदूरच्या भागात जाणे सर्वांनाच शक्य नाही. तरीसुद्धा, आपल्याच क्षेत्रात जे जगाच्या निरनिराळ्या भागातील लोक राहतात त्यांच्यापर्यंत हा संदेश पोचवणे नक्कीच आपल्या आवाक्यात आहे. आपण वर्षानुवर्षे ज्या लोकांना सुवार्ता सांगितली आहे, फक्‍त त्यांनाच नव्हे तर सर्व प्रकारच्या लोकांना साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेतो का? ज्यांना आजपर्यंत सुवार्ता ऐकण्याची संधी मिळालेली नाही अशा इतर लोकांनाही साक्ष देण्याचा मी प्रयत्न करेन, असा आपल्या मनाशी निर्धार करा.—रोम. १५:२०, २१.

१८. येशूला लोकांबद्दल काळजी होती हे कशावरून दिसून येते?

१८ येशूला सर्व लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा होती. म्हणूनच त्याने केवळ एकाच क्षेत्रात प्रचार केला नाही. बायबलमधील एका अहवालात असे म्हटले आहे की तो “सर्व नगरांतून आणि खेड्यांतून हिंडत गेला.” आणि “त्याने जेव्हा लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला,” व त्यांना मदत करण्याची किती गरज आहे हे त्याने व्यक्‍त केले.—मत्त. ९:३५-३७.

१९, २०. यहोवा व येशूप्रमाणेच आपल्यालाही सर्व प्रकारच्या लोकांविषयी कळकळ वाटते हे आपण कसे दाखवू शकतो?

१९ येशूसारखीच मनोवृत्ती दाखवण्याचे तुमच्यासमोर कोणते मार्ग आहेत? काही जणांनी आपल्याच क्षेत्रातील ज्या भागांत सहसा कार्य केले जात नाही तेथे जाऊन साक्षकार्य करण्याकरता विशेष प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ बाजारपेठा, सार्वजनिक उद्याने, बस किंवा रेल्वे स्थानके, किंवा आत जाण्याची परवानगी नसलेल्या इमारतींसमोर. इतर जणांनी त्यांच्या क्षेत्रात राहायला आलेल्या विशिष्ट समाजाच्या लोकांना किंवा गतकाळात ज्यांना सहसा सुवार्ता सांगण्यात आली नाही अशा लोकांना आपला संदेश सांगण्याच्या उद्देशाने नवीन भाषा शिकून घेतली आहे. त्यांच्या भाषेत त्यांना नमस्कार कसा करायचा हे जरी तुम्ही शिकून घेतले तरी तुम्हाला त्यांच्याविषयी किती आपुलकी व काळजी आहे, हे त्यांना दिसून येईल. आपण स्वतः नवीन भाषा शिकू शकत नसलो तरी जे शिकत आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो का? हे लोक परदेशातून आलेल्या लोकांना प्रचार करण्यासाठी एवढा खटाटोप का म्हणून करत आहेत अशा प्रकारचे नकारात्मक प्रश्‍न विचारून आपण नक्कीच त्यांचा उत्साह भंग करू इच्छित नाही. देवाच्या नजरेत सर्वांचे जीवन मौल्यवान आहे आणि आपण देखील हाच दृष्टिकोन बाळगू इच्छितो.—कलस्सै. ३:१०, ११.

२० देवाचा दृष्टिकोन बाळगण्यात हेही समाविष्ट आहे की आपण सर्वांना सुवार्ता सांगितली पाहिजे, मग त्यांची परिस्थिती कशीही असो. काही जण बेघर असतील, त्यांचे कपडे कदाचित गलिच्छ असतील किंवा त्यांची अनैतिक जीवनशैली असेल. प्रचार करताना काही जण आपल्याशी कठोरतेने वागले तर यावरून आपण त्यांच्या देशाच्या किंवा समाजाच्या सगळ्याच लोकांबद्दल वाईट मत बनवायला नको. पौलाशी काही जण निर्दयतेने वागले पण त्याने त्या विशिष्ट पार्श्‍वभूमीच्या लोकांना प्रचार करायचे बंद केले नाही. (प्रे. कृत्ये १४:५-७, १९-२२) त्यांच्यामधूनही काही व्यक्‍ती सुवार्तेला जरूर प्रतिसाद देतील असा भरवसा बाळगून त्याने आपले कार्य चालू ठेवले.

२१. यहोवाचा दृष्टिकोन बाळगल्यास तुम्हाला कशा प्रकारे मदत होईल?

२१ या चर्चेवरून अगदी स्पष्ट झाले आहे की आपल्या मंडळीतील बांधवांशी, आपल्या आंतरराष्ट्रीय बंधुवर्गाशी तसेच आपल्या प्रचारक्षेत्रातील लोकांशी व्यवहार करताना आपण योग्य दृष्टिकोन, म्हणजेच यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. यहोवाच्या दृष्टिकोनाचे आपण जितके जवळून अनुकरण करू तितकेच आपण शांती व एकता टिकवून ठेवण्यास हातभार लावू. आणि लोकांनी यहोवावर प्रेम करावे म्हणून त्यांना साहाय्य करण्यास आपण तितकेच समर्थ बनू. आपला देव, यहोवा “पक्षपात करीत नाही” तर सर्वांबद्दल प्रेम व आस्था व्यक्‍त करतो “कारण ते सर्व त्याच्या हातांचे काम आहेत.”—ईयो. ३४:१९, पं.र.भा.

तुम्ही सांगू शकता का?

• आपल्या बांधवांविषयी आपण कशा प्रकारचा दृष्टिकोन टाळला पाहिजे?

• आपल्या बांधवांकडे आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे पाहू शकतो?

• आपल्या आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाविषयी आपला कसा दृष्टिकोन असावा यासंबंधी तुम्हाला काय काय शिकायला मिळाले?

• सेवाकार्यात आपण लोकांविषयी यहोवाच्या दृष्टिकोनाचे अनुकरण कसे करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

इतर संस्कृतींच्या लोकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

[२८ पानांवरील चित्र]

तुम्हाला कोणत्या मार्गांनी अधिकाधिक लोकांपर्यंत सुवार्ता पोचवता येईल?