व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मदतीसाठी आपण यहोवाला मारत असलेली हाक तो ऐकतो

मदतीसाठी आपण यहोवाला मारत असलेली हाक तो ऐकतो

मदतीसाठी आपण यहोवाला मारत असलेली हाक तो ऐकतो

“परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.” —स्तो. ३४:१५.

१, २. (क) आज पुष्कळ लोकांना कसे वाटत आहे? (ख) हे पाहून आपल्याला आश्‍चर्य का वाटत नाही?

 तुम्ही दुःखी आहात का? या प्रश्‍नाचे होय असे तुमचे उत्तर असेल तर तुम्ही एकटेच नाही. या दुष्ट व्यवस्थीकरणात कोट्यवधी लोक, दैनंदिन जीवनाच्या दबावांचा मोठ्या मुश्‍किलीने सामना करत आहेत. काहींना या समस्या आपल्या सहनशक्‍ती पलीकडच्या आहेत असे वाटते. त्यांनाही स्तोत्रकर्त्या दाविदासारखे वाटते, ज्याने असे लिहिले: “माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे. माझे काळीज धडधडत आहे; माझी शक्‍ति मला सोडून गेली आहे; माझ्या डोळ्यात तेजही राहिले नाही.”—स्तो. ३८:८, १०.

आपण ख्रिस्ती असल्यामुळे, जीवनातील या दुःखद गोष्टी पाहून आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. या ‘वेदना’ येशूच्या उपस्थितीच्या भाकीत केलेल्या चिन्हाचा भाग आहेत, हे आपल्याला माहीत आहे. (मार्क १३:८; मत्त. २४:३) ‘वेदना’ असे भाषांतरीत केलेला मूळ भाषेतला शब्द, मूल प्रसवताना स्त्रीला होणाऱ्‍या अतोनात वेदनांना सूचित करतो. या ‘कठीण दिवसांत’ लोकांना तोंड द्याव्या लागत असलेल्या दुःखद गोष्टींच्या तीव्रतेचे किती अचूक वर्णन या शब्दांतून मिळते!—२ तीम. ३:१.

यहोवाला आपले दुःख कळते

३. देवाच्या लोकांना कोणत्या गोष्टीची चांगल्या प्रकारे जाणीव आहे?

यहोवाच्या लोकांनाही चांगल्या प्रकारे जाणीव आहे, की ते दुःखद अनुभवांतून सुटलेले नाहीत आणि भविष्यात कदाचित वाईट परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. मानवजातीला आज सर्वसामान्यपणे ज्या दुःखांचा सामना करावा लागतो त्या दुःखांव्यतिरिक्‍त देवाचे सेवक यानात्याने आपला विश्‍वास कमकुवत करण्यास टपून बसलेला ‘आपला शत्रू सैतान’ याला देखील आपल्याला तोंड द्यावे लागते. (१ पेत्र ५:८) अशा वेळी दाविदाला जसे वाटले तसे आपल्यालाही वाटणे साहजिक आहे. दाविदाने असे म्हटले: “निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.”—स्तो. ६९:२०.

४. आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा कोणत्या गोष्टीतून आपल्याला सांत्वन मिळते?

पण आपण आशाहीन आहोत, असा दाविदाच्या म्हणण्याचा अर्थ होता का? नाही. त्याच स्तोत्रात पुढे दावीद काय म्हणतो ते पाहा: “परमेश्‍वर दरिद्र्‌यांचे ऐकतो; बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानीत नाही.” (स्तो. ६९:३३) कधीकधी आपल्याला असे वाटेल, की आपण आपल्या दुःखांचे किंवा पीडांचे जणू काय बंदी बनलो आहोत. आपली परिस्थिती कोणालाही समजत नाही, असे आपल्याला वाटेल—आणि कदाचित त्यांना खरोखरच समजत नसेल. पण दाविदाप्रमाणे आपण या गोष्टीतून सांत्वन मिळवू शकतो, की यहोवाला आपले दुःख कळते.—स्तो. ३४:१५.

५. राजा शलमोनाला कोणता भरवसा होता?

दाविदाचा पुत्र शलमोन याने जेरूसलेममधील मंदिराच्या समर्पणप्रसंगी या वस्तुस्थितीवर अधिक जोर दिला. (२ इतिहास ६:२९-३१ वाचा.) “आपणास होणारे क्लेश किंवा दु:ख” यांविषयी यहोवाला प्रार्थना करणाऱ्‍या प्रत्येक प्रामाणिक व्यक्‍तीची विनंती ऐक, अशी शलमोनाने यहोवाला भीक मागितली. क्लेश सहन करणाऱ्‍या या लोकांच्या प्रार्थना देव ऐकेल का? देव केवळ त्यांच्या प्रार्थनाच ऐकणार नाही तर त्यांच्या वतीने कार्यही करेल, असा भरवसा शलमोनाने व्यक्‍त केला. देव लोकांना मदत का करतो? कारण यहोवा “मानवजातीची मने ओळखणारा” देव आहे.

६. आपण चिंतेचा सामना कसा करू शकतो, व का?

आपणही, “आपणास [व्यक्‍तिगतरीत्या] होणारे क्लेश किंवा दु:ख” यांविषयी यहोवाला प्रार्थना करू शकतो. यहोवाला आपले दुःख समजते आणि त्याला आपली काळजी आहे, या गोष्टीतून आपण सांत्वन मिळवले पाहिजे. प्रेषित पेत्राने असे म्हणून या गोष्टीची पुष्टी दिली, की “तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७, पं.र.भा.) आपल्या बाबतीत जे काही होते त्याची यहोवाला काळजी वाटते. यहोवाला आपल्याबद्दल असलेल्या प्रेमळ काळजीवर जोर देताना येशूने असे म्हटले: “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकहि भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.”—मत्त. १०:२९-३१.

यहोवा देत असलेल्या मदतीवर विसंबून राहा

७. कोणत्या साहाय्याची आपण खात्री बाळगू शकतो?

आपण दुःखाने पीडित असतो तेव्हा आपल्याला मदत करण्यास यहोवा तयार असतो आणि त्याच्याजवळ तितके सामर्थ्यही आहे, याची आपण पक्की खात्री बाळगू शकतो. “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.” (स्तो. ३४:१५-१८; ४६:१) हे साहाय्य तो कशा प्रकारे पुरवतो? १ करिंथकर १०:१३ मध्ये काय म्हटले आहे ते पाहा: “देव विश्‍वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” यहोवा कदाचित अशा काही घटना घडवून आणेल ज्यामुळे आपले दुःख नाहिसे होईल किंवा ते दुःख सहन करण्याची शक्‍ती तो आपल्याला देईल. यांपैकी कोणत्याही मार्गाने तो आपल्याला मदत करतो.

८. यहोवा देत असलेल्या साहाय्याचा आपण फायदा कसा करून घेऊ शकतो?

यहोवा देत असलेल्या साहाय्याचा आपण फायदा कसा करून घेऊ शकतो? आपल्याला काय करण्यास सांगण्यात आले आहे ते पाहा: “तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका.” याचा अर्थ आपण आपल्या चिंता आणि आपल्या समस्या जणू काय यहोवाच्या हाती सोपवून देतो आणि त्याला म्हणतो, आता तू हे सांभाळ. आणि आपण निर्धास्त होतो अर्थात चिंता करायचे थांबवतो आणि यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल म्हणून धीराने त्याच्यावर भरवसा ठेवतो. (मत्त. ६:२५-३२) पण त्याच्यावर भरवसा ठेवण्याकरता आपण नम्र असले पाहिजे. नम्र व्यक्‍ती स्वतःच्या शक्‍तीवर किंवा बुद्धीवर अवलंबून राहत नाही. “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन” होऊन आपण हे कबूल करतो, की आपण कनिष्ठ आहोत. (१ पेत्र ५:६ वाचा.) परिणामतः देव आपल्याबाबतीत जे काही घडण्याची अनुमती देतो त्याला आपण तोंड देतो. आपण कदाचित लगेचच सुटका मिळण्याची उत्कंठा बाळगू परंतु, आपल्या वतीने नेमके केव्हा आणि कसे कार्य करायचे हे यहोवाला चांगल्याप्रकारे माहीत आहे, असा आपला भरवसा आहे.—स्तो. ५४:७; यश. ४१:१०.

९. दाविदाला कोणत्या प्रकारच्या चिंता यहोवावर टाकाव्या लागल्या?

स्तोत्र ५५:२२ मधील दाविदाच्या शब्दांची आठवण करा. त्याने म्हटले: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” दाविदाने हे शब्द लिहिले तेव्हा तो अत्यंत दुःखी अवस्थेत होता. (स्तो. ५५:४) असे समजले जाते, की दाविदाने हे स्तोत्र, त्याचा पुत्र अबशालोमाने त्याचे राजपद हिरावून घेण्यासाठी कट रचला होता तेव्हा लिहिले. दाविदाचा सर्वात भरवसालायक सल्लागार अहीथोफेल देखील या कटात सामील होता. दाविदाला आपला जीव वाचवण्यासाठी जेरूसलेम सोडून पळून जावे लागले होते. (२ शमु. १५:१२-१४) या दुःखदायक परिस्थितीतही दाविदाने देवावरील आपला भरवसा कमी होऊ दिला नाही किंवा तो निराश झाला नाही.

१०. आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करावे लागते तेव्हा आपण काय केले पाहिजे?

१० आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करावे लागत असले तरी दाविदाप्रमाणे आपण यहोवाला प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबतीत प्रेषित पौल आपल्याला काय करण्यास आर्जवतो ते आपण पाहू या. (फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.) कळकळीने प्रार्थना केल्याने काय होते? कळकळीने प्रार्थना केल्याने “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति [आपली] अंतःकरणे व [आपले] विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”

११. “देवाने दिलेली शांति” आपल्या अंतःकरणाचे व आपल्या विचारांचे संरक्षण कशी करते?

११ प्रार्थना केल्याने आपली परिस्थिती बदलेल का? कदाचित बदलेल. परंतु, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जसे हवे तसे यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर नेहमी देत नाही. तरीपण, प्रार्थना केल्यामुळे आपण पीडादायक भावनांमुळे आपले मानसिक संतुलन गमावत नाही. पीडादायक भावना आपल्याला भारावून टाकतात तेव्हा “देवाने दिलेली शांति” आपल्याला स्थिर करते. शत्रूंच्या हल्ल्यांपासून एखाद्या शहराचे संरक्षण करण्याकरता जसे सैन्य दल नेमले जाते तसे “देवाने दिलेली शांति” आपल्या अंतःकरणाचे व आपल्या विचारांचे संरक्षण करते. या शांतीमुळे आपण, आपल्या मनातील शंका, भीती, नकारात्मक विचार यांवर मात करू शकतो आणि अविचारीपणे प्रतिक्रिया दाखवण्याचे टाळतो.—स्तो. १४५:१८.

१२. एका व्यक्‍तीला मानसिक शांती कशी मिळते, हे उदाहरण देऊन समजावून सांगा.

१२ आपण जेव्हा एखादा दुःखद प्रसंग अनुभवत असतो तेव्हा आपल्याला मानसिक शांती कशी लाभू शकते? या उदाहरणाचा विचार करा. हे उदाहरण कदाचित काही बाबतीत आपल्या परिस्थितीशी जुळेल. एक कामगार एका खडूस मॅनेजरच्या हाताखाली काम करत आहे. परंतु, या कामगाराला कंपनीच्या मालकाला आपल्या भावना व्यक्‍त करायची संधी मिळते. कंपनीचा मालक अतिशय दयाळू व समंजस मनुष्य आहे. तो कामगाराला सांगतो की त्याला त्याची परिस्थिती समजते व लवकरच तो मॅनेजरला काढून टाकेल. हे ऐकल्यावर कामगाराला कसे वाटते? मालकाने दिलेल्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून व बदल येईपर्यंत आणखी थोडे कष्ट सहन करावे लागले तरी काही हरकत नाही असे समजून कामगाराचा टिकून राहण्याचा निश्‍चय आणखी पक्का होतो. तसेच, यहोवाला आपली परिस्थिती समजते आणि तो आपल्याला असे आश्‍वासन देतो, की लवकरच “ह्‍या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.” (योहा. १२:३१) किती सांत्वनदायक विचार आहे हा!

१३. प्रार्थनेसोबत आपण आणखी काय करू शकतो?

१३ पण मग, यहोवाला फक्‍त आपल्या समस्यांविषयी प्रार्थना करणेच पुरेसे आहे का? नाही. आपण प्रार्थनांच्या अनुषंगाने कार्य करणे आवश्‍यक आहे. राजा शौलाने जेव्हा दाविदाला ठार मारण्यासाठी त्याच्या घरी लोक पाठवले तेव्हा दाविदाने अशी प्रार्थना केली: “हे माझ्या देवा, माझ्या वैऱ्‍यांपासून मला सोडीव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचीव. दुष्कर्म करणाऱ्‍यांपासून मला सोडीव; घातकी मनुष्यांपासून माझा बचाव कर.” (स्तो. ५९:१, २) प्रार्थनेसोबत दाविदाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि आपला जीव वाचवण्याकरता आवश्‍यक ती पावले उचलली. (१ शमु. १९:११, १२) याचप्रकारे, आपल्या दुःखदायक परिस्थितीला तोंड देण्याकरता आणि कदाचित त्या परिस्थितीत सुधार करण्याकरता आपल्याला व्यावहारिक बुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू शकतो.—याको. १:५.

सहन करण्याची शक्‍ती कोठून मिळू शकेल?

१४. दुःखद परिस्थिती सहन करताना कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१४ आपल्यावरील दुःखद परिस्थिती लगेचच काढल्या जाणार नाहीत. त्या कदाचित काही काळपर्यंत तशाच राहतील. असे जर आहे तर कोणती गोष्ट आपल्याला ती परिस्थिती सहन करण्यास मदत करू शकेल? सर्वात आधी हे लक्षात ठेवा, की समस्या असूनही आपण जेव्हा यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करीत राहतो तेव्हा आपण हे सिद्ध करून दाखवतो, की आपण त्याच्यावर किती प्रेम करतो. (प्रे. कृत्ये १४:२२) ईयोबावर सैतानाने लावलेल्या दोषारोपांची आठवण करा: “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धि पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” (ईयो. १:९-११) ईयोबाने देवाशी एकनिष्ठ राहून हा आरोप ठार खोटा आहे हे सिद्ध केले. आपल्यावर आलेली दुःखद परिस्थिती सहन करून आपल्याला देखील सैतान लबाड आहे हे सिद्ध करण्याची संधी आहे. आणि आपल्या सहनशीलतेमुळे आपली आशा व आपला भरवसा आणखी पक्का होतो.—याको. १:४.

१५. कोणत्या उदाहरणांतून आपल्याला मनोबल मिळू शकेल?

१५ दुसरी गोष्ट म्हणजे, “जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत,” ही गोष्ट लक्षात ठेवा. (१ पेत्र ५:९) होय, “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परिक्षा तुम्हावर गुदरली नाही.” (१ करिंथ. १०:१३) यास्तव, स्वतःच्या जीवनातील समस्यांवर रवंथ करत बसण्यापेक्षा इतरांच्या उदाहरणावर मनन करून तुम्ही शक्‍ती आणि धैर्य मिळवू शकता. (१ थेस्सलनी. १:५-७; इब्री १२:१) अतिशय दुःखद परिस्थितीतही विश्‍वासूपणे टिकून राहिलेल्या बंधूभगिनींना तुम्ही ओळखत असाल. त्यांच्या उदाहरणावर मनन करण्यासाठी वेळ काढा. तुमच्यासारख्याच परिस्थितीतून गेलेल्या बंधूभगिनींचे आपल्या प्रकाशनांत छापलेले अनुभव शोधून ते वाचण्यासाठी तुम्ही वेळ काढला आहे का? या अनुभवांतून तुम्हाला खूप मनोबल मिळेल.

१६. आपण जेव्हा विविध परिक्षांचा सामना करतो तेव्हा देव आपल्याला मनोबल कसे देतो?

१६ तिसरी गोष्ट. यहोवा “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव” आहे. ‘तो आपल्यावरील सर्व संकटात आपले सांत्वन करितो, असे की ज्या सांत्वनाने आपल्याला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आपण, जे कोणी कोणत्याहि संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ होतो,’ ही गोष्ट विसरू नका. (२ करिंथ. १:३, ४) फक्‍त सध्याच्या संकटातच नव्हे तर “सर्व संकटात” आपल्याला उत्तेजन व बल देण्याकरता देव जणू काय आपल्या बाजूने उभा आहे. यामुळे आपण, “कोणत्याहि संकटात” असलेल्या इतरांना सांत्वन देऊ शकतो. पौलाला या शब्दांची व्यक्‍तिगतरीत्या प्रचिती आली.—२ करिंथ. ४:८, ९; ११:२३-२७.

१७. जीवनातील दुःखद परिस्थितींना तोंड देण्याकरता बायबल आपली कशा प्रकारे मदत करते?

१७ चौथी गोष्ट. आपल्याजवळ देवाचे वचन बायबल आहे. ते “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीम. ३:१६, १७) देवाचे वचन आपल्याला फक्‍त “पूर्ण” व ‘सज्जच’ करीत नाही तर ते आपल्याला जीवनातील दुःखदायक परिस्थितींना तोंड कसे द्यायचे तेही शिकवते. ते आपल्याला, “पूर्ण” व “सज्ज” करते. मूळ भाषेत, “सज्ज” असे भाषांतर केलेल्या शब्दाचा अक्षरशः अर्थ “आवश्‍यक असलेले सर्व काही बसवलेले,” असा होतो. हा शब्द, प्राचीन काळात, समुद्रप्रवासासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टी बसवलेल्या नावेच्या संदर्भात अथवा एखादे यंत्र ज्या उद्देशासाठी बनवण्यात आले आहे तो उद्देश पूर्ण व्हावा म्हणून त्यात सर्व आवश्‍यक त्या गोष्टी बसवणे, या अर्थाने वापरण्यात आला असावा. तसेच, आपल्या मार्गात येणाऱ्‍या सर्व गोष्टी हाताळण्याकरता आवश्‍यक असलेले सर्वकाही यहोवा आपल्या वचनाकरवी पुरवतो. म्हणूनच आपण म्हणू शकतो: “देवाने ही परिस्थिती माझ्यावर येऊ दिली आहे तर मी त्याच्या मदतीने यशस्वीरीत्या ती सहन करू शकेन.”

आपल्या सर्व दुःखांतून सुटका

१८. कोणती गोष्ट नजरेपुढे ठेवल्याने आपल्याला आणखी मदत होईल?

१८ पाचवी गोष्ट. यहोवा खूप लवकर मानवजातीला सर्व दुःखांतून मुक्‍त करणार आहे या अद्‌भुत वस्तुस्थितीला सतत आपल्या नजरेपुढे ठेवा. (स्तो. ३४:१९; ३७:९-११; २ पेत्र २:९) हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा, देवाकडून मिळालेल्या या सुटकेमुळे, आपण सध्याच्या दुःखांतून तर मुक्‍त होऊ, इतकेच नव्हे तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधीही मिळेल. मग ते जीवन स्वर्गात येशूबरोबर असो किंवा पृथ्वीवरील नंदनवनात असो.

१९. आपण विश्‍वासूपणे कसे टिकून राहू शकू?

१९ पण तोपर्यंत आपल्याला या दुष्ट जगातील दुःखदायक परिस्थितीशी झुंज देत राहावी लागेल. आपण त्या काळाची किती आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा दुःखद परिस्थितीच राहणार नाही! (स्तो. ५५:६-८) आपण विश्‍वासूपणे टिकून राहिलो तर दियाबल सैतान लबाड आहे हे सिद्ध होईल, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवू या. आपल्या स्वतःच्या आणि आपल्या ख्रिस्ती बंधूसमाजाच्या प्रार्थनांतून मिळणारे बळ प्राप्त करत राहू या आणि हे लक्षात ठेवू या, की आपल्या बांधवांनासुद्धा आपल्यासारख्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देवाच्या वचनाचा चांगल्याप्रकारे उपयोग करून पूर्ण व सज्ज होत राहा. “सर्व सांत्वनदाता देव” पुरवत असलेल्या प्रेमळ काळजीवरून तुमचा भरवसा उडणार नाही, याची नेहमी खात्री करा. “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात,” ही गोष्ट सतत ध्यानात ठेवा.—स्तो. ३४:१५.

तुम्ही उत्तर देऊ शकाल का?

• दाविदाला ज्या दुःखदायक गोष्टी सहन कराव्या लागत होत्या त्याबद्दल त्याला कसे वाटत होते?

• राजा शलमोनाने कोणता भरवसा व्यक्‍त केला?

• यहोवा आपल्यावर ज्या दुःखद परिस्थिती येऊ देतो त्यांचा सामना करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

यहोवा आपल्या दुःखी लोकांच्या वतीने कार्य करेल, असा भरवसा शलमोनाला होता

[१५ पानांवरील चित्र]

दाविदाने प्रार्थनेद्वारे यहोवावर आपल्या चिंता टाकल्या आणि मग आपल्या प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य केले