समजूतदारपणा दाखवा, संतुलित राहा
समजूतदारपणा दाखवा, संतुलित राहा
‘त्यांनी सौम्य असावे, अशी त्यांना आठवण दे.’—तीत ३:१, २.
१, २. सहनशील असण्याविषयी शास्त्रवचनांत काय म्हटले आहे व हे का उचित आहे?
स्वर्गात राहणाऱ्या आपल्या पित्या यहोवाजवळ अनंत बुद्धी आहे. आपण त्याच्या हातची कृती आहोत त्यामुळे जीवनात मार्गदर्शनासाठी आपण त्याच्याकडेच पाहतो. (स्तो. ४८:१४) ख्रिस्ती शिष्य याकोब आपल्याला असे सांगतो, “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.”—याको. ३:१७.
२ “तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो,” असे प्रेषित पौलाने आर्जवले. * (फिलिप्पै. ४:५) ख्रिस्त येशू ख्रिस्ती मंडळीचा प्रभू व मस्तक आहे. (इफिस. ५:२३) आपण प्रत्येकाने समजूतदार असणे, ख्रिस्ताचे मार्गदर्शन स्वीकारण्यास तयार असणे व इतरांबरोबर व्यवहार करताना समंजसपणा दाखवणे किती महत्त्वाचे आहे!
३, ४. (क) समजूतदारपणा दाखवल्याने कोणते फायदे होतात ते उदाहरण देऊन सांगा. (ख) आपण कोणत्या पैलूंचा विचार करणार आहोत?
३ आपण जेव्हा संतुलित प्रमाणात समजूतदारपणा दाखवतो तेव्हा आपल्यालाच त्याचा फायदा होतो. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये दहशतवाद्यांचा एक कट उघडकीस आला तेव्हा, बहुतेक विमान प्रवासी, पूर्वी त्यांना ज्या वस्तू नेण्याची परवानगी होती त्या आता नेता येणार नाहीत यासंबंधी काढण्यात आलेला नियम पाळण्यास तयार झाले. वाहन चालवताना आपण इतर वाहन चालकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो; जसे की, आपल्याला जेव्हा एखादा चौक पार करायचा असतो तेव्हा वाहतुकीच्या नियमानुसार वेगाने जाण्याची परवानगी असतानासुद्धा आपण आपल्या वाहनाचा वेग कमी करतो. यामुळे सर्वांचे संरक्षण होते आणि वाहनांची रहदारी देखील सुरळीत चालते.
४ आपल्यातील बहुतेकांना समजूतदारपणा दाखवणे जरा जड जाते. आपल्या मदतीखातर या लेखात अधीनता व समजूतदारपणाचे तीन पैलू दाखवण्यात आले आहेत जसे की, आपला हेतू, अधिकारपदी असलेल्यांप्रती आपली मनोवृत्ती आणि समजूतदारपणा दाखवण्याची सीमा. यांवर आपण विचार करू या.
अधीनता व समजूतदारपणा का दाखवला पाहिजे
५. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, कोणत्या कारणामुळे एक दास आपल्या धन्याची चाकरी करीत राहण्याची निवड करू शकत होता?
५ ख्रिस्तपूर्व काळातील एका उदाहरणावरून आपल्याला अधीनता व समजूतदारपणा दाखवण्यामागचा योग्य हेतू लक्षात येतो. जे हिब्रू लोक दास बनले होते त्यांना मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्यांच्या दास्यत्वाच्या सातव्या वर्षी किंवा योबेल वर्षी (जे पहिले येईल, त्या वर्षी) मुक्त करावे लागत होते. तरीपण एखादा दास, दास म्हणून राहण्याची निवड करू शकत होता. (निर्गम २१:५, ६ वाचा.) कोणत्या कारणामुळे तो असे करीत असे? धन्याबद्दल त्याला असलेल्या प्रेमापोटी तो असे करीत असे. त्याचा धनी समंजस व प्रेमळ असेल, तर तो दास बनून राहण्याची निवड करत असे.
६. समजूतदारपणा दाखवण्यामध्ये प्रेम कसे समाविष्ट आहे?
६ त्याचप्रमाणे, यहोवाबद्दल असलेले प्रेम आपल्याला, आपले जीवन त्याला समर्पित करण्यास व आपण त्याला दिलेले वचन पाळावयास प्रवृत्त करते. (रोम. १४:७, ८) प्रेषित योहानाने असे लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहा. ५:३) ही प्रीति स्वार्थ पाहत नाही. (१ करिंथ. १३:४, ५) इतर लोकांबरोबर जेव्हा आपण उठ-बस करतो तेव्हा, शेजाऱ्यांबद्दलचे प्रेम आपल्याला, समजूतदारपणा दाखवण्यास व स्वतःच्या हितापेक्षा त्यांच्या हिताचा विचार करण्यास प्रवृत्त करते. आपल्या स्वार्थाचा विचार करण्याऐवजी आपण इतरांचा विचार करतो.—फिलिप्पै. २:२, ३.
७. आपल्या सेवेत आपण समंजसपणा कसा दाखवतो?
७ आपल्या बोलण्याद्वारे अथवा आपल्या कृतींद्वारे आपण इतरांसाठी अडखळण बनू नये. (इफिस. ४:२९) प्रेम आपल्याला असे काहीही करण्यापासून रोखेल ज्यामुळे इतर पार्श्वभूमीचे व संस्कृतीचे लोक यहोवाची सेवा करण्यापासून अडखळतील. यासाठी आपल्याला समंजसपणा दाखवावा लागेल. उदाहरणार्थ, मिशनरी भगिनींना भडक सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करण्याची सवय असेल. परंतु एखाद्या क्षेत्रात भडक सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करणाऱ्या स्त्रीला वाईट चालीचे समजले जात असेल तर या भगिनी जेव्हा अशा क्षेत्रात काम करतात तेव्हा त्या भडक सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करण्यावर अडून राहून इतरांना अडखळण बनत नाहीत.—१ करिंथ. १०:३१-३३.
८. स्वतःला इतरांपेक्षा “कनिष्ठ” समजण्यासाठी यहोवाबद्दल असलेले प्रेम आपल्याला कशाप्रकारे मदत करेल?
८ यहोवाबद्दल आपल्याला प्रेम असेल तर आपल्यातील गर्व भावना विरघळून जाईल. आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण यावर येशूच्या शिष्यांमध्ये वाद चालला असताना येशूने त्यांच्यामध्ये एका लहान मुलाला उभे केले. तो म्हणाला: “जो कोणी ह्या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करितो तो माझा स्वीकार करतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करितो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.” (लूक ९:४८; मार्क ९:३६) स्वतःला “कनिष्ठ” समजायला आपल्याला व्यक्तिगतरीत्या कदाचित कठीण वाटेल. वारशाने मिळालेली अपरिपूर्णता आणि गर्व बाळगण्याकडे असलेला आपला कल यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करतो. परंतु नम्रपणा आपल्याला समंजस असण्यास मदत करेल.—रोम. १२:१०.
९. समजूतदारपणा दाखवायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे?
९ समजूतदारपणा दाखवायचा असेल तर आपण देवाने ज्यांना नियुक्त केले आहे त्यांना अधीनता दाखवली पाहिजे. सर्व खरे ख्रिस्ती मस्तकपदाच्या तत्त्वाचे गांभीर्य जाणतात. ही गोष्ट प्रेषित पौलाने करिंथकरांना अगदी स्पष्टरीत्या सांगितली: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.”—१ करिंथ. ११:३.
१०. यहोवाच्या अधिकाराच्या अधीन राहून आपण काय दाखवतो?
१० देवाच्या अधिकाराच्या अधीन राहून आपण हे दाखवतो, की पिता यानात्याने आपण त्याच्यावर भरवसा व विश्वास करतो. प्रत्येकाच्या जीवनात काय चालले आहे हे त्याला माहीत आहे व त्याप्रमाणे तो आपल्याला प्रतिफळ देईल. ही जाणीव आपल्याला, इतर जण जेव्हा आपला अपमान करतात किंवा क्रोधीत होऊन त्यांचा स्वतःवरील ताबा सुटतो तेव्हा समजूतदारपणा दाखवण्यास मदत करेल. पौलाने असे लिहिले: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” पौलाने मग अशी सूचना देऊन त्या सल्ल्यावर जोर दिला: “प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.”—रोम. १२:१८, १९.
११. आपण ख्रिस्ताच्या नेतृत्वाच्या अधीन आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?
११ ख्रिस्ती मंडळीतही आपण देवाने नियुक्त केलेल्या वडिलांच्या अधीन राहिले पाहिजे. प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायात, ख्रिस्त येशूला आपल्या उजव्या हातात मंडळीतील “तारे” घेऊन आहे, असे चित्रित करण्यात आले आहे. (प्रकटी. १:१६, २०) सर्वसामान्यपणे, हे “तारे” मंडळीतील वडिलवर्गांना अथवा पर्यवेक्षकांना चित्रित करतात. हे नियुक्त पर्यवेक्षक ख्रिस्ताच्या नेतृत्वाच्या अधीन राहतात आणि इतरांबरोबर दयाळुपणे व्यवहार करण्याच्या त्याच्या पद्धतीचे अनुकरण करतात. येशूने यथाकाळी खावयास देण्यासाठी ज्यांना नेमले आहे त्या “विश्वासू व बुद्धिमान दासाला” मंडळीतील सर्वांनी अधीनता दाखवली पाहिजे. (मत्त. २४:४५-४७) आज आपण या लेखाचा अभ्यास करण्यास व यातील माहितीचा आपल्या जीवनात अवलंब करण्यास तयार झालो याचाच अर्थ आपण, व्यक्तिगतरीत्या ख्रिस्ताच्या नेतृत्वाच्या अधीन आहोत. यामुळे मंडळीत शांती व ऐक्य टिकून राहते.—रोम. १४:१३, १९.
अधीनता दाखवण्याची सीमा
१२. अधीनता दाखवण्याच्या बाबतीतही सीमा का आहेत?
१२ परंतु अधीनता दाखवण्याचा अर्थ, आपल्या विश्वासांचे किंवा ख्रिस्ती तत्त्वांचे पालन करण्याचे सोडून देणे, असा मुळीच होत नाही. आरंभीच्या ख्रिश्चनांना धार्मिक पुढाऱ्यांनी ख्रिस्ताच्या नावाने शिकवण देण्याचे बंद करा, असे जेव्हा निक्षून सांगितले तेव्हा त्यांनी काय केले? पेत्र आणि इतर प्रेषितांनी न घाबरता असे म्हटले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रे. कृत्ये ४:१८-२०; ५:२८, २९) यास्तव आज जेव्हा सरकारी अधिकारी आपल्याला, सुवार्तेचे प्रचार कार्य थांबवण्यास बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण आपले कार्य थांबवत नाही. आपण व्यवहारकुशलतेचा उपयोग करून सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आपल्या नेहमीच्या पद्धतीत कदाचित फेरबदल करू. घरोघरच्या कार्यावर बंदी असेल तर आपण घरमालकांना भेटण्याचे इतर मार्ग शोधू आणि देवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करीत राहू. तसेच, ‘वरिष्ठ अधिकारी’ आपल्या सभांवर बंदी आणतात तेव्हा आपण लोकांचे लक्ष विनाकारण आपल्याकडे आकर्षित न करता लहान लहान गटात एकत्र जमू.—रोम. १३:१; इब्री १०:२४, २५.
१३. जे अधिकारपदी आहेत त्यांच्याबरोबर समंजसपणे वागण्याविषयी येशूने काय म्हटले?
१३ डोंगरावरील आपल्या प्रवचनात येशूने अधिकारपदी असलेल्यांना अधीनता दाखवणे महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले. तो म्हणाला: “जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाहि घेऊ दे; आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.” (मत्त. ५:४०, ४१) * इतरांबद्दल विचारीपणा दाखवून त्यांना मदत करण्याची इच्छा आपल्याला जणू काय दोन कोस जाण्यास अर्थात सांगकामे व होनामे न होता अधिक करण्यास प्रवृत्त करते.—१ करिंथ. १३:५; तीत ३:१, २.
१४. आपण धर्मत्यागी लोकांना मान्यता का दाखवू नये?
१४ आपण समंजसपणा दाखवत असलो, तरीसुद्धा आपण धर्मत्यागी लोकांना मान्यता दाखवू नये. याबाबतीत आपली स्पष्ट आणि ठाम भूमिका, सत्याची शुद्धता आणि मंडळीतील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. ‘खोट्या बंधुंबद्दल’ प्रेषित पौलाने असे लिहिले: “सुवार्तेचे सत्य तुम्हाजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरहि वश होऊन मान्य झालो नाही.” (गलती. २:४, ५) मंडळीतील काही जण धर्मत्यागी बनतात; अर्थात असे फार क्वचित घडते. या वेळी देखील विश्वासू ख्रिश्चन जे योग्य आहे त्याबाबतीत ठाम राहतील.
पर्यवेक्षकांनी समजूतदार असले पाहिजे
१५. ख्रिस्ती पर्यवेक्षक चर्चेसाठी एकत्र जमतात तेव्हा ते समजूतदारपणा कसा दाखवू शकतात?
१५ पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या बांधवांची एक योग्यता अशी आहे, की त्यांनी समजूतदार असले पाहिजे. पौलाने लिहिले: ‘मंडळीचा धर्माध्यक्ष समजूतदार असावा.’ (१ तीम. ३:२, ३, मराठी कॉमन लँग्वेज) नियुक्त वडील मंडळीच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी अथवा चर्चा करण्यासाठी एकत्र जमतात तेव्हा खासकरून त्यांनी हा गुण दाखवणे महत्त्वाचे आहे. निर्णय घेण्याआधी, उपस्थित असलेल्या सर्वांना स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असले तरी, प्रत्येकाने काहीतरी टिपणी केलीच पाहिजे असा काही नियम नाही. चर्चेदरम्यान एखादा वडील, इतर वडिलांकडून शास्त्रवचनातील लागू होणाऱ्या तत्त्वांबद्दल ऐकेल तेव्हा त्याचे विचार कदाचित बदलतील. अशावेळी, स्वतःच्या मतावर अडून राहण्याऐवजी एक प्रौढ वडील समजूतदारपणा दाखवेल आणि इतरांचे मत मान्य करेल. चर्चेच्या सुरुवातीला कदाचित प्रत्येकाची वेगवेगळी मते असतील. पण सर्वजण जेव्हा प्रार्थनापूर्वक चर्चा करतात तेव्हा नम्र व समजूतदार वडिलांमधील ऐक्य टिकून राहते.—१ करिंथ. १:१०; इफिसकर ४:१-३ वाचा.
१६. ख्रिस्ती वडिलांची कोणती मनोवृत्ती असली पाहिजे?
१६ ख्रिस्ती वडिलांनी आपल्या सर्व कार्यांमध्ये ईश्वरशासित व्यवस्थेला उंचावून धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वडील जेव्हा मेंढपाळकत्वाच्या भेटीला जातात तेव्हा देखील त्यांची ही मनोवृत्ती दिसून आली पाहिजे. ही मनोवृत्ती त्यांना, इतरांबद्दल विचारीपणा व सौम्यपणा दाखवण्यास मदत करेल. पेत्राने असे लिहिले: “तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा.”—१ पेत्र ५:२.
१७. मंडळीतील प्रत्येक व्यक्ती इतरांबरोबर व्यवहार करताना समंजसपणा कशी दाखवू शकते?
१७ मंडळीतील वृद्ध बंधूभगिनींना, त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांनी दिलेली मदत व आदर याबद्दल कृतज्ञता वाटते व ते त्यांना आदराने वागवतात. तर, तरुण वृद्धांचा मान राखतात. कारण हे वृद्ध बंधूभगिनी यहोवाच्या सेवेत मुरलेले आहेत; त्यांच्याजवळ भरपूर अनुभव आहे. (१ तीम. ५:१, २) ख्रिस्ती वडील अशा बांधवांना शोधतात ज्यांच्यावर ते विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवू शकतात व देवाच्या कळपाची काळजी घेण्यास मदत व्हावी म्हणून प्रशिक्षण देऊ शकतात. (२ तीम. २:१, २) प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने पौलाच्या या ईश्वरप्रेरित सल्ल्याचे महत्त्व जाणले पाहिजे: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”—इब्री १३:१७.
कौटुंबिक सदस्य दाखवत असलेला समजूतदारपणा
१८. कौटुंबिक वर्तुळात समजूतदारपणा दाखवणे उचित का आहे?
१८ कौटुंबिक वर्तुळातही प्रत्येक सदस्याने समजूतदारपणा दाखवला पाहिजे. (कलस्सैकर ३:१८-२१ वाचा.) ख्रिस्ती कुटुंबात प्रत्येक सदस्याची काय भूमिका आहे हे बायबल सांगते. पिता हा पत्नीचा मस्तक आहे आणि सोबतच मुलांना मार्गदर्शन देण्याची प्रामुख्याने त्याची जबाबदारी आहे. पत्नीने आपल्या पतीच्या अधिकाराला मान्यता दाखवली पाहिजे आणि मुलांनी आपल्या आईवडिलांच्या अधीन राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण प्रभूला हे संतोषकारक आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य, योग्य व संतुलित मार्गाने समजूतदारपणा दाखवून घरातील ऐक्य व शांती टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावू शकतो. हा मुद्दा नीट समजण्यासाठी बायबलमध्ये काही उदाहरणे आहेत.
१९, २०. (क) समजूतदारपणा दाखवण्याच्या बाबतीत एली व यहोवाने मांडलेल्या उदाहरणांतील फरक दाखवा. (ख) या उदाहरणांतून पालक कोणता धडा शिकू शकतात?
१९ शमुवेल अद्याप लहान मुलगाच होता तेव्हा एली इस्राएलमध्ये महायाजक म्हणून सेवा करत होता. परंतु एलीचे पुत्र, हफनी व फिनहास “अधम” होते. “त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.” एलीने त्यांच्याविषयी वाईट गोष्टी ऐकल्या. ते, दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी कुकर्म करत असल्याचेही त्याने ऐकले. त्याने काय केले? एलीने त्यांना सांगितले, की जर त्यांनी यहोवाविरुद्ध पाप केले तर त्यांची वकिली करणारा कोणीही नसेल. याव्यतिरिक्त एलीने त्यांची सुधारणूक करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना शिक्षाही दिली नाही. परिणामतः, एलीचे पुत्र आपली वाईट कामे करतच राहिले. सरतेशेवटी, यहोवाच्या न्यायी गुणानुसार, ते दोघेही मृत्यूच्या शिक्षेस पात्र ठरले. त्यांच्या मृत्यूची बातमी सहन न झाल्यामुळे एलीसुद्धा मरण पावला. किती दुःखद परिणाम! एलीने दाखवलेला समजूतदारपणा चुकीचा होता. त्याने आपल्या मुलांच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष केले.—१ शमु. २:१२-१७, २२-२५, ३४, ३५; ४:१७, १८.
२० एलीच्या उलट यहोवाने आपल्या देवपुत्रांबरोबर कसा व्यवहार केला ते पाहा. संदेष्टा मीखायाने एक उल्लेखनीय दृष्टांत पाहिला. या दृष्टांतात, यहोवा आणि त्याच्या दुतांची एक सभा भरलेली असते. यहोवा दुतांना विचारतो, इस्राएलचा दुष्ट राजा अहाब याला कोण मोह घालून त्याचे पतन घडवेल? विविध देवदूत सुचवत असलेल्या गोष्टी यहोवा ऐकतो. मग एक देवदूत म्हणतो, की तो ही कामगिरी पूर्ण करेल. यहोवा त्याला विचारतो, की तो हे कसे करेल? देवदूताचे बोलणे ऐकल्यावर यहोवाला समाधान वाटते आणि तो त्याला ते काम पूर्ण करायची आज्ञा देतो. (१ राजे २२:१९-२३) कुटुंबातील सदस्य या अहवालातून समजूतदारपणा दाखवण्याचा काही धडा शिकू शकतात का? ख्रिस्ती पती आणि पिता, आपल्या पत्नीचे आणि मुलांचे म्हणणे ऐकून घेऊ शकतो. दुसऱ्या बाजूला पाहता, ख्रिस्ती पत्नीला व मुलांना एक गोष्ट समजली पाहिजे. ती म्हणजे, त्यांनी एखादी गोष्ट सुचवली असली तरी, अंतिम निर्णय पती घेईल; कारण शास्त्रवचनांनुसार त्याला हा हक्क देण्यात आला आहे. अशारीतीने पत्नीने व मुलांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे.
२१. पुढील लेखात कोणत्या विषयावर चर्चा करण्यात येईल?
२१ समजूतदारपणा दाखवण्याच्या बाबतीत यहोवाने दिलेल्या प्रेमळ व सुज्ञ सल्ल्याविषयी आपण त्याचे किती आभारी आहोत. (स्तो. ११९:९९) संतुलित मार्गाने समजूतदारपणा दाखवल्यास वैवाहिक जीवन सुखी कसे होते हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
[तळटीपा]
^ सहनशीलता असे भाषांतरीत केलेल्या शब्दासाठी प्रेषित पौलाने ज्या ग्रीक शब्दाचा प्रयोग केला त्याचे एका शब्दांत भाषांतर करणे कठीण आहे. मराठी बायबलमध्ये या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. जसे की, सौम्यपणा, सहनशीलता, समजंसपणा, समजूतदारपणा, अधीनता. या लेखात हे अर्थ आलटून-पालटून वापरण्यात आले आहेत. एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे: “समजूतदार असण्यामध्ये, हक्कांवर अथवा मतांवर अडून न राहणे, इतरांना समजून घेणे व इतरांना सौम्यपणा दाखवणे समाविष्ट आहे.” तेव्हा, या शब्दाचा अर्थ, नम्र व समंजस असणे, देवाच्या नियमांच्या अक्षरांना चिकटून न राहणे किंवा हक्क मिळवण्यावर अडून न राहणे असाही होतो.
^ टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, २००५ पृष्ठे २३-६ वरील “कोणी तुला वेठीस धरल्यास” हा लेख पाहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• समजूतदारपणा दाखवल्याने कोणते चांगले परिणाम लाभतात?
• पर्यवेक्षक समजूतदारपणा कशा प्रकारे दाखवू शकतात?
• कुटुंबातील प्रत्येक सदस्याने समजूतदारपणा दाखवणे महत्त्वाचे का आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[४ पानांवरील चित्र]
मंडळीतील वडील, ख्रिस्ताप्रमाणे इतरांबरोबर दयाळुपणे व्यवहार करतात
[६ पानांवरील चित्र]
मंडळीचे वडील एकत्र जमतात तेव्हा प्रार्थना आणि समंजसपणाची मनोवृत्ती यांमुळे ऐक्य वाढते