व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणत्या गोष्टीने जीवनात खरे समाधान मिळते?

कोणत्या गोष्टीने जीवनात खरे समाधान मिळते?

कोणत्या गोष्टीने जीवनात खरे समाधान मिळते?

“[खऱ्‍या] देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ.”—उप. १२:१३.

१, २. उपदेशक पुस्तकात असलेल्या विवेकी बोधतत्त्वांचा आपल्याला लाभ कसा होऊ शकतो?

कल्पना करा: एका मनुष्याजवळ सर्व काही आहे. तो एक ख्यातनाम मुत्सद्दी आहे. पृथ्वीवरल्या श्रीमंत व सर्वात बुद्धिमान असलेल्या लोकांच्या पंक्‍तीत बसणाऱ्‍यांपैकी तो एक आहे. पण एवढे सर्व मिळवल्यावरही त्याला एक प्रश्‍न सतावत असतो: ‘कोणत्या गोष्टीने जीवनात खरे समाधान मिळते?’

सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी असा एक मनुष्य खरोखर अस्तित्वात होता. त्याचे नाव होते शलमोन. समाधान मिळवण्याच्या शोधात त्याने काय काय केले याचे वर्णन आपल्याला उपदेशकाच्या पुस्तकात वाचायला मिळते. (उप. १:१३) शलमोनाच्या स्वानुभवावरून आपण पुष्कळ गोष्टी शिकू शकतो. आणि उपदेशकाच्या पुस्तकात असलेले विवेकी बोधतत्त्व आपल्याला, जीवनाला खरा अर्थ देणारी ध्येये ठेवण्यास मदत करू शकेल.

“वायफळ उद्योग”

३. मानवाच्या जीवनाविषयीची कोणती वस्तुस्थिती सर्वांनाच मान्य करावी लागते?

शलमोन आपल्याला सांगतो, की यहोवा देवाने पृथ्वीवर विपुल प्रमाणात अद्‌भुत व विस्मयकारक गोष्टी बनवल्या आहेत. यांचे जितके कौतुक आपण करू तितके कमीच आहे. परंतु आपले जीवन अल्प कालावधीचे असल्यामुळे देवाच्या या अद्‌भुत सृष्टीचा शोध घेण्यास आपण खऱ्‍या अर्थाने सुरुवातही करू शकत नाही. (उप. ३:११; ८:१७) आपल्या हातात फक्‍त काही दिवस असतात आणि तेही भुर्रकन्‌ उडून जातात. (ईयो. १४:१, २; उप. ६:१२) या वस्तुस्थितीने आपल्या हातात असलेल्या आयुष्याचा सुज्ञपणे उपयोग करण्यास आपल्याला प्रवृत्त केले पाहिजे. असे करणे सोपे नाही. कारण सैतानाचे जग आपली दिशाभूल करू शकते.

४. (क) “व्यर्थ” असे भाषांतरीत केलेल्या इब्री शब्दाचा काय अर्थ होतो? (ख) जीवनातल्या कोणत्या ध्येयांची आपण चर्चा करणार आहोत?

आयुष्य वाया घालवण्याच्या धोक्याविषयी बोलताना शलमोन, उपदेशक पुस्तकात ३० वेळा “व्यर्थ” या शब्दाचा उपयोग करतो. “व्यर्थ” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ, पोकळ, वायफळ, अर्थहीन, तथ्यहीन किंवा टाकाऊ असा होतो. (उप. १:२, ३) कधीकधी शलमोनाने “व्यर्थ” या शब्दाच्या तोडीचा, “वाऱ्‍याच्या मागे लागणे” या शब्दप्रयोगाचा देखील वापर केला आहे. (उप. १:१४; २:११, पं.र.भा.) वाऱ्‍याला पकडण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते, हे स्पष्टच आहे. असे करण्यातून काहीच साध्य होत नाही. तसेच, अविवेकी ध्येयांच्या मागे लागल्याने निराशाच पदरी पडते. सद्य युगातील जीवन इतके अल्प आहे की, निष्फळ ध्येयांच्या मागे लागणे आपल्याला परवडत नाही. तेव्हा, या ध्येयांच्या मागे लागण्याची चूक आपल्या हातून घडू नये म्हणून आपण शलमोनाने दैनंदिन जीवनातल्या काही सर्वसामान्य गोष्टींची उदाहरणे दिली आहेत ज्यावर आपण विचार करू या. या लेखात आधी आपण, सुखविलास आणि भौतिक संपत्ती यांच्या मागे लागण्याविषयीची चर्चा करू या. त्यानंतर, देवाला संतोषविणाऱ्‍या कामाविषयीची चर्चा करू या.

सुखविलासाच्या मागे धावत राहिल्याने आपण आनंदी होऊ का?

५. सुख मिळवण्यासाठी शलमोनाने काय काय केले?

आज अनेक लोक करत आहेत त्याप्रमाणे शलमोनाने सुखविलासी जीवनाच्या मागे धावून समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो: “मी कोणत्याहि आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरिले नाही.” (उप. २:१०) सुख मिळवण्यासाठी त्याने काय काय केले? उपदेशक पुस्तकाच्या दुसऱ्‍या अध्यायानुसार त्याने ‘द्राक्षारसाने आपल्या शरीराची चैन’ केली. अर्थात त्याने संयम सोडला नाही. त्याने, घरेदारे बांधली, मळे, बागा लावल्या, वृक्षांची लागवड केली, राजमहाले बांधली, संगीतात प्राविण्य मिळवले, मिष्टान्‍नांचा आस्वाद घेतला.

६. (क) जीवनात चांगल्या गोष्टींची मजा लुटणे चूक का नाही? (ख) पण करमणुकीच्या बाबतीत संतुलन राखणे महत्त्वाचे का आहे?

मित्रांबरोबर मजा करण्यास बायबल मनाई करते का? मुळीच नाही. उलट शलमोनाने म्हटले, की दिवसभराच्या कष्टाच्या कामानंतर निवांतपणे भोजनाचा आस्वाद लुटणे ही देवाकडील एक देणगी आहे. (उपदेशक २:२४; ३:१२, १३ वाचा.) शिवाय स्वतः यहोवा देव, तरुणांना “आनंद कर” असे सांगतो. (उप. ११:९) आपल्या सर्वांनाच अधूनमधून निवांतपणा व मनास तजेला देणारी करमणूक हवी असते. (मार्क ६:३१ पडताळून पाहा.) परंतु, करमणूक आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश बनता कामा नये. करमणुकीची तुलना जेवणानंतर आपण खात असलेल्या गोड पदार्थाशी करता येईल. जेवणानंतरची मिठाई ही जेवणाचा मुख्य भाग नसते. तुम्ही अस्सल मिठाई खाणारे असलात तरी तुम्ही या गोष्टीशी सहमत व्हाल की, तुम्ही जर मिठाई व्यतिरिक्‍त दुसरे काहीही खाल्ले नाही तर लवकरच तुम्हाला मिठाईची उबग येईल. मिठाईने तुम्हाला हवे असलेले पोषण मिळत नाही. तसेच, जीवनात सुखविलासाला अधिक महत्त्व देणे ‘वाऱ्‍याच्या मागे लागण्यासारखे’ आहे, हे शलमोनाला दिसून आले.—उप. २:१०, ११.

७. करमणूक निवडण्याच्या बाबतीत आपण दक्षता का बाळगली पाहिजे?

शिवाय, सर्वच प्रकारची करमणूक हितकारक नसते. बहुतेक करमणुकी, आध्यात्मिकरीत्या व नैतिकरीत्या अगदी हानीकारक असतात. जीवनात मजा करायची होती म्हणून कोट्यवधी लोकांनी अंमली पदार्थांचा दुरुपयोग केला, दारूबाजी केली, किंवा जुगार खेळला पण यामुळे शेवटी ते निराशेच्या गर्तेत पूर्णपणे बुडून गेले. हानीकारक गोष्टी केल्या तर आपल्याला त्यांचे परिणामही भोगावेच लागतील, अशी प्रेमळ ताकीद यहोवा आपल्याला देतो.—गलती. ६:७.

८. आपण ज्या प्रकारे आपले जीवन व्यतीत करत आहोत त्यावर विचार करणे सुज्ञपणाचे का आहे?

तसेच, सुखविलासाच्या मागे बेछूटपणे धावत राहिल्याने आपण अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे उचित लक्ष देऊ शकणार नाही. आपले आयुष्य लवकर सरत असल्यामुळे या अल्प आयुष्यात आपण नेहमीच निरोगी व समस्यांपासून मुक्‍त राहू याची शाश्‍वती नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणूनच तर शलमोनाने म्हटले त्याप्रमाणे, “हास्यविनोदगृहाकडे” जाण्यापेक्षा एखाद्याच्या अंत्यसंस्काराला खासकरून एखाद्या निष्ठावान ख्रिस्ती बंधू अथवा भगिनीच्या अंत्यसंस्काराला गेल्याने आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. (उपदेशक ७:२,  वाचा.) तो कसा? आपण जेव्हा अंत्यसंस्काराचे भाषण ऐकतो आणि मरण पावलेल्या त्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकाच्या जीवनावर मनन करतो तेव्हा आपण आपले जीवन कसे व्यतीत करत आहोत यावर विचार करण्यास प्रवृत्त होतो. असे केल्याने, आपल्या उरलेल्या आयुष्याचा सुज्ञपणे उपयोग करण्यासाठी आपल्या ध्येयांत काही फेरबदल करण्याची जाणीव आपल्याला होईल.—उप. १२:१.

भौतिक संपत्तीने आपण समाधानी होऊ का?

९. भौतिक संपत्ती मिळवण्याविषयी शलमोनाला काय जाणीव झाली?

शलमोनाने उपदेशकाचे पुस्तक लिहिले तेव्हा तो त्याच्या काळातल्या उच्चभ्रूंपैकी एक होता. (२ इति. ९:२२) त्याला हवे ते मिळवण्याची त्याची ऐपत होती. त्याने असे लिहिले: “माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही.” (उप. २:१०) तरीपण, केवळ भौतिक संपत्तीने आपण समाधानी होत नाही, हे त्याला जाणवले. त्याने असा निष्कर्ष काढला: “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही.”—उप. ५:१०.

१०. खरे समाधान व खरी संपत्ती आपण कशी प्राप्त करू शकतो?

१० धनसंपत्तीचे मूल्य क्षणिक असले तरी संपत्तीचे आकर्षण अतिशय प्रभावशाली असू शकते. अमेरिकेत अलिकडेच घेण्यात आलेल्या एका सर्व्हेत, विद्यापीठाच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्‍या ७५ टक्के विद्यार्थ्यांनी, “जीवनात सुखसंपन्‍न होण्याचे” आपले मुख्य ध्येय आहे असे सांगितले. या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य केले तरी, ते खरोखरच आनंदी होतील का? नाही. संशोधकांच्या पाहण्यात असे आले, की एखादी व्यक्‍ती जेव्हा भौतिक गोष्टींना आपल्या जीवनात मुख्य स्थान देते तेव्हा ती आनंदी व समाधानी होत नाही. शलमोनाने तर कैक वर्षांआधीच हा निष्कर्ष काढला होता. त्याने असे लिहिले: “मी सोन्यारुप्याचा आणि राजांजवळ असणाऱ्‍या . . . बहुमूल्य पदार्थांचा संचय केला; . . . तो पाहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता.” * (उप. २:८, ११) याउलट आपण जर यहोवाची पूर्ण मनाने सेवा करण्यासाठी आपले जीवन उपयोगात आणले तर आपण त्याचे आशीर्वाद आणि खरी संपत्ती प्राप्त करू.—नीतिसूत्रे १०:२२ वाचा.

कोणत्या कार्याने खरे समाधान मिळते?

११. कामाच्या महत्त्वाविषयी बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे?

११ येशूने म्हटले: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीहि काम करीत आहे.” (योहा. ५:१७) यहोवा आणि येशू या दोघांनाही कामातून समाधान मिळते, यात काही शंकाच नाही. सृष्टीच्या कार्यावर समाधान व्यक्‍त करताना यहोवाविषयी बायबल असे म्हणते: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्प. १:३१) देवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी पाहून देवदूतांनी “जयजयकार केला.” (ईयो. ३८:४-७) शलमोनाने देखील अर्थपूर्ण कामाचे महत्त्व जाणले.—उप. ३:१३.

१२, १३. (क) होसे व मीगल हे दोघे जण ईमानदारीने काम केल्याने मिळणारे समाधान कोणत्या शब्दांत व्यक्‍त करतात? (ख) नोकरीमुळे कधीकधी निराशा का येऊ शकते?

१२ अनेक लोकांना ईमानदारीने काम केल्याने मिळणाऱ्‍या समाधानाचे महत्त्व कळते. होसे एक चित्रकार आहे. तो म्हणतो: “तुमच्या मनात असलेले चित्र तुम्ही जेव्हा कागदावर उतरवता तेव्हा तुम्हाला, एक उंच डोंगर सर केल्यासारखे वाटते.” मीगल * एक पेशेवाईक व्यापारी आहे. तो म्हणतो: “काम केल्याने समाधान मिळते. यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता. शिवाय आपण काही तरी साध्य केले आहे याचेही समाधान आपल्याला मिळते.”

१३ दुसऱ्‍या बाजूला पाहता, पुष्कळ कामे रटाळ असतात; फार कमी कामांत, सर्जनशीलतेचा उपयोग करण्याची संधी असते. कधीकधी तर कामाचे ठिकाण किंवा सोबत काम करणाऱ्‍या लोकांकडून मिळणारी अन्यायी वागणूक नकोशी वाटते. शलमोनाने दाखवल्याप्रमाणे कधीकधी कामचुकार लोकांना वरच्या लोकांची चमचेगिरी केल्यामुळे कष्टाळू कामगाराला जितका मोबदला मिळतो तितकाच या कामचुकारांना आयताच मिळतो. (उप. २:२१) दुसऱ्‍या कारणांमुळेही निराशा येऊ शकते. सुरुवातीला चांगला नफा मिळवून देणारा बिजनेस, देशाची आर्थिकता ढासळल्यामुळे किंवा अनपेक्षित घटना घडल्यामुळे मंदावू शकतो. (उपदेशक ९:११ वाचा.) यशस्वी होण्याकरता रक्‍ताचे पाणी करणारी व्यक्‍ती चिडचिडी व निराश होते. आपण “वाऱ्‍यासाठी श्रम केले” असे तिला वाटू लागते.—उप. ५:१६, पं.र.भा.

१४. कोणत्या कामामुळे नेहमीच खरे समाधान मिळते?

१४ पण असे कोणते काम आहे का ज्यामुळे आपण कधीही निराश होत नाही? आधी उल्लेख केलेला होसे म्हणतो: “जसजशी वर्षे सरत जातात तसतशी रंगवलेली चित्रं हरवू शकतात किंवा खराब होऊ शकतात. पण देवाच्या सेवेत आपण करत असलेल्या कामाच्या बाबतीत असं होत नाही. सुवार्तेचा प्रचार करण्याविषयी यहोवानं दिलेल्या आज्ञेचं पालन करून मी देवाला भिऊन वागणारे ख्रिस्ती बनण्यास इतरांना मदत केली आहे. आणि त्यांना याचा फायदा कायमचा होतो. हे काम खरोखरच अगदी मौल्यवान आहे.” (१ करिंथ. ३:९-११) मीगलचेही हेच म्हणणे आहे, की नोकरीपेक्षा राज्याच्या संदेशाचा प्रचार केल्याने आपल्याला खूप समाधान मिळते. तो म्हणतो: “तुम्ही जेव्हा एखाद्याला बायबलमधील सत्य सांगता आणि ते सत्य त्या व्यक्‍तीच्या हृदयाला स्पर्श झाल्याचं पाहता तेव्हा तुम्हाला जो आनंद होतो तो आनंद निराळाच!”

“आपले अन्‍न जलाशयावर सोड”

१५. जीवन कशामुळे खरोखर समाधानी होते?

१५ थोडक्यात, जीवन कशामुळे खरोखर समाधानी होते? या व्यवस्थीकरणात आपण जर आपल्याजवळ असलेला अल्प वेळ चांगली कामे करण्यास व यहोवाला संतुष्ट करण्यास वापरला तर आपल्याला खरे समाधान मिळेल. यहोवा देवाबरोबर निकटचा संबंध जोडून आपण आपल्या मुलांना बायबलमधील तत्त्वे शिकवू शकतो, इतरांना यहोवाविषयी जाणून घ्यायला मदत करू शकतो आणि आपल्या बंधूभगिनींबरोबर कायमची मैत्री जोडू शकतो. (गलती. ६:१०) या सर्व प्रयत्नांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही आणि जे असे प्रयत्न करतात त्यांना आशीर्वाद मिळतील. चांगली कामे करण्याच्या महत्त्वाचे वर्णन करताना शलमोनाने एक अतिशय रोचक तुलना केली. तो म्हणाला: “आपले अन्‍न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल.” (उप. ११:१) येशूने आपल्या शिष्यांना असे आर्जवले: “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल.” (लूक ६:३८) शिवाय यहोवा देव स्वतः, जे इतरांसाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांना प्रतिफळ देण्याचे वचन देतो.—नीति. १९:१७; इब्री लोकांस ६:१० वाचा.

१६. आपण आपल्या जीवनाचा उपयोग कसा करणार आहोत याबद्दलचा निर्णय केव्हा घेतला पाहिजे?

१६ आपण आपल्या जीवनाचा उपयोग कसा करणार आहोत याबद्दलचा सुज्ञ निर्णय तरुण वयातच घेण्यास बायबल आपल्याला आर्जवते. असे जर आपण केले तर नंतरच्या वर्षांत आपण निराश होणार नाही. (उप. १२:१) जगातली आकर्षणे मिळवण्यात आपल्या जीवनाची सर्वोत्तम वर्षे वाया घालवल्यानंतर, आपण तर निव्वळ वाऱ्‍यामागे धावत होतो अशी जेव्हा आपल्याला जाणीव होईल तेव्हा याचे किती दुःख होईल!

१७. कोणती गोष्ट तुम्हाला जीवनातला सर्वोत्तम मार्ग निवडण्यास मदत करू शकेल?

१७ कोणत्याही प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवाची सुद्धा हीच इच्छा आहे, की आपण जीवनाचा उपभोग घ्यावा, चांगल्या गोष्टी कराव्यात आणि अनावश्‍यक दुःख टाळावे. (उप. ११:९, १०) कोणती गोष्ट तुम्हाला असे करण्यास मदत करेल? देवाच्या सेवेत वाढ करण्याच्या संबंधाने ध्येये ठेवा आणि मग ही ध्येये मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करा. जवळजवळ २० वर्षांपूर्वी, काव्यरला दोन गोष्टींमध्ये निवड करायची होती. वैद्यकीय क्षेत्रात लठ्ठ पगाराची नोकरी करायची की पूर्ण वेळेची सेवा करायची. “डॉक्टरचं काम तसं समाधानकारक काम असू शकतं. पण, लोकांना सत्य शिकवण्यात मला जो आनंद मिळतो त्याची तुलना कशासोबतही होत नाही. पूर्ण वेळेच्या सेवेमुळे मी माझं जीवन पूर्णार्थाने उपभोगू शकतो. मी या सेवेला लवकर का सुरुवात केली नाही, याचीच मला खंत वाटते.”

१८. पृथ्वीवरील येशूचे जीवन समाधानी का बनले?

१८ तेव्हा, सर्वात मौल्यवान असलेली कोणती गोष्ट मिळवण्यास आपण झटले पाहिजे? उपदेशक पुस्तकात म्हटले आहे: “सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.” (उप. ७:१) येशूचे जीवन या गोष्टीचे ज्वलंत उदाहरण आहे. त्याने यहोवासमोर एक उल्लेखनीय नाव कमवले. शेवटच्या घटकेपर्यंत विश्‍वासू राहून येशूने आपल्या पित्याचे सार्वभौमत्व उंचावून खंडणी बलिदान दिले ज्यामुळे आपल्याकरता तारणाचा मार्ग खुला झाला. (मत्त. २०:२८) पृथ्वीवरील त्याच्या अल्प कालावधीत त्याने खरोखर समाधानी जीवनाचे एक उत्तम उदाहरण मांडले. या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा आपण सर्व जण प्रयत्न करत आहोत.—१ करिंथ. ११:१; १ पेत्र २:२१.

१९. शलमोनाने कोणता सुज्ञ सल्ला दिला?

१९ आपणही यहोवाच्या नजरेत उत्तम नाव कमवू शकतो. हे नाव धनसंपत्ती पेक्षा कितीतरी पटीने अधिक मौल्यवान आहे. (मत्तय ६:१९-२१ वाचा.) यहोवाच्या नजरेत ज्या गोष्टी उत्तम आहेत त्या करण्यासाठी आपण दररोज वेगवेगळे मार्ग शोधू शकतो. यामुळे आपले जीवन समाधानी होऊ शकेल. जसे की, आपण इतरांना सुवार्तेचा प्रचार करू शकतो, आपले वैवाहिक व कौटुंबिक बंधन आणखी मजबूत करू शकतो आणि व्यक्‍तिगत अभ्यास तसेच सभांना उपस्थित राहून यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी घनिष्ठ करू शकतो. (उप. ११:६; इब्री १३:१६) तेव्हा, खरोखर समाधानी जीवन तुम्हाला उपभोगायला आवडेल का? असल्यास, शलमोनाने दिलेल्या पुढील सल्ल्याचे पालन करत राहा: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उप. १२:१३.

[तळटीपा]

^ परि. 10 शलमोनाला दर वर्षी २२,००० किलोपेक्षा अधिक सोने मिळत होते.—२ इति. ९:१३.

^ परि. 12 नाव बदलण्यात आले आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपण आपले जीवन कसे व्यतीत करत आहोत यावर विचार करण्यास कोणत्या गोष्टीने आपण प्रवृत्त होऊ?

• सुखविलास आणि धनसंपत्ती यांच्या मागे धावणे हे कशाच्या मागे धावण्यासारखे आहे?

• कोणत्या कामामुळे आपल्याला कायमचे समाधान मिळू शकेल?

• सर्वात मौल्यवान असलेली कोणती गोष्ट मिळवण्यास आपण झटले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

करमणुकीला आपल्या जीवनात कोणते स्थान असले पाहिजे?

[२४ पानांवरील चित्र]

प्रचार कार्य अतिशय समाधानकारक कार्य केव्हा बनते?