व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा

तरुणांनो, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा

तरुणांनो, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा

“तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उप. १२:१.

१. यहोवा आपल्या तरुण उपासकांविषयी भरवसा कसा व्यक्‍त करतो?

यहोवाच्या दृष्टीत ख्रिस्ती तरुण मौल्यवान आणि दवबिंदूंप्रमाणे आल्हाददायक आहेत. त्याच्या पुत्राच्या ‘पराक्रमाच्या’ दिवशी अनेक तरुण ख्रिस्ताच्या सेवेकरता ‘संतोषाने पुढे होतील’ असे त्याने भाकीतही केले होते. (स्तो. ११०:३) ही भविष्यवाणी आपल्या काळाविषयी करण्यात आली होती. आज बहुसंख्य लोक अधर्मी झाले आहेत. ते केवळ आपल्या स्वार्थाच्या व पैशाच्या मागे लागले आहेत. ते देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करतात. तरीसुद्धा, आपली उपासना करणारे तरुण अशा लोकांपेक्षा वेगळे असतील हे यहोवाला माहीत होते. तरुणांनो, यहोवाला तुमच्यावर केवढा भरवसा आहे!

२. यहोवाला स्मरण्याचा काय अर्थ होतो?

तरुण जन यहोवाला म्हणजेच आपल्या निर्माणकर्त्याला स्मरतात हे पाहून त्याला किती आनंद होत असेल याची कल्पना करा! (उप. १२:१) पण फक्‍त यहोवाचा विचार मनात आणणे म्हणजे त्याला स्मरणे नव्हे. तर आपण त्याला स्मरतो हे आपल्या कृतींतून दिसून आले पाहिजे. आपण त्याला जे आवडते ते केले पाहिजे. त्याच्या नियमांचे व तत्त्वांचे दैनंदिन जीवनात पालन केले पाहिजे. तसेच, यहोवाला आपण स्मरतो याचा अर्थ आपण त्याच्यावर भरवसा ठेवतो. तो जे काही सांगतो ते आपल्या भल्याकरताच आहे याची आपल्याला खात्री असते. (स्तो. ३७:३; यश. ४८:१७, १८) तरुणांनो, तुम्हाला तुमच्या निर्माणकर्त्याविषयी असेच वाटते का?

‘अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेवा’

३, ४. यहोवावर भरवसा असल्याचे येशूने कसे दाखवले आणि आज यहोवावर भरवसा ठेवणे का महत्त्वाचे आहे?

देवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांपैकी सर्वात उत्तम उदाहरण, अर्थातच येशू ख्रिस्ताचे आहे. त्याने आपल्या जीवनात नीतिसूत्रे ३:५, ६ यातील शब्दांचे तंतोतंत पालन केले: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर लगेचच, सैतानाने जगिक सत्ता व वैभवाचे आमीष दाखवून त्याला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. (लूक ४:३-१३) पण येशू त्याच्या बहकाव्यात आला नाही. कारण त्याला माहीत होते की खरे “धन, सन्मान व जीवन” हे “नम्रता व परमेश्‍वराचे भय” बाळगल्यानेच प्राप्त होते.—नीति. २२:४.

आजच्या जगातील लोकांना लोभी व स्वार्थी वृत्तीने झपाटले आहे. अशा वातावरणात, आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणेच सुज्ञपणाचे ठरेल. जीवनाकडे नेणाऱ्‍या संकोचित मार्गावर चालण्यापासून यहोवाच्या सेवकांना परावृत्त करण्यासाठी सैतान कोणत्याही थराला जाऊ शकतो हे आठवणीत ठेवा. सर्वांनी नाशाकडे नेणाऱ्‍या पसरट मार्गावर चालावे असे त्याला वाटते. सैतानाच्या फसवणुकीला बळी पडू नका! त्याऐवजी, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरत राहण्याचा दृढनिश्‍चय करा. त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवा आणि ‘खऱ्‍या जीवनावरील’ आपली पकड मजबूत करा. ते खरे जीवन तुम्हाला खात्रीने आणि फार लवकरच मिळणार आहे.—१ तीम. ६:१९.

तरुणांनो, सुज्ञतेने वागा

५. या जगाच्या भविष्याविषयी तुम्हाला काय वाटते?

निर्माणकर्त्याला स्मरणारे तरुण आपल्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा सुज्ञ असतात. (स्तोत्र ११९:९९, १०० वाचा.) याचे कारण म्हणजे, ते देवाच्या दृष्टिकोनाने विचार करतात. हे जग लवकरच नाहीसे होणार आहे हे त्यांना माहीत आहे. भविष्याविषयी लोकांची चिंता व भीती कशा प्रकारे वाढत गेली आहे हे तुमच्या लहान वयातही तुम्ही नक्कीच पाहिले असेल. प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड आणि यांसारख्या इतर समस्यांविषयीही तुम्ही ऐकलेच असेल. या जागतिक पातळीच्या समस्यांविषयी बऱ्‍याच लोकांना चिंता वाटते. पण या सर्व घडामोडी सैतानाच्या जगाचा अंत जवळ आल्याची चिन्हे आहेत, हे केवळ यहोवाच्या साक्षीदारांना पूर्णपणे समजले आहे.—प्रक. ११:१८.

६. काही तरुण कशा प्रकारे फसले आहेत?

पण खेदाने म्हणावे लागते की देवाच्या तरुण सेवकांपैकी काहींनी, हे जग शेवटच्या घटका मोजत आहे हे विसरून, ‘जे होईल ते पाहून घेऊ’ अशी बेफिकीर मनोवृत्ती स्वीकारली आहे. (२ पेत्र ३:३, ४) इतर जण वाईट संगती व पोर्नोग्राफी यांस बळी पडून गंभीर पाप करून बसले आहेत. (नीति. १३:२०) आज, अंताच्या इतक्या जवळ येऊन पोचल्यानंतर देवाची मर्जी गमावून बसणे किती दुःखदायक ठरेल! त्याऐवजी सा.यु.पू. १४७३ साली इस्राएली लोकांच्या बाबतीत जे घडले त्यावरून धडा घ्या. त्या वेळी त्यांनी मवाबाच्या मैदानात तळ दिला होता आणि ते प्रतिज्ञात देशाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोचले होते. त्याप्रसंगी काय घडले, तुम्हाला आठवते का?

अंतिम रेषेपर्यंत येऊनही ते इनामास मुकले

७, ८. (क) सैतानाने इस्राएली लोकांना कशा प्रकारे भुलवले? (ख) आज सैतान देवाच्या लोकांना कोणत्या पाशात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे?

सैतान कसेही करून इस्राएली लोकांना त्यांचे प्रतिज्ञात वतन मिळवण्यापासून अडवू इच्छित होता हे तर उघडच आहे. संदेष्टा बलाम याच्याकरवी त्यांना शाप देण्याची कुयुक्‍ती फसली, तेव्हा सैतानाने जणू पाठीमागून वार करायचे ठरवले. यहोवाचे नियम तोडल्यामुळे हे लोक त्याच्या मर्जीतून उतरले तर यहोवा स्वतःच त्यांना आशीर्वाद देणार नाही असा आडाखा बांधून, सैतानाने मवाबाच्या मोहक स्त्रियांसोबत दुष्कर्म करण्यास इस्राएली लोकांना भुलवले. यावेळी मात्र दियाबलाची कुयुक्‍ती काही प्रमाणात का होईना, पण यशस्वी ठरली. लोक मवाबाच्या कन्यांशी व्यभिचार करू लागले आणि बआलपौराला नमन करू लागले. यामुळे अतिशय अनर्थकारी परिणाम घडले. इतकी वर्षे ज्याची वाट पाहिली होती त्या प्रतिज्ञात देशाच्या अगदी जवळ आले असताना, सुमारे २४,००० इस्राएली लोक आपल्या प्राणास मुकले!—गण. २५:१-३, ९.

आज आपण कैक पटीने चांगल्या अशा एका प्रतिज्ञात देशाच्या जवळ आलो आहोत. अर्थात, देवाचे नवे जग. सैतान आजही बदललेला नाही. आजही तो देवाच्या लोकांना लैंगिक अनैतिकतेच्या पाशात अडकवण्यास प्रयत्नशील आहे. आजच्या जगातील नैतिक स्तर इतक्या खालच्या थराला पोचले आहेत, की अविवाहित व्यक्‍तींमधील लैंगिक संबंध व समलिंगी संबंध यांत काहीही गैर नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे असे मानले जाते. एका ख्रिस्ती बहिणीने म्हटले: “समलिंगी संबंध आणि विवाहबाह्‍य लैंगिक संबंध देवाच्या नजरेत वाईट आहेत हे माझ्या मुलांना फक्‍त घरी व राज्य सभागृहातच शिकायला मिळतं.”

९. ऐन तारुण्यात काय घडू शकते आणि तरुण या समस्येवर कशा प्रकारे मात करू शकतात?

स्त्रीपुरुषांतील लैंगिक संबंध एका नव्या जिवाच्या उत्पत्तीशी निगडीत असल्यामुळे, ही देवाकडील पवित्र देणगी आहे असे म्हणता येईल. निर्माणकर्त्याला स्मरणाऱ्‍या तरुणांना हे माहीत असल्यामुळेच, लैंगिक संबंधांचा उपभोग देवाच्या वचनाप्रमाणे केवळ पती व पत्नीच घेऊ शकतात हेही ते जाणतात. (इब्री १३:४) पण ऐन तारुण्यात लैंगिक भावना अतिशय तीव्र असल्यामुळे एका व्यक्‍तीला तारतम्याने विचार करणे कठीण जाते. त्यामुळे नैतिक दृष्ट्या निष्कलंक राहण्याकरता तरुणांना अक्षरशः संघर्ष करावा लागू शकतो. तुमच्या मनात अनुचित विचार येतात तेव्हा तुम्ही काय करू शकता? चांगल्या, शुद्ध गोष्टींवर मन लावण्यास साहाय्य करण्याची यहोवाला कळकळीने विनंती करा. जे प्रामाणिक अंतःकरणाने यहोवाला प्रार्थना करतात त्यांच्याकडे तो कधीही दुर्लक्ष करत नाही. (लूक ११:९-१३ वाचा.) प्रार्थनेसोबतच, शुद्ध व उभारणीकारक विषयांवरील संभाषणही तुम्हाला आपल्या मनातून अशुद्ध विचार काढून टाकण्यास साहाय्यक ठरू शकते.

सुज्ञपणे जीवनातील ध्येये निवडा

१०. आपण कशा प्रकारची विचारसरणी टाळली पाहिजे, आणि स्वतःला आपण कोणते प्रश्‍न विचारावेत?

१० आजच्या जगात बहुतेक तरुण कोणतेही नीतिनियम न जुमानता केवळ चैनबाजीत मग्न आहेत याचे एक कारण म्हणजे, त्यांना देवाचे मार्गदर्शन नाही व भविष्याकरता त्यांना कोणतीही आशा नाही. ते यशयाच्या काळातील, देवाला विसरलेल्या आणि जीवनात “आनंद व हर्ष, . . . मांस खाणे व द्राक्षारस पिणे” एवढाच हेतू असलेल्या इस्राएली लोकांप्रमाणे आहेत. (यश. २२:१३) अशा लोकांचा हेवा करण्याऐवजी, आपण यहोवाने त्याच्या विश्‍वासू सेवकांना दिलेल्या अद्‌भुत आशेविषयी मनन करू नये का? देवाच्या तरुण सेवकांपैकी असल्यास, तुम्ही त्या नव्या जगाची उत्सुकतेने वाट पाहत आहात का? ‘धन्य आशाप्राप्तीची वाट पाहत मर्यादेने वागण्याचा’ तुम्ही मनापासून प्रयत्न करता का? (तीत २:१२, १३) तुमच्या जीवनात तुम्ही कोणती ध्येये निवडता आणि कोणत्या गोष्टींना महत्त्व देता हे यावरच अवलंबून आहे.

११. अद्याप शालेय शिक्षण सुरू असलेल्या ख्रिस्ती तरुणांनी मेहनतीने अभ्यास का केला पाहिजे?

११ हे जग तरुणांना व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवण्याकरता आपली शक्‍ती पणाला लावण्याचे प्रोत्साहन देते. अर्थात, तुमचे शालेय शिक्षण अद्याप पूर्ण झाले नसल्यास, तुम्ही मेहनतीने अभ्यास करून आवश्‍यक शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण पुढे तुम्हाला स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासोबतच, ख्रिस्ती मंडळीचा एक उपयोगी सदस्य आणि परिणामकारक राज्य प्रचारकही व्हायचे आहे. यासाठी तुम्हाला आपले विचार स्पष्टपणे व्यक्‍त करता आले पाहिजेत, तर्कशुद्ध रीतीने विचार करता आला पाहिजे तसेच, आपले विचार इतरांना संयमीपणे व आदरपूर्वक पटवून देता आले पाहिजेत. जे बायबलचा अभ्यास करतात व त्यातील तत्त्वांचा जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न करतात अशा तरुणांना सर्वात उत्तम प्रकारचे शिक्षण मिळते. तसेच, ते एका यशस्वी व सार्वकालिक भविष्याकडे वाटचाल करण्यास सुरुवात करतात.—स्तोत्र १:१-३ वाचा. *

१२. ख्रिस्ती कुटुंबांनी कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे?

१२ इस्राएलात आईवडीलच मुलांना शिक्षण देत असत. आणि आपल्या मुलांना शिक्षण देणे हे त्यांच्या दृष्टीत खूप महत्त्वाचे होते. या शिक्षणात, जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींचा, विशेषतः उपासनेशी संबंधित विषयांचा समावेश होता. (अनु. ६:६, ७) त्यामुळे, आपल्या आईवडिलांचे व इतर देवभीरू वडिलधाऱ्‍यांचे ऐकल्यामुळे, इस्राएलातील लहान मुलांना केवळ ज्ञानच नव्हे, तर सुज्ञता, चातुर्य, विवेक व चाणाक्षपण यांसारखे दुर्मिळ गुणही आत्मसात करता येत होते. (नीति. १:२-४; २:१-५, ११-१५) आज ख्रिस्ती कुटुंबांनीही शिक्षणाकडे अशाच प्रकारे लक्ष दिले पाहिजे.

तुम्ही कोणाचे ऐकावे?

१३. काही तरुणांना कशा प्रकारचा सल्ला मिळतो आणि हा सल्ला स्वीकारण्याबाबत त्यांनी सावध का राहिले पाहिजे?

१३ तरुणांना सल्ला देणारे बरेच जण असतात, उदाहरणार्थ शिक्षक किंवा समुपदेशक. हे लोक सहसा फक्‍त व्यावसायिक क्षेत्रातील यशाच्या दृष्टिकोनातूनच विचार करत असतात. कृपया तुम्हाला मिळणाऱ्‍या सर्व सल्ल्यांविषयी प्रार्थनापूर्वक विचार करा. आणि देवाच्या वचनातील तसेच विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांतील माहितीशी त्याची तुलना करून, मगच निर्णय घ्या. कमी अनुभव असलेल्या तरुणांवर सैतानाचा विशेषतः डोळा आहे हे बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला माहीतच आहे. उदाहरणार्थ, एदेन बागेतही आदामापेक्षा कमी अनुभव असलेल्या हव्वेने सैतानाचे ऐकले. खरे पाहता, सैतानाला ती ओळखतही नव्हती आणि त्याने कोणत्याही प्रकारे तिच्याबद्दल प्रेम किंवा काळजी व्यक्‍त केली नव्हती. दुसरीकडे पाहता, यहोवाने आपले प्रेम कितीतरी गोष्टींतून व्यक्‍त केले होते. तिने यहोवाचे ऐकले असते तर किती बरे झाले असते!—उत्प. ३:१-६.

१४. आपण यहोवाचे तसेच सत्यात असलेल्या आईवडिलांचे का ऐकावे?

१४ निर्माणकर्त्याचे तुमच्यावरही प्रेम आहे आणि त्याचे प्रेम निष्कपट व निःस्वार्थ आहे. तुम्ही फक्‍त सध्याच्या काळातच नव्हे तर सर्वदा आनंदी राहावे असे त्याला वाटते. म्हणूनच, आईवडिलांनी प्रेमळपणे आपल्या मुलाला म्हणावे, तसे तो तुम्हाला आणि त्याची उपासना करणाऱ्‍या सर्वांनाच असे म्हणतो: “हाच मार्ग आहे; याने चला.” (यश. ३०:२१) तुमचे आईवडील सत्यात असतील आणि ते यहोवावर मनापासून प्रेम करत असतील तर तुम्हाला एक विशेष आशीर्वाद मिळाला आहे असे समजा! जीवनातील ध्येयांची निवड करताना त्यांचा सल्ला आदरपूर्वक ऐका. (नीति. १:८, ९) कारण तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. आणि ते जीवन जगातील धनसंपत्ती किंवा मानमरातबापेक्षा निश्‍चितच कितीतरी पटीने मौल्यवान आहे.—मत्त. १६:२६.

१५, १६. (क) आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो? (ख) बारूखच्या अनुभवातून आपण कोणता महत्त्वाचा धडा घेऊ शकतो?

१५ निर्माणकर्त्याला स्मरणारे आपली राहणी साधी ठेवतात. यहोवा आपल्याला कधीही ‘सोडणार नाही’ किंवा ‘टाकणार नाही’ याची त्यांना खात्री असते. (इब्री लोकांस १३:५ वाचा.) अशा प्रकारची हितकारक मनोवृत्ती जगिक विचारसरणीशी जुळत नसल्यामुळे, या जगातील लोकांच्या मनोवृत्तीचा आपल्यावर प्रभाव पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. (इफिस. २:२) याबाबतीत, सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेमचा विनाश होण्याआधीच्या बिकट काळात राहणाऱ्‍या बारूखचे, अर्थात यिर्मयाच्या लेखनिकाचे उदाहरण विचारात घ्या.

१६ कदाचित बारूखला जीवनातील सर्व सुखसोयी मिळवण्याची इच्छा असावी. हे पाहून यहोवाने प्रेमळपणे बारूखला ‘मोठाल्या गोष्टींमागे’ न लागण्याचा सल्ला दिला. बारूखने नम्रपणे व सुज्ञपणे यहोवाचे ऐकले आणि यामुळे तो जेरूसलेमच्या नाशातून सुखरूप बचावला. (यिर्म. ४५:२-५) पण बारूखच्या काळातील इतर लोकांनी यहोवाच्या उपासनेला जीवनात दुय्यम स्थान देऊन ‘मोठाल्या गोष्टी’ मिळवल्या खऱ्‍या; पण लवकरच खास्द्यांनी (बॅबिलोनी लोकांनी) जेरूसलेमवर हल्ला केला तेव्हा त्यांनी आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व गमावले. बऱ्‍याच जणांनी आपला जीवही गमावला. (२ इति. ३६:१५-१८) बारूखचा अनुभव आपल्याला याची जाणीव करून देतो की या जगातील धनसंपत्ती व प्रतिष्ठेपेक्षा देवासोबतचा आपला चांगला नातेसंबंध केव्हाही जास्त महत्त्वाचा आहे.

अनुकरण करण्याजोगी उदाहरणे

१७. येशू, पौल व तीमथ्य यांची उदाहरणे यहोवाच्या सेवकांकरता अनुकरण करण्याजोगी का आहेत?

१७ जीवनात यशस्वीरित्या वाटचाल करण्यास साहाय्य करू शकतील, अशी अनेक अनुकरणीय उदाहरणे आपल्याला देवाच्या वचनात सापडतात. येशूचेच उदाहरण घ्या. तो सर्वगुणसंपन्‍न होता. तरीसुद्धा, लोकांना सार्वकालिक लाभ होऊ शकेल अशा कार्याला अर्थात, ‘राज्याच्या सुवार्तेच्या’ प्रसाराला त्याने स्वतःला वाहून घेतले. (लूक ४:४३) पौलानेही, यहोवाची जिवेभावे सेवा करण्याच्या इच्छेने एका अत्यंत लाभप्रद व्यवसायाकडे पाठ फिरवली. ‘विश्‍वासातील खरे लेकरू’ तीमथ्य, याने पौलाचा कित्ता गिरवला. (१ तीम. १:१) येशू, पौल व तीमथ्य यांनी पत्करलेल्या मार्गाचा त्यांना कधी पस्तावा वाटला का? मुळीच नाही! किंबहुना, देवाची सेवा करण्याच्या बहुमानाच्या तुलनेत, जगातल्या सर्व गोष्टी “केरकचरा” आहेत, असे पौलाने म्हटले.—फिलिप्पै. ३:८-११.

१८. एका तरुण बांधवाने आपल्या जीवनात कशा प्रकारे मोठे फेरबदल केले आणि त्याला याविषयी पस्तावा का होत नाही?

१८ कित्येक तरुण ख्रिस्ती आज येशू, पौल व तीमथ्य यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. उदाहरणार्थ, एक तरुण बांधव ज्याने भरपूर पगाराची नोकरी सोडून दिली, त्याने असे लिहिले: “बायबलमधील तत्त्वांचे मी जीवनात पालन करत असल्यामुळे मला भराभर बढती मिळत गेली. पण इतका पैसा हातात येऊनही, हे सगळं वाऱ्‍यामागे धावण्यासारखं आहे असं मला वाटे. मी कंपनीच्या वरिष्ठांकडे जाऊन पूर्ण वेळेची सेवा करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं, तेव्हा त्यांनी लगेच माझ्या पगारात बरीच वाढ करण्याचं आश्‍वासन दिलं. त्यांना वाटलं की कदाचित हे ऐकून मी आपला विचार बदलेन. पण माझा निर्णय पक्का होता. मी इतकी चांगली नोकरी सोडून पूर्ण वेळेची सेवा का सुरू केली, याचं बऱ्‍याच लोकांना आश्‍चर्य वाटलं. मला विचाराल, तर मी हेच म्हणेन की देवाला केलेले समर्पण पूर्ण करण्याची मला इच्छा असल्यामुळेच मी हे पाऊल उचललं. आज माझ्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना अव्वल स्थान आहे. यामुळे मला जो आनंद आणि जे समाधान मिळालं आहे, ते अमाप पैसा व प्रतिष्ठा प्राप्त करूनही मिळू शकलं नसतं.”

१९. तरुणांना कोणता सुज्ञ निर्णय घेण्याचे प्रोत्साहन दिले जाते?

१९ सबंध जगात, हजारो तरुणांनी अशा प्रकारे सुज्ञ निर्णय घेतले आहेत. तेव्हा तरुणांनो, भविष्याविषयी कोणत्याही योजना करताना यहोवाचा दिवस किती जवळ आला आहे हे आठवणीत ठेवा. (२ पेत्र ३:११, १२) या जगात ज्यांची भरभराट होत आहे, त्यांचा हेवा करू नका. त्याऐवजी, तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्‍यांचे ऐका. ‘स्वर्गात संपत्ति साठवणे’ हीच सर्वात सुरक्षित व सार्वकालिक फायदा मिळवून देणारी एकमेव गुंतवणूक आहे. (मत्तय ६:१९, २०; १ योहान २:१५-१७ वाचा.) तर मग, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा. असे केल्यास, यहोवा निश्‍चितच तुम्हाला अनेक आशीर्वाद देईल.

[तळटीप]

^ परि. 11 उच्च शिक्षण आणि नोकरी-व्यवसाय याविषयीच्या माहितीकरता, टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००५ अंकातील, पृष्ठे २६-३१ पाहावे.

तुम्हाला आठवते का?

• देवावर आपला भरवसा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

• कोणत्या शिक्षणास सर्वात उत्तम शिक्षण म्हणता येईल?

• बारूखच्या अनुभवावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

• कोणाची उदाहरणे अनुकरण करण्याजोगी आहेत आणि का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्रे]

यहोवा सर्वात उत्तम प्रकारचे शिक्षण पुरवतो

[१५ पानांवरील चित्र]

बारूखने यहोवाचे ऐकल्यामुळे तो जेरूसलेमच्या नाशातून सुखरूप बचावला. त्याच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळते?