व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘निरर्थक गोष्टींचा’ अव्हेर करा

‘निरर्थक गोष्टींचा’ अव्हेर करा

‘निरर्थक गोष्टींचा’ अव्हेर करा

“जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय.”—नीति. १२:११.

१. आपल्याजवळ कोणकोणत्या मौल्यवान गोष्टी असू शकतात आणि त्यांचा उपयोग करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?

मौल्यवान म्हणता येतील अशा अनेक गोष्टी आपल्या सर्वांजवळ असतात. उदाहरणार्थ चांगले आरोग्य, शारीरिक ताकद, कुशाग्र बुद्धी किंवा आर्थिक साधनसंपत्ती. यहोवावर प्रेम असल्यामुळे आपल्याजवळ असणाऱ्‍या या मौल्यवान गोष्टींचा त्याच्या सेवेकरता उपयोग करण्यास आपल्याला आनंदच होतो. असे करण्याद्वारे, “आपल्या द्रव्याने [“मौल्यवान गोष्टींनी,” NW] परमेश्‍वराचा सन्मान कर” या देवप्रेरित आज्ञेचे आपण पालन करतो.—नीति. ३:९.

२. निरर्थक गोष्टींविषयी बायबल काय ताकीद देते आणि ही ताकीद कशी खरी ठरते?

मौल्यवान गोष्टींसोबतच बायबल काही निरर्थक गोष्टींचाही उल्लेख करते आणि या निरर्थक म्हणजेच निरुपयोगी गोष्टी मिळवण्याकरता आपण आपली साधनसंपत्ती वाया घालवू नये अशी ताकीद देते. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे १२:११ यात असे म्हटले आहे: “जो आपले शेत स्वतः करितो त्याला भरपूर अन्‍न मिळते, परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय.” या नीतिसूत्राचे तात्पर्य उघडच आहे. जर एखादा माणूस आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याकरता कष्ट करत असेल, तर साहजिकच त्याच्या कुटुंबाला कशाचीही कमी पडणार नाही. (१ तीम. ५:८) पण जर तो निरर्थक गोष्टींमागे लागून आपली साधनसंपत्ती वाया घालवत असेल, तर तो “अक्कलशून्य” ठरेल. मूळ इब्री भाषेत या ठिकाणी वापरलेल्या शब्दाचा असा अर्थ होतो की या मनुष्याजवळ चांगले निर्णय घेण्याची क्षमता नाही व त्याचे हेतू नेक नाहीत. असा माणूस अन्‍नास मोताद झाल्यास आश्‍चर्य वाटू नये.

३. निरर्थक गोष्टींसंबंधी बायबलमध्ये दिलेली ताकीद आपल्या उपासनेला कशी लागू होते?

नीतिसूत्रे १२:११ यातील तत्त्व आपल्या उपासनेलाही लागू करता येईल. ते कसे? जो ख्रिस्ती परीश्रमपूर्वक व विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करतो त्याला खरी सुरक्षितता अनुभवता येते. आता तर त्याला देवाचे आशीर्वाद मिळतातच, पण भविष्याचीही त्याला पक्की आशा आहे. (मत्त. ६:३३; १ तीम. ४:१०) पण जो ख्रिस्ती यहोवाच्या सेवेऐवजी निरर्थक गोष्टींच्या नादी लागतो तो यहोवासोबतचा आपला चांगला नातेसंबंध तसेच सार्वकालिक जीवनाची आशाही धोक्यात घालतो. आपल्या बाबतीत असे घडू नये म्हणून आपण काय केले पाहिजे? आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी “निरर्थक” आहेत हे ओळखून आपण त्या गोष्टींचा अव्हेर करण्याचा निश्‍चय केला पाहिजे.—तीत २:११, १२ वाचा.

४. कोणत्या गोष्टींना निरर्थक म्हणता येईल?

तर मग, कोणत्या गोष्टींना निरर्थक म्हणता येईल? ढोबळमानाने, जी गोष्ट यहोवाची मनोभावे सेवा करण्यापासून आपले लक्ष विचलित करते अशी कोणतीही गोष्ट निरर्थकच आहे. उदाहरणार्थ, निरनिराळ्या प्रकारचे मनोरंजन. अर्थात, मनोरंजन आवश्‍यक आहे याबद्दल वाद नाही. पण, आध्यात्मिक कार्यांकडे दुर्लक्ष करून जेव्हा “मौजमजा” करण्यातच आपण खूप जास्त वेळ घालवतो, तेव्हा मनोरंजनही निरर्थक ठरते. कारण त्यामुळे आपल्या आध्यात्मिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (उप. २:२४; ४:६) असे घडू नये म्हणून, ख्रिस्ती या नात्याने आपण जीवनात समतोल साधला पाहिजे. आपला मौल्यवान वेळ आपण कशा प्रकारे खर्च करतो याचे आपण डोळसपणे परीक्षण केले पाहिजे. (इफिसकर ५:१५, १६ वाचा.) पण, मनोरंजनापेक्षा जास्त हानीकारक ठरू शकतील अशा निरर्थक अथवा निरुपयोगी गोष्टींचाही बायबलमध्ये उल्लेख आढळतो. यांपैकी एक म्हणजे खोटी दैवते.

निरुपयोगी दैवतांचा अव्हेर करा

५. बायबलमध्ये “निरुपयोगी” हा शब्द बरेचदा कशाच्या संदर्भात वापरण्यात आला आहे?

बायबलमध्ये खोट्या दैवतांना “निरुपयोगी” म्हणण्यात आले आहे. उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएल राष्ट्राला असे म्हटले: “तुम्ही आपणासाठी मूर्ति [“निरुपयोगी दैवते,” NW] करू नयेत; त्याचप्रमाणे कोरीव मूर्ति अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृति कोरिलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये कारण मी परमेश्‍वर तुमचा देव आहे.” (लेवी. २६:१) दावीद राजाने असे लिहिले: “परमेश्‍वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्‍वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.”—१ इति. १६:२५, २६.

६. खोटी दैवते निरुपयोगी का आहेत?

दाविदाने म्हटल्याप्रमाणे यहोवाच्या महानतेचा पुरावा आपल्याला सर्वत्र दिसून येतो. (स्तो. १३९:१४; १४८:१-१०) अशा या महान यहोवा देवाने इस्राएली लोकांशी करार बांधला, हा त्यांच्याकरता किती मोठा बहुमान होता! पण या लोकांनी यहोवाकडे पाठ फिरवून, हाताने कोरलेल्या मूर्तींपुढे व स्तंभांपुढे माथे टेकण्याचा मूर्खपणा केला! त्यांच्यावर संकटे आली तेव्हा त्यांची ही खोटी दैवते खरोखरच निरुपयोगी असल्याचे सिद्ध झाले. कारण आपल्या उपासकांना तर सोडाच, पण स्वतःलाही वाचवण्यास ही दैवते असमर्थ ठरली.—शास्ते १०:१४, १५; यश. ४६:५-७.

७, ८. ‘धन’ कशा प्रकारे देवाचे स्थान घेऊ शकते?

आजही बऱ्‍याच देशांत लोक हाताने बनवलेल्या मूर्तींची पूजा करतात. ही दैवते इस्राएलाच्या काळात जितकी निरुपयोगी होती तितकीच आजही आहेत. (१ योहा. ५:२१) पण बायबलमध्ये मूर्तींव्यतिरिक्‍त इतर गोष्टींनाही देव म्हणण्यात आले आहे. उदाहरणार्थ येशूच्या या शब्दांकडे लक्ष द्या: “कोणीहि दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्‍यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.”—मत्त. ६:२४.

‘धन’ कशा प्रकारे देवाचे स्थान घेऊ शकते? हे समजून घेण्यासाठी प्राचीन इस्राएलातील एखाद्या शेतात पडलेल्या दगडाचे उदाहरण घ्या. हा दगड एखाद्या घराच्या अथवा भिंतीच्या बांधकामाकरता उपयोगात आणला जाऊ शकत होता. पण पूजण्यासाठी “स्तंभ” म्हणून किंवा ‘आकृति कोरून’ स्थापन करण्यात आल्यास, तोच दगड यहोवाच्या लोकांना पाप करण्यास प्रवृत्त करू शकत होता. (लेवी. २६:१) त्याच प्रकारे पैसाही जीवनात आवश्‍यक आहे. पैशाशिवाय आपल्याला जीवनावश्‍यक गोष्टी मिळवता येणार नाहीत. शिवाय, यहोवाच्या सेवेकरताही आपण पैशाचा चांगला वापर करू शकतो. (उप. ७:१२; लूक १६:९) पण जर पैसा मिळवण्याकरता आपण आपल्या ख्रिस्ती सेवेचा बळी दिला तर आपण पैशाला देवाचा दर्जा देतो असा त्याचा अर्थ होईल. (१ तीमथ्य ६:९, १० वाचा.) या जगात बहुतेक लोकांना श्रीमंत कसे होता येईल याचाच ध्यास लागला आहे. त्यामुळे ख्रिस्ती या नात्याने आपण याबाबतीत समतोल दृष्टिकोन बाळगत आहोत किंवा नाही, याची आपण खात्री केली पाहिजे.—१ तीम. ६:१७-१९.

९, १०. (क) ख्रिस्ती या नात्याने आपण शिक्षणाकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो? (ख) उच्च शिक्षणामुळे कोणता धोका संभवू शकतो?

मुळात उपयोगी असूनही जे निरुपयोगी किंवा निरर्थक ठरू शकते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे शिक्षण. चांगले शिक्षण मिळून आपली मुले स्वतःच्या पायांवर उभी राहावी असे सगळ्याच पालकांना वाटते. पण, त्याहून महत्त्वाचे म्हणजे चांगल्या शिक्षणाचा ख्रिस्ती जीवनात फायदा होतो. एका सुशिक्षित ख्रिस्ती व्यक्‍तीला बायबलचे वाचन करून त्याचा अर्थ समजून घेणे, समस्यांविषयी साधकबाधक विचार करून योग्य निर्णय घेणे, आणि इतरांना बायबलमधील सत्ये सुस्पष्ट व पटण्याजोग्या रीतीने समजावून सांगणे जास्त सोपे जाते. चांगले शिक्षण मिळवायला वेळ तर लागतो पण नंतर हे शिक्षण कारणी लागते.

१० पण उच्च शिक्षणाविषयी, म्हणजेच महाविद्यालयातील अथवा विद्यापीठातील शिक्षणाविषयी काय म्हणता येईल? जीवनात यश मिळवायचे असेल, तर उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे बरेच लोक मानतात. पण अशा प्रकारचे शिक्षण घेतल्यामुळे यहोवाच्या सेवेत उपयोगात आणण्याजोगी तरुपणातील मौल्यवान वर्षे वाया जातात. (उप. १२:१) शिवाय, उच्च शिक्षण घेणाऱ्‍यांच्या मनावर जगिक बुद्धीचा प्रभाव पडतो. म्हणूनच की काय, जेथे बहुतेक लोक उच्च शिक्षित आहेत अशा देशांमध्ये देवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण आपले भविष्य, मोठमोठ्या विद्यापीठांतून शिक्षण घेतल्याने सुरक्षित होईल असा विचार करण्याऐवजी, ख्रिस्ती या नात्याने आपण यहोवावर भरवसा ठेवतो.—नीति. ३:५

शारीरिक अभिलाषांना देवाचे स्थान देऊ नका

११, १२. काही जणांच्या बाबतीत बोलताना, “पोट हे त्यांचे दैवत आहे” असे पौलाने का म्हटले?

११ फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौल, देवाचे स्थान घेऊ शकेल अशा आणखी एका गोष्टीकडे आपले लक्ष वेधतो. पूर्वीच्या काही सहउपासकांच्या संदर्भात तो असे म्हणतो: ‘मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताहि रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत; नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.’ (फिलिप्पै. ३:१८, १९) एखाद्याचे पोट त्याचे दैवत कसे बनू शकते?

१२ पौलाने उल्लेख केलेले त्याचे हे सहउपासक आपल्या शारीरिक अभिलाषांना यहोवाच्या सेवेपेक्षा जास्त महत्त्व देत होते असे दिसते. कदाचित त्यांच्यापैकी काही जण खादाड किंवा दारूडे म्हणता येण्याइतपत खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिरेक करत असावेत. (नीति. २३:२०, २१; अनुवाद २१:१८-२१ पडताळून पाहा.) तर इतर जण, पहिल्या शतकातील जगात उपलब्ध असलेल्या सर्व सोयीसवलतींचा पुरेपूर उपभोग घेण्याच्या नादी लागून, यहोवाच्या सेवेपासून विचलित झाले असावेत. आपण मात्र चैनीचे जीवन उपभोगण्याच्या इच्छेमुळे, यहोवाची मनापासून सेवा करण्याबाबत कधीही हयगय करू नये.—कलस्सै. ३:२३,२४.

१३. (क) लोभ म्हणजे काय आणि पौलाने त्याचे वर्णन कशा प्रकारे केले? (ख) आपण लोभी बनण्याचे कसे टाळू शकतो?

१३ खोट्या उपासनेचा पौलाने आणखी एका संदर्भात उल्लेख केला होता. त्याने असे लिहिले: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्‍याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.” (कलस्सै. ३:५) आपल्याजवळ नसलेली एखादी गोष्ट मिळवण्याच्या तीव्र इच्छेला लोभ म्हणता येईल. हा लोभ भौतिक वस्तू मिळवण्याचा असू शकतो. तसेच, यात अनैतिक लैंगिक वासनांचाही समावेश असू शकतो. (निर्ग. २०:१७) अशा प्रकारच्या शारीरिक अभिलाषा एका अर्थाने मूर्तीपूजाच आहेत हे किती गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे! कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अशा अयोग्य इच्छांवर लगाम घातलाच पाहिजे, हे येशूने एक बोलके उदाहरण देऊन स्पष्ट केले.—मार्क ९:४७ वाचा; १ योहा. २:१६.

निरर्थक शब्दांपासून सावध राहा

१४, १५. (क) यिर्मयाच्या काळात कोणत्या “निरर्थक गोष्टी” बऱ्‍याच जणांकरता हानीकारक ठरल्या? (ख) मोशेचे शब्द मौल्यवान का होते?

१४ निरर्थक गोष्टींमध्ये शब्दांचाही समावेश असू शकतो. उदाहरणार्थ, यहोवाने यिर्मयाला असे सांगितले: “संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात; मी त्यांस पाठविले नाही, मी त्यांजबरोबर बोललो नाही; ते खोटा दृष्टांत, शकुन, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपटयोजना संदेशरूपाने तुम्हास सांगतात.” (यिर्म. १४:१४) ते खोटे संदेष्टे स्वतःला यहोवाचे संदेष्टे म्हणवत होते पण प्रत्यक्षात मात्र ते स्वतःच्या बुद्धीनुसार, स्वतःच्याच मतांचा प्रसार करत होते. म्हणूनच त्यांचे संदेश “निरर्थक” म्हणण्याजोगे होते. कारण लोकांना त्यामुळे काहीही फायदा झाला नाही, उलट देवाच्या लोकांकरता ते आध्यात्मिक दृष्टीने हानीकारक ठरले. सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी सैनिकांनी जेरूसलेमवर हल्ला केला तेव्हा या खोट्या संदेष्ट्यांच्या निरर्थक संदेशांवर भरवसा ठेवणारे कित्येक जण हकनाक मारले गेले.

१५ याउलट, मोशेने इस्राएली लोकांना असे सांगितले: “ज्या गोष्टी आज मी तुम्हाला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा; . . . ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय. तुम्ही यार्देन ओलांडून ज्या देशाचे वतन करून घ्यावयाला जाणार आहा तेथे हिच्याच योगे चिरकाळ राहाल.” (अनु. ३२:४६, ४७) मोशे देवाच्या प्रेरणेने बोलत होता. म्हणूनच त्याचे शब्द मौल्यवान होते. इस्राएली लोकांकरता ते जीवनदायक ठरले. ज्यांनी त्याच्या शब्दांचे लक्षपूर्वक पालन केले त्यांना दीर्घायुष्य व समृद्धी लाभली. आपणही निरर्थक शब्द नाकारून नेहमी सत्याच्या मौल्यवान वचनांना जडून राहिले पाहिजे.

१६. वैज्ञानिकांची विधाने देवाच्या वचनाच्या विरोधात असल्यास आपण त्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो?

१६ आज आपल्याला निरर्थक गोष्टी ऐकायला मिळतात का? हो. उदाहरणार्थ, उत्क्रांतीचा सिद्धान्त व वैज्ञानिक क्षेत्रांत लावण्यात आलेले अनेक शोध यांच्या आधारावर काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की देवावर विश्‍वास ठेवण्याची गरज नाही; जे काही घडते ते नैसर्गिक प्रक्रियेनुसारच घडत असते. अशा मगरूर विधानांमुळे आपल्याला चिंता वाटण्याची काही गरज आहे का? मुळीच नाही! कारण देवाचे ज्ञान व मनुष्याचे ज्ञान यांत जमीन अस्मानचा फरक आहे. (१ करिंथ. २:६, ७) आणि मनुष्याच्या शिकवणी देवाने प्रकट केलेल्या ज्ञानाच्या विरोधात गेल्यास, नेहमी मनुष्याच्या शिकवणीच खोट्या ठरतात हे आपल्याला माहीत आहे. (रोमकर ३:४ वाचा.) विज्ञानाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली असली तरीसुद्धा मनुष्याच्या ज्ञानाविषयी बायबलचा हा निष्कर्ष आजही खरा आहे: “ह्‍या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे.” देवाच्या बुद्धीच्या अथांग सागरापुढे मनुष्याचे तर्कवाद केवळ एका बिंदूसारखे आहेत.—१ करिंथ. ३:१८-२०.

१७. ख्रिस्ती धर्मजगताच्या पुढाऱ्‍यांच्या व धर्मत्यागी व्यक्‍तींच्या शब्दांकडे आपण कशा दृष्टिकोनाने पाहावे?

१७ निरर्थक शब्दांचे आणखी एक उदाहरण म्हणजे ख्रिस्ती धर्मजगताच्या पुढाऱ्‍यांच्या शिकवणी. हे धर्मपुढारी आपण देवाची शिकवण देत असल्याचा दावा करतात. पण ते शिकवत असलेल्या बहुतेक गोष्टी शास्त्रवचनांवर आधारित नसतात आणि खरे पाहता निरुपयोगीच असतात. धर्मत्यागी व्यक्‍तीसुद्धा निरर्थक गोष्टी बोलतात. देवाने नेमलेल्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासापेक्षा’ आपल्याला जास्त समजते असे ते दाखवतात. (मत्त. २४:४५-४७) पण मुळात हे धर्मत्यागी स्वतःच्या बुद्धीनुसार बोलत असतात. त्यांचे शब्द निरुपयोगी असतात आणि जे त्यांचे ऐकतात त्यांच्याकरता या निरर्थक गोष्टी एक अडखळण ठरू शकतात. (लूक १७:१, २) त्यांच्या गोष्टी ऐकून सत्याच्या मार्गातून बहकू नये म्हणून आपण काय करू शकतो?

निरर्थक शब्दांचा अव्हेर कसा कराल?

१८. पहिले योहान ४:१ यातील सल्ल्याचे आपण कशा रीतीने पालन करू शकतो?

१८ वृद्ध प्रेषित योहानाने याबाबतीत हा उत्तम सल्ला दिला: “प्रियजनहो, प्रत्येक प्रेरित संदेशाचा विश्‍वास धरू नका, तर ते संदेश देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.” (१ योहान ४:१, NW) योहानाच्या या सल्ल्यानुसार सहसा आपण प्रचार कार्यात भेटणाऱ्‍या लोकांना, जे काही त्यांना शिकवले जाते त्याची बायबलमधून खात्री करून घेण्याचे प्रोत्साहन देतो. हा सल्ला आपल्याकरताही तितकाच उपयुक्‍त आहे. सत्याची टीका करणारी किंवा ख्रिस्ती मंडळीची, वडिलांची अथवा आपल्या बांधवांपैकी कोणाचीही बदनामी करणारी विधाने आपल्या कानावर पडल्यास आपण लगेच त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्याची चूक कधीही करू नये. उलट, आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: “ही गोष्ट पसरवणारा बायबलमध्ये जे सांगितले आहे त्यानुसार वागत आहे का? या गोष्टी किंवा हे दावे यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेला साहाय्यक ठरतील का? मंडळीतील शांतीला ते पूरक आहेत का?” ज्या गोष्टीमुळे आपल्या बांधवांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्यांचा अवमान होतो अशी कोणतीही गोष्ट निरर्थकच समजावी.—२ करिंथ. १३:१०, ११.

१९. आपले शब्द निरर्थक ठरणार नाहीत याची खात्री वडील कशा प्रकारे करू शकतात?

१९ निरर्थक गोष्टींच्या संदर्भात, मंडळीतील वडीलही एक महत्त्वाचा धडा घेऊ शकतात. बांधवांना मार्गदर्शन करत असताना, आपणही अपरिपूर्ण आहोत हे लक्षात ठेवून वडिलांनी केवळ स्वतःच्या ज्ञानाच्या अथवा अनुभवाच्या शिदोरीवर अवलंबून राहू नये. तर त्यांनी नेहमी बायबल काय सांगते याकडे बांधवांचे लक्ष वेधले पाहिजे. प्रेषित पौलाने याविषयी एक रास्त नियम सांगितला. त्याने म्हटले: “शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये.” (१ करिंथ. ४:६) बायबलमध्ये जे लिहिले आहे त्याच्या पलीकडे वडील कधीही जात नाहीत. आणि याच तत्त्वानुसार, ते विश्‍वासू व बुद्धिमान दासाने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शनाच्या पलीकडेही कधी जात नाहीत.

२०. निरर्थक गोष्टींचा अव्हेर करण्यासाठी आपल्याला कोणती मदत उपलब्ध आहे?

२० निरुपयोगी “दैवते,” निरर्थक शब्द अथवा आणखी कोणतीही निरर्थक गोष्ट अतिशय हानीकारक ठरू शकते. म्हणूनच, या निरर्थक गोष्टी ओळखण्यास मदत करण्याची आपण यहोवाकडे प्रार्थना करतो आणि त्यांचा अव्हेर करण्यासाठी त्याचेच मार्गदर्शन घेतो. असे करण्याद्वारे जणू स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही यहोवाला असे म्हणतो: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे.” (स्तो. ११९:३७) यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारणे किती महत्त्वाचे आहे याविषयी पुढील लेखात चर्चा केली जाईल.

तुम्हाला स्पष्ट करता येईल का?

• ढोबळमानाने, कोणत्या ‘निरर्थक गोष्टींचा’ आपण अव्हेर केला पाहिजे?

• पैशाने आपल्या जीवनात देवाचे स्थान घेऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

• शारीरिक अभिलाषा जोपासणे कशा प्रकारे मूर्तीपूजा ठरू शकते?

• आपण निरर्थक शब्दांचा अव्हेर कसा करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३ पानांवरील चित्र]

इस्राएली लोकांना निरर्थक गोष्टींमागे लागण्याऐवजी ‘आपल्या शेतात’ कष्ट करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले

[५ पानांवरील चित्र]

धनसंपत्ती मिळवण्याच्या इच्छेपोटी यहोवाच्या सेवेबाबत कधीही हयगय करू नका

[६ पानांवरील चित्र]

वडिलांचे शब्द अतिशय मौल्यवान ठरू शकतात