व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या अंतसमयात विवाह आणि पालकत्वाची जबाबदारी

या अंतसमयात विवाह आणि पालकत्वाची जबाबदारी

या अंतसमयात विवाह आणि पालकत्वाची जबाबदारी

“काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.”—१ करिंथ. ७:२९.

१. (क) आज जगात होणारे कोणते बदल “कठीण” आहेत? (ख) कौटुंबिक जीवनात होणाऱ्‍या उलथापालथींचा आपल्याशी काय संबंध आहे?

देवाच्या वचनात असे भाकीत करण्यात आले होते की युद्धे, भूकंप, अन्‍नटंचाई आणि महामाऱ्‍या ही ‘शेवटल्या काळाची’ वैशिष्ट्ये असतील. (दानी. ८:१७, १९; लूक २१:१०, ११) मानव इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा काळ, मोठमोठ्या सामाजिक उलाढालींचा काळ असेल असाही इशारा बायबलमध्ये देण्यात आला आहे. कौटुंबिक जीवनात होणारी उलथापालथ ही जगण्यास “कठीण” असलेल्या या ‘शेवटल्या काळातील’ गोष्टींपैकी एक आहे. (२ तीम. ३:१-४) पण मग या उलाढालींचा आपल्याशी काय संबंध? संबंध आहे. कारण आज या उलाढाली इतक्या विस्तृत प्रमाणावर व इतक्या प्रभावीपणे होत आहेत, की विवाह आणि पालकत्व यांबद्दल ख्रिश्‍चनांच्या दृष्टिकोनावर त्यांचा प्रभाव पडू शकतो. तो कसा?

२. विवाह व घटस्फोट यांबाबतीत जगिक लोकांचा काय दृष्टिकोन आहे?

आजकाल, घटस्फोट घेणे सर्वसामान्य बनले आहे; तो सहजरीत्या घेता येतो. इतकेच नव्हे तर अनेक राष्ट्रांत घटस्फोट घेणाऱ्‍यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत चालले आहे. परंतु, आपल्या सभोवती असलेल्या जगिक लोकांचा, विवाह व घटस्फोट यांबाबतीत असलेला दृष्टिकोन आणि यहोवा देवाचा दृष्टिकोन यांत जमीन अस्मानाचा फरक आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण मग यहोवाचा दृष्टिकोन काय आहे?

३. विवाहाविषयी यहोवा आणि येशू यांचा दृष्टिकोन काय आहे?

ज्यांचा विवाह झाला आहे त्यांनी आपल्या विवाह शपथा विश्‍वासूपणे पाळाव्यात अशी यहोवा देव अपेक्षा करतो. पहिल्या पुरुष व स्त्रीचा विवाह लावताना त्याने म्हटले: “पुरुष आपल्या . . . स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” येशूने नंतर हेच वाक्य पुन्हा बोलून दाखवले व पुढे असेही म्हटले: “म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” आणखी पुढे येशू असेही म्हणाला: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो.” (उत्प. २:२४; मत्त. १९:३-६,) तेव्हा, विवाहाचे बंधन हे आयुष्यभराचे बंधन आहे आणि विवाह जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतरच हे बंधन संपुष्टात येते, असा यहोवा आणि येशू या दोघांचाही दृष्टिकोन आहे. (१ करिंथ. ७:३९) विवाहाचे बंधन पवित्र असल्यामुळे घटस्फोटाला क्षुल्लक गोष्ट समजू नये. किंबहुना, यहोवाला ज्या घटस्फोटाचा तिटकारा वाटतो त्याविषयी देवाच्या वचनात सांगण्यात आले आहे. *मलाखी २:१३-१६; ३:६ वाचा.

विवाहव्यवस्थेला गांभीर्याने घ्या

४. लग्न करण्याची घाई केल्याचा काही तरुणांना पस्तावा का होतो?

आपण राहात असलेले जग कामवासनेने वेडेपिसे झाले आहे. चित्रपटांमध्ये, मासिकांमध्ये, इंटरनेटवर कामुक चित्रांना ऊत आल्याचे दिसून येते. या अश्‍लील चित्रांचा परिणाम आपल्या मनावर व विशेषकरून मंडळीतल्या आपल्या प्रिय तरुणांच्या मनावरही होऊ शकतो, या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. इच्छा नसतानाही मनात वाईट भावना उत्पन्‍न करू शकणाऱ्‍या या हिणकस प्रभावाचा आपले तरुण प्रतिकार कसा करू शकतात? यावर उपाय म्हणून काहींनी लहान वयातच लग्न केले आहे. लग्न केल्याने आपण लैंगिक अनैतिकतेत गुरफटणार नाही, असे त्यांना वाटते. परंतु, लग्न झाल्यानंतर मात्र घेतलेल्या या निर्णयाचा काहींना पस्तावा झाला आहे. का? कारण, नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर अर्थात लग्नाचे नाविन्य संपल्यावर जेव्हा खऱ्‍या संसाराला सुरुवात होते तेव्हा त्यांना जाणवते, की त्यांच्या आवडीनिवडी व त्यांच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी अगदीच भिन्‍न आहेत. साहजिकच, अशा पतीपत्नीत नंतर गंभीर समस्या निर्माण होतात.

५. कोणती गोष्ट पतीपत्नीला आपल्या विवाह शपथा विश्‍वासूपणे पाळण्यास मदत करू शकेल? (तळटीप पाहा.)

तुम्ही अशा व्यक्‍तीबरोबर लग्न करता जिच्याविषयी नंतर तुम्हाला कळते की ती, तुम्ही जशी अपेक्षा केली होती त्यानुसार नाही, तेव्हा हे खूप कठीण असू शकते. (१ करिंथ. ७:२८) अशा विवाहात कितीही समस्या असल्या तरी, बायबल ज्याला अनुमती देत नाही असा घटस्फोट घेणे हा यावर तोडगा नसल्याचे खऱ्‍या ख्रिश्‍चनांना माहीत आहे. त्यामुळे, जे पतीपत्नी आपल्या विवाह शपथा विश्‍वासूपणे पाळू इच्छितात ते आपला विवाह टिकवून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. ख्रिस्ती मंडळीतल्या प्रत्येकाने अशा पतीपत्नीचा आदर केला पाहिजे व त्यांना प्रेमळ साहाय्य दिले पाहिजे. *

६. विवाहाच्या बाबतीत आपल्या तरुणांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

तुम्ही तरुण व अद्यापही अविवाहित आहात का? असल्यास, लग्नाच्या बाबतीत तुम्ही कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे? विरुद्ध लिंगी ख्रिस्ती व्यक्‍तीबरोबर प्रणयाराधना सुरू करण्याआधी तुम्ही जोपर्यंत विवाहासाठी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक रीत्या तयार होत नाही तोपर्यंत थांबून राहिल्याने नंतर होणारे पुष्कळ दुःख टाळू शकता. लग्नासाठी अमुकच वय असले पाहिजे, असे बायबलमध्ये सांगण्यात आलेले नाही. * तरीपण, लैंगिक इच्छा तीव्र असतात तो काळ ओसरेपर्यंत थांबून राहणे चांगले, असे बायबल म्हणते. (१ करिंथ. ७:३६, NW) का बरे? कारण, उत्कट लैंगिक इच्छा तुम्हाला बहकवू शकतात आणि योग्य निर्णय घेण्यात बाधा ठरू शकतात ज्यामुळे नंतर खूप पस्तावा होऊ शकतो. विवाहाविषयी यहोवाने बायबलमध्ये दिलेला सल्ला तुमच्याच लाभासाठी व आनंदासाठी आहे हे लक्षात ठेवा.—यशया ४८:१७, १८ वाचा.

पालकत्वाची जबाबदारी गांभीर्याने घ्या

७. काही तरुण जोडप्यांच्या बाबतीत काय घडते व यामुळे त्यांच्या वैवाहिक नातेसंबंधात तणाव का निर्माण होऊ शकतात?

लहान वयात लग्न केलेली काही जोडपी स्वतःच अद्याप लहान असतात आणि त्यांना मूल होते. त्यांनी अजून एकमेकांना व्यवस्थीत ओळखलेले नसते तोच बाळाचे आगमन होते. आणि बाळाकडे तर २४ तास लक्ष द्यावेच लागते. साहजिकच मग आईचे सर्व लक्ष बाळाकडे जाते आणि तिच्या तरुण पतीला आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे असे वाटू लागते. शिवाय, तान्ह्या बाळाची काळजी घेताना रात्ररात्र जागरण करावे लागत असल्यामुळे चिडचिड होते व पतीपत्नीतील नातेसंबंधात तणाव निर्माण होतात. आपण पूर्वीसारखे स्वतंत्र नाही, याची त्या दोघांना अचानक जाणीव होते. पूर्वी जसे ते मनास वाटेल तेथे जाऊ शकत होते, काहीही करू शकत होते तसे आता त्यांना करता येत नाही. या बदललेल्या परिस्थितीबद्दल त्यांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

८. पालकत्वाच्या जबाबदारीविषयी आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे व का?

ज्या प्रकारे आपण विवाह व्यवस्थेला गांभीर्याने घेतले पाहिजे त्याच प्रकारे पालकत्वाची जबाबदारी देखील देवाने दिलेली आदरयुक्‍त नेमणूक आहे असे आपण समजले पाहिजे. बाळाच्या आगमनामुळे एखाद्या जोडप्याला बरेच फेरबदल करावे लागतील. हे सर्व फेरबदल त्यांनी आपली जबाबदारी समजून करावेत. यहोवानेच मानवांना मुले प्रसवण्याची क्षमता दिली असल्यामुळे आपले नवजात शिशू हे “परमेश्‍वराने दिलेले धन आहे” असे पालकांनी समजावे. (स्तो. १२७:३) साक्षीदार असलेले आईवडील, ‘प्रभूमध्ये आई-बापाचे’ कर्तव्य पार पाडायचा प्रयत्न करतील.—इफिस. ६:१.

९. (क) मुलांचे संगोपन करण्यात काय काय गोवलेले आहे? (ख) आपली पत्नी आध्यात्मिकरीत्या मजबूत राहावी म्हणून पती कोणत्या मार्गांनी तिला मदत करू शकतो?

मुलांचे संगोपन करताना आईवडिलांना कित्येक वर्षांपर्यंत स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. मुलांच्या मागे त्यांचा खूप वेळ व परिश्रम जातात. एका ख्रिस्ती पतीने हे समजून घेतले पाहिजे, की बाळाचा जन्म झाल्यानंतर आपली पत्नी ख्रिस्ती सभांमध्ये एकाग्रतेने बसून संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ मिळवू शकणार नाही व व्यक्‍तिगत बायबल अभ्यास तसेच मनन यांसाठी तिच्याजवळ पुरेसा वेळ राहणार नाही. यामुळे तिचे आध्यात्मिक आरोग्य कमजोर होण्याची शक्यता आहे. पालकत्वाची जबाबदारी गांभीर्याने घेताना, बाळाला सांभाळण्यासाठी पती आपल्या परीने सर्व प्रयत्न करतो. कधीकधी पत्नीचे सभांतील काही भाग चुकतात तेव्हा पती घरी आल्यावर चुकलेल्या भागातील मुद्दे तिला सांगू शकतो. आपल्या पत्नीला क्षेत्र सेवेत चांगल्या प्रकारे सहभाग घेता यावा म्हणून काही वेळेस तो बाळाची काळजी घेऊ शकतो.—फिलिप्पैकर २:३, ४ वाचा.

१०, ११. (क) मुलांना यहोवाच्या “शिक्षणात” वाढवण्याचा काय अर्थ होतो? (ख) अनेक पालकांची आपण प्रशंसा का केली पाहिजे?

१० पालकत्वाची जबाबदारी गांभीर्याने घेण्यामध्ये, मुलांच्या अन्‍न, वस्र, निवारा व आरोग्याची काळजी घेणे इतकेच समाविष्ट नाही. या अंतसमयाच्या कठीण काळात खासकरून तरुणांवर बालपणातच नैतिक तत्त्वांचे संस्कार करणे महत्त्वाचे आहे. आईवडिलांनी त्यांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवले’ पाहिजे. (इफिस. ६:४) प्रभूच्या “शिक्षणात” मुलांना वाढवण्याचा असा अर्थ होतो, की आईवडिलांनी मुलांच्या कोवळ्या मनात यहोवाचे विचार रुजवण्यास सुरुवात करावी व हे त्यांनी, मुले किशोरावस्थेच्या खडतर वर्षांत पोहचूपर्यंत करीत राहावे.—२ तीम. ३:१४, १५.

११ “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा” असे जेव्हा येशूने आपल्या अनुयायांना सांगितले तेव्हा पालकांनीही आपल्या मुलांना शिष्य बनण्यास मदत केली पाहिजे असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. (मत्त. २८:१९, २०) परंतु मुलांना शिष्य बनवणे इतके सोपे नाही. कारण, आजचे जग तरुणांवर बरेच दबाव आणत आहे. त्यामुळे, आपल्या मुलांना सत्यात वाढवून त्यांना समर्पित ख्रिस्ती बनण्यास मदत करणाऱ्‍या पालकांची मंडळीतल्या सर्वांनी मनापासून प्रशंसा केली पाहिजे. त्यांनी जबाबदार पालक या नात्याने आपला विश्‍वास व आपल्या विश्‍वासू कार्यांद्वारे जगाच्या प्रभावांवर “जय” मिळवला आहे.—१ योहा. ५:४.

उदात्त हेतूकरता अविवाहित राहणे किंवा मुले न होऊ देणे

१२. काही ख्रिश्‍चन काही काळ अविवाहित राहण्याची निवड का करतात?

१२ “काळाचा संक्षेप करण्यात आला” असल्यामुळे व ‘ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप बदलत’ असल्यामुळे देवाचे वचन आपल्याला अविवाहित राहिल्याने मिळणाऱ्‍या लाभांवर विचार करण्यास प्रवृत्त करते. (१ करिंथ. ७:२९-३१) त्यामुळे काही बांधव अथवा भगिनी आमरण सडे राहतात किंवा मग काही वर्षांपर्यंत अविवाहित राहणे पसंत करतात. अविवाहित राहिल्यामुळे त्यांना असलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग ते आपल्या स्वार्थी इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करीत नाहीत, ही प्रशंसनीय गोष्ट आहे. यहोवाची सेवा “एकाग्रतेने” करता यावी म्हणून अनेक बंधूभगिनी सडेच राहतात. (१ करिंथकर ७:३२-३५ वाचा.) काही अविवाहित ख्रिस्ती, पायनियरींग करतात अथवा बेथेलमध्ये सेवा करतात. काही जण सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहण्यासाठी पात्र ठरून यहोवाच्या संघटनेच्या कामी येतात. किंबहुना, काही काळापुरती का होईना पण अविवाहित राहून काहींनी पूर्ण वेळेची सेवा केली आहे. या सेवेत मिळालेल्या मोलवान धड्यांचा आता त्यांच्या वैवाहिक जीवनातही उपयोग होत असल्याचे त्यांना दिसून येत आहे.

१३. काही ख्रिश्‍चन जोडपी मुले का होऊ देत नाहीत?

१३ जगातील काही भागात कौटुंबिक जीवनात आणखी एक बदल घडत असल्याचे दिसत आहे. अनेक जोडपी मुले होऊ देत नाहीत. असे करण्यामागची कारणे वेगवेगळी असतात, जसे की काही जण आर्थिक परिस्थितीमुळे मुले होऊ देत नाहीत तर इतर जणांना लठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने मुले नको असतात. साक्षीदार कुटुंबामध्ये देखील अशी जोडपी आहेत जी मुले होऊ देत नाहीत. बऱ्‍याचदा त्यांचा हेतू, यहोवाची सेवा कोणत्याही अडथळ्याविना करता यावी हा असतो. याचा अर्थ, जी जोडपी मुले होऊ देत नाहीत ती चारचौघांसारखा संसाराचा आनंद लुटत नाहीत, असा होतो का? मुळीच नाही. देवाच्या राज्याला जीवनात प्रथम स्थान देण्याची त्यांची इच्छा असल्यामुळे ते विवाहामुळे मिळणाऱ्‍या काही आशीर्वादांचा त्याग करण्यास तयार असतात. (१ करिंथ. ७:३-५) यातील काही जोडपी विभागीय, प्रांतीय पर्यवेक्षक या नात्याने किंवा बेथेल मध्ये राहून यहोवाची व आपल्या बांधवांची सेवा करतात. तर इतर जण पायनियर किंवा मिशनरी म्हणून सेवा करतात. यहोवा त्यांची सेवा आणि ते त्याच्यावर दाखवत असलेली प्रीति विसरणार नाही.—इब्री ६:१०.

“संकट”

१४, १५. साक्षीदार पालकांना कोणते “संकट”’ भोगावे लागू शकते?

१४ प्रेषित पौलाने विवाहित ख्रिश्‍चनांना सांगितले की त्यांना “संकट” भोगावे लागेल. (१ करिंथ. ७:२८, पं.र.भा.) या संकटांमध्ये जोडप्याच्या, त्यांच्या मुलांच्या किंवा त्यांच्या वयस्कर आईवडिलांच्या आजारपणाचा समावेश होऊ शकतो. शिवाय मुलांचे संगोपन करताना येणाऱ्‍या अडचणींचा व दुःखांचा देखील यात समावेश होऊ शकतो. या लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील” असे बायबलमध्ये आधीच भाकीत करण्यात आले होते. या कठीण परिस्थितीचे एक गुणलक्षण म्हणजे, “आईबापांस न मानणारी मुले.”—२ तीम. ३:१-३.

१५ ख्रिस्ती पालकांना मुलांचे संगोपन करणे सोपे जात नाही. आजच्या “कठीण” काळाचे वाईट प्रभाव आपल्यावरही पडत असतात. त्यामुळे ख्रिस्ती पालकांना, आपल्या मुलांवर होणाऱ्‍या “ह्‍या जगाच्या” घातक प्रभावांविरुद्ध सतत लढत द्यावी लागते. (इफिस. २:२, ३) आणि या लढाईत ते नेहमीच विजयी होतात असे नाही. साक्षीदार कुटुंबातील एखाद्या मुलाने अथवा मुलीने यहोवाची सेवा करायचे सोडून दिले तर ज्या पालकांनी त्याला अथवा तिला सत्यात वाढवण्याचा इतका प्रयत्न केला होता त्यांच्यासाठी तर हे ‘संकटच’ ठरते.—नीति. १७:२५.

“मोठे संकट”

१६. येशूने कोणत्या ‘संकटाविषयी’ भाकीत केले?

१६ पण, वैवाहिक जीवनात व मुलांचे संगोपन करताना ख्रिश्‍चनांना जे “संकट” सहन करावे लागते त्याच्यापेक्षाही एका अतिशय मोठ्या संकटाचा त्यांना सामना करावा लागणार आहे. येशूची उपस्थिती आणि या व्यवस्थीकरणाची समाप्ती यांविषयी भाकीत करताना येशूने असे म्हटले: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्त. २४:३, २१) या ‘मोठ्या संकटातून’ एक मोठा लोकसमुदाय सुखरूप पार होईल, असे येशूने नंतर सांगितले. पण त्याआधी सैतानाचे व्यवस्थीकरण यहोवाच्या शांतीप्रिय साक्षीदारांवर शेवटपर्यंत हल्ला करीत राहील. तो काळ आपल्या सर्वांसाठीच, मग प्रौढ असू देत अथवा मुले असू देत, कठीण असेल.

१७. (क) आपण पूर्ण खात्रीनिशी भविष्याचा सामना का करू शकतो? (ख) काय केल्याने आपण विवाहाची व पालकत्वाची जबाबदारी गांभीर्याने घेऊ शकू?

१७ पण, या संकटाचा विचार करून आपण विनाकारण गर्भगळीत होऊ नये. यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणारे पालक आपल्या मुलांसह सुरक्षित राहण्याची आशा बाळगू शकतात. (यशया २६:२०, २१ वाचा; सफ. २:२, ३; १ करिंथ. ७:१४) पण तोपर्यंत आपण राहत असलेल्या कठीण दिवसांचे भान ठेवू या जेणेकरून या अंत समयात विवाहाची व पालकत्वाची जबाबदारी गांभीर्याने घेऊ शकू. (२ पेत्र ३:१०-१३) असे केले तरच आपण—मग सडे असो अथवा विवाहित असो, मुलांसहित असो अथवा मुलांरहीत असो—यहोवा देवाचा आणि ख्रिस्ती मंडळीचा आदर करू आणि त्यांचे गौरव करू.

[तळटीपा]

^ परि. 3 कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकातील “विवाह मोडण्याच्या बेतात असल्यास” हा १३ वा अध्याय पाहा.

^ परि. 5 वैवाहिक समस्येला तोंड देत असलेली दांपत्ये, टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, २००३ आणि सावध राहा! एप्रिल ८, २००१ वर्षाच्या अंकात विवाहाच्या संबंधाने आलेले लेख वाचून साहाय्य मिळवू शकतात.

^ परि. 6 तरुणांचे प्रश्‍न—उपयोगी पडणारी उत्तरे या पुस्तकातला “मी विवाहाकरता तयार आहे का?” असे शीर्षक असलेला ३० वा अध्याय पाहा.

उजळणी

• तरुण ख्रिश्‍चनांनी लग्न करण्याची घाई का करू नये?

• मुलांचे संगोपन करण्यात काय काय गोवलेले आहे?

• अनेक ख्रिस्ती बांधव व भगिनी अविवाहित राहणे का पसंत करतात आणि विवाहित असतील तर मुले का होऊ देत नाहीत?

• ख्रिस्ती पालकांना कोणत्या ‘संकटाचा’ सामना करावा लागू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

तरुण ख्रिश्‍चनांनी लग्न करण्याची घाई का करू नये?

[१८ पानांवरील चित्र]

आध्यात्मिक कार्यात पत्नीला चांगल्या प्रकारे सहभाग घेता यावा म्हणून पती, कामात हातभार लावून तिला मदत करू शकतो

[१९ पानांवरील चित्र]

काही ख्रिस्ती जोडपी मुले का होऊ देत नाहीत?