व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योहान पुस्तकातील ठळक मुद्दे

योहान पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

योहान पुस्तकातील ठळक मुद्दे

“ज्या शिष्यावर येशूची प्रीति होती” तो योहान, ख्रिस्ताचे जीवन व सेवाकार्य यांच्याविषयीचा ईश्‍वरप्रेरित अहवाल लिहिणारा शेवटला होता. (योहा. २१:२०) योहानाचे शुभवर्तमान सा.यु. ९८ च्या सुमारास लिहून पूर्ण झाले. योहानाच्या शुभवर्तमानात जी माहिती देण्यात आली आहे ती इतर तीन शुभवर्तमानात आढळत नाही.

प्रेषित योहानाने मनात एक निश्‍चित्त हेतू बाळगून हे शुभवर्तमान लिहिले आहे. कोणता हेतू? या हेतूविषयी योहान म्हणतो: “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्‍वास ठेवावा, आणि विश्‍वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. २०:३१) योहानाच्या या शुभवर्तमानातील संदेश आपल्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.—इब्री ४:१२.

‘हा पाहा, देवाचा कोकरा!’

(योहान १:१–११:५४)

येशूला पाहिल्यावर बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने पूर्ण आत्मविश्‍वासाने असे म्हटले: “पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहा. १:२९) शोमरोन, गालील, यहुदा आणि यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेशात येशू प्रचार करीत, लोकांना शिकवत व चमत्कार करीत प्रवास करतो तेव्हा ‘पुष्कळ लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवतात.’—योहा. १०:४१, ४२.

येशूने केलेला सर्वात उल्लेखनीय चमत्कार म्हणजे, लाजरचे पुनरुत्थान. मरून चार दिवस झालेल्या मनुष्याला पुन्हा जिवंत झाल्याचे पाहून खूप लोक येशूवर विश्‍वास ठेवतात. पण, मुख्य याजक आणि परूशी मात्र येशूला ठार मारण्याचा कट रचतात. त्यामुळे येशू तेथून निघून “रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास” जातो.—योहा. ११:५३, ५४.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:३५, ४०—बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाबरोबर अंद्रिया शेजारी कोणता शिष्य उभा होता? कथन करणाऱ्‍याने नेहमी बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाला “योहान” असे संबोधले आहे. स्वतःच्या शुभवर्तमानात त्याने केव्हाही स्वतःच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. यास्तव, अंद्रिया शेजारी उभा असलेला हा बिननावाचा शिष्य शुभवर्तमान लिहिणारा योहान आहे.

२:२०—कोणते मंदिर बांधायला “शेचाळीस वर्षे” लागली? यहुदी लोक, यहुदीयाचा राजा हेरोद याने पुन्हा बांधलेल्या जरुब्बाबेलाच्या मंदिराला उद्देशून बोलत होते. इतिहासकार जोसिफसनुसार हे काम हेरोदाच्या कारकीर्दीच्या १८ व्या वर्षी किंवा सा.यु.पू. १८/१७ मध्ये सुरू झाले. मंदिर आणि इतर मुख्य वास्तूंचे बांधकाम आठ वर्षांत पूर्ण झाले. पण, मंदिराचे काम सा.यु. ३० च्या वल्हांडणापर्यंत व नंतरही पुढे चालू राहिले; म्हणूनच यहुदी लोक म्हणाले, की मंदिर बांधायला ४६ वर्षे लागली.

५:१४—पाप केल्यामुळे आजारपण येते का? नेहमीच नाही. येशूने ज्या माणसाला बरे केले तो वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे ३८ वर्षांपासून आजारी होता. (योहा. ५:१-९) येशूच्या म्हणण्याचा असा अर्थ होता, की त्या माणसाला दया दाखवण्यात आली आहे तेव्हा इथूनपुढे त्याने तारणाच्या मार्गावरच चालावे व जाणूनबुजून पाप करू नये नाहीतर आजारपणापेक्षा वाईट असलेली गोष्ट त्याला भोगावी लागेल. कदाचित त्या मनुष्याच्या हातून असे पाप घडेल ज्याची शिक्षा मृत्यू होती व मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जिवंत होण्याची अर्थात पुनरुत्थानाची आशा नव्हती.—मत्त. १२:३१, ३२; लूक १२:१०; इब्री १०:२६, २७.

५:२४, २५—“मरणातून जीवनात पार” होणारे हे कोण आहेत? येशू अशा लोकांविषयी बोलत होता जे एकेकाळी आध्यात्मिक अर्थाने मृत होते, पण त्याचे ऐकून त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आणि आपल्या पापी मार्गापासून ते मागे फिरले. ते “मरणातून जीवनात पार” होतात म्हणजे मृत्यूदंडाची त्यांची शिक्षा माफ केली जाते आणि देवावर त्यांनी विश्‍वास ठेवल्यामुळे त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा दिली जाते.—१ पेत्र ४:३-६.

५:२६; ६:५३—‘एखाद्याठायी जीवन असण्याचा’ काय अर्थ होतो? येशू ख्रिस्ताच्या संबंधाने याचा अर्थ, देवाकडून त्याला मिळालेल्या दोन विशिष्ट शक्‍ती असा होतो. एक शक्‍ती म्हणजे, मानवांना देवासमोर एका उत्तम स्वीकृत भूमिकेत उभे राहू देणे आणि दुसरी म्हणजे मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्याची त्याला बहाल करण्यात आलेली शक्‍ती. येशूच्या अनुयायांच्या संबंधाने ‘त्यांच्यामध्ये जीवन असण्याचा’ अर्थ, जीवनाची पूर्णता प्राप्त करणे, असा होतो. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान होते तेव्हा त्यांना जीवनाची पूर्णता प्राप्त होते. पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्या विश्‍वासू जणांना, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शेवटी होणाऱ्‍या शेवटल्या परिक्षेतून पार पडल्यानंतरच जीवनाची पूर्णता अनुभवायला मिळेल.—१ करिंथ. १५:५२, ५३; प्रकटी. २०:५, ७-१०.

६:६४—यहूदा इस्कर्योत आपल्याला धरून देईल हे येशूला, त्याने जेव्हा त्याची निवड केली तेव्हा माहीत होते का? कदाचित नाही. पण सा.यु. ३२ साली एके प्रसंगी येशूने आपल्या प्रेषितांना असे सांगितले: “तुम्हातील एक जण सैतान आहे.” कदाचित या प्रसंगी येशूने, यहूदा इस्कर्योताने पापाच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली आहे हे पाहिले असेल. व याच अर्थाने त्याने, यहूदा त्याला पकडून देईल हे “पहिल्यापासून” माहीत असल्याचे म्हटले.—योहा. ६:६६-७१.

आपल्याकरता धडे:

२:४. येशू मरीयेला असे सुचवू इच्छित होता, की देवाचा बाप्तिस्माप्राप्त अभिषिक्‍त पुत्र या नात्याने त्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या मार्गदर्शनानुसार वागले पाहिजे. येशूने आपल्या सेवेला नुकतीच सुरुवात केली असली तरी, त्याच्या नेमलेल्या कार्याच्या व त्याच्या बलिदानरूपी मृत्यूच्या घडीची त्याला पूर्णपणे जाणीव होती. देवाची इच्छा पूर्ण करताना त्याच्या कुटुंबातील कोणीही, अगदी मरीयासुद्धा त्याच्या आड येऊ शकत नव्हती. आपणही यहोवा देवाची सेवा अशाच चिकाटीने केली पाहिजे.

३:१-९. यहुद्यांचा अधिकारी असलेल्या निकदेमाकडून आपण दोन गोष्टी शिकतो. एक गोष्ट, निकदेमाने नम्रता, सूक्ष्मदृष्टी आणि आध्यात्मिक गरजांची जाणीव असल्याचे दाखवले. म्हणूनच तर त्याने एका गरीब सुताराच्या मुलाला देवाने पाठवलेला शिक्षक म्हणून स्वीकारले. आजही ख्रिश्‍चनांनी नम्रता दाखवली पाहिजे. दुसरी गोष्ट, येशू पृथ्वीवर असेपर्यंत निकदेम त्याचा शिष्य बनला नाही. कदाचित त्याला मनुष्याची भीती होती, सन्हेद्रीनमध्ये असलेले पद जाण्याची भीती होती किंवा धनसंपत्तीवर त्याचे प्रेम असावे. यासर्वांतून आपण एक मुख्य धडा शिकतो: ‘आपला वधस्तंभ उचलून येशूला अनुसरत’ राहण्याचा आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा कोणत्याही प्रवृत्तीमुळे आपण या निर्णयापासून मागे हटू नये.—लूक ९:२३.

४:२३, २४. देवाने आपली उपासना स्वीकारावी असे जर आपल्याला वाटत असेल तर ती उपासना बायबलमध्ये प्रकट केलेल्या सत्याच्या अनुषंगात असली पाहिजे आणि या उपासनेला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन असले पाहिजे.

६:२७. ‘सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्‍या अन्‍नासाठी श्रम’ करण्याचा अर्थ आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे असा होतो. असे केल्यास आपण धन्य होतो.—मत्त. ५:३, NW.

६:४४. यहोवा आपल्या प्रत्येकाची व्यक्‍तिशः काळजी घेतो. प्रचार कार्याद्वारे आणि बायबलमधील सत्य, त्याच्या पवित्र आत्म्याकरवी समजण्यास व त्या सत्याचे अवलंबन करण्यास मदत करण्याद्वारे तो प्रत्येकाला आपल्या पुत्राजवळ आणतो.

११:३३-३६. आपल्या भावना व्यक्‍त करणे हे दुर्बळतेचे लक्षण नाही.

‘त्याच्या मागे चालत राहा’

(योहान ११:५५–२१:२५)

सा.यु. ३३ चा वल्हांडण सण जवळ आल्यावर येशू बेथानीस परततो. निसान ९ रोजी तो एका गाढवीच्या शिंगरावर बसून जेरूसलेमला येतो. निसान १० रोजी येशू पुन्हा मंदिरात येतो. आपल्या पित्याच्या नावाच्या गौरवासाठी येशूने केलेल्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून स्वर्गातून एक वाणी होते: “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.”—योहा. १२:२८.

वल्हांडणाचे भोजन करत असताना येशूने त्याच्या शिष्यांचा निरोप घेण्याआधी एक महत्त्वाचा सल्ला त्यांना दिला आणि त्यांच्यावतीने प्रार्थना केली. यानंतर त्याला अटक करण्यात येते, त्याची उलटतपासणी होते, त्याला वधस्तंभावर चढवण्यात येते आणि शेवटी त्याचे पुनरुत्थान होते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१४:२—येशू कशा प्रकारे आपल्या विश्‍वासू अनुयायांकरता स्वर्गात “जागा तयार” करणार होता? देवाच्या पुढे उपस्थित राहून आपल्या रक्‍ताचे मूल्य त्याला सादर करण्याद्वारे येशूने नवीन कराराला कायदेशीर रूप दिले. जागा तयार करण्यात ख्रिस्ताला राज्याधिकार मिळणे समाविष्ट होते. यानंतर त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांच्या स्वर्गीय पुनरुत्थानाची सुरुवात होणार होती.—१ थेस्सलनी. ४:१४-१७; इब्री ९:१२, २४-२८; १ पेत्र १:१९; प्रकटी. ११:१५.

१९:११—“ज्याने मला आपल्या स्वाधीन केले” असे येशूने पिलाताला म्हटले तेव्हा तो यहूदा इस्कर्योताविषयी बोलत होता का? यहुदाविषयी किंवा कोणत्याही एका विशिष्ट व्यक्‍तीविषयी बोलण्याऐवजी कदाचित येशू, त्याला ठार मारण्याच्या पापात सामील असणाऱ्‍या सर्वांविषयी बोलत होता. या सर्वांमध्ये यहूदा, “मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा” आणि बरब्बाच्या सुटकेची मागणी करण्यास ज्यांना चेतवण्यात आले होते त्या ‘लोकसमुदायाचाही’ समावेश होता.—मत्त. २६:५९-६५; २७:१, २, २०-२२.

२०:१७—येशूने मरीया मग्दालीया हिला “मला बिलगून बसू नको,” असे का सांगितले? कारण, मरीयेला वाटले, की तो आता लगेचच स्वर्गात जाणार आहे व ती त्याला पुन्हा पाहू शकणार नाही. आपण इतक्यात जाणार नाही, असे आश्‍वासन देऊन येशूने तिला, त्याला बिलगून न बसता जाऊन त्याच्या शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानाची बातमी देण्यास सांगितले.

आपल्याकरता धडे:

१२:३६. “प्रकाशाचे पुत्र” अथवा ज्योती वाहक बनण्याकरता आपण देवाचे वचन बायबल याचे अचूक ज्ञान घेतले पाहिजे. आणि या ज्ञानाद्वारे आपण आध्यात्मिक अंधःकारात असलेल्या इतरांना बाहेर काढून त्यांना देवाच्या प्रकाशात आणले पाहिजे.

१४:६. देवाची स्वीकृती मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताशिवाय इतर कोणताही मार्ग नाही. येशूवर विश्‍वास ठेवण्याद्वारे व त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारेच आपण यहोवाच्या जवळ येऊ शकतो.—१ पेत्र २:२१.

१४:१५, २१, २३, २४; १५:१०. देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्यानेच आपण देवाच्या व त्याच्या पुत्राच्या प्रीतीत राहू शकतो.—१ योहा. ५:३.

१४:२६; १६:१३. यहोवाचा पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो आणि शिकलेल्या गोष्टींची पुन्हा आठवण करून देतो. सत्य प्रकट करण्यासही हा आत्मा कार्य करतो. त्यामुळे आपण ज्ञान, बुद्धी, सूक्ष्मदृष्टी, समंजसपणा व विचारशक्‍ती यांच्यात वाढ करू शकतो. यास्तव आपण प्रार्थना करीत राहिले पाहिजे व विशेषकरून पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.—लूक ११:५-१३.

२१:१५, १९. येशूने पेत्राला विचारले, की तो त्याच्यावर “ह्‍यांच्यापेक्षा” अर्थात त्यांच्या पुढ्यात असलेल्या माशांपेक्षा अधिक प्रेम करतो का? मासे पकडण्याचे काम करण्याऐवजी पेत्राने त्याचे अनुकरण पूर्ण वेळ करावे, यावर येशूने जोर दिला. आपल्याला आकर्षित करणाऱ्‍या कोणत्याही गोष्टींपेक्षा येशूवर अधिक प्रेम करण्याचा आपला दृढनिश्‍चय शुभवर्तमान अहवाल वाचल्यावर आणखी पक्का झाला पाहिजे. तेव्हा, आपण पूर्ण मनाने येशूच्या मागे चालत राहू या.

[३१ पानांवरील चित्र]

निकदेमाच्या उदाहरणावरून आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो?