व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही

वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही

वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही

प्रेषित पौलाने आपल्या सोबत्यांना सल्ला दिला: “आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलती. ६:१०) प्रेषित पौलाने ईश्‍वरप्रेरणेने दिलेल्या या सल्ल्याचे आजही आपण पालन करतो. आपल्या सोबतच्या बंधूभगिनींना मदत करण्याचे वेगवेगळे मार्ग आपण शोधत असतो. ख्रिस्ती मंडळीत ज्यांना मदतीची व प्रेमळ काळजीची गरज आहे अशांमध्ये वृद्धाश्रमांत राहणाऱ्‍या आपल्या प्रिय बंधूभगिनींचा देखील समावेश होतो.

काही देशांत वृद्धांची काळजी घरातच घेतली जाते. पण, इतर देशांत वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवले जाते जेथे त्यांची काळजी घेतली जाते. अशा वृद्धाश्रमात आपले वृद्ध ख्रिस्ती बंधूभगिनी असतील तर आपण त्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो? त्यांना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते? कुटुंबातील सदस्यांकडून त्यांना कसलाही आधार नसेल तर हे वृद्ध ख्रिस्ती बंधूभगिनी परिस्थितीला कशा प्रकारे तोंड देऊ शकतात? ख्रिस्ती मंडळीतले इतर बंधूभगिनी अशांना कशा प्रकारे मदत करू शकतात? आणि या वृद्ध बंधूभगिनींना नियमितरीत्या भेट दिल्याने आपल्याला कसा फायदा होतो?

वृद्धाश्रमातील अडचणी

वृद्ध ख्रिस्ती बंधूभगिनी वृद्धाश्रमात राहायला जातात तेव्हा त्यांना तो परिसर नवीन वाटेल. त्यांचे वृद्धाश्रम कदाचित दुसऱ्‍या मंडळीच्या क्षेत्रात असेल आणि या क्षेत्रातील साक्षीदार बंधूभगिनी कदाचित यांना ओळखत नसतील. त्यामुळे स्थानीय साक्षीदार अशा वृद्धांना नियमितरीत्या भेट देण्याचा विचार करणार नाहीत. शिवाय, वृद्धाश्रमात वेगवेगळ्या धर्माचे इतर वृद्ध जन राहात असतील. यामुळे आपल्या वृद्ध बंधू अथवा भगिनीला अशांसोबत राहणे कठीण वाटेल.

उदाहरणार्थ, काही भागांतील वृद्धाश्रमांच्या आवारातच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वृद्धांची देखभाल करणाऱ्‍या एका व्यक्‍तीने असे म्हटले: “ज्यांना बोलता येत नाही अशा काही वृद्ध साक्षीदारांना व्हीलचेअरवर बसवून त्यांचे मत न विचारताच त्यांना चर्चला नेण्यात आले आहे.” शिवाय, वृद्धाश्रमांतील कर्मचारी, वृद्धांच्या दैनंदिन कार्यांत बदल म्हणून वाढदिवस, नाताळ, ईस्टरसारखे सण पाळतात. वृद्धाश्रमांतील काही साक्षीदारांना तर, त्यांचा विवेक त्यांना खाण्यास परवानगी देणार नाही असे अन्‍नपदार्थ खाण्यास देण्यात आली आहेत. (प्रे. कृत्ये १५:२९) आपण जर वृद्धाश्रमात असलेल्या आपल्या या वृद्ध बंधूभगिनींना नियमितरीत्या भेटायला गेलो तर अशा परिस्थितींना तोंड कसे द्यायचे याबाबतीत त्यांना मदत करू शकू.

मंडळीकडून आधार

घरातल्यांचा आधार नसलेल्या वृद्धांची काळजी घेण्यात आरंभीचे ख्रिस्ती सतर्क होते. (१ तीम. ५:९) तसेच आजही ख्रिस्ती मंडळीतले वडील जन त्यांच्या क्षेत्रातल्या वृद्धाश्रमांत राहणाऱ्‍या वृद्ध बंधूभगिनींकडे दुर्लक्ष होत नसल्याची खात्री करतात. * रॉबर्ट नावाचे एक वडील म्हणतात: “वडिलांनी जर वृद्धाश्रमांत राहणाऱ्‍या बंधूभगिनींचे कसे चालले आहे हे व्यक्‍तिशः जाऊन पाहिले आणि त्यांच्यासोबत प्रार्थना केली तर या बंधूभगिनींना खूप प्रोत्साहन मिळेल. मंडळीतील प्रत्येक जण या वृद्धांची काळजी घेऊ शकतो.” वृद्ध बंधूभगिनींना भेटण्यासाठी आपण वेळ काढतो तेव्हा या गरजू बंधूभगिनींची काळजी घेणे यहोवाच्या नजरेत किती महत्त्वाचे आहे, ही गोष्ट आपल्याला समजल्याचे आपण दाखवतो.—याको. १:२७.

गरज असते तेव्हा, वृद्धाश्रमात राहणाऱ्‍या वृद्ध बंधूभगिनींना मदत देण्यासाठी मंडळीतील वडील जन आवश्‍यक ती व्यवस्था करतील. एक मदत कोणती असू शकते याबद्दल रॉबर्ट सांगतात: “वृद्ध बंधूभगिनींना आपण, त्यांना जमत असेल तर ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन देऊ शकतो.” पण जे बंधूभगिनी राज्य सभागृहापर्यंत प्रवास करू शकत नाहीत त्यांच्यासाठी वडील जन इतर योजना करू शकतात. ऐंशीत असलेल्या जॅकलीन नावाच्या एका भगिनीला ऑस्टोआरथ्रायटीस (हाडांचा विकार) आहे. टेलिफोनवरून ती मंडळीच्या सभांचा कार्यक्रम ऐकते. ती म्हणते: “तिकडे राज्य सभागृहात सभा चालतात आणि इकडे मी टेलिफोनवरून तो सर्व कार्यक्रम ऐकते तेव्हा मला त्याचा खूप फायदा होतो; मला हे असं थेट प्रक्षेपण आवडतं. काहीही झालं तरी मला सभांचा कार्यक्रम ऐकायला हवा असतो!”

पण एखाद्या वृद्ध बंधू किंवा भगिनीला टेलिफोनवरून सभांचा कार्यक्रम ऐकणे शक्य नसल्यास वडील जन सभांच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग करू शकतात. आणि जी व्यक्‍ती हे रेकॉर्डींग वृद्धाश्रमात असलेल्या बंधू अथवा भगिनीला द्यायला जाते ती त्यांच्याबरोबर प्रोत्साहनदायक गोष्टी बोलू शकते. “मंडळीतल्या इतरांचं कसं चाललं आहे, याबद्दल जेव्हा आपण या वृद्ध बंधूभगिनींना सांगतो तेव्हा आपणही या आध्यात्मिक कुटुंबाचे भाग आहोत, असं त्यांना वाटतं,” असे एका वडिलांनी म्हटले.

त्यांच्याबरोबर बोलत राहा

वृद्धाश्रमात राहायला गेल्यावर अनेक वृद्धांच्या मनावर ताण येतो; ते गोंधळून जातात. त्यामुळे काही जण एकलकोंडे बनतात. पण, वृद्धाश्रमात नुकत्याच राहायला गेलेल्या आपल्या बंधूभगिनींना आपण जर लगेच भेटायला गेलो व त्यांच्याशी प्रोत्साहनदायक गोष्टी केल्या तर आपण त्यांना, त्यांची आंतरिक शांती व आनंद पुन्हा मिळवण्यास मदत करू शकतो.—नीति. १७:२२.

वृद्धाश्रमातील वृद्ध बंधूभगिनींच्या डोक्यावर परिणाम झाला असेल, त्यांना ऐकू येत नसेल किंवा त्यांना बोलता येत नसेल तर त्यांना भेट द्यायला जाऊन काही उपयोग नाही, असा काही जण विचार करतील. परंतु, त्यांच्याबरोबर बोलणे कितीही कठीण असले तरी, आपण त्यांना भेटायला जाण्याद्वारे दाखवून देतो की आपल्या सोबतच्या बंधूभगिनींना आपण अजूनही ‘आदराने आपणापेक्षा थोर मानतो.’ (रोम. १२:१०) एखादा वृद्ध बांधव सांगितलेल्या गोष्टी लगेचच विसरत असेल तर आपण त्यांना त्यांच्या अनुभवांची कदाचित त्यांच्या बालपणाच्या काही गोष्टींची आठवण करून देऊ शकतो किंवा त्यांना सत्य कसे मिळाले हे सांगायला लावू शकतो. त्यांना जर योग्य शब्द आठवत नसतील तर आपण काय करू शकतो? आपण शांतपणे ऐकू शकतो. आणि उचित असेल तर त्यांना जेव्हा शब्द आठवत नाही तेव्हा एखाद-दोन शब्द सुचवू शकतो किंवा त्यांचे बोलणे थोडक्यात बोलून त्यांना पुढे बोलण्याचे उत्तेजन देऊ शकतो. ते जर गोंधळलेले वाटत असतील किंवा त्यांना बोलायला त्रास होत असेल आणि आपल्याला त्यांचे बोलणे समजत नसेल तर त्यांच्या आवाजाकडे नीट लक्ष देऊन आपण त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो.

पण या वृद्ध बंधूभगिनींना बोलताच येत नसेल तर आपण दुसऱ्‍या मार्गांचा अवलंब करू शकतो. लॉरन्स नावाची एक पायनियर भगिनी ८० वर्षांच्या मॅडलेन नावाच्या एका ख्रिस्ती भगिनीला नियमितरीत्या भेटायला जाते. मॅडलेनला बोलता येत नाही. त्या दोघी एकमेकींबरोबर कसे बोलतात त्याबद्दल लॉरन्स सांगते: “आम्ही एकत्र प्रार्थना करतो तेव्हा मी तिचा हात धरते. मॅडलेनला आपली कृतज्ञता व्यक्‍त करायची असते तेव्हा ती हळूच माझा हात दाबते आणि आपले डोळे मिचकावते.” आपल्या वृद्ध मित्रांचे हात हातात घेऊन किंवा त्यांना प्रेमाने मिठी मारून आपण त्यांना खरोखरच खूप दिलासा देऊ शकतो.

भेटायला जाणे महत्त्वाचे

वृद्धांना तुम्ही जेव्हा भेटायला जाता तेव्हा, वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्गही त्यांची चांगली काळजी घेऊ लागतो. वृद्धाश्रमांत असलेल्या साक्षीदार बंधूभगिनींना जवळजवळ २० वर्षांपासून भेट द्यायला जाणारी डॅन्येल नावाची भगिनी म्हणते: “वृद्धाश्रमातील एखाद्या वृद्धाला नेहमी कोणी ना कोणी भेटायला येतं हे जेव्हा तिथले कर्मचारी पाहतात तेव्हा तेही या वृद्धांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागतात.” आधी उल्लेख केलेले रॉबर्ट म्हणतात: “नेहमी भेटायला येणाऱ्‍या व्यक्‍तीचं बोलणं कर्मचारी वर्ग ऐकून घेतो. नेहमी भेटायला येणाऱ्‍यांशी ते जसं आदरानं वागतात तसं अधून मधून भेटायला येणाऱ्‍यांशी सहसा वागत नाहीत.” वृद्धाश्रमात वृद्धांना भेटायला येणारे नातेवाईक, तिथल्या नर्सेसच्या कामाविषयी नेहमीच कुरकूर करत असतात, पण आपण जेव्हा या नर्सेसचे आभार मानतो तेव्हा मात्र त्यांना आनंद होतो. शिवाय, वृद्धाश्रमातील सर्व नर्सेसबरोबर आपण खेळीमेळीने वागलो तर त्यांना काळजी घ्याव्या लागणाऱ्‍या साक्षीदार वृद्धांच्या मूल्यांचा व विश्‍वासांचा या नर्सेस मान राखतील.

लहानसहान कामात हातभार लावून आपण तिथल्या कर्मचारी वर्गाबरोबर चांगले संबंध ठेवू शकतो. कधीकधी, पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी नसल्यामुळे वृद्धांची इतक्या चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात नाही. रेबेका नावाची एक नर्स असे सुचवू इच्छिते: “जेवणाच्या वेळी खूप धावपळ असते. या वेळेला जर कोणी भेटायला आलं तर भेटायला आलेले लोक वृद्धांना खायला मदत करू शकतात.” आपण काही मदत करू शकतो का, असे वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्‍यांना विचारायला आपण कचरू नये.

आपण जर एकाच वृद्धाश्रमाला सतत भेट देत असू तर आपल्या वृद्ध बांधवाला अथवा भगिनीला काय काय हवे आहे हे आपल्याला दिसेल. मग तिथल्या कर्मचाऱ्‍यांच्या परवानगीने आपण त्या गोष्टी या बंधूभगिनींना आणून देऊ शकतो. जसे की, या वृद्धांच्या खोलीत त्यांच्या प्रिय जनांचे फोटो किंवा मुलांनी काढलेली चित्रे लावून त्यांच्या भकास खोलीचे स्वरूप बदलू शकतो. त्यांच्यासाठी उबदार कपडे किंवा ते साबण, लोशन वगैरे काही वापरत असतील तर त्या गोष्टी नेऊ शकतो. वृद्धाश्रमात बाग असेल तर त्यांना बाहेर मोकळ्या हवेत फिरायला नेऊ शकतो. आधी उल्लेख केलेली लॉरन्स म्हणते: “मी दर आठवड्याला मॅडलेनला भेटायला जाते. ती तर माझ्या येण्याची वाट पाहत असते. मी जर मुलांना सोबत नेलं तर ती लगेच माझ्याकडे पाहून हसते आणि तिचे डोळे चमकतात!” वृद्धाश्रमांत राहणाऱ्‍यांसाठी या छोट्या छोट्या गोष्टींनीच खूप मोठा फरक पडतो.—नीति. ३:२७.

फायदा दोघांचाही

वृद्ध बंधूभगिनींना नियमितरीत्या भेट दिल्याने आपल्या ‘प्रीतीच्या खरेपणाची’ पारख होते. (२ करिंथ. ८:८) ती कशी? आपला वयोवृद्ध मित्र हळूहळू खंगत चालल्याचे पाहून आपल्याला खूप मानसिक यातना होतात. लॉरन्स म्हणते: “मॅडलेनची तब्येत ढासळत चालल्याचे मी पाहायचे तेव्हा सुरुवातीला मी दर भेटीनंतर अक्षरशः रडायचे. पण यहोवाला कळकळीनं प्रार्थना केल्यानं मी माझ्या मनातील भीतीवर मात करू शकते आणि मॅडलेनला आणखी प्रोत्साहन देऊ शकते हे मला जाणवलं.” रॉबर्ट अनेक वर्षांपासून लॅरी नावाच्या एका बांधवाला नेहमी भेटायला जातात. बंधू लॅरी यांना पार्किन्सनचा आजार आहे. रॉबर्ट म्हणतात: “या आजारामुळे त्यांना स्पष्ट बोलता येत नसल्यामुळं त्यांचा एकही शब्द मला कळत नाही. पण आम्ही जेव्हा एकत्र प्रार्थना करतो तेव्हा, त्यांचा किती विश्‍वास आहे, हे मला जाणवतं.”

आपल्या वृद्ध बंधूभगिनींना आपण जेव्हा भेटायला जातो तेव्हा फक्‍त त्यांनाच नव्हे तर आपल्यालाही फायदा होतो. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांबरोबर राहूनही यहोवाच्या जवळ राहण्याचा त्यांचा दृढनिश्‍चय पाहून आपण विश्‍वास व धैर्य कसे दाखवायचे ते शिकतो. त्यांना ऐकू येत नाही, दिसत नाही तरीपण ते आध्यात्मिक अन्‍न घेण्यास किती उत्सुक असतात हे पाहून, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल” या वचनाची सत्यता पटते. (मत्त. ४:४) मुलांचे स्मितहास्य किंवा एकत्र मिळून जेवणे यासारख्या लहानसहान गोष्टींतून आनंद मिळवणारे हे वृद्ध जन आपल्याला आठवण करून देतात, की आपण आहे तितक्यात समाधान मानू शकतो. देवाबरोबर त्यांनी जोडलेला चांगला नातेसंबंध पाहून आपण, योग्य गोष्टींना महत्त्व देण्यास शिकू शकतो.

होय, आपण वृद्धांना जो आधार देतो त्याचा संपूर्ण मंडळीला फायदा होतो. तो कसा? शारीरिकरीत्या कमजोर असलेले बंधूभगिनी इतरांच्या प्रेमळ साहाय्यावर अवलंबून असल्यामुळे ते, मंडळीतल्या इतर बंधूभगिनींना दया दाखवण्याची संधी देतात. त्यामुळे, वृद्धांची काळजी घेणे, मग ती खूप वर्षांपर्यंत घ्यावी लागली तरी, एकमेकांची सेवा करण्याचा एक भाग आहे असे आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. (१ पेत्र ४:१०, ११) या कामात वडिलांनी पुढाकार घेतला तर ते मंडळीतल्या इतर सदस्यांना, ख्रिस्ती कार्याच्या या पैलूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे पाहण्यास मदत करू शकतात. (यहे. ३४:१५, १६) प्रेमळ साहाय्य देऊन आपण आपल्या प्रिय वृद्ध बंधूभगिनींना हा दिलासा देतो की आपण त्यांना विसरलेलो नाहीए!

[तळटीप]

^ परि. 8 मंडळीतील एखादा वृद्ध बांधव अथवा भगिनी दुसऱ्‍या मंडळीच्या क्षेत्रात असलेल्या वृद्धाश्रमात राहायला गेली आहे हे समजताच मंडळीच्या सचिवांनी लगेच तेथील मंडळीच्या वडिलांना याबद्दलची माहिती द्यावी. असे करण्यात केवळ मदत करण्याची इच्छाच नव्हे तर प्रेमळपणा देखील दिसून येतो.

[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“वृद्धाश्रमातील एखाद्या वृद्धाला नेहमी कोणी ना कोणी भेटायला येतं हे जेव्हा तिथले कर्मचारी पाहतात तेव्हा तेही या वृद्धांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागतात.”

[२६ पानांवरील चित्र]

वृद्ध बांधवासोबत अथवा भगिनीसोबत कळकळीने प्रार्थना केल्यास त्यांना आंतरिक शांती पुन्हा मिळू शकते

[२६ पानांवरील चित्र]

आपल्या प्रेमळ हावभावांमुळे आपल्या प्रिय वृद्ध बंधूभगिनींना दिलासा मिळेल