व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्व गोष्टींत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करा

सर्व गोष्टींत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करा

सर्व गोष्टींत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करा

“हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.”—स्तो. ४८:१४.

१, २. स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्याऐवजी आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन का करावे आणि या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

बरेचदा आपण निरर्थक किंवा हानीकारक गोष्टींनाही चांगले म्हणण्याची चूक करतो. (नीति. १२:११) ख्रिस्ती व्यक्‍तीने करू नये अशी एखादी गोष्ट करण्याची आपल्याला तीव्र इच्छा असल्यास आपले हृदय काही न काही सबब शोधून, ही गोष्ट गैर नाही असे आपल्याला पटवून देते. (यिर्म. १७:५, ९) म्हणूनच, स्तोत्रकर्त्याने सुज्ञपणे यहोवाला अशी प्रार्थना केली: “तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर; ती मला मार्ग दाखवोत.” (स्तो. ४३:३) त्याने स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्याऐवजी यहोवावर भरवसा ठेवला. आणि खरोखरच, यहोवापेक्षा चांगले मार्गदर्शन त्याला कोण देऊ शकत होता? स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही नेहमी देवाचेच मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे.

पण, इतर कोणाहीपेक्षा आपण यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा का ठेवावा? त्याचे मार्गदर्शन आपण केव्हा घेतले पाहिजे? यहोवाच्या मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा व्हावा म्हणून आपल्याठायी कोणते गुण असण्याची आवश्‍यकता आहे आणि आजच्या काळात यहोवा कशा प्रकारे आपले मार्गदर्शन करत आहे? या महत्त्वाच्या प्रश्‍नांची सदर लेखात चर्चा करण्यात आली आहे.

यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा का ठेवावा?

३-५. कोणत्या कारणांमुळे आपण यहोवाच्या मार्गदर्शनावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो?

यहोवा आपला स्वर्गीय पिता आहे. (१ करिंथ. ८:६) तो आपल्या प्रत्येकाला अगदी चांगल्या प्रकारे ओळखतो. किंबहुना, आपल्या हृदयात काय आहे हेही त्याला माहीत असते. (१ शमु. १६:७; नीति. २१:२) दावीद राजाने देवाला म्हटले: “माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. हे परमेश्‍वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकहि शब्द माझ्या मुखातून निघत नाही.” (स्तो. १३९:२,) यहोवा आपल्याला इतक्या चांगल्या रीतीने ओळखत असल्यामुळे, आपल्याकरता सर्वात उत्तम मार्ग कोणता हे त्यालाच माहीत आहे, याची आपण खात्री बाळगू नये का? शिवाय, यहोवा सर्वात बुद्धिमान आहे. तो सर्वकाही जाणतो. त्याला सर्व काही दिसते. कोणत्याही मानवाला करता येणार नाही इतक्या खोलपर्यंत तो प्रत्येक गोष्टीचे परीक्षण करू शकतो. आणि एखाद्या गोष्टीचा शेवट कसा होईल हे त्याला आधीपासूनच सांगता येते. (यश. ४६:९-११; रोम. ११:३३) तो “एकच ज्ञानी देव” आहे.—रोम. १६:२५.

यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचे आपल्यावर प्रेम आहे आणि आपले भले व्हावे असेच त्याला नेहमी वाटते. (योहा. ३:१६; १ योहा. ४:८) आपला प्रेमळ पिता असल्यामुळे तो उदारतेने आपल्याला अनेक आशीर्वाद देतो. शिष्य याकोबाने लिहिले: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. . . . ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.” (याको. १:१७) जे देवाचे मार्गदर्शन स्वीकारतात त्यांना त्याच्या उदारतेमुळे जीवनात मोठा फायदा होतो.

शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे यहोवा सर्वसमर्थ आहे. याविषयी स्तोत्रकर्त्याने असे म्हटले: “जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. परमेश्‍वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो; तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो.” (स्तो. ९१:१, २) यहोवाचे मार्गदर्शन हेच सर्वात उत्तम मार्गदर्शन आहे कारण त्याचे संकल्प कधीही निष्फळ होऊ शकत नाहीत. आपल्याला जरी विरोधाला तोंड द्यावे लागले, तरी यहोवा सदैव आपल्या पाठीशी राहील. तो कधीही आपल्याला निराश करणार नाही. (स्तो. ७१:४, ५; नीतिसूत्रे ३:१९-२६ वाचा.) आतापर्यंत आपण पाहिल्याप्रमाणे, आपल्याकरता सर्वात उत्तम मार्ग कोणता हे यहोवाला माहीत आहे; आपल्याला सर्वात उत्तम तेच मिळावे अशी त्याची इच्छा आहे आणि ते पुरवण्याचे सामर्थ्यही त्याच्याचजवळ आहे. तर मग, त्याच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करणे हा मूर्खपणाच ठरणार नाही का? पण, यहोवाच्या मार्गदर्शनाची आपल्याला केव्हा गरज असते?

आपल्याला मार्गदर्शनाची केव्हा गरज असते?

६, ७. आपल्याला यहोवाच्या मार्गदर्शनाची गरज केव्हा असते?

खरे पाहिल्यास, सबंध जीवनात म्हणजे बालपणापासून जीवनाच्या अगदी शेवटपर्यंत आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज असते. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ [“जीवनाच्या अखेरपर्यंत,” NW] आमचा मार्गदर्शक होईल.” (स्तो. ४८:१४) स्तोत्रकर्त्याप्रमाणे सुज्ञ ख्रिश्‍चनांचे डोळे मागर्दर्शन मिळवण्याकरता सदोदित देवाकडेच लागलेले असतात.

अर्थात, जीवनात काही प्रसंगी आपल्याला मदतीची खास गरज भासते. उदाहरणार्थ, छळ किंवा गंभीर आजारपण यांसारख्या समस्यांमुळे अथवा अचानक नोकरी गेल्यामुळे कधीकधी आपण “संकटात” सापडतो. (स्तो. ६९:१६, १७) अशा वेळी, आपण यहोवाचा धावा केला पाहिजे. तो आपल्याला संकटास तोंड देण्याकरता बळ व चांगले निर्णय घेण्याकरता मार्गदर्शन देईल हा आत्मविश्‍वास आपण बाळगला पाहिजे. असे केल्यास आपल्याला सांत्वन मिळेल. (स्तोत्र १०२:१७ वाचा.) पण संकटातच नव्हे, तर इतर प्रसंगीही आपल्याला यहोवाच्या साहाय्याची गरज असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण इतरांना राज्याची सुवार्ता सांगायला जातो, तेव्हा यहोवाच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला परिणामकारक रीतीने हे कार्य करता येणार नाही. तसेच कोणताही निर्णय घेताना, मग तो मनोरंजनाविषयी असो, पेहरावाविषयी असो, मैत्री, नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही बाबीविषयी असो, योग्य निर्णय घेण्याकरता आपल्याला यहोवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. खरोखरच, जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांत आपल्याला मार्गदर्शनाची नितान्त गरज आहे.

देवाच्या मार्गदर्शनाचा अव्हेर करणे धोकेदायक

८. देवाने मना केलेले फळ खाऊन हव्वेने काय दर्शवले?

पण, यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे न करणे हे आपल्यावर अवलंबून आहे. देव याबाबतीत आपल्यावर बळजबरी करत नाही. यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन न करण्याचा निर्णय घेणारी, हव्वा ही मानवांपैकी पहिलीच व्यक्‍ती होती. आणि असा निर्णय घेतल्याने किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे तिच्या उदाहरणावरून उघडच आहे. हव्वेने असा निर्णय घेऊन काय दर्शवले, याचाही विचार करा. आपण ‘देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हावे’ अशी इच्छा असल्यामुळे, देवाने मना केलेले फळ हव्वेने खाल्ले. (उत्प. ३:५) असे करण्याद्वारे, जणू ती देवाचे स्थान घेऊ पाहत होती. यहोवाच्या सूचनांचे पालन करण्याऐवजी, चांगले व वाईट काय हे स्वतःहून ठरवण्याचा ती प्रयत्न करत होती. अशा रीतीने, तिने यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचा अव्हेर केला. तिला स्वतःवर कोणाचाही अधिकार नको होता. तिचा पती आदाम, यानेही तिच्या पावलावर पाऊल ठेवून यहोवा देवाविरुद्ध विद्रोह करण्याचा मार्ग निवडला.—रोम. ५:१२.

९. यहोवाच्या मार्गदर्शनाचा अव्हेर केल्यास आपण खरे पाहता काय करत असतो आणि असे करणे सर्वात मोठा निर्बुद्धीपणा का आहे?

आज आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन न केल्यास, चांगले व वाईट काय हे ठरवण्याचा यहोवाला अधिकार आहे हे आपण मान्य करत नाही असा त्याचा अर्थ होईल. उदाहरणार्थ, पोर्नोग्राफी म्हणजेच अश्‍लील चित्रे पाहण्याची सवय जडलेल्या एखाद्या माणसाचा विचार करा. जर हा माणूस ख्रिस्ती मंडळीशी संगती करत असेल तर पोर्नोग्राफीविषयी यहोवाचे मार्गदर्शन काय आहे हे त्याला नक्कीच माहीत असेल. अशा अशुद्ध किंवा घृणास्पद गोष्टींकडे पाहून विकृत आनंद घेणे तर दूरच, पण त्यांचा उल्लेखही केला जाऊ नये असे देवाचे वचन सांगते. (इफिस. ५:३) याबाबतीत यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन न करून, हा माणूस यहोवाचे सार्वभौमत्त्व नाकारतो म्हणजेच, त्याचा अधिकार अमान्य करतो. (१ करिंथ. ११:३) हा सर्वात मोठा निर्बुद्धीपणा आहे कारण यिर्मयाने म्हटल्याप्रमाणे, “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्म. १०:२३.

१०. आपण आपल्या इच्छास्वातंत्र्याचा नेहमी जबाबदारीच्या जाणिवेने उपयोग का केला पाहिजे?

१० काही जण कदाचित यिर्मयाच्या शब्दांशी सहमत होणार नाहीत. ते म्हणतील, जर यहोवानेच आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिले आहे तर मग, आपल्या मनाने निर्णय घेतल्यास त्याने का म्हणून आपली टीका करावी? पण, देवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्याची देणगी दिली असली, तरीसुद्धा या देणगीसोबत आपल्यावर एक जबाबदारीही येते हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. आपण जे काही बोलायचे किंवा करायचे निवडतो त्याकरता आपल्याला जाब द्यावा लागेल. (रोम. १४:१०) येशूने म्हटले: “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” त्याने असेही म्हटले: “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.” (मत्त. १२:३४; १५:१९) त्याअर्थी, आपण जे काही बोलतो व करतो त्यावरून आपल्या हृदयात काय आहे हे दिसून येते. आपण मुळात कशा प्रकारच्या व्यक्‍ती आहोत हे त्यावरून कळते. म्हणूनच, एक सुज्ञ ख्रिस्ती सर्व गोष्टींत यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करतो. असे केल्यामुळे यहोवाच्या नजरेत तो ‘सरळ मनाचा’ ठरतो आणि अशा मनुष्याचे यहोवा ‘कल्याण’ करेल.—स्तो. १२५:४.

११. इस्राएल राष्ट्राच्या बाबतीत जे घडले त्यावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

११ इस्राएल राष्ट्राच्या बाबतीत काय घडले हे आठवा. जेव्हा या राष्ट्रातील लोकांनी यहोवाच्या मार्गांनी चालायचे निवडले व त्याच्या आज्ञांचे पालन केले तेव्हा यहोवाने त्यांचे संरक्षण केले. (यहो. २४:१५, २१, ३१) पण बरेचदा त्यांनी आपल्या इच्छास्वातंत्र्याचा दुरुपयोग केला. यिर्मयाच्या काळात यहोवाने त्यांच्याविषयी असे म्हटले: “त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.” (यिर्म. ७:२४-२६) किती दुःखदायक परिस्थिती! आपल्या मनाच्या हट्टापायी किंवा स्वार्थापायी आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचा अव्हेर करून स्वतःच्याच मनाप्रमाणे कधीही चालू नये कारण असे केल्यास, इस्राएली लोकांप्रमाणे आपणही ‘पुढे नाही, तर मागेच जाऊ!’

देवाच्या सल्ल्याचे पालन करण्याकरता कशाची आवश्‍यकता आहे?

१२, १३. (क) कोणत्या गुणामुळे आपल्याला यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करावेसे वाटेल? (ख) विश्‍वास इतका महत्त्वाचा का आहे?

१२ यहोवावर प्रेम असल्यास आपल्याला आपोआपच त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करावेसे वाटेल. (१ योहा. ५:३) पण प्रेमासोबतच आणखी कशाची आवश्‍यकता आहे हे पौलाने सांगितले. त्याने म्हटले: “आम्ही विश्‍वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.” (२ करिंथ. ५:६, ७) विश्‍वास महत्त्वाचा का आहे? कारण, यहोवा जरी आपल्याला ‘नीतिमार्गांनी चालवत’ असला, तरी या मार्गांवर चालल्याने आपल्याला आजच्या जगात धनसंपत्ती किंवा प्रतिष्ठा मिळते असे नाही. (स्तो. २३:३) म्हणूनच, आपण यहोवाची सेवा केल्यामुळे मिळणाऱ्‍या व कितीतरी पटीने जास्त मौल्यवान असणाऱ्‍या आध्यात्मिक आशीर्वादांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि यासाठीच आपल्याठायी पक्का विश्‍वास असण्याची गरज आहे. (२ करिंथकर ४.१७, १८ वाचा.) असा विश्‍वास असल्यास, आपण जीवनात आपल्याजवळ जे काही आहे त्यात समाधानी राहू शकू.—१ तीम. ६:८.

१३ येशूने सांगितले होते की खरी उपासना करणाऱ्‍यांनी आत्मत्यागी असले पाहिजे. आणि आत्मत्यागी असण्याकरताही विश्‍वासाची गरज आहे. (लूक ९:२३, २४) यहोवाच्या अनेक विश्‍वासू उपासकांनी आपल्या जीवनात मोठमोठे त्याग केले. त्यांना गरीबी, जुलूम, अन्याय इतकेच काय तर क्रूर छळालाही तोंड द्यावे लागले. (२ करिंथ. ११:२३-२७; प्रक. ३:८-१०) पण देवावर व त्याच्या प्रतिज्ञांवर पक्का विश्‍वास असल्यामुळेच ते आनंदाने या सर्व समस्यांना सामोरे जाऊ शकले. (याको. १:२, ३) पक्का विश्‍वास असल्यास आपल्याला याची पूर्ण खात्री असेल, की यहोवाचे मार्गदर्शन हे नेहमी आपल्या भल्याकरताच असते आणि त्याच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे दीर्घ पल्ल्यात नेहमी आपला फायदाच होतो. विश्‍वासूपणे टिकून राहणाऱ्‍यांना जे प्रतिफळ मिळेल, ते सध्याच्या काळात सोसाव्या लागणाऱ्‍या कोणत्याही त्रासापेक्षा कितीतरी मोठे असेल याविषयी आपल्या मनात तीळमात्र शंका राहणार नाही.—इब्री. ११:६.

१४. हागारला नम्रता का दाखवावी लागली?

१४ यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याकरता नम्रतेचीही गरज आहे. साराची दासी हागार हिच्या उदाहरणावरून हे दिसून येते. साराला अनेक वर्षांपर्यंत मूल झाले नाही तेव्हा तिने हागार ही आपली दासी अब्राहामाला उपपत्नी म्हणून दिली. पण हागार गरोदर राहताच, आपल्या मालकिणीला तुच्छ लेखू लागली. तेव्हा, साराने ‘तिचा जाच करण्यास’ सुरुवात केली. या जाचाला कंटाळून हागार पळून गेली. यहोवाच्या दुताला ती आढळली तेव्हा त्याने तिला म्हटले: “तू आपल्या धनीणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे सोशीत राहा.” (उत्प. १६:२, ६, ८, ९) कदाचित हागारला हा सल्ला रुचला नसेल. देवदूताने सांगितल्याप्रमाणे वागण्याकरता तिला आपली घमेंडी वृत्ती सोडून द्यावी लागणार होती. पण, हागारने नम्रपणे देवदूताच्या सांगण्याप्रमाणे केले. यामुळेच, इश्‍माएलचा जन्म त्याच्या पित्याच्या छत्रछायेत होऊ शकला.

१५. यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याकरता नम्रता दाखवावी लागेल, अशा काही परिस्थितींचे वर्णन करा.

१५ कधीकधी, यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याकरता आपल्यालाही नम्रता दाखवावी लागते. उदाहरणार्थ, काहींना नम्रपणे हे कबूल करावे लागेल की त्यांना आवडणाऱ्‍या मनोरंजनाला यहोवाची संमती नाही. किंवा, एखाद्या ख्रिस्ती बांधवाने कोणाचे मन दुखावले असेल तर त्याला नम्रपणे त्याची क्षमा मागावी लागेल. एखाद्याच्या हातून काही चूक झाली असल्यास, त्याने ती चूक कबूल केली पाहिजे. समजा, कोणाच्या हातून गंभीर पाप झाले तर? त्याने नम्रपणे वडिलांजवळ आपल्या पापाची कबूली दिली पाहिजे. कदाचित एखाद्याला मंडळीतून बहिष्कृतही केले जाऊ शकते. जर त्याला मंडळीत परत यायचे असेल तर त्याने नम्रपणे पश्‍चात्ताप करून, वाईट मार्ग सोडून दिला पाहिजे. या व अशा इतर परिस्थितींत नीतिसूत्रे २९:२३ यातील शब्द आपल्याला दिलासा देऊ शकतात: “गर्व मनुष्याला खाली उतरितो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.”

यहोवा कशा प्रकारे मार्गदर्शन करतो?

१६, १७. देवाचे मार्गदर्शन मिळवण्याकरता आपण बायबलचा पुरेपूर फायदा कसा करून घेऊ शकतो?

१६ यहोवा निरनिराळ्या मार्गांनी आपले मार्गदर्शन करतो. त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्याचे प्रेरित वचन, बायबल. (२ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.) देवाच्या वचनापासून पुरेपूर फायदा मिळवण्याकरता आपण दररोज बायबल वाचण्याची सवय लावली पाहिजे. एखादा पेचप्रसंग निर्माण झाल्यावर जर आपण बायबलमध्ये उपयुक्‍त वचनांचा शोध घेऊ लागलो, तर ते तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे ठरेल. (स्तो. १:१-३) त्याऐवजी, दररोज बायबल वाचण्याची सवय लावल्यास देवाची प्रेरित वचने आपल्या अंगी मुरतील. देवाचे विचार आपले विचार बनतील आणि परिणामी आपल्याला अनपेक्षित समस्यांनाही यशस्वीपणे तोंड देता येईल.

१७ बायबलचे वाचन करण्यासोबतच, जे आपण वाचतो त्यावर मनन करणे आणि त्याविषयी प्रार्थना करणेही महत्त्वाचे आहे. बायबलमधील वचनांवर मनन करताना, या वचनांतील सल्ला विशिष्ट परिस्थितीत कसा लागू करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. (१ तीम. ४:१५) आपल्यासमोर गंभीर स्वरूपाच्या समस्या येतात, तेव्हा आपण यहोवाला प्रार्थना करून मार्गदर्शनाची विनंती केली पाहिजे. मग यहोवाचा आत्मा, आपण आधीच बायबलमध्ये किंवा बायबल-आधारित प्रकाशनांमध्ये वाचलेल्या तत्त्वांची आपल्याला आठवण करून देईल.—स्तोत्र २५:४, ५ वाचा.

१८. आपले मार्गदर्शन करण्याकरता यहोवा ख्रिस्ती बांधवांचा कशा प्रकारे उपयोग करतो?

१८ आपले ख्रिस्ती बांधवही यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्यास आपले साहाय्य करू शकतात. खास करून, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ व त्याचे प्रतिनिधीत्व करणारे नियमन मंडळ, छापील साहित्याच्या व सभा-संमेलनांच्या कार्यक्रमाच्या रूपात सातत्याने आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतात. (मत्त. २४:४५-४७; प्रेषितांची कृत्ये १५:६, २२-३१ पडताळून पाहा.) शिवाय, आपल्याला वैयक्‍तिक रीत्या साहाय्य करू शकतील व बायबलमधून सल्ला देऊ शकतील असे बरेचसे आध्यात्मिक वृत्तीचे प्रौढ जन ख्रिस्ती बांधवांमध्ये आहेत, विशेषतः मंडळीतील वडील. (यश. ३२:१) ख्रिस्ती कुटुंबांतील मुलांना देवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा आणखी एक उत्तम मार्ग उपलब्ध आहे. अर्थात, त्यांचे सत्यात असणारे आईवडील. मुलांचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देवाने आईवडिलांवर सोपवली आहे आणि म्हणूनच मुलांनी नेहमी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.—इफिस. ६:१-३.

१९. यहोवाच्या मार्गदर्शनाचे सदोदित पालन केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

१९ तर अशा रीतीने, बऱ्‍याच मार्गांनी यहोवा आज आपले मार्गदर्शन करत आहे. या मार्गदर्शनाचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. इस्राएल राष्ट्र यहोवाला विश्‍वासू होते त्या काळाच्या संदर्भात दावीद राजाने असे म्हटले: “आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत; ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्‍त करीत होतास. ते तुझा धावा करीत आणि मुक्‍त होत. ते तुझ्यावर भाव ठेवीत, आणि निराश होत नसत.” (स्तो. २२:३-५) जर आपण यहोवावर भाव ठेवून त्याच्या मार्गदर्शनाचे पालन केले, तर आपणही ‘निराश होणार नाही.’ आपल्या आशेचे प्रतिफळ आपल्याला अवश्‍य मिळेल. स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्याऐवजी आपण ‘आपला जीवितक्रम परमेश्‍वरावर सोपवून दिल्यास’ सध्याच्या काळातही आपल्याला विपूल आशीर्वाद मिळतील. (स्तो. ३७:५) आणि जर आपण विश्‍वासूपणे यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करत राहिलो, तर हे आशीर्वाद आपण सदासर्वकाळ उपभोगू शकू. दावीद राजाने लिहिले: “परमेश्‍वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्‍तांस सोडीत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते . . . नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तो. ३७:२८, २९.

तुम्हाला स्पष्ट करता येईल का?

• आपण यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा का ठेवतो?

• यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन न केल्यास आपण काय दाखवतो?

• कोणकोणत्या परिस्थितींत ख्रिस्ती व्यक्‍तीला नम्रता दाखवावी लागू शकते?

• आज यहोवा कशा प्रकारे आपले मार्गदर्शन करतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्रे]

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत तुम्ही मार्गदर्शनाकरता यहोवाकडे डोळे लावता का?

[९ पानांवरील चित्र]

हव्वेने यहोवाचे सार्वभौमत्त्व नाकारले

[१० पानांवरील चित्र]

देवदूताच्या सल्ल्याचे पालन करण्याकरता हागारला कोणता गुण दाखवावा लागणार होता?