व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांचे बरे करत राहा

इतरांचे बरे करत राहा

इतरांचे बरे करत राहा

“आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा, त्यांचे बरे करा.”—लूक ६:३५.

१, २. इतरांचे भले करणे नेहमीच सोपे का नसते?

इतरांचे भले करणे नेहमीच सोपे नसते. आपण ज्यांच्याशी प्रेमाने वागतो ते आपल्याशी प्रेमाने वागतीलच असे नाही. उदाहरणार्थ, आपण लोकांना “धन्यवादित देवाच्या” तसेच त्याच्या पुत्राच्या ‘गौरवाची सुवार्ता’ सांगण्याद्वारे आध्यात्मिक दृष्टीने त्यांचे भले करण्याचा प्रयत्न करतो. पण बरेच जण याविषयी कृतज्ञता व्यक्‍त करण्याऐवजी आपल्या संदेशाला थंड प्रतिसाद देतात. (१ तीम. १:११) इतर जण “ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी” बनून आपल्या कार्याला कडा विरोध करतात. (फिलिप्पै. ३:१८) ख्रिस्ती या नात्याने आपण अशा लोकांशी कशा प्रकारे वागावे?

येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुम्ही तर आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा, त्यांचे बरे करा.” (लूक ६:३५) येशूच्या या सल्ल्याचे आपण आता जवळून परीक्षण करू या. तसेच इतरांचे भले करण्याविषयी येशूने जी इतर विधाने केली होती त्यांचेही आपण परीक्षण करू. यातून निश्‍चितच आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल.

“आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा”

३. (क) मत्तय ५:४३-४५ यातील येशूच्या विधानाचा सारांश स्वतःच्या शब्दांत सांगा. (ख) पहिल्या शतकातील यहुदी धर्मपुढाऱ्‍यांमध्ये यहुदी व गैर-यहुदी लोकांसंबंधी कोणती धारणा निर्माण झाली होती?

आपल्या सुप्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनात येशूने, वैऱ्‍यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्याकरता प्रार्थना करा असे सांगितले. (मत्तय ५:४३-४५ वाचा.) त्याच्या श्रोत्यांपैकी बहुतेकजण यहुदी असल्यामुळे, देवाची ही आज्ञा त्यांच्या परिचयाची होती: “सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नको, तर तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वत:सारखी प्रीति कर.” (लेवी. १९:१८) या आज्ञेतील ‘आपले भाऊबंद’ आणि ‘आपले शेजारी’ या संज्ञा, फक्‍त यहुदी लोकांना लागू होतात अशी पहिल्या शतकातील यहुदी धर्मपुढाऱ्‍यांची धारणा होती. मोशेच्या नियमशास्त्रात इस्राएली लोकांना इतर राष्ट्रांपासून अलिप्त राहण्याची आज्ञा देण्यात आली होती, हे खरे आहे. पण कालांतराने यहुद्यांमध्ये अशी भावना निर्माण झाली की यहुदी नसलेले सर्व जण आपले शत्रूच आहेत आणि त्याअर्थी अशा प्रत्येक व्यक्‍तीचा द्वेष केला पाहिजे.

४. येशूने आपल्या शिष्यांना वैऱ्‍यांशी कशा प्रकारे वागण्यास सांगितले?

याउलट येशूने असे म्हटले: “आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” (मत्त. ५:४४) आपल्याशी वैरभावाने वागणाऱ्‍या सर्वांशी प्रेमानेच वागा असे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले. लूकच्या शुभवर्तमानानुसार येशूने म्हटले: “तुम्हा ऐकणाऱ्‍यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा; जे तुमचा द्वेष करितात त्यांचे बरे करा; जे तुम्हास शाप देतात त्यांस आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” (लूक ६:२७, २८) पहिल्या शतकात जे लोक येशूच्या या शब्दांनुसार वागले त्यांच्याप्रमाणेच आपणही ‘जे आपला द्वेष करतात’ त्यांच्या शत्रुत्वाच्या बदल्यात त्यांच्याकरता चांगली कृत्ये करण्याद्वारे त्यांचे ‘बरे करतो.’ जे ‘आपल्याला शाप देतात’ त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याद्वारे आपण त्यांना ‘आशीर्वाद देतो.’ आणि जे ‘आपला छळ करतात,’ आपल्याला मारहाण करतात किंवा इतर प्रकारे आपली ‘निर्भर्त्सना’ किंवा अपमान करतात, त्यांच्याकरता आपण ‘प्रार्थना करतो.’ आपण देवाला विनंती करतो की या छळ करणाऱ्‍यांच्या मनाचे परिवर्तन व्हावे व त्यांनीही यहोवाची संमती मिळवण्याकरता योग्य पावले उचलावीत.

५, ६. आपण आपल्या वैऱ्‍यांवर प्रेम का करावे?

पण आपण वैऱ्‍यांवर प्रीती का करावी? येशूने याचे कारण सांगितले: “अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र व्हावे.” (मत्त. ५:४५) वैऱ्‍यांवर प्रीती केल्यास, आपण यहोवाचे अनुकरण करत असतो आणि त्याअर्थी आपण त्याचे “पुत्र” ठरतो. यहोवा “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” लूकच्या शुभवर्तमानात म्हटल्यानुसार, देव “कृतघ्न व दुर्जन ह्‍यांच्यावरहि उपकार करणारा आहे.”—लूक ६:३५.

आपल्या शिष्यांनी ‘वैऱ्‍यांवर प्रीति करणे’ किती महत्त्वाचे आहे यावर भर देण्याकरता येशूने म्हटले: “जे तुमच्यावर प्रीति करितात त्यांच्यावर तुम्ही प्रीति केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारहि तसेच करितात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करिता? परराष्ट्रीयहि तसेच करितात ना?” (मत्त. ५:४६, ४७) जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्याशीच जर आपण प्रेमाने वागत असू, तर याकरता आपण देवाकडून कोणत्याही ‘प्रतिफळाची’ किंवा त्याच्या अनुग्रहाची अपेक्षा करू शकत नाही. कारण येशूच्या काळात ज्यांना सहसा वाईट समजले जात होते ते जकातदारही आपल्यावर प्रेम करणाऱ्‍यांशी प्रेमानेच वागत.—लूक ५:३०; ७:३४.

७. जर आपण फक्‍त आपल्या ‘बंधुजनांना’ अभिवादन केले तर त्यात काही विशेष नाही, असे का म्हणता येते?

यहुदी लोक एकमेकांना प्रणाम करताना सहसा ज्या अभिवादनाचा वापर करत, त्यात “शांति” या शब्दाचा समावेश होता. (लूक १०:५; योहा. २०:१९) या अभिवादनातून ते जणू एकमेकांच्या आरोग्याकरता, कल्याणाकरता व ख्यालीखुशालीकरता मनोमन प्रार्थना करत. ज्यांना आपण आपले ‘बंधुजन’ समजतो त्यांनाच जर आपण अभिवादन केले, तर त्यात “विशेष” असे काहीच नाही. येशूने म्हटल्यानुसार “परराष्ट्रीयहि” असेच करत होते.

८. “तुम्ही पूर्ण व्हा” असे म्हणताना येशू आपल्या श्रोत्यांना काय करण्याचे प्रोत्साहन देत होता?

आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापी स्वभावामुळे ख्रिस्ताचे शिष्य पूर्णपणे निर्दोष किंवा परिपूर्ण असू शकत नव्हते. (रोम. ५:१२) तरीसुद्धा येशूने आपल्या उपदेशाच्या या भागाचा शेवट असे म्हणून केला: “ह्‍यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.” (मत्त. ५:४८) असे म्हणून, तो श्रोत्यांना शत्रूंवरही प्रेम करण्याद्वारे आपल्या प्रेमास परिपूर्ण बनवण्याचे आणि त्याअर्थी आपल्या ‘स्वर्गीय पित्या’ यहोवाचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन देत होता. आज आपणही असेच केले पाहिजे.

क्षमाशील का असावे?

९. “आमची ऋणे आम्हास सोड” या शब्दांचा काय अर्थ होतो?

आपल्याविरुद्ध पाप करणाऱ्‍याला आपण दयाळुपणे क्षमा केली पाहिजे. असे करण्याद्वारे आपण इतरांचे बरे करत राहू शकतो. येशूने आपल्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेत हे शब्द आहेत: “जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड.” (मत्त. ६:१२) अर्थात, याठिकाणी आर्थिक ऋणांविषयी सांगितलेले नाही. येशू कोणत्या ‘ऋणांविषयी’ बोलत होता, हे लूकच्या शुभवर्तमानातून स्पष्ट होते. त्यात असे म्हटले आहे: “आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करितो.”—लूक ११:४.

१०. क्षमाशील असण्याच्या बाबतीत आपण देवाचे अनुकरण कशा प्रकारे करू शकतो?

१० पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पापी व्यक्‍तींना मोठ्या मनाने क्षमा करणाऱ्‍या यहोवा देवाचे आपण अनुकरण केले पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (इफिस. ४:३२) स्तोत्रकर्ता दावीद याने एका भजनात असे म्हटले: “परमेश्‍वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. . . . आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. . . . पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.”—स्तो. १०३:८-१४.

११. देव कोणाला क्षमा करतो?

११ लोकांनी जर त्यांच्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांना खरोखर क्षमा केली असेल, तरच देव त्यांच्या पापांची क्षमा करेल. (मार्क ११:२५) हा मुद्दा आणखी स्पष्ट करण्यासाठी येशूने पुढे म्हटले: “कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाहि क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताहि तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही.” (मत्त. ६:१४, १५) जे इतरांना क्षमा करतात त्यांनाच केवळ देव क्षमा करतो. तेव्हा, इतरांचे भले करत राहण्याचा एक मार्ग म्हणजे पौलाच्या या सल्ल्याचे पालन करणे: “प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.”—कलस्सै. ३:१३.

“दोष काढू नका”

१२. इतरांचे दोष काढण्याविषयी येशूने कोणता सल्ला दिला?

१२ येशूने डोंगरावरील प्रवचनात इतरांचे भले करत राहण्याचा आणखी एक मार्ग सांगितला. कोणाचे दोष काढू नका असा सल्ला आपल्या श्रोत्यांना देऊन, त्याने या मुद्द्‌याचा खुलासा करण्याकरता एक प्रभावशाली दृष्टान्तही सांगितला. (मत्तय ७:१-५ वाचा.) “कोणाचे दोष काढू नका” असे म्हणताना येशूचे तात्पर्य काय होते यावर विचार करू या.

१३. येशूने आपल्या श्रोत्यांना काय करण्याचा सल्ला दिला?

१३ मत्तयाच्या शुभवर्तमानानुसार येशूने म्हटले: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका.” (मत्त. ७:१) लूकने लिहिलेल्या अहवालानुसार येशूने म्हटले: “तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल.” (लूक ६:३७) मूळ भाषेत, या दोन्ही वचनांत येशूने केवळ “दोष काढू नका” असे न म्हणता, “दोष काढायचे थांबवा” असे म्हटले होते. पहिल्या शतकातील परूशी लोक, शास्त्रवचनांचा कसलाही आधार नसलेल्या आपल्या रूढीपरंपरांवरून इतरांचा अतिशय कठोरपणे न्याय करत. आपल्या श्रोत्यांपैकी जर कोणी असे करत असतील तर त्यांनी हे थांबवावे असे येशू सांगू इच्छित होता. त्याऐवजी, इतरांच्या चुकांची क्षमा करा असे त्याने म्हटले. प्रेषित पौलानेही इतरांना क्षमा करण्याविषयी अशाच प्रकारचा सल्ला दिला.—इफिसकर ४:३२ वाचा.

१४. क्षमा करण्याद्वारे येशूचे शिष्य इतरांना काय करण्यास प्रवृत्त करू शकत होते?

१४ येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, की जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा तेसुद्धा आपल्याला क्षमा करण्यास प्रवृत्त होतात. त्याने म्हटले: “ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.” (मत्त. ७:२) इतरांशी व्यवहार करताना, आपण जे काही पेरतो त्याचेच आपल्याला पीक मिळेल.—गलती. ६:७.

१५. फाजील टीका करण्याची वृत्ती योग्य नाही हे येशूने कशा प्रकारे स्पष्ट केले?

१५ फाजील टीका करण्याची वृत्ती किती चुकीची आहे हे समजवण्याकरता येशूने दिलेले हे उदाहरण तुम्हाला आठवत असेल. त्याने म्हटले: “तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहातोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे.” (मत्त. ७:३, ४) इतरांची टीका करण्याची सवय असलेला मनुष्य आपल्या भावाच्या ‘डोळ्यातल्या’ लहानशा दोषाकडे लक्ष देतो. तो खरे तर असे सुचवत असतो की डोळ्यात कुसळ असल्यामुळे भावाला स्पष्ट दिसत नाही, म्हणजेच त्याचा दृष्टिकोन योग्य नाही. दोष, कुसळाप्रमाणे तसा लहानसाच असतो, पण टीका करणारा “तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे” असे म्हणतो. भावाचा दृष्टिकोन सुधारायला त्याचे साहाय्य करण्यास उत्सुक असल्याचा तो आव आणतो.

१६. परूशांच्या स्वतःच्या डोळ्यात “मुसळ” होते असे का म्हणता येते?

१६ खासकरून यहुदी धर्मपुढाऱ्‍यांची अतिशय टीकात्मक वृत्ती होती. उदाहरणार्थ, एकदा येशूने एका अंधळ्या माणसाला बरे केले, तेव्हा येशू नक्कीच देवापासून आलेला आहे असे तो अंधळा म्हणू लागला. हे ऐकून परूशांनी क्रोधित होऊन त्याला म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हाला शिकवतोस काय?” (योहा. ९:३०-३४) यहोवाच्या दृष्टिकोनानुसार, योग्य रीतीने न्याय करण्याच्या बाबतीत खरे तर या परूशांच्या स्वतःच्या डोळ्यात “मुसळ” होते. म्हणजे देवाच्या आदर्शांनुसार न्याय करण्याच्या बाबतीत जणू ते पूर्णपणे अंधळे होते. म्हणूनच येशूने म्हटले: “अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.” (मत्त. ७:५; लूक ६:४२) जर आपण इतरांचे भले करण्याचा व त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागण्याचा निश्‍चय केला तर आपण सतत टीकात्मक वृत्तीने आपल्या भावाच्या डोळ्यात कुसळ आहे का हे पाहत बसणार नाही. उलट, आपण स्वतःही अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या बांधवांना दोषी ठरवण्याचा किंवा त्यांची टीका करण्याचा आपल्याला काहीही हक्क नाही हे आपण कबूल करू.

आपण इतरांशी कसे वागावे?

१७. मत्तय ७:१२ यातील नियमानुसार आपण इतरांशी कसे वागावे?

१७ डोंगरावरील प्रवचनात येशूने सांगितले की ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांच्या मागण्या प्रेमळपणे पूर्ण करतो त्याचप्रमाणे देवही आपल्या सेवकांच्या प्रार्थनांचे उत्तर देतो. (मत्तय ७:७-१२ वाचा.) येशूने सांगितलेला हा नियम लक्ष देण्याजोगा आहे: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्त. ७:१२) आपण इतरांशी अशा रीतीने वागलो तरच आपण स्वतःला येशू ख्रिस्ताचे खरे अनुयायी म्हणवू शकतो.

१८. इतरांनी आपल्याशी जसे वागावे अशी आपली इच्छा आहे तसेच आपण त्यांच्याशी वागले पाहिजे हे ‘नियमशास्त्रात’ कशा प्रकारे स्पष्ट करण्यात आले होते?

१८ इतरांनी आपल्याशी जसे वागावे अशी आपली इच्छा आहे तसेच आपण त्यांच्याशी वागले पाहिजे असे सांगितल्यानंतर येशूने म्हटले: “नियमशास्त्र व संदेष्टग्रंथ हेच होत.” याचा अर्थ, जेव्हा आपण येशूने सांगितल्याप्रमाणे वागतो, तेव्हा आपण “नियमशास्त्र,” म्हणजेच बायबलमधील उत्पत्तीपासून अनुवादापर्यंतची पुस्तके लिहिण्यामागच्या मूळ उद्देशानुसार वागत असतो. या पुस्तकांनी, दुष्टाईचा अंत करण्याकरता एक वंश उत्पन्‍न करण्याचा यहोवाचा उद्देश तर प्रकट केलाच, पण त्यासोबतच देवाने सा.यु.पू. १५१३ साली मोशेद्वारे इस्राएल राष्ट्राला दिलेले नियमसुद्धा या पुस्तकांत नमूद आहेत. (उत्प. ३:१५) नियमशास्त्रात इतर गोष्टींसोबतच इस्राएली लोकांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते की त्यांनी न्यायीपणे वागावे, पक्षपात करू नये, आणि दुःखिकष्टी व परदेशी लोकांना साहाय्य करावे.—लेवी. १९:९, १०, १५, ३४.

१९. आपण इतरांचे भले करावे हे ‘संदेष्टग्रंथांवरून’ कशा प्रकारे स्पष्ट होते?

१९ ‘संदेष्टग्रंथांचा’ उल्लेख करताना येशू इब्री शास्त्रवचनांतील संदेष्ट्यांच्या पुस्तकांविषयी बोलत होता. या पुस्तकांत मशीहाविषयी करण्यात आलेल्या भविष्यवाण्या होत्या व त्या ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्या. ही लिखाणे देखील हेच दाखवतात की देवाचे लोक त्याच्या दृष्टीत जे योग्य ते करतात आणि इतरांशी योग्य रीतीने वागतात, तेव्हा तो त्यांना आशीर्वाद देतो. उदाहरणार्थ, यशयाच्या भविष्यवाणीत इस्राएली लोकांना हा सल्ला देण्यात आला: “परमेश्‍वर म्हणतो, न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा; . . . जो मानव हे करितो व जो मानवपुत्र यास धरून राहतो, . . . जो कोणतेहि दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरितो तो धन्य!” (यश. ५६:१, २) यावरून हेच स्पष्ट होते की आपल्या लोकांनी नेहमी इतरांचे भले करत राहावे अशी देव त्यांच्याकडून अपेक्षा करतो.

नेहमी इतरांचे भले करा

२०, २१. येशूचे डोंगरावरील प्रवचन ऐकल्यानंतर लोकसमुदायाची काय प्रतिक्रिया होती आणि तुम्ही या उपदेशावर मनन का करावे?

२० डोंगरावरील प्रवचन म्हटलेल्या येशूच्या अप्रतिम उपदेशात त्याने ज्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्‌यांविषयी सांगितले, त्यांपैकी केवळ काही मुद्द्‌यांचे आपण येथे परीक्षण केले आहे. तरीसुद्धा, येशूचे ते प्रवचन ऐकल्यावर लोकांनी दाखवलेली प्रतिक्रिया आपण समजू शकतो. बायबलमधील प्रेरित अहवाल आपल्याला याविषयी असे सांगतो: “येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवीत होता.”—मत्त. ७:२८, २९.

२१ भाकीत करण्यात आल्याप्रमाणे आपण खरोखरच एक “अद्‌भुत सल्लागार” आहोत हे येशूने सिद्ध करून दाखवले. (यश. ९:६, ईझी टू रीड व्हर्शन) येशूला आपल्या स्वर्गीय पित्याच्या विचारसरणीची किती जवळून ओळख होती याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे त्याचे डोंगरावरील प्रवचन. आपण चर्चा केलेल्या मुद्द्‌यांसोबतच, खरा आनंद कसा मिळवावा, अनैतिक वर्तन कसे टाळावे, नीतिमत्तेने कसे वागावे आणि एक सुरक्षित व आनंदी भवितव्य कसे मिळवता येईल यांसारख्या अनेक विषयांबद्दल या प्रवचनात आणखीही बरेच काही सांगितले आहे. तर मग, मत्तय ५-७ अध्यायांचे पुन्हा एकदा लक्षपूर्वक व प्रार्थनापूर्वक वाचन करायला तुम्हाला आवडणार नाही का? येशूने या अध्यायांत दिलेल्या उत्तम सल्ल्यावर मनन करा. डोंगरावरील प्रवचनात त्याने जे जे म्हटले त्याचे आपल्या जीवनात पालन करा. असे केल्यास, तुम्हाला यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागून त्याला संतुष्ट करता येईल, इतरांशी योग्य रीतीने वागता येईल तसेच सदोदित इतरांचे बरे करत राहता येईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपण आपल्या वैऱ्‍यांशी कसे वागावे?

• आपण क्षमाशील का असावे?

• इतरांना दोषी ठरवण्याविषयी येशूने काय म्हटले?

मत्तय ७:१२ यानुसार आपण इतरांशी कशा प्रकारे वागले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील संक्षिप्त आशय]

“कोणाचे दोष काढू नका” असे येशूने का म्हटले हे तुम्हाला माहीत आहे का?

[८ पानांवरील चित्र]

जे आपला छळ करतात त्यांच्याकरता आपण प्रार्थना का करावी?

[१० पानांवरील चित्र]

इतरांनी आपल्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्ही नेहमी त्यांच्याशी वागता का?