व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांशी आपण कसे वागावे?

इतरांशी आपण कसे वागावे?

इतरांशी आपण कसे वागावे?

“लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीहि त्यांच्याशी वर्तन करा.”—लूक ६:३१.

१, २. (क) डोंगरावरील प्रवचन काय आहे? (ख) या व पुढील लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

येशू ख्रिस्त खरोखर एक महान शिक्षक होता. धार्मिक कारणांवरून त्याचा द्वेष करणाऱ्‍यांनी जेव्हा त्याला अटक करण्यासाठी शिपाई पाठवले, तेव्हा हे शिपाई त्याला अटक न करताच परतले व म्हणाले: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” (योहा. ७:३२, ४५, ४६) येशूने दिलेल्या उपदेशांपैकी सर्वात उल्लेखनीय उपदेश म्हणजे त्याचे डोंगरावरील प्रवचन. हे प्रवचन मत्तयाच्या शुभवर्तमानातील ५-७ अध्यायांत आपल्याला वाचायला मिळते आणि त्याच्याशी मिळतीजुळती माहिती लूक ६:२०-४९ येथेही आढळते. *

या प्रवचनातील सुवर्ण नियम बहुतेकांच्या ओळखीचा आहे. इतरांशी आपण कसे वागावे याविषयी हा नियम आहे. येशूने म्हटले: “लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीहि त्यांच्याशी वर्तन करा.” (लूक ६:३१) येशूने स्वतः लोकांकरता कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या! त्याने रोग्यांना बरे केले, इतकेच काय तर मृतांनाही जिवंत केले. येशूच्या या चमत्कारांमुळे तर लोकांना फायदा झालाच; पण त्याने सांगितलेल्या सुवार्तेचा ज्यांनी स्वीकार केला त्यांना सर्वात जास्त आशीर्वाद प्राप्त झाले. (लूक ७:२०-२२ वाचा.) यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्यालाही येशूप्रमाणे, इतरांना राज्याची सुवार्ता सांगण्यास आनंद वाटतो. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) या व पुढील लेखात आपण, प्रचार कार्याविषयी तसेच इतरांशी आपण कसे वागावे यासंबंधी इतर मुद्द्‌यांविषयी येशूने डोंगरावरील प्रवचनात काय म्हटले याबद्दल चर्चा करू.

सौम्यतेने वागा

३. सौम्यता म्हणजे काय?

येशूने म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्त. ५:५) सौम्यता दुर्बलतेचे लक्षण आहे असे बायबलमध्ये कोठेही सुचवण्यात आलेले नाही. आपण इतरांशी नरमाईने वागतो, कारण देव त्याच्या सेवकांकडून अशी अपेक्षा करतो. ही सौम्य वृत्ती सहमानवांसोबतच्या आपल्या व्यवहारांतून दिसून येते. उदाहरणार्थ, आपण ‘वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करत नाही.’—रोम. १२:१७-१९.

४. सौम्य वृत्तीचे लोक सुखी आहेत असे का म्हणता येते?

सौम्य वृत्तीचे लोक धन्य, म्हणजेच सुखी आहेत “कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” येशू, जो स्वतः “मनाचा सौम्य व लीन” होता, त्याला “सर्व गोष्टींचा वारीस” करण्यात आले आहे. त्याअर्थी, पृथ्वीचे वतन मिळवणाऱ्‍यांपैकी तो सर्वात प्रमुख आहे. (मत्त. ११:२९; इब्री १:२; स्तो. २:८) मशीहासोबत म्हणजेच ‘मानवपुत्रासोबत’ स्वर्गीय राज्यात शासन करणारे इतर जणही असतील असे भाकीत करण्यात आले होते. (दानी. ७:१३, १४, २१, २२, २७) “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” या नात्याने हे १,४४,००० सौम्य वृत्तीचे अभिषिक्‍त जन, येशूसोबत पृथ्वीचे वतन पावतील. (रोम. ८:१६, १७; प्रकटी. १४:१) सौम्य वृत्तीच्या इतर लोकांना त्या स्वर्गीय राज्याच्या शासनाखाली पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद मिळेल.—स्तो. ३७:११.

५. आपणही ख्रिस्ताप्रमाणे सौम्यतेने वागलो तर याचा काय परिणाम होईल?

आपण इतरांशी कठोरतेने वागलो तर साहजिकच लोकांना आपला राग येईल आणि ते आपल्याला टाळू लागतील. पण ख्रिस्ताप्रमाणे जर आपण सौम्यतेने वागलो, तर मंडळीतल्या बांधवांना आपला सहवास आवडेल आणि आपल्या सहवासामुळे त्यांना आध्यात्मिक प्रोत्साहन मिळू शकेल. सौम्यता देवाच्या आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळात समाविष्ट आहे. म्हणजेच, ‘आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगत असू व चालत असू’ तर देवाची कार्यकारी शक्‍ती आपल्याला सौम्यतेने वागण्यास प्रवृत्त करेल. (गलतीकर ५:२२-२५ वाचा.) निश्‍चितच, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणाऱ्‍या सौम्य व्यक्‍तींपैकी आपणही असावे असे आपल्या सर्वांनाच वाटते, नाही का?

“जे दयाळू ते धन्य”

६. जे “दयाळू” असतात त्यांच्याठायी कोणते उल्लेखनीय गुण असतात?

डोंगरावरील प्रवचनात येशूने असेही म्हटले: “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.” (मत्त. ५:७) जे “दयाळू” असतात त्यांना दीनदुबळ्यांविषयी कोमल करुणा असते आणि ते त्यांच्याशी सहानुभूतीने वागतात. दुःखिकष्टी लोकांना पाहून त्यांना कळवळा येतो. येशूलाही लोकसमुदायांचा “कळवळा आला” आणि म्हणूनच त्याने चमत्कार करून त्यांचे दुःख दूर केले. (मत्त. १४:१४; २०:३४) त्याच प्रकारे, आपणही लोकांबद्दल कळवळा व सहानुभूती वाटत असल्यामुळे त्यांच्याशी दयाळुपणे वागण्यास प्रेरित झाले पाहिजे.—याको. २:१३.

७. लोकांचा कळवळा आल्यामुळे येशूने काय केले?

येशू एकदा विश्रांती घेण्यास जात असताना लोकांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ आला. हे लोक, “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला. आणि तो त्यांना बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मार्क ६:३४) येशूप्रमाणे आपणही इतरांना राज्याचा संदेश आणि देवाच्या दयाळू कृत्यांविषयी सांगतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो!

८. जे दयाळू आहेत त्यांना धन्य का म्हटले आहे?

जे दयाळू आहेत त्यांना धन्य म्हणण्यात आले आहे कारण “त्यांच्यावर दया होईल.” आपण लोकांशी दयाळुपणे वागतो तेव्हा सहसा तेसुद्धा आपल्याशी तसेच वागतात. (लूक ६:३८) शिवाय, येशूने म्हटले: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाहि क्षमा करील.” (मत्त. ६:१४) पापांची क्षमा व देवाची संमती मिळवल्याने प्राप्त होणारा आनंद केवळ जे दयाळू असतात त्यांनाच अनुभवायला मिळतो.

“शांति करणारे” धन्य का आहेत?

९. आपण शांती करणारे असल्यास आपण कशा प्रकारे वागू?

धन्य किंवा सुखी होण्याचे आणखी एक कारण सांगताना येशूने म्हटले: “जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना ‘देवाची मुले’ म्हणतील.” (मत्त. ५:९) आपण जर “शांति करणारे” असू तर ज्या गोष्टीमुळे “स्नेह्‍यांत फूट” पडू शकेल अशी कोणतीही गोष्ट आपण खपवून घेणार नाही, किंवा त्यात सहभागही घेणार नाही. (नीति. १६:२८) आपल्या शब्दांनी व कृतींनी आपण ख्रिस्ती मंडळीच्या आत तसेच बाहेर असणाऱ्‍या लोकांशीही शांतीसंबंध राखण्यास प्रयत्नशील असू. (इब्री १२:१४) आणि खासकरून आपण यहोवा देवासोबत एक शांतीपूर्ण संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू.—१ पेत्र ३:१०-१२ वाचा.

१०. “शांती करणारे” धन्य का आहेत?

१० येशूने म्हटले की “जे शांति करणारे ते धन्य” आहेत, “कारण त्यांना ‘देवाची मुले’ म्हणतील.” येशू हाच मशीहा आहे यावर विश्‍वास ठेवल्यामुळे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “देवाची मुले होण्याचा अधिकार” प्राप्त होतो. (योहा. १:१२; १ पेत्र २:२४) येशूच्या शांतिप्रिय ‘दुसऱ्‍या मेंढरांविषयी’ काय? स्वर्गीय सहवारसदारांसोबत येशूच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान तो या दुसऱ्‍या मेंढरांचा “सनातन पिता” असेल. (योहा. १०:१४, १६; यश. ९:६; प्रकटी. २०:६) या हजार वर्षांच्या राजवटीच्या शेवटी हे शांती करणारे खऱ्‍या अर्थाने देवाची पृथ्वीवरील मुले बनतील.—१ करिंथ. १५:२७, २८.

११. जर आपण ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानानुसार’ चालत असू, तर आपण इतरांशी कशा प्रकारे वागू?

११ यहोवा “शांतिदाता देव” आहे. त्यामुळे त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्याकरता आपण त्याच्या गुणांचे अनुकरण केले पाहिजे. आपणही त्याच्याप्रमाणे शांतिप्रिय बनले पाहिजे. (फिलिप्पै. ४:९) जर आपण ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानानुसार’ चालत असू, तर आपण इतरांशी शांतीपूर्ण रीतीने वागू. (याको. ३:१७) आणि असे केल्यामुळे, येशूने म्हटल्याप्रमाणे आपण धन्य किंवा सुखी होऊ.

“तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या”

१२. (क) देवाकडील सत्याच्या प्रकाशाविषयी येशूने काय म्हटले? (ख) आपण आपला प्रकाश लोकांसमोर कशा प्रकारे पडू देतो?

१२ लोकांचे भले करण्याचा किंवा त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्यांना देवाकडील सत्याचा प्रकाश प्राप्त करण्यास मदत करणे. (स्तो. ४३:३) येशूने त्याच्या शिष्यांना “तुम्ही जगाचा प्रकाश आहा,” असे सांगितले. त्याने त्यांना हा प्रकाश लोकांसमोर पाडण्याचे प्रोत्साहन दिले जेणेकरून त्यांची “सत्कर्मे” म्हणजेच इतरांसाठी केलेली चांगली कृत्ये लोकांना दिसू शकतील. “लोकांसमोर” पडणाऱ्‍या या आध्यात्मिक प्रकाशामुळे मानवजातीला फायदा होईल असे येशूने म्हटले. (मत्तय ५:१४-१६ वाचा.) आजच्या काळात, आपण आपल्या संपर्कात येणाऱ्‍या लोकांचे भले करण्याद्वारे आणि “सर्व जगात” म्हणजेच “सर्व राष्ट्रांत” सुवार्तेचा प्रचार करण्यात सहभागी होण्याद्वारे आपला प्रकाश लोकांसमोर पडू देतो. (मत्त. २६:१३; मार्क १३:१०) हा आपल्याकरता एक बहुमानच नाही का?

१३. लोकांचे आपल्याकडे लक्ष का जाते?

१३ येशूने म्हटले, “डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही.” डोंगरावर वसलेले कोणतेही शहर सहज दृष्टीस पडते. त्याच प्रकारे, सुवार्तेचे प्रचारक या नात्याने आपली चांगली कृत्ये तसेच आपला मर्यादशीलपणा व शुद्ध आचरण लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.—तीत २:१-१४.

१४. (क) पहिल्या शतकातील दिवे कशा प्रकारचे होते? (ख) आपण बायबलमधील सत्याचा प्रकाश “मापाखाली” ठेवत नाही याचा काय अर्थ होतो?

१४ येशूने म्हटले की दिवा लावून मापाखाली नव्हे तर दिवठणीवर ठेवल्यामुळे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. पहिल्या शतकात सामान्यपणे वातीचे दिवे वापरले जात. हे दिवे मातीचे असत व सहसा त्यांत जैतुनाच्या तेलाचा वापर केला जात असे. लाकडी किंवा धातूपासून बनवलेल्या दिवठणीवर ठेवल्याने दिव्याचा प्रकाश ‘घरातल्या सर्वांवर’ पडे. लोक दिवा लावून “मापाखाली” ठेवत नव्हते. हे माप जवळजवळ आठ किलो धान्य मावू शकेल इतके मोठे भांडे होते. या उदाहरणावरून येशू आपल्या शिष्यांना असे सांगत होता की त्यांनी आपला आध्यात्मिक प्रकाश लपवून ठेवू नये. म्हणूनच, आपण आपला प्रकाश इतरांसमोर पडू दिला पाहिजे. विरोध किंवा छळ होत असल्यामुळे आपण कधीही बायबलमधील सत्य इतरांपासून लपवून ठेवू नये.

१५. आपल्या ‘सत्कर्मांमुळे’ काही लोक काय करतात?

१५ दिव्याचा उल्लेख केल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गांतील पित्याचे गौरव करावे.” आपल्या ‘सत्कर्मांमुळे’ काही जण देवाचे सेवक बनून त्याचे ‘गौरव करतात.’ ही गोष्ट आपल्याला ‘जगात ज्योतीसारखे’ चमकत राहण्याची प्रेरणा देत नाही का?—फिलिप्पै. २:१५.

१६. “जगाचा प्रकाश” असण्याकरता आपण काय केले पाहिजे?

१६ “जगाचा प्रकाश” असण्याकरता आपण राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. पण, इतकेच पुरेसे नाही. प्रेषित पौलाने लिहिले, “प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्‍यात दिसून येते.” (इफिस. ५:८, ९) आपले आचरण नेहमी देवाच्या उच्च आदर्शांनुसार असले पाहिजे. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपण प्रेषित पेत्राच्या या सल्ल्याचे पालन केले पाहिजे: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) पण सहविश्‍वासू बांधवांचे आपसात काही मतभेद झाल्यास काय करावे?

“आपल्या भावाबरोबर समेट कर”

१७-१९. (क) मत्तय ५:२३, २४ यात सांगितलेले “दान” काय होते? (ख) भावासोबत समेट करणे किती महत्त्वाचे आहे आणि येशूने हे कशा प्रकारे स्पष्ट केले?

१७ डोंगरावरील प्रवचनात येशूने त्याच्या शिष्यांना आपल्या भावाविषयी मनात राग किंवा द्वेष बाळगण्याबद्दल बजावले होते. मनात तिरस्कार बाळगण्याऐवजी त्यांनी लवकरात लवकर दुखावल्या गेलेल्या भावाशी समेट करावा असे त्याने सांगितले. (मत्तय ५:२१-२५ वाचा.) येशूच्या सल्ल्याकडे बारकाईने लक्ष द्या. तुम्ही जर आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणत असताना तुम्हाला आठवले की तुमच्या भावाच्या मनात तुमच्याविरुद्ध काहीतरी आहे तर तुम्ही काय करायचे होते? तुम्ही आपले दान तेथेच वेदीजवळ सोडून आपल्या भावासोबत समेट करायचा होता. आणि त्यानंतरच परत येऊन आपले दान अर्पण करायचे होते.

१८ त्या काळात लोक यहोवाच्या मंदिरात “दान” म्हणजेच अर्पण किंवा बलिदाने आणत. प्राण्यांची बलिदाने देण्याची आज्ञा स्वतः देवाने दिली असल्यामुळे ती मोशेच्या नियमशास्त्रानुसार इस्राएली लोकांच्या उपासनेचा भाग होती आणि त्याअर्थी अतिशय महत्त्वाची होती. पण तरीसुद्धा, आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुम्हाला आठवल्यास, या समस्येचा प्रथम सोक्षमोक्ष लावणे हे दान अर्पण करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे होते. म्हणूनच येशूने म्हटले, “तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” नियमशास्त्रात सांगितलेले धार्मिक कर्तव्य पार पाडण्यापेक्षा आपल्या भावाशी सलोखा करण्यास प्राधान्य द्यायचे होते.

१९ येशूने हे विधान केवळ विशिष्ट दानांच्या किंवा विशिष्ट अपराधांच्या संदर्भात केले नव्हते. त्याअर्थी, दान कोणतेही असले तरीसुद्धा आपल्या भावाला आपल्याविरुद्ध काही तक्रार आहे हे आठवताच दान देणाऱ्‍या व्यक्‍तीने ते दान अर्पण करणे पुढे ढकलायचे होते. पशू बलिदान असल्यास, जिवंत प्राणी तेथेच मंदिरातील याजकांच्या अंगणात होमवेदीसमोर सोडून त्याने निघून जायचे होते. मतभेद मिटवल्यावरच त्याने परत येऊन आपले दान अर्पण करायचे होते.

२०. एखाद्या बांधवाचा राग आल्यास आपण लवकरात लवकर त्याच्यासोबत समेट का केला पाहिजे?

२० देवाच्या दृष्टीत, आपल्या भावांसोबतचा आपला नातेसंबंध खऱ्‍या उपासनेचा महत्त्वाचा भाग आहे. जे लोक प्राण्यांची बलिदाने देत होते, पण आपल्या बांधवांशी चांगल्या प्रकारे वागत नव्हते, अशा लोकांची बलिदाने यहोवाच्या नजरेत व्यर्थ होती. (मीखा ६:६-८) म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना ‘लवकर समेट करण्याचे’ प्रोत्साहन दिले. (मत्त. ५:२५, पं.र.भा.) त्याच प्रकारे पौलानेही असे लिहिले: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिस. ४:२६, २७) राग येण्याचे वाजवी कारण असले तरीपण आपण लवकरात लवकर समेट करण्यासाठी आवश्‍यक पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून आपण फार वेळ रागावलेल्या स्थितीत राहणार नाही आणि सैतान आपल्या या मनःस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला एखादे अयोग्य कृत्य करण्यास प्रवृत्त करू शकणार नाही.—लूक १७:३, ४.

इतरांशी नेहमी आदरपूर्वक वागा

२१, २२. (क) या लेखात चर्चा केलेल्या येशूच्या सल्ल्याचे पालन आपण कशा प्रकारे करू शकतो? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

२१ येशूने डोंगरावरील प्रवचनात केलेल्या काही विधानांची आपण या लेखात चर्चा केली आहे. ही माहिती आपल्याला इतरांशी प्रेमळपणे व आदरपूर्वक वागण्यास नक्कीच मदत करेल. अपरिपूर्ण असलो तरी आपण सर्व जण येशूच्या सल्ल्याचे पालन करू शकतो कारण तो आणि आपला स्वर्गीय पिता देखील आपल्याकडून अवाजवी अपेक्षा करत नाही. प्रामाणिकपणे आणि प्रार्थनापूर्वक प्रयत्न केल्यास व यहोवा देवाचा आशीर्वाद मिळाल्यास आपण सौम्य वृत्तीचे, दयाळू व शांतिप्रिय व्यक्‍ती बनू शकतो. सत्याचा प्रकाश इतरांना दाखवण्याद्वारे आपण यहोवाचे गौरव करू शकतो. तसेच, वेळ आल्यास आपण आपल्या बांधवांशी समेट करू शकतो.

२२ यहोवाने आपल्या उपासनेचा स्वीकार करावा म्हणून आपण आपल्या शेजाऱ्‍यांशीही योग्य प्रकारे वागणे गरजेचे आहे. (मार्क १२:३१) पुढील लेखात आपण डोंगरावरील प्रवचनातील इतर काही विधानांची चर्चा करू. ही माहिती आपल्याला इतरांचे भले करत राहण्यास साहाय्यक ठरेल. येशूच्या या अप्रतिम उपदेशातील ज्या मुद्द्‌यांची आपण चर्चा केली आहे त्यांवर मनन केल्यावर आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, ‘मी इतरांशी कसे वागतो?’

[तळटीप]

^ परि. 1 या व पुढील लेखाचा अभ्यास करण्याअगोदर तुम्ही वैयक्‍तिकरित्या हे उतारे वाचून काढल्यास तुमचा अभ्यास निश्‍चितच आणखीन अर्थपूर्ण ठरेल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• सौम्यता म्हणजे काय?

• “जे दयाळू ते धन्य” असे का म्हटले आहे?

• आपण आपला प्रकाश लोकांसमोर कशा प्रकारे पडू देतो?

• आपण लवकरात लवकर ‘आपल्या भावाबरोबर समेट’ का केला पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४ पानांवरील चित्र]

आपला प्रकाश इतरांसमोर पडू देण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे राज्य संदेशाचा प्रचार करणे

[५ पानांवरील चित्र]

ख्रिश्‍चनांनी नेहमी देवाच्या आदर्शांनुसार आचरण केले पाहिजे

[६ पानांवरील चित्र]

आपल्या बांधवाशी समेट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा