व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणपणीच यहोवाची सेवा करण्यास सुरुवात करा

तरुणपणीच यहोवाची सेवा करण्यास सुरुवात करा

तरुणपणीच यहोवाची सेवा करण्यास सुरुवात करा

“ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा.”—२ तीम. ३:१४.

१. आपल्या तरुण साक्षीदारांच्या सेवेविषयी यहोवाला कसे वाटते?

यहोवाला तरुण लोक करत असलेली पवित्र सेवा इतकी महत्त्वाची वाटते, की त्याने त्यांच्याविषयी स्तोत्रकर्त्याला एक भविष्यवाणी करण्याची प्रेरणा दिली. या भविष्यवाणीत स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक स्वसंतोषाने, पवित्रतेच्या शोभेने आपणांस अर्पितील; पहाटेच्या उदरातून आलेले दहिवर असे तुझे तरुण तुला आहेत.” (स्तो. ११०:३, पं.र.भा.) होय, यहोवा स्वसंतोषाने त्याची सेवा करू इच्छिणाऱ्‍या तरुणांना खूप मौल्यवान समजतो.

२. भविष्याच्या संबंधाने आज तरुणांना कोणत्या दबावांना तोंड द्यावे लागते?

ख्रिस्ती मंडळीतील तरुणांनो, तुम्ही यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे का? खऱ्‍या देवाची सेवा करण्याची निवड करायला अनेक तरुणांना कदाचित कठीण वाटेल. व्यवसायिक, शिक्षक आणि कधीकधी तर कुटुंबातील सदस्य व मित्रजनही तरुणांना भौतिक ध्येये ठेवण्याचे उत्तेजन देतात. जे तरुण यहोवाच्या उपासनेशी निगडीत असलेली ध्येये ठेवतात त्यांची सहसा थट्टा अथवा टीका केली जाते. परंतु, खऱ्‍या देवाची सेवा करण्याची तुम्ही केलेली निवड ही जीवनातल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वोत्तम आहे. (स्तो. २७:४) याचबाबतीत पुढे तीन प्रश्‍न दिले आहेत ज्यावर तुम्ही विचार करावा: तुम्ही देवाची सेवा का केली पाहिजे? इतरांनी काहीही म्हटले किंवा केले तरी, यहोवाला आपले जीवन समर्पित केलेली व्यक्‍ती म्हणून तुम्हाला यश कसे मिळू शकेल? पवित्र सेवेच्या कोणकोणत्या उत्कृष्ट संधी तुम्हाला मिळू शकतात?

यहोवाची सेवा करण्याची निवड सर्वात उत्तम निवड

३. यहोवाची सृष्टी पाहून आपण काय करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे?

तुम्ही खऱ्‍या व जिवंत देवाची सेवा का केली पाहिजे? प्रकटीकरण ४:११ मध्ये याचे एक मुख्य कारण देण्यात आले आहे: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचा यहोवा अद्‌भुत निर्माणकर्ता आहे. ही पृथ्वी किती सुरेख आहे! वृक्षराजी, रंगीबेरंगी फुले, प्राणी, महासागरे, डोंगर-दऱ्‍या, धबधबे, ही सर्व यहोवाची हस्तकृती आहेत. स्तोत्र १०४:२४ मध्ये असे म्हटले आहे: “[परमेश्‍वराच्या] समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.” यहोवाने आपल्याला प्रेमळपणे शरीर व मन दिले आहे ज्याबद्दल आपण त्याचे खूप आभारी आहोत. यामुळेच तर आपण पृथ्वीवरील गोष्टींचा मनसोक्‍त आनंद लुटू शकतो. मग, या विस्मयकारक सृष्टीबद्दल आपल्याला असलेल्या कृतज्ञतेपोटी आपण त्याची सेवा करण्यास प्रवृत्त होऊ नये का?

४, ५. देवाने केलेल्या कोणत्या कार्यांमुळे यहोशवाला त्याच्या समीप असल्यासारखे वाटले?

यहोवाची सेवा करण्याचे आणखी एक कारण आपल्याला, प्राचीन इस्राएल लोकांचा नेता यहोशवा याने काढलेल्या उद्‌गारांतून समजते. आपल्या आयुष्याच्या शेवटी यहोशवाने देवाच्या लोकांना असे सांगितले: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” कोणत्या आधारावर यहोशवा असे म्हणू शकला?—यहो. २३:१४.

ईजिप्तमध्ये वाढल्यामुळे यहोशवाला यहोवाने आपल्या लोकांना त्यांचा स्वतःचा देश देईन, असे जे वचन दिले होते त्याविषयी माहीत असावे. (उत्प. १२:७; ५०:२४, २५; निर्ग. ३:८) फारोने इस्राएल लोकांना त्यांच्या मायदेशी जाऊ देण्यास नकार दिला तेव्हा ईजिप्तवर दहा पीडा आणून यहोवाने या हट्टी राजाला कसे वाकवले व यहोवाने आपल्या लोकांना दिलेले वचन पूर्ण करण्यास कशी सुरुवात केली हे यहोशवाने पाहिले होते. लाल समुद्रातून सुखरूप पार झालेल्यांमध्ये व मग फारोला व त्याच्या सैन्याला समुद्राने कसे गिळंकृत केले हे पाहणाऱ्‍यांमध्ये यहोशवाचा देखील समावेश होता. सीनाय वाळवंटाच्या “भयानक रानातून” दूरचा प्रवास करत असताना यहोवाने इस्राएल लोकांना लागणाऱ्‍या सर्व गोष्टी कशा पुरवल्या हेही यहोशवाने पाहिले होते. इस्राएल लोकांपैकी एकही जण तहानेने किंवा भुकेने मृत्यूमुखी पडला नाही. (अनु. ८:३-५, १४-१६; यहो. २४:५-७) बलाढ्य कनानी राष्ट्रांवर चढाई करून वचनयुक्‍त देशाचा ताबा मिळवण्याची वेळ आली तेव्हा यहोवा, त्याची उपासना करणाऱ्‍या लोकांच्या पाठीशी कसा खंबीरपणे उभा होता हे देखील यहोशवाने पाहिले होते.—यहो. १०:१४, ४२.

६. काय केल्याने तुमच्यामध्ये यहोवा देवाची सेवा करण्याची इच्छा जागृत होऊ शकेल?

यहोवाने दिलेले वचन पाळले, हे यहोशवाला ठाऊक होते. त्यामुळेच तर त्याने असे म्हटले: “मी आणि माझे घराणे तर परमेश्‍वराची सेवा करणार.” (यहो. २४:१५) तुमच्याविषयी काय? यहोवा देवाने पूर्ण केलेल्या व लवकरच पूर्ण करणाऱ्‍या प्रतिज्ञांचा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला देखील यहोशवाप्रमाणे त्याची सेवा कराविशी वाटते का?

७. पाण्याने बाप्तिस्मा घेणे एक महत्त्वपूर्ण पाऊल का आहे?

यहोवाच्या सृष्टीवर आणि त्याच्या उल्लेखनीय व पूर्णपणे भरवसा करण्यालायक प्रतिज्ञांवर मनन करून तुम्ही फक्‍त समर्पणच नव्हे तर पाण्याने बाप्तिस्मा घेऊन हे समर्पण व्यक्‍त करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे. जे यहोवा देवाची सेवा करू इच्छितात त्यांनी बाप्तिस्म्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचललेच पाहिजे. आपला आदर्श येशू याने आपल्या कार्यातून हे स्पष्टपणे दाखवून दिले. मशीहा म्हणून त्याला मिळालेली नेमणूक सुरू करण्याआधी तो बाप्तिस्मा घेण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाकडे गेला. येशूने बाप्तिस्मा का घेतला? त्याने नंतर म्हटले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” (योहा. ६:३८) पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो स्वतःला सादर करत आहे हे दाखवण्यासाठी त्याने बाप्तिस्मा घेतला.—मत्त. ३:१३-१७.

८. तीमथ्याने खऱ्‍या देवाची उपासना करण्याची निवड का केली व तुम्हाला काय करावे लागेल?

दुसरे उदाहरण आहे तीमथ्याचे. तीमथ्य या तरुण ख्रिस्ती बांधवाला यहोवाने नंतर पुष्कळ कामे व अनेक जबाबदाऱ्‍या दिल्या. तीमथ्याने खऱ्‍या देवाची उपासना करण्याची निवड का केली? बायबल आपल्याला त्याच्याविषयी असे सांगते, की त्याला देवाविषयी अनेक गोष्टी ‘शिकवण्यात आल्या होत्या व त्याविषयी त्याची खात्री झाली होती.’ (२ तीम. ३:१४) तुम्ही जर बायबलचा अभ्यास केला असेल आणि बायबलमधील सर्व शिकवणी खऱ्‍या आहेत अशी तुमची खात्री पटली असेल तर तुम्ही देखील तीमथ्याप्रमाणे देवाची सेवा करण्यास तयार झाला आहात. आता तुम्हाला फक्‍त निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही काय करू इच्छिता याबद्दल आपल्या पालकांजवळ बोलायला काय हरकत आहे? तुमचे पालक आणि मंडळीतील वडील जन तुम्हाला बाप्तिस्म्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या शास्त्र आधारित अटी समजण्यास मदत करतील.—प्रेषितांची कृत्ये ८:१२ वाचा.

९. तुम्ही बाप्तिस्मा घेता तेव्हा इतर लोकांना तुमच्याविषयी काय वाटेल?

तुम्ही जर बाप्तिस्मा घेतलात तर खऱ्‍या देवाची सेवा करण्यासाठी ही एक उत्तम सुरुवात ठरेल. बाप्तिस्मा घेण्याद्वारे तुम्ही जणू काय एका दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत भाग घेता. भविष्यात सार्वकालिक जीवन आणि आता देवाची इच्छा पूर्ण केल्याने मिळणारा आनंद, ही या शर्यतीची प्रतिफळे आहेत. (इब्री १२:२, ३) या शर्यतीत आधीपासूनच असलेल्या तुमच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना व ख्रिस्ती मंडळीतल्या तुमच्या मित्रांना तुम्हाला पाहून आनंद वाटेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही यहोवाचे मन आनंदित कराल. (नीतिसूत्रे २३:१५ वाचा.) तुम्ही यहोवाची उपासना करण्याची निवड का केली आहे हे जगीक लोकांना समजणार नाही. ते कदाचित आक्षेप घेतील किंवा तुम्हाला विरोधही करतील. तरीपण तुम्ही यावर मात करू शकता.

इतर जण आक्षेप घेतात किंवा विरोध करतात तेव्हा

१०, ११. (क) यहोवाची सेवा करण्याचा तुम्ही निर्णय घेता तेव्हा लोकांच्या मनात कदाचित कोणकोणते प्रश्‍न येतील? (ख) खऱ्‍या उपासनेविषयी येशूला जेव्हा लोकांनी प्रश्‍न विचारले तेव्हा त्याने ज्याप्रकारे या प्रश्‍नांची उत्तरे दिली त्यावरून तुम्ही काय शिकू शकता?

१० यहोवाची सेवा करण्याचा तुम्ही घेतलेला निर्णय कदाचित तुमच्या शाळासोबत्यांना, शेजाऱ्‍यांना, नातेवाईकांना समजणार नाही. तुम्ही हा मार्ग का निवडला, तुमचे काय विश्‍वास आहेत, यांविषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्‍न येतील. अशावेळी तुमची प्रतिक्रिया कशी असावी? अर्थात तुम्ही आधी तुमच्या विचारांचे व भावनांचे परीक्षण करून पाहिले पाहिजे जेणेकरून तुम्ही हा निर्णय का घेतला त्याची कारणे तुम्हाला समजावून सांगता येऊ शकतील. तुमच्या धार्मिक विश्‍वासांविषयी समजावून सांगताना तुम्ही येशू ख्रिस्ताशिवाय आणखी कोणत्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करू शकाल?

११ यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांनी येशूला जेव्हा पुनरुत्थानाविषयी उलट-सुलट प्रश्‍न विचारले तेव्हा त्याने त्यांचे लक्ष एका शास्त्रवचनाकडे वळवले ज्याचा त्यांनी पूर्वी कधीच विचार केला नव्हता. (निर्ग. ३:६; मत्त. २२:२३, ३१-३३) एका शास्त्र्याने जेव्हा येशूला सर्वात मोठी आज्ञा कोणती असा प्रश्‍न विचारला तेव्हा येशूने सरळ बायबलमधूनच त्याला योग्य उत्तर दाखवले. हे उत्तर ऐकून त्या मनुष्याने येशूचे आभार मानले. (लेवी. १९:१८; अनु. ६:५; मार्क १२:२८-३४) शास्त्रवचनांचा वापर करण्याच्या व बोलण्याच्या येशूच्या पद्धतीमुळे “लोकसमुदायात फूट” पडत असे परंतु त्याचे विरोधक त्याच्या केसांनाही धक्का पोहचवू शकत नव्हते. (योहा. ७:३२-४६) तुमच्या विश्‍वासाविषयी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना बायबलचा उपयोग करा आणि “सौम्यतेने व भीडस्तपणाने” उत्तर द्या. (१ पेत्र ३:१५) एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर तुम्हाला माहीत नसेल तर तसे सांगा आणि तुम्ही त्या विषयावर आणखी संशोधन करून मग उत्तर द्याल असे सांगायला लाजू नका. नंतर, वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स अथवा तुम्हाला समजत असलेल्या भाषेत सीडी-रोमवर वॉचटावर लायब्ररी असेल तर त्या विषयावर आणखी संशोधन करा. उत्तम तयारी केल्यास ‘प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्हाला समजेल.’—कलस्सै. ४:६.

१२. तुमचा छळ झाला तर तुम्ही निराश का होऊ नये?

१२ देवाची सेवा करण्याच्या तुम्ही घेतलेल्या निर्णयाविषयी आणि तुमच्या विश्‍वासांविषयी लोक तुम्हाला कदाचित फक्‍त प्रश्‍न विचारुनच थांबणार नाहीत. हे जग, देवाचा शत्रू सैतान याच्या कह्‍यात आहे. (१ योहान ५:१९ वाचा.) यामुळे सर्वच लोक तुमची वाहवाह करतील किंवा तुमची प्रशंसा करतील, अशी अपेक्षा करू नका. काही जण तुमचा विरोधही करतील. ते “तुमची निंदा” एक दोनदाच नव्हे तर कदाचित नेहमीच करतील. (१ पेत्र ४:४) पण तुम्ही एकटे नाही, हे लक्षात असू द्या. येशू ख्रिस्तानेही छळ सोसला. तसेच प्रेषित पेत्राने देखील छळाचा सामना केला. त्याने असे लिहिले: “प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका; ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहा त्याअर्थी आनंद करा.”—१ पेत्र ४:१२, १३.

१३. ख्रिश्‍चन असल्यामुळे आपला छळ होतो तेव्हा आपण आनंद का मानला पाहिजे?

१३ ख्रिश्‍चन असल्यामुळे तुम्हाला जेव्हा छळाचा किंवा विरोधाचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही आनंद मानला पाहिजे. आनंद का मानला पाहिजे? कारण जग तुमचा विरोध करत नसेल तर याचा अर्थ, तुम्ही देवाच्या नव्हे तर सैतानाच्या तत्त्वांनुसार जगत आहात. येशूने असा इशारा दिला: “जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांस असेच म्हणत असत.” (लूक ६:२६) आपला छळ होतो याचा अर्थ सैतान आणि त्याचे जग आपण यहोवाची सेवा करत आहोत म्हणून आपल्यावर क्रोधीत आहेत. (मत्तय ५:११, १२ वाचा.) आणि ‘ख्रिस्ताच्या नावामुळे निंदा’ होणे ही आनंदाची गोष्ट आहे.—१ पेत्र ४:१४.

१४. छळ होत असतानाही आपण यहोवाशी विश्‍वासू राहिलो तर कोणते फायदे होतात?

१४ विरोध होत असतानाही तुम्ही जेव्हा यहोवा देवाशी विश्‍वासू राहता तेव्हा याचे निदान चार फायदे होतात. तुम्ही देव आणि त्याचा पुत्र यांविषयी साक्ष देता. तुम्ही विश्‍वासूपणे परीक्षा सहन करत असल्याचे पाहून तुमच्या ख्रिस्ती बंधूभगिनींना उत्तेजन मिळते. ज्या लोकांना यहोवाविषयी कसलीही माहिती नाही ते त्याला जाणून घेण्यास प्रवृत्त होतात. (फिलिप्पैकर १:१२-१४ वाचा.) आणि शेवटी परीक्षांचा सामना करण्यासाठी यहोवा बळ देत असल्याची तुम्हाला जाणीव होते तेव्हा त्याच्यावरील तुमचे प्रेम आणखी वाढते.

‘मोठे द्वार’ तुमच्यासाठी उघडण्यात आले आहे

१५. प्रेषित पौलासमोर कोणते ‘मोठे द्वार’ उघडण्यात आले होते?

१५ इफिससमधील आपल्या सेवेविषयी प्रेषित पौलाने असे लिहिले: “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे.” (१ करिंथ. १६:८, ९) हे द्वार म्हणजे, पौलाला त्या शहरात मोठ्या प्रमाणात सुवार्तेचा प्रचार करण्याची व शिष्य बनवण्याची मिळालेली संधी. ही संधी स्वीकारून पौलाने अनेक लोकांना यहोवाविषयी शिकून घेण्यास व त्याची उपासना करण्यास मदत केली.

१६. सन १९१९ मध्ये अभिषिक्‍त शेष वर्गाच्या सदस्यांसमोर कोणते ‘दार उघडण्यात आले’?

१६ सन १९१९ मध्ये, वैभवशाली येशू ख्रिस्ताने अभिषिक्‍त शेष वर्गाच्या सदस्यांसमोर एक “दार उघडून ठेवले,” अर्थात त्यांना एक संधी दिली. (प्रकटी. ३:८) शेष वर्गाच्या सदस्यांनी ही संधी स्वीकारून सुवार्तेचा प्रचार करण्यास व बायबलमधील सत्य पूर्वीपेक्षा अधिक जोमाने शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्या सेवेचा काय परिणाम झाला आहे? राज्याची सुवार्ता पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यात पोहचली आहे आणि सुमारे सत्तर लाख लोकांना देवाच्या नवीन जगात सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची आशा मिळाली आहे.

१७. ‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या दारातून’ तुम्ही प्रवेश कसा करू शकता?

१७ यहोवाच्या सर्व सेवकांसमोर आजही एक “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” खुले आहे. सुवार्तेच्या प्रचार कार्यात अधिक सहभाग घेण्याची संधी असणाऱ्‍यांना खूप आनंद व समाधान मिळते. यहोवाच्या तरुण सेवकांनो, “सुवार्तेवर विश्‍वास” ठेवण्यास इतरांना मदत करण्याच्या तुम्हाला मिळालेल्या अतुलनीय संधीला तुम्ही किती मौल्यवान समजता? (मार्क १:१४, १५) तुम्ही सामान्य पायनियर अथवा साहाय्यक पायनियर म्हणून सेवा करण्याचा कधी विचार केला आहे का? राज्य सभागृह बांधकाम, बेथेल सेवा, मिशनरी सेवा यासारख्या संधी तुमच्यासारख्या अनेक तरुणांसमोर खुल्या आहेत. सैतानाच्या दुष्ट जगाचा घडा भरत आला आल्यामुळे फार कमी वेळ उरला आहे. तेव्हा, राज्य सेवेच्या कोणत्याही पैलूत भाग घेणे ही निकडीची बाब बनली आहे. वेळ आहे तोपर्यंत तुम्ही या ‘मोठ्या दारातून’ प्रवेश कराल का?

“परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा”

१८, १९. (क) कोणत्या गोष्टीमुळे यहोवाची सेवा करण्याची दावीदाची इच्छा आणखी प्रबळ झाली? (ख) देवाची उपासना करण्यात घालवलेल्या आयुष्याचा दावीदाला मुळीच पस्तावा झाला नाही हे कशावरून दिसते?

१८ “परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा,” असे आमंत्रण ईश्‍वरप्रेरित स्तोत्रकर्ता इतरांना देतो. (स्तो. ३४:८) प्राचीन इस्राएलचा राजा दावीद लहानपणी एक मेंढपाळ होता. यहोवाने त्याला जंगली जनावरांच्या हल्ल्यांतून वाचवले होते. गल्याथाबरोबरच्या लढाईत देव त्याच्या पाठीशी उभा होता व इतर अनेक संकटांतून त्याने त्याला वाचवले. (१ शमु. १७:३२-५१; स्तो. १८, उपरीलेखन) देवाच्या महान प्रेमळ-दयेमुळे दावीद असे लिहिण्यास प्रवृत्त झाला: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही.”—स्तो. ४०:५.

१९ दावीदाचे यहोवावर खूप प्रेम होते. पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने स्तुती करण्याची त्याची इच्छा होती. (स्तोत्र ४०:८-१० वाचा.) खऱ्‍या देवाची उपासना करण्यात त्याने जी वर्षे घालवली होती याचा त्याला मुळीच पस्तावा झाला नाही. देवाच्या नीतिनियमांनुसार वागणे हे त्याच्यासाठी अमूल्य संपत्तीसारखे होते. यातून त्याला जो आनंद मिळाला त्याची तुलना कशासोबतही करता येत नाही. आपल्या म्हातारपणी दावीदाने असे म्हटले: “हे प्रभू, परमेश्‍वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. . . . मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.” (स्तो. ७१:५, १८) दावीद शारीरिकरीत्या अशक्‍त झाला होता परंतु यहोवावरील त्याचा भरवसा आणि यहोवासोबतची त्याची मैत्री मात्र आणखी सशक्‍त झाली होती.

२०. यहोवाची सेवा करण्यात आपले आयुष्य घालवण्याचा निर्णय हा सर्वात उत्तम निर्णय का आहे?

२० यहोशवा, दावीद आणि तीमथ्य यांचे उदाहरण, यहोवाची सेवा करण्यात आपले आयुष्य घालवण्याचा निर्णय हा सर्वात उत्तम निर्णय आहे याचा आणखी एक पुरावा आहे. यहोवा देवाची ‘जिवेभावे सेवा’ केल्यामुळे मिळणाऱ्‍या दीर्घ-काळ लाभांची सर, या जगातल्या कामातून मिळणाऱ्‍या अल्प-काळाच्या लाभांना कदापि येणार नाही. (यहो. २२:५) तुम्ही प्रार्थनेद्वारे यहोवाला आपले जीवन अद्यापही समर्पित केले नसेल तर स्वतःला हा प्रश्‍न विचारा: ‘कोणती गोष्ट मला यहोवाचा साक्षीदार बनण्यापासून अडवत आहे?’ तुम्ही जर बाप्तिस्मा घेतलेले यहोवा देवाचे उपासक आहात तर जीवनातला आनंद आणखी वाढवायला तुम्हाला आवडेल का? मग होता होईल तितकी अधिक देवाची सेवा करा आणि ख्रिस्ती या नात्याने प्रगती करीत राहा. प्रेषित पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करून तुम्ही आध्यात्मिक प्रगती कशी करू शकता, हे पुढील लेखात सांगण्यात आले आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपण देवाची सेवा का केली पाहिजे याची दोन कारणे सांगा.

• कोणत्या गोष्टीने तीमथ्याला देवाची सेवा करण्याचा निर्णय घेण्यास मदत केली?

• छळ होत असतानाही तुम्ही खंबीर का राहिले पाहिजे?

• तुमच्यासमोर कोणत्या संधी आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

यहोवाची सेवा करण्यात आपले आयुष्य घालवण्याचा निर्णय हा सर्वात उत्तम निर्णय आहे

[१९ पानांवरील चित्र]

तुमच्या विश्‍वासांविषयी कोणी प्रश्‍न विचारल्यास तुम्हाला उत्तरे देता येतील का?