व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या राज्याद्वारे लवकरच आपली सुटका होणार!

देवाच्या राज्याद्वारे लवकरच आपली सुटका होणार!

देवाच्या राज्याद्वारे लवकरच आपली सुटका होणार!

“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्त. ६:१०.

१. येशूची मुख्य शिकवण काय होती?

डोंगरावरील प्रवचनात येशू ख्रिस्ताने एका आदर्श प्रार्थनेचाही समावेश केला. या प्रार्थनेत आपल्याला त्याच्या मुख्य शिकवणीचा सारांश सापडतो. त्याने आपल्या अनुयायांना अशा प्रकारे प्रार्थना करण्यास शिकवले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्त. ६:९-१३) येशू ‘उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरला.’ (लूक ८:१) त्याने आपल्या अनुयायांना असे प्रोत्साहन दिले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (मत्त. ६:३३) या लेखाचा अभ्यास करताना, क्षेत्र सेवाकार्यात उपयोगात आणता येतील अशा मुद्द्‌यांकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, यांपैकी एखादा प्रश्‍न कोणी विचारल्यास त्याचे उत्तर कसे देता येईल यावर विचार करा: राज्याचा संदेश महत्त्वाचा का आहे? मानवजातीला कशापासून सुटका हवी आहे? आणि देवाचे राज्य कशा प्रकारे आपली सुटका करेल?

२. राज्याचा संदेश इतका महत्त्वाचा का आहे?

येशूने असे भाकीत केले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्त. २४:१४) देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता अत्यंत महत्त्वाची आहे. किंबहुना, हा जगातला सर्वात महत्त्वाचा संदेश आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही! सबंध जगात, १,००,००० पेक्षा जास्त मंडळ्यांमध्ये जवळजवळ सत्तर लाख यहोवाचे साक्षीदार एका अभूतपूर्व प्रचार कार्यात सहभागी होऊन देवाचे राज्य स्थापन झाल्याची घोषणा करत आहेत. ही खरोखरच एक सुवार्ता आहे कारण पृथ्वीच्या कारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेण्याकरता देवाने एक सरकार स्थापन केले आहे, असा याचा अर्थ होतो. देवाच्या राज्याच्या शासनाखाली, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही देवाच्या इच्छेप्रमाणे घडून येईल.

३, ४. पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे घडून येईल तेव्हा मानवजातीला कोणते आशीर्वाद मिळतील?

पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे घडून येईल तेव्हा मानवजातीला कोणते आशीर्वाद मिळतील? यहोवा “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटी. २१:४) आदामाकडून वारशाने मिळालेले पाप व अपरिपूर्णता यामुळे कोणीही आजारी पडणार नाही किंवा मरणार नाही. मृत्यू झालेल्यांपैकी जे देवाच्या स्मृतीत आहेत त्यांना सर्वकाळ जगण्याची संधी दिली जाईल, कारण बायबल असे आश्‍वासन देते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रे. कृत्ये २४:१५) युद्धे, रोगराई व दुष्काळ यांसारख्या गोष्टी इतिहासजमा होतील आणि या पृथ्वीचे एका सुंदर नंदनवनात रूपांतर केले जाईल. हिंस्र प्राणी देखील तेव्हा मानवांसोबत व एकमेकांसोबत शांतीने राहतील.—स्तो. ४६:९; ७२:१६; यश. ११:६-९; ३३:२४; लूक २३:४३.

देवाच्या राज्याकरवी मानवजातीला हे अद्‌भुत आशीर्वाद मिळणार असल्यामुळेच बायबलमधील भविष्यवाणीत त्या काळाचे या सांत्वनदायक शब्दांत वर्णन केले आहे: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” पण जे उपद्रव माजवतात त्यांच्याविषयी काय? बायबल सांगते: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल.” पण “परमेश्‍वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.”—स्तो. ३७:९-११.

५. सध्याच्या जगाचे काय होईल?

पण हे सर्व घडून येण्याकरता आधी सध्याचे जग व यातील परस्परविरोधी सरकारे, धर्म व व्यापारी यंत्रणा नाहीशा केल्या जाणे आवश्‍यक आहे. देवाचे स्वर्गीय सरकार अगदी हेच करेल. संदेष्टा दानीएल याने देवाच्या प्रेरणेने असे भाकीत केले: “त्या [सध्या राज्य करत असलेल्या] राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव [स्वर्गात] एका राज्याची स्थापना करील. त्याचा कधी भंग होणार नाही. त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही. तर ते या [सध्याच्या] सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानी. २:४४) देवाचे राज्य, म्हणजेच एक नवे स्वर्गीय सरकार पृथ्वीवरील एका नव्या समाजावर शासन करू लागेल. अशा रीतीने, एक “नवे आकाश व नवी पृथ्वी” अस्तित्वात येईल व यांत “नीतिमत्त्व वास” करेल.—२ पेत्र ३:१३.

आता सुटका होण्याची जास्त गरज

६. या दुष्ट जगातील वाईट परिस्थितीचे बायबलमध्ये कशा प्रकारे वर्णन करण्यात आले आहे?

योग्य व अयोग्य काय हे आपल्या मनाने ठरवण्याच्या इच्छेपोटी जेव्हा सैतान, आदाम व हव्वा यांनी देवाविरुद्ध बंड केले तेव्हापासून मानवी कुटुंब अधोगतीच्या मार्गाला लागले. याच्या जवळजवळ १,६०० वर्षांनंतर, जागतिक जलप्रलयाअगोदर ‘पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार झाली, त्यांच्या मनात येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट होत्या.’ (उत्प. ६:५) मग, सुमारे १,३०० वर्षांनंतर शलमोनाला त्याच्या काळातील परिस्थिती इतकी वाईट झाल्याचे आढळले, की त्याने असे लिहिले: “जे अद्यापि हयात आहेत त्यांपेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी असे मी म्हटले. जो अजून उत्पन्‍न झाला नाही, ज्याने ह्‍या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्‍या दोघांपेक्षाहि बरी.” (उप. ४:२, ३) आणखी ३,००० वर्षे पुढे गेल्यास आपण आपल्या काळात येतो. आजही दुष्टाई वाढतच असल्याचे आपण पाहत आहोत.

७. मानवजातीला आज देवाच्या राज्याकरवी सुटका होण्याची जास्त गरज का आहे?

दुष्टाई बऱ्‍याच काळापासून अस्तित्वात आहे हे खरे असले, तरीसुद्धा इतर कोणत्याही काळापेक्षा मानवजातीला आज देवाच्या राज्याकरवी सुटका होण्याची जास्त गरज आहे. मागच्या १०० वर्षांदरम्यान परिस्थिती इतिहासात कधी नव्हती इतकी बिघडली आणि दिवसेंदिवस ती बिघडतच आहे. उदाहरणार्थ, वर्ल्डवॉच इंस्टिट्यूटने एका वृत्तात असे म्हटले: “इ.स. पहिल्या शतकापासून १८९९ सालापर्यंतच्या सर्व युद्धांत जितके लोक मारले गेले त्यापेक्षा तिप्पट संख्येने [२० व्या] शतकातील युद्धांत लोकांचे बळी गेले.” १९१४ पासून आतापर्यंत १० कोटी पेक्षा जास्त लोक युद्धांत मारले गेले आहेत! एका ज्ञानकोशात असा अंदाज लावण्यात आला की दुसऱ्‍या महायुद्धातच जवळजवळ सहा कोटी लोकांचा बळी गेला. आता तर काही राष्ट्रांजवळ आण्विक शस्त्रे आहेत. या शस्त्रांच्या साहाय्याने मानव एकाच वेळी सबंध राष्ट्रांचे नामोनिशाण मिटवू शकतात. शिवाय, विज्ञान व औषधोपचाराच्या क्षेत्रांत मानवाने अभूतपूर्व प्रगती केली असूनही दरवर्षी जवळजवळ पन्‍नास लाख मुले उपासमाराला बळी पडतात.—बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील ९ वा अध्याय पाहावा.

८. हजारो वर्षांच्या मानवी शासनामुळे कोणती गोष्ट निर्विवादपणे सिद्ध झाली आहे?

मानवांनी बरेच प्रयत्न करूनही त्यांना या वाढत्या दुष्टाईला आळा घालता आला नाही. शांती, समृद्धी व आरोग्य यांसारख्या मनुष्याच्या मूलभूत गरजा या जगातील राजकीय, व्यापारी व धार्मिक संस्था कधीही पुरवू शकल्या नाहीत. मानवजातीसमोर असलेल्या भयानक समस्या सोडवणे तर दूरच राहिले, पण या संस्थांनी जणू आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या मानवी राज्याकडे पाहून, पुढील शब्द किती खरे आहेत याची जाणीव होते: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्म. १०:२३) ‘मनुष्याने दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसानच’ केले आहे. (उप. ८:९) मानवच नव्हेत तर, “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”—रोम. ८:२२.

९. या ‘शेवटल्या काळातील’ परिस्थितीविषयी खऱ्‍या ख्रिश्‍चनांना काय माहीत आहे?

आपल्या काळाच्या संदर्भात बायबलने असे भाकीत केले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” मानवी शासनाच्या शेवटल्या काळातील परिस्थितीचे वर्णन केल्यानंतर भविष्यवाणीत असे म्हटले आहे: “दुष्ट व भोंदू माणसे ही दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीमथ्य. ३:१-५, १३ वाचा.) त्याअर्थी, जगातली परिस्थिती आणखीनच बिकट होत जाईल हे ख्रिश्‍चनांना माहीत आहे. कारण, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहा. ५:१९) पण आनंदाची गोष्ट म्हणजे जे देवावर प्रेम करतात त्यांची तो लवकरच सुटका करणार आहे. विनाशाकडे वाटचाल करत असलेल्या या जगातून तो लवकरच त्यांना सोडवणार आहे.

केवळ यहोवाच सुटका करू शकतो

१०. केवळ यहोवाच आपली सुटका करू शकतो असे का म्हणता येते?

१० तुम्ही लोकांना सुवार्ता सांगता, तेव्हा केवळ यहोवाच आपली सुटका करू शकतो या गोष्टीकडे त्यांचे लक्ष वेधा. तो आपल्या सेवकांना सर्व संकटांतून सोडवू इच्छितो आणि असे करण्याचे सामर्थ्यही केवळ त्याच्याचजवळ आहे. (प्रे. कृत्ये ४:२४, ३१; प्रकटी. ४:११) यहोवा आपल्या लोकांना सर्व संकटांतून सोडवेल आणि त्याचे उद्देश अवश्‍य पूर्ण करेल याची आपण खात्री बाळगू शकतो कारण त्याने स्वतः अशी प्रतिज्ञा केली आहे: “मी कल्पिले तसे होईलच.” त्याचे वचन “[त्याच्याकडे] विफल होऊन परत येणार नाही.”—यशया १४:२४, २५; ५५:१०, ११ वाचा.

११, १२. देव आपल्या सेवकांना कोणती हमी देतो?

११ दुष्टांचा नाश करताना, यहोवाने आपल्या सेवकांचे रक्षण करण्याची हमी दिली आहे. संदेष्ट्या यिर्मयाला घोर पापी लोकांना निर्भयपणे संदेश घोषित करण्यास पाठवताना देवाने म्हटले: “त्यांस तू भिऊ नको; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.” (यिर्म. १:८) त्याच प्रकारे, सदोम व गमोरा या दुष्ट शहरांचा नाश करण्याअगोदर त्याने लोट व त्याच्या कुटुंबाला सुरक्षित स्थानी नेण्याकरता दोन देवदूतांना पाठवले. आणि ‘तेव्हा परमेश्‍वराने सदोम व गमोरा यांवर गंधक व अग्नि यांचा वर्षाव केला.’—उत्प. १९:१५, २४, २५.

१२ जागतिक पातळीवरही यहोवा आपल्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्‍यांना सोडवण्यास समर्थ आहे. त्याने जलप्रलय आणून प्राचीन काळात एका दुष्ट जगाचा विनाश केला तेव्हा “नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्‍याचे सात जणांसह रक्षण केले.” (२ पेत्र २:५) त्याच प्रकारे, सध्याच्या दुष्ट जगाचा नाश करतानाही यहोवा सरळ मनाच्या लोकांना सोडवेल. म्हणूनच त्याचे वचन म्हणते: ‘सर्व नम्र जनांनो, परमेश्‍वराचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्‍वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.’ (सफ. २:३) त्या जगव्याप्त विनाशाच्या परिणामस्वरूप, “सरल जन देशात वसतील. . . . परंतु दुष्ट पृथ्वीवरून छेदून टाकले जातील.”—नीति. २:२१, २२, पं.र.भा.

१३. यहोवाच्या सेवकांपैकी ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना कशा प्रकारे सुटका मिळेल?

१३ पण आजारपण, छळ व इतर कारणांमुळे आतापर्यंत देवाच्या सेवकांपैकी कित्येकांचा मृत्यू झाला आहे. (मत्त. २४:९) मग या सर्वांना कशा प्रकारे सुटका मिळेल? याआधी सांगितल्याप्रमाणे, “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रे. कृत्ये २४:१५) आपल्या सेवकांची सुटका करण्यापासून कोणतीही गोष्ट यहोवाला रोखू शकत नाही, हे जाणणे किती सांत्वनदायक आहे!

एक नीतिमान सरकार

१४. देवाचे राज्य हे एक नीतिमान सरकार आहे याची आपण खात्री का बाळगू शकतो?

१४ प्रचार कार्य करताना, लोकांना सांगा की यहोवाचे स्वर्गीय राज्य हे एक नीतिमान सरकार आहे. कारण हे सरकार न्याय, धार्मिकता व प्रीती यांसारख्या देवाच्या अद्‌भुत गुणांच्या आधारावर राज्य करेल. (अनु. ३२:४; १ योहा. ४:८) शिवाय, पृथ्वीवर शासन करण्यास सर्वात सुयोग्य अशा व्यक्‍तीच्या, अर्थात येशू ख्रिस्ताच्या हाती देवाने हे राज्य सोपवले आहे. तसेच, यहोवाने १,४४,००० अभिषिक्‍त जनांना पृथ्वीवरून निवडून त्यांना स्वर्गीय जीवन देण्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून ते ख्रिस्ताचे सहवारसदार या नात्याने त्याच्यासोबत मिळून पृथ्वीच्या कारभारांची देखरेख करतील.—प्रक. १४:१-५

१५. देवाचे राज्य व मनुष्याचे शासन यांतला फरक सांगा.

१५ येशू व १,४४,००० अभिषिक्‍त जनांचे शासन आणि अपरिपूर्ण मानवांनी आजपर्यंत केलेले शासन यांत जमीन अस्मानाचा फरक असेल! या जगातील कित्येक शासकांनी आपल्या प्रजाजनांवर जाचजुलूम व अत्याचार केले. तसेच त्यांनी युद्धाच्या वेदीवर आपल्या प्रजेतील लाखो लोकांचा बळी दिला. म्हणूनच, बायबलमध्ये आपल्याला मानवावर भरवसा न ठेवण्याचा सल्ला दिला आहे, कारण “त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” (स्तो. १४६:३) याउलट, ख्रिस्ताच्या शासनपद्धतीतून त्याचे प्रेमळ व्यक्‍तिमत्त्व झळकेल! येशूने म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवास विसावा मिळेल;’ कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्त. ११:२८-३०.

शेवटले दिवस लवकरच संपुष्टात येणार!

१६. शेवटला काळ कशा प्रकारे संपुष्टात येईल?

१६ या जगाचा शेवटला काळ, किंवा “युगाच्या समाप्तीचे” दिवस १९१४ सालापासून सुरू झाले. (मत्त. २४:३) पण फार लवकर, येशूने ज्याविषयी सांगितले होते, ते “मोठे संकट” येणार आहे. (मत्तय २४:२१ वाचा.) भूतकाळात कधीही आले नव्हते व भविष्यात कधीही येणार नाही अशा त्या महासंकटात सैतानाच्या सबंध जगाचा नाश होईल. पण मोठ्या संकटाची सुरुवात कशा प्रकारे होईल? आणि त्याचा अंत कसा होईल?

१७. मोठ्या संकटाची कशा प्रकारे सुरुवात होईल याविषयी बायबलमध्ये काय सुचवण्यात आले आहे?

१७ मोठ्या संकटाची सुरुवात अचानक होईल. “शांति आहे, निर्भय आहे” असे लोक म्हणत असताना, अनपेक्षितपणे ‘प्रभूचा दिवस’ येईल. (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३ वाचा.) जगातील राष्ट्रे, आपल्या मोठमोठ्या समस्या आपण जवळजवळ सोडवल्याच आहेत, असा विचार करत असताना अकस्मात ‘मोठ्या बाबेलचा’ म्हणजेच खोट्या धर्मांच्या जागतिक साम्राज्याचा नाश होईल, आणि अशा रीतीने मोठ्या संकटाची सुरुवात होईल. ‘मोठ्या बाबेलचा’ नाश झालेला पाहून जगाला आश्‍चर्याचा धक्का बसेल. तिचा नाश करण्यात येईल तेव्हा राजे व इतर जण अवाक होऊन पाहत राहतील.—प्रकटी. १७:१-६, १८; १८:९, १०, १५, १६, १९.

१८. सैतान यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल, तेव्हा यहोवाची प्रतिक्रिया काय असेल?

१८ मोठ्या संकटादरम्यान, एका महत्त्वाच्या घडीला “सूर्य, चंद्र व तारे ह्‍यांत चिन्हे घडून येतील,” आणि “मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल.” तेव्हा, आपण ‘सरळ उभे राहून आपली डोकी वर करू; कारण आपला मुक्‍तिसमय जवळ आलेला असेल.’ (लूक २१:२५-२८; मत्त. २४:२९, ३०) सैतान, किंवा गोग आपल्या सैन्याचा रोख देवाच्या लोकांकडे वळवेल. पण आपल्या विश्‍वासू सेवकांवर हात उगारणाऱ्‍यांविषयी यहोवा असे म्हणतो: “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो [माझ्या] डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जख. २:८) त्यामुळे, देवाच्या लोकांचा नाश करण्याचा सैतानाचा प्रयत्न फोल ठरेल. का? कारण सार्वभौम प्रभू यहोवा आपल्या सेवकांचे रक्षण करण्याकरता लगेच कारवाई करेल.—यहे. ३८:९, १८.

१९. देवाचे सैन्य सैतानाच्या जगाचा सर्वनाश करील याविषयी आपण खात्री का बाळगू शकतो?

१९ देव जगातील राष्ट्रांविरुद्ध कारवाई करेल तेव्हा ‘ते जाणतील की तो यहोवा आहे.’ (यहे. ३६:२३, पं.र.भा.) आपला न्यायदंड बजावण्याकरता तो आपले सैन्य अर्थात ख्रिस्त येशूच्या नेतृत्त्वाखाली कोट्यवधी देवदूतांना, पृथ्वीवरील सैतानाच्या जगाचे जे काही उरले असेल त्याचा नाश करण्याकरता पाठवेल. (प्रकटी. १९:११-१९) प्राचीन काळात, केवळ एका देवदूताने एका रात्रीतच देवाच्या शत्रुंपैकी “एक लक्ष पंचायशी हजार लोक मारिले” होते. हे लक्षात घेता, देवाचे स्वर्गीय सैन्य अगदी सहजपणे पृथ्वीवरील सैतानाच्या व्यवस्थीकरणाचे नामोनिशाण मिटवून टाकेल याविषयी आपण खात्री बाळगू शकतो. हर्मगिदोनात सैतानाच्या जगाचा पूर्ण नाश होईल तेव्हा मोठे संकट संपुष्टात येईल. (२ राजे १९:३५; प्रकटी. १६:१४, १६) यानंतर सैतान व त्याचे दुरात्मे यांना हजार वर्षांकरता अथांग डोहात टाकले जाईल. कालांतराने, त्यांचा नाश केला जाईल.—प्रकटी. २०:१-३.

२०. आपल्या राज्याद्वारे यहोवा काय साध्य करेल?

२० अशा रीतीने, पृथ्वीवरून दुष्टाई पूर्णपणे नाहीशी केली जाईल आणि नीतिमान लोक या पृथ्वीच्या पाठीवर सदासर्वकाळ राहतील. यहोवा आपल्या लोकांची सुटका करणारा महान देव आहे हे सिद्ध झालेले असेल. (स्तो. १४५:२०) आपल्या राज्याद्वारे तो आपले सार्वभौमत्त्व सिद्ध करेल, आपल्या पवित्र नावावरील कलंक मिटवून टाकेल आणि पृथ्वीकरता असलेला आपला महान उद्देश पूर्ण करेल. ही सुवार्ता सर्वांना सांगण्यात हिरिरीने भाग घ्या. तसेच, देवाच्या राज्याकरवी मानवजातीची सुटका होण्याचा काळ जवळ आला आहे हे समजून घेण्यास ‘सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती’ असलेल्या लोकांना साहाय्य करत राहा. तुमच्या या सेवाकार्यात तुम्हाला भरपूर आनंद व समाधान मिळो!—प्रे. कृत्ये १३:४८, NW.

तुम्हाला आठवते का?

• येशूने राज्याच्या महत्त्वावर कशा प्रकारे भर दिला?

• मानवजातीला आज सुटका होण्याची जास्त गरज का आहे?

• मोठ्या संकटादरम्यान आपण कोणत्या घटनांची अपेक्षा करू शकतो?

• यहोवा आपल्या लोकांचे रक्षण करण्यास समर्थ आहे हे कशावरून दिसून येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२, १३ पानांवरील चित्रे]

आपल्या काळात अभूतपूर्व प्रमाणात प्रचार कार्य केले जाईल असे देवाच्या वचनात भाकीत करण्यात आले होते

[१५ पानांवरील चित्र]

यहोवाने नोहा व त्याच्या कुटुंबाचे रक्षण केले. तो आपलेही रक्षण करण्यास समर्थ आहे

[१६ पानांवरील चित्र]

यहोवा “सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही.”—प्रकटी. २१:४