व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पौलाचा कित्ता गिरवून आध्यात्मिक प्रगती करा

पौलाचा कित्ता गिरवून आध्यात्मिक प्रगती करा

पौलाचा कित्ता गिरवून आध्यात्मिक प्रगती करा

“जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे.”—२ तीम. ४:७.

१, २. तार्ससच्या शौलाने आपल्या जीवनात कोणते बदल केले आणि कोणते महत्त्वाचे काम त्याने हाती घेतले?

तार्ससचा शौल बुद्धिमान व निश्‍चयी होता. तरीही, ‘मी पूर्वी दैहिक वासनांनुरुप वागलो,’ असे तो म्हणतो. (इफिस. २:३) मी “पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो,” असे तो स्वतःविषयी नंतर म्हणाला.—१ तीम. १:१३.

कालांतराने मात्र शौलाने आपल्या जीवनात बरेच बदल केले. त्याने पूर्वीची जीवनशैली सोडून दिली आणि ‘स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहण्याकरता’ अर्थात निःस्वार्थ मनोवृत्ती उत्पन्‍न करण्यासाठी बरेच श्रम घेतले. (१ करिंथ. १०:३३) तो सौम्य मनोवृत्तीचा बनला आणि पूर्वी ज्यांचा तो द्वेष करायचा त्या बांधवांना त्याने कोमल दया दाखवली. (१ थेस्सलनीकाकर २:७, ८, वाचा.) त्याने असे लिहिले: “मी . . . सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी.”—इफिस. ३:७, ८.

३. पौलाच्या पत्रांचा व त्याच्या सेवेच्या अहवालांचा अभ्यास केल्याने आपला फायदा कसा होऊ शकेल?

याच शौलाला नंतर पौल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याने सत्यात वाखाणण्याजोगी प्रगती केली. (प्रे. कृत्ये १३:९) आपणही पौलाने लिहिलेली पत्रे, त्याच्या सेवेचा अहवाल यांबद्दलचा अभ्यास करण्याद्वारे व त्याच्या विश्‍वासाचे अनुकरण करण्याद्वारे सत्यात प्रगती करू शकतो. (१ करिंथकर ११:१ आणि इब्री लोकांस १३:७ वाचा.) वरील गोष्टी केल्याने आपल्याला व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाचा एक चांगला परिपाठ घालण्यास, लोकांबद्दल खरे प्रेम विकसित करण्यास व स्वतःविषयी उचित दृष्टिकोन बाळगण्यास प्रेरणा कशी मिळते त्याविषयी आपण पाहू या.

बायबल अभ्यासाचा पौलाचा परिपाठ

४, ५. व्यक्‍तिगत अभ्यासाचा पौलाला फायदा कसा झाला?

पौल एक परूशी होता. त्याला “गमलिएलाच्या चरणांजवळ” बसून “वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले” होते. त्यामुळे त्याला शास्त्रवचनांचे बऱ्‍यापैकी ज्ञान होते. (प्रे. कृत्ये २२:१-३; फिलिप्पै. ३:४-६) त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगचेच तो “अरबस्तानांत”—सिरियाच्या वाळवंटात किंवा कदाचित मनन करण्यास शांत असलेल्या अरेबियन द्वीपकल्पांवरील एखाद्या ठिकाणी गेला असावा. (गलती. १:१७) येशू मशीहा आहे हे सिद्ध करणाऱ्‍या बायबलमधील काही भागांवर पौलाला मनन करायचे होते. शिवाय, जे काम पौलासाठी वाढून ठेवण्यात आले होते त्या कामासाठी त्याला सज्ज व्हायचे होते. (प्रेषितांची कृत्ये ९:१५, १६, २०, २२) आध्यात्मिक गोष्टींवर मनन करण्याचा पौलाने प्रयत्न केला.

व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाद्वारे पौलाने जे ज्ञान व जी सूक्ष्मदृष्टी मिळवली होती त्यामुळे तो इतरांना सत्य अगदी प्रभावीपणे शिकवू शकला. जसे की, पिसिदीयातल्या अंत्युखिया येथील एका सभास्थानात शिकवताना पौलाने, येशू मशीहा आहे हे सिद्ध करणाऱ्‍या इब्री शास्त्रवचनांतील निदान पाच थेट अवतरणांचा उल्लेख केला. पौलाने इब्री शास्त्रवचने थेट उद्धृत न करताही अनेकवेळा त्यांचा उल्लेख केला. बायबलमधून त्याने मांडलेले वाद इतके मन वळावू होते, की देवाची उपासना करणारे ‘पुष्कळ भक्‍तिमान जण पौल व बर्णबा ह्‍यांच्यामागे’ आणखी शिकून घेण्याकरता गेले. (प्रे. कृत्ये १३:१४-४४) अनेक वर्षांनंतर, पौल राहत असलेल्या ठिकाणी रोममधील यहुद्यांचा एक गट त्याच्याकडे आला तेव्हा त्याने त्यांना ‘देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरिता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरिता सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करून’ सांगितली.—प्रे. कृत्ये २८:१७, २२, २३.

६. कोणत्या गोष्टीमुळे पौल परीक्षांचा सामना करत असतानाही आध्यात्मिकरीत्या स्थिर राहू शकला?

पौलाला जेव्हा परीक्षांना तोंड द्यावे लागत होते तेव्हासुद्धा तो शास्त्रवचनांचे परीक्षण करीत राहिला व त्यातील ईश्‍वरप्रेरित सल्ल्यातून शक्‍ती मिळवत राहिला. (इब्री ४:१२) पौलाचा वध होण्याआधी तो रोममध्ये बंदिवासात असताना त्याने तीमथ्याला “पुस्तके” आणि ‘चर्मपत्रे’ आणायला सांगितली. (२ तीम. ४:१३) हे हस्तलेख, कदाचित इब्री शास्त्रवचनांतील काही भाग होते ज्यांचा उपयोग पौलाने गहन अभ्यास करण्यासाठी केला. विश्‍वासात स्थिर राहण्याकरता पौलाला शास्त्रवचनांचे ज्ञान असणे महत्त्वाचे होते व बायबल अभ्यासाचा त्याचा परिपाठ असल्यामुळेच त्याला हे ज्ञान मिळवता आले.

७. नियमितरीत्या बायबलचा अभ्यास केल्याने कोणते फायदे होतात ते सांगा.

बायबलचा नियमित अभ्यास आणि अभ्यासलेल्या गोष्टींवर अर्थपूर्ण मनन केल्यास आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. (इब्री ५:१२-१४) देवाच्या वचनाच्या महत्त्वाविषयी स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “सोन्यारुप्याच्या लक्षावधि नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्‍यांपेक्षा अधिक सूज्ञ करितात; कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरितो.” (स्तो. ११९:७२, ९८, १०१) तुमचा देखील व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाचा परिपाठ आहे का? बायबलचे दररोज वाचन करून व वाचलेल्या गोष्टींवर मनन करून तुम्ही देवाची सेवा करताना भवितव्यात मंडळीत तुम्हाला मिळणाऱ्‍या नेमणुकींसाठी स्वतःला तयार करत आहात का?

शौल लोकांवर प्रेम करायला शिकला

८. यहुदी नसणाऱ्‍या लोकांना शौल कसे वागवत होता?

ख्रिस्ती बनण्याआधी शौल यहुदी धर्माचा कट्टर अनुयायी होता. यहुदी नसणाऱ्‍या लोकांबद्दल त्याला कसलीच काळजी नव्हती. (प्रे. कृत्ये २६:४, ५) काही यहुदी लोक स्तेफनास दगडमार करत होते तेव्हा तो त्यांच्याकडे संमतीकारक नजरेने पाहत उभा होता. स्तेफनास दगडमार करून ठार मारताना ख्रिश्‍चनांचा छळ करून आपण काही वावगे करत नाही, असे कदाचित त्याला या प्रसंगी वाटत असावे. (प्रे. कृत्ये ६:८-१४; ७:५४–८:१) याविषयीच्या ईश्‍वरप्रेरित अहवालात असे म्हटले आहे: “शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाहि धरून आणून तुरुंगात टाकीत असे.” (प्रे. कृत्ये ८:३) “बाहेरच्या नगरापर्यंत देखील [तो] त्यांचा पाठलाग करीत” असे.—प्रे. कृत्ये २६:११.

९. कोणत्या अनुभवामुळे शौलाला लोकांबरोबरील त्याच्या व्यवहारांवर पुनःविचार करावा लागला?

दिमिष्कातल्या ख्रिस्ताच्या शिष्यांचा छळ करण्यासाठी जात असताना प्रभू येशू शौलाशी बोलला. देवाच्या पुत्राच्या दैवी प्रकाशामुळे शौलाची दृष्टी गेली आणि त्याला दुसऱ्‍यांची मदत घ्यावी लागली. यहोवाने हनन्याद्वारे शौलाला त्याची दृष्टी पुन्हा मिळवून देईपर्यंत लोकांकडे बघण्याचा शौलाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. (प्रे. कृत्ये ९:१-३०) ख्रिस्ताचा अनुयायी झाल्यानंतर तो सर्व लोकांशी येशूप्रमाणेच समभावनेने वागला. मात्र यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले. त्याला त्याचा हिंसक स्वभाव बदलावा लागला आणि “सर्व माणसांबरोबर . . . शांतीने” राहावे लागले.रोम. १२:१७-२१ वाचा.

१०, ११. पौलाने लोकांवरील त्याचे खरे प्रेम कसे दाखवले?

१० पौल लोकांबरोबर फक्‍त शांतीनेच राहू इच्छित नव्हता तर तो त्यांच्यावर खरे प्रेम करू इच्छित होता आणि ख्रिस्ती सेवेमुळे त्याला ही संधी मिळाली. त्याच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान त्याने आशिया मायनरमध्ये सुवार्तेचा प्रचार केला. पौलाचा आणि त्याच्या सहकाऱ्‍यांचा जहाल विरोध होत असूनही त्यांनी नम्र लोकांना ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्यास मदत केली. लुस्र व इकुन्या या शहरातल्या लोकांनी एके प्रसंगी पौलाला ठार मारायचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा पौल व त्याचे सहकारी पुन्हा त्या शहरात गेले.—प्रे. कृत्ये १३:१-३; १४:१-७, १९-२३.

११ नंतर, पौलाने व त्याच्या सोबत असलेल्यांनी फिलिप्पै येथील मासेदोनिया शहरात देवाबरोबर नातेसंबंध जोडू इच्छिणाऱ्‍या लोकांना शोधले. लुदिया नावाच्या एका यहुदी मतानुसारी स्त्रीने सुवार्ता ऐकली आणि ती ख्रिस्ती बनली. त्या नगरातील अधिकाऱ्‍यांनी पौल व सीला यांना गजांनी मारले व त्यांना तुरुंगात टाकले. पौलाने तुरुंगाधिकाऱ्‍यालाही प्रचार केला. परिणाम? तुरुंग अधिकारी आणि त्याच्या कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला व ते यहोवाचे उपासक बनले.—प्रे. कृत्ये १६:११-३४.

१२. एकेकाळी ख्रिश्‍चनांच्या जीवावर उठलेला शौल कोणत्या कारणामुळे येशू ख्रिस्ताचा प्रेमळ प्रेषित बनण्यास प्रवृत्त झाला?

१२ शौल एकेकाळी ज्या लोकांचा छळ करत होता त्याच लोकांचा धार्मिक विश्‍वास त्याने का स्वीकारला? कोणत्या गोष्टीमुळे एकेकाळी ख्रिश्‍चनांच्या जीवावर उठलेला हा मनुष्य नंतर देव आणि ख्रिस्त यांच्याबद्दलचे सत्य लोकांनी शिकावे म्हणून आपला जीव धोक्यात घालण्यास तयार असलेला दयाळू व प्रेमळ प्रेषित बनला? पौलच स्वतः याचे उत्तर देतो: “ज्या देवाने मला . . . आपल्या कृपेने बोलाविले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे बरे वाटले.” (गलती. १:१५, १६) पौलाने तीमथ्याला असे लिहिले: “जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्‍वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.” (१ तीम. १:१६) यहोवाने पौलाला क्षमा केली. देवाची ही अपात्र कृपा व दया मिळाल्याने पौल इतरांना सुवार्तेचा प्रचार करून त्यांच्यावर प्रेम दाखवण्यास प्रवृत्त झाला.

१३. कोणत्या गोष्टीमुळे आपण लोकांवर व आपल्या बंधूभगिनींवर प्रेम दाखवण्यास प्रवृत्त झाले पाहिजे, आणि हे प्रेम आपण कशाप्रकारे व्यक्‍त करू शकतो?

१३ यहोवा आपल्याही पापांची व चुकांची क्षमा करतो. (स्तो. १०३:८-१४) स्तोत्रकर्त्याने असे विचारले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तो. १३०:३) देवाने आपल्यावर दया दाखवली नसती तर आपल्यापैकी कोणालाही पवित्र सेवेचा आनंद लुटता आला नसता किंवा सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची आशा बाळगता आली नसती. देवाने अपात्र कृपा दाखवून आपल्या सर्वांवर खूप मेहरबानी केली आहे. त्यामुळे, पौलाप्रमाणे आपणही लोकांना प्रचार करण्याद्वारे व बायबलमधील सत्य त्यांना शिकवण्याद्वारे आपले प्रेम दाखवू शकतो. तसेच आपल्या सहविश्‍वासू बंधूभगिनींचा विश्‍वास मजबूत करून देखील आपण प्रेम व्यक्‍त करू शकतो.—प्रेषितांची कृत्ये १४:२१-२३ वाचा.

१४. प्रचार कार्यातील सहभाग वाढवून आपण कशा प्रकारे एक उत्तम प्रचारक बनू शकतो?

१४ पौलाला प्रचारकार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च करण्याची आणि उत्तम प्रचारक बनण्याची इच्छा होती आणि येशूच्या उदाहरणाची त्याच्या मनावर खोल छाप पडली होती. देवाचा पुत्र येशू याने प्रचार कार्याद्वारे, लोकांना अप्रतिम प्रेम दाखवले. येशूने म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्त. ९:३५-३८) अधिक कामकरी पाठवण्याची पौलाने देवाला विनंती केली असेल आणि त्याने स्वतः एक आवेशी कामकरी बनून या विनंतीच्या सुसंगतेत कार्य केले. तुमच्याविषयी काय? तुम्हीही आपल्या प्रचार कार्याच्या पद्धतीत सुधारणा करू शकता का? किंवा, प्रचार कार्यात कदाचित पायनियरींग करण्याद्वारे तुम्ही तुमचा सहभाग वाढवू शकता का? इतरांना ‘जीवनाचे वचन [घट्ट] धरण्यास’ मदत करण्याद्वारे आपण त्यांना खरे प्रेम दाखवू शकतो.—फिलिप्पै. २:१६.

पौलाचा स्वतःविषयीचा दृष्टिकोन

१५. इतर ख्रिश्‍चनांच्या संदर्भात पौलाने स्वतःविषयी कोणता दृष्टिकोन बाळगला?

१५ ख्रिस्ती सेवक या नात्याने पौलाने आपल्यासाठी आणखी एका बाबतीत उल्लेखनीय उदाहरण मांडले. ख्रिस्ती मंडळीत त्याला अनेक नेमणुका मिळत होत्या. तरीपण, त्याला ही पूर्ण जाणीव होती, की त्याने स्वतःच्या बळावर हे आशीर्वाद मिळवले नव्हते किंवा त्याच्या अंगी असलेल्या विशिष्ट गुणांमुळे त्याला हे आशीर्वाद मिळाले नव्हते. तर, देवाच्या अपात्र कृपेमुळे त्याला हे आशीर्वाद मिळाले होते. इतर ख्रिश्‍चनही सुवार्तेचे प्रभावी सेवक होते, हे पौलाने मान्य केले. देवाच्या लोकांमध्ये त्याला मोठी जबाबदारी मिळाली होती तरीपण तो नम्र होता.—१ करिंथकर १५:९-११, वाचा.

१६. सुंतेच्या वादाच्या बाबतीत पौलाने नम्रता व लीनता कशी दाखवली?

१६ अंत्युखियाच्या एका सिरियन शहरात एका वादाला तोंड फुटले तेव्हा पौलाने तो कसा सोडवला ते पाहा. सुंतेवरून उठलेल्या या वादामुळे ख्रिस्ती मंडळीत दुमत झाले होते. (प्रे. कृत्ये १४:२६–१५:२) सुंता न झालेल्या विदेशी लोकांना प्रचार करण्याच्या कामात पुढाकार घेण्याकरता पौलाची नेमणूक करण्यात आली असल्यामुळे, गैर यहुदी लोकांशी व्यवहार करण्यात आपण पटाईत आहोत व त्याअर्थी, उभा राहिलेला वाद आपण चुटकीसरशी सोडवू शकतो, असे कदाचित त्याला वाटले असेल. (गलतीकर २:८, ९ वाचा.) परंतु, हा वाद सोडवण्यासाठी त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे त्याला जाणवले तेव्हा, ही बाब जेरुसलेममधील नियमन मंडळाकडे नेण्याच्या योजनेला पाठिंबा देऊन त्याने नम्रता व लीनता दाखवली. नियमन मंडळाने हा वाद ऐकून घेतला मग त्यावर निर्णय दिला आणि हा निर्णय इतर सर्व मंडळ्यांना कळवण्यासाठी काही बांधवांना नेमले, ज्यात पौलाचा देखील समावेश होता तेव्हा पौलाने याला पूर्ण सहकार्य दिले. (प्रे. कृत्ये १५:२२-३१) अशाप्रकारे पौलाने आपल्या सहविश्‍वासू सेवकांना ‘आदराने आपणापेक्षा थोर मानण्यात’ पुढाकार घेतला.—रोम. १२:१०ख.

१७, १८. (क) मंडळ्यांतील बंधूभगिनींबद्दल पौलाला कसे वाटत होते? (ख) इफिससमधील वडिलांनी पौलाला निरोप देताना जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून पौलाच्या स्वभावाविषयी आपल्याला काय समजते?

१७ हा नम्र प्रेषित पौल, मंडळ्यांतील आपल्या बंधू भगिनींपासून तुटक राहिला नाही. उलट त्याने त्यांच्याशी आणखी जवळीक साधली. रोमकरांना त्याने लिहिलेल्या पत्राच्या शेवटी त्याने २० पेक्षा अधिक बंधू भगिनींची नावे घेऊन त्यांना नमस्कार पाठवला. यांपैकी बहुतेकांची नावे बायबलमधील इतर पुस्तकात आढळत नाहीत व फार कमी जणांना मंडळ्यांत जबाबदाऱ्‍या होत्या. पण ते यहोवाचे एकनिष्ठ सेवक होते आणि पौलाचे त्यांच्यावर खूप प्रेम होते.—रोम. १६:१-१६.

१८ पौलाच्या नम्र व मैत्रीपूर्ण स्वभावामुळे मंडळ्यांतील बंधूभगिनी विश्‍वासात मजबूत झाले. इफिससमधील वडिलांना भेटण्याची शेवटची वेळ आली तेव्हा “त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्‍यापुढे पडणार नाही, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले.” पण पौल जर घमंडी किंवा तुटक स्वभावाचा असता तर त्याला निरोप देताना त्यांना इतके दुःख झाले असते का?—प्रे. कृत्ये २०:३७, ३८.

१९. सहख्रिश्‍चनांबरोबर व्यवहार करताना आपण ‘लीनता’ कशी दाखवू शकतो?

१९ आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्‍या सर्वांनी पौलासारखी नम्र वृत्ती दाखवली पाहिजे. त्याने सहख्रिश्‍चनांना अशी विनंती केली: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” (फिलिप्पै. २:३) या सल्ल्याचे पालन आपण कसे करू शकतो? एक मार्ग म्हणजे, मंडळीतल्या वडिलांना सहकार्य देऊन, त्यांचे मार्गदर्शन स्वीकारून व त्यांनी घेतलेल्या न्यायिक निर्णयांनुसार चालून आपण या सल्ल्याचे पालन करू शकतो. (इब्री लोकांस १३:१७ वाचा.) दुसरा मार्ग म्हणजे, आपल्या मंडळीतल्या सर्व बंधूभगिनींबद्दल मनात गाढ आदर बाळगण्याद्वारे आपण या सल्ल्याचे पालन करू शकतो. यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांत, विविध राष्ट्राचे, संस्कृतीचे, वंशाचे व जातीचे लोक आहेत. पौलाप्रमाणे आपणही या सर्वांना निःपक्षपणे व प्रेमाने वागवले पाहिजे, नाही का? (प्रे. कृत्ये १७:२६; रोम. १२:१०क) “देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीहि एकमेकांचा स्वीकार करा,” असे आपल्याला उत्तेजन देण्यात आले आहे.—रोम. १५:७.

जीवनाच्या शर्यतीत ‘धीराने धावा’

२०, २१. काय केल्याने आपल्याला जीवनाच्या शर्यतीत यशस्वीरीत्या धावत राहण्यास मदत मिळू शकेल?

२० ख्रिश्‍चन व्यक्‍तीच्या जीवनाची तुलना दीर्घ-पल्ल्याच्या शर्यतीशी करता येऊ शकते. पौलाने असे लिहिले: “मी . . . धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे; प्रभु जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाहि देईल.”—२ तीम. ४:७, ८.

२१ पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यास आपणही सार्वकालिक जीवनासाठी असलेल्या शर्यतीत यशस्वीरीत्या धावू शकू. (इब्री १२:१) तेव्हा, व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाचा एक चांगला परिपाठ घालून, लोकांबद्दल गाढ प्रेम विकसित करून व स्वतःविषयी नम्र वृत्ती बाळगून आपण आध्यात्मिक प्रगती करीत राहू या.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• शास्त्रवचनांच्या नियमित व्यक्‍तिगत अभ्यासामुळे पौलाला फायदा कसा झाला?

• खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी लोकांबद्दल खरे प्रेम दाखवणे महत्त्वाचे का आहे?

• तुमच्या अंगी असलेल्या कोणत्या गुणांमुळे तुम्ही इतरांना निःपक्षपातीपणे वागवू शकाल?

• मंडळीतल्या वडिलांना सहकार्य देण्यास पौलाचे उदाहरण तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

पौलाप्रमाणे शास्त्रवचनांतून शक्‍ती मिळवा

[२४ पानांवरील चित्र]

सुवार्ता सांगून इतरांबद्दल प्रेम दाखवा

[२५ पानांवरील चित्र]

पौलाच्या कोणत्या स्वभावामुळे तो बांधवांचा लाडका होता?