व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अशक्‍त असूनही सशक्‍त

अशक्‍त असूनही सशक्‍त

अशक्‍त असूनही सशक्‍त

आपल्या अंगी असलेल्या उणिवांमुळे कदाचित आपण भारावून जाऊ. जळूंप्रमाणे त्या कदाचित आपल्याला चिकटून राहतील. या उणिवांवर आपण कधीच मात करू शकणार नाही, आपण कुचकामी आहोत असा विचार आपण स्वतःबद्दल करू. किंवा, इतरांबरोबर स्वतःची तुलना केल्यावर ते आपल्यापेक्षा वरचढ आहेत असे आपल्याला वाटेल. आपले मनोबल खचवणारी आणखी एक गोष्ट आजारपण असू शकते. तुम्हाला कदाचित असा एखादा आजार झाला असेल ज्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस खंगत चालला आहात. तुमची शक्‍ती नाहीशी होत आहे आणि जगण्याची उमेद कमी होत चालली आहे. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही परिस्थितीचा आपण सामना करत असलो तर, यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, असे आपल्याला वाटेल. तुम्हाला कदाचित ईयोबाप्रमाणे वाटेल. त्याने देवाला असे म्हटले: “तू मला अधोलोकात लपविशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेविशील, माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करिशील. तर किती बरे होईल!”—ईयो. १४:१३.

अशा हतबल करणाऱ्‍या परिस्थितीतून तुम्ही बाहेर कसे पडू शकता? बाहेर पडणे सहजसोपे नसले तरी, निदान काही वेळ तरी तुम्ही तुमची समस्या विसरली पाहिजे. उदाहरणार्थ, यहोवाने विचारांना चालना देणारे जे प्रश्‍न आपला विश्‍वासू सेवक, ईयोब याला विचारले त्यावर आपणही मनन करू शकतो: “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. तिचे मोजमाप कोणी ठरविले बरे? तिला मापनसूत्र कोणी लाविले? हे तुला ठाऊक आहे काय?” (ईयो. ३८:४, ५) या प्रश्‍नांचा अर्थ काय होतो यावर जर आपण विचार केला तर यहोवाची सर्वश्रेष्ठ बुद्धी आणि शक्‍ती आपण डोळे झाकून कबूल करू. यामुळे, सध्याच्या व्यवस्थीकरणाला त्याने एका चांगल्या कारणासाठी राहू दिले आहे, हे आपल्याला समजेल.

“शरीरात एक काटा”

यहोवाच्या आणखी एका सेवकाने त्याच्या “शरीरातील एक काटा” अर्थात खूप दिवसांपासून त्याला सतावत असलेली एक समस्या काढून टाकण्याची यहोवाला विनंती केली. ही समस्या काढून टाकावी, अशी प्रेषित पौलाने देवाला तीन वेळा विनंती केली. आपल्या पायात काटा घुसल्यावर आपण जसे बेचैन होतो त्याप्रमाणे पौलाच्या समस्येमुळे तो बेचैन झाला असावा. कदाचित यहोवाच्या सेवेतला त्याचा आनंद कमी झाला असावा. सारखा सलत असलेला हा काटा त्याला, सतत कोणीतरी थोबाडीत मारत असल्याप्रमाणे वाटत होता, असे पौल म्हणतो. पण यहोवाने त्याला असे उत्तर दिले: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्‍तपणातच शक्‍ति पूर्णतेस येते.” यहोवाने पौलाची ही समस्या काढून टाकली नाही. तर पौलालाच या समस्येशी झुंज देत राहण्याचे शिकावे लागले. पण तो म्हणाला: “जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.” (२ करिंथ. १२:७-१०) पौलाने असे म्हणण्याचा काय अर्थ होता?

पौलाची ही समस्या चमत्कारिकपणे गायब झाली नाही. तरीपण, ही समस्या त्याला यहोवाच्या सेवेत उल्लेखनीय गोष्टी साध्य करण्यापासून रोखू शकली नाही. साहाय्यासाठी पौल यहोवावर विसंबून राहिला आणि सतत त्याची मदत मागत राहिला. (फिलिप्पै. ४:६, ७) पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटी पौल असे म्हणू शकला: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे.”—२ तीम. ४:७.

अपरिपूर्ण मानवांमध्ये कितीतरी उणिवा असतात, त्यांना वेगवेगळ्या समस्या असतात आणि तरीपण आपली इच्छा पूर्ण करण्याकरता यहोवा त्यांचा उपयोग करतो. याचे श्रेय यहोवालाच जाते. या सेवकांना त्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी व सेवेतला आनंद टिकवून ठेवण्यासाठी तो त्यांना मार्गदर्शन व बुद्धी देतो. होय, अपरिपूर्ण मानव अशक्‍त असले तरी, अर्थात त्यांच्यात उणिवा असल्या तरी यहोवा त्यांच्या हातून मोठमोठाली कार्ये करवून घेऊ शकतो.

“मी चढून जाऊ नये म्हणून” देवाने माझ्या शरीरातला काटा काढला नाही, असे पौल म्हणतो. (२ करिंथ. १२:७) या ‘काट्यामुळे’ पौलाला त्याच्या मर्यादांची सतत आठवण राहिली व यामुळे तो नम्र राहू शकला. येशूने देखील अशीच शिकवण दिली: “जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.” (मत्त. २३:१२) देवाच्या सेवकांना परीक्षांना तोंड द्यावे लागते तेव्हा ते नम्र होण्यास शिकतात. त्यांना ही जाणीव होते, की शेवटपर्यंत विश्‍वासूपणे टिकून राहण्याकरता त्यांना यहोवावर विसंबून राहण्याची गरज आहे. अशा प्रकारे पौलाप्रमाणे ते ‘परमेश्‍वराविषयी अभिमान बाळगू’ शकतात.—१ करिंथ. १:३१.

छुप्या उणिवा

काही जणांना, आपल्या अंगी उणिवा आहेत, याची जाणीव नसते किंवा ते तसे कबूलही करत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीला फाजील आत्मविश्‍वास असेल. ती तिच्या बुद्धीवर अथवा शक्‍तीवर अवलंबून असेल. (१ करिंथ. १०:१२) अपरिपूर्ण मानवांची आणखी एक उणीव म्हणजे, प्रतिष्ठा मिळवण्याची आकांक्षा.

राजा दाविदाच्या सैन्यातला सेनापती यवाब धाडसी, निर्णायक व कार्यक्षम होता. तरीपण त्याने घमेंड, दांडगाई दाखवून घोर पाप केले. त्याने दोन सेनापतींची निर्घृण हत्या केली. पहिल्यांदा त्याने अबनेराला ठार मारून सूड उगवला. नंतर, आपला मावस भाऊ अमासा याला आलिंगन देण्याचे नाटक करून उजव्या हाताने त्याची दाढी धरली व असे दाखवले, की तो त्याला चुंबन देत आहे व मग आपल्या डाव्या हाताने तलवार खुपसून त्याला ठार मारले. (२ शमु. १७:२५; २०:८-१०) यवाबाच्या जागी अमासाला सेनापती करण्यात आले होते. त्यामुळे यवाबाला अमासावर राग होता. तो त्याला प्रतिस्पर्धी समजत होता. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्याची व सेनापतीचे पद पुन्हा मिळवण्याची ही उत्तम संधी आहे, असे समजून यवाबाने अमासाला ठार मारले. यवाब आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकला नाही. त्याच्या डोक्यात स्वाभिमानाचे खूळ शिरले होते. अमासाला ठार मारल्यानंतर यवाबाला पस्तावा झाल्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. राजा दाविदाने मरायच्या आधी आपला पुत्र शलमोन याला, यवाबाला त्याच्या कार्यांची शिक्षा न विसरता देण्यास बजावले.—१ राजे २:५, ६, २९-३५.

आपल्या मनात वाईट इच्छा येतात तेव्हा आपण त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत. आपण आपल्या उणिवांवर ताबा ठेवला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यात उणिवा आहेत हे आधी आपण ओळखून कबूल केले पाहिजे. मग, त्यांच्यावर मात करण्यासाठी आपण आवश्‍यक ती पावले उचलली पाहिजेत. आपण यहोवाला सतत प्रार्थना करू शकतो. आपल्या उणिवांवर मात करण्यास शक्‍ती देण्यासाठी आपण त्याला विनंती करू शकतो. देवाचे वचन बायबलचा मनःपूर्वक अभ्यास करून, आपण आपल्यातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध झगडण्याचे मार्ग शोधू शकतो. (इब्री ४:१२) आपल्या उणिवांवर आपल्याला फक्‍त एक-दोनदाच नव्हे तर सतत मात करीत राहावी लागेल आणि असे करताना आपण निराश होता कामा नये. आपण अपरिपूर्ण अवस्थेत आहोत तोपर्यंत आपल्याला असा लढा देत राहावा लागेल. पौलाने स्वतःच्या बाबतीत असे कबूल केले: “जे मी इच्छितो ते करितो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करितो.” पण तुम्हाला माहीतच आहे, की पौल कधीही आपल्या कार्यांवर कसलाही ताबा नसल्याप्रमाणे आपल्या उणिवांच्या आहारी गेला नाही. उलट, तो आपल्या अंगी असलेल्या उणिवेविरुद्ध सतत लढा देत राहिला आणि येशू ख्रिस्तामार्फत देवाच्या मदतीवर विसंबून राहिला. (रोम. ७:१५-२५) आणखी एका ठिकाणी पौलाने असे म्हटले: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्‍यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.”—१ करिंथ. ९:२७.

सबबी सांगण्याची मानवांची प्रवृत्तीच आहे. यहोवासारखा दृष्टिकोन विकसित करून आपण या प्रवृत्तीवर मात करू शकतो. पौलाने याबाबतीत ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “वाइटाचा वीट माना; बऱ्‍याला चिकटून राहा.” (रोम. १२:९) आपल्या उणिवांविरुद्ध झगडताना आपल्याला, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि आत्म-शिस्त या गुणांची गरज आहे. दाविदाने यहोवाला अशी विनंती केली: “माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा.” (स्तो. २६:२) आपली खोल आंतरिक प्रवृत्ती यहोवा पारखू शकतो व आवश्‍यक ती मदत आपल्याला देऊ शकतो, हे दाविदाला ठाऊक होते. यहोवा आपले वचन आणि आपला पवित्र आत्मा यांद्वारे पुरवत असलेले मार्गदर्शन आपण स्वीकारले तर आपण आपल्या उणिवांवर मात करण्याच्या दिशेने जे प्रयत्न करत आहोत त्यात यशस्वी होऊ शकू.

काही जण त्यांच्या समस्यांमुळे बेचैन असतील; त्यांना असे वाटत असेल, की या समस्या आपण आपल्या हिंमतीवर सोडवू शकत नाही. अशावेळी मंडळीतले वडील अशा बंधूभगिनींना प्रेमळ साहाय्य व प्रोत्साहन देऊ शकतात. (यश. ३२:१, २) पण या बाबतीत आपण वाजवी असले पाहिजे. काही समस्यांवर या सद्य युगात पूर्णपणे तोडगा नाही. तरीपण, पुष्कळ जण या समस्यांना तोंड देण्यास शिकले आहेत व यामुळे त्यांचे जीवन समाधानकारक झाले आहे.

यहोवाच्या आधाराची हमी

या कठीण काळांत आपल्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी, आपण ही खात्री बाळगू शकतो, की यहोवा आपल्याला मार्ग दाखवेल आणि आपल्याला टिकून राहण्यास मदत करेल. बायबल आपल्याला असे आर्जवते: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:६, ७.

कॅथी बेथेलमध्ये अनेक वर्षांपासून सेवा करत आहे. आपल्या पतीला अल्झायमर्सचा आजार असल्याचे जेव्हा तिला समजले तेव्हा, आपण या आव्हानाला तोंड देऊ शकणार नाही, असे तिला वाटले. बुद्धी व भावनिक शक्‍तिकरता तिला यहोवाला दररोज प्रार्थना करावीच लागायची. तिच्या पतीची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती तेव्हा प्रेमळ बांधवांनी या आजाराविषयीची इत्थंभूत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि भगिनींनी कॅथीची व तिच्या नवऱ्‍याची नेटाने काळजी घेऊन त्यांना भावनिक आधार दिला. या प्रेमळ बंधूभगिनींद्वारेच तर यहोवा कॅथीला साहाय्य देत होता. त्यामुळे कॅथी आपल्या आजारी पतीची त्यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे सुमारे ११ वर्षांपर्यंत देखभाल करू शकली. ती म्हणते: “यहोवानं मला जे साहाय्य पुरवलं त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानताना माझ्या डोळ्यात प्रत्येकवेळा पाणी यायचं. या साहाय्यामुळेच तर मी खंबीर राहू शकले. मी खूप थकून जायचे; तरीपण इतक्या वर्षांपर्यंत मी काम करू शकेन, असं मला वाटलं नव्हतं!”

छुप्या उणिवांवर मात करण्यास साहाय्य

आपण कोणत्याच कामासाठी लायक नाही, असा स्वतःबद्दल विचार करणाऱ्‍या लोकांना वाटेल, की संकटकाळात असताना त्यांनी यहोवाला मारलेली हाक कदाचित तो ऐकणार नाही. पण अशा लोकांनी, दाविदाच्या उदाहरणाचा विचार करावा. बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर दाविदाला स्वतःची खूप लाज वाटली व तो असे म्हणाला: “हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” (स्तो. ५१:१७) दाविदाने अगदी मनापासून पश्‍चात्ताप केला. आता तो देवाला प्रार्थना करू शकतो व देव जरूर त्याला दया दाखवेल अशी खात्री त्याला होती. येशूनेही यहोवाप्रमाणे काळजी व्यक्‍त केली. शुभवर्तमान लेखक मत्तय याने यशयाने उद्‌गारलेले शब्द येशूला लागू करून म्हटले: “चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझविणार नाही.” (मत्त. १२:२०; यश. ४२:३) पृथ्वीवर असताना, येशूने गरीब व जुलूमाने पीडित लोकांना दया दाखवली. दुःखाने जर्जर झालेल्या लोकांमध्ये असलेली शेवटची उमेद अथवा मिणमिणती वात त्याने विझवली नाही. उलट, अशा लोकांमध्ये त्याने नव्याने उमेद निर्माण करून त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत केली. पृथ्वीवर असताना त्याने हेच तर केले. येशू अजूनही असाच आहे. त्याला आपल्या कमतरतांबद्दल सहानुभूती वाटते, असा विश्‍वास तुम्ही करत नाही का? इब्री लोकांस ४:१५ मध्ये त्याच्याविषयी असे म्हटले आहे, की त्याला ‘सर्वांच्या दुर्बलतेविषयी सहानुभूती वाटते.’

आपल्या ‘शरीरातल्या काट्याविषयी’ लिहिताना पौलाला जाणवले, की ख्रिस्ताचे सामर्थ्य त्याच्यावर ‘छायेप्रमाणे’ अर्थात एखाद्या तंबूप्रमाणे होते. (२ करिंथ. १२:७-९) तंबूत गेल्यावर एखाद्या व्यक्‍तीला ऊन-वाऱ्‍यापासून जसे सुरक्षित वाटते तसे ख्रिस्तामार्फत देव पुरवत असलेल्या संरक्षणाचा अनुभव पौल घेऊ शकला. पौलाप्रमाणे आपणही दुर्बलतांच्या आहारी जाण्याची किंवा समस्यांत हार मानण्याची गरज नाही. आध्यात्मिकरित्या खंबीर राहण्याकरता आपण यहोवा देव त्याच्या पृथ्वीवरील मंडळीमार्फत पुरवत असलेल्या सर्व तरतुदींचा उपयोग करू शकतो. आपल्या परीने शक्य ते सर्व आपण करू शकतो आणि यहोवा आपल्याला मार्गदर्शन देईल, असा आत्मविश्‍वास बाळगू शकतो. देवाची शक्‍ती आपल्या उणिवांवर मात करण्यास आपल्याला कशा प्रकारे साहाय्य करते याचा अनुभव घेतल्यावर, आपणही पौलाप्रमाणे असे म्हणू शकतो: “मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.”—२ करिंथ. १२:१०.

[३ पानांवरील चित्र]

पौलाने सेवा पूर्ण करण्याकरता मार्गदर्शन मिळावे म्हणून सतत यहोवाला प्रार्थना केली

[५ पानांवरील चित्र]

राजा दाविदाने यवाबाला सेनापती म्हणून नेमले

[५ पानांवरील चित्र]

यवाबाने प्रतिस्पर्धी अमासाला ठार मारले

[६ पानांवरील चित्र]

वडील जन बायबलमधून मार्गदर्शन देतात ज्यामुळे समस्यांना तोंड देण्यास आपल्याला मदत होते