व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण ज्यांच्यापासून दूर पळालो पाहिजे अशा गोष्टी

आपण ज्यांच्यापासून दूर पळालो पाहिजे अशा गोष्टी

आपण ज्यांच्यापासून दूर पळालो पाहिजे अशा गोष्टी

“अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले?”—मत्त. ३:७.

१. बायबलमध्ये पळून जाण्याविषयीची कोणती उदाहरणे आहेत?

‘पळणे’ हा शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या मनात काय येते? काहींना, पोटीफराच्या बायकोच्या तावडीतून निसटून पळणाऱ्‍या तरण्याबांड व देखण्या योसेफाची आठवण होईल. (उत्प. ३९:७-१२) तर काहींना, येशूच्या आज्ञेचे पालन करून सा.यु. ६६ साली जेरूसलेममधून पळून जाणाऱ्‍या ख्रिश्‍चनांची आठवण होईल. येशूने या ख्रिश्‍चनांना आज्ञा दिली: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा . . . जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे.”—लूक २१:२०, २१.

२, ३. (क) बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने धार्मिक पुढाऱ्‍यांची जी टीका केली तिचा काय अर्थ होता? (ख) योहानाने दिलेल्या ताकीदीवर येशूने देखील जोर कसा दिला?

वरील उदाहरणे, ही अक्षरशः पळून जाण्याविषयीची आहेत. परंतु आज विश्‍वभरात असलेल्या सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी एका लाक्षणिक अर्थाने पळ काढणे अगत्याचे आहे. याच अर्थाने बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने ‘पळणे’ हा शब्द वापरला. योहानाकडे येणाऱ्‍या लोकांमध्ये, स्वतःला धार्मिक समजणारे यहुदी धार्मिक पुढारी होते ज्यांना पश्‍चात्ताप करण्याची गरज नाही असे वाटत होते. पश्‍चात्तापाचे प्रतीक म्हणून जे लोक बाप्तिस्मा घेत होते अशा सर्वसाधारण लोकांना हे पुढारी तुच्छ लेखायचे. अशा दांभिक पुढाऱ्‍यांचे पितळ उघडे करून योहानाने त्यांना अगदी निर्भयतेने म्हटले: “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? ह्‍यास्तव पश्‍चात्तापास योग्य असे फळ द्या.”—मत्त. ३:७, ८.

योहान खरोखर कुठेतरी पळून जाण्याविषयी बोलत नव्हता. तर तो येणाऱ्‍या न्यायाच्या दिवसाविषयी अर्थात क्रोधाच्या दिवसाविषयी बोलत होता. आणि तो या धार्मिक पुढाऱ्‍यांना ताकीद देत होता, की जर ते या दिवसापासून वाचू इच्छित असतील तर त्यांनी पश्‍चात्तापास योग्य अशी फळे उत्पन्‍न करणे आवश्‍यक आहे. नंतर येशूनेही अगदी निडरतेने धार्मिक पुढाऱ्‍यांना खडसावले. त्यांच्या खुनशी मनोवृत्तीवरून त्यांचा खरा पिता सैतान होता हे स्पष्ट दिसत असल्याचे त्याने त्यांना म्हटले. (योहा. ८:४४) योहानाने आधी जी ताकीद दिली तिच्यावर अधिक जोर देत येशूने या पुढाऱ्‍यांना “फुरश्‍यांच्या पिलांनो,” असे संबोधून त्यांना विचारले: “तुम्ही गेहेन्‍नातला दंड कसा चुकवाल?” (मत्त. २३:३३, पं.र.भा.) येशूने गेहेन्‍ना म्हटलेल्या शब्दाचा काय अर्थ होता?

४. येशूने गेहेन्‍ना म्हटलेल्या शब्दाचा काय अर्थ होता?

जेरूसलेम शहराबाहेरील एका दरीचे नाव गेहेन्‍ना असे होते. या दरीत, शहरातला कचरा आणि मृत प्राण्यांची शरीरे जाळली जात. येशूने गेहेन्‍नाचा उपयोग सार्वकालिक मृत्यू दर्शवण्यासाठी केला. (पृष्ठ २७ पाहा.) हे धार्मिक पुढारी गेहेन्‍नात जाण्याचे कसे चुकवतील असा प्रश्‍न येशूने केला तेव्हा हे धार्मिक पुढारी सार्वकालिक विनाशास पात्र आहेत असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता.—मत्त. ५:२२, २९.

५. योहानाने व येशूने दिलेली ताकीद साधार होती याला इतिहास दुजोरा कसा देतो?

यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांनी येशू आणि त्याच्या अनुयायांचा छळ करून आपल्या पापात आणखी भर घातली. नंतर, योहान व येशू या दोघांनी ताकीद दिल्याप्रमाणे देवाच्या क्रोधाचा दिवस आला. हा ‘क्रोध’ फक्‍त जेरूसलेम व यहुदावरच येणार असल्यामुळे तेथून अक्षरशः पळून जाणे शक्य झाले असावे. हा क्रोध सा.यु. ७० साली रोमन सैन्यांनी जेव्हा जेरूसलेम शहराचा आणि मंदिराचा नाश केला तेव्हा आला. जेरूसलेमवर अशा प्रकारचे “संकट” पहिल्यांदाच आले होते. यात अनेक जण ठार झाले किंवा त्यांना बंदी बनवण्यात आले. याहूनही एक मोठे संकट स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवणाऱ्‍या व इतर धर्मांच्या लोकांवर येणार आहे.—मत्त. २४:२१.

ज्यापासून पळाले पाहिजे असा भविष्यातील क्रोध

६. आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीत कोणत्या गोष्टीस सुरुवात झाली?

आरंभीच्या ख्रिश्‍चनांपैकी काही जण धर्मत्यागी बनले आणि अनेक लोकांनी त्यांचे अनुकरण केले. (प्रे. कृत्ये २०:२९, ३०) येशूचे प्रेषित जिवंत असेपर्यंत त्यांनी अशा धर्मत्यागाला “प्रतिबंध” केला. पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र ख्रिस्ती धर्माचे अनेक खोटे पंथ उदयास आले. आज, ख्रिस्ती धर्मजगतात शेकडो धर्म आहेत आणि प्रत्येकाच्या शिकवणी परस्परविरोधी आहेत. ख्रिस्ती धर्मजगतात उदयास येणाऱ्‍या पाळक वर्गाचे भाकीत बायबलमध्ये करण्यात आले आहे. बायबलमध्ये त्यांचे वर्णन गट या नात्याने “अनीतिमान पुरुष” वा “नाशाचा पुत्र” असे करण्यात आले आहे व “प्रभु येशू . . . येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील,” असे म्हटले आहे.—२ थेस्सलनी. २:३, ६-८.

७. “अनीतिमान पुरुष” ही संज्ञा ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाला योग्य रीतीने का लागू होते?

ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक अनीतिमान आहेत. बायबलमध्ये नसलेल्या शिकवणी, सणवार, व वर्तन यांना बढावा देऊन त्यांनी कोट्यवधी लोकांची दिशाभूल केली आहे. येशूने खडसावलेल्या धार्मिक पुढाऱ्‍यांप्रमाणे ‘नाशाच्या पुत्राचा’ भाग असलेल्या आधुनिक दिवसातील उपासकांना पुनरुत्थानाची आशा नसलेल्या एका मोठ्या विनाशाला तोंड द्यावे लागणार आहे. (२ थेस्सलनी. १:६-९) पण ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांनी व इतर खोट्या धर्माच्या पुढाऱ्‍यांनी ज्या लोकांची दिशाभूल केली आहे अशा लोकांबद्दल काय? या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याकरता आपण सा.यु.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमच्या पहिल्या नाशानंतर घडलेल्या घटनांचे परीक्षण करू या.

“बाबेलातून पळून जा”

८, ९. (क) बॅबिलोनमध्ये बंदिवासात असलेल्या यहुद्यांना यिर्मयाने कोणता भविष्यसूचक संदेश सांगितला? (ख) मेद व पारसने बॅबिलोनवर विजय मिळवल्यानंतर, यहुद्यांना पळून जाणे कसे शक्य झाले?

सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेमवर आलेल्या संकटाविषयी संदेष्टा यिर्मयाने भाकीत केले होते. देवाच्या लोकांना बंदिवासात नेले जाईल परंतु ‘सत्तर वर्षानंतर’ आपल्या मायदेशात त्यांचे पुनर्वसन होईल, असे तो म्हणाला होता. (यिर्म. २९:४, १०) बॅबिलोनमध्ये बंदिवान असलेल्या यहुद्यांसाठी यिर्मयाचा एक महत्त्वाचा संदेश होता—बॅबिलोनमध्ये आचरल्या जाणाऱ्‍या खोट्या उपासनेपासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवायचे होते. तरच ते जेरूसलेमला पुन्हा जाऊन यहोवाने ठरवलेल्या वेळी खऱ्‍या उपासनेची पुनर्स्थापना करू शकणार होते. सा.यु.पू. ५३९ साली मेद व पारसने बॅबिलोनवर विजय मिळवल्यानंतर लगेचच या बंदिवानांची सुटका झाली. तेव्हा पर्शियाचा राजा कोरेश दुसरा याने एक हुकूम काढला ज्यात म्हटले होते, की यहुद्यांनी परत आपल्या मायदेशी जावे आणि जेरूसलेममधील यहोवाचे मंदिर पुन्हा बांधावे.—एज्रा १:१-४.

हजारो यहुद्यांनी आलेल्या या संधीचा फायदा घेतला आणि ते आपल्या मायदेशी परतले. (एज्रा २:६४-६७) असे करण्याद्वारे त्यांनी यिर्मयाच्या भविष्यसूचक आज्ञेची पूर्णता केली. यासाठी, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी पळून जावे लागले. (यिर्मया ५१:६, ४५, ५० वाचा.) परंतु सर्वच यहुद्यांना बॅबिलोन ते जेरूसलेम व यहुदा हा लांबचा पल्ला पूर्ण करता येणार नव्हता. काहींना वयोवृद्ध दानीएल संदेष्ट्याप्रमाणे बॅबिलोनमध्येच राहावे लागले. पण मागे राहिलेल्या या लोकांनी जर जेरूसलेममध्ये असलेल्या खऱ्‍या उपासनेला पूर्ण मनाने पाठिंबा दिला व बॅबिलोनमध्ये चालणाऱ्‍या खोट्या उपासनेपासून स्वतःला अलिप्त ठेवले तरच त्यांना यहोवाचे आशीर्वाद मिळणार होते.

१०. “मोठी बाबेल” कोणकोणत्या ‘अमंगळ’ गोष्टींस जबाबदार आहे?

१० आज, लाखो करोडो लोक, खोट्या धर्माच्या वेगवेगळ्या प्रकारात गोवलेले आहेत. हे सर्व खोटे धर्म प्राचीन बॅबिलोनमधून आलेले आहेत. (उत्प. ११:६-९) या सर्व खोट्या धर्मांना एकत्रितपणे “मोठी बाबेल, कलावंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” असे नाव देण्यात आले आहे. (प्रकटी. १७:५) खोट्या धर्मांनी जगाच्या राजकीय शासकांना पाठिंबा देण्याचा इतिहास खूप मोठा आहे. ज्या ‘अमंगळ’ गोष्टींस ते जबाबदार आहे त्यामध्ये अनेक युद्धांचा समावेश होतो ज्यांत ‘पृथ्वीवरल्या [कोट्यवधी लोकांचा] वध’ झाला आहे. (प्रकटी. १८:२४) इतर ‘अमंगळ’ गोष्टींमध्ये, पाळकवर्गाचे सदस्य करत असलेले व चर्च अधिकारी खपवून घेत असलेले मुलांचे लैंगिक शोषण तसेच इतर अनैतिक कार्ये यांचा समावेश होतो. यहोवा पृथ्वीवरून खोट्या धर्माचा लवकरच विनाश करणार आहे यात आश्‍चर्याचे ते काय?—प्रकटी. १८:८.

११. मोठ्या बाबेलचा नाश होण्याआधी खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर कोणती जबाबदारी आहे?

११ ज्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांना हे माहीत आहे त्यांच्यावर मोठ्या बाबेलच्या सदस्यांना या विनाशाची चेतावणी देण्याची जबाबदारी आहे. ही चेतावणी ते बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांचे वाटप करण्याद्वारे देतात. येशूने ज्यांना “यथाकाळी खावयास” देण्यासाठी नेमले आहे त्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ ही बायबल आधारित प्रकाशने तयार केली जातात. (मत्त. २४:४५) लोक जेव्हा बायबलमधील संदेशात आवड दाखवतात तेव्हा बायबल अभ्यासाद्वारे त्यांना अधिक माहिती देण्याची व्यवस्था केली जाते. हे लोक, “बाबेलातून पळून” जाणे किती महत्त्वाचे आहे हे उशीर होण्याआधी ओळखतील अशी आशा केली जाते.—प्रकटी. १८:४.

मूर्तिपूजेपासून दूर पळा

१२. प्रतिमा व मूर्ती यांची उपासना करण्याविषयी देवाला काय वाटते?

१२ मोठ्या बाबेलीत प्रचलित असलेली आणखी एक घृणास्पद प्रथा म्हणजे प्रतिमांची व मूर्तींची पूजा-अर्चा. देव या प्रतिमांना व मूर्तींना “अमंगळ” समजतो. (अनु. २९:१७) “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे; आणि दुसऱ्‍याला मी आपले गौरव देणार नाही, व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही,” या विधानाच्या अनुषंगात देवाला संतुष्ट करू पाहणाऱ्‍या सर्वांनी मूर्तिपूजा टाळलीच पाहिजे.—यश. ४२:८, पं.र.भा.

१३. आपण मूर्तिपूजेच्या कोणकोणत्या अप्रत्यक्ष प्रकारांपासून पळाले पाहिजे?

१३ देवाच्या वचनात, मूर्तिपूजेच्या अप्रत्यक्ष प्रकारांविषयीचे वर्णन दिले आहे. जसे की, बायबलमध्ये लोभ बाळगण्याला एक प्रकारची “मूर्तिपूजा” म्हटले आहे. (कलस्सै. ३:५) लोभ बाळगण्याचा अर्थ, मना केलेल्या गोष्टीची जसे की दुसऱ्‍याची मालमत्ता मिळण्याची आशा करणे, असा होतो. (निर्ग. २०:१७) दियाबल सैतान बनलेल्या देवदूताने, सर्वसमर्थ देवासारखे होण्याचा व देवाची नव्हे तर स्वतःची उपासना केली जावी असा लोभ बाळगला. (लूक ४:५-७) यामुळे त्याने यहोवाविरुद्ध बंड केले आणि हव्वेच्या मनातही देवाने मना केलेल्या गोष्टीविषयी लोभ उत्पन्‍न केला. आदामाने देखील एक प्रकारे मूर्तिपूजाच केली. आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला आज्ञाधारकता दाखवण्यापेक्षा बायकोच्या सहवासाला महत्त्व देऊन त्याने आपली स्वार्थी इच्छा पूर्ण केली. परंतु जे देवाच्या क्रोधाच्या दिवसापासून वाचू इच्छितात त्यांनी केवळ यहोवाची भक्‍ती केली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या लोभाचा प्रतिकार केला पाहिजे.

“जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा”

१४-१६. (क) नैतिकतेच्या बाबतीत योसेफाचे उदाहरण उत्तम का आहे? (ख) आपल्या मनात अनैतिक विचार आल्यास आपण काय करू शकतो? (ग) आपण जारकर्मापासून पळण्यात यशस्वी कसे होऊ शकतो?

१४ पहिले करिंथकर ६:१८ वाचा. पोटीफरच्या पत्नीने योसेफाला भुलविण्याचा प्रयत्न केला तेव्हा योसेफ तिच्यापासून अक्षरशः पळाला. विवाहित व अविवाहित अशा सर्व ख्रिश्‍चनांसाठी त्याने किती एक उत्तम उदाहरण मांडले! अनैतिकतेविषयी देवाचा दृष्टिकोन सूचित करणाऱ्‍या गत काळातील घटनांचा त्याच्या विवेकावर प्रभाव झाला होता. आपण “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” या आज्ञेचे पालन करू इच्छित असू तर, आपला विवाह सोबती नसलेल्या व्यक्‍तीबद्दल आपल्या मनात अनैतिक विचार आणणाऱ्‍या सर्व गोष्टी टाळू. आपल्याला असे सांगण्यात आले आहे: “जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्‍याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा; त्यामुळे देवाचा कोप होतो.”—कलस्सै. ३:५, ६.

१५ “देवाचा कोप” फार लवकर येणार आहे. जगातील अनेक लोक मनात अनैतिक विचार आणतात आणि त्यांच्या आहारी जातात. त्यामुळे आपण देवाच्या मदतीसाठी व पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून अशुद्ध लैंगिक विचार आपल्यावर कब्जा करणार नाहीत. तसेच, बायबलचा अभ्यास केल्याने, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्याने व लोकांना सुवार्ता सांगितल्याने आपल्याला ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यास’ मदत होईल. अशा प्रकारे आपण “देहवासना पूर्ण करणारच नाही.”—गलती. ५:१६.

१६ पण आपण जर पोर्नोग्राफी पाहत असू तर आपण निश्‍चित्तच ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालू’ शकणार नाही. या कारणास्तव, सर्व ख्रिश्‍चनांनी मनात लैंगिक भावना चाळवणारी पुस्तके, चित्रपट किंवा संगीत यांपासून दूर राहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर, देवाच्या ‘पवित्र जनांनी’ अशा गोष्टींवर विनोद किंवा त्यांची चर्चा देखील आपसात करू नये. (इफिस. ५:३, ४) असे करून आपण आपल्या प्रेमळ पित्याला हे दाखवून देऊ, की आपण त्याच्या येणाऱ्‍या क्रोधाच्या दिवसापासून वाचू इच्छितो आणि येणाऱ्‍या धार्मिक नव्या जगात जगू इच्छितो.

‘द्रव्याच्या लोभापासून’ दूर पळा

१७, १८. आपण ‘द्रव्याच्या लोभापासून’ दूर का पळाले पाहिजे?

१७ तीमथ्याला लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौलाने ख्रिस्ती दासांवर प्रभाव पाडणाऱ्‍या काही तत्त्वांवर जोर दिला. यांपैकी काही दासांनी, आपल्या ख्रिस्ती मालकांकडून आर्थिक फायदा मिळण्याची अपेक्षा केली असावी. इतरांनी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी जे पवित्र आहे अर्थात आपल्या बांधवांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असावा. “भक्‍ति हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना” करण्याविरुद्ध पौलाने ताकीद दिली. या लोकांना कदाचित “द्रव्याचा लोभ” असावा. द्रव्याचा लोभ कोणावरही, मग तो श्रीमंत असो अथवा गरीब असो, वाईटच परिणाम करतो.—१ तीम. ६:१, २, ५, ९, १०.

१८ ‘द्रव्याच्या लोभामुळे’ किंवा पैशाने विकत घेता येत असलेल्या अनावश्‍यक गोष्टींच्या लोभामुळे देवाबरोबर ज्यांचा नातेसंबंध बिघडला अशा बायबलमधील लोकांची उदाहरणे तुम्हाला आठवतात का? (यहो. ७:११, २१; २ राजे ५:२०, २५-२७) पौलाने तीमथ्याला असा आग्रह केला: “हे देवभक्‍ता, तू ह्‍यापांसून पळ, आणि नीतिमत्व, सुभक्‍ति, विश्‍वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लाग.” (१ तीम. ६:११) येणाऱ्‍या क्रोधाच्या दिवसापासून जे वाचू इच्छितात त्यांनी या सल्ल्याचे पालन करणे अगत्याचे आहे.

‘तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळा’

१९. सर्व तरुणांना कशाची आवश्‍यकता आहे?

१९ नीतिसूत्रे २२:१५ वाचा. हृदयात असलेल्या मूर्खतेमुळे तरुण जन अगदी सहजरित्या भटकू शकतात. पण बायबल आधारित शिस्त त्यांना भटकण्यापासून रोखू शकते. ज्यांचे पालक यहोवाचे साक्षीदार नाहीत असे अनेक तरुण जन बायबलमधील तत्त्वे शोधून त्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. इतर तरुणांना, मंडळीतल्या आध्यात्मिक प्रौढ जणांनी दिलेल्या सुज्ञ सल्ल्याचा फायदा होतो. बायबल आधारित सल्ला कोणीही दिला तरी त्या सल्ल्याचे पालन केल्याने आता आणि भविष्यातही आनंद मिळू शकतो.—इब्री १२:८-११.

२०. कुवासनांपासून दूर पळण्यास ख्रिस्ती तरुणांना मदत कशी मिळू शकेल?

२० दुसरे तीमथ्य २:२०-२२ वाचा. लाभदायक शिस्त न मिळालेले अनेक तरुण जन, स्पर्धा, लोभ, जारकर्म, पैसे मिळवण्याची हाव, सुखविलासाचा पाठलाग यासारख्या अर्थहीन गोष्टींना बळी पडले आहेत. या सर्व गोष्टी ‘तरुणपणाच्या वासना’ आहेत ज्यांच्यापासून दूर पळण्यास बायबल आपल्याला आग्रह करते. ख्रिश्‍चन तरुणांकरता, या गोष्टींपासून दूर पळण्याचा अर्थ, सर्व प्रकारच्या हानीकारक प्रभावांपासून स्वतःला सुरक्षित ठेवणे, असा होतो. “शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्‍यांबरोबर” देवासारखे गुण विकसित करण्याविषयी मिळत असलेल्या सल्ल्याचे पालन करणे तरुणांना अधिक लाभदायक ठरू शकेल.

२१. येशू ख्रिस्ताने आपल्या मेंढरांसमान अनुयायांविषयी कोणती लक्षवेधक प्रतिज्ञा केली आहे?

२१ आपण तरुण असो अथवा वृद्ध असो; आपली दिशाभूल करणाऱ्‍या लोकांचे म्हणणे ऐकण्यास नकार देऊन आपण हे दाखवतो, की आपण ‘परक्यांच्या वाणीपासून दूर पळणाऱ्‍या’ येशूच्या मेंढरांसमान अनुयायांमध्ये गणले जाऊ इच्छितो. (योहा. १०:५) पण देवाच्या क्रोधाच्या दिवसापासून वाचण्याकरता फक्‍त हानीकारक गोष्टींपासून दूर पळणे इतकेच पुरेसे नाही. तर आपण जे चांगले गुण आहेत ते आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढील लेखात अशा सात गुणांची चर्चा करण्यात आली आहे. याची चर्चा करणे आपल्याच फायद्याचे आहे कारण येशूने पुढील लक्षवेधक प्रतिज्ञा केली आहे: “मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीहि नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही.”—योहा. १०:२८.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• येशूने धार्मिक पुढाऱ्‍यांना काय ताकीद दिली?

• आज कोट्यवधी लोक कोणत्या घातक परिस्थितीत आहेत?

• मूर्तिपूजेच्या कोणत्या धूर्त मार्गांपासून आपण पळालो पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८, ९ पानांवरील चित्रे]

‘पळणे’ हा शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या मनात काय येते?