व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आपली पहिली प्रीति” सोडू नका

“आपली पहिली प्रीति” सोडू नका

“आपली पहिली प्रीति” सोडू नका

“जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा.”—प्रकटी. ३:११.

१, २. यहोवाबद्दल आपण जे शिकत आहोत तेच सत्य आहे याची जाणीव झाली तेव्हा तुम्हाला कसे वाटले?

आज्ञाधारक मानवजातीकरता यहोवाने जे अद्‌भुत आशीर्वाद राखून ठेवले आहेत त्यांविषयी तुम्हाला पहिल्यांदा समजले, तो दिवस तुम्हाला आठवतो का? जर तुम्ही पूर्वी दुसऱ्‍या एखाद्या धर्माचे सदस्य असाल, तर शास्त्रवचनांतून तुम्हाला देवाच्या उद्देशांविषयी स्पष्टीकरण देण्यात आले, किंवा एके काळी कठीण वाटणाऱ्‍या शिकवणी जेव्हा सोप्या करून सांगण्यात आल्या तेव्हा तुम्हाला कसे वाटले? आतापर्यंत आपल्याला अंधारात ठेवण्यात आले होते याची तुम्हाला जाणीव झाली असेल. पण आज तुम्हाला सत्याचा प्रकाश मिळाल्याबद्दल किती आनंद वाटतो! जर तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबातच लहानाचे मोठे झाला असाल, तर आपण यहोवाबद्दल जे शिकत आहोत तेच सत्य आहे याची जेव्हा तुम्हाला खात्री पटली, किंवा तुम्ही या ज्ञानानुसार वागण्याचा निश्‍चय केला तेव्हा तुम्हाला कसे वाटले, हे तुम्हाला आठवते का?—रोम. १२:२.

तुम्ही जर मंडळीतील इतर भाऊबहिणींना हे प्रश्‍न विचारले तर त्यांचे हेच उत्तर असेल की त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांना यहोवाच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटले आणि त्याने आपल्याला स्वतःकडे आकर्षित केले याबद्दल त्यांना कृतज्ञता वाटली. (योहा. ६:४४) या आनंदाने प्रेरित होऊन ते ख्रिस्ती कार्यांत उत्साहाने सहभाग घेऊ लागले. किंबहुना, त्यांना इतका आनंद झाला की जो भेटेल त्याला याविषयी सांगावे असे त्यांना वाटू लागले. तुम्हालाही असाच अनुभव आला का?

३. येशूने इफिसकरांच्या मंडळीला संदेश पाठवला तेव्हा या मंडळीत कशी परिस्थिती होती?

पहिल्या शतकात, इफिसस येथील ख्रिस्ती मंडळीला दिलेल्या संदेशात येशूने त्यांच्या ‘पहिल्या प्रीतिविषयी’ उल्लेख केला होता. या इफिसकरांमध्ये प्रशंसा करण्याजोग्या बऱ्‍याच गोष्टी होत्या, पण यहोवाबद्दल त्यांनी एके काळी जे प्रेम दाखवले होते ते मात्र हळूहळू कमी झाले होते. म्हणूनच येशू त्यांना म्हणाला: “तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस. तरी तू आपली पहिली प्रीति सोडली ह्‍याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.”—प्रकटी. २:२-४.

४. इफिसकरांना येशूने दिलेला संदेश आजच्या काळाकरता योग्य आहे असे का म्हणता येईल?

अभिषिक्‍त जनांमध्ये १९१४ पासून काही काळापर्यंत अस्तित्वात असलेली परिस्थिती लक्षात घेता, प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशूने इफिसकरांना व इतर मंडळ्यांना दिलेले मार्गदर्शन अगदी योग्यच होते. (प्रकटी. १:१०) पण आजही काही ख्रिस्ती, यहोवाबद्दल व ख्रिस्ती सत्याबद्दल असलेली “आपली पहिली प्रीति” विसरण्याची शक्यता आहे. म्हणूनच, तुमच्या स्वतःच्याच अनुभवांची आठवण केल्याने व त्यांवर मनन केल्याने कशा प्रकारे तुम्ही देवाबद्दल व सत्याबद्दल सुरुवातीला तुम्हाला असलेले प्रेम व आवेश टिकवून ठेवू शकता, त्यात नवचैतन्य आणू शकता आणि त्यात भर घालू शकता, याविषयी आता आपण पाहू या.

तुम्हाला कशामुळे सत्याची खात्री पटली?

५, ६. (क) प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला कशाविषयी खात्री पटली पाहिजे? (ख) यहोवाचे साक्षीदार जे शिकवतात ते सत्य असल्याची तुम्हाला कशामुळे खात्री पटली? (ग) सत्याबद्दल वाटलेली पहिली प्रीती आपण कशा प्रकारे आपल्या मनात पुन्हा जागृत करू शकतो?

जो कोणी यहोवाला आपले जीवन समर्पित करतो, त्याने प्रथम “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे” हे ‘समजून घेतले पाहिजे’ किंवा त्याला त्याविषयी खात्री पटली पाहिजे. (रोम. १२:१, २) याकरता बायबलमधील सत्याचे ज्ञान घेणे आवश्‍यक आहे. यहोवाचे साक्षीदार जे शिकवतात ते सत्य आहे याची प्रत्येक व्यक्‍तीला वेगवेगळ्या कारणांमुळे खात्री पटू शकते. काही जण सांगतात की जेव्हा त्यांनी देवाचे नाव बायबलमध्ये वाचले किंवा मृत्यूनंतर मनुष्याचे काय होते हे जेव्हा त्यांना पहिल्यांदा समजले तेव्हा जणू त्यांचे डोळे उघडले. (स्तो. ८३:१८; उप. ९:५, १०) इतर जण यहोवाच्या लोकांमध्ये असलेले प्रेम पाहून प्रभावित झाले. (योहा. १३:३४, ३५) आणखी काही जणांनी जगाचा भाग नसण्याचा काय अर्थ होतो याविषयी विचार केला. तेव्हा ते या निष्कर्षावर आले, की जे राजकीय कारभारांत किंवा युद्धांत सामील होत नाहीत तेच खरे ख्रिस्ती आहेत.—यश. २:४; योहा. ६:१५; १७:१४-१६.

या निरनिराळ्या गोष्टी शिकून घेतल्यामुळे व त्यांवर तर्क केल्यामुळे बऱ्‍याच जणांच्या मनात पहिल्यांदा देवाबद्दल प्रीतीची भावना जागृत झाली. तुम्हाला कशामुळे सत्याविषयी खात्री पटली याची आठवण करा. कारण तुम्ही एक स्वतंत्र व्यक्‍ती आहात. तुमच्या जीवनातील परिस्थिती व तुमचे गुण हे इतर सर्वांपेक्षा वेगळे आहेत. त्याअर्थी, यहोवावर प्रेम करण्याची आणि त्याच्या अभिवचनांवर विश्‍वास करण्याची तुमची कारणेही इतर जणांपेक्षा नक्कीच वेगळी असतील. आणि ही कारणे तुम्ही सत्य शिकून घेतले, तेव्हा तुम्हाला जितकी महत्त्वाची वाटली, तितकीच आजही महत्त्वाची वाटत असतील यात शंका नाही. सत्य बदललेले नाही. तेव्हा, ते विचार व भावना मनात ताज्या केल्यामुळे सत्याबद्दल तुम्हाला सुरुवातीला असलेले प्रेम निश्‍चितच पुन्हा प्रज्वलित होईल.—स्तोत्र ११९:१५१, १५२; १४३:५ वाचा.

पहिल्या प्रीतीत भर घाला

७. सत्याविषयी सुरुवातीला असलेल्या प्रेमात भर घालणे का गरजेचे आहे आणि आपण हे कसे करू शकतो?

तुम्ही यहोवाला समर्पण केले तेव्हापासून तुमच्या जीवनात अनेक वळणे आली असतील. सत्याबद्दल तुम्हाला सुरुवातीला जे प्रेम होते ते तर महत्त्वाचे होतेच, पण काळाच्या ओघात तुम्हाला नित्य नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. तुमच्या विश्‍वासाची पारख करणाऱ्‍या या आव्हानांना सामोरे जाण्याकरता तुम्हाला अतिशय गहिऱ्‍या अशा प्रेमाची गरज होती. पण यहोवाने तुम्हाला साहाय्य केले. (१ करिंथ. १०:१३) त्याअर्थी, मागच्या अनेक वर्षांत आलेल्या या अनुभवांची शिदोरीही अतिशय मोलाची आहे. कारण या अनुभवांनी तुम्हाला सुरुवातीच्या त्या प्रेमात भर घालण्यास मदत केली. आणि या अनुभवांवर मनन करणे हा देवाची उत्तम व ग्रहणीय इच्छा काय आहे हे समजून घेण्याचा आणखी एक मार्ग आहे.—यहो. २३:१४; स्तो. ३४:८.

८. यहोवाने मोशेला स्वतःची कशा प्रकारे ओळख करून दिली आणि इस्राएलांना कशा प्रकारे देवाची आणखी जवळून ओळख घडली?

ही गोष्ट समजून घेण्याकरता, यहोवाने इस्राएलांना इजिप्तच्या दास्यातून सोडवण्याचा आपला संकल्प जाहीर केला तेव्हाच्या प्रसंगाची आठवण करा. देवाने मोशेला स्वतःची ओळख करून देताना असे म्हटले: “मला जे व्हायचे असेल ते मी होईन.” (निर्ग. ३:७, ८, १३, १४, NW) दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे, तर यहोवा असे म्हणत होता, की आपल्या लोकांना सोडवण्याकरता जे काही व्हावे लागेल किंवा जी काही भूमिका घ्यावी लागेल ती तो घेईल. यानंतरच्या घटनांत, यहोवाने आवश्‍यकतेनुसार आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू प्रकट केले. इस्राएलांनी यहोवाला सर्वसमर्थ देव, न्यायाधीश, मार्गदर्शक, तारणहार, योद्धा व पालनकर्ता अशा नानाविध भूमिका वठवताना पाहिले.—निर्ग. १२:१२; १३:२१; १४:२४-३१; १६:४; नहे. ९:९-१५.

९, १०. कशा प्रकारचे अनुभव आपल्याला देवाच्या जवळ आणू शकतात आणि या अनुभवांची आठवण केल्याने कोणता फायदा होऊ शकतो?

तुमची परिस्थिती प्राचीन काळातील इस्राएलांपेक्षा अर्थातच वेगळी आहे. तरीपण, यहोवाला तुमच्याबद्दल वाटणाऱ्‍या वैयक्‍तिक आस्थेची ज्यामुळे तुम्हाला खात्री पटली, किंवा तुमचा विश्‍वास ज्यामुळे मजबूत झाला असे अनुभव नक्कीच तुम्हालाही आलेच असतील. कदाचित यहोवा तुमच्याकरता पालनकर्ता, सांत्वनदाता किंवा शिक्षक झाला असेल. (यशया ३०:२०ख, २१ वाचा.) किंवा, तुम्ही केलेल्या प्रार्थनेचे स्पष्ट उत्तर मिळाल्याचे तुम्हाला जाणवले असेल. कदाचित तुम्ही एखाद्या पेचप्रसंगात अडकला असाल आणि अचानक एखादा भाऊ किंवा बहीण तुमच्या मदतीला धावून आली असेल. किंवा वैयक्‍तिक अभ्यास करताना कदाचित खास तुमच्या परिस्थितीला लागू होणारी शास्त्रवचने समोर आली असतील.

१० अशा प्रकारचे अनुभव जर तुम्ही इतरांना सांगितले तर त्यांना कदाचित ते फार उल्लेखनीय वाटणार नाहीत. कारण या घटना चमत्कारिक होत्या अशातला भाग नाही. तरीपण, तुमच्याकरता त्या घटना अतिशय अर्थपूर्ण होत्या. कारण तुमच्याकरता यहोवाला जी भूमिका घेणे आवश्‍यक होते, ती त्याने घेतली. तुम्ही सत्यात आला त्यानंतरच्या अनेक वर्षांची आठवण करा. यहोवा आपल्याबद्दल वैयक्‍तिक काळजी व्यक्‍त करत आहे असे तुम्हाला जाणवले, अशा काही घटना तुम्हाला आठवतात का? या घटनांची व तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते याची आठवण केल्याने तुमच्या मनात पुन्हा एकदा यहोवाबद्दल प्रीतीची भावना उचंबळून येईल. या अनुभवांची शिदोरी जपून ठेवा. त्यांवर मनन करा. कारण यहोवाला तुमच्याबद्दल वैयक्‍तिक आस्था आहे याचा ते पुरावा आहेत. आणि तुमचा हा भरवसा, ही खात्री कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

आत्मपरीक्षण करा

११, १२. जर एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला सत्याबद्दल पूर्वी वाटणारे प्रेम हळूहळू कमी झाले असेल तर याचे काय कारण असू शकते आणि येशूने या संदर्भात कोणता सल्ला दिला?

११ तुम्हाला एके काळी देवाबद्दल व सत्याबद्दल वाटणारे प्रेम जर आज वाटत नसेल, तर देवाच्या बाजूने काहीही बदललेले नाही याची आठवण असू द्या. यहोवा कधीही बदलत नाही. (मला. ३:६; याको. १:१७) त्याला तेव्हाही तुमच्याबद्दल स्वारस्य होते आणि आजही तितकेच आहे. तर मग, आज यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध जर पूर्वीसारखा नसेल, तर हे कशामुळे घडले असावे? तुमच्या जीवनातील ताणतणाव व काळज्या वाढल्यामुळे असे घडले असावे का? कदाचित तुम्ही पूर्वी जास्त मनःपूर्वक प्रार्थना करत असाल, वैयक्‍तिक अभ्यासाकरता जास्त मेहनत घेत असाल किंवा नियमित रीत्या मनन करत असाल. आताच्या तुलनेत तुम्ही पूर्वी सेवाकार्यात जास्त आवेशी होता का किंवा मंडळीच्या सभांना जास्त नियमितपणे जात होता का?—२ करिंथ. १३:५.

१२ कदाचित तुमच्या बाबतीत असे घडलेही नसेल. पण जर वरील प्रश्‍नांना तुमचे उत्तर होकारार्थी असेल, तर कशामुळे हे बदल घडले असावेत? कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे, आपल्या आरोग्याची काळजी घेणे यांसारख्या वाजवी चिंतांमुळे यहोवाचा दिवस किती जवळ आला आहे याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असेल का? येशूने आपल्या प्रेषितांना सांगितले: “संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”—लूक २१:३४-३६.

१३. याकोबाने देवाच्या वचनाची तुलना कशासोबत केली?

१३ बायबलचा एक लेखक याकोब याने देवाच्या प्रेरणेने लिहिताना सहविश्‍वासू बांधवांना देवाच्या वचनाच्या आधारे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याचे प्रोत्साहन दिले. त्याने लिहिले: “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशांत आपले शारीरिक मुख पाहणाऱ्‍या माणसासारखा आहे; तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो, आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल.”—याको. १:२२-२५.

१४, १५. (क) बायबल तुम्हाला आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यास कशा प्रकारे मदत करू शकते? (ख) तुम्ही कोणत्या प्रश्‍नांवर मनन करू शकता?

१४ आपण व्यवस्थित दिसत आहोत की नाही हे पाहण्याकरता सहसा आरशाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या पुरुषाला आपला टाय नीट लावलेला नाही असे दिसले तर तो त्याला नीट करू शकतो. किंवा एखाद्या स्त्रीला आपले केस नीट नाहीत असे दिसले तर ती ते व्यवस्थित करू शकते. त्याच प्रकारे, आपण कसे आहोत हे पाहण्यास शास्त्रवचने आपल्याला मदत करतात. बायबलमध्ये जे सांगितले आहे त्याच्याशी जेव्हा आपण स्वतःची तुलना करतो तेव्हा आपण त्याचा आरशासारखा उपयोग करत असतो. पण जर आपण आरशात पाहिले, आणि एखादी गोष्ट नीट नाही असे दिसल्यावरही ती सुधारण्याकरता काही केले नाही, तर त्याचा काय उपयोग? देवाच्या ‘परिपूर्ण नियमांच्या’ आधारावर आपल्याला जे दिसते त्यानुसार जर आपण ‘कृती केली,’ म्हणजेच त्यानुसार वागलो, तर हा सुज्ञपणा ठरेल. तेव्हा, यहोवाबद्दल व सत्याबद्दल आपल्याला आधी वाटणारे प्रेम आता कमी झाले आहे असे ज्या कोणाला जाणवते, त्याने स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘सध्या माझ्या जीवनात कोणते ताणतणाव आहेत आणि त्यांच्याप्रती माझी प्रतिक्रिया काय आहे? पूर्वी याच गोष्टींना मी कशा प्रकारे प्रतिक्रिया दाखवत होतो? यात काही बदल झाला आहे का?’ जर अशा आत्मपरीक्षणातून तुमचे काहीतरी चुकत आहे असे लक्षात आले, तर त्याकडे दुर्लक्ष मुळीच करू नका. काही बदल करण्याची गरज असेल तर लवकरात लवकर हे बदल करा.—इब्री १२:१२, १३.

१५ अशा प्रकारे मनन केल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्याच्या दृष्टीने, वाजवी ध्येये ठेवण्याकरताही साहाय्य मिळेल. प्रेषित पौलाने तीमथ्य या आपल्या सहकाऱ्‍याला सेवाकार्यात प्रगती करण्याकरता देवप्रेरित सल्ला दिला. त्याने आपला तरुण साथीदार तीमथ्य याला असे म्हटले: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यात गढून जा.”—१ तीम. ४:१५.

१६. शास्त्रवचनांच्या आधारावर स्वतःचे परीक्षण करत असताना तुम्ही कोणत्या धोक्याविषयी सावध राहिले पाहिजे?

१६ प्रामाणिकपणे स्वतःचे परीक्षण करत असताना निश्‍चितच तुम्हाला काही उणिवा लक्षात येतील. यामुळे कदाचित तुम्ही निराश होण्याची शक्यता आहे, पण असे घडू देऊ नका. कारण आपल्याला कोणत्या गोष्टींत सुधारणा करण्याची गरज आहे हे ओळखण्यासाठीच खरे तर आपण आत्मपरीक्षण करत असतो. देवाच्या सेवकांनी आपल्या उणिवांमुळे, कमतरतांमुळे स्वतःला कवडीमोल समजावे असे सैतानाला वाटते. किंबहुना देवाचे सेवक त्याच्या सेवेत जे काही करतात त्याची देवाला मुळीच किंमत नाही असा दावा करण्यात आला आहे. (ईयो. १५:१५, १६; २२:३) पण हे साफ खोटे आहे. येशूने हा दावा पूर्णपणे खोडून काढला. आपल्यापैकी प्रत्येक जण देवाच्या दृष्टीत मौल्यवान आहे. (मत्तय १०:२९-३१ वाचा.) आपल्याठायी असलेल्या कमतरतांची जाणीव झाल्यामुळे खरे तर, भविष्यात आपण यहोवाच्या मदतीने सुधारणा करू असा नम्रपणे निश्‍चय करण्याची आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. (२ करिंथ. १२:७-१०) जर आजारी असल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे तुम्हाला जास्त कार्य करणे शक्य नसेल, तर तुम्हाला साध्य करता येतील अशी छोटी-छोटी ध्येये ठेवा. पण काही झाले तरी खचून जाऊ नका किंवा देवाबद्दल असलेले प्रेम कमी होऊ देऊ नका.

कृतज्ञ असण्यासारखे बरेच काही

१७, १८. पहिल्या प्रीतीत भर घातल्यामुळे तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळतील?

१७ तुमच्या पहिल्या प्रीतीत भर घालत राहिल्यास तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील. देवाविषयीचे तुमचे ज्ञान वाढेल आणि त्याच्या प्रेमळ मार्गदर्शनाची मनापासून कदर करायला तुम्ही शिकाल. (नीतिसूत्रे २:१-९; ३:५, ६ वाचा.) स्तोत्रकर्त्याने म्हटले, “[परमेश्‍वराचा निर्बंध] पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते.” तसेच, “परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो.” शिवाय, “जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्‍वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य.”—स्तो. १९:७, ११; ११९:१.

१८ देवाप्रती कृतज्ञ असण्यासारखे बरेच काही तुमच्याजवळ आहे याच्याशी तुम्ही नक्कीच सहमत व्हाल. आज जगात जे काही घडत आहे त्यामागची कारणे तुम्हाला समजली आहेत. देव आपल्या सेवकांना प्रेमळपणे ज्या तरतुदी पुरवतो त्यांचा तुम्ही फायदा घेत आहात. तसेच, यहोवाने तुम्हाला आपल्या जगव्याप्त मंडळीत सामील होण्याकरता स्वतःकडे आकर्षित करून घेतले आहे आणि आपल्या साक्षीदारांपैकी असण्याचा बहुमान दिला आहे याबद्दलही तुम्ही निश्‍चितच कृतज्ञ असाल. या सर्व आशीर्वादांची नेहमी कदर करा! जर तुम्ही देवाच्या सर्व आशीर्वादांची यादी बनवली तर नक्कीच ती एक लांबलचक यादी बनेल. पण वेळोवेळी असे केल्यामुळे तुम्हाला निश्‍चितच या सल्ल्याचे पालन करण्यास मदत मिळेल: “जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा.”—प्रकटी. ३:११.

१९. आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवण्याकरता, देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी मनन करण्यासोबतच आणखी कोणत्या गोष्टी आवश्‍यक आहेत?

१९ आपण सत्यात आलो तेव्हापासून आतापर्यंत आपल्या विश्‍वासात उन्‍नती झाली आहे किंवा नाही यावर मनन करणे, ही तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहण्यास साहाय्य करणाऱ्‍या गोष्टींपैकी केवळ एक आहे. आपले आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवण्याकरता आवश्‍यक असणाऱ्‍या आणखी काही गोष्टींबद्दल या नियतकालिकात वारंवार सांगण्यात आले आहे. यांत प्रार्थना, ख्रिस्ती सभांमध्ये उपस्थित राहणे व त्यांत सहभाग घेणे तसेच सार्वजनिक सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेणे समाविष्ट आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला सुरुवातीला असलेले प्रेम टिकवून ठेवण्यास, त्यात नवचैतन्य आणण्यास व त्यात भर घालण्यास मदत करतील.—इफिस. ५:१०; १ पेत्र ३:१५; यहू. २०, २१.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवावर प्रेम करण्यास ज्या गोष्टींमुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली त्या आजही तुम्हाला कशा प्रकारे प्रोत्साहनदायक ठरू शकतात?

• काळाच्या ओघात आलेल्या अनुभवांविषयी मनन केल्याने तुम्हाला कशाची खात्री पटेल?

• देवावर असलेल्या प्रेमाबद्दल तुम्ही आत्मपरीक्षण का केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

तुम्ही सत्याकडे कशामुळे आकर्षित झाला आणि कोणत्या गोष्टीमुळे त्याविषयी तुमची खात्री पटली?

[२५ पानांवरील चित्र]

तुम्हाला स्वतःत काही सुधारणा करण्याची गरज जाणवली आहे का?