एक करामती युक्ती
एक करामती युक्ती
मध्य आफ्रिकेत, तीन तरुणांना त्यांच्या भागात होणार असलेल्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहायचे होते. पण प्रश्न होता, तेथे पोचायचे कसे? कारण अधिवेशनाचे ठिकाण जवळजवळ ९० किलोमीटरच्या अंतरावर होते. त्यांच्याजवळ तेथे पोचण्याचे कोणतेही साधन नव्हते. शिवाय, रस्ताही कच्चा, खडबडीत व धुळीने माखलेला होता. त्यांनी कोणाकडून तीन सायकली घ्याव्यात असे ठरवले, पण चांगल्या स्थितीत असलेल्या तीन सायकली त्यांना मिळू शकल्या नाहीत.
त्यांच्यापुढे असलेली ही समस्या पाहून त्यांच्या मंडळीतील एका वडिलांनी आपली सायकल त्यांना देऊ केली. त्यांची सायकल तशी जुनीच होती पण चांगल्या स्थितीत होती. पूर्वी आपण कसे इतरांसोबत मिळून सायकलीने अधिवेशनाला जायचो हे त्या वडिलांनी त्यांना सांगितले. त्यांनी त्या तिघांना एकाच सायकलीने अधिवेशनाला जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी सुचवलेली युक्ती तशी साधीच होती, एवढेच की त्याकरता तिघांच्या सहकार्याची गरज होती. पण तिघे जण एकाच सायकलीने कसे काय प्रवास करू शकत होते?
दुपारचे रखरखीत ऊन टाळण्याकरता हे तरुण बांधव पहाटेच एका ठिकाणी भेटले आणि त्यांनी आपले सामान सायकलीला बांधले. मग त्यांच्यापैकी एकाने सायकल चालवण्यास सुरुवात केली आणि बाकीचे दोघे जण त्याच्यामागून भराभर चालू लागले. जवळजवळ अर्ध्या किलोमीटरच्या अंतरानंतर सायकल चालवणारा थांबला आणि त्याने सायकल एका झाडाला टेकवली. पण दुसराच कोणीतरी सायकल घेऊन पळून जाऊ नये म्हणून त्याने मागून येणाऱ्या दोघांना ती दिसेल अशा ठिकाणी ठेवली. मग हा पहिला बांधव, पायी चालू लागला.
मागून येणारे दोघे जण सायकलीपाशी पोचल्यानंतर त्यांच्यापैकी एक जण सायकलीवर निघाला, तर दुसरा आणखी अर्ध्या किलोमीटरपर्यंत पायी चालू लागला. त्यानंतर, सायकलीने जाण्याची त्याची पाळी होती. अशा रीतीने दृढ निश्चय व उत्तम सहकार्य केल्यामुळे या तिघांना प्रत्येकी ९० किलोमीटर ऐवजी फक्त ६० किलोमीटरच चालावे लागले. पण त्यांच्या परीश्रमाचे चीज झाले. त्यांना अधिवेशनाला उपस्थित राहून आपल्या ख्रिस्ती भाऊ बहिणींच्या सहवासाचा तसेच आध्यात्मिक मेजवानीचा आस्वाद घेता आला. (अनु. ३१:१२) या वर्षी, तुम्ही आपल्या भागातील अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल का?