व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगायला तुम्ही तयार आहात का?

तुमच्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगायला तुम्ही तयार आहात का?

तुमच्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगायला तुम्ही तयार आहात का?

तुमच्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगण्याचे तुम्हाला राहावलेच नाही, असा एखादा प्रसंग तुमच्यावर कधी आला का? पराग्वेतील १६ वर्षीय सुझॅनाच्या बाबतीत काय घडले ते पाहा. उच्च माध्यमिक शाळेत एकदा नीतिशास्त्राचा तास चालू असताना असे विधान करण्यात आले, की यहोवाचे साक्षीदार “जुना करार,” येशू ख्रिस्त किंवा मरीया यांच्यावर विश्‍वास ठेवत नाहीत. या चर्चेत भाग घेणाऱ्‍यांनी तर असेही म्हटले, की साक्षीदार धर्मांध आहेत, ते वैद्यकीय उपचार स्वीकारण्यापेक्षा मरण पत्करायला तयार असतात. सुझॅनाच्या जागी तुम्ही असता तर या लोकांना कशा प्रकारे उत्तर दिले असते?

सुझॅनाला राहावले नाही. तिने मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना केली आणि बोलण्यासाठी आपला हात वर केला. तास तसा संपतच आला होता त्यामुळे तिने आपल्या शिक्षिकेला, यहोवाची साक्षीदार या नात्याने तिचा काय विश्‍वास आहे या विषयावर भाषण देण्याची परवानगी मागितली. शिक्षिकेने लगेच तिला परवानगी दिली. पुढील दोन आठवड्यांत सुझॅनाने यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे? या माहितीपत्रकाचा उपयोग करून आपले भाषण तयार केले.

भाषण देण्याचा दिवस उजाडला. सुझॅनाने यहोवाचे साक्षीदार हे नाव कोठून आले याचे स्पष्टीकरण दिली. भविष्यासाठी आपली काय आशा आहे आणि आपण रक्‍त संक्रमण का स्वीकारत नाही, हेही तिने समजावून सांगितले. मग तिने वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांचे काही प्रश्‍न असतील तर ते विचारण्यास सांगितले. बहुतेक विद्यार्थ्यांनी आपले हात वर केले. ही तरुण मुलगी बायबलमधून कशी सहजपणे उत्तर देत आहे, हे पाहून शिक्षिका खूप प्रभावित झाली.

वर्गातल्या एका मुलाने म्हटले: “मी एकदा एका राज्य सभागृहात गेलो होतो. तिथं मी एकही मूर्ती पाहिली नाही.” याचे कारण काय असावे हे शिक्षिकेला माहीत करून घ्यायचे होते. सुझॅनाने स्तोत्र ११५:४-८ आणि निर्गम २०:४ ही वचने वाचून दाखवली. यामुळे शिक्षिकेला आश्‍चर्याचा धक्का बसला. तिने म्हटले: “बायबलमध्ये मूर्तींचा इतका सडेतोडपणे निषेध करण्यात आलेला असताना आमच्या चर्चेसमध्ये इतक्या मूर्त्या का आहेत?”

ही प्रश्‍न आणि उत्तरांची चर्चा ४० मिनिटे चालली. सुझॅनाने जेव्हा वर्गातल्या सर्वांना, नो ब्लड—मेडिसीन मिट्‌स द चॅलेंज हा व्हिडिओ पाहायचा का, असे विचारले असता सर्वांनी होकार दिला. त्यामुळे शिक्षिकेने पुढील दिवशी ही चर्चा चालू ठेवण्याची योजना केली. व्हिडिओ दाखवल्यानंतर, सुझॅनाने काही यहोवाचे साक्षीदार स्वीकारत असलेल्या पर्यायी उपचारांची माहिती दिली. याविषयी शिक्षिकेने म्हटले, की “इतके पर्यायी उपचार आहेत हे मला माहीतच नव्हतं. शिवाय रक्‍ताविना उपचार करण्याचे इतके फायदे आहेत हेही मला माहीत नव्हतं. या उपचार पद्धती फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांसाठीच आहेत का?” या उपचार पद्धती फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांसाठीच नाहीत हे तिला कळल्यावर तिने म्हटले: “पुढच्या वेळी यहोवाचे साक्षीदार माझ्या घरी येतील तेव्हा मी जरूर त्यांच्याबरोबर आणखी चर्चा करेन.”

सुझॅनाने २० मिनिटांसाठी तयार केलेली चर्चा तब्बल तीन तास चालली. एक आठवड्यानंतर, इतर विद्यार्थ्यांनी चर्च सदस्य म्हणून त्यांचे विश्‍वास काय आहेत या विषयावर एक भाषण दिले. भाषणाच्या शेवटी अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले परंतु भाषण देणाऱ्‍या विद्यार्थ्यांना आपल्या विश्‍वासांविषयी काहीच सांगता आले नाही. शिक्षिकेने त्यांना विचारले: “तुम्हाला तुमच्या विश्‍वासांविषयी सांगता येत नाही, पण तुमच्याबरोबर शिकणारी सुझॅना जी यहोवाची साक्षीदार आहे, तिला स्पष्टीकरण कसं काय देता आलं?”

उत्तर असे आले: “ते बायबलचा खूप चांगला अभ्यास करतात. आम्ही करत नाही.”

सुझॅनाकडे वळून शिक्षिका म्हणाली: “तुम्ही खरंच बायबलचा अभ्यास करता आणि ते जे काही सांगतं त्याचं पालन करायचा प्रयत्न करता हे दिसतं. तुमची प्रशंसा केलीच पाहिजे.”

यहोवाच्या साक्षीदारांविषयी वर्गात जी चर्चा चालू होती तेव्हा सुझॅना शांत राहू शकली असती. पण तिने तसे केले नाही. इतरांचा गैरसमज दूर करण्यासाठी ती बोलली. असे करून तिने त्या इस्राएली चिमुरडीचे अनुकरण केले जिला अरामी लोकांनी बंदी बनवून नेले होते. तिचे नाव बायबलमध्ये सांगितलेले नाही. ती नामान नावाच्या एका अरामी सेनापतीच्या घरी दासी होती. नामानाला एक भयंकर त्वचारोग झाला होता. या इस्राएली मुलीने आपले सर्व धैर्य एकवटून आपल्या मालकिणीला म्हटले: “शोमरोनातल्या संदेष्ट्यांशी माझ्या धन्यांची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.” खऱ्‍या देवाविषयी साक्ष देण्याचे या मुलीला राहावलेच नाही. याचा परिणाम असा झाला, की नामान यहोवाचा उपासक बनला.—२ राजे ५:३, १७.

सुझॅनाला देखील यहोवा आणि त्याच्या लोकांविषयी साक्ष देण्याचे राहावले नाही. तिच्या विश्‍वासांविषयी लोकांनी जेव्हा प्रश्‍न विचारले तेव्हा ती शांत राहिली नाही. असे करून तिने बायबलमधील पुढील आज्ञेचे पालन केले: “ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) तुम्ही देखील तुमच्या विश्‍वासांविषयी सांगण्यास तयार आहात का आणि जेव्हा तसा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही लगेच पुढे होता का?

[१७ पानांवरील चित्र]

ही साधने तुम्हाला तुमच्या विश्‍वासांविषयी सांगण्यास मदत करतील