व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठपुरावा करण्याजोगे गुण

पाठपुरावा करण्याजोगे गुण

पाठपुरावा करण्याजोगे गुण

“नीतिमत्त्व, सुभक्‍ति, विश्‍वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लाग.”—१ तीम. ६:११.

१. ‘पाठीस लागणे,’ या शब्दाचा अर्थ काय होतो हे उदाहरण देऊन सांगा.

‘पाठीस लागणे,’ हे शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या मनात काय येते? कदाचित तुम्ही मोशेच्या दिवसांचा विचार कराल जेव्हा मिसऱ्‍यांनी इस्राएल लोकांचा “पाठलाग केला” परंतु लाल समुद्रात त्यांचा नाश झाला. (निर्ग. १४:२३) किंवा कदाचित तुम्ही प्राचीन इस्राएल राष्ट्रातील अशा मनुष्याचा विचार कराल ज्याच्या हातून अपघाताने मनुष्यवध होतो. या मनुष्याला सहा शरणपुरांपैकी कुठल्याही एका शरणपुरात होता होईल तितक्या लवकर जायचे होते. नाहीतर, ‘रक्‍ताचा सूड घेणारा त्याचे हृदय संतप्त असता त्या मनुष्यघातक्याच्या मागे लागून त्याला जिवे मारू शकत’ होता.—अनु. १९:६, पं.र.भा.

२. (क) देवाने काही ख्रिश्‍चनांना कोणत्या बक्षिसाचा पिच्छा करण्याचे आमंत्रण दिले? (ख) आज बहुतेक ख्रिश्‍चनांना यहोवाने कोणती आशा दिली आहे?

बायबलमधील वरील उदाहरणांच्या तुलनेत, आता आपण प्रेषित पौलाच्या सकारात्मक मनोवृत्तीकडे लक्ष देऊ या. त्याने असे लिहिलेः “ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.” (फिलिप्पै. ३:१४) एकूण १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना, ज्यांत पौलाचा देखील समावेश होतो स्वर्गीय जीवनाचे बक्षीस मिळणार आहे असे बायबल सांगते. हे सर्व येशू ख्रिस्ताबरोबर पृथ्वीवर हजार वर्षांकरता राज्य करतील. देवाने या लोकांना किती उत्तम ध्येय दिले आहे ज्याचा ते पिच्छा करू शकतात. पण, आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांपैकी बहुतेकांपुढे एक वेगळे ध्येय आहे ज्याचा त्यांना पाठपुरावा करायचा आहे. यहोवाने प्रेमळपणे त्यांच्यासाठी एक आशा दिली आहे जी आशा आदाम व हव्वेने गमावली होती. आदाम हव्वेला पृथ्वीवरील नंदनवनात परिपूर्ण आरोग्यात सार्वकालिक जीवनाची आशा होती.—प्रकटी. ७:४, ९; २१:१-४.

३. देवाने दाखवलेल्या अपात्र कृपेबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो?

पापी मनुष्य जे बरोबर आहे ते करून स्वतःच्या हिकमतीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकत नाहीत. (यश. ६४:६) देवाने येशू ख्रिस्ताद्वारे केलेल्या प्रेमळ तरतुदीवर विश्‍वास ठेवल्यानेच सार्वकालिक जीवन मिळणे शक्य आहे. देवाने दाखवलेल्या या अपात्र कृपेबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? “नीतिमत्त्व, सुभक्‍ति, विश्‍वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लाग” * या आज्ञेचे पालन करून आपण कदर दाखवू शकतो. (१ तीम. ६:११) या गुणांवर मनन केल्याने आपल्यातील प्रत्येकाला हे गुण मिळवण्याचा ‘अधिकाधिक’ प्रयत्न करण्याचा दृढनिश्‍चय करता येईल.—१ थेस्सलनी. ४:१, पं.र.भा.

‘नीतिमत्त्वाच्या पाठीस लाग’

४. ‘नीतिमत्त्वाचा’ पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे हे आपण खात्रीने कसे म्हणू शकतो आणि असे करण्यासाठी एखादी व्यक्‍ती कोणती पावले उचलू शकते?

पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दोन्ही पत्रात आपण ज्या गुणांचा पाठपुरावा केला पाहिजे अशा गुणांची यादी दिली व या यादीत त्याने प्रत्येक वेळा “नीतिमत्त्व” या गुणाचा उल्लेख प्रथम केला. (१ तीम. ६:११; २ तीम. २:२२) याशिवाय, बायबलमध्ये इतर ठिकाणी आपल्याला नीतिमत्त्वाचा पाठपुरावा करण्याचे वारंवार उत्तेजन मिळते. (नीति. १५:९; २१:२१; यश. ५१:१) असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, ‘एकाच खऱ्‍या देवाला व त्याने ज्याला पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखणे’ अर्थात या दोघांचे ज्ञान घेणे. (योहा. १७:३) एखाद्या व्यक्‍तीने नीतिमत्त्वाचा पाठपुरावा केल्यास ती पूर्वीच्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करण्यास आणि देवाची इच्छा करण्यासाठी मागे ‘वळण्यास’ प्रेरित होईल.—प्रे. कृत्ये ३:१९.

५. देवासमोर एक नीतिमान भूमिका मिळवून ती राखण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

आज नीतिमत्त्वाचा पाठपुरावा करणाऱ्‍या लाखो लोकांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे व हे समर्पण पाण्याने बाप्तिस्मा घेऊन व्यक्‍त केले आहे. तुम्ही आता बाप्तिस्मा घेतलेले प्रचारक आहात तर तुम्ही नीतिमत्त्वाचा पाठपुरावा करत आहात हे तुमच्या जीवनशैलीवरून दिसले पाहिजे किंवा दिसत आहे या गोष्टीवर तुम्ही कधी विचार केला आहे का? असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, जीवनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेताना “चांगले आणि वाईट” काय आहे ते बायबलमधून समजून घेणे. (इब्री लोकांस ५:१४ वाचा.) उदाहरणार्थ, समजा तुम्ही एक ख्रिस्ती आहात व तुमचे लग्नाचे वय झाले आहे. तर तुम्ही बाप्तिस्मा न झालेल्या ख्रिस्ती व्यक्‍तीबरोबर प्रेमसंबंध न जुळवण्याचा ठाम निश्‍चय केला आहे का? असा निश्‍चय तुम्ही केला असल्यास तुम्ही नीतिमत्त्वाचा पाठपुरावा करत आहात.—१ करिंथ. ७:३९.

६. नीतिमत्त्वाचा पाठपुरावा करण्यात काय काय गोवले आहे?

नीतिमान असणे हे स्वतःला अधिक धार्मिक समजणे किंवा “फाजील धार्मिक” असण्यापासून वेगळे आहे. (उप. ७:१६) धार्मिकतेचा आव आणून स्वतःला इतरांपेक्षा अधिक नीतिमान दाखवण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध येशूने इशारा दिला. (मत्त. ६:१) नीतिमत्त्वाचा पाठपुरावा करण्यात आपले हृदय गोवले आहे. आपण नीतिमान होऊ इच्छित असू तर आपल्याला आपल्या मनातील चुकीचे विचार, प्रवृत्ती, हेतू व इच्छा सुधाराव्या लागतील. आपण जर असे करीत राहिलो तर आपल्या हातून गंभीर पाप घडणार नाहीत. (नीतिसूत्रे ४:२३ वाचा; याकोब. १:१४, १५ पडताळून पाहा.) एवढेच नव्हे तर यहोवाही आपल्यावर संतुष्ट होईल आणि इतर ख्रिस्ती गुण आपल्या अंगी बाणवण्याकरता आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश देईल.

‘सुभक्‍तीच्या पाठीस लाग’

७. ‘सुभक्‍तीचा’ काय अर्थ होतो?

भक्‍तिमान असण्यात पूर्णपणे समर्पित आणि निष्ठावंत असणे समाविष्ट आहे. बायबलच्या एका शब्दकोशात “सुभक्‍ती” असे ज्या ग्रीक शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे त्याचा अर्थ “देवाचे चांगले व हितकर भय बाळगणे” असा होतो. प्राचीन इस्राएल लोक अशाप्रकारची भक्‍ती दाखवण्यात उणे पडले. इजिप्तच्या दास्यत्वातून देवाने त्यांची सुटका केल्यावर देखील त्यांनी देवाची अवज्ञा केली.

८. (क) आदामाने पाप केल्यामुळे कोणता प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला? (ख)  ‘सुभक्‍तीच्या [या] रहस्याचे’ उत्तर कशा प्रकारे देण्यात आले?

परिपूर्ण मनुष्य आदाम याने पाप करून हजारो वर्षे उलटल्यानंतरही, “मानव पूर्णार्थाने सुभक्‍ती दाखवू शकतात का,” हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला. या हजारो वर्षांदरम्यान कोणीही पापी मनुष्य पूर्णार्थाने सुभक्‍तीनुसार जगू शकलेला नाही. पण योग्य वेळी यहोवाने ‘सुभक्‍तीच्या [या] रहस्याचे’ उत्तर दिले. परिपूर्ण मानव म्हणून जन्माला येण्याकरता त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे जीवन मरीयेच्या उदरात स्थलांतरीत केले. पूर्णपणे समर्पित व खऱ्‍या देवाशी निष्ठावंत असण्याचा काय अर्थ होतो हे येशूने पृथ्वीवरील आपल्या संपूर्ण जीवनादरम्यान आणि त्याच्या अपमानास्पद मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत एकनिष्ठ राहून दाखवले. त्याने केलेल्या प्रार्थनांतून त्याला आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याबद्दल किती श्रद्धा होती हे दिसून येते. (मत्त. ११:२५; योहा. १२:२७, २८) अशा प्रकारे, येशूच्या अनुकरणीय जीवनक्रमाचे वर्णन करण्याकरता यहोवाने पौलाला ‘सुभक्‍तीविषयी’ लिहिण्यास प्रेरित केले.—१ तीमथ्य ३:१६ वाचा.

९. आपण सुभक्‍तीचा पाठपुरावा कसा करू शकतो?

आपल्या पापी अवस्थेत आपण पूर्णार्थाने सुभक्‍ती दाखवू शकत नाही. पण आपण सुभक्‍तिचा पाठपुरावा करू शकतो अर्थात भक्‍तिमान होण्याचा नेटाने प्रयत्न करू शकतो. यासाठी आपल्याला ख्रिस्ताने मांडलेल्या उदाहरणाचे होता होईल तितक्या जवळून अनुकरण करावे लागेल. (१ पेत्र २:२१) आपण त्या दांभिक लोकांप्रमाणे होणार नाही जे ‘सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारतात.’ (२ तीम. ३:५) याचा असा अर्थ होत नाही, की आपण खऱ्‍या अर्थाने भक्‍तिमान असलो तर आपले बाह्‍य स्वरूप कसेही असले तरी काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ, विवाह समारंभाला जाताना अथवा बाजार करण्यासाठी जाताना आपला पेहराव, आपण ‘देवभक्‍ति स्वीकारली’ आहे या आपल्या दाव्याशी नेहमी जुळण्यास हवा. (१ तीम. २:९, १०) आपण जर सुभक्‍तीचा पाठपुरावा करू इच्छितो तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात देवाच्या धार्मिक स्तरांनुसार जगणे आवश्‍यक आहे.

‘विश्‍वासाच्या पाठीस लाग’

१०. आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१० रोमकर १०:१७ वाचा. मजबूत विश्‍वास उत्पन्‍न करून तो टिकवून ठेवण्याकरता ख्रिश्‍चनांनी देवाच्या वचनातील अमूल्य सत्यांवर मनन करीत राहिले पाहिजे. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ अनेक उत्तम प्रकाशने तयार केली आहेत. यापैकी तीन उल्लेखनीय पुस्तके, सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, थोर शिक्षकाकडून शिका (इंग्रजी) आणि “चल, माझ्यामागे ये,” (इंग्रजी) ही आहेत. ख्रिस्ताला चांगल्या प्रकारे ओळखण्यास व ओळखल्यामुळे होता होईल तितक्या जवळून त्याचे अनुकरण करण्यास ही तीन पुस्तके बनवण्यात आली आहेत. (मत्त. २४:४५-४७) दास वर्ग सभा, संमेलने आणि अधिवेशनांचे आयोजन देखील करतो. या कार्यक्रमांच्या बहुतेक भागात ‘ख्रिस्ताच्या वचनावर’ जोर दिला जातो. देव पुरवत असलेल्या वरील गोष्टींकडे ‘विशेष लक्ष लावत’ असताना तुम्ही आणखी कोणकोणत्या मार्गांनी यांचा अधिक फायदा करून घेऊ शकता?—इब्री २:१.

११. विश्‍वासाचा पाठपुरावा करण्यात प्रार्थना आणि आज्ञाधारकपणाची काय भूमिका आहे?

११ मजबूत विश्‍वास उत्पन्‍न करण्यासाठी आणखी एक मदत म्हणजे प्रार्थना. येशूच्या शिष्यांनी एकदा त्याला, “आमचा विश्‍वास वाढवा,” अशी विनंती केली. आपणही देवाकडे नम्रपणे अशीच विनंती करू शकतो. (लूक १७:५) अधिक विश्‍वासाकरता, आपण देवाच्या पवित्र आत्म्याची मदत मिळावी म्हणून प्रार्थना केली पाहिजे; “विश्‍वास” हा ‘पवित्र आत्म्याच्या फळाचा’ एक पैलू आहे. (गलती. ५:२२) तसेच, देवाच्या आज्ञेचे पालन करूनही आपला विश्‍वास दृढ होतो. उदाहरणार्थ, प्रचार कार्यात अधिक सहभाग घेतल्यामुळे आपल्याला मनापासून आनंद मिळेल. आणि ‘पहिल्याने त्याचे राज्य व [देवाचे] नीतिमत्त्व मिळविण्यास झटल्याने’ मिळणाऱ्‍या आशीर्वादांवर आपण मनन करतो तेव्हा आपला विश्‍वास मजबूत होतो.—मत्त. ६:३३.

‘प्रीतीच्या पाठीस लागा’

१२, १३. (क) येशूने दिलेली नवी आज्ञा कोणती आहे? (ख) कोणकोणत्या मार्गांनी आपण ख्रिस्ताप्रमाणे प्रीतीचा पाठपुरावा केला पाहिजे?

१२ पहिले तीमथ्य ५:१, २ वाचा. ख्रिस्ती एकमेकांना प्रीती कशी दाखवू शकतात याविषयी पौलाने व्यावहारिक सल्ला दिला. आपल्या सुभक्‍तीत येशूने दिलेल्या नव्या आज्ञेचे पालन करणे समाविष्ट असले पाहिजे. ही नवी आज्ञा अशी, की येशूने ज्याप्रमाणे आपल्यावर प्रीती केली तशी आपणही “एकमेकांवर” केली पाहिजे. (योहा. १३:३४) प्रेषित योहानाने म्हटले: “जवळ संसाराची साधने असून व आपला बंधु गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीति कशी राहणार?” (१ योहा. ३:१७) अशी प्रीती आपल्या कार्यांतून दाखवल्याचे प्रसंग तुम्हाला आठवतात का?

१३ आणखी एका मार्गाने आपण प्रीतीचा पाठपुरावा करू शकतो. तो म्हणजे, आपल्या बांधवांविरुद्ध मनात राग न बाळगता त्यांना क्षमा करणे. (१ योहान ४:२० वाचा.) याऐवजी आपण या ईश्‍वरप्रेरित सल्ल्याचे पालन करू: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” (कलस्सै. ३:१३) मंडळीत तुमचे कोणाबरोबर खटकत असेल तर तुम्ही हा सल्ला कशा प्रकारे लागू करू शकता? तुम्ही त्या व्यक्‍तीला क्षमा करायला तयार आहात का?

‘धीराच्या पाठीस लागा’

१४. फिलदेल्फिया येथील मंडळीतल्या बांधवांच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१४ अल्पकालीक ध्येय साध्य करण्याकरता आपल्यापरीने होता होईल तितका प्रयत्न करणे एक गोष्ट आहे परंतु हे ध्येय साध्य करण्याकरता कठीण असेल किंवा ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणे ही पूर्णपणे दुसरी गोष्ट आहे. होय, सार्वकालिक जीवनाच्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याकरता धीराची आवश्‍यकता आहे. “धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे म्हणून . . . जो परीक्षाप्रसंग . . . येणार आहे, त्यापासूनहि मी तुला राखीन,” असे प्रभू येशूने फिलदेल्फिया मंडळीला सांगितले. (प्रकटी. ३:१०) धीर दाखवणे किती महत्त्वाचे आहे हे येशूने शिकवले. आपल्याला जेव्हा परीक्षांचा किंवा मोहांचा सामना करावा लागतो तेव्हा धीरामुळे आपण हार मानत नाही. फिलदेल्फिया येथील पहिल्या शतकातील मंडळीतल्या बांधवांनी त्यांच्यावर आलेल्या विश्‍वासाच्या अनेक परीक्षाप्रसंगांत उल्लेखनीय धीर दाखवला असावा. म्हणूनच येशूने त्यांना, पुढे येणाऱ्‍या एका मोठ्या परीक्षेच्या वेळी तो त्यांच्या पाठीशी असेल असे आश्‍वासन दिले.—लूक १६:१०.

१५. धीराविषयी येशूने काय शिकवले?

१५ सत्यात नसलेले नातेवाईक आणि जगातील लोक आपल्या अनुयायांचा द्वेष करतील हे येशूला माहीत होते त्यामुळे त्याने निदान दोन प्रसंगी तरी त्यांना असे उत्तेजन दिले: “जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.” (मत्त. १०:२२; २४:१३) त्यावेळी त्यांना शेवटपर्यंत टिकून राहण्याकरता धैर्य कसे मिळणार होते हेही येशूने दाखवले. एका दाखल्यात त्याने, खडकाळ जमिनीची तुलना, देवाचे “वचन आनंदाने ग्रहण” करणाऱ्‍या परंतु विश्‍वासाच्या परीक्षांच्या वेळी गळून पडणाऱ्‍या लोकांबरोबर केली. पण, आपल्या विश्‍वासू अनुयायांची तुलना त्याने चांगल्या मातीशी केली जी देवाचे वचन “धरून” ठेवते व ‘धीराने फळ देत जाते.’—लूक ८:१३, १५.

१६. यहोवाने केलेली कोणती प्रेमळ तरतूद आज कोट्यवधी लोकांना धीर दाखवण्यास मदत करत आहे?

१६ धीराने टिकून राहण्याचे रहस्य तुमच्या लक्षात आले का? आपण देवाचे वचन “धरून” ठेवले पाहिजे अर्थात ते आपल्या हृदयात व मनात जिवंत ठेवले पाहिजे. असे करण्यास आपल्याला साहाय्य करणारे एक साधन म्हणजे पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी). हे बायबल अचूक, समजण्यास सोपे व अधिकाधिक भाषांमध्ये उपलब्ध होत आहे. देवाच्या वचनातील एखाद्या भागावर मनन केल्याने आपल्याला, “धीराने फळ देत” राहण्यास आवश्‍यक असलेले बळ मिळेल.—स्तो. १:१, २.

शांती व ‘सौम्यतेच्या पाठीस लागा’

१७. (क) ‘सौम्य’ असणे इतके महत्त्वाचे का आहे? (ख) येशू सौम्य होता हे त्याने कसे दाखवले?

१७ खोटे आरोप लावलेले कोणालाही आवडत नाही. लोकांवर जेव्हा खोटे आरोप लावले जातात तेव्हा साहजिकच ते संतापतात. पण “सौम्यता” दाखवण्यात किती सुज्ञपणा आहे. (नीतिसूत्रे १५:१ वाचा.) खोटे आरोप लावले जातात तेव्हा सौम्यपणे वागण्यास खूप मनोबल लागते. येशू ख्रिस्ताने याबाबतीत एक उत्तम उदाहरण मांडले. “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.” (१ पेत्र २:२३) येशू जसा वागला अगदी तसेच आपण वागू शकत नसलो तरी, होता होईल तितक्या प्रमाणात सौम्यता दाखवण्याच्या बाबतीत आपण सुधारणा करू शकतो का?

१८. (क) सौम्यपणा दाखवल्याने कोणते चांगले परिणाम होतात? (ख) इतर कोणत्या गुणाचा पाठपुरावा करण्याचा आग्रह आपल्याला करण्यात आला आहे?

१८ येशूप्रमाणे आपणही आपल्या विश्‍वासांविषयी विचारपूस करणाऱ्‍यांना “सौम्यतेने व भीडस्तपणाने” उत्तर देण्यास “नेहमी सिद्ध” असू या. (१ पेत्र ३:१५) आपण सौम्य असलो तर, क्षेत्रात भेटणाऱ्‍या लोकांबरोबर व आपल्या बंधूभगिनींबरोबर आपले जेव्हा दुमत होते तेव्हा आपल्यातला वाद शिगेला पोहचणार नाही. (२ तीम. २:२४, २५) सौम्यपणामुळे आपण शांती उपभोगू शकतो. म्हणूनच की काय, प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात, आपण ज्या गुणांचा पाठपुरावा केला पाहिजे त्या गुणांमध्ये ‘शांतीचा’ देखील उल्लेख केला. (२ तीम. २:२२; १ तीमथ्य ६:११ पडताळून पाहा.) होय, “शांति” हा आणखी एक गुण आहे ज्याचा पाठपुरावा करण्याचे उत्तेजन बायबलमध्ये देण्यात आले आहे.—स्तो. ३४:१४; इब्री १२:१४.

१९. सात ख्रिस्ती गुणांवर चर्चा केल्यानंतर तुम्ही कशाचा पाठपुरावा करण्याचा निश्‍चय केला आहे व का?

१९ आपण पाठपुरावा केला पाहिजे अशा सात ख्रिस्ती गुणांवर, जसे की नीतिमत्त्व, सुभक्‍ती, विश्‍वास, प्रीती, धीर, सौम्यता आणि शांती यांवर आपण चर्चा केली. प्रत्येक मंडळीतील बंधूभगिनी हे अमुल्य गुण दाखवण्याचा आपल्या परीने आटोकाट प्रयत्न करतात तेव्हा ते किती चांगले आहे! यामुळे यहोवाचा महिमा होईल आणि त्याच्या स्तुतीकरता आपल्यातील प्रत्येकाला तो आकार देऊ शकेल.

[तळटीप]

^ परि. 3 “पाठीस लाग” यासाठी पौलाने वापरलेल्या मूळ शब्दाचा अक्षरशः अर्थ, “पाठलाग करणे, पिच्छा पुरवणे, मागे धावणे असा होतो आणि लाक्षणिक अर्थ, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे, काही तरी मिळवण्याचा नेटाने प्रयत्न करणे,” असा होतो.

मनन करण्याकरता मुद्दे

• नीतिमत्त्वाचा व सुभक्‍तीचा पाठपुरावा करण्यात काय काय गोवलेले आहे?

• विश्‍वासाचा आणि धीराचा पाठपुरावा करण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करेल?

• प्रीतीचा आपल्या एकमेकांबरोबरील व्यवहारावर कसा परिणाम झाला पाहिजे?

• आपण सौम्यतेचा व शांतीचा पाठपुरावा करण्याची गरज का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्र]

लोकांवर छाप पाडण्यासाठी नीतिमत्तेचा आव आणण्याविरुद्ध येशूने इशारा दिला

[१३ पानांवरील चित्र]

देवाच्या वचनातील सत्यावर मनन केल्याने आपण विश्‍वासाचा पाठपुरावा करू शकतो

[१५ पानांवरील चित्र]

आपण प्रीतीचा व सौम्यतेचा पाठपुरावा करू शकतो