व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा अधिकार मान्य करा

यहोवाचा अधिकार मान्य करा

यहोवाचा अधिकार मान्य करा

“देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहा. ५:३.

१, २. (क) दुसऱ्‍यांच्या अधिकाराखाली राहण्याची कल्पना आज बहुतेक जणांना का रुचत नाही? (ख) जे कोणाचाही अधिकार जुमानत नाहीत, ते खरोखरच स्वतंत्र आहेत असे म्हणता येईल का? खुलासा करा.

आज बहुतेक लोकांना दुसऱ्‍या कोणाच्या अधिकाराखाली राहण्याची कल्पना रुचत नाही. “मी काय करावं किंवा करू नये हे कुणी मला सांगण्याची गरज नाही” असे ते म्हणतात. अशा वृत्तीचे लोक कोणत्याही रुढीपरंपरांना जुमानत नाहीत. पण हे लोक खरोखरच स्वतंत्र आहेत, असे म्हणता येईल का? नाही. कारण त्यांच्यापैकी बरेच जण, “या युगाबरोबर समरूप” झालेल्या इतरांचे अनुकरण करत असतात. (रोम. १२:२) स्वतंत्र असणे तर दूरच, पण ख्रिस्ती प्रेषित पेत्र याच्या शब्दांत सांगायचे, तर हे लोक “भ्रष्टतेचे दास” आहेत. (२ पेत्र २:१९) ते “ह्‍या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपति” म्हणजेच दियाबल सैतान याच्या सांगण्याप्रमाणे वागतात.—इफिस. २:२.

“माझ्यासाठी काय योग्य आहे, हे ठरवण्याचा अधिकार मी माझ्या आईवडिलांना, कोणत्याही पाळकाला, गुरूला किंवा बायबललाही देत नाही,” असे एका लेखकाने गर्विष्ठपणे म्हटले. अधिकारपदी असलेले बरेच जण आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेतात हे कबूल आहे. शिवाय, इतरांना त्यांच्या आज्ञेत राहावेसे वाटेल अशा प्रकारचे त्यांचे आचरणही नसते. तरीपण, आपल्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही असा निष्कर्ष काढणे हा यावरील उपाय आहे का? दररोज घडणाऱ्‍या भयानक घटनांच्या बातम्यांवर एक नजर टाकल्यास आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. मानवजातीला आपल्या काळात मार्गदर्शनाची नितान्त गरज असूनही, ते स्वीकारण्याची आज बहुतेकांची वृत्ती नाही हे खरोखरच दुःखदायक आहे.

अधिकाराप्रती आपली भूमिका

३. आपण मानवी अधिकाऱ्‍यांच्या सांगण्यानुसार डोळे मिटून वागत नाही, हे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी कशा प्रकारे दाखवले?

ख्रिस्ती या नात्याने, आपण अधिकाराप्रती जगातील लोकांपेक्षा वेगळी भूमिका घेतो. अर्थात, इतर जण जे सांगतील त्याचे आपण डोळे मिटून पालन करतो असा याचा अर्थ होत नाही. उलट काही प्रसंगी, अधिकारपदी असलेल्या व्यक्‍तीच्या सांगण्यानुसार वागण्यास आपण नकार दिला पाहिजे. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या बाबतीत असेच घडले. उदाहरणार्थ, प्रेषितांना प्रचार करण्यास मनाई करण्यात आली, तेव्हा त्यांनी मुख्य याजक व सन्हेद्रिनच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्‍यांपुढे हतबल होऊन निमूटपणे त्यांचे म्हणणे ऐकले नाही. मानवी अधिकाराला शरण जाऊन, जे योग्य ते करत राहण्याचे त्यांनी सोडून दिले नाही.—प्रेषितांची कृत्ये ५:२७-२९ वाचा.

४. देवाच्या लोकांपैकी बऱ्‍याच जणांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन देवाच्या आज्ञांचे पालन केले हे इब्री शास्त्रवचनांतील कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

देवाच्या सेवकांपैकी, येशू ख्रिस्ताच्या काळाआधी होऊन गेलेले अनेक जण अशाच प्रकारच्या दृढनिश्‍चयी वृत्तीने वागले. उदाहरणार्थ, मोशेने ‘राजाच्या क्रोधाला न भिता, आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे नाकारले [व] देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे पसंत करून घेतले.’ (इब्री ११:२४, २५, २७) योसेफानेही पोटिफराच्या पत्नीचे अनैतिक प्रस्ताव झिडकारण्यास मागेपुढे पाहिले नाही. आपल्या धन्याची पत्नी आपल्याविरुद्ध सूड उगवून आपल्याला हानी पोचवू शकते हे माहीत असूनही त्याने असे केले. (उत्प. ३९:७-९) तसेच, दानीएलाने राजमहालातील अन्‍न खाऊन ‘आपणास विटाळ होऊ देऊ नये असा मनाचा निश्‍चय केला.’ बॅबिलोनमधील खोजांच्या अधिकाऱ्‍याने दानीएलाची ही भूमिका सहजासहजी स्वीकारली नाही, तरीसुद्धा दानीएल खंबीर राहिला. (दानी. १:८-१४) या उदाहरणांवरून हेच दिसून येते, की सबंध इतिहासात देवाच्या लोकांनी परिणामांची तमा न बाळगता, जे योग्य ते करत राहण्याकरता निश्‍चयी भूमिका घेतली. केवळ मानवी अधिकाऱ्‍यांची मर्जी राखण्याकरता त्यांनी कधीही नमते घेतले नाही, आणि आपणही घेऊ नये.

५. अधिकाराप्रती आपली भूमिका जगातील लोकांपेक्षा कशा प्रकारे वेगळी आहे?

ही धैर्यशील भूमिका म्हणजे केवळ हेकटपणा किंवा अडेल वृत्ती नाही. तसेच, सरकारविरुद्ध बंड करणाऱ्‍या आंदोलनकर्त्यांसारखे वागण्याचीही आपली इच्छा नाही. फक्‍त इतकेच, की आपण कोणत्याही मानवापेक्षा यहोवाच्या अधिकारास मान देतो. या बाबतीत आपण कोणताही समझोता करू इच्छित नाही. मानवाने केलेले कायदे, देवाच्या कायद्यांच्या विरोधात गेल्यास आपण काय करावे, हे ठरवण्याकरता आपल्याला दोनदा विचार करावा लागत नाही. पहिल्या शतकातील प्रेषितांप्रमाणेच आपण मानवाची नव्हे तर देवाची आज्ञा मानतो.

६. यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे नेहमी चांगले का असते?

देवाचा अधिकार मान्य करण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करते? नीतिसूत्रे ३:५, ६ यात जे सांगितले आहे त्याच्याशी आपण पूर्णपणे सहमत आहोत: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” देव आपल्याला जे काही करण्यास सांगतो त्यामुळे शेवटी आपले भलेच होईल याची आपल्याला खात्री आहे. (अनुवाद १०:१२, १३ वाचा.) यहोवाने इस्राएलांना संबोधून असे म्हटले: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” पुढे त्याने म्हटले: “तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.” (यश. ४८:१७, १८) या शब्दांवर आपल्याला भरवसा आहे. देवाच्या आज्ञांचे पालन करणे नेहमी आपल्या हिताचे असते याची आपल्याला खात्री पटली आहे.

७. देवाच्या वचनात दिलेल्या एखाद्या आज्ञेमागचे कारण पूर्णपणे न समजल्यास आपण काय करावे?

यहोवाच्या वचनात दिलेल्या एखाद्या आज्ञेमागचे कारण आपल्याला पूर्णपणे समजले नाही तरीसुद्धा आपण त्याचा अधिकार मान्य करतो आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतो. अंधविश्‍वासामुळे किंवा भोळसटपणामुळे नव्हे, तर देवावर असलेल्या भरवशामुळे आपण असे करतो. कोणती गोष्ट आपल्या हिताची आहे हे यहोवाला माहीत आहे याची आपल्याला मनःपूर्वक खात्री असल्याचे यावरून दिसून येते. आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन का करतो याचे आणखी एक कारण म्हणजे आपले त्याच्यावर प्रेम आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” (१ योहा. ५:३) पण आज्ञापालनाचा आणखी एक पैलू आहे व त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये.

आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव देणे

८. ‘ज्ञानेंद्रियांना सराव’ देणे हे यहोवाचा अधिकार मान्य करण्याशी कशा प्रकारे संबंधित आहे?

बायबल आपल्याला सांगते की आपल्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” झाला पाहिजे. (इब्री ५:१४) त्याअर्थी, आपण देवाच्या आज्ञांचे पालन केवळ करायचे म्हणून करत नाही. तर यहोवाच्या नीतिनियमांच्या आधारे “चांगले आणि वाईट” यांतील फरक समजून घेण्याची क्षमता आपण विकसित करू इच्छितो. यहोवाचे मार्ग किती सूज्ञ आहेत याची आपण प्रतीती करू इच्छितो, ज्यायोगे आपल्यालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणे असे म्हणता येईल: “तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”—स्तो. ४०:८.

९. आपण कशा प्रकारे आपल्या विवेकबुद्धीचा यहोवाच्या मार्गांशी मेळ घालू शकतो आणि असे करणे महत्त्वाचे का आहे?

स्तोत्रकर्त्याप्रमाणे, देवाच्या नियमांचे मोल जाणण्याकरता आपण बायबलमधून जे काही वाचतो त्यावर मनन केले पाहिजे. उदाहरणार्थ, यहोवाच्या एखाद्या नियमाविषयी वाचल्यावर आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘ही आज्ञा योग्य का आहे? या आज्ञेचे पालन करणे माझ्या हिताचे का आहे? याबाबतीत देवाच्या सल्ल्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांना कोणते दुष्परिणाम भोगावे लागले आहेत?’ जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या विवेकाचा देवाच्या मार्गांशी मेळ घालतो, तेव्हा आपल्याला देवाच्या इच्छेनुसार निर्णय घेणे जास्त सोपे जाते. आपल्याला सर्व गोष्टींत “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून” घेणे आणि त्यानुसार वागणे शक्य होते. (इफिस. ५:१७) पण हे नेहमीच सोपे नसते.

देवाचा अधिकार कमकुवत करण्यास सैतान प्रयत्नशील

१०. सैतानाने देवाच्या अधिकारास कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे असे कोणते एक क्षेत्र आहे?

१० सैतान सुरुवातीपासूनच देवाचा अधिकार कमकुवत करण्यास प्रयत्नशील राहिला आहे. त्याची स्वैराचारी वृत्ती कितीतरी गोष्टींतून दिसून येते. उदाहरणार्थ, देवाने स्थापन केलेल्या विवाहाच्या व्यवस्थेचा अनादर करण्याची प्रवृत्ती. आज काही जोडपी लग्न न करताच एकत्र राहणे पसंत करतात. तर इतर जण वैवाहिक बंधनातून मुक्‍त होण्याचे मार्ग शोधत असतात. या दोन्ही प्रकारचे लोक एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्‍त केलेल्या पुढील विधानाशी कदाचित सहमत होतील: “एकाच जोडीदाराबरोबर आयुष्यभर राहणे स्त्री व पुरुष दोघांकरता अशक्य आहे.” तिने पुढे म्हटले: “आपल्या जोडीदाराला विश्‍वासू असणारी किंवा राहू इच्छिणारी एकही व्यक्‍ती माझ्यातरी पाहण्यात आलेली नाही.” तसेच एक लोकप्रिय अभिनेता, ज्याचे अनेक स्त्रियांशी संबंध तुटले, त्यानेही काहीसे असेच मत व्यक्‍त केले. तो म्हणतो: “जीवनभर एकाच व्यक्‍तीसोबत राहणे हे खरोखर नैसर्गिक आहे का याबद्दल मला शंका वाटते.” आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘विवाहाच्या बाबतीत मी यहोवाचा अधिकार मान्य करतो का, की जगातील लोकांच्या बेपर्वा वृत्तीचा माझ्या विचारसरणीवर प्रभाव पडला आहे?’

११, १२. (क) तरुणांना यहोवाचा अधिकार मान्य करणे जड का जाते? (ख) यहोवाचे नियम व तत्त्वे यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुःखद परिणाम घडू शकतात हे दाखवणारा एक अनुभव सांगा.

११ तुम्ही यहोवाच्या संघटनेतील एक तरुण व्यक्‍ती आहात का? जर असाल, तर सैतान खासकरून तुमच्यासारख्याच व्यक्‍तींना आपले निशाण बनवून यहोवाच्या अधिकारास सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतो हे आठवणीत असू द्या. ‘तरुणपणाच्या वासना,’ व त्यांत भर घालण्याकरता मित्रमैत्रिणींकडून येणारा दबाव, या गोष्टी कधीकधी तुम्हाला देवाच्या आज्ञा त्रासदायक आहेत असा विचार करायला लावू शकतात. (२ तीम. २:२२) पण असे कधीही घडू देऊ नका. देवाच्या नीतिनियमांत किती सुज्ञता आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” असे बायबल तुम्हाला सांगते. (१ करिंथ. ६:१८) पुन्हा एकदा, स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘ही आज्ञा योग्य का आहे? या आज्ञेचे पालन करणे माझ्या हिताचे का आहे?’ ज्यांनी देवाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले व यामुळे ज्यांना भारी किंमत मोजावी लागली अशा काही व्यक्‍तींना तुम्ही स्वतः ओळखत असाल. ते खरोखरच सुखी आहेत का? आज त्यांचे जीवन ते यहोवाच्या संघटनेत असताना होते, त्यापेक्षा चांगले आहे का? देवाच्या सेवकांपैकी बाकीचे सर्व जण ज्याला मुकले आहेत, असे जीवनात सुखी होण्याचे काहीतरी खास गुपीत त्यांना सापडले आहे का?—यशया ६५:१४ वाचा.

१२ शॅरन नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीने काही काळाआधी असे म्हटले: “यहोवाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मला एड्‌स या भयानक रोगाने ग्रासले आहे. मला कित्येकदा यहोवाच्या सेवेत घालवलेली वर्षे आठवतात. तेव्हा मी किती आनंदी होते.” यहोवाच्या नियमांचे उल्लंघन करून आपण केवढा मूर्खपणा केला व या नियमांचे मोल आपण ओळखायला हवे होते याची तिला जाणीव झाली. खरोखर, यहोवाचे नियम आपल्याच संरक्षणाकरता असतात. वरील शब्द लिहिल्यानंतर अवघ्या सात आठवड्यांत शॅरनचा मृत्यू झाला. तिच्या दुःखद अनुभवावरून हेच दिसून येते, की जे सैतानाच्या या दुष्ट जगाचा भाग बनतात त्यांना तो काहीही चांगले देऊ शकत नाही. “लबाडीचा बाप” असणारा सैतान आश्‍वासने तर बरीच देतो, पण त्यांपैकी एकही खरे ठरत नाही. हव्वेला दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे ती सर्व फोल ठरतात. (योहा. ८:४४) खरोखर, यहोवाचा अधिकार मान्य करणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे.

स्वतंत्र वृत्तीपासून सावध राहा

१३. आपण कोणत्या बाबतीत स्वतंत्र वृत्तीपासून सावध राहिले पाहिजे?

१३ यहोवाचा अधिकार मानण्यासोबतच आपण स्वतंत्र वृत्तीपासून सावध राहिले पाहिजे. गर्विष्ठ मनोवृत्ती, आपल्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही असा विचार करण्यास भाग पाडू शकते. उदाहरणार्थ, देवाच्या लोकांमध्ये पुढाकार घेणाऱ्‍यांचा सल्ला स्वीकारण्यास कदाचित आपण नकार देऊ. पण यहोवाने आपल्या लोकांना यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याकरता विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाची व्यवस्था केली आहे. (मत्त. २४:४५-४७) आज यहोवा याच मार्गाने आपल्या लोकांची काळजी वाहत आहे हे आपण नम्रपणे कबूल केले पाहिजे. याबाबतीत विश्‍वासू प्रेषितांच्या उदाहरणाचे आपण अनुकरण केले पाहिजे. काही शिष्य येशूला सोडून गेले तेव्हा येशूने प्रेषितांना विचारले: “तुमचीहि निघून जाण्याची इच्छा आहे काय?” पेत्राने उत्तर दिले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.”—योहा. ६:६६-६८.

१४, १५. आपण बायबलमधील सल्ल्याचे नम्रपणे पालन का केले पाहिजे?

१४ यहोवाचा अधिकार मान्य करण्यात साहजिकच त्याच्या वचनातील मार्गदर्शनाचे पालन करणेही आलेच. उदाहरणार्थ, विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्ग आपल्याला ‘जागे व सावध राहण्यास’ बजावत आहेत. (१ थेस्सलनी. ५:६) हा सल्ला या शेवटल्या काळात अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज बहुतेक जण “स्वार्थी, धनलोभी” झाले आहेत. (२ तीम. ३:१, २) जगात सर्वसामान्य असलेल्या या प्रवृत्तींचा आपल्यावरही प्रभाव पडू शकतो का? हो, निश्‍चितच पडू शकतो. जी आध्यात्मिक स्वरूपाची नाहीत, अशी ध्येये आपल्याला देवाच्या सेवेत सुस्त बनवू शकतात. अशी ध्येये ठेवल्यामुळे आपण धनसंपत्तीच्या मागे लागण्याची शक्यता आहे. (लूक १२:१६-२१) म्हणूनच, बायबलमधील सल्ला स्वीकारणे व सैतानाच्या या जगात प्रचलित असणारी स्वार्थी जीवनशैली टाळणे खरेच किती महत्त्वाचे आहे!—१ योहा. २:१६.

१५ विश्‍वासू व बुद्धिमान दासांकडून मिळणारे आध्यात्मिक अन्‍न नियुक्‍त वडिलांच्या माध्यमाने वेगवेगळ्या मंडळ्यांना दिले जाते. बायबल आपल्याला अशी आज्ञा देते: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.” (इब्री १३:१७) मंडळीच्या वडिलांकडून कधीच कोणतीही चूक होऊ शकत नाही असा याचा अर्थ होतो का? नाही! या वडिलांमध्ये असणाऱ्‍या कमतरता कोणत्याही मनुष्यापेक्षा यहोवा जास्त स्पष्टपणे पाहू शकतो. आणि तरीसुद्धा तो आपल्याकडून अशी अपेक्षा करतो की आपण त्यांच्या अधीन असावे. त्याअर्थी, वडील अपरिपूर्ण असले तरीसुद्धा त्यांना सहकार्य करण्याद्वारे आपल्याला यहोवाचा अधिकार मान्य आहे हे आपण दाखवतो.

नम्रतेचे महत्त्व

१६. ख्रिस्ती मंडळीचे मस्तक असणाऱ्‍या येशूविषयी आपण आदर कसा दाखवू शकतो?

१६ मंडळीचे मस्तक खरे तर येशू ख्रिस्त आहे हे आपण कधीही विसरू नये. (कलस्सै. १:१८) म्हणूनच आपण नियुक्‍त वडिलांच्या सूचनांचे पालन करतो आणि त्यांना “अत्यंत मान” देतो. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) अर्थात, मंडळीतील वडीलही, स्वतःची मते नव्हेत तर देवाचा संदेश मंडळीला देण्याद्वारे, आपण ख्रिस्ताच्या अधीन आहोत हे दाखवू शकतात. ते स्वतःचे एखादे वैयक्‍तिक मत पुढे करण्यासाठी कधीही ‘शास्त्रलेखापलीकडे जात नाहीत.’—१ करिंथ. ४:६.

१७. महत्त्वाकांक्षी वृत्ती धोकेदायक का आहे?

१७ मंडळीतील सर्वांनीच स्वतःच्या गौरवाच्या पाठीस लागण्यापासून संभाळले पाहिजे. (नीति. २५:२७) प्रेषित योहानाला भेटलेला एक शिष्य याच पाशाला बळी पडला होता. योहानाने त्याच्याविषयी असे लिहिले: “[मंडळीमध्ये] अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही. ह्‍यामुळे मी आलो तर तो जी कृत्ये करितो त्यांची आठवण देईन; तो आम्हाविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करितो.” (३ योहा. ९, १०) यात आपल्याकरताही एक धडा आहे. आपल्यामध्ये जर महत्त्वाकांक्षी वृत्तीचा जराही अंश असला तर तो उपटून टाकणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण बायबल आपल्याला सांगते: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.” जे देवाचा अधिकार मान्य करतात, त्यांनी गर्विष्ठपणाचा पाश टाळलाच पाहिजे. नाहीतर, अप्रतिष्ठा ठरलेली आहे.—नीति. ११:२; १६:१८.

१८. कोणती गोष्ट आपल्याला यहोवाचा अधिकार मान्य करण्यास मदत करेल?

१८ तर मग, या जगातील स्वतंत्र वृत्ती टाळण्याचा व यहोवाचा अधिकार मान्य करण्याचा दृढनिश्‍चय करा. यहोवाची सेवा करण्याचा जो बहुमान तुम्हाला मिळाला आहे, त्याविषयी वेळोवेळी मनन करा. तुम्ही आज यहोवाच्या लोकांमध्ये आहात हाच या गोष्टीचा पुरावा आहे, की त्याने तुम्हाला आपल्या पवित्र आत्म्याद्वारे स्वतःकडे आकर्षित केले आहे. (योहा. ६:४४) तेव्हा, देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाला कधीही क्षुल्लक लेखू नका. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचा अव्हेर करता आणि यहोवाचा अधिकार मान्य करता, हे जीवनात जे काही कराल त्यातून दाखवण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला आठवते का?

• यहोवाचा अधिकार मान्य करण्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?

• आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव देणे हे यहोवाचा अधिकार मान्य करण्याशी कशा प्रकारे संबंधित आहे?

• सैतान कोणकोणत्या बाबतींत देवाचा अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो?

• यहोवाचा अधिकार मान्य करण्यासाठी नम्र असणे का आवश्‍यक आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

“आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे”

[२० पानांवरील चित्र]

देवाच्या नीतिनियमांचे पालन करण्यातच सुज्ञता आहे