व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणते फळास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही

कोणते फळास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही

कोणते फळास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही

‘सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल हे तुला ठाऊक नसते.’—उप. ११:६.

१. वाढीची प्रकिया पाहणे हा एक चमत्कारिक अनुभव आहे व हा अनुभव आपल्याला नम्र बनवतो असे का म्हणता येईल?

शेतकऱ्‍याने अधीर होऊन चालत नाही, त्याला धीर धरावा लागतो. (याको. ५:७) बी पेरल्यानंतर ते जमिनीत रुजेपर्यंत व त्यास अंकुर फुटेपर्यंत शेतकऱ्‍याला वाट पाहावी लागते. योग्य वातावरण असल्यास, काही काळाने इवलीशी कोंबे मातीतून बाहेर डोकावू लागतात. मग त्यांची रोपे होतात. रोपांची पूर्ण वाढ झाल्यानंतर शेतात कणसे डोलू लागतात. पाहता पाहता, पीक तयार होते आणि शेतकरी कापणीच्या तयारीला लागतो. लहानशा बीपासून दाण्यांनी भरलेली कणसे होईपर्यंतची ही चमत्कारिक वाढ होताना पाहणे हा खरोखर एक अनोखा अनुभव असतो. तसेच, ही वाढ घडवून आणणाऱ्‍याविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा अनुभव आपल्याला नम्र बनवतो. कारण, आपण बी पेरून त्याला पाणी घालू शकतो. त्याची जोपासना करू शकतो. पण वाढ घडवून आणणे हे मात्र देवाच्याच हातात असते.—१ करिंथकर ३:६ पडताळून पाहा.

२. याआधीच्या लेखात चर्चा करण्यात आलेल्या दृष्टान्तांतून आध्यात्मिक वाढीसंबंधी येशूने कोणत्या गोष्टी शिकवल्या?

याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे येशूने राज्य प्रचाराच्या कार्याची तुलना शेतातील पेरणीच्या कामाशी केली. शेतकऱ्‍याने चांगल्या प्रतीचे बी पेरले तरीसुद्धा ते बी वाढेल किंवा नाही हे प्रत्येक व्यक्‍तीच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे हे स्पष्ट करण्यासाठी येशूने वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींचा दृष्टान्त दिला. (मार्क ४:३-९) बी पेरून झोपी जाणाऱ्‍या शेतकऱ्‍याच्या दृष्टान्तातून येशूने या गोष्टीवर प्रकाश टाकला, की वाढ नेमकी कशा प्रकारे घडून येते हे शेतकऱ्‍याला पूर्णपणे समजत नाही. कारण वाढ मनुष्याच्या प्रयत्नाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने घडून येते. (मार्क ४:२६-२९) आता आपण येशूने दिलेल्या आणखी तीन दृष्टान्तांवर विचार करू या. मोहरीचा दाणा, खमीर व मासे धरण्याचे जाळे यांविषयी हे तीन दृष्टान्त आहेत. *

मोहरीच्या दाण्याचा दृष्टान्त

३, ४. मोहरीच्या दाण्याच्या दृष्टान्तावरून राज्य संदेशाविषयी कोणत्या गोष्टी स्पष्ट होतात?

मोहरीच्या दाण्याचा दृष्टान्त देखील मार्कच्या चौथ्या अध्यायातच सापडतो. या दृष्टान्तातून दोन गोष्टी उजेडात येतात. एक गोष्ट म्हणजे, राज्याच्या संदेशाची होणारी अद्‌भुत वाढ आणि दुसरी म्हणजे, हा संदेश स्वीकारणाऱ्‍यांना मिळणारे संरक्षण. येशूने म्हटले: “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांस त्याच्या सावलीत वस्ती करता येते.”—मार्क ४:३०-३२.

हा दृष्टान्त ‘देवाच्या राज्याच्या’ वाढीचे वर्णन करतो. सा. यु. ३३ पासून राज्य संदेशाचा सर्वदूर झालेला प्रसार व ख्रिस्ती मंडळीत झालेली अभूतपूर्व वृद्धी, या वाढीचा पुरावा आहे. मोहरीचा दाणा लहानसाच असतो आणि एखाद्या लहानशा गोष्टीस तो सूचित करू शकतो. (लूक १७:६ पडताळून पाहा.) पण कालांतराने मोहरीचे रोपटे, झाड म्हणण्याइतके म्हणजे १०-१५ फुटांपर्यंत वाढू शकते व त्याच्या फांद्याही मजबूत होतात.—मत्त. १३:३१, ३२.

५. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीची कशा प्रकारे वाढ झाली?

सा.यु. ३३ साली ख्रिस्ती मंडळीच्या जवळजवळ १२० सदस्यांना पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले, तेव्हापासून या मंडळीची वाढ होण्यास सुरुवात झाली. त्या वेळी ही मंडळी अतिशय लहान होती. काही काळातच या लहानशा मंडळीत ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारणाऱ्‍या हजारो जणांची भर पडली. (प्रेषितांची कृत्ये २:४१; ४:४; ५:२८; ६:७; १२:२४; १९:२० वाचा.) यानंतरच्या तीन दशकांच्या कालावधीत कापणी करणाऱ्‍यांची संख्या इतकी वाढली होती, की ‘आकाशाखालच्या सर्व सृष्टीत सुवार्तेची घोषणा झाली,’ असे प्रेषित पौल कलस्सै येथील मंडळीला लिहू शकला. (कलस्सै. १:२३) खरोखरच ही किती विलक्षण वाढ होती!

६, ७. (क) एकोणीसशे चौदापासून कोणती वाढ दिसून आली आहे? (ख) ही वाढ पुढेही कशा प्रकारे होत राहणार आहे?

देवाच्या राज्याची १९१४ साली स्वर्गात स्थापना झाली तेव्हापासून मोहरीच्या ‘झाडाला’ कोणी कल्पनाही केली नसेल इतक्या फांद्या फुटल्या आहेत. देवाच्या लोकांनी यशयाच्या भविष्यवाणीची पूर्णता आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल.” (यश. ६०:२२) विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत राज्य प्रचाराचे काम करणाऱ्‍या अभिषिक्‍त जणांना याची पुसटशीही कल्पना नव्हती, की सन २००८ पर्यंत जवळजवळ सत्तर लाख साक्षीदार २३० देशांत हे कार्य करत असतील. येशूने मोहरीच्या दाण्याच्या दृष्टान्तात वर्णन केल्याप्रमाणेच, ही वाढ खरोखर थक्क करणारी आहे!

पण ही वाढ येथेच थांबते का? नाही. लवकरच तो दिवस येईल जेव्हा पृथ्वीवर राहणारी प्रत्येक व्यक्‍ती देवाच्या राज्याला अधीन झालेली असेल. विरोध करणाऱ्‍या सर्वांचा नाश झालेला असेल. हे सर्व, मनुष्याच्या प्रयत्नांमुळे नव्हे, तर यहोवाने कारवाई करून पृथ्वीचा कारभार आपल्या हातात घेतल्यामुळे घडून येईल. (दानीएल २:३४, ३५ वाचा.) त्यावेळी आपल्याला यशयाची आणखी एक भविष्यवाणी खऱ्‍या अर्थाने पूर्ण झालेली पाहायला मिळेल: “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यश. ११:९.

८. (क) येशूच्या दृष्टान्तातील पाखरे कोणास सूचित करतात? (ख) आजही आपल्याला कशापासून संरक्षण मिळते?

येशूने म्हटले की आकाशातल्या पाखरांस या राज्याच्या सावलीत वस्ती करता येते. ही पाखरे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींवर बी पेरणाऱ्‍या मनुष्याच्या दृष्टान्तातील, चांगले बी खाऊन टाकणाऱ्‍या पाखरांसारखी नाहीत. म्हणजेच, ही पाखरे देवाच्या राज्याच्या शत्रूंना सूचित करत नाहीत. (मार्क ४:४) तर या दृष्टान्तातील पाखरे, ख्रिस्ती मंडळीत आश्रय घेणाऱ्‍या चांगल्या मनोवृत्तीच्या लोकांना सूचित करतात. आजही, त्यांना या दुष्ट जगाच्या अनैतिक व अशुद्ध चालीरितींपासून संरक्षण मिळते. (यशया ३२:१, २ पडताळून पाहा.) एका भविष्यवाणीत, यहोवानेही मशीही राज्याची तुलना एका झाडाशी केली होती. त्याने म्हटले: “मी इस्राएलाच्या उंच पर्वतावर [एक डहाळी] लावीन; तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंधसरू होईल; म्हणजे मग त्याच्याखाली सर्व पक्षिकुळे राहतील; त्याच्या शाखांच्या छायेत ती वस्ती करितील.”—यहे. १७:२३.

खमिराचा दृष्टान्त

९, १०. (क) खमिराच्या दृष्टान्तात येशूने कोणत्या मुद्द्‌यावर प्रकाश टाकला? (ख) बायबलमध्ये खमीर अनेक वेळा कशास सूचित करते आणि येशूने केलेल्या खमिराच्या उल्लेखासंबंधी आता आपण कोणत्या प्रश्‍नावर विचार करणार आहोत?

वाढ ही नेहमीच डोळ्यांना दिसेल अशा प्रकारे घडत नाही. पुढील दृष्टान्तात येशू याच मुद्द्‌यावर प्रकाश टाकतो. तो म्हणतो: “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेविले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” (मत्त. १३:३३) हे खमीर कशाचे चिन्ह आहे आणि राज्याच्या वाढीशी त्याचा काय संबंध आहे?

१० बायबलमध्ये, खमीर हे अनेक वेळा पापास सूचित करण्याकरता वापरण्यात आले आहे. प्राचीन करिंथ येथील एका पापी व्यक्‍तीमुळे सबंध मंडळीवर पडलेल्या वाईट प्रभावाविषयी बोलताना प्रेषित पौलाने खमिराचा याच अर्थाने उपयोग केला होता. (१ करिंथ. ५:६-८) तर मग, आता येशू एखाद्या वाईट गोष्टीच्या वाढीबद्दल सांगण्याकरता खमिराचा उल्लेख करत होता का?

११. प्राचीन इस्राएलात खमिराचा कशा प्रकारे वापर केला जात असे?

११ या प्रश्‍नाचे उत्तर पाहण्याआधी आपण तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली म्हणजे, वल्हांडणाच्या सणादरम्यान खमीर असलेली अर्पणे न देण्याची जरी यहोवाने आज्ञा दिली असली, तरीसुद्धा इतर वेळी त्याने खमिराची अर्पणे स्वीकारली. उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणासाठी खमिराचा वापर केला जात असे. ही यज्ञार्पणे यहोवाच्या अनेक आशीर्वादांबद्दल त्याचे आभार व्यक्‍त करण्याकरता कृतज्ञतेच्या भावनेने स्वेच्छापूर्वक दिली जात असत. शांत्यर्पणाचे भोजन हा एक आनंदाचा प्रसंग असे.—लेवी. ७:११-१५.

१२. बायबलमध्ये ज्या प्रकारे रूपके वापरली आहेत त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१२ दुसरी गोष्ट म्हणजे, शास्त्रवचनांत एखाद्या संज्ञेचा एखाद्या वाईट गोष्टीबद्दल सांगण्यासाठी उपयोग करण्यात आला असला, तरीसुद्धा दुसऱ्‍या ठिकाणी त्याच संज्ञेचा एखाद्या चांगल्या गोष्टीच्या संदर्भातही उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, १ पेत्र ५:८ यात सैतान किती क्रूर व धोकेदायक आहे हे सांगण्याकरता त्याची तुलना सिंहाशी करण्यात आली आहे. आणि प्रकटीकरण ५:५ यात येशूलाही सिंह म्हटले आहे. तो “यहूदा वंशाचा सिंह” आहे असे आपण तेथे वाचतो. या दुसऱ्‍या उदाहरणात, येशू सिंहासारखा धैर्यवान व न्यायप्रिय आहे असे सांगायचे आहे.

१३. खमिराविषयी दिलेल्या दृष्टान्तातून येशूने आध्यात्मिक वाढीसंबंधी काय स्पष्ट केले?

१३ तिसरी गोष्ट अशी, की खमिरामुळे सगळे पीठ खराब झाले किंवा टाकून द्यावे लागले असे येशूने या दृष्टान्तात म्हटले नाही. तो पाव बनवण्याच्या सर्वसाधारण पद्धतीविषयी बोलत होता. या दृष्टान्तातील स्त्रीने मुद्दामहून पिठात खमीर घातले होते आणि त्याचा हवा तसाच परिणाम झाला. खमीर पिठामध्ये लपवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे, पीठ फुगण्याची प्रक्रिया स्त्रीला प्रत्यक्षात दिसली नाही. यावरून आपल्याला बी पेरून झोपी जाणाऱ्‍या माणसाच्या दृष्टान्ताची आठवण होते. येशूने म्हटले, “बी रुजते व वाढते पण हे कसे होते हे त्याला कळत नाही.” (मार्क ४:२७) आध्यात्मिक वाढ अदृश्‍यपणे घडते हे येशूने किती साध्या उदाहरणातून समजावून सांगितले! सुरुवातीला कदाचित आपल्याला वाढ होताना दिसणार नाही, पण कालांतराने तिचे परिणाम स्पष्ट दिसून येतात.

१४. खमिरामुळे सगळे पीठ फुगून गेले यावरून प्रचार कार्याविषयी कोणती गोष्ट स्पष्ट होते?

१४ ही वाढ मनुष्याला अदृश्‍य असण्यासोबतच ती व्यापक प्रमाणावर घडून येते. ही खमिराच्या दृष्टान्तावरून स्पष्ट होणारी आणखी एक गोष्ट आहे. खमिरामुळे सगळे पीठ म्हणजे, ‘तीन मापे पीठ’ फुगून जाते. (लूक १३:२१) खमिराप्रमाणेच, ज्या राज्य प्रचाराच्या कार्यामुळे आध्यात्मिक वाढ घडून आली आहे त्याचा इतका विस्तार झाला आहे, की आज ते कार्य “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” केले जात आहे. (प्रे. कृत्ये १:८; मत्त. २४:१४) दिवसेंदिवस अद्‌भुत रीत्या वाढत चाललेल्या राज्य प्रचाराच्या कार्यात सहभागी होणे हा आपल्याकरता खरोखरच किती मोठा बहुमान आहे!

मासे धरण्याचे जाळे

१५, १६. (क) जाळ्याच्या दृष्टान्ताचा सारांश सांगा. (ख) जाळे कशास सूचित करते आणि हा दृष्टान्त राज्याच्या वाढीशी संबंधित असलेल्या कोणत्या पैलूवर प्रकाश टाकतो?

१५ येशू ख्रिस्ताचे शिष्य बनू इच्छिणाऱ्‍यांच्या संख्येपेक्षा ते त्याचे खरे शिष्य ठरतील किंवा नाही हे जास्त महत्त्वाचे आहे. राज्याच्या वाढीशी संबंधित असलेल्या या पैलूचा येशूने आणखी एक दृष्टान्त देताना उल्लेख केला. त्याने म्हटले: “स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे.”—मत्त. १३:४७.

१६ मासे धरण्याचे जाळे राज्य प्रचाराच्या कार्याला सूचित करते. या जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात. येशूने पुढे असे म्हटले: “[जाळे] भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.”—मत्त. १३:४८-५०.

१७. जाळ्याच्या दृष्टान्तात वर्णन केलेले वेगळे करण्याचे काम कोणत्या कालावधीत घडते?

१७ येशूने म्हटले होते, की तो मोठ्या वैभवाने येईल तेव्हा शेरडे व मेंढरे यांचा अंतिम न्याय केला जाईल. जाळ्याच्या दृष्टान्तात वर्णन केलेले वेगळे करण्याचे काम याच अंतिम न्यायाला सूचित करते का? (मत्त. २५:३१-३३) नाही. तो अंतिम न्याय मोठ्या संकटादरम्यान येशू येईल तेव्हा केला जाईल. पण, जाळ्याच्या दृष्टान्तातील वेगळे करण्याचे काम “युगाच्या समाप्तीस” घडते. * आज आपण या काळात, अर्थात मोठ्या संकटाअगोदरच्या कालावधीत राहात आहोत. तर मग आज हे वेगळे करण्याचे काम कशा प्रकारे केले जात आहे?

१८, १९. (क) आजच्या काळात वेगळे करण्याचे कोणते काम केले जात आहे? (ख) प्रामाणिक मनाच्या लोकांनी कोणती पावले उचलली पाहिजेत? (पृष्ठ २१ वरील तळटीपही पाहावी.)

१८ आपल्या काळात मानवजातीच्या विशाल सागरातील लाखो लाक्षणिक मासे यहोवाच्या मंडळीकडे आकर्षित झाले आहेत. यांपैकी काही जण स्मारकविधीला उपस्थित राहतात. इतर जण आपल्या सभांना येतात. तर आणखी काही जण केवळ बायबलचा अभ्यास करण्यात समाधान मानतात. पण हे सर्वच जण खरे ख्रिस्ती बनतात का? त्यांना ‘किनाऱ्‍याकडे ओढले जाते’ खरे, पण येशूने म्हटले की जे “चांगले” आहेत, केवळ त्यांनाच भांड्यांत जमा केले जाते. ही भांडी ख्रिस्ती मंडळ्यांना सूचित करतात. वाईट मासे फेकून दिले जातात. शेवटी त्यांना लाक्षणिक अग्नीच्या भट्टीत टाकून दिले जाईल, म्हणजेच त्यांचा कायमचा सर्वनाश केला जाईल.

१९ वाईट माशांप्रमाणेच, एके काळी यहोवाच्या लोकांसोबत बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या बऱ्‍याच जणांनी अभ्यास करण्याचे बंद केले आहे. तसेच, ज्यांचे आईवडील साक्षीदार आहेत अशा बऱ्‍याच जणांना येशूचे अनुयायी बनण्याची मुळातच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेण्याविषयी आजपर्यंत टाळमटाळ केली आहे. किंवा, काही काळ यहोवाची सेवा केल्यानंतर ते यहोवाच्या संस्थेपासून दूर गेले आहेत. * (यहे. ३३:३२, ३३) पण, प्रामाणिक मनाच्या सर्व लोकांनी आज आवश्‍यक पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना भांड्यांसारख्या असणाऱ्‍या मंडळ्यांमध्ये जमा केले जाऊ शकेल. तसेच, त्यांनी शेवटपर्यंत सुरक्षित स्थानी टिकून राहणेही अत्यंत गरजेचे आहे.

२०, २१. (क) येशूने वाढीसंबंधी दिलेल्या दृष्टान्तांच्या चर्चेतून आपल्याला काय शिकायला मिळाले आहे? (ख) तुम्ही काय करण्याचे ठरवले आहे?

२० तर मग, वाढीसंबंधी येशूने दिलेल्या दृष्टान्तांची आपण थोडक्यात जी चर्चा केली आहे त्यातून आपल्याला काय शिकायला मिळाले आहे? पहिली गोष्ट ही, की ज्या प्रकारे मोहरीच्या दाण्याची वाढ होते, त्याच प्रकारे आज पृथ्वीवर राज्य संदेशाला प्रतिसाद देणाऱ्‍यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कोणतीही गोष्ट यहोवाच्या कार्यात बाधा बनू शकत नाही! (यश. ५४:१७) शिवाय, जे “[झाडाच्या] सावलीत वस्ती” करण्यासाठी आले आहेत त्यांना सैतानाच्या दुष्ट जगापासून संरक्षण मिळाले आहे. जी दुसरी गोष्ट आपण शिकलो आहोत, ती अशी की वाढ घडवणारा हा देवच आहे. ज्या प्रकारे पिठात लपवलेल्या खमिराने सगळे पीठ फुगून गेले त्याच प्रकारे ही वाढ नेहमीच समजेल अशा प्रकारे घडून आलेली नाही. पण ती सगळ्या पृथ्वीभर झाली आहे हे मात्र निश्‍चित! तिसरी गोष्ट म्हणजे, प्रतिसाद देणाऱ्‍या सर्वांनीच चांगल्या माशांसारखे असल्याचे दाखवलेले नाही. त्यांच्यापैकी काही जण येशूच्या दृष्टान्तातील वाईट माशांसारखे ठरले आहेत.

२१ तरीपण, आज यहोवा असंख्य लोकांना स्वतःकडे आकर्षित करत आहे हे पाहून आपल्याला किती प्रोत्साहन मिळते! (योहा. ६:४४) एकापाठोपाठ एक अशा कित्येक देशांत अभूतपूर्व वाढ झाली आहे. या सर्वाचे श्रेय यहोवालाच जाते. पण ही वाढ पाहून आपल्यापैकी प्रत्येकाला कित्येक शतकांआधी लिहिण्यात आलेल्या या आदेशाचे पालन करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे: “सकाळी आपले बी पेर . . . कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.”—उप. ११:६.

[तळटीपा]

^ परि. 2 यापूर्वी टेहळणी बुरूज सप्टेंबर १, १९९२ यातील पृष्ठे १९-२४, तसेच ऑक्टोबर १, १९७५ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे ५८९-६०८ यांत या दृष्टान्तांचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. या लेखात या विषयांवर सुधारित स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

^ परि. 17 मत्तय १३:३९-४३ यातील दृष्टान्तात राज्य प्रचाराच्या कार्याच्या एका वेगळ्या पैलूविषयी सांगितलेले असले, तरीसुद्धा त्या दृष्टान्ताच्या पूर्णतेचा काळ व जाळ्याच्या दृष्टान्ताचा पूर्णतेचा काळ सारखाच आहे. या दोन्ही दृष्टान्तांची पूर्णता ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळादरम्यान घडते. बी पेरण्याचे व कापणीचे काम ज्या प्रकारे या सबंध काळादरम्यान घडत राहते, त्याच प्रकारे लाक्षणिक मासे वेगळे करण्याचे काम देखील या काळादरम्यान चालू राहते.—टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १५, २०००, पृष्ठे २५-२६; एकमेव खऱ्‍या देवाची उपासना करणे (इंग्रजी), पृष्ठे १७८-१८१, परि. ८-११.

^ परि. 19 याचा अर्थ असा होतो का, की यहोवाच्या लोकांसोबत अभ्यास करण्याचे किंवा सभांना यायचे ज्यांनी सोडून दिले आहे अशा सर्व लोकांना देवदूतांनी वाईट मासे म्हणून फेकून दिले आहे? नाही! ज्या कोणाला यहोवाकडे परत येण्याची मनापासून इच्छा असेल त्याच्याकरता द्वार खुले आहे.—मला. ३:७.

तुमचे उत्तर काय असेल?

• मोहरीच्या दाण्याच्या दृष्टान्तावरून आपल्याला राज्याच्या वाढीविषयी व आध्यात्मिक संरक्षणाविषयी काय शिकायला मिळते?

• येशूच्या दृष्टान्तातील खमीर कशास सूचित करते आणि राज्याच्या वाढीसंबंधी येशू या दृष्टान्तातून कोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकतो?

• मासे धरण्याच्या जाळ्याच्या दृष्टान्तातून राज्याच्या वाढीसंबंधी कोणता पैलू स्पष्ट होतो?

• ज्यांना “भांड्यांत जमा केले” जाते त्यांमध्येच आपण शेवटपर्यंत राहावे म्हणून आपण काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्रे]

मोहरीच्या दाण्याच्या दृष्टान्तावरून आपल्याला राज्याच्या वाढीसंबंधी काय शिकायला मिळते?

[१९ पानांवरील चित्र]

खमिराच्या दृष्टान्तावरून आपण काय शिकतो?

[२१ पानांवरील चित्र]

चांगल्या व वाईट माशांचे वेगळे केले जाणे कशास सूचित करते?