व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

घरोघरच्या सेवाकार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करणे

घरोघरच्या सेवाकार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करणे

घरोघरच्या सेवाकार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करणे

“मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.”—१ थेस्सलनी. २:२.

१. यिर्मयाला कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले आणि या आव्हानांवर त्याने कशा प्रकारे मात केली?

यिर्मया हा आपल्यासारख्याच भावना असलेला माणूस होता. यहोवाने त्याला “राष्ट्रांचा संदेष्टा” म्हणून नेमले तेव्हा तो म्हणाला: “अहो, प्रभु परमेश्‍वर, पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” तरीसुद्धा, यहोवावर भरवसा ठेवून त्याने आपल्यावर सोपवण्यात आलेले कार्य स्वीकारले. (यिर्म. १:४-१०) जवळजवळ चाळीस वर्षांपर्यंत यिर्मयाला या कार्यात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. बहुतेक लोकांनी त्याच्या संदेशात आस्था दाखवली नाही. त्यांनी त्याचे ऐकले नाही, त्याची टिंगल केली. इतकेच काय, त्याला मारहाणही केली. (यिर्म. २०:१, २) यामुळे कधीकधी त्याला हे कार्य सोडून द्यावेसे वाटायचे. पण, बहुतेक लोकांना त्याचा संदेश नकोसा वाटत असूनही, तो आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहिला. देवाच्या पाठबळाने यिर्मया असे कार्य साध्य करू शकला, जे तो स्वतःच्या बळावर कधीही करू शकला नसता.यिर्मया २०:७-९ वाचा.

२, ३. यिर्मयाला ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्याच प्रकारच्या आव्हानांना आजही देवाच्या सेवकांना तोंड द्यावे लागते असे का म्हणता येईल?

आज देवाच्या सेवकांपैकी बरेच जण यिर्मयाच्या भावना समजू शकतात. घरोघरचे कार्य करू लागण्याआधी आपल्यापैकी कितीतरी जण असा विचार करायचे की ‘मला हे कधीच जमणार नाही.’ पण आपण सुवार्ता घोषित करावी ही यहोवाची इच्छा आहे, हे जेव्हा आपल्याला समजले तेव्हा आपण आपल्या भीतीवर मात केली आणि प्रचार कार्यात स्वतःला झोकून दिले. तरीसुद्धा, आपल्यापैकी बहुतेकांच्या जीवनात कधी न कधी अशी वेळ आली असेल जेव्हा, काही काळासाठी का होईना आपल्याला प्रचार कार्यात टिकून राहणे कठीण वाटले. खरोखर, घरोघरी जाऊन प्रचार करायला सुरुवात करणे, तसेच हे कार्य शेवटपर्यंत करत राहणे एक आव्हानच आहे.—मत्त. २४:१३.

तुम्ही काही काळापासून यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत असाल व मंडळीच्या सभांना उपस्थित राहात असाल, पण घरोघरचे प्रचार कार्य सुरू करण्यास मागे पुढे पाहात आहात का? किंवा, तुमचा बाप्तिस्मा झालेला असेल व तुम्हाला कोणतीही शारीरिक दुर्बलता नसेल, तरीसुद्धा तुम्हाला घरोघरी जाऊन साक्षकार्य करणे कठीण वाटते का? असे असल्यास खचून जाऊ नका, कारण सर्व परिस्थितींतील लोक घरोघरच्या कार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर यशस्वीरित्या मात करत आहेत. यहोवाच्या मदतीने तुम्हालाही असे करता येईल, यात शंका नाही.

सुवार्ता सांगण्याकरता धैर्य एकवटणे

४. धैर्याने सुवार्ता सांगत राहण्यास पौलाला कशामुळे मदत मिळाली?

सबंध जगातील प्रचार कार्य हे मनुष्याच्या सामर्थ्याने किंवा बुद्धीने नव्हे, तर देवाच्या आत्म्याद्वारे साध्य केले जात आहे हे तुम्ही नक्कीच मान्य कराल. (जख. ४:६) अगदी हेच, प्रत्येक साक्षीदाराच्या वैयक्‍तिक सेवाकार्याबद्दलही म्हणता येईल. (२ करिंथ. ४:७) प्रेषित पौलाचेच उदाहरण घ्या. विरोधकांद्वारे त्याचा व मिशनरी कार्यातील त्याच्या सहकाऱ्‍यांचा छळ होत असतानाचा एक प्रसंग आठवून तो असे लिहितो: “पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, . . . मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.” (१ थेस्सलनी. २:२; प्रे. कृत्ये १६:२२-२४) पौलासारख्या आवेशी प्रचारकालाही प्रचार कार्यात टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली असा आपण कधी विचारही करणार नाही. पण, तोही आपल्यासारखाच माणूस होता आणि त्यामुळे आपल्या सर्वांप्रमाणेच त्यालाही धैर्याने सुवार्ता सांगत राहण्याकरता यहोवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहावे लागले. (इफिसकर ६:१८-२० वाचा.) पौलाच्या उदाहरणाचे आपल्याला कशा प्रकारे अनुकरण करता येईल?

५. प्रचार कार्य करण्याकरता धैर्य एकवटण्याचा एक मार्ग कोणता आहे?

धैर्य एकवटण्याचा एक मार्ग म्हणजे प्रार्थना करणे. एक पायनियर बहीण म्हणते: “लोकांशी आत्मविश्‍वासाने बोलता यावं म्हणून मी प्रार्थना करते, शिकवलेल्या गोष्टी त्यांच्या अंतःकरणाला भिडाव्यात म्हणून प्रार्थना करते. शिवाय, मला सेवाकार्यातून आनंद मिळावा म्हणूनही मी प्रार्थना करते. शेवटी काही झालं तरी हे आपलं नव्हे तर यहोवाचं कार्य आहे. त्यामुळे, त्याच्या मदतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही.” (१ थेस्सलनी. ५:१७) धैर्याने प्रचार करण्याकरता आपण सर्वांनी सदोदित देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता प्रार्थना केली पाहिजे.—लूक ११:९-१३.

६, ७. (क) यहेज्केलाला कोणता दृष्टान्त देण्यात आला आणि त्याचा काय अर्थ होता? (ख) यहेज्केलाच्या दृष्टान्तातून आजच्या काळात देवाचे सेवक कोणता धडा घेऊ शकतात?

धैर्याने सुवार्ता सांगत राहण्यास आणखी कोणती गोष्ट मदत करू शकेल, हे आपल्याला यहेज्केलाच्या पुस्तकातून कळते. एका दृष्टान्तात, यहोवा यहेज्केलाला एक ग्रंथाचा पट देतो. या ग्रंथपटावर दोन्ही बाजूला “विलाप, शोक व आकांत” यांविषयी लिहिलेले होते. यहोवा यहेज्केलाला हा ग्रंथपट खायला सांगतो व म्हणतो: “मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर.” या दृष्टान्ताचा काय अर्थ होता? यहेज्केलाला जो संदेश लोकांना सांगायचा होता, तो त्याने स्वतः पूर्णपणे आत्मसात करून जणू त्यास आपल्या शरीराचा हिस्सा बनवायचा होता. त्याच्या अंतःकरणावर या संदेशाचा प्रभाव पडावा हा त्यामागचा उद्देश होता. संदेष्टा यहेज्केल पुढे सांगतो: “मी तो सेवन केला तो तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.” देवाचा संदेश लोकांना सांगणे हा यहेज्केलासाठी मध चाखण्यासारखा एक आनंददायक अनुभव होता. जरी त्याला एक अतिशय भारी संदेश लोकांना सांगायचा होता आणि बहुतेक लोकांनी या संदेशाला प्रतिसाद दिला नाही, तरीसुद्धा, यहोवाच्या वतीने लोकांकडे जाऊन हे कार्य करणे त्याच्या लेखी एक बहुमान होता.—यहेज्केल २:८–३:४, ७-९ वाचा.

या दृष्टान्तात आजच्या काळातील देवाच्या सेवकांकरता एक महत्त्वाचा धडा आहे. आपल्यालाही लोकांना एक भारी संदेश सांगायचा आहे. आणि, आजही बहुतेक लोक आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत, ख्रिस्ती सेवाकार्य म्हणजे देवाने आपल्याला दिलेला एक बहुमान आहे असा दृष्टिकोन टिकवून ठेवण्याकरता आपण आध्यात्मिक दृष्ट्या पौष्टिक आहार घेत राहिले पाहिजे. जर आपण फक्‍त वरवर किंवा अधूनमधून बायबलचा अभ्यास केला, तर आपल्याला देवाचे वचन पूर्णपणे आत्मसात करता येणार नाही. तुम्हाला तुमचे वैयक्‍तिक बायबल वाचन व बायबल अभ्यास आणखी चांगल्या रीतीने किंवा आणखी नियमितपणे करता येईल का? वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्याच्या बाबतीत तुम्हाला सुधारणा करता येईल का?—स्तो. १:२, ३.

चर्चा सुरू करणे

८. घरोघरच्या सेवाकार्यात चर्चा सुरू करण्यासाठी काही राज्य प्रचारकांना कोणती पद्धत साहाय्यक ठरली आहे?

घरोघरचे सेवाकार्य करताना, घरमालकाशी सुरुवातीला काय व कसे बोलावे हे ठरवणे बऱ्‍याच प्रचारकांना अतिशय कठीण वाटते. खरेच, काही क्षेत्रांत चर्चा सुरू करणे सोपे नाही. काही प्रचारकांना, सोबतच्या चौकटीत सांगितल्याप्रमाणे, निवडक शब्दांत लहानशी प्रस्तावना केल्यावर घरमालकाला एक पत्रिका देऊन त्यांच्याशी बोलणे जास्त सोपे वाटते. पत्रिकेचे शीर्षक किंवा त्यावरील चित्र घरमालकाचे लक्ष वेधू शकते. त्या दरम्यान आपण घरमालकाला आपल्या भेटीचा उद्देश सांगू शकतो आणि एखादा योग्य प्रश्‍न विचारू शकतो. * आणखी एक पद्धत म्हणजे, घरमालकाला तीन-चार वेगवेगळ्या पत्रिका दाखवून त्यांपैकी कोणतीही एक पत्रिका निवडण्यास सांगणे. अर्थातच, आपला हेतू लोकांना फक्‍त पत्रिकाच देणे किंवा प्रत्येक घरी त्यांचा वापर करणे नव्हे, तर बायबलवर आधारित चर्चा सुरू करणे हा आहे. असे केल्यामुळे आपल्याला बायबल अभ्यास सुरू करता येईल.

९. चांगली तयारी करणे महत्त्वाचे का आहे?

चर्चा सुरू करण्याकरता पद्धत कोणतीही वापरली तरीसुद्धा, जर तुम्ही चांगली तयारी करून गेलात, तर तुम्हाला घरोघरच्या सेवाकार्यात आत्मविश्‍वासाने व उत्साहीपणे बोलता येईल. एक पायनियर बंधू असे म्हणतो: “तयारी करून गेल्यास, मला सेवाकार्यात जास्त आनंद मिळतो आणि तयार केलेले सादरीकरण वापरण्यास मी उत्सुक असतो.” आणखी एक पायनियर बंधू म्हणतो: “सेवाकार्यात जी प्रकाशने द्यायची आहेत, त्यांतील माहिती आधीपासून वाचल्यास मला ती जास्त उत्साहीपणे सादर करता येतात.” तयारी करताना, आपण काय बोलणार याचा मनोमन विचार करणे जरी काही प्रमाणात फायदेशीर असले, तरी सादरीकरणाचा मोठ्याने सराव केल्यास जास्त फायदा होतो असे अनेकांना आढळले आहे. असे केल्यामुळे त्यांना अगदी उत्तम रीत्या यहोवाची सेवा करणे शक्य होते.—कलस्सै. ३:२३; २ तीम. २:१५.

१०. क्षेत्र सेवेच्या सभा सर्वांकरता उपयुक्‍त व फायदेकारक ठराव्यात म्हणून काय केले जाऊ शकते?

१० क्षेत्र सेवेच्या सभांमध्ये सेवेकरता उपयुक्‍त अशी माहिती सादर केल्यास, घरोघरच्या सेवाकार्यातील आपली परिणामकारकता व आनंद द्विगुणित होतो. जर त्या दिवसाचे दैनिक वचन प्रचार कार्याशी संबंधित असेल, तर ते वाचून त्यावर थोडक्यात चर्चा केल्यास हरकत नाही. पण, क्षेत्र सेवेची सभा चालवणाऱ्‍या बांधवाने त्यांच्या क्षेत्रात परिणामकारक ठरू शकेल अशा एखाद्या साध्याशा सादरीकरणावर चर्चा करण्यासाठी किंवा त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्या दिवशी सेवाकार्यात वापरता येईल अशी इतर व्यवहारोपयोगी माहितीही सादर केली जाऊ शकते. असे केल्यामुळे या सभेला उपस्थित राहणाऱ्‍या सर्वांना परिणामकारक रीतीने साक्ष देण्यास साहाय्य मिळेल. आधीपासूनच उत्तम तयारी केल्यास, या सभा चालवणाऱ्‍या वडिलांना व इतरांना हे उद्दिष्ट साध्य करता येईल. तसेच, त्यांना ठरलेल्या वेळात ही सभा आटोपणेही शक्य होईल.—रोम. १२:८.

ऐकून घेण्याचे महत्त्व

११, १२. सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतल्यामुळे आपल्याला लोकांच्या हृदयापर्यंत पोचणे कशा प्रकारे शक्य होते? उदाहरणे द्या.

११ सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांसोबत बायबलच्या आधारावर चर्चा सुरू करण्याकरता व त्यांच्या मनापर्यंत पोचण्याकरता केवळ चांगली तयारी करून जाणे पुरेसे नाही. त्यांच्याविषयी मनापासून काळजी, आस्था असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही काळजी व आस्था व्यक्‍त करण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेणे. एका प्रवासी पर्यवेक्षकाने म्हटले: “लोकांचे बोलणे ऐकून घेणे हा त्यांच्याबद्दल तुम्हाला मनापासून आस्था आहे हे दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे एक आश्‍चर्यकारक परिणाम घडून येतो. तो असा, की लोक तुमचा संदेश ऐकून घेण्यास प्रवृत्त होतात.” घरमालकाचे बोलणे प्रामाणिकपणे ऐकून घेतल्यामुळे जणू आपण त्याच्या हृदयात प्रवेश मिळवतो. याचे एक बोलके उदाहरण पाहा.

१२ फ्रांसमधील सेंटेट्येन शहरातील ले प्रॉग्रे या दैनिकात काही काळाआधी एक खुले पत्र प्रसिद्ध करण्यात आले. या पत्रात एका स्त्रीने आपल्या तीन महिन्यांच्या तान्ह्या मुलीचा दुःखद मृत्यू झाल्यानंतर दोन व्यक्‍तींनी दिलेल्या भेटीबद्दल वर्णन केले होते. तिने लिहिले: “या दोन व्यक्‍ती नक्कीच यहोवाच्या साक्षीदारांपैकी असाव्यात हे मी लगेच ताडले. काहीतरी निमित्त सांगून यांना घालवून द्यावे, असा मनोमन विचार करत असतानाच त्यांनी दाखवलेल्या एका माहितीपत्रकाकडे माझे लक्ष गेले. देवाने दुःख अस्तित्वात का राहू दिले आहे या विषयावर ते माहितीपत्रक होते. ते पाहिल्यावर मी त्यांना घरात बोलावले. त्यांचे तर्कवाद खोडून काढण्याचा माझा इरादा होता. . . . ते दोघे जवळजवळ तासभर बसले असतील. त्यांनी अतिशय सहानुभूतीपूर्वक माझे बोलणे ऐकून घेतले. त्यांच्याशी बोलल्यावर मला खूप बरे वाटू लागले. त्यांनी पुन्हा येण्याविषयी विचारले तेव्हा मी लगेच तयार झाले.” (रोम. १२:१५) काही काळानंतर या स्त्रीसोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. या स्त्रीला त्या पहिल्या भेटीत साक्षीदारांनी काय सांगितले हे नव्हे, तर त्यांनी कशा प्रकारे तिचे बोलणे ऐकून घेतले हे आठवणीत राहिले. ही गोष्ट बरेच काही सांगून जाते.

१३. सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांच्या विशिष्ट परिस्थितीनुसार आपण सुवार्ता सांगण्याची पद्धत कशा प्रकारे जुळवून घेऊ शकतो?

१३ आपण लोकांचे बोलणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतो तेव्हा खरे तर, त्यांना देवाच्या राज्याची गरज का आहे हे व्यक्‍त करण्याची आपण त्यांना संधी देतो. असे केल्यामुळे त्यांना सुवार्ता सांगणे आपल्याला आणखी सोपे जाते. अनुभवी व प्रभावी सुवार्तिक, लोकांचे ऐकून घेण्याच्या कलेत अतिशय निपुण असतात हे कदाचित तुमच्या पाहण्यात आले असेल. (नीति. २०:५) सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांबद्दल ते आपुलकी दाखवतात. केवळ नाव व पत्ताच नव्हे तर लोकांच्या आवडीनिवडी, चिंतेचे विषय यांचीही ते नोंद घेतात. कोणा व्यक्‍तीने एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल शंका व्यक्‍त केल्यास ते त्या विषयावर संशोधन करतात आणि लवकरात लवकर त्या व्यक्‍तीची पुन्हा भेट घेऊन ती माहिती तिला सांगतात. प्रेषित पौलाप्रमाणे ते सेवाकार्यात भेटणाऱ्‍या व्यक्‍तींच्या विशिष्ट परिस्थितीनुसार राज्याचा संदेश सादर करण्याची आपली पद्धत जुळवून घेतात. (१ करिंथकर ९:१९-२३ वाचा.) अशा प्रकारे मनापासून आस्था व्यक्‍त केल्यामुळे लोक राज्याच्या संदेशाकडे आकर्षित होतात. शिवाय, असे करताना आपण ‘आपल्या देवाच्या परम दयेचे’ अनुकरण करत असतो.—लूक १:७८.

नेहमी आशावादी असा

१४. सेवाकार्य करत असताना आपण यहोवाच्या गुणांचे अनुकरण कशा प्रकारे करू शकतो?

१४ यहोवाने आपल्या प्रत्येकाला चांगल्या वाईटाची निवड करण्याचे स्वातंत्र्य देऊन सन्मानित केले आहे. सर्वसमर्थ देव असूनही, त्याची सेवा करण्यास तो कोणालाही भाग पाडत नाही. उलट, लोकांवर प्रेम असल्यामुळे तो त्यांना आपली सेवा करण्याची विनंती करतो. तसेच, त्याच्या अद्‌भुत तरतुदींबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करणाऱ्‍यांना तो अनेक आशीर्वाद देतो. (रोम. २:४) त्याचे सेवक या नात्याने, आपण जेव्हा जेव्हा सुवार्ता सांगतो तेव्हा तेव्हा आपल्या दयाळू देवाचे आपण अनुकरण केले पाहिजे. (२ करिंथ. ५:२०, २१; ६:३-६) पण असे करता यावे म्हणून क्षेत्रातील लोकांबद्दल नेहमी आशावादी दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. हे अर्थातच सोपे नाही. पण कोणती गोष्ट या बाबतीत आपल्याला साहाय्य करेल?

१५. (क) लोकांनी संदेशाचा स्वीकार न केल्यास, येशूने आपल्या शिष्यांना काय करण्यास सांगितले? (ख) योग्य मनोवृत्तीच्या लोकांना शोधत राहण्याकरता कोणती गोष्ट साहाय्यक ठरू शकेल?

१५ येशूने आपल्या अनुयायांना सांगितले होते की काही लोकांनी त्यांच्या संदेशाचा स्वीकार न केल्यास, त्यांनी निराश होऊ नये. उलट, त्यांनी योग्य मनोवृत्तीच्या लोकांना शोधण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे. (मत्तय १०:११-१५ वाचा.) असे करण्यासाठी, आपण सहज साध्य करता येण्याजोगी छोटीछोटी ध्येये डोळ्यांपुढे ठेवली पाहिजेत. एक बंधू स्वतःची तुलना खाणीत सोने शोधणाऱ्‍याशी करतो. “आज मला नक्कीच सोने सापडेल,” हे त्याचे ब्रीदवाक्य आहे. आणखी एक बंधू “दर आठवडी निदान एका तरी आस्थेवाईक व्यक्‍तीला भेटून, तिची आस्था आणखी वाढवण्याकरता काही दिवसांतच तिला पुनर्भेट देण्याचे” ध्येय ठेवतो. काही प्रचारक शक्यतो प्रत्येक घरमालकाशी बोलताना कमीतकमी एक शास्त्रवचन उघडून दाखवण्याचा संकल्प करतात. तुम्हालाही अशा प्रकारचे एखादे सहज साध्य करण्याजोगे ध्येय ठेवता येईल का?

१६. प्रचार कार्य करत राहण्याकरता आपल्याकडे कोणकोणती कारणे आहेत?

१६ घरोघरच्या सेवाकार्याची सफलता फक्‍त क्षेत्रातील लोकांच्या प्रतिसादावरून मोजता येत नाही. प्रचार कार्यामुळे प्रामाणिक मनाच्या लोकांचे तारण शक्य होते, हे जरी खरे असले, तरीसुद्धा यामुळे इतर महत्त्वाची उद्दिष्टेही साध्य होतात. उदाहरणार्थ, ख्रिस्ती सेवाकार्यामुळे यहोवावर आपले किती प्रेम आहे हे दाखवण्याची आपल्याला संधी मिळते. (१ योहा. ५:३) तसेच, यामुळे आपण लोकांच्या रक्‍ताचा दोष आपल्यावर येण्याचे टाळू शकतो. (प्रे. कृत्ये २०:२६, २७) या कार्यामुळे अधर्मी लोकांना, “न्यायनिवाडा करावयाची [देवाची] घटिका आली आहे” याची ताकीद मिळते. (प्रकटी. १४:६, ७) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सुवार्तेच्या प्रचारामुळे आज सबंध पृथ्वीवर यहोवाच्या नावाचे गौरव होत आहे. (स्तो. ११३:३) म्हणूनच, लोक ऐकोत अथवा न ऐकोत, आपण राज्याच्या संदेशाची घोषणा करत राहिले पाहिजे. सुवार्ता घोषित करण्यासाठी आपण जे काही परिश्रम घेतो ते यहोवाच्या दृष्टीत मनोरम आहेत.—रोम. १०:१३-१५.

१७. लोकांना लवकरच कोणती गोष्ट मान्य करावी लागेल?

१७ आज बरेच लोक आपल्या प्रचार कार्याकडे दुर्लक्ष करतात. पण लवकरच, ते त्याकडे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील. (मत्त. २४:३७-३९) यहोवाने यहेज्केलाला असे आश्‍वासन दिले होते, की त्याने घोषित केलेले न्यायसंदेश खरे ठरतील तेव्हा इस्राएल घराण्यास ‘कोणी तरी संदेष्टा त्याजकडे गेला होता हे समजेल.’ (यहे. २:५) त्याच प्रकारे सध्याच्या जगाविरुद्ध यहोवा आपला न्यायदंड बजावेल तेव्हा लोकांना हे मान्य करावेच लागेल की यहोवाच्या साक्षीदारांनी सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी घोषित केलेला संदेश मुळात एकमेव खरा देव यहोवा याच्याकडून होता आणि साक्षीदार खरोखरच त्याच्या वतीने बोलत होते. इतिहासातील या अतिशय निर्णायक काळात, यहोवाचे नाव धारण करण्याचा आणि त्याचा संदेश घोषित करण्याचा केवढा महान सुहक्क आपल्याला मिळाला आहे! तेव्हा, त्याच्याच पाठबळावर विसंबून राहण्याद्वारे आपण घरोघरच्या कार्यातील आव्हानांवर मात करत राहू या.

[तळटीप]

^ परि. 8 काही क्षेत्रांतील परिस्थिती लक्षात ठेवून, आमची राज्य सेवा यापेक्षा काहीशी वेगळी पद्धत सुचवू शकते.

तुमचे उत्तर काय असेल?

• प्रचार कार्य करण्याकरता आपण कशा प्रकारे धैर्य एकवटू शकतो?

• घरोघरच्या सेवाकार्यात बायबलमधील विषयांवर चर्चा सुरू करण्याकरता आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?

• आपण इतरांबद्दल मनस्वी आस्था कशी व्यक्‍त करू शकतो?

• आपल्या क्षेत्रातील लोकांबद्दल आशावादी दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला कशामुळे मदत होईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चौकट/चित्र]

बायबलवर आधारित चर्चा सुरू करण्याचा एक मार्ग

सुरुवात अशी करावी:

◼ घरमालकाला अभिवादन केल्यावर, तुम्ही त्याला एक पत्रिका देऊन असे म्हणू शकता, “या महत्त्वाच्या विषयाबद्दल काही प्रोत्साहनदायक माहिती देण्याकरता मी आज आपल्याकडे आलो होतो.”

◼ किंवा तुम्ही एक पत्रिका देऊन असे म्हणू शकता, “आपली भेट घेण्याचं कारण म्हणजे, मी या विषयावर आपलं मत जाणून घेऊ इच्छितो.”

पत्रिका स्वीकारल्यास:

◼ जास्त वेळ न घालवता, पत्रिकेच्या शीर्षकाच्या आधारावर, घरमालकाला आपले मत व्यक्‍त करण्यास प्रोत्साहन देईल असा साधासा प्रश्‍न विचारा.

◼ घरमालकाची मते समजून घेण्याकरता त्यांचे उत्तर लक्षपूर्वक ऐका. मत व्यक्‍त केल्याबद्दल त्यांचे आभार माना आणि त्यांच्या अभिप्रायांचा चर्चेत समावेश करा.

चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी:

◼ घरमालकाच्या आवडीनिवडी आणि गरजा यांनुसार आपल्या सादरीकरणात फेरबदल करून एक-दोन वचने वाचून त्यांवर चर्चा करा.

◼ आवड दाखवल्यास प्रकाशने द्या आणि शक्य असल्यास बायबल अभ्यास कसा केला जातो ते प्रदर्शित करून दाखवा. पुन्हा भेट घेण्याची व्यवस्था करा.