व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे वचन सजीव आहे करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

पौलाला करिंथ येथील मंडळीच्या आध्यात्मिक हिताची खूप काळजी लागली आहे. तेथील बांधवांमध्ये दुमते असल्याचे त्याच्या कानावर आले आहे. अनैतिक कृत्ये खपवून घेतली जात आहेत. शिवाय, काही गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी मंडळीनेही पौलाला लिहिले आहे. म्हणून, सा. यु. ५५ च्या सुमारास, पौल आपल्या तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यावर इफिससमध्ये असताना, करिंथकरांना लिहिलेल्या दोन पत्रांपैकी पहिले पत्र लिहितो.

असे दिसते की पहिले पत्र लिहिल्यावर काही महिन्यांतच पौलाने करिंथकरांना आपले दुसरे पत्र लिहिले. हे दुसरे पत्र त्या पहिल्या पत्राचा उर्वरित भाग आहे. पहिल्या शतकातील करिंथ मंडळीच्या आतील तसेच बाहेरील परिस्थिती अनेक मार्गांनी आपल्या काळातील परिस्थितीसारखीच होती, त्यामुळे पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांतील संदेश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.—इब्री ४:१२.

‘सावध असा, स्थिर राहा, खंबीर व्हा’

(१ करिंथ. १:१-१६:२४)

“तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे,” असा पौल आग्रह करतो. (१ करिंथ. १:१०) ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्वाची इमारत ज्याच्यावर उभारली जाते, असा ‘येशू ख्रिस्तावाचून दुसरा पाया नाही.’ (१ करिंथ. ३:११-१३) मंडळीतील एका जारकर्मी मनुष्याबद्दल पौल म्हणतो, “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” (१ करिंथ. ५:१३) तो असेही म्हणतो, “शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभुसाठी आहे.”—१ करिंथ. ६:१३.

मंडळीने ‘ज्या बाबींविषयी लिहून’ विचारले होते, त्यांच्या उत्तरादाखल पौल विवाहासंबंधी व अविवाहित राहण्यासंबंधी उत्तम व व्यावहारिक सल्ला देतो. (१ करिंथ. ७:१) ख्रिस्ती मस्तकपद, सभा सुव्यवस्थितरित्या चालवणे तसेच पुनरुत्थानाची खात्री यांविषयी सांगितल्यावर, पौल त्यांना आर्जवतो: “सावध असा, विश्‍वासात स्थिर राहा; मर्दासारखे वागा; खंबीर व्हा.”—१ करिंथ. १६:१३.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:२१—यहोवा विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांचे खरोखरच “मूर्खपणाच्या योगे” तारण करतो का? नाही, तो असे करत नाही. पण, ‘जगाला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नसल्यामुळे,’ देव ज्या ज्ञानायोगे लोकांचे तारण करतो ते जगाच्या दृष्टीत मूर्खतेचे आहे.—योहा. १७:२५.

५:५—‘आत्मा तारला जावा अशा हेतूने, त्या [दुष्ट] माणसाला देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करण्याचा’ काय अर्थ आहे? जेव्हा गंभीर पाप करत राहणाऱ्‍या अपश्‍चात्तापी मनुष्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाते तेव्हा तो पुन्हा दियाबलाच्या दुष्ट जगाचा भाग बनतो. (१ योहा. ५:१९) अशा रीतीने, त्याला सैतानाच्या स्वाधीन केले जाते. या पातक्याला बहिष्कृत केल्यामुळे मंडळीतून दुष्ट प्रभाव नाश केला जातो म्हणजेच काढून टाकण्यात येतो व मंडळीतील ‘आत्मा’ अर्थात चांगली मनोवृत्ती टिकून राहते.—२ तीम. ४:२२.

७:३३, ३४—विवाहित पुरुष किंवा स्त्रिया ज्यांविषयी चिंता करतात त्या ‘जगाच्या गोष्टी’ काय आहेत? जीवनातील ज्या सर्वसामान्य गोष्टींविषयी विवाहित ख्रिश्‍चनांना चिंता करावी लागते, त्यांविषयी पौल येथे सांगत आहे. यांमध्ये अन्‍न, वस्त्र आणि निवारा यांचा समावेश आहे. पण, जगातील ज्या वाईट गोष्टींपासून ख्रिश्‍चनांनी दूर राहिले पाहिजे त्यांचा यात समावेश नाही.—१ योहा. २:१५-१७.

११:२६—“जितक्यांदा” तुम्ही येशूच्या मरणाचे स्मरण करता असे म्हणताना पौलाचा काय अर्थ होता आणि ख्रिश्‍चनांनी ‘केव्हापर्यंत’ असे करायचे होते? येशूच्या मृत्यूचे स्मरण वारंवार करावे असे पौल म्हणत नव्हता. “जितक्यांदा” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “जेव्हा कधी” किंवा “त्या प्रत्येक वेळी” असा आहे. त्याअर्थी पौल असे म्हणत होता, की वर्षातून एकदा, निसान १४ या दिवशी अभिषिक्‍त ख्रिस्ती, स्मारकविधीचे बोधचिन्ह असणारी भाकरी खातात व द्राक्षारस पितात त्या प्रत्येक वेळी ते ‘प्रभूच्या मरणाची घोषणा करतात.’ “तो येईपर्यंत,” म्हणजेच पुनरुत्थानाद्वारे त्यांना स्वर्गात घेईपर्यंत ते असे करतात.—१ थेस्सलनी. ४:१४-१७.

१३:१३—विश्‍वास आणि आशा यांपेक्षा प्रीती कशा प्रकारे श्रेष्ठ आहे? ‘आशा धरलेल्या गोष्टी’ खऱ्‍या ठरल्या व बाळगलेल्या ‘भरवशाप्रमाणे’ त्या घडून आल्या, की मग विश्‍वास व आशा संपुष्टात येतात. (इब्री ११:१) पण प्रीती ही विश्‍वास व आशा या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे कारण ती कधीच संपुष्टात येत नाही.

१५:२९—‘मेलेल्यांखातर बाप्तिस्मा’ घेणे म्हणजे काय? बाप्तिस्मा न घेताच मरण पावलेल्या लोकांखातर जिवंत लोकांनी बाप्तिस्मा घ्यावा, असे पौल या वचनात सुचवत नव्हता. पौलाचा असा अर्थ होता, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा बाप्तिस्मा अशा एका जीवनशैलीत होतो ज्यात ते त्यांच्या मृत्यूपर्यंत एकनिष्ठ राहतात आणि नंतर, आत्मिक जीवनासाठी त्यांचे पुनरुत्थान होईल.

आपल्याकरता धडे:

१:२६-३१; ३:३-९; ४:७. स्वतःपेक्षा नम्रपणे यहोवाविषयी अभिमान बाळगल्याने मंडळीतील ऐक्य वाढते.

२:३-५. ग्रीक तत्त्वज्ञान आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या करिंथ येथे प्रचार करताना, ऐकणाऱ्‍यांना आपला संदेश पटवून सांगता येईल का याची पौलाला शंका वाटली असेल. तरीपण, त्याने कोणत्याही दुर्बलतेला किंवा भीतीला देवाने त्याच्यावर सोपवलेल्या सेवाकार्याच्या आड येऊ दिले नाही. आपणही आपल्यापुढे येणाऱ्‍या कठीण परिस्थितींना किंवा आपण याआधी कधीच सामना केला नाही अशा परिस्थितीला घाबरून देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याचे थांबवू नये. पौलाप्रमाणे आपणही पूर्ण भरवशाने मदतीसाठी यहोवाकडे पाहू शकतो.

२:१६. “ख्रिस्ताचे मन” असणे म्हणजे त्याची विचारसरणी ठाऊक असणे, त्याच्याप्रमाणे विचार करणे, त्याचे व्यक्‍तिमत्त्व चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्याच्या आदर्शाचे अनुकरण करणे. (१ पेत्र २:२१; ४:१) म्हणून, आपण येशूच्या जीवनाचा आणि त्याच्या सेवाकार्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणे किती महत्त्वाचे आहे!

३:१०-१५; ४:१७. आपण शिकवण्याच्या आणि शिष्य बनवण्याच्या आपल्या क्षमतेचे परीक्षण करून सुधारणा केली पाहिजे. (मत्त. २८:१९, २०) आपण चांगल्या प्रकारे शिकवत नसू, तर आपल्या विद्यार्थ्याच्या विश्‍वासाची परीक्षा होईल तेव्हा तो विश्‍वासात टिकू शकणार नाही. आणि हा तोटा आपल्यासाठी इतका यातनादायक असेल की जणू काय आपण ‘अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखे’ तारले जाऊ.

६:१८. ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढणे’ म्हणजे फक्‍त पोर्नियात समाविष्ट असणारी कृत्येच टाळणे नव्हे. तर, अश्‍लील साहित्य (पोर्नोग्राफी), अशुद्धपणा, अनैतिक विचार, इष्कबाजी यांसारखी जारकर्माकडे नेणारी कोणतीही गोष्ट आपण टाळली पाहिजे.—मत्त. ५:२८; याको. ३:१७.

७:२९. पतीपत्नीने एकमेकांमध्ये इतके रममाण होऊ नये की राज्याच्या कार्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होईल.

१०:८-११. इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली तेव्हा यहोवा अतिशय क्रोधित झाला. म्हणून, कुरकुर करण्याची प्रवृत्ती टाळण्यातच सुज्ञपणा आहे.

१६:२. जर आपण राज्याच्या कार्यासाठी दान देण्याची आधीपासूनच योजना केली आणि पद्धतशीर रीत्या ते दिले तर आपण खंड न पडता दान देऊ शकू.

“सुधारणूक स्वीकारत राहा”

(२ करिंथ. १:१-१३:१४)

पौल करिंथकरांना सांगतो की ज्या पश्‍चात्तापी पातक्याला ताडन करण्यात आले होते, “त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे.” पौलाच्या पहिल्या पत्रामुळे करिंथकरांना दुःख झाले होते, तरीपण त्यांना “पश्‍चाताप होण्याजोगे दुःख झाले” म्हणून पौल आनंद व्यक्‍त करतो.—२ करिंथ. २:६, ७; ७:८, ९.

‘जसे ते सर्व गोष्टींमध्ये समृद्ध आहेत,’ तसेच त्यांनी ‘कृपेच्या कार्यातही’ म्हणजे दान देण्याविषयीही समृद्ध असावे, असे पौल त्यांना प्रोत्साहन देतो. आपली टीका करणाऱ्‍यांना उत्तर दिल्यानंतर, तो सर्वांना अखेरचा सल्ला देतो: “सुखरूप असा, पूर्ण केलेले व्हा [“सुधारणूक स्वीकारत राहा,” NW], समाधानी असा, एकचित्त असा, शांतीने राहा.”—२ करिंथ. ८:७; १३:११, पं.र.भा.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१५, १६—आपण “संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल” म्हणजेच सुगंध आहोत असे का म्हणण्यात आले आहे? कारण, आपण बायबलशी जडून राहतो आणि त्यातील संदेश पसरवण्यात भाग घेतो. हा “सुगंध” अनीतिमान व्यक्‍तींना दुर्गंध वाटू शकतो, पण यहोवाला आणि प्रामाणिक मनाच्या लोकांना संतोषदायक वाटतो.

५:१६—“आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही” असे अभिषिक्‍त ख्रिस्ती का म्हणू शकतात? कारण, ते लोकांकडे दैहिक दृष्टिकोनातून पाहत नाहीत. म्हणजेच, एखाद्याची आर्थिक स्थिती, जात, वंश किंवा तो कोणत्या देशाचा आहे याला ते महत्त्व देत नाहीत. त्यांना आपल्या बांधवांसोबतचा ख्रिस्ती नातेसंबंध जास्त महत्त्वाचा वाटतो.

११:१, १६; १२:११—करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाचे बोलणे मूढपणाचे किंवा असमंजसपणाचे होते का? नाही. पण, प्रेषित म्हणून आपल्या हक्काच्या बचावात त्याला जे काही म्हणणे भाग पडले त्यावरून काहींना असे वाटले असावे की तो बढाई मारत आहे आणि मूढपणे बोलत आहे.

१२:१-४—कोणाला “सुखलोकात [“नंदनवनात,” NW] उचलून नेण्यात आले” होते? बायबलमध्ये आणखी कोणत्याही व्यक्‍तीला असा अनुभव आल्याचे सांगितलेले नाही. शिवाय, हा अहवाल पौलाने प्रेषित म्हणून आपल्या हक्काचे समर्थन केल्यानंतर लगेच वाचायला मिळतो. यावरून, कदाचित पौल स्वतःच्याच अनुभवाविषयी सांगत असावा. पौलाला दृष्टान्तात दिसलेले नंदनवन, ‘अंतसमयात’ ख्रिस्ती मंडळी अनुभवत असलेले आध्यात्मिक नंदनवन असावे.—दानी. १२:४.

आपल्याकरता धडे:

३:५. हे वचन सांगते की यहोवा बायबलद्वारे, आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आणि पृथ्वीवरील आपल्या संघटनेद्वारे ख्रिश्‍चनांना सेवाकार्यासाठी पात्र ठरवतो. (योहा. १६:७; २ तीम. ३:१६, १७) म्हणूनच, आपण बायबलचा आणि बायबल आधारित प्रकाशनांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला पाहिजे, पवित्र आत्म्यासाठी सातत्याने प्रार्थना केली पाहिजे आणि ख्रिस्ती सभांना नियमितपणे हजर राहून त्यांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.—स्तो. १:१-३; लूक ११:१०-१३; इब्री १०:२४, २५.

४:१६. ‘आपल्या आतील माणसाला [यहोवा] दिवसेंदिवस नवा करतो,’ त्यामुळे यहोवाने केलेल्या तरतुदींचा आपण नियमितपणे फायदा करून घेतला पाहिजे. आध्यात्मिक गोष्टींवर मनन केल्याशिवाय आपला एकही दिवस जाऊ नये.

४:१७, १८. आपल्यावर येणारे ‘संकट तात्कालिक व हलके’ आहे हे आठवणीत ठेवल्याने कठीण परिस्थितीतही यहोवाशी विश्‍वासू राहण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.

५:१-५. स्वर्गीय आशेबद्दल अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असलेल्या भावना पौलाने किती सुरेख शब्दांत व्यक्‍त केल्या!

१०:१३. जास्त गरज असलेल्या ठिकाणी साहाय्य करण्यास जर आपल्याला नेमण्यात आलेले नसेल, तर आपण आपल्या मंडळीला नेमून दिलेल्या क्षेत्राच्या मर्यादेतच सेवाकार्य केले पाहिजे.

१३:५. ‘आपण विश्‍वासात आहो किंवा नाही याविषयी परीक्षा’ करण्यासाठी, बायबलमधून जे शिकतो त्याच्या आधारावर आपण आपले आचरण तपासून पाहिले पाहिजे. तसेच, ‘आपली प्रतीति पाहण्यासाठी,’ देवासोबतचा आपला नातेसंबंध किती घनिष्ठ आहे, आपली ‘ज्ञानेंद्रिये’ किती तीक्ष्ण आहेत आणि आपल्या विश्‍वासाची कार्ये किती व्यापक आहेत हेही आपण पारखून पाहिले पाहिजे. (इब्री ५:१४; याको. १:२२-२५) पौलाने दिलेल्या उत्तम सल्ल्याचे पालन केल्याने आपण सत्याच्या मार्गावर वाटचाल करत राहू शकतो.

[२६, २७ पानांवरील चित्र]

“जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता,” या शब्दांचा काय अर्थ होतो?—१ करिंथ. ११:२६