व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला कशाचीच भीती नव्हती

यहोवा आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला कशाचीच भीती नव्हती

यहोवा आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला कशाचीच भीती नव्हती

एईप्टिया पेट्रीडू यांच्याद्वारे कथित

सन १९७२ मध्ये, संपूर्ण सायप्रसमधील साक्षीदार, बंधू नेथन एच. नॉर यांचे खास जाहीर भाषण ऐकण्याकरता निकोसियात जमले होते. बंधू नॉर, यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यावर अनेक वर्षांपासून देखरेख करीत होते. मला बघताच त्यांनी मला ओळखलं. मला त्यांना माझं नावही सांगावं लागलं नाही. ते मला म्हणाले: “मग, इजिप्तहून काय खबर?” बंधू नॉरना मी २० वर्षांपूर्वी, इजिप्तमध्ये जिथं मी वाढले होते त्या ॲलेक्झांड्रिया शहरात भेटले होते.

जानेवारी २३, १९१४ रोजी ॲलेक्झांड्रियात माझा जन्म झाला होता. एकूण चार मुलांत मी थोरली होते. आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच समुद्र होता. तेव्हाचं ॲलेक्झांड्रिया शहर अतिशय सुंदर होतं. त्या शहराचा इतिहास व तेथील वास्तुकला नावाजलेली होती. तिथं वेगवेगळ्या देशांचे लोक येऊन स्थायिक झाले होते. युरोपिअन लोकांचे अरबी लोकांसोबत उठणेबसणे होते. त्यामुळे ग्रीक या आमच्या मातृभाषेसोबतच आम्ही अरबी, इंग्रजी, फ्रेंच व इटालियन भाषाही बोलायला शिकलो.

शिक्षण संपल्यानंतर मला, एका फ्रेन्च फॅशन डिझायनरकडे नोकरी लागली. श्रीमंत स्त्रियांसाठी भारी कपड्यांची डिझाईन काढून मग ते शिवायला मला खूप आवडायचं. मला धार्मिक विषयांतही गोडी होती आणि बायबल वाचायला खूप आवडायचं. वाचलेलं सर्वच मला कळत नसायचं तरीपण मी वाचत राहायचे.

याच दरम्यान म्हणजे १९३० च्या दशकाच्या मध्यात, माझी ओळख थिओडोटस पेट्रीडीस या तरुणाबरोबर झाली. तो सायप्रसचा राहणारा होता. तसा तो एक पट्टीचा पहिलवान होता पण तो मिठाई बनवायलाही शिकला होता आणि एका लोकप्रिय पेस्ट्रीच्या दुकानात कामाला होता. थिओडोटस माझ्या, एका गर्द तपकिरी केसांच्या व लहान बांध्याच्या मुलीच्या प्रेमात पडला. पुष्कळदा तो, माझ्या खिडकीखाली उभं राहून ग्रीक प्रेमगीतं गायचा. जून ३०, १९४० रोजी आमचं लग्न झालं. आम्ही खूप आनंदी होतो. माझ्या आईच्या घराखालच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. १९४१ साली, आमच्या पहिल्या मुलाचा, जॉनचा जन्म झाला.

बायबलमधील सत्य माहीत होणं

काही काळापासून थिओडोटस आमच्या धर्माविषयी संतुष्ट नव्हता. त्याच्या मनात बायबलविषयी खूप प्रश्‍न होते. माझ्या नकळत त्यानं यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. एकदा, मी बाळाबरोबर घरीच असताना एका स्त्रीनं आमचं दार वाजवलं आणि मला बायबलचा संदेश असलेलं एक कार्ड दिलं. तिला वाईट वाटू नये म्हणून मी ते कार्ड शांतपणे वाचलं. त्यानंतर तिनं मला बायबलविषयी काही प्रकाशनं दिली. थिओडोटस तर हीच प्रकाशनं घरी आणत असे!

“माझ्याकडंही हीच पुस्तकं आहेत. या, आत या,” असं मी तिला म्हणाले. मी लगेचच तिच्यावर म्हणजे, एलीनी निकोलाऊ या साक्षीदार भगिनीवर प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. तिनं मात्र बायबल उघडून माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर अगदी शांतपणे दिलं. मला ते आवडलं. अचानक जणू माझे डोळे उघडले आणि मला बायबलचा संदेश समजू लागला. आम्ही दोघी बोलताना थांबलो तेव्हा एलीनीचं लक्ष माझ्या पतीच्या फोटोकडं गेलं. ती म्हणाली: “मी या गृहस्थांना ओळखते!” आता मला कळलं थिओडोटस काय करत होता. त्याचंच मला आश्‍चर्य वाटलं. थिओ तर एकटाच आणि तेही मला न सांगता ख्रिस्ती सभांना जाऊ लागला होता! तो घरी आल्यावर मी त्याला म्हणाले: “तू मागच्या रविवारी जिथं गेला होतास तिथं या आठवडी मीही तुझ्याबरोबर येणार आहे.”

मी पहिल्यांदा सभेला गेले तेव्हा इनमिन दहा लोक बायबलमधील मीखा नावाच्या पुस्तकावर चर्चा करीत होते. ते ज्या गोष्टींवर बोलत होते त्या गोष्टी मी अगदी आतुरतेने आत्मसात केल्या. तेव्हापासून दर शुक्रवारी संध्याकाळी, जॉर्ज व कटरीनी पेत्राकी आमच्याकडे बायबल अभ्यासासाठी येऊ लागले. आम्ही साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला म्हणून माझ्या बाबांनी व भावंडांनी आमचा विरोध केला. फक्‍त एका बहिणीनं विरोध केला नाही, पण तिनं सत्य स्वीकारलं नाही. आईनं मात्र सत्य स्वीकारलं. सन १९४२ मध्ये, आई, थिओडोटस आणि मी, यहोवाला आम्ही केलेलं समर्पण व्यक्‍त करण्यासाठी ॲलेक्झांड्रियाच्या समुद्रात बाप्तिस्मा घेतला.

आमच्या जीवनाची घडी विस्कटते

सन १९३९ मध्ये दुसऱ्‍या महायुद्धाची सुरुवात झाली आणि पाहता पाहता युद्ध चांगलंच पेटलं. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, जर्मन जनरल अर्विन रोमल आणि त्याचं रणगाड्यांचं सैन्यदल जवळच्या अल अलामेनमध्ये आलं व ॲलेक्झांड्रियात जिकडे पाहू तिकडे ब्रिटिश लष्कर दिसत होते. आम्ही वाळवलेल्या अन्‍नाचा भरपूर साठा जमवून ठेवला. त्याचवेळेस, थिओडोटसला सुएझच्या आखाताजवळ तौफिक बंदरावर असलेल्या त्याच्या मालकाचं मिठाईचं नवीन दुकान सांभाळण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे आम्ही तिकडे राहायला गेलो. ग्रीक बोलणारे दोन साक्षीदार आम्हाला शोधण्यासाठी निघाले. त्यांना आमचा पत्ता ठाऊक नव्हता, तरीपण त्यांनी घरोघरी प्रचार कार्य करून शेवटी आम्हाला शोधून काढलं.

तौफिक बंदरावर असताना आम्ही स्तावरोस व युला किपरेओस आणि त्यांची मुलं, टोटोस व यॉर्यिया यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करू लागलो. या कुटुंबाबरोबर आमचा घरोबा वाढला. स्तावरोसला बायबलचा अभ्यास इतका आवडायचा, की आमची शेवटची ट्रेन चुकावी व आम्हाला तिथंच राहता यावं म्हणून तो मुद्दामहून त्याच्या घरातली सर्व घड्याळे एक तास मागं करायचा. आम्ही रात्री उशिरापर्यंत चर्चा करत बसायचो.

तौफिक बंदरावर आम्ही दीड वर्ष होतो. त्यानंतर आईची तब्येत बिघडल्यामुळे आम्ही पुन्हा ॲलेक्झांड्रियात राहायला आलो. १९४७ मध्ये आई वारली. ती शेवटपर्यंत यहोवाशी विश्‍वासू होती. पुन्हा एकदा आम्ही, प्रौढ ख्रिस्ती मित्रांच्या उभारणीकारक सहवासाद्वारे यहोवानं आम्हाला दिलेलं उत्तेजन अनुभवलं. तसेच विदेशी नेमणूक मिळालेले मिशनरी बंधूभगिनी जहाजानं जाताना, त्यांचं जहाज ॲलेक्झांड्रियात थांबलंच तर आम्ही त्यांना घरी बोलवायचो.

आनंदाचे व दुःखाचे प्रसंग

१९५२ साली, जेम्स या आमच्या दुसऱ्‍या मुलाचा जन्म झाला. आईवडील या नात्यानं, मुलांना आध्यात्मिक वातावरणात वाढवणं किती महत्त्वाचं आहे याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे आम्ही आमचं घर, नियमित सभांसाठी खुलं केलं आणि बहुतेकदा आम्ही पूर्ण वेळेच्या सेवकांना घरी बोलवायचो. अशा प्रकारे आमचा मोठा मुलगा जॉन याच्या मनात बायबल सत्याबद्दल गोडी निर्माण झाली व किशोरवयातच त्यानं पायनियरींग सुरू केली. त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो रात्रशाळेत जायचा.

काही दिवसांतच थिओडोटसला हृदयाचा गंभीर आजार असल्याचं निदान करण्यात आलं व तो करत असलेलं काम त्याला थांबवण्यास सांगण्यात आलं. आमचा मुलगा जेम्स तेव्हा फक्‍त चार वर्षांचा होता. आमचं कसं होणार होतं? “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे,” हे यहोवानं दिलेलं वचन आम्ही विसरायचं नाही म्हणून ठरवलं. (यश. ४१:१०) १९५६ साली आम्हाला सुएझ कालव्या जवळच्या इजमेलिया येथे पायनियर म्हणून सेवा करण्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा आम्हाला किती आनंद झाला व किती आश्‍चर्य वाटलं त्याची तुम्ही कल्पना करू शकता! पुढच्या काही वर्षांत इजिप्तमध्ये बरीच खळबळ माजली. आणि आमच्या ख्रिस्ती बांधवांना सत्यात टिकून राहण्याकरता उत्तेजनाची गरज होती.

सन १९६० मध्ये आम्हाला, प्रत्येकी एक सूटकेस अशा मोजक्याच सामानासह इजिप्त सोडावं लागलं. आम्ही, थिओडोटस जिथं लहानाचा मोठा झाला होता तिथं म्हणजे सायप्रसला राहायला गेलो. इथं येईपर्यंत थिओडोटसची तब्येत आणखीनच खालावली व तो कामही करू शकत नव्हता. पण एका प्रेमळ ख्रिस्ती बंधू व भगिनीनं आम्हाला त्यांचं एक घर राहायला दिलं. दोन वर्षांनी माझा प्रिय थिओ वारला. आता जेम्सची जबाबदारी माझ्या एकटीवर आली होती. जॉनही सायप्रसला आला होता पण आता त्याचं लग्न झालं होतं आणि त्याला त्याचं कुटुंब सांभाळायचं होतं.

कठीण काळांत यहोवानं आम्हाला सांभाळलं

मग, स्तावरोस व डोरा कॉईरीस यांनी आम्हाला त्यांच्या घरात राहायला बोलवलं. पुन्हा एकदा आमच्या गरजांची काळजी घेतल्याबद्दल मी गुडघे टेकून यहोवाचे आभार मानले. (स्तो. १४५:१६) स्तावरोस व डोरानं त्यांचं जुनं घर विकून, तळमजल्यावर राज्य सभागृह असलेलं नवीन घर बांधायचं ठरवलं तेव्हा त्यांनी जेम्स व माझ्यासाठी, या नवीन घराला जोडूनच दोन खोल्या काढल्या. ते खरोखरच प्रेमळ लोक होते.

जेम्सचंही नंतर लग्न झालं व तो आणि त्याची पत्नी, त्यांचं पहिलं मूल होईपर्यंत पायनियरींग करत होते. त्यांना चार मुलं झाली. बंधू नॉर यांच्या त्या अविस्मरणीय भेटीच्या दोन वर्षांनंतर म्हणजे १९७४ सालात सायप्रसमध्ये राजकीय खळबळ माजली. * पुष्कळ लोकांना आणि बऱ्‍याच साक्षीदारांनाही आपली घरंदारं कायमची सोडून दुसरीकडं राहायला जावं लागलं. जॉनलाही आपल्या कुटुंबासोबत पळून जावं लागलं. तो आपली पत्नी आणि तीन मुलांसह कॅनडाला गेला. पुष्कळ लोक सायप्रस सोडून जात होते तरीपण राज्य प्रचारकांत वाढ होत असल्याचं पाहून आम्हाला आनंद वाटत होता.

मला पेन्शन मिळू लागल्यानंतर मी सेवेमध्ये अधिक भाग घेऊ शकले. पण काही वर्षांआधी, मला पक्षाघाताचा सौम्य झटका आल्यामुळे मी जेम्स आणि त्याच्या कुटुंबाबरोबर राहायला गेले. नंतर, माझी तब्येत जास्त बिघडली तेव्हा मला बऱ्‍याच आठवड्यांसाठी इस्पितळात राहावं लागलं आणि त्यानंतर मग मी वृद्धाश्रमात राहायला गेले. माझं अंग सतत दुःखत असतं, तरीपण मी वृद्धाश्रमातील नर्सेसना, पेशंट्‌सना व भेटायला येणाऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगत असते. मी पुष्कळ तास एकांतात अभ्यास करण्यातही घालवते. माझ्या मंडळीतल्या प्रेमळ बंधूभगिनींच्या साहाय्यामुळे मी वृद्धाश्रमापासून जवळच असलेल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासालाही जाऊ शकते.

आयुष्याच्या संधिकालात सांत्वन

आम्हा पतीपत्नीला ज्या लोकांना सत्यात येण्यास मदत करण्याची संधी मिळाली त्या लोकांबद्दल जेव्हा मी ऐकते तेव्हा मला खूप दिलासा मिळतो. त्यांच्यापैकी अनेकांची मुलं, नातवंडं पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत. काही जण, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, ग्रीस, स्वीत्झर्लंड येथे सेवा करत आहेत. माझा मुलगा जॉन व सून त्यांच्या मुलासोबत कॅनडात राहतात. त्यांची थोरली मुलगी आपल्या पतीसह पायनियरींग करते. धाकटी मुलगी लिंडा आणि जावई, जॉशूवा स्नेप यांना गिलियड प्रशालेच्या १२४ व्या वर्गासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

जेम्स आणि त्याची बायको जर्मनीत आहेत. त्यांची दोन मुलं बेथेलमध्ये—एक, ग्रीसच्या अथेन्स बेथेलमध्ये तर दुसरा जर्मनीच्या सेल्टर्स बेथेलमध्ये सेवा करत आहेत. आणि त्यांचा सर्वात धाकटा मुलगा तसेच मुलगी व जावई जर्मनीत पायनियरींग करत आहेत.

आई आणि माझा प्रिय थिओ पुनरुत्थानात पुन्हा आल्यावर आम्हाला त्यांना कितीतरी गोष्टी सांगायच्या आहेत! त्यांनी आपल्या कुटुंबासाठी किती उत्तम वारसा सोडला होता हे पाहून त्यांना किती आनंद होईल. *

[तळटीपा]

^ परि. 21 सावध राहा! (इंग्रजी) ऑक्टोबर २२, १९७४, पृष्ठे १२-१५ पाहा.

^ परि. 26 हा लेख प्रकाशनासाठी तयार करत असताना, भगिनी पेट्रीडू वयाच्या ९३ व्या वर्षी मरण पावल्या.

[२४ पानांवरील संक्षिप्त आशय]

पुन्हा एकदा आम्ही, प्रौढ ख्रिस्ती मित्रांच्या उभारणीकारक सहवासाद्वारे यहोवानं आम्हाला दिलेलं उत्तेजन अनुभवलं

[२३ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सायप्रस

निकोसिया

भूमध्य समुद्र

इजिप्त

कैरो

अल अलामेन

ॲलेक्झांड्रिया

इजमेलिया

सुएझ

तौफिक बंदर

सुएझ कालवा

[चित्राचे श्रेय]

Based on NASA/Visible Earth imagery

[२३ पानांवरील चित्र]

सन १९३८ मध्ये थिओडोटसबरोबर

[२५ पानांवरील चित्र]

जॉन आपल्या पत्नीसोबत

[२५ पानांवरील चित्र]

जेम्स आपल्या पत्नीसोबत