व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘वाढवणारा देवच आहे’!

‘वाढवणारा देवच आहे’!

‘वाढवणारा देवच आहे’!

“लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराहि काही नाही; तर वाढविणारा देव हाच काय तो आहे.”—१ करिंथ. ३:७.

१. आपण कोणत्या अर्थाने “देवाचे सहकारी” आहोत?

“देवाचे सहकारी.” या शब्दांत प्रेषित पौलाने आपल्या सर्वांना मिळालेल्या एका विशेषाधिकाराचे वर्णन केले. (१ करिंथकर ३:५-९ वाचा.) पौल या ठिकाणी शिष्य बनवण्याच्या कार्याविषयी बोलत होता. त्याने या कार्याची तुलना बी पेरण्याशी व त्याला पाणी घालण्याशी केली. या महत्त्वपूर्ण कार्यात यहोवाच्या मदतीशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. कारण ‘वाढविणारा देवच आहे,’ अशी पौलाने आपल्याला आठवण करून दिली.

२. ‘वाढवणारा देवच आहे’ हे सत्य आपल्याला सेवाकार्याकडे योग्य दृष्टिकोनाने पाहण्यास कशा प्रकारे मदत करते?

‘वाढवणारा देवच आहे’ हे सत्य, आपल्याला नम्र मनोवृत्ती राखण्यास व आपल्या सेवाकार्याकडे योग्य दृष्टिकोनाने पाहण्यास मदत करते. प्रचार कार्य करण्यासाठी व बायबल अभ्यास चालवण्यासाठी आपण कदाचित बरीच मेहनत घेत असू. पण यामुळे जे काही चांगले परिणाम घडून येतात त्या सर्वांचे श्रेय शेवटी यहोवालाच जाते. का? कारण, वाढ घडवून आणणे हे आपल्या हातात नाही. किंबहुना, ही वाढ होण्याची प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे घडून येते, हे देखील आपल्यापैकी कोणाला समजू शकत नाही. शलमोन राजाने याचे अगदी अचूक शब्दांत वर्णन केले. त्याने म्हटले: “सर्व काही घडविणाऱ्‍या देवाची कृति तुला कळत नाही.”—उप. ११:५.

३. जमिनीत बी पेरणे आणि शिष्य बनवणे या दोन कार्यांत कोणते साम्य आहे?

वाढ नेमकी कशा प्रकारे घडून येते हे कळत नसल्यामुळे आपले कार्य निराशाजनक ठरते का? नाही. उलट, यामुळे ते आणखीनच रोमांचक व उत्साहवर्धक बनते. शलमोन राजाने म्हटले: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.” (उप. ११:६) हे शब्द अगदी खरे आहेत. कारण जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा रोपे नेमकी कोठे उगवतील किंवा उगवतील की नाही हे देखील आपल्याला माहीत नसते. शिवाय, अशा बऱ्‍याचशा गोष्टी असतात ज्यांवर आपला ताबा नसतो. शिष्य बनवण्याच्या कार्याच्या बाबतीतही काहीसे असेच आहे. येशूने दोन दृष्टान्तांतून या गोष्टीवर भर दिला. हे दोन दृष्टान्त मार्कच्या शुभवर्तमानातील ४ थ्या अध्यायात नमूद आहेत. आपण या दृष्टान्तांतून कोणते धडे घेऊ शकतो हे बघू या.

वेगवेगळ्या प्रकारची जमीन

४, ५. येशूने सांगितलेल्या बी पेरणाऱ्‍याच्या दृष्टान्ताचा सारांश सांगा.

मार्क ४:१-९ यातील अहवालात येशू एका बी पेरणाऱ्‍याविषयी सांगतो. बी पेरत असताना ते निरनिराळ्या ठिकाणी पडते. येशू म्हणतो: “ऐका; पाहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला; आणि तो पेरीत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले; आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटविली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्‍न आले.”

बायबल लिहिण्यात आले त्या काळात, बी पेरणारा सहसा आपल्या कपड्यांच्या घडीत किंवा एखाद्या भांड्यात बी घेऊन ते हाताने फेकत जात असे. तेव्हा, या दृष्टान्तातील बी पेरणारा मुद्दामहून वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींवर बी टाकत नाही. तर त्याने फेकलेले बी निरनिराळ्या ठिकाणी जाऊन पडते.

६. येशूने बी पेरणाऱ्‍याचा दृष्टान्त कशा प्रकारे समजावून सांगितला?

या दृष्टान्ताचा अर्थ येशूने स्वतःच समजावून सांगितला. मार्क ४:१४-२० यात आपण असे वाचतो: “पेरणारा वचन पेरितो. वाटेवर वचन पेरिले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करितात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात; मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”

७. बी व निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी कशास सूचित करतात?

बी पेरणारा निरनिराळ्या प्रकारचे बी पेरतो असे येशूने म्हटले नाही, याकडे लक्ष द्या. बी एकाच प्रकारचे आहे. पण ते वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींवर जाऊन पडते आणि प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारचा परिणाम घडून येतो. पहिल्या प्रकारची जमीन कडक व घट्ट आहे. दुसऱ्‍या प्रकारची जमीन खडकाळ असल्यामुळे तेथे माती कमी आहे. तिसऱ्‍या प्रकारच्या जमिनीत काटेरी झुडपे आहेत तर चौथ्या प्रकारची जमीन ही चांगली म्हणजेच सुपीक जमीन आहे. (लूक ८:८) बी म्हणजे काय? बी म्हणजे देवाच्या वचनात सापडणारा राज्याचा संदेश. (मत्त. १३:१९) निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी कशास सूचित करतात? त्या वेगवेगळ्या मनोवृत्तींच्या लोकांना सूचित करतात.—लूक ८:१२, १५ वाचा.

८. (क) बी पेरणारा कोणाचे प्रतिनिधीत्व करतो? (ख) राज्य प्रचाराच्या कार्याप्रती लोकांची प्रतिक्रिया वेगवेगळी का असते?

बी पेरणारा कोणाचे प्रतिनिधीत्व करतो? तो राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणाऱ्‍या देवाच्या सहकाऱ्‍यांचे प्रतिनिधीत्व करतो. पौल व अपोल्लो यांच्याप्रमाणे देवाचे सहकारी पेरणी करतात व पाणी घालतात. पण त्यांनी कठीण परिश्रम केले तरीही परिणाम वेगवेगळे असू शकतात. का? कारण संदेश ऐकणाऱ्‍या लोकांची मनोवृत्ती वेगवेगळी असते. येशूने दिलेल्या दृष्टान्तातील बी पेरणारा, पेरणी तर करतो पण कशा प्रकारचे फळ मिळेल हे त्याच्या हातात नसते. आपले अनेक विश्‍वासू बंधू-भगिनी कित्येक वर्षांपासून, काही ठिकाणी तर कित्येक दशकांपासून मेहनतीने प्रचाराचे कार्य करत असूनही त्यांना फारसे चांगले परिणाम दिसून आलेले नाहीत. त्यांच्याकरता हा दृष्टान्त खरोखर सांत्वनदायक आहे. * असे का म्हणता येईल?

९. प्रेषित पौल व येशू या दोघांनीही कोणत्या सांत्वनदायक गोष्टीवर भर दिला?

बी पेरणाऱ्‍याचा विश्‍वासूपणा त्याच्या कार्यातून मिळणाऱ्‍या परिणामांवरून ठरवता येत नाही. “प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजुरी मिळेल,” असे म्हणताना पौलाने हेच सुचवले होते. (१ करिंथ. ३:८) त्याअर्थी, ज्याच्या त्याच्या श्रमाच्या हिशोबाने त्याला मजूरी किंवा प्रतिफळ मिळते, त्या श्रमातून निष्पन्‍न होणाऱ्‍या परिणामांच्या हिशोबाने नव्हे. येशूचे शिष्य एकदा प्रचाराच्या दौऱ्‍यावरून परत आले तेव्हा त्यानेही याच मुद्द्‌यावर भर दिला होता. शिष्य अतिशय आनंदात होते कारण येशूच्या नावाने दुरात्मेही त्यांना वश झाले होते. अर्थात ही आनंदी होण्याजोगीच गोष्ट होती, पण येशूने त्यांना म्हटले: “भुते तुम्हाला वश होतात ह्‍याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्‍याचा आनंद माना.” (लूक १०:१७-२०) बी पेरणाऱ्‍याला त्याच्या कार्याच्या परिणामस्वरूप भरपूर वाढ झालेली दिसून आली नाही, तरीसुद्धा त्याने पुरेसे परिश्रम केले नाहीत किंवा इतरांच्या तुलनेत तो कमी विश्‍वासू आहे असे म्हणता येणार नाही. कारण, कशा प्रकारचे परिणाम मिळतील हे बऱ्‍याच प्रमाणात संदेश ऐकणाऱ्‍याच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. आणि शेवटी काही झाले तरी, वाढ करणारा हा देवच आहे!

वचन ऐकणाऱ्‍यांवर येणारी जबाबदारी

१०. वचन ऐकणारा चांगल्या जमिनीसारखा असेल किंवा नसेल हे कशावर अवलंबून आहे?

१० वचन ऐकणाऱ्‍यांविषयी काय म्हणता येईल? ते कसा प्रतिसाद देतील हे देवाने आधीच ठरवले आहे का? नाही. ते चांगल्या जमिनीसारखे असतील किंवा नसतील हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. किंबहुना, एखाद्या व्यक्‍तीची मनोवृत्ती बदलूही शकते. (रोम. ६:१७) दृष्टान्तात येशू म्हणतो की काहींनी वचन “ऐकल्याबरोबर” सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. पण हे टाळले जाऊ शकते. याकोब ४:७ यात ख्रिश्‍चनांना असे प्रोत्साहन दिले आहे की “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” येशू दुसऱ्‍याही प्रकारच्या व्यक्‍तींचे वर्णन करतो. हे लोक सुरुवातीला मोठ्या आनंदाने वचन स्वीकारतात पण “त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने” ते टिकाव धरत नाहीत. देवाच्या सेवकांना मात्र असा सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी “मुळावलेले व पाया घातलेले असे” असले पाहिजे, जेणेकरून त्यांना देवाच्या वचनाची “रुंदी, लांबी, उंची व खोली” समजून घेता येईल व “बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीति ओळखून” घेता येईल.—इफिस. ३:१७-१९; कलस्सै. २:६, ७.

११. चिंता व धनसंपत्तीच्या लोभामुळे वचनाची वाढ खुंटू नये म्हणून काय केले पाहिजे?

११ इतर जणांविषयी येशूने म्हटले की ते वचन ऐकून घेतात व नंतर “प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ” यांसारख्या गोष्टी त्यांच्या जीवनात शिरून वचनाची वाढ खुंटवितात. (१ तीम. ६:९, १०) हे टाळण्यासाठी ते काय करू शकतात? प्रेषित पौल याचे उत्तर देतो: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’”—इब्री १३:५.

१२. चांगल्या जमिनीसारखे असणारे लोक वेगवेगळ्या प्रमाणात पीक देतात असे का?

१२ शेवटी, येशू असे म्हणतो की जे चांगल्या जमिनीत पेरलेले आहेत त्यांच्यापैकी “कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.” वचन स्वीकारणाऱ्‍यांपैकी काहींची चांगली मनोवृत्ती असली व ते पीकही देत असले, तरीसुद्धा सुवार्तेच्या प्रचार कार्यात प्रत्येकजण जे साध्य करतो, ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार वेगवेगळे असू शकते. उदाहरणार्थ, म्हातारपणामुळे किंवा गंभीर आजारामुळे काही जण प्रचार कार्यात कदाचित जास्त सहभाग घेऊ शकणार नाहीत. (मार्क १२:४३, ४४ पडताळून पाहा.) साहजिकच बी पेरणाऱ्‍याला या गोष्टींवर ताबा नसतो, पण तरीसुद्धा यहोवाने केलेली वाढ पाहून त्याला निश्‍चितच आनंद होतो.—स्तोत्र १२६:५, ६ वाचा.

बी पेरून झोपी जाणारा

१३, १४. (क) येशूने बी पेरणाऱ्‍याविषयी दिलेल्या दृष्टान्ताचा सारांश सांगा. (ख) या दृष्टान्तातील बी पेरणारा कोण आहे व बी कशास सूचित करते?

१३ मार्क ४:२६-२९ यात बी पेरणाऱ्‍याचा आणखी एक दृष्टान्त आपल्याला वाचायला मिळतो: “परमेश्‍वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.”

१४ हा बी पेरणारा कोण आहे? ख्रिस्ती धर्मजगतातील काही जणांच्या मते तो येशू ख्रिस्त आहे. पण येशू झोपी जातो आणि पीक कशा प्रकारे वाढते हे त्याला माहीत नाही हे कसे काय म्हणता येईल? येशूला तर वाढीविषयी निश्‍चितच माहीत आहे! त्याअर्थी, हा बी पेरणारा येशू नसून आधीच्या दृष्टान्ताप्रमाणेच तो अशा लोकांना सूचित करतो, जे प्रचार कार्यात आवेशाने सहभाग घेण्याद्वारे राज्याचे बी पेरतात. जमिनीत पडणारे बी म्हणजे ते घोषित करत असलेला संदेश आहे. *

१५, १६. येशूला बी पेरणाऱ्‍याच्या दृष्टान्तातून शेतातील पिकाच्या वाढीसंबंधी व आध्यात्मिक वाढीसंबंधी काय सांगायचे होते?

१५ येशू म्हणतो की बी पेरणारा “रात्री झोपी जातो, दिवसा उठतो.” बी पेरणाऱ्‍याची आपल्या कार्याप्रती हलगर्जी वृत्ती होती असे येथे सुचवलेले नाही. कारण रात्री झोपणे व सकाळी उठणे हा तर जीवनातील सर्वसामान्य नित्यक्रम आहे. या वचनात, दिवसा काम करून रात्री झोपण्याचा हा नित्यक्रम काही काळापर्यंत चालला असे सांगायचे आहे. या काळादरम्यान काय घडले याकडे येशू लक्ष वेधतो. तो म्हणतो, “बी रुजते व वाढते.” मग तो पुढे म्हणतो: “पण हे कसे होते हे त्याला कळत नाही.” वाढ “आपोआप” * होते या गोष्टीवर येथे जोर देण्यात आला आहे.

१६ येशू या ठिकाणी काय सांगू इच्छित होता? तो येथे वाढ होण्यावर आणि ती कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने होते या गोष्टीवर जोर देत होता. “जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.” (मार्क ४:२८) ही वाढ हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने होते. शिवाय ती जबरदस्तीने किंवा लवकर घडवून आणता येत नाही. आध्यात्मिक वाढीबद्दलही हेच म्हणता येते. योग्य मनोवृत्ती असलेल्या व्यक्‍तीच्या हृदयात यहोवा जसजसे सत्य रुजू देतो तसतशी ही वाढही टप्प्याटप्प्याने होत जाते.—प्रे. कृत्ये १३:४८; इब्री ६:१.

१७. सत्याचे बी फलदायी ठरते तेव्हा कोणकोण आनंद करतात?

१७ बी पेरणारा ‘पीक तयार झाल्यावर लागलाच’ कापणीच्या कामात कशा प्रकारे सहभाग घेतो? यहोवा नव्या शिष्यांच्या हृदयात राज्याचे सत्य वाढू देतो, तेव्हा काही काळाने अशी वेळ येते, जेव्हा हे नवे शिष्य देवाबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमाने प्रवृत्त होऊन आपले जीवन त्याला समर्पित करतात. हे समर्पण जाहीर करण्याकरता ते पाण्यात बाप्तिस्मा घेतात. जे बंधू पुढेही प्रगती करत राहतात त्यांच्यावर हळूहळू मंडळीत अधिक जबाबदाऱ्‍या सोपवल्या जातात. ज्याने सर्वप्रथम बी पेरले होते तो तर राज्याच्या फळाची कापणी करतोच, पण एखाद्या विशिष्ट व्यक्‍तीला शिष्य बनवण्याकरता ज्यांनी बी पेरण्यात व्यक्‍तिशः सहभाग घेतला नव्हता, त्यांना देखील फळ मिळते. (योहान ४:३६-३८ वाचा.) अशा रीतीने, ‘पेरणारा व कापणाराही एकत्र आनंद’ करतात.

आपल्या काळाकरता धडे

१८, १९. (क) येशूने दिलेल्या दृष्टान्तांच्या या चर्चेतून तुम्हाला व्यक्‍तिशः कोणते प्रोत्साहन मिळाले आहे? (ख) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

१८ मार्कच्या ४ थ्या अध्यायातील या दोन दृष्टान्तांची चर्चा केल्यानंतर आपल्याला काय शिकायला मिळाले आहे? आपल्यालाही पेरणीचे काम करायचे आहे हे स्पष्ट झाले आहे. आपण कोणतीही निमित्ते सांगून किंवा समस्यांच्या, अडथळ्यांच्या भीतीने हे कार्य करण्याचे थांबवू नये. (उप. ११:४) पण त्याच वेळी, आपल्याला देवाचे सहकारी म्हणून कार्य करण्याचा बहुमान मिळाला आहे हेही आपण कधी विसरू नये. आध्यात्मिक वाढ यहोवाच घडवून आणतो. आपल्या प्रयत्नांवर व जे संदेश स्वीकारतात त्यांच्या प्रयत्नांवर यहोवाने आशीर्वाद दिल्यामुळेच ही वाढ घडून येते. आपण जबरदस्तीने ही आध्यात्मिक वाढ घडवून आणू शकत नाही हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. तसेच, वाढ मंद गतीने होत असल्यास किंवा वाढ होत नसल्यास, आपण निराश होण्याचे कारण नाही. आपले यश हे आपल्याला मिळणाऱ्‍या परिणामांवरून ठरत नाही, तर यहोवाप्रती आणि त्याने आपल्यावर ‘सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची सुवार्ता’ घोषित करण्याची जी विशेष जबाबदारी सोपवली आहे, तिच्याप्रती आपण किती विश्‍वासू आहोत यावरून ठरते. हे खरोखरच सांत्वनदायक नाही का?—मत्त. २४:१४.

१९ नवे शिष्य व राज्याचे कार्य यात होणाऱ्‍या वाढीसंबंधी येशूने आणखी काय शिकवले? शुभवर्तमानातील अहवालांत नमूद असणाऱ्‍या इतर काही दृष्टान्तांतून आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळते. या दृष्टान्तांपैकी काहींची आपण पुढच्या लेखात चर्चा करणार आहोत.

[तळटीपा]

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक २००५ (इंग्रजी) पृष्ठे २१०-२११ वर दिलेले, बंधू जेऑर्ज फियॉल्नीर लिंडाल यांचे आइसलँडमधील सेवाकार्याचे उदाहरण पाहा. तसेच, बरीच वर्षे कोणतेही चांगले परिणाम दिसून आले नाहीत, तरीसुद्धा आयर्लंडमध्ये विश्‍वासूपणे कार्य केलेल्या इतर सेवकांचे अनुभव यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक १९८८ (इंग्रजी) पृष्ठे ८२-९९ वर पाहा.

^ परि. 14 या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण करताना पूर्वी असे सांगण्यात आले होते की बी हे आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील गुणांना सूचित करते व या गुणांचा विकास होत असताना त्यांवर वातावरणातील निरनिराळ्या गोष्टींचा चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. पण, येशूच्या दृष्टान्तातील बी बदलून त्याचे वाईट बी किंवा नासके फळ बनत नाही, तर पीक तयार होईपर्यंत त्याची केवळ वाढ होत जाते, हे लक्ष देण्याजोगे आहे.—तुझे राज्य येवो पृष्ठ ९६, परि. ६ पाहावा.

^ परि. 15 या संज्ञेचा या वचनाव्यतिरिक्‍त केवळ एका ठिकाणी, म्हणजे प्रेषितांची कृत्ये १२:१० येथे उपयोग करण्यात आला आहे. त्या वचनात, लोखंडी दरवाजा “आपोआप” उघडला गेला असे सांगितले आहे.

तुम्हाला आठवते का?

• शेतात बी पेरणे व राज्याच्या संदेशाची घोषणा करणे यात कोणते साम्य आहे?

• यहोवा राज्याचा प्रचार करणाऱ्‍याचे यश कशावरून ठरवतो?

• शेतातील पिकाच्या वाढीत व आध्यात्मिक वाढीत कोणते साम्य असल्याचे येशूने स्पष्टपणे सांगितले?

• ‘पेरणारा व कापणाराही एकत्र आनंद’ करतात ते कोणत्या अर्थाने?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्रे]

येशूने देवाच्या राज्याची घोषणा करणाऱ्‍याची तुलना बी पेरणाऱ्‍याशी का केली?

[१५ पानांवरील चित्रे]

चांगल्या जमिनीसारखे असणारे, राज्य प्रचाराच्या कार्यात आपापल्या परिस्थितीनुसार मनःपूर्वक सहभाग घेतात

[१६ पानांवरील चित्रे]

वाढवणारा देवच आहे