व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवा व आनंदी राहा

स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवा व आनंदी राहा

स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवा व आनंदी राहा

“आपण पुन्हा अपयशी ठरलो!” हाती घेतलेले एखादे काम पूर्ण करता न आल्यामुळे तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का? एखाद्या तरुण ख्रिस्ती मातेच्या मनात असा विचार येऊ शकतो. बाळाकडे सतत लक्ष द्यावे लागत असल्यामुळे कदाचित ती दमून जात असेल, आणि आध्यात्मिक कार्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे निराश होत असेल. किंवा, एखाद्या ख्रिस्ती बांधवाला लहानपणी ज्या प्रकारे त्याचे संगोपन झाले त्यामुळे असे वाटू शकते की मंडळीत त्याने कितीही काम केले तरी ते अपुरेच आहे. तसेच, एखादी वयस्क भगिनी, पूर्वीसारखी शक्‍ती न राहिल्यामुळे व जास्त हालचाल करता येत नसल्यामुळे मंडळीच्या कार्यांत आधीसारखा उत्साहाने भाग घेता येत नाही या विचाराने खिन्‍न होत असेल. क्रिस्ट्यान नावाच्या एका भगिनीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे तिला यहोवाच्या सेवेत इच्छा असूनही जास्त सहभाग घेता येत नाही. ती म्हणते, “जेव्हा जेव्हा मी पायनियर सेवेकरता प्रोत्साहन देणारं एखादं भाषण ऐकते, तेव्हा तेव्हा मला दाटून येतं.”

अशा प्रकारच्या भावना आपल्या मनात आल्यास आपण काय करावे? काही ख्रिश्‍चनांना भावनांच्या आहारी न जाता, आपल्या परिस्थितीकडे वास्तववादी दृष्टिकोनाने पाहण्यास कशामुळे मदत मिळाली आहे? वाजवी अपेक्षा बाळगण्याचे कोणते फायदे आहेत?

समजूतदार असा

प्रेषित पौल आपल्याला आनंदी राहण्याचे रहस्य सांगतो. तो म्हणतो: “नेहमी प्रभूमधील आनंदाने भरलेले असा. मी पुन्हा सांगतो, आनंद करा. तुम्ही . . . समजूतदार आहात हे प्रत्येकाला दिसू द्या.” (फिलिप्पै. ४:४, ५, सुबोध भाषांतर) देवाची सेवा आनंदाने करण्याकरता व त्यातून समाधान मिळवण्याकरता आपण समजूतदार असले पाहिजे, म्हणजेच आपली परिस्थिती व क्षमता लक्षात घेऊन आपण वाजवी अपेक्षा ठेवायला शिकले पाहिजे. जर आपण परिणामांचा विचार न करता अवाजवी ध्येये ठेवली व आकाशपाताळ एक करून ती साध्य करण्याचा प्रयत्न केला, तर आपण अनावश्‍यक तणाव ओढवून घेऊ. पण त्याच वेळी, आणखी एका गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे, स्वतःच्या बाबतीत आपण अतिमवाळही असू नये. म्हणजेच, साध्या साध्या समस्यांचा बाऊ करून आपण ख्रिस्ती सेवाकार्यापासून अनावश्‍यकपणे अंग चोरू नये.

आपल्या सर्वांची परिस्थिती वेगवेगळी असू शकते. पण यहोवा आपल्या प्रत्येकाकडून अशी अपेक्षा करतो की आपण त्याला जे सर्वात उत्तम ते द्यावे, म्हणजेच आपण त्याची पूर्ण मनाने, जिवेभावे सेवा करावी. (कलस्सै. ३:२३, २४) यहोवाला सर्वात उत्तम ते देण्याबाबत जर का आपण तडजोड केली, तर समर्पणाच्या वेळी त्याला दिलेले वचन आपण पाळत नाही असा त्याचा अर्थ होईल. (रोम. १२:१) शिवाय, यहोवाची जिवेभावे सेवा केल्यामुळे मिळणारे समाधान, निर्भेळ आनंद व इतर अनेक आशीर्वाद यांपासून आपण स्वतःला वंचित करू.—नीति. १०:२२.

बायबलमध्ये “समजूतदार” असे भाषांतर केलेल्या शब्दाचा अर्थ विचारशील असणे असाही होतो. या शब्दाचा मूळ अर्थ “सौम्य” असणे म्हणजेच लवचीक असणे, अडून न राहणे असा आहे. (याको. ३:१७) तसेच, अतिकडक नसणे याही अर्थाची छटा या शब्दात आहे. त्यामुळे, जर आपण समजूतदार असू तर आपल्याला दोन्ही टोकांना न जाता, आपल्या परिस्थितीकडे वाजवी दृष्टिकोनाने पाहणे शक्य होईल. हे कठीण आहे का? हो, काही जणांना हे कठीण वाटते. इतरांशी ते विचारशीलपणे वागत असले तरी, स्वतःच्या बाबतीत मात्र वाजवी दृष्टिकोन बाळगणे त्यांना जमत नाही. उदाहरणार्थ, आपला एखादा मित्र पुरेशी विश्रांती न घेता खूप जास्त काम करत असेल आणि हळूहळू त्याच्या तब्येतीवर याचा दुष्परिणाम होऊ लागला असेल, तर साहजिकच आपण त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू, किंवा त्याला याविषयी सतर्क करू, नाही का? त्याच प्रकारे, आपणही आपल्या शक्‍तीच्या पलीकडे झटत आहोत याची चिन्हे दिसताच आपण सावध झाले पाहिजे.—नीति. ११:१७.

जर लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून अवाजवी अपेक्षा केल्या असतील तर आपल्या क्षमतांविषयी माफक दृष्टिकोन बाळगणे आपल्याला जास्त कठीण वाटू शकते. काहींना लहानपणी सतत असे वाटायचे की आईवडिलांचे प्रेम मिळवण्याकरता आपण आणखी काम केले पाहिजे, आणखी चांगले वागले पाहिजे, किंवा अव्वल दर्जाचे असले पाहिजे. जर आपल्या बाबतीत असे घडले असेल, तर यहोवा देवही आपल्याकडून अवाजवी अपेक्षा बाळगतो असा चुकीचा दृष्टिकोन आपल्या मनात असण्याची शक्यता आहे. पण, यहोवा आपण मनःपूर्वक केलेल्या सेवेची कदर करतो. “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो,” असे त्याचे वचन आपल्याला आश्‍वासन देते. (स्तो. १०३:१४) त्याला आपल्या कमतरतांची, अडचणींची जाणीव आहे, आणि या अडचणी असूनही जेव्हा आपण त्याची आवेशाने सेवा करतो तेव्हा तो आपल्यावर प्रेम करतो. आपला देव कठोर मुकादमासारखा नाही हे आठवणीत ठेवल्यास, आपल्याला आपल्या मर्यादा लक्षात ठेवून स्वतःकडून वाजवी अपेक्षा बाळगण्यास मदत होईल.—मीखा ६:८.

तरीसुद्धा, काहींना अशा प्रकारचा वाजवी दृष्टिकोन बाळगणे जड जाते. जर तुम्हालाही असे वाटत असेल, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्‍या एखाद्या अनुभवी ख्रिस्ती बंधू किंवा भगिनीची तुम्ही मदत घेऊ शकता. (नीति. २७:९) उदाहरणार्थ, कदाचित तुम्हाला सामान्य पायनियर म्हणून सेवा करण्याची इच्छा असेल. हे जरी अतिशय कौतुकास्पद ध्येय असले, तरी ते साध्य करणे तुम्हाला कदाचित कठीण जात असेल. असे असल्यास, ते बंधू किंवा भगिनी तुम्हाला तुमच्या जीवनात काही फेरबदल करण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात आणून देतील. किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमुळे या घडीला सामान्य पायनियर सेवेचे ध्येय ठेवणे योग्य राहील का, याविषयी ते तुमच्यासोबत चर्चा करतील. तुम्हाला ज्या अतिरिक्‍त कार्यांत सहभाग घ्यावासा वाटतो ती कार्ये तुमच्या आवाक्यात आहेत का? किंवा जास्त कार्य करता यावे म्हणून तुम्ही कोणते फेरबदल केले पाहिजेत? याची ते तुम्हाला जाणीव करून देतील. पतीसुद्धा आपल्या पत्नीला तिच्या क्षमतेनुसार ध्येये गाठण्यास मदत करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या महिन्यात जास्तीचे कार्य हाती घेण्याअगोदर काही दिवस विश्रांती घेण्याचे तो तिला सुचवू शकतो. यामुळे तिचा उत्साह आणखी वाढेल आणि तिला आनंदाने सेवा करत राहण्यास साहाय्य मिळेल.

तुम्ही जे करू शकता त्याकडे लक्ष द्या

वयोमानामुळे किंवा प्रकृती खालावल्यामुळे कधीकधी आपल्याला यहोवाच्या सेवेत हवा तितका सहभाग घेता येत नाही. किंवा, तुम्हाला लहान मुले असल्यास, त्यांची काळजी घेण्यातच बहुतेक वेळ व शक्‍ती खर्च होत असल्यामुळे वैयक्‍तिक अभ्यास चांगल्या प्रकारे करता येत नाही किंवा ख्रिस्ती सभांमध्ये नीट लक्ष देता येत नाही याचे कदाचित तुम्हाला वाईट वाटत असेल. पण तुम्ही जे करू शकत नाही त्याकडेच खूप लक्ष दिल्यामुळे, तुम्ही जे करू शकता त्याकडे तर तुमचे दुर्लक्ष होत नसावे?

प्राचीन काळात, लेव्यांना वर्षातून दोन आठवडे मंदिरात सेवा करण्याचा विशेषाधिकार मिळत असे. हजारो वर्षांपूर्वी, एका लेव्याने मात्र कायम देवाच्या वेदीजवळ राहण्याची इच्छा व्यक्‍त केली. ही इच्छा प्रशंसनीय असली तरी त्याच्याकरता ती पूर्ण करणे अशक्य होते. मग, आहे त्या परिस्थितीत संतुष्ट राहण्यास या लेव्याला कशामुळे मदत मिळाली? (स्तो. ८४:१-३) मंदिराच्या अंगणात एक दिवसही घालवायला मिळणे हा एक बहुमान आहे हे त्याने ओळखले. (स्तो. ८४:४, ५, १०) त्याच प्रकारे, आपण जे करण्यास असमर्थ आहोत त्याचाच विचार करत बसण्याऐवजी जे काही आपल्याला शक्य आहे ते ओळखून आपण त्याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे.

कॅनडात राहणाऱ्‍या नेरलाँड या भगिनीचे उदाहरण घ्या. सतत व्हीलचेअरवर बसून राहावे लागत असल्यामुळे, आपल्याला सेवाकार्यात जास्त सहभाग घेता येत नाही याची तिला खंत वाटत असे. पण तिने आपला दृष्टिकोन बदलला. तिच्या घरापासून जवळच असलेल्या एका शॉपिंग मॉलला तिने आपले खास प्रचाराचे क्षेत्र मानले. ती सांगते: “मॉलमध्ये असलेल्या एका बेंचजवळ मी आपल्या व्हीलचेअरवर बसून राहते. क्षणभर विश्रांती घ्यायला म्हणून बेंचवर येऊन बसणाऱ्‍यांना सुवार्ता सांगायला मला आनंद वाटतो.” या महत्त्वाच्या मार्गाने सेवाकार्यात सहभाग घेतल्यामुळे नेरलाँडला खूप समाधान मिळते.

फेरबदल करण्यास तयार असा

शिडांचे जहाज समुद्रातून वेगाने जात आहे अशी कल्पना करा. मध्येच जर जोराचे वादळ आले, तर जहाजाच्या चालकाला शिडांची दिशा बदलण्याशिवाय व ती वरखाली करण्याशिवाय पर्याय नसतो. वादळावर तर त्याला नियंत्रण नसते, पण शिडे वरखाली केल्यामुळे व त्यांची दिशा बदलल्यामुळे तो आपल्या जहाजावर नियंत्रण ठेवू शकतो. त्याच प्रकारे, जीवनात वादळांचे रूप घेऊन येणाऱ्‍या कठीण प्रसंगांवर सहसा आपले नियंत्रण नसते. पण अशा कठीण प्रसंगांना तोंड देताना आपल्याजवळ असलेल्या शारीरिक, मानसिक व भावनिक क्षमतांचा आपण ज्या प्रकारे उपयोग करतो, त्यात आवश्‍यक फेरबदल केल्यास कठीण परिस्थितीतही आपण बऱ्‍याच प्रमाणात आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि आपल्या बदललेल्या परिस्थितीचे भान ठेवून प्रत्येक पाऊल उचलल्यास आपल्याला पुढेही आनंदाने, समाधानाने देवाची सेवा करता येईल.—नीति. ११:२.

काही उदाहरणांकडे लक्ष द्या. जर आपण अशक्‍त असू, तर ज्या दिवशी संध्याकाळी ख्रिस्ती सभा असते त्या दिवशी आपण थकवणारी कामे आवर्जून टाळली पाहिजेत. असे केल्यास, आपल्याला सभेला हजर राहता येईल व आपल्या बांधवांच्या सहवासाचा पुरेपूर लाभ घेता येईल. किंवा, जर एखाद्या भगिनीला, मूल आजारी असल्यामुळे घरोघरच्या सेवाकार्याला जाणे शक्य नसेल, तर ती एखाद्या ख्रिस्ती भगिनीला आपल्या घरी बोलावून, मूल झोपलेले असताना तिच्यासोबत टेलिफोनद्वारे साक्षकार्य करू शकते.

कदाचित तुमच्या परिस्थितीमुळे, मंडळीच्या सभांमध्ये चर्चा केल्या जाणार असलेल्या प्रत्येक भागाचा आधीपासून अभ्यास करणे तुम्हाला शक्य नसेल. असे असल्यास, तुम्हाला किती भागांची तयारी करणे शक्य आहे हे ठरवून, निदान त्या भागांची चांगल्या प्रकारे तयारी करा. अशा रीतीने, आपल्या सध्याच्या परिस्थितीनुसार ध्येयांत फेरबदल केल्यास आपण उत्साही व आनंदी राहू शकतो.

ध्येयांमध्ये फेरबदल करण्याकरता दृढनिश्‍चयी व परिश्रमी वृत्तीची गरज आहे. सेर्झ व आन्येस या फ्रांसमध्ये राहणाऱ्‍या जोडप्याला आपल्या योजनांमध्ये बराच मोठा बदल करावा लागला. सेर्झ सांगतो, “आन्येसला दिवस गेल्याचं आमच्या लक्षात आलं, तेव्हा मिशनरी होण्याचं आपलं स्वप्न आता अधुरं राहणार याची आम्हाला जाणीव झाली.” पण, या जोडप्याने एक नवीन ध्येय ठेवले. त्याविषयी सेर्झ सांगतो, “परदेशी जाऊन सेवा करता येणार नसल्यामुळे आम्ही आपल्याच देशात ‘मिशनरी’ व्हायचं ठरवलं. आम्ही एका परदेशी भाषेच्या गटात सामील झालो.” हे नवे ध्येय ठेवल्यामुळे त्यांना फायदा झाला का? आज दोन चुणचुणीत मुलींचा पिता असणारा सेर्झ म्हणतो, “मंडळीला आमची मदत होतेय याचं आम्हाला खूप समाधान वाटतं.”

फ्रांसमध्ये राहणाऱ्‍या ऑडील नावाच्या भगिनी सत्तरीत असून त्यांना गुडघ्यांचा ऑस्टियोआर्थरायटिस आहे. त्यामुळे, त्यांना फार वेळ उभे राहता येत नाही. या दुखण्यामुळे घरोघरच्या सेवाकार्यात सहभाग घेता येत नाही म्हणून त्या खूप निराश झाल्या होत्या. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी टेलिफोनद्वारे साक्षकार्य करायला सुरुवात केली. त्या म्हणतात: “हे इतकं सोपं व आनंददायक असेल असा मी विचारही केला नव्हता!” या पद्धतीने प्रचार कार्य केल्यामुळे साक्षकार्यासाठी असलेला त्यांचा उत्साह कायम राहिला.

वाजवी अपेक्षा बाळगल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

आपण काय करू शकतो व काय करू शकत नाही, याविषयी वाजवी दृष्टिकोन बाळगल्यामुळे आपण स्वतःला बऱ्‍याच निराशांपासून वाचवतो. आपल्याला हवे तेवढे करता येत नसले, तरीसुद्धा माफक ध्येये ठेवल्यास आपल्याला समाधान अनुभवता येईल. आपण साध्य केलेल्या गोष्टी फार मोठ्या नसल्या, तरीसुद्धा आपल्याला त्या साध्य केल्याचा आनंद वाटेल.—गलती. ६:४.

जसजसे आपण स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवायला शिकू, तसतसे आपण इतर ख्रिस्ती बंधूभगिनींप्रतीही जास्त विचारशील बनू. त्यांच्या दुर्बलतांची व अडचणींची जाणीव असल्यामुळे, ते आपल्याकरता जे काही करतात त्याबद्दल आपण कृतज्ञ असू. त्यांच्याकडून मिळणाऱ्‍या मदतीची कदर केल्यामुळे मंडळीत सहकार्याची, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती निर्माण होईल. (१ पेत्र ३:८) आपला प्रेमळ पिता यहोवा कधीही आपल्याकडून अवास्तव अपेक्षा करत नाही हे नेहमी आठवणीत असू द्या. जर आपणही स्वतःकडून माफक, वाजवी अपेक्षा ठेवल्या व आपल्या परिस्थितीनुसार साध्य करण्याजोगी ध्येये ठेवलीत तर आपल्या आध्यात्मिक कार्यांतून आपल्याला जास्त समाधान व आनंद मिळू शकेल!

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाची सेवा आनंदाने व समाधानाने करत राहण्याकरता आपण आपल्या क्षमता व परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःकडून वाजवी अपेक्षा करायला शिकले पाहिजे

[३० पानांवरील चित्र]

नेरलाँड आपल्या परिस्थितीनुसार सेवाकार्यात जमेल तितका सहभाग घेते व यातून तिला खूप आनंद मिळतो

[३१ पानांवरील चित्र]

“जहाजावर” नियंत्रण ठेवण्याकरता आवश्‍यक फेरबदल करायला शिका

[चित्राचे श्रेय]

© Wave Royalty Free/age fotostock

[३२ पानांवरील चित्र]

सेर्झ व आन्येस यांनी नवीन ध्येये ठेवल्यामुळे त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले