व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“उत्सुकतेने” यथार्थ ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करा

“उत्सुकतेने” यथार्थ ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करा

“उत्सुकतेने” यथार्थ ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करा

यहोवाने आपल्या उपासनेचा स्वीकार करावा असे त्याच्या सगळ्याच सेवकांना वाटत असते. आणि त्यामुळेच आपला विश्‍वास आणखी बळकट करण्यास व देवाची पवित्र सेवा आणखी आवेशाने करण्यास आपण उत्सुक असतो. पण, प्रेषित पौल एका संभाव्य धोक्याकडे आपले लक्ष वेधतो. त्याच्या काळात काही यहुदी लोक या धोक्याला बळी पडले होते. त्यांच्याविषयी पौलाने असे म्हटले: “त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.” (रोम. १०:२) यावरून हेच दिसून येते, की आपला विश्‍वास व आपली उपासना ही फक्‍त भावनांवर आधारित असू नये. तर आपल्या निर्माणकर्त्याबद्दल व त्याच्या इच्छेबद्दल आपण यथार्थ ज्ञानही घेतले पाहिजे.

पौलाने त्याच्या इतर पत्रांत असे लिहिले, की देवाने आपल्या उपासनेचा स्वीकार करावा म्हणून उत्सुक मनोवृत्तीने ज्ञान संपादन करणे आवश्‍यक आहे. त्याने ख्रिस्ताच्या अनुयायांसाठी अशी प्रार्थना केली, की त्यांनी देवाच्या इच्छेसंबंधीच्या “पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, [त्यांनी] सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने [त्यांची] वृद्धि व्हावी.” (कलस्सै. १:९, १०) पण, देवाबद्दल यथार्थ किंवा ‘पूर्ण ज्ञान’ घेणे इतके महत्त्वाचे का आहे? आणि हे ज्ञान अधिकाधिक संपादन करण्याचा आपण का प्रयत्न करावा?

आपल्या विश्‍वासाचा आधार

देवाबद्दल व त्याच्या इच्छेबद्दल बायबलमध्ये प्रकट करण्यात आलेले यथार्थ ज्ञान हाच मुळात आपल्या विश्‍वासाचा आधार आहे. हे विश्‍वासार्ह ज्ञान आपल्याजवळ नसल्यास, यहोवावरील आपला विश्‍वास पत्त्यांच्या घरासारखा ठरेल, जे वाऱ्‍याची झुळूक येताच कोसळते. म्हणूनच, पौल आपल्याला असे प्रोत्साहन देतो की आपण देवाची इच्छा काय आहे हे ‘समजून घेऊन’ व आपल्या ‘मनाचे नवीकरण’ करून त्याची पवित्र सेवा करावी. (रोम. १२:१, २) यासाठी, बायबलचा नियमित स्वरूपाने अभ्यास करणे साहाय्यक ठरू शकेल.

पोलंड येथे राहणारी ईवा नावाची एक सामान्य पायनियर आपले प्रामाणिक मत व्यक्‍त करते: “देवाच्या वचनाचा जर मी नियमितपणे अभ्यास केला नाही, तर यहोवाविषयीच्या यथार्थ ज्ञानात मला प्रगती करता येणार नाही. माझी ख्रिस्ती ओळख मिटून जाईल. देवावरचा माझा विश्‍वास कमजोर होत जाईल आणि आध्यात्मिक अर्थाने माझी दुर्दशा होईल.” आपल्याबाबतीत हे कधीही न घडो! आता आपण एका अशा मनुष्याचे उदाहरण पाहू या, ज्याने यहोवाबद्दल अधिकाधिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करून त्याचे मन आनंदित केले.

“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!”

आपल्या बायबलमध्ये स्तोत्र ११९ म्हणून दिलेले गीत, यहोवाचे नियम, निर्बंध, आदेश, आज्ञा व निर्णय यांबद्दल स्तोत्रकर्त्याच्या भावना व्यक्‍त करते. स्तोत्रकर्त्याने असे लिहिले: “मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन . . . तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत.” त्याने असेही लिहिले: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.”—स्तो. ११९:१६, २४, ४७, ४८, ७७, ९७.

स्तोत्रकर्त्याच्या वरील शब्दांवरून असे दिसून येते, की त्याला देवाच्या वचनावर “मनन” करण्यास ‘आनंद’ वाटे. देवाच्या नियमशास्त्राचा अभ्यास करणे त्याला प्रिय होते यावर हे शब्द भर देतात. हे प्रेम किंवा ही आवड केवळ स्तोत्रकर्त्याच्या मनात उचंबळून आलेल्या भावनांतूनच उत्पन्‍न झालेली नव्हती. तर, त्याला देवाच्या नियमशास्त्रावर ‘मनन’ करण्याची आणि त्याद्वारे यहोवाच्या शब्दांचा सखोल व अचूक अर्थ समजून घेण्याची उत्कंठा होती. देवाबद्दल व त्याच्या इच्छेबद्दल होता होईल तितके यथार्थ ज्ञान घेण्यास तो उत्सुक होता, हे त्याच्या मनोवृत्तीवरून स्पष्टपणे दिसून येते.

देवाच्या वचनावर स्तोत्रकर्त्याला गहिरे प्रेम होते. आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो: ‘माझ्याबद्दलही असे म्हणता येईल का? दररोज बायबलचा काही भाग वाचून त्याचे परीक्षण करणे मला आवडते का? देवाच्या वचनाचे वाचन करण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो का व ते करण्याआधी देवाला प्रार्थना करतो का?’ या प्रश्‍नांना जर आपले होकारार्थी उत्तर असेल, तर ‘देवाच्या पूर्ण ज्ञानाने आपली वृद्धि होत आहे’ असे म्हणता येईल.

ईवा म्हणते: “वैयक्‍तिक अभ्यास आणखी चांगल्या प्रकारे कसा करता येईल या दिशेने मी सतत प्रयत्न करत असते. ‘उत्तम देश पाहा’ (इंग्रजी) हे माहितीपत्रक मिळाल्यापासून मी अभ्यास करताना जवळजवळ प्रत्येक वेळी त्याचा उपयोग केला आहे. इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स आणि आवश्‍यकता पडेल त्यानुसार इतर पुस्तकांतूनही जास्तीत जास्त गोष्टींविषयी माहिती शोधण्याचा मी प्रयत्न करते.”

व्हॉइचेक व मावगोझाता या जोडप्याचे उदाहरण पाहू या. त्यांच्यावर कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्‍या आहेत. मग ते वैयक्‍तिक बायबल अभ्यासासाठी वेळ कसा काढतात? “आम्ही दोघंही जमेल तसा देवाच्या वचनाचा वैयक्‍तिक रीत्या अभ्यास करतो. मग, जे मुद्दे खास आवडले किंवा प्रोत्साहनदायक वाटले ते कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी आम्ही एकमेकांना सांगतो.” अशा रीतीने, सखोल वैयक्‍तिक अभ्यास केल्यामुळे त्यांना आनंद तर मिळतोच, आणि ‘पूर्ण ज्ञानाने वृद्धि करण्यासही’ मदत मिळते.

ग्रहणशील मनोवृत्तीने अभ्यास करा

ख्रिस्ती या नात्याने आपल्याला माहीत आहे, की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीम. २:३, ४) त्यामुळे, बायबलचे वाचन करून त्याचा अर्थ ‘समजून घेण्याचा’ प्रयत्न करणे अधिकच महत्त्वाचे बनते. (मत्त. १५:१०) आणि याकरता, ग्रहणशील मनोवृत्तीने अभ्यास करणे साहाय्यक ठरू शकते. पौलाने बिरुया येथील ख्रिश्‍चनांना सुवार्ता सांगितली तेव्हा त्यांनी अशीच मनोवृत्ती दाखवली होती: “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.”—प्रे. कृत्ये १७:११.

बायबलचा अभ्यास करत असताना, तुम्ही बिरुयातील ख्रिश्‍चनांप्रमाणे उत्सुक मनोवृत्ती बाळगण्याचा व लक्ष विचलित करणाऱ्‍या अनावश्‍यक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करता का? आपल्याला जरी अभ्यास करणे पूर्वी कंटाळवाणे वाटत असले, तरीसुद्धा आपण बिरुयातील बांधवांचे अनुकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो. काही जणांचे वय जसजसे वाढते तसतसे ते वाचन व अभ्यास करण्याचे टाळू लागतात. पण यहोवाच्या उपासकांच्या बाबतीत असे घडण्याचे कारण नाही. आपण तरुण असो वा वृद्ध, लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी टाळण्याच्या दिशेने आपण निश्‍चितच प्रयत्न करू शकतो. वाचन करत असताना, तुम्ही दुसऱ्‍यांनाही फायदेकारक ठरू शकेल असा एखादा मुद्दा शोधण्याचा प्रयत्न करू शकता. उदाहरणार्थ, अभ्यासादरम्यान वाचण्यात आलेल्या किंवा शिकायला मिळालेल्या गोष्टी आपल्या विवाह जोडीदाराला किंवा एखाद्या ख्रिस्ती मित्राला सांगण्याचा तुम्ही आवर्जून प्रयत्न करता का? असे केल्यामुळे त्या गोष्टी तुमच्या मनात तर कायमच्या कोरल्या जातीलच पण इतरांनाही त्यांचा फायदा होऊ शकेल.

अभ्यास करण्याच्या बाबतीत, एज्राचे अनुकरण करा. एज्रा हा देवाचा प्राचीन काळातील एक सेवक होता. त्याने ‘परमेश्‍वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करण्याचा निश्‍चयच केला होता’ किंवा, असे करण्यासाठी त्याने आपले मन तयार केले होते. (एज्रा ७:१०) तुम्ही एज्राचे अनुकरण कसे करू शकता? अभ्यासाकरता योग्य वातावरण निर्माण करा. मग, अभ्यासाला सुरुवात करण्याअगोदर यहोवाला प्रार्थना करा आणि मार्गदर्शन व बुद्धी देण्याची त्याला विनंती करा. (याको. १:५) स्वतःला हा प्रश्‍न विचारा, ‘या अभ्यासादरम्यान मला कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत?’ वाचन करताना मुख्य मुद्द्‌यांकडे लक्ष द्या. या मुद्द्‌यांची तुम्ही नोंदही करून ठेवू शकता किंवा विशेष आठवणीत ठेवण्याजोगे मुद्दे अधोरेखित करू शकता. या माहितीचा प्रचार कार्यात, निर्णय घेताना किंवा एखाद्या बांधवाला प्रोत्साहन देताना कसा उपयोग करता येईल याचा विचार करा. अभ्यासाच्या शेवटी, त्या माहितीची उजळणी करा. असे केल्यामुळे, शिकलेली माहिती आठवणीत ठेवणे तुम्हाला सोपे जाईल.

ईवा अभ्यास करण्याची आपली पद्धत सांगते: “बायबल वाचताना, मी संदर्भवचने पडताळून पाहते. तसेच, वॉचटावर प्रकाशनांची संदर्भसूची आणि सीडी-रोमवर वॉचटावर लायब्ररीचाही मी वापर करते. सेवाकार्यात वापरता येतील अशा मुद्द्‌यांची मी नोंद करून ठेवते.”

अनेकांनी आध्यात्मिक विषयांत तल्लीन होऊन सखोल अभ्यास करण्याचा आनंद बऱ्‍याच वर्षांपासून घेतला आहे. (नीति. २:१-५) पण आता मात्र अनेक जबाबदाऱ्‍यांमुळे त्यांना वैयक्‍तिक अभ्यासाकरता वेळ काढणे कठीण वाटू लागले आहे. जर तुमच्याबाबतीतही असेच असेल, तर तुम्ही आपल्या वेळापत्रकात कोणते फेरफार करू शकता?

मला वेळ कसा काढता येईल?

सहसा, आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांच्याकरता वेळ काढणे आपल्याला सोपे जाते हे तुम्हीही मान्य कराल. बऱ्‍याच जणांना असे आढळले आहे की एखादे साध्य करता येण्याजोगे ध्येय डोळ्यांपुढे ठेवल्यास, वैयक्‍तिक अभ्यासात रमणे त्यांना सोपे जाते. उदाहरणार्थ, तुम्ही संपूर्ण बायबल वाचण्याचे ध्येय ठेवू शकता. अर्थात, लांबलचक वंशावळ्या, प्राचीन मंदिराचे सविस्तर वर्णन किंवा गुंतागुंतीच्या भविष्यवाण्या यांसारखे विषय वाचताना, या सर्वाचा आपल्या जीवनाशी काय संबंध असे तुम्हाला वाटू शकते आणि त्यामुळे हे भाग वाचताना लक्ष एकाग्र करणे तुम्हाला कठीण वाटू शकते. पण, तुमचे ध्येय गाठण्याकरता तुम्ही काही व्यावहारिक पावले उचलू शकता. उदाहरणार्थ, कठीण वाटणाऱ्‍या एखाद्या भागाचे परीक्षण करण्याअगोदर, तुम्ही त्याच्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीबद्दल किंवा ती माहिती आपल्याकरता कशा प्रकारे उपयोगी आहे याबद्दल वाचन करू शकता. अशा प्रकारची माहिती “ऑल स्क्रिप्चर इज इंस्पायर्ड ऑफ गॉड ॲन्ड बेनेफिशियल” या जवळजवळ ५० भाषांतून उपलब्ध असलेल्या पुस्तकात तुम्हाला सापडेल.

बायबलचे वाचन करताना कल्पनाशक्‍तीचा उपयोग केल्यास तुमचे वाचन अधिकच उत्साहवर्धक बनेल. यामुळे, तुम्हाला त्या अहवालातील व्यक्‍तींचे व घटनांचे चित्र डोळ्यांपुढे उभे करता येईल. या काही सल्ल्यांचे तुम्ही पालन केल्यास तुमचा अभ्यास नक्कीच अधिक आनंददायक व माहितीपूर्ण ठरेल. आणि मग आपोआपच त्याकरता वेळ काढण्यास तुम्ही जास्त उत्सुक असाल. तसेच, दररोज न चुकता बायबलचे वाचन करणेही तुम्हाला सोपे जाईल.

वरील सल्ले वैयक्‍तिक अभ्यासाच्या बाबतीत साहाय्यक ठरू शकतील. पण, ज्यांना कौटुंबिक अभ्यासासाठी वेळ काढणे कठीण वाटते अशी कुटुंबे काय करू शकतात? नियमित कौटुंबिक अभ्यास केल्यास आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतील याविषयी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन मनमोकळी चर्चा का करू नये? या चर्चेतूनच अनेक उपयुक्‍त सूचना पुढे येऊ शकतील. उदाहरणार्थ, बायबलच्या काही भागाचे परीक्षण करण्याकरता दररोज किंवा आठवड्यातील विशिष्ट दिवस सर्व जण सकाळी लवकर उठू शकतात, असे कोणीतरी सुचवेल. किंवा कुटुंबाच्या नित्यक्रमात कदाचित थोडा बदल करण्याची गरज असल्याचे तुमच्या या चर्चेतून दिसून येईल. उदाहरणार्थ, काही कुटुंबांना जेवणानंतरची वेळ अभ्यासासाठी सोयीची वाटते. जेवणानंतर आवराआवर करण्यास सुरुवात करण्याआधी किंवा दुसऱ्‍या कोणत्या कामाला लागण्याआधी ते १०-१५ मिनिटे दैनंदिन शास्त्रवचन किंवा साप्ताहिक बायबल वाचनातील काही भाग वाचतात. सुरुवातीला, कदाचित थोडे कठीण वाटेल पण काही काळातच कुटुंबातील सर्वांना याची सवय होईल आणि सर्व जण आनंदाने या व्यवस्थेला सहकार्य देतील.

वॉइचेक व मावगोझाता यांनी आपल्या कुटुंबात कोणता फेरबदल केला याविषयी ते सांगतात: “पूर्वी बऱ्‍याच अनावश्‍यक व बिनमहत्त्वाच्या गोष्टींत आमचा खूप वेळ वाया जायचा. म्हणूनच, आम्ही ई-मेल्स पाठवण्यात जास्त वेळ घालवायचा नाही असे ठरवले. तसेच करमणुकीत जो वेळ आम्ही खर्च करायचो, तोही कमी केला आणि बायबलचा अभ्यास करण्याकरता एक विशिष्ट दिवस व वेळ ठरवून घेतली.” हे फेरबदल केल्याबद्दल या कुटुंबाला कसलीही खंत नाही. तुम्हालाही या कुटुंबाचे अनुकरण करता येईल.

यथार्थ ज्ञानात भर घातल्याने मिळणारे आशीर्वाद

देवाच्या वचनाच्या सखोल अभ्यासामुळे “प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ” उत्पन्‍न होते. (कलस्सै. १:१०) तुमच्या जीवनात जेव्हा हे घडून येईल, तेव्हा तुमची प्रगती नक्कीच सर्वांना दिसून येईल. तुम्हाला एक आध्यात्मिक प्रवृत्तीची व्यक्‍ती म्हणून ओळखले जाईल आणि बायबलमधील सत्याचे निरनिराळे पैलू तुम्हाला स्पष्ट होतील. यामुळे, बायबलच्या तत्त्वांचे ज्ञान नसलेल्या व्यक्‍तींप्रमाणे टोकाला न जाता तुम्ही समंजसपणे निर्णय घेऊ शकाल आणि इतरांनाही बायबलमधून सल्ला देणे तुम्हाला सोपे जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही यहोवाच्या जवळ याल, त्याचे गुण तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील आणि पर्यायाने तुम्ही इतरांना या गुणांबद्दल जास्त प्रभावीपणे सांगू शकाल.—१ तीम. ४:१५; याको. ४:८.

तेव्हा, तुमचे वय काहीही असो आणि तुम्ही सत्यात कितीही वर्षांपासून असा, देवाच्या वचनाचे उत्सुकतेने वाचन करण्याचा व ग्रहणशील मनोवृत्तीने त्याचा सखोल अभ्यास करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. याकरता तुम्ही जे काही परिश्रम कराल ते यहोवा कधीही विसरणार नाही याची तुम्ही खात्री बाळगू शकता. (इब्री ६:१०) तो नक्कीच तुमच्यावर अनेक आशीर्वादांचा वर्षाव करेल!

[१३ पानांवरील चौकट]

‘देवाच्या पूर्ण ज्ञानाने आपली वृद्धि होते’ तेव्हा . . .

देवावरचा आपला विश्‍वास दृढ होतो आणि आपण यहोवाला शोभेल असे वागतो.कलस्सै. १:९, १०

आपल्याला देवाच्या तत्त्वांचा सखोल व अचूक अर्थ समजून घेता येतो, योग्य व अयोग्य यांत फरक करता येतो आणि त्यामुळे आपण समंजसपणे निर्णय घेतो.स्तो. ११९:९९

इतरांना यहोवाच्या जवळ येण्यास साहाय्य करणे आपल्याला अतिशय आनंददायक वाटू लागतेमत्त. २८:१९, २०

[१४ पानांवरील चित्रे]

अभ्यासाकरता योग्य ठिकाण शोधणे सोपे नाही, पण असे करणे फायद्याचे आहे

[१५ पानांवरील चित्र]

काही कुटुंबे जेवणानंतर बायबलचा काही भाग वाचतात