थेस्सलनीकाकरांस व तीमथ्यास लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे
यहोवाचे वचन सजीव आहे
थेस्सलनीकाकरांस व तीमथ्यास लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे
प्रेषित पौलाने थेस्सलनीका शहराला भेट देऊन तेथे एक मंडळी स्थापन केली तेव्हापासूनच या नवीन मंडळीस विरोधाला तोंड द्यावे लागले होते. म्हणून, कदाचित विशीत असलेल्या तीमथ्याने जेव्हा थेस्सलनीकाहून तेथील मंडळीबद्दल चांगली बातमी आणली, तेव्हा शाबासकी व प्रोत्साहन देण्याकरता पौलाने थेस्सलनीकाकरांना एक पत्र लिहिले. देवाच्या प्रेरणेने पौलाने लिहिलेल्या पत्रांपैकी हे पहिले पत्र, त्याने कदाचित सा.यु. ५० च्या उत्तरार्धात लिहिले असावे. त्यानंतर, लवकरच त्याने थेस्सलनीकाकरांना आपले दुसरे पत्र लिहिले. या पत्रात त्याने त्या मंडळीत असलेल्या काही जणांचा चुकीचा दृष्टिकोन सुधारला आणि बांधवांना विश्वासात स्थिर राहण्याचे प्रोत्साहन दिले.
यानंतर सुमारे दहा वर्षांनी, पौल मासेदोनियामध्ये होता आणि तीमथ्य इफिसस येथे होता. पौलाने तीमथ्याला पत्र लिहून त्याला इफिससमध्येच थांबण्याचे व तेथील बांधवांना मंडळीतील खोट्या शिक्षकांच्या प्रभावाला बळी न पडता यहोवा देवासोबत आपला चांगला नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करण्याचे प्रोत्साहन दिले. सा.यु. ६४ साली आगीमुळे रोम शहराचे बरेच नुकसान झाल्यावर ख्रिश्चनांविरुद्ध छळाची लाट उसळली तेव्हा पौलाने तीमथ्याला आपले दुसरे पत्र लिहिले. हे पत्र पौलाच्या प्रेरित लेखनांपैकी शेवटचे होते. या चार पत्रांत पौलाने दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन आज आपल्याकरताही फायदेकारक ठरू शकते.—इब्री ४:१२.
‘जागे राहावे’
थेस्सलनीकाकरांनी “विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व . . . धरलेला धीर” याबद्दल पौलाने त्यांची प्रशंसा केली. तुम्ही ‘आमची आशा, आमचा आनंद व आमच्या अभिमानाचा मुगूट’ आहात असे त्याने त्यांना सांगितले.—१ थेस्सलनी. १:३; २:१९.
पुनरुत्थानाच्या आशेने एकमेकांचे सांत्वन करण्याचे प्रोत्साहन थेस्सलनीकाकरांना दिल्यानंतर पौलाने म्हटले: “जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.” म्हणूनच, त्याने त्यांना “जागे व सावध राहावे” असा सल्ला दिला.—१ थेस्सलनी. ४:१६-१८; ५:२, ६.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
४:१५-१७—ज्यांना “प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अतंराळात” घेतले जाते ते कोण आहेत, आणि हे कसे घडते? ते ख्रिस्ताला राज्य सामर्थ्य मिळाल्यानंतर त्याच्या उपस्थितीदरम्यान जगणारे अभिषिक्त ख्रिस्ती आहेत. ते अदृश्य स्वर्गात ‘प्रभूला सामोरे होतात.’ असे घडण्यासाठी, प्रथम त्यांचा मृत्यू होणे व आत्मिक प्राणी या नात्याने त्यांचे पुनरुत्थान होणे आवश्यक आहे. (रोम. ६:३-५; १ करिंथ. १५:३५, ४४) ख्रिस्ताच्या उपस्थितीची सुरुवात झालेली असल्यामुळे आज ज्या अभिषिक्त ख्रिश्नांचा मृत्यू होतो ते मृतावस्थेत राहत नाहीत. ते लगेच स्वर्गात ‘घेतले जातात’ म्हणजेच त्यांचे लगेच पुनरुत्थान केले जाते.—१ करिंथ. १५:५१, ५२.
५:२३—‘तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे राखली जावोत,’ असे जेव्हा पौलाने म्हटले, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? पौल या ठिकाणी कोणत्याही एका विशिष्ट मंडळीविषयी बोलत नसून संपूर्ण ख्रिस्ती मंडळीचा आत्मा, जीव व शरीर यांविषयी बोलत होता. यात थेस्सलनीका येथील अभिषिक्त ख्रिश्चनांचाही समावेश होता. मंडळी राखली जावी इतकेच म्हणण्याऐवजी त्याने मंडळीचा “आत्मा” म्हणजेच मंडळीची एकंदरीत मनोवृत्ती राखली जावी अशी प्रार्थना केली. तसेच त्याने मंडळीचा “जीव” अर्थात तिचे अस्तित्व आणि तिचे “शरीर” म्हणजेच अभिषिक्त ख्रिश्चनांचा सबंध वर्ग यांसाठीही प्रार्थना केली. (१ करिंथ. १२:१२, १३) पौलाच्या या प्रार्थनेतून मंडळीबद्दल त्याला किती कळकळ होती हे स्पष्ट होते.
आपल्याकरता धडे:
१:३, ७; २:१३; ४:१-१२; ५:१५. सल्ला देण्याचा एक प्रभावकारी मार्ग म्हणजे, रास्त कारणांबद्दल शाबासकी देणे आणि आणखी सुधारणा करण्याचे प्रोत्साहन देणे.
४:१, ९, १०. यहोवाच्या उपासकांनी त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध दृढ करत राहिले पाहिजे.
५:१-३, ८, २०, २१. यहोवाचा दिवस जवळ येत असल्यामुळे, “आपण सावध असावे, विश्वास व प्रीति हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.” शिवाय, देवाचे वचन बायबल यामध्ये असलेल्या भविष्यवाण्यांकडे गंभीरतेने लक्ष द्यावे.
“स्थिर राहा”
पौलाने आपल्या पहिल्या पत्रात म्हटलेल्या गोष्टींचा विपर्यास करून, मंडळीतील काही जणांनी दावा केला होता की “प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन [“उपस्थिती,” NW]” जवळ येऊन ठेपले आहे. हा चुकीचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी, पौलाने “अगोदर” काय होईल हे सांगितले.—२ थेस्सलनी. २:१-३.
“स्थिर राहा, आणि . . . जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा,” असे म्हणून पौलाने त्यांना प्रोत्साहन दिले. आणि “अव्यवस्थितपणे वागणाऱ्या . . . प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे,” अशी आज्ञा दिली.—२ थेस्सलनी. २:१५; ३:६.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
२:३, ८—“अनीतिमान पुरुष” कोण आहे, आणि त्याला कोणत्या अर्थाने मारून टाकले जाईल? हा “पुरुष” कोणा एका व्यक्तीस नव्हे तर ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्गास सूचित करतो. “शब्द” म्हणजेच देवाचा प्रमुख प्रवक्ता असलेल्या येशू ख्रिस्ताला दुष्ट लोकांविरुद्ध देवाचा न्यायदंड घोषित करण्याचा आणि त्यांचा नाश करण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे. (योहा. १:१) त्याअर्थी, येशूच “आपल्या मुखातील श्वासाने [सामर्थ्याने]” अनीतिमान पुरुषाचा नाश करेल असे म्हणता येते.
२:१३, १४—देवाने अभिषिक्त ख्रिश्चनांना कशा प्रकारे “तारणासाठी निवडिले आहे”? स्त्रीची संतती सैतानाचे डोके फोडील असा यहोवाने संकल्प केला तेव्हाच एक वर्ग या नात्याने अभिषिक्त जणांना पूर्वनिश्चित केले होते. (उत्प. ३:१५) त्यांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, ते कोणते कार्य करतील आणि त्यांना कशा प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागेल हे देखील यहोवाने प्रकट केले होते.
आपल्याकरता धडे:
१:६-९. देव दुष्टांना न्यायदंड देतो, पण त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांचे तो संरक्षण करतो.
३:८-१२. यहोवाचा दिवस जवळ असल्याची सबब देऊन आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करण्याचे थांबवू नये. रिकामटेकडेपणामुळे आपण आळशी बनू शकतो आणि यामुळे “दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ” करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये उत्पन्न होऊ शकते.—१ पेत्र ४:१५.
“तुझ्या स्वाधीन केलेली ठेव संभाळ”
पौलाने तीमथ्याला “सुयुद्ध कर; विश्वास व चांगला विवेक भाव धर” असे सांगितले. मंडळीत जबाबदारीच्या पदावर नियुक्त केल्या जाणाऱ्या पुरुषांकरता कोणत्या आवश्यक पात्रता आहेत हे त्याने सांगितले. तसेच, त्याने तीमथ्याला ‘अनीतिच्या कहाण्यांपासून दूर’ राहण्याची सूचना दिली.—१ तीम. १:१८, १९; ३:१-१०, १२, १३; ४:७.
पौलाने लिहिले: “वडील माणसाला टाकून बोलू नको.” त्याने तीमथ्याला असेही आर्जवले: “तुझ्या स्वाधीन केलेली ठेव संभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा.”—१ तीम. ५:१; ६:२०.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१:१८; ४:१४—तीमथ्याविषयी ‘पूर्वीच झालेले संदेश’ काय होते? पौल त्याच्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्याच्या वेळी लुस्त्र शहरास भेट देतो तेव्हा, तीमथ्य भविष्यात ख्रिस्ती मंडळीत कोणती भूमिका निभावेल यासंबंधी देवाच्या प्रेरणेने काही संदेश देण्यात आले असण्याची शक्यता आहे. (प्रे. कृत्ये १६:१, २) या ‘पूर्वी झालेल्या संदेशांच्या’ आधारावर मंडळीतील वडिलांनी तरुण तीमथ्यावर ‘हात ठेवून’ त्याला खास कामगिरीकरता नेमले.
२:१५—‘बालकाला जन्म देण्याच्या योगे स्त्रियांचे तारण’ कशा प्रकारे होईल? मुलांना जन्म देणे, त्यांची काळजी घेणे, आणि घरदार सांभाळणे अशा कार्यांमुळे स्त्रिया आळशी बनत १ तीम. ५:११-१५.
नाहीत. त्यामुळे “वटवट्या व लुडबुड्या” होण्यापासून त्यांचे संरक्षण होऊ शकते.—३:१६—सुभक्तीचे रहस्य काय आहे? यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला पूर्णपणे आज्ञाधारक राहणे मानवांना शक्य आहे किंवा नाही हे कितीतरी काळापासून रहस्य होते. येशूने आपल्या मृत्यूपर्यंत देवाप्रती पूर्ण सचोटी राखून दाखवून दिले की हे शक्य आहे.
६:१५, १६—या वचनांतील शब्द यहोवा देवाला लागू होतात की येशू ख्रिस्ताला? या वचनांत येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याविषयी सांगितले असल्यामुळे हे शब्द त्यालाच लागू होतात. (१ तीम. ६:१४) राजे व प्रभू या नात्याने शासन करणाऱ्या मानवांच्या तुलनेत तो “एकच अधिपति” आहे व केवळ त्यालाच अमरत्व आहे. (दानी. ७:१४; रोम. ६:९) तो अदृश्य स्वर्गात गेला तेव्हापासून त्याला पृथ्वीवरील कोणीही मनुष्य आपल्या डोळ्यांनी “पाहू शकत” नाही.
आपल्याकरता धडे:
४:१५. आपण खूप वर्षांपूर्वी सत्य स्वीकारलेले असो किंवा अलीकडेच, यहोवासोबत आपला नातेसंबंध दृढ करण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे.
६:२. जर आपण एखाद्या सहविश्वासू बांधवाकडे नोकरीला असू, तर आपण कोणत्याही प्रकारे याचा गैरफायदा घेऊ नये. उलट, मंडळीबाहेरच्या एखाद्या व्यक्तीसाठी आपण जितक्या मेहनतीने काम करू त्यापेक्षा जास्त मेहनत आपल्या बांधवाकरता आपण घेतली पाहिजे.
“वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा”
पुढे येणाऱ्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याकरता तीमथ्याला तयार करण्यासाठी पौलाने असे लिहिले: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.” त्याने तीमथ्याला हा सल्ला दिला: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण” असावे.—२ तीम. १:७; २:२४.
“तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा,” असे म्हणून तीमथ्याला पौलाने प्रोत्साहन दिले. धर्मत्यागी शिकवणींना ऊत आला असल्यामुळे प्रेषिताने या तरुण पर्यवेक्षकाला असा सल्ला दिला: “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, . . . शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.”—२ तीम. ३:१४; ४:२.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१:१३—“सुवचनांचा नमुना” काय आहे? ही ‘सुवचने’ म्हणजे “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची” वचने—खऱ्या ख्रिस्ती शिकवणी. (१ तीम. ६:३) येशूने जे काही शिकवले व केले ते देवाच्या वचनाशी सुसंगत असल्यामुळे ‘सुवचने’ हा शब्द पर्यायाने बायबलच्या सर्व शिकवणींना लागू होतो. या शिकवणींतून आपल्याला समजते की यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो. बायबलमधून आपण जे काही शिकलो त्याप्रमाणे वागण्याद्वारे आपण या नमुन्याचे पालन करतो.
४:१३—“चर्मपत्रे” काय होती? पौल रोममध्ये तुरुंगात असताना अभ्यासाकरता इब्री शास्त्रवचनांच्या काही गुंडाळ्या मागवल्या असाव्यात. यातील काही गुंडाळ्या पपायरसच्या तर इतर चामड्याच्या असू शकतात.
आपल्याकरता धडे:
१:५; ३:१५. तीमथ्याला येशू ख्रिस्तावर असलेल्या विश्वासाचा प्रभाव त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर पडला. तीमथ्याला अशा प्रकारचा विश्वास असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला बालपणापासूनच घरात मिळालेले पवित्र शास्त्राचे शिक्षण. देवाप्रती आणि आपल्या मुलांप्रती असलेली आपली जबाबदारी पूर्ण करण्याच्या बाबतीत आपण काय करत आहोत यावर कुटुंबातील सदस्यांनी गंभीरपणे विचार करणे किती महत्त्वाचे आहे!
१:१६-१८. आपले बांधव परीक्षांना किंवा छळाला तोंड देत असतात, किंवा तुरुंगात असतात अशा वेळी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे व आपल्याकडून होईल तितकी मदत त्यांना केली पाहिजे.—नीति. ३:२७; १ थेस्सलनी. ५:२५.
२:२२. ख्रिश्चनांनी खास करून तरुणांनी कसरत करण्यात, खेळ-क्रीडा, संगीत, मनोरंजन, छंद, प्रवास, निरर्थक गप्पा, आणि अशाच प्रकारच्या इतर गोष्टींमध्ये इतके रममाण होऊ नये की ज्यामुळे आध्यात्मिक कार्यांकरता त्यांच्याकडे वेळच उरणार नाही.
[३१ पानांवरील चित्र]
पौलाने देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या पत्रांपैकी शेवटचे पत्र कोणते होते?