व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तीत, फिलेमोन व इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

तीत, फिलेमोन व इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

तीत, फिलेमोन व इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

पौलाला रोममध्ये पहिल्यांदा कैद करण्यात आल्यानंतर, सा.यु. ६१ मध्ये त्याला मुक्‍त करण्यात आले. त्यानंतर काही काळाने त्याने क्रेत बेटाला भेट दिली. तेथील मंडळीला आध्यात्मिक साहाय्याची गरज आहे हे लक्षात घेऊन त्याने तीताला तेथेच थांबण्यास सांगितले. नंतर, पौल कदाचित मासेदोनियात असताना, तीताला त्याच्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्याकरता मार्गदर्शन देण्यासाठी आणि प्रेषित या नात्याने त्याच्या कार्याला आपला पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी पौलाने त्याला एक पत्र लिहिले.

याआधी, सा.यु. ६१ मध्ये पौलाला कैदेतून मुक्‍त करण्याच्या काही काळाअगोदर, त्याने कलस्सै येथे राहणारा एक ख्रिस्ती बंधू फिलेमोन याला एक पत्र लिहिले. या पत्रात पौलाने आपला मित्र फिलेमोन याला एक विनंती केली.

सा.यु. ६१ च्या सुमारास पौलाने यहुदियात राहणाऱ्‍या इब्री ख्रिश्‍चनांनाही एक पत्र लिहिले. यहुदी धार्मिक व्यवस्थेपेक्षा ख्रिस्ती धर्म कशा प्रकारे श्रेष्ठ आहे हे त्याने या पत्रात स्पष्ट केले. या तिन्ही पत्रांत आपल्याकरता अतिशय उपयोगी सल्ला आहे.—इब्री ४:१२.

विश्‍वासात खंबीर राहा

(तीत १:१-३:१५)

पौलाने तीताला ‘प्रत्येक नगरात वडील नेमण्याविषयी’ मार्गदर्शन दिले. तसेच, “[जे अनावर आहेत अशांनी] विश्‍वासात खंबीर व्हावे” म्हणून “कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल,” असाही सल्ला दिला. त्याने क्रेत येथील मंडळीतील सर्वांना ‘अभक्‍तीला नाकारून मर्यादेने वागण्याचा’ सल्ला दिला.—तीत १:५, १०-१४; २:१२, १३.

पौलाने क्रेत येथील बांधवांना विश्‍वासात खंबीर राहण्यास साहाय्य करण्यासाठी आणखी सल्ला दिला. त्याने तीताला “मूर्खपणाचे वाद, . . . व नियमशास्त्राविषयीची भांडणे, ह्‍यांपासून दूर” राहण्यास सांगितले.—तीत ३:९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१५—“शुद्ध जनांस सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्‍वास न ठेवणारे ह्‍यांना काहीच शुद्ध नाही” याचा काय अर्थ आहे? हे समजून घेण्याकरता “सर्व काही” असे म्हणताना पौलाचा काय अर्थ होता हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी चुकीच्या असल्याचे देवाच्या वचनात स्पष्टपणे सांगितले आहे त्यांविषयी तो बोलत नव्हता. तर, ज्या बाबतींत ख्रिस्ती बांधव आपापल्या विवेकानुसार निर्णय घेऊ शकतात अशा गोष्टींविषयी तो बोलत होता. ज्यांची विचारसरणी देवाच्या स्तरांशी सुसंगत आहे, त्यांना या गोष्टी शुद्ध वाटतात. पण, ज्यांची विचारसरणी विकृत झाली आहे आणि ज्यांचा विवेक भ्रष्ट झाला आहे त्यांना या गोष्टी अशुद्ध वाटतात. *

३:५—अभिषिक्‍त ख्रिस्ती कशा प्रकारे ‘स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्‍यांच्याद्वारे तारिले’ जातात? देवाने त्यांना खंडणी बलिदानाच्या आधारावर येशूच्या रक्‍ताद्वारे शुद्ध केले आहे, त्याअर्थी, ते स्नानाने तारिलेजातात. त्यांचे पवित्र आत्म्याने नवीकरणकेले जाते याचा असा अर्थ आहे की देवाचे आत्म्याने अभिषिक्‍त पुत्र या नात्याने ते “नवी उत्पत्ती” बनले आहेत.—२ करिंथ. ५:१७.

आपल्याकरता धडे:

१:१०-१३; २:१५. मंडळीत चुकीचे काही घडत असल्यास, ख्रिस्ती पर्यवेक्षकांनी ते सुधारण्याचे धैर्य दाखवले पाहिजे.

२:३-५. पहिल्या शतकाप्रमाणेच, आजही प्रौढ ख्रिस्ती बहिणींनी “चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्‍त नसाव्या; सुशिक्षण देणाऱ्‍या असाव्या.” अशा प्रकारे, त्या मंडळीतील “तरुण स्त्रियांना” खासगीत प्रभावीपणे मार्गदर्शन देऊ शकतील.

३:८, १४. ‘चांगली कृत्ये करण्याचे मनावर घेणे, चांगले व हितकारक’ आहे, कारण त्यामुळे देवाच्या सेवेत फलदायी होण्यास आणि दुष्ट जगापासून अलिप्त राहण्यास आपल्याला साहाय्य मिळते.

“प्रीतीस्तव विनंती” करा

(फिले. १-२५)

फिलेमोनाने दाखवलेली ‘प्रीती व भरवसा’ यांसाठी पौल त्याची प्रशंसा करतो. तो सहविश्‍वासू बांधवांच्या जिवाला विश्रांतीचा स्रोत असल्यामुळे पौलाला “फार आनंद झाला व [त्याचे] सांत्वन झाले.”—फिले. ४, ५,.

अनेसिमाबद्दल एक नाजूक प्रश्‍न हाताळताना पौलाने आदेश न देता, “प्रीतीस्तव विनंती” करण्याद्वारे, पर्यवेक्षकांसाठी एक उत्तम उदाहरण मांडले. त्याने फिलेमोनाला म्हटले: “तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे, आणि मला ठाऊक आहे की, मी जे म्हणतो, त्यापेक्षा तू अधिकहि करशील.”—फिले. ८, ९, २१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१०, ११, १८—आधी “निरुपयोगी” असलेला अनेसिम “उपयोगी” कसा बनला? गुलामी करण्याची इच्छा नसल्यामुळे, अनेसिम कलस्सैमधील फिलेमोनाच्या घरातून रोमला पळून गेला. या १,४०० किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणारे पैसेही त्याने आपल्या मालकाच्या घरातून चोरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरेच, फिलेमोनासाठी तो निरुपयोगीच होता. पण, रोममध्ये पौलाने अनेसिमाला ख्रिस्ती बनण्यासाठी साहाय्य केले. अशा प्रकारे, आधी “निरुपयोगी” असलेला हा दास “उपयोगी” बनला.

१५, १६—अनेसिमाला दास्यातून मुक्‍त करावे असे पौलाने फिलेमोनाला का सांगितले नाही? पौलाला ‘देवाच्या राज्याची घोषणा करण्याची, आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवण्याची’ आपली कामगिरी पूर्ण करण्याची इच्छा होती. म्हणून, त्याला दासांशी संबंधित समस्या व अशा इतर सामाजिक प्रश्‍नांत गुंतायचे नव्हते.—प्रे. कृत्ये २८:३१.

आपल्याकरता धडे:

२. ख्रिस्ती सभांकरता फिलेमोनाने आपले घर उपलब्ध करून दिले होते. आपल्या घरात क्षेत्र सेवेची सभा होणे हा आपल्यासाठी एक बहुमान आहे.—रोम. १६:५; कलस्सै. ४:१५.

४-७. विश्‍वास आणि प्रीती हे गुण प्रदर्शित करण्याच्या बाबतीत आदर्श असलेल्या बंधू-भगिनींची प्रशंसा करण्यास आपण पुढाकार घेतला पाहिजे.

१५, १६. जीवनात अप्रिय घटना घडतात तेव्हा, आपण अनावश्‍यक चिंता करू नये. कारण, अनेसिमाप्रमाणेच आपल्या बाबतीतही अशा घटनांतून चांगले परिणाम घडून येण्याची शक्यता आहे.

२१. फिलेमोनाने अनेसिमाला क्षमा करावी अशी पौलाची अपेक्षा होती. त्याच प्रमाणे, आपणही आपले मन दुखावणाऱ्‍या बंधू-भगिनींना क्षमा करावी अशी आपल्याकडून अपेक्षा केली जाते.—मत्त. ६:१४.

‘प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा’

(इब्री १:१-१३:२५)

येशूच्या बलिदानावरील विश्‍वास नियमशास्त्रात सांगितलेल्या कार्यांपेक्षा वरचढ आहे हे सिद्ध करण्यासाठी, पौल ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, त्याचे याजकत्व, त्याचे बलिदान आणि नवा करार यांच्या श्रेष्ठत्वावर भर देतो. (इब्री ३:१-३; ७:१-३, २२; ८:६; ९:११-१४, २५, २६) या माहितीमुळे यहुद्यांच्या हातून होत असलेला छळ सोसण्यास इब्री ख्रिश्‍चनांना नक्कीच मदत मिळाली असेल. पौल इब्री ख्रिश्‍चनांना ‘प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा’ असे आर्जवतो.—इब्री ६:२.

एका ख्रिस्ती व्यक्‍तीसाठी विश्‍वास किती महत्त्वाचा आहे? पौलाने लिहिले: “विश्‍वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे.” तो इब्री ख्रिश्‍चनांना, ‘आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावण्याचे’ व विश्‍वास ठेवून असे करण्याचे प्रोत्साहन देतो.—इब्री ११:६; १२:१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१४, १५—सैतान “मरणावर सत्ता गाजविणारा” असल्यामुळे तो कोणाचाही मृत्यू घडवून आणू शकतो का? निश्‍चितच नाही. पण, एदेनात त्याने दुष्ट कृत्ये करण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच त्याच्या लबाडीमुळे मानवांवर मरण आले. कारण आदामाने पाप केले आणि अशा रीतीने मानवी कुटुंबात पाप व मरण पसरले. (रोम. ५:१२) शिवाय, सैतानाच्या पृथ्वीवरील सेवकांनी यहोवाच्या उपासकांना छळले आहे, कधीकधी तर मृत्यू होईपर्यंत छळले आहे. येशूच्या बाबतीत त्यांनी असेच केले. पण, म्हणून सैतानाजवळ कोणाचाही मृत्यू घडवून आणण्याची अमर्याद शक्‍ती आहे असा याचा अर्थ होत नाही. असे असते, तर त्याने कधीच यहोवाच्या सेवकांचा समूळ नाश केला असता. यहोवा आपल्या लोकांचे एक समूह या नात्याने संरक्षण करतो आणि सैतानाला कधीही त्यांचा समूळ उच्छेद करण्याची तो परवानगी देणार नाही. सैतानाच्या हल्ल्यांमुळे आपल्यापैकी काही जणांचा मृत्यू होण्याची देव परवानगी देत असला, तरी आपण खात्री बाळगू शकतो की झालेले कोणत्याही प्रकारचे नुकसान तो भरून काढेल.

४:९-११—आपण देवाच्या ‘विसाव्यात’ कसा प्रवेश करतो? देवाने आपल्या सृष्टी कार्याच्या सहा दिवसांच्या शेवटी विसावा घेतला. त्याला खात्री होती की पृथ्वीबद्दल आणि मानवांबद्दल त्याचा उद्देश पूर्ण होईल. (उत्प. १:२८; २:२, ३) येशू ख्रिस्त आणि त्याच्या खंडणी बलिदानाऐवजी स्वतःच्याच नीतिमत्त्वाच्या आधारे तारण मिळवण्याचा प्रयत्न न करता, आपण तारणाकरता देवाने केलेली तरतूद स्वीकारण्याद्वारे त्याच्या ‘विसाव्यात’ प्रवेश करतो. आपल्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्याऐवजी यहोवावर विश्‍वास ठेवून आज्ञाधारकपणे त्याच्या पुत्राचे अनुकरण केल्यामुळे आपल्याला दररोज अनेक आनंददायक व विसावा देणाऱ्‍या आशीर्वादांचा अनुभव घेता येईल.—मत्त. ११:२८-३०.

११:१०, १३-१६—अब्राहाम कोणत्या “नगराची” वाट पाहत होता? हे खरोखरचे नगर नव्हते, तर लाक्षणिक नगर होते. येशू ख्रिस्त आणि त्याच्या १,४४,००० सहशासकांनी बनलेल्या ‘स्वर्गीय यरूशलेमाची’ अब्राहाम वाट पाहत होता. या सहशासकांना स्वर्गीय वैभव प्राप्त झाल्यानंतर त्यांना “पवित्र नगरी, नवी यरुशलेम” असेही संबोधण्यात आले आहे. (इब्री १२:२२; प्रकटी. १४:१; २१:२) अब्राहाम देवाच्या राज्यात जीवन उपभोगण्याची वाट पाहत होता.

१२:२—‘येशूच्या पुढे असलेला आनंद’ काय होता, ज्याच्यासाठी त्याने “वधस्तंभ सहन केला”? त्याच्या सेवाकार्यामुळे जे साध्य केले जाणार होते ते पाहण्याचा हा आनंद होता. अर्थात, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण, देवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन आणि खंडणीद्वारे मृत्यूपासून मानवजातीचे तारण. तसेच, राजा या नात्याने राज्य करण्याचे आणि प्रमुख याजक या नात्याने सेवा करण्याचे प्रतिफळ मिळवण्यास आणि त्याद्वारे मानवजातीला अनेक आशीर्वाद मिळवून देण्यासही तो उत्सुक होता.

१३:२०—नव्या कराराला ‘सर्वकाळाचा’ करार असे का म्हटले आहे? याची तीन कारणे आहेत: (१) इतर कोणताही करार कधीच त्याची जागा घेणार नाही, (२) या करारामुळे मिळणारे फायदे कायमस्वरूपी आहेत, आणि (३) नव्या कराराच्या व्यवस्थेचा फायदा ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ हर्मगिदोनानंतरही होत राहील.—योहा. १०:१६.

आपल्याकरता धडे:

५:१४. आपण देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून, शिकलेल्या गोष्टी जीवनात अनुसरल्या पाहिजे. आपल्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” करून देण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही.—१ करिंथ. २:१०.

६:१७-१९. देवाने दिलेल्या अभिवचनावर आणि त्याच्या शपथेवर जर आपली आशा भक्कमपणे आधारित असेल, तर सत्याच्या मार्गावरून आपण सहजासहजी विचलित होणार नाही.

१२:३, ४. लहानसहान परीक्षांमुळे किंवा विरोधामुळे ‘आपली मने खचून आपण थकून न जाता’ प्रौढत्वाकडे वाटचाल करून परीक्षांचा सामना करण्याची आपली क्षमता सुधारली पाहिजे. आपण “रक्‍त पडेपर्यंत” म्हणजे, मृत्यूपर्यंत प्रतिकार करण्याचा निर्धार केला पाहिजे.—इब्री १०:३६-३९.

१२:१३-१५. कोणतेही “कडूपणाचे मूळ” म्हणजेच, मंडळीतील कारभाराविषयी टीका करणारी कोणतीही व्यक्‍ती, आपल्याला ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करण्यापासून’ परावृत्त करता कामा नये.

१२:२६-२८. देवाने नव्हे तर इतरांनी ‘घडवलेल्या वस्तू,’ जसे की सध्याचे व्यवस्थीकरण, तसेच दुष्ट “आकाश” यांना काढून टाकले जाईल. तेव्हा, केवळ “न हालविलेल्या वस्तू” म्हणजेच, देवाचे राज्य आणि त्याचे समर्थक टिकून राहतील. म्हणूनच, आवेशाने राज्याची घोषणा करणे आणि त्याच्या तत्त्वांचे जीवनात पालन करणे खरोखर किती गरजेचे आहे!

१३:७, १७. मंडळीतील पर्यवेक्षकांच्या आज्ञेत व त्यांच्या अधीन राहण्याचा हा आदेश नेहमी आठवणीत ठेवल्यास आपल्याला सहकार्याची मनोवृत्ती दाखवणे सोपे जाईल.

[तळटीप]

^ परि. 11 टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००७, पुष्ठे १२-१३ पाहा.