व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर मानून त्यांचा आदर करता का?

तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर मानून त्यांचा आदर करता का?

तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर मानून त्यांचा आदर करता का?

“प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.”—रोम. १२:१०.

१. जगातील कित्येक भागांत आज कशाला महत्त्व राहिलेले नाही?

जगातील काही भागांत, मोठ्यांच्या सहवासात असताना, लहानांनी त्यांना आदर दाखवण्यासाठी गुडघे टेकून बसण्याचा रिवाज आहे. वयाने लहान असलेले मोठ्यांपेक्षा उंच दिसू नये ही यामागची भावना आहे. या समाजांत, लहानांनी मोठ्यांकडे पाठ फिरवणेही अनादराचे कृत्य समजले जाते. अशा प्रकारे, विविध समाजांत मोठ्यांचा आदर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या सगळ्या पद्धती, देवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्राची आपल्याला आठवण करून देतात. या नियमशास्त्रात या आज्ञेचाही समावेश होता: “पिकल्या केसासमोर [आदराने] उठून उभा राहा; वृध्दाला मान दे.” (लेवी. १९:३२) दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेक ठिकाणी इतरांचा सन्मान करण्याला आज महत्त्व दिले जात नाही. खरे तर, इतरांचा अनादर करण्याची प्रवृत्तीच आज सर्वत्र दिसून येते.

२. आपण कोणाचा सन्मान केला पाहिजे असे देवाचे वचन आपल्याला सांगते?

दुसरीकडे पाहता, देवाच्या वचनात सांगितले आहे की इतरांचा आदर किंवा सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण यहोवा आणि येशूचा सन्मान केला पाहिजे असे त्यामध्ये सांगितले आहे. (योहा. ५:२३) आपल्याला अशीही आज्ञा देण्यात आली आहे की आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आणि सहविश्‍वासू बंधू-भगिनींचा सन्मान केला पाहिजे, तसेच मंडळीबाहेरील काहींचा विशेषपणे सन्मान केला पाहिजे. (रोम. १२:१०; इफिस. ६:१, २; १ पेत्र २:१७) आपण यहोवाचा सन्मान करतो हे कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो? कशा प्रकारे आपण आपल्या ख्रिस्ती बंधू-भगिनींचा सन्मान किंवा आदर करू शकतो? या प्रश्‍नांची व याच्याशी संबंधित इतर प्रश्‍नांची आपण चर्चा करू या.

यहोवाचा आणि त्याच्या नावाचा सन्मान करा

३. यहोवाचा सन्मान करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग कोणता आहे?

यहोवाचा सन्मान करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे, त्याच्या नावाप्रती उचित आदर दाखवणे. कारण, आपण ‘देवाच्या नावाकरिता’ निवडलेले लोक आहोत. (प्रे. कृत्ये १५:१४) खरेच, सर्वशक्‍तिमान यहोवा देवाचे नाव धारण करणे सन्मानाची गोष्ट आहे. संदेष्टा मीखा याने असे म्हटले: “सर्व लोक, प्रत्येक आपापल्या देवाच्या नावाने असे चालतात, परंतु आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाल चालत जाऊ.” (मीखा ४:५, पं.र.भा.) यहोवाच्या नावाला शोभेल अशा प्रकारे दररोज आचरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याद्वारे, आपण ‘यहोवाच्या नावाने’ चालतो. पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना आठवण करून दिल्याप्रमाणे, आपण ज्या सुवार्तेचा प्रचार करतो त्यानुसार वागलो नाही, तर देवाच्या नावाची “निंदा” किंवा अनादर होईल.—रोम. २:२१-२४.

४. यहोवाच्या नावाची साक्ष देण्याच्या सुहक्काकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने पाहता?

साक्षकार्य करण्याद्वारे देखील आपण यहोवाचा सन्मान करतो. प्राचीन काळात, यहोवाने इस्राएल राष्ट्राच्या लोकांना त्याचे साक्षीदार होण्याची संधी देऊ केली होती. पण, ही जबाबदारी पार पाडण्यास ते चुकले. (यश. ४३:१-१२) त्यांनी वारंवार यहोवाकडे आपली पाठ फिरवली व “इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले.” (स्तो. ७८:४०, ४१) परिणामी, त्या राष्ट्राने यहोवाचा अनुग्रह पूर्णपणे गमावला. पण, आज आपण मात्र यहोवाचे आणि त्याच्या नावाचे साक्षीदार होण्याचा सुहक्क आपल्याला लाभल्याबद्दल कृतज्ञ आहोत. आपण त्याच्या नावाची घोषणा करतो कारण आपले यहोवावर प्रेम आहे आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण केले जावे अशी आपली उत्कट इच्छा आहे. आणि आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दलचे सत्य आपल्याला माहीत झाल्यामुळे आपण प्रचार करण्यास प्रेरित होतो. आपल्यालाही पौलाप्रमाणेच वाटते ज्याने म्हटले: “मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” —१ करिंथ. ९:१६.

५. यहोवावर विश्‍वास असणे आणि त्याचा आदर करणे हे कशा प्रकारे एकमेकांशी संबंधित आहेत?

स्तोत्रकर्ता दाविदाने असे म्हटले: “ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवितील, कारण, हे परमेश्‍वरा, जे तुझा शोध करितात त्यांस तू टाकिले नाही.” (स्तो. ९:१०) जर आपण यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत असू आणि त्याच्या नावाचा आदर करत असू, तर प्राचीन काळातील त्याच्या विश्‍वासू सेवकांप्रमाणेच आपल्यालाही त्याच्यावर भरवसा असेल. यहोवावरचा आपला भरवसा आणि आपला विश्‍वास, आपण त्याचा सन्मान करतो हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग आहे. यहोवावरचा आपला भरवसा आणि त्याचा आदर करणे यात जो संबंध आहे त्याबद्दल देवाचे वचन काय म्हणते याकडे लक्ष द्या. जेव्हा प्राचीन इस्राएलाने यहोवावर भरवसा ठेवण्याचे सोडून दिले, तेव्हा यहोवाने मोशेला असे विचारले: “कोठवर हे लोक मला [अनादराने] तुच्छ लेखणार आणि ह्‍यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनहि हे कोठवर माझ्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत?” (गण. १४:११) याउलट, परीक्षांचा सामना करत असताना, यहोवा आपले संरक्षण आणि सांभाळ करेल असा जेव्हा आपण भरवसा बाळगतो, तेव्हा आपण त्याचा आदर करतो.

६. मनापासून यहोवाचा आदर करण्यास आपल्याला कशामुळे प्रेरणा मिळते?

यहोवाबद्दल आपल्याला वाटणारा आदर मनापासून असला पाहिजे असे येशूने दाखवले होते. त्याने देवाची उपासना प्रामाणिक मनाने न करणाऱ्‍या लोकांबद्दल यहोवाने काय म्हटले होते ते सांगितले: “हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.” (मत्त. १५:८) यहोवावर आपले खरे प्रेम असल्यास आपण त्याचा मनापासून आदर करण्यास प्रेरित होतो. (१ योहा. ५:३) आणि यहोवाने दिलेले हे वचन सुद्धा आपण आठवणीत ठेवतो: “जे माझा आदर करितात त्यांचा मी आदर करीन.”—१ शमु. २:३०.

मंडळीतील वडील इतरांचा आदर करतात

७. (क) मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेल्या बांधवांनी त्यांच्या देखरेखीखाली असलेल्यांचा सन्मान का केला पाहिजे? (ख) पौलाने कशा प्रकारे सहविश्‍वासू बांधवांचा आदर केला?

प्रेषित पौलाने सहविश्‍वासू बांधवांना असा सल्ला दिला: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोम. १२:१०) मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेल्या बांधवांनी, आपल्या देखरेखीखाली असलेल्यांचा सन्मान करण्यात आदर्श ठेवला पाहिजे. याबाबतीत, महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या असणाऱ्‍यांनी प्रेषित पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. (१ थेस्सलनीकाकर २:७, ८ वाचा.) पौलाने ज्या मंडळ्यांना भेट दिली होती, तेथील बांधवांना हे माहीत होते की तो त्यांना असे काहीही करण्यास सांगणार नाही जे तो स्वतः करू इच्छित नाही. पौल सहविश्‍वासू बांधवांचा आदर करत असल्यामुळे पर्यायाने त्यानेही इतरांचा आदर मिळवला. “मी तुम्हास विनंती करितो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा,” असे पौलाने म्हटले तेव्हा नक्कीच अनेकांनी मनःपूर्वक त्याचे अनुकरण केले असेल याची आपण खात्री बाळगू शकतो.—१ करिंथ. ४:१६.

८. (क) येशूने आपल्या अनुयायांना कोणत्या एका महत्त्वपूर्ण मार्गाने आदर दाखवला? (ख) आज ख्रिस्ती पर्यवेक्षक कशा प्रकारे येशूचे अनुकरण करू शकतात?

जबाबदारीच्या पदावर असलेले बांधव आपल्या देखरेखीखाली असलेल्यांना आणखी एका मार्गाने आदर दाखवतात. इतरांना कोणतीही विनंती करताना किंवा निर्देशने देताना, ते त्याची कारणेही स्पष्ट करतात. अशा प्रकारे, ते येशूचे अनुकरण करतात. उदाहरणार्थ, कापणीच्या कामासाठी आणखी जास्त कामकऱ्‍यांना पाठवण्यासाठी आपल्या अनुयायांना प्रार्थना करायला सांगताना, असे का केले पाहिजे त्याचे कारण येशूने सांगितले. त्याने म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्त. ९:३७, ३८) त्याच प्रकारे, जेव्हा त्याने आपल्या अनुयायांना ‘जागृत राहण्याचा’ सल्ला दिला, तेव्हा त्याने त्याचे कारण सांगितले. त्याने म्हटले: “कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मत्त. २४:४२) वारंवार, येशूने आपल्या अनुयायांना काय करावे हे सांगण्यासोबतच, त्यांनी ते का केले पाहिजे हेही सांगितले. अशा प्रकारे, त्याने आपल्या अनुयायांना आदर दाखवला. ख्रिस्ती पर्यवेक्षकांसाठी अनुकरण करण्याजोगे किती उत्तम उदाहरण!

यहोवाच्या मंडळीचा आणि तिच्याद्वारे मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचा आदर करा

९. जेव्हा आपण जगव्याप्त ख्रिस्ती मंडळीचा व तिच्या वतीने आपले मार्गदर्शन करणाऱ्‍यांचा आदर करतो, तेव्हा आपण कोणाचा आदर करत असतो? स्पष्ट करा.

यहोवाचा सन्मान करण्यासाठी आपण जगव्याप्त ख्रिस्ती मंडळीचा आणि तिच्या वतीने आपले मार्गदर्शन करणाऱ्‍यांचा देखील सन्मान केला पाहिजे. जेव्हा आपण विश्‍वासू दास वर्गाद्वारे मिळणाऱ्‍या शास्त्रीय सल्ल्याचे पालन करतो, तेव्हा आपण यहोवाच्या संघटनेचा व त्याच्या मार्गदर्शनाचा आदर करतो. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत, नियुक्‍त बांधवांप्रती आदर न दाखवणाऱ्‍यांविषयी प्रेषित योहानाने नाराजी व्यक्‍त केली. (३ योहान ९-११ वाचा.) योहानाच्या शब्दांवरून दिसते की हे लोक मंडळीत जबाबदारीच्या पदावर नेमलेल्यांचा आदर करण्यास तर चुकत होतेच, पण त्यांनी दिलेले शिक्षण व मार्गदर्शन यांचाही ते अनादर करत होते. आनंदाची गोष्ट म्हणजे, बहुतेक ख्रिश्‍चनांची अशा प्रकारची मनोवृत्ती नव्हती. निदान, प्रेषित जिवंत असेपर्यंत तरी, काहींचा अपवाद वगळता बंधुवर्गातील बहुतेकांनी मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांबद्दल मनापासून आदर दाखवला.—फिलिप्पै. २:१२.

१०, ११. ख्रिस्ती मंडळीत काहींवर अधिकार सोपवला जाणे योग्यच आहे हे शास्त्रवचनांच्या आधारे स्पष्ट करा.

१० येशूने ज्याअर्थी आपल्या शिष्यांना, “तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा” असे म्हटले, त्याअर्थी, ख्रिस्ती मंडळीत अधिकाराची पदे असणे योग्य नाही असा तर्क काहींनी केला आहे. (मत्त. २३:८) पण, इब्री व ग्रीक शास्त्रवचनांतही अशा कितीतरी व्यक्‍तींची उदाहरणे आढळतात, ज्यांना देवाकडून अधिकार मिळाला होता. प्राचीन इब्री लोकांमधील कुलपिता, शास्ते आणि राजे यांचा इतिहास पाहिल्यास, यहोवाने आपल्या वतीने मार्गदर्शन देण्यासाठी मानवांचा उपयोग केला होता याचा भरपूर पुरावा आपल्याला सापडतो. या नियुक्‍त व्यक्‍तींना जेव्हा लोकांनी उचित आदर दाखवला नाही तेव्हा यहोवाने त्यांचे ताडन केले.—२ राजे १:२-१७; २:१९, २३, २४.

११ प्राचीन काळाप्रमाणेच, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनीही प्रेषितांचा अधिकार मान्य केला. (प्रे. कृत्ये २:४२) उदाहरणार्थ, पौलाने बांधवांना मार्गदर्शन दिले. (१ करिंथ. १६:१; १ थेस्सलनी. ४:२) आणि, त्यासोबतच त्याने स्वतः देखील आपल्यावर अधिकार असणाऱ्‍यांचे मार्गदर्शन नम्रपणे स्वीकारले. (प्रे. कृत्ये १५:२२; गल. २:९, १०) खरोखर, ख्रिस्ती मंडळीतील अधिकाराविषयी पौलाचा उचित दृष्टिकोन होता.

१२. अधिकाराच्या संदर्भात, बायबलमधील उदाहरणांवरून आपल्याला कोणत्या दोन गोष्टी शिकायला मिळतात?

१२ यातून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात. पहिली अशी, की ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ त्याच्या नियमन मंडळाद्वारे पुरुषांना जबाबदारीच्या पदावर नियुक्‍त करणे आणि यांपैकी काहींना इतर नियुक्‍त पुरुषांवर अधिकार दिला जाणे हे शास्त्रवचनांशी पूर्णपणे सुसंगत आहे. (मत्त. २४:४५-४७; १ पेत्र ५:१-३) दुसरी गोष्ट म्हणजे, नियुक्‍त पुरुषांसहित आपण सर्वांनीच आपल्यावर अधिकार असलेल्यांचा सन्मान केला पाहिजे. तर मग, जगव्याप्त ख्रिस्ती मंडळीत देखरेख करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, त्यांचा आपण कोणकोणत्या व्यावहारिक मार्गांनी सन्मान करू शकतो?

प्रवासी पर्यवेक्षकांना आदर दाखवणे

१३. आधुनिक काळात ख्रिस्ती मंडळीच्या वतीने मार्गदर्शन करणाऱ्‍यांना आपण आदर कसा दाखवू शकतो?

१३ पौलाने म्हटले: “बंधुजनहो, आम्ही तुम्हास विनंती करितो की, तुम्हामध्ये जे श्रम करितात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करितात त्यांचा तुम्ही सन्मान करावा; आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा.” (१ थेस्सलनी. ५:१२, १३) ‘जे श्रम करतात’ त्यांच्यामध्ये प्रवासी पर्यवेक्षकांचा नक्कीच समावेश करता येईल. म्हणूनच, आपण त्यांना “अत्यंत मान” दिला पाहिजे. असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, त्यांचा सल्ला व प्रोत्साहन आनंदाने स्वीकारून त्यानुसार वागणे. एखादा प्रवासी पर्यवेक्षक आपल्याला विश्‍वासू दास वर्गाकडील काही सूचना कळवतो, तेव्हा “वरून येणारे ज्ञान” आपल्याला “समजूत होण्याजोगे,” म्हणजेच आज्ञाधारक असण्यास प्रेरित करेल.—याको. ३:१७.

१४. मंडळी प्रवासी पर्यवेक्षकांना मनापासून आदर कसा दाखवू शकते आणि याचा परिणाम काय होतो?

१४ कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने करण्याची सवय झालेली असते. अशा वेळी तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्याची सूचना मिळाल्यास आपली काय प्रतिक्रिया असेल? “आमच्याकडे अशी पद्धत नाही” किंवा “ही पद्धत दुसरीकडे चालत असेल, आमच्या मंडळीत चालणार नाही,” असा विचार करून मिळालेल्या सूचनेचा विरोध करण्याची प्रवृत्ती आपण टाळली पाहिजे. त्याऐवजी, मिळालेल्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आपण प्रवासी पर्यवेक्षकांना आदर दाखवू शकतो. मंडळी ही यहोवाची आहे आणि या मंडळीचे मस्तक येशू आहे हे आपण लक्षात ठेवल्यास, मिळालेल्या मार्गदर्शनाचे पालन करणे आपल्याला सोपे जाईल. प्रवासी पर्यवेक्षकांनी दिलेल्या निर्देशनाचा जेव्हा आनंदाने स्वीकार केला जातो व मंडळीत त्याचे पालन केले जाते, तेव्हा आपण त्यांचा मनापासून आदर करतो हे दिसून येते. करिंथ येथील बांधवांनी त्यांच्या मंडळीच्या भेटीस आलेला वडील तीत, याच्या मार्गदर्शनाचे आदरपूर्वक पालन केल्याबद्दल प्रेषित पौलाने त्यांची प्रशंसा केली. (२ करिंथ. ७:१३-१६) आज, आपणही ही खात्री बाळगू शकतो की प्रवासी पर्यवेक्षकांकडून मिळालेली निर्देशने राजीखुशीने लागू केल्यास प्रचार कार्यात आपल्याला जास्तीतजास्त आनंद अनुभवता येईल.—२ करिंथकर १३:११ वाचा.

“सर्वांस मान द्या”

१५. आपण सहविश्‍वासू बंधू-भगिनींना कोणत्या मार्गांनी आदर दाखवतो?

१५ पौलाने लिहिले: “वडील माणसाला टाकून बोलू नको, तर त्याला बापासमान समजून बोध कर. तरुणास बंधुसमान मानून, वडील स्त्रियांस मातासमान मानून, तरुण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मानून बोध कर. ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर.” (१ तीम. ५:१-३) होय, देवाचे वचन आपल्याला ख्रिस्ती मंडळीतील सर्वांचा आदर करण्यास सांगते. पण, एखाद्या बांधवाशी किंवा बहिणीशी तुमचे मतभेद झाल्यास काय? यामुळे तुम्ही त्यांचा आदर करणे थांबवणार का? की त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या ख्रिस्ती गुणांची आठवण ठेवून, आपल्या मनोवृत्तीत बदल करणार? विशेषतः जबाबदारीच्या पदावर असणाऱ्‍यांनी कधीही इतरांवर ‘धनीपण न करता’ नेहमी त्यांचा आदर केला पाहिजे. (१ पेत्र ५:३) खरेच, ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांमध्ये असणारे मनःपूर्वक प्रेम हेच तिचे ओळखचिन्ह असल्यामुळे, ख्रिस्ती मंडळीत आपल्याला एकमेकांचा सन्मान करण्याच्या कितीतरी संधी मिळतात.योहान १३:३४, ३५ वाचा.

१६, १७. (क) आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्याबद्दलच नव्हे, तर जे आपला विरोध करतात त्यांच्याबद्दलही आपल्याला आदर असणे का महत्त्वाचे आहे? (ख) आपण कशा प्रकारे ‘सर्वांस मान देतो’?

१६ अर्थातच, इतरांचा आदर करणे आपण ख्रिस्ती मंडळीपुरतेच मर्यादित ठेवत नाही. पौलाने त्याच्या दिवसांतील ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे . . . बरे करावे.” (गल. ६:१०) हे मान्य आहे की आपला एखादा सहकर्मी किंवा वर्गसोबती आपल्याशी चांगल्या प्रकारे वागत नाही तेव्हा या तत्त्वाचे पालन करणे आपल्याला जड जाते. अशा वेळी आपण पुढील शब्द आठवणीत ठेवणे गरजेचे आहे: “दुष्कर्म्यांवर जळफळू नको.” (स्तो. ३७:१) या सल्ल्याचे पालन केल्याने आपल्याला आपल्या विरोधकांशीही आदराने वागण्यास मदत मिळेल. त्याच प्रकारे, प्रचार कार्य करत असताना, नम्र मनोवृत्ती बाळगल्याने आपल्याला सर्वांशी “सौम्यतेने व भीडस्तपणाने” वागता येईल. (१ पेत्र ३:१५) शिवाय, आपले स्वरूप व आपला पेहराव यावरूनही, आपल्याला लोकांबद्दल आदर असल्याचे दिसून येईल.

१७ खरोखर, सहविश्‍वासू बंधू-भगिनींशी व्यवहार करताना असो, किंवा मंडळीबाहेरील इतर लोकांशी व्यवहार करताना असो, आपण सर्व वेळी या सल्ल्याचे पालन करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करतो: “सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.”—१ पेत्र २:१७.

तुमचे उत्तर काय असेल?

आपण उचित आदर कसा दाखवू शकतो:

• यहोवाप्रती?

• मंडळीतील वडील आणि प्रवासी पर्यवेक्षक यांच्या प्रती?

• मंडळीतील प्रत्येक सदस्याप्रती?

• आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्या प्रती?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी नियमन मंडळाच्या अधिकाराचा आदर केला

[२४ पानांवरील चित्र]

प्रत्येक देशात मंडळीतील वडील, नियमन मंडळाने नियुक्‍त केलेल्या प्रवासी पर्यवेक्षकांचा सन्मान करतात