व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्या भल्यासाठी आपल्यावर नजर ठेवतो

यहोवा आपल्या भल्यासाठी आपल्यावर नजर ठेवतो

यहोवा आपल्या भल्यासाठी आपल्यावर नजर ठेवतो

“परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.”—२ इति. १६:९.

१. यहोवा आपले परीक्षण का करतो?

यहोवा कोणत्याही मानवी पित्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो आपल्याविषयी सर्व काही जाणतो. त्याला तर आपल्या मनात ‘उत्पन्‍न होणारे विचार व कल्पना’ देखील कळतात. (१ इति. २८:९) तरीसुद्धा, आपल्या चुका शोधण्याच्या उद्देशाने तो आपले परीक्षण करत नाही. (स्तो. ११:४; १३०:३) उलट, त्याचे आपल्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे तो आपले संरक्षण करू इच्छितो. कोणत्याही गोष्टीमुळे त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध बिघडू नये किंवा सार्वकालिक जीवन मिळवण्याची आपली आशा धोक्यात येऊ नये असे त्याला वाटते आणि म्हणून तो आपले परीक्षण करतो.—स्तो. २५:८-१०, १२, १३.

२. यहोवा कोणासाठी आपले सामर्थ्य प्रगट करतो?

यहोवा सर्वशक्‍तिक्‍तिमान असल्यामुळे तो सर्व काही पाहू शकतो. त्यामुळे जेव्हा त्याचे एकनिष्ठ सेवक त्याला मदतीसाठी हाक मारतात तेव्हा तो त्यांच्या मदतीला धावून येतो. आणि जेव्हा ते परीक्षांना तोंड देत असतात तेव्हा त्यांना साहाय्य करतो. दुसरे इतिहास १६:९ मध्ये असे म्हटले आहे: “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” येथे लक्ष देण्याजोगी गोष्ट अशी की जे सात्विक चित्ताने म्हणजेच शुद्ध मनाने किंवा प्रामाणिक हेतूने यहोवाची सेवा करतात केवळ अशाच लोकांचे साहाय्य करण्यासाठी तो आपले सामर्थ्य दाखवतो. पण, जे बेइमान व ढोंगी आहेत अशा लोकांबद्दल तो आस्था दाखवत नाही. —यहो. ७:१, २०, २१, २५; नीति. १:२३-३३.

देवासोबत चाला

३, ४. ‘देवाबरोबर चालण्याचा’ काय अर्थ आहे आणि बायबलमधील कोणत्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते?

या अफाट विश्‍वाचा सृष्टिकर्ता मानवांना लाक्षणिक अर्थाने आपल्यासोबत चालू देतो या गोष्टीवर कित्येक लोकांचा विश्‍वास बसत नाही. पण, यहोवाची इच्छा आहे की आपण त्याच्यासोबत चालावे. प्राचीन काळात हनोख आणि नोहा हे ‘देवाबरोबर चालले.’ (उत्प. ५:२४; ६:९) मोशे ‘जणू काही प्रत्यक्ष देव आपल्याबरोबर आहे असे दिसत असल्याप्रमाणे चालत राहिला.’ (इब्री ११:२७, सुबोध भाषांतर) राजा दावीदही आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्यासोबत नम्रपणे चालला. त्याने म्हटले: “[यहोवा] माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.”—स्तो. १६:८.

अर्थातच, आपण अक्षरशः यहोवाचा हात धरून त्याच्यासोबत चालू शकत नाही. पण, लाक्षणिक अर्थाने चालू शकतो. ते कसे? स्तोत्रकर्त्या आसाफाने असे लिहिले: “मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखविशील.” (स्तो. ७३:२३, २४) सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, जेव्हा आपण यहोवाच्या लिखित वचनाद्वारे व त्याच्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाद्वारे’ मिळणाऱ्‍या सल्ल्याचे काळजीपूर्वक पालन करतो, तेव्हा आपण त्याच्यासोबत चालत असतो.—मत्त. २४:४५; २ तीम. ३:१६.

५. यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांवर एका प्रेमळ पित्याप्रमाणे कशा प्रकारे लक्ष देतो आणि आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहिले पाहिजे?

जे लोक यहोवासोबत चालतात ते त्याला प्रिय आहेत. म्हणूनच, एका प्रेमळ पित्याप्रमाणे तो त्यांच्याकडे लक्ष देतो, त्यांची काळजी घेतो, त्यांचे संरक्षण करतो आणि त्यांना मार्गदर्शन देतो. देव म्हणतो, “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तो. ३२:८) स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘यहोवाच्या मार्गदर्शनाकडे लक्ष देण्याद्वारे आणि त्याची प्रेमळ नजर आपल्यावर आहे याची जाणीव बाळगून, मी देवाचा हात धरून चालत आहे का? यहोवाच्या अस्तित्वाची मला सदोदित जाणीव असते का, आणि याचा माझ्या विचारांवर, तसेच माझ्या वागण्या-बोलण्यावर प्रभाव पडतो का? माझ्या हातून एखादी चूक घडल्यास, यहोवा भावनाशून्य व कठोर नसून, प्रेमळ व क्षमाशील पिता आहे आणि पश्‍चात्तापी वृत्ती दाखवणाऱ्‍यांना तो आपल्याकडे परत येण्यास मदत करू इच्छितो असा दृष्टिकोन मी बाळगतो का?’—स्तो. ५१:१७.

६. यहोवा देव आईवडिलांपेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ आहे?

कधीकधी, आपण एखादे चुकीचे पाऊल उचलण्याअगोदरच यहोवा आपल्या मदतीला धावून येतो. उदाहरणार्थ, आपल्या मनात अयोग्य इच्छा उत्पन्‍न होऊ लागल्या आहेत हे तो पारखू शकतो. (यिर्म. १७:९) अशा परिस्थितीत, आपल्या आईवडिलांच्याही आधी यहोवा आपली मदत करू शकतो, कारण त्याचे “नेत्र” आपल्या मनातील विचारांचेही परीक्षण करू शकतात. (स्तो. ११:४; १३९:४; यिर्म. १७:१०) यिर्मयाचा लेखनिक व जवळचा मित्र बारूख याला देवाने एकदा कशा प्रकारे मदत केली त्याकडे लक्ष द्या.

यहोवाने प्रेमळ पित्याप्रमाणे बारूखाला मदत केली

७, ८. (क) बारूख कोण होता आणि त्याच्या मनात कोणत्या हानीकारक विचारांनी मूळ धरले असावे? (ख) यहोवाने बारूखाबद्दल एका प्रेमळ पित्याप्रमाणे काळजी कशी व्यक्‍त केली?

बारूख हा एक कुशल शास्त्री होता. तो यिर्मयासोबत विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत होता. कालांतराने, त्यांच्यावर यहुदाविरुद्ध यहोवाचे न्यायदंड सुनावण्याची कठीण कामगिरी सोपवण्यात आली. (यिर्म. १:१८, १९) ही कामगिरी पार पाडत असताना केव्हातरी, बारूख आपल्यासाठी “मोठाल्या गोष्टींची” लालसा करू लागला. कदाचित बारूख एखाद्या प्रतिष्ठित घराण्याचा असावा. त्यामुळे त्याच्या मनात स्वार्थी महत्त्वाकांक्षा किंवा धनसंपत्तीची लालसा उत्पन्‍न झाली असण्याची शक्यता आहे. काहीही असो, त्याच्या मनात अशा प्रकारचे हानीकारक विचार मूळ धरू लागले आहेत हे यहोवाने पाहिले. यहोवाने तत्परतेने या बाबीकडे लक्ष दिले. त्याने यिर्मयाद्वारे बारूखाला असे म्हटले: “तू म्हणालास, ‘हाय हाय! परमेश्‍वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.’” मग देवाने म्हटले: “तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करितोस काय? ती करू नको.”—यिर्म. ४५:१-५.

यहोवाने बारूखाला सडेतोड शब्दांत सल्ला दिला हे खरे आहे. तरीपण, रागाने नव्हे, तर बारूखाची काळजी वाटत असल्यामुळे यहोवाने एका प्रेमळ पित्याप्रमाणे हा सल्ला दिला. बारूख बाळगत असलेल्या इच्छा हानीकारक असल्या, तरी त्याचे हृदय मुळात दुष्ट किंवा कपटी नाही हे यहोवाने पाहिले. जेरूसलेम आणि यहूदा यांचा अंत जवळ आहे हेही यहोवाला माहीत होते आणि त्यामुळे, या निर्णायक घडीला बारूखाने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये असे यहोवाला वाटत होते. त्यामुळेच, आपल्या सेवकाला वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून देवाने त्याला आठवण करून दिली की तो “सर्व मानवांवर अरिष्ट” आणणार आहे. तसेच बारूख सुज्ञपणे वागल्यास त्याला आपला जीव वाचवता येईल असेही यहोवाने त्याला सांगितले. (यिर्म. ४५:५) यहोवा जणू काही त्याला असे म्हणत होता: ‘बारूख, परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नकोस. यहूदा व जेरूसलेमच्या दुष्ट लोकांची लवकरच काय गत होणार आहे हे ध्यानात ठेव. तू विश्‍वासू राहिलास तर मी तुझे संरक्षण करेन.’ यहोवाचे शब्द बारूखाच्या मनाला नक्कीच भिडले असतील. कारण बारूखाने त्याचे म्हणणे मनावर घेऊन आपली विचारसरणी बदलली आणि त्यामुळे सतरा वर्षांनंतर जेरूसलेमचा नाश झाला तेव्हा तो त्यातून सुखरूप बचावला.

९. परिच्छेदात विचारलेल्या प्रश्‍नांना तुमचे उत्तर काय असेल?

बारूखाच्या अहवालावर मनन करताना, पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर व शास्त्रवचनांवर विचार करा: यहोवाने बारूखाशी केलेल्या व्यवहारातून त्याच्या आपल्या सेवकांप्रती काय भावना आहेत हे कसे दिसून येते? (इब्री लोकांस १२:९ वाचा.) आपण राहात असलेल्या या कठीण काळात, देवाने बारूखाला दिलेल्या सल्ल्यातून आणि बारूखाने त्याला ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यावरून आपण काय शिकू शकतो? (लूक २१:३४-३६ वाचा.) यिर्मयाचे अनुकरण करून ख्रिस्ती वडील, यहोवाला त्याच्या सेवकांबद्दल वाटणारी कळकळ आपल्या वागण्या-बोलण्याद्वारे कशी व्यक्‍त करू शकतात?—गलतीकर ६:१ वाचा.

पुत्रानेही पित्याचे प्रेम प्रकट केले

१०. ख्रिस्ती मंडळीच्या मस्तकाची भूमिका निभावण्यास येशू का समर्थ आहे?

१० ख्रिस्तपूर्व काळात यहोवाने संदेष्ट्यांद्वारे व इतर विश्‍वासू सेवकांद्वारे आपल्या लोकांबद्दल प्रेम प्रकट केले. आज त्याचे प्रेम प्रामुख्याने, ख्रिस्ती मंडळीचे मस्तक असलेल्या येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट होते. (इफिस. १:२२, २३) म्हणूनच प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशूला एका कोकऱ्‍यासारखे चित्रित करण्यात आले आहे, ज्याला “सात डोळे” आहेत. ‘[हे डोळे] सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत.’ (प्रकटी. ५:६) देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण असल्यामुळे येशू चांगले काय व वाईट काय हे अचूकपणे समजू शकतो. यहोवाप्रमाणेच त्याच्यामध्ये देखील आपल्या मनातील विचार जाणून घेण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट त्याच्यापासून लपून राहू शकत नाही.

११. येशूची काय भूमिका आहे आणि आपल्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कशा प्रकारे यहोवासारखाच आहे?

११ पण, यहोवाप्रमाणेच येशू देखील स्वर्गातून एखाद्या पोलिसासारखा आपल्यावर पाळत ठेवत नाही. तर, प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्यावर नजर ठेवतो. येशूला “सनातन पिता” ही पदवी देण्यात आली आहे. त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांना तो सार्वकालिक जीवन प्रदान करेल याची आठवण ही पदवी आपल्याला करून देते. (यश. ९:६) शिवाय, ख्रिस्ती मंडळीचे मस्तक या नात्याने, तो उत्सुक मनोवृत्तीच्या व आध्यात्मिक रीत्या प्रौढ ख्रिश्‍चनांना, खासकरून वडिलांना मंडळीतील गरजू व्यक्‍तींस सांत्वन व सल्ला देण्यासाठी प्रेरित करू शकतो.—१ थेस्सलनी. ५:१४; २ तीम. ४:१, २.

१२. (क) आशिया मायनरमधील सात मंडळ्यांना लिहिलेल्या पत्रांतून येशूविषयी काय प्रकट होते? (ख) देवाच्या कळपाबद्दल असलेली ख्रिस्ताची मनोवृत्ती वडील जन कशा प्रकारे दाखवतात?

१२ ख्रिस्ताला आपल्या कळपाबद्दल असलेली आस्था आशिया मायनरमधील सात मंडळ्यांतील वडिलांना लिहिलेल्या पत्रांतून दिसून येते. (प्रकटी. २:१-३:२२) प्रत्येक मंडळीत काय घडत होते याची त्याला जाणीव असल्याचे आणि आपल्या अनुयायांबद्दल त्याला मनापासून काळजी असल्याचे या पत्रांतून दिसून आले. आजच्या मंडळ्यांच्याबाबतीतही हेच म्हणता येईल. किंबहुना, प्रकटीकरणातील दृष्टांत ‘प्रभूच्या दिवसादरम्यान’ पूर्ण होत असल्यामुळे आजही मंडळीत जे काही होत आहे त्याची जाणीव ख्रिस्ताला आहे आणि आजही त्याला आपल्या अनुयायांची तितकीच काळजी आहे. * (प्रकटी. १:१०) ख्रिस्ताचे प्रेम सहसा आध्यात्मिक मेंढपाळ या नात्याने सेवा करणाऱ्‍या वडिलांच्याद्वारे व्यक्‍त होते. आवश्‍यक असते तेव्हा सांत्वन, प्रोत्साहन किंवा सल्ला देण्यासाठी ख्रिस्त या ‘मानवरूपी देणग्यांना’ म्हणजेच वडिलांना प्रेरित करतो. (इफिस. ४:८, NW; प्रे. कृत्ये २०:२८; यशया ३२:१, २ वाचा.) वडील जन तुम्हाला प्रोत्साहन किंवा सल्ला देतात, तेव्हा हा ख्रिस्ताच्याच प्रेमाचा पुरावा आहे या दृष्टिकोनाने तुम्ही त्याकडे पाहता का?

योग्य वेळी मदत

१३-१५. देव कोणकोणत्या मार्गांनी आपल्या प्रार्थनांचे उत्तर देऊ शकतो? उदाहरणे सांगा.

१३ तुम्ही मदतीसाठी कळकळीने देवाला प्रार्थना करता, आणि त्याचे उत्तर एका प्रौढ बंधू किंवा बहिणीच्या प्रोत्साहनदायक भेटीद्वारे तुम्हाला मिळते, असे तुमच्याबाबतीत कधी घडले आहे का? (याको. ५:१४-१६) किंवा ख्रिस्ती सभेतील एखाद्या भाषणातून वा आपल्या प्रकाशनांतील माहितीतून तुम्हाला कधी मदत मिळाली आहे का? बरेचदा, यहोवा या मार्गांद्वारे आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो. उदाहरणार्थ, एका वडिलांच्या भाषणानंतर एक बहीण त्यांना जाऊन भेटली. या भाषणाच्या अगोदरच्या आठवड्यांत तिला घोर अन्याय सहन करावा लागला होता. पण, आपल्या समस्येबद्दल तक्रार करण्याऐवजी, भाषणात चर्चा केलेल्या बायबलमधील विशिष्ट मुद्यांसाठी तिने आभार व्यक्‍त केले. या भाषणातील मुद्दे तिच्या परिस्थितीला लागू होतील असेच होते आणि त्यामुळे तिला सांत्वन मिळाले. या सभेला हजर राहिल्याबद्दल तिला किती आनंद झाला असेल!

१४ तुरुंगात असताना बायबल सत्य शिकून बाप्तिस्मारहित प्रचारक बनलेल्या तीन कैद्यांना प्रार्थनेद्वारे कशा प्रकारे मदत मिळाली, हे पाहू या. एकदा तुरुंगात मारामारी झाल्यामुळे, शिक्षा म्हणून सर्व कैद्यांवर काही निर्बंध लावण्यात आले. कैद्यांनी याविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. आपला निषेध दर्शवण्यासाठी दुसऱ्‍या दिवशी सकाळी न्याहारीनंतर कोणीही आपली ताटे परत द्यायची नाहीत असे त्यांनी ठरवले. यामुळे ते तीन बाप्तिस्मारहित प्रचारक पेचात पडले. जर त्यांनी या बंडात इतर कैद्यांची साथ दिली तर रोमकर १३:१ येथे असलेल्या यहोवाच्या सल्ल्याचे ते उल्लंघन ठरेल. पण, साथ दिली नाही तर त्यांना कैद्यांचा रोष पत्करावा लागेल.

१५ या तिघांना एकमेकांशी बोलण्याचा किंवा सल्ला घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. पण, तिघांनीही योग्य निर्णय घेता यावा म्हणून यहोवाला प्रार्थना केली. दुसऱ्‍या दिवशी सकाळी तिघांना असे आढळले की ते सर्व जण एकाच निष्कर्षावर आले आहेत—न्याहारीच करायची नाही. नंतर जेव्हा गार्ड ताटे गोळा करण्याकरता आले, तेव्हा या तिघांकडे परत देण्यासाठी ताटेच नव्हती. ‘प्रार्थना ऐकणारा’ यहोवा देव त्यांच्या पाठीशी होता या जाणिवेने त्यांना किती आनंद झाला असेल!—स्तो. ६५:२.

आत्मविश्‍वासाने भविष्याला सामोरे जाणे

१६. यहोवाला मेंढरांसमान लोकांमध्ये आस्था आहे हे सुवार्तेच्या प्रचार कार्यातून कसे दिसते?

१६ प्रामाणिक मनाचे लोक, मग ते कोठेही राहत असले, तरी यहोवाला त्यांच्याबद्दल आस्था आहे. आणि याचा आणखी एक पुरावा म्हणजे जगभरात चाललेले प्रचार कार्य. (उत्प. १८:२५) मेंढरांसमान लोक, अद्याप जेथे सुवार्तेचा प्रचार करण्यात आलेला नाही अशा ठिकाणी जरी राहत असले, तरीही त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी यहोवा आपल्या स्वर्गदूतांद्वारे आपल्या सेवकांचे मार्गदर्शन करू शकतो. (प्रकटी. १४:६, ७) उदाहरणार्थ, एका इथियोपिअन अधिकाऱ्‍याला गाठून त्याला शास्त्रवचनाचा उलगडा करून सांगण्यासाठी, देवाने एका स्वर्गदूताद्वारे पहिल्या शतकातील सुवार्तिक फिलिप्प यास मार्गदर्शन केले. याचा परिणाम काय झाला? त्या माणसाने सुवार्तेचा स्वीकार केला आणि येशूचा एक बाप्तिस्माप्राप्त अनुयायी बनला. *योहा. १०:१४; प्रे. कृत्ये ८:२६-३९.

१७. भविष्याबद्दल आपण अनावश्‍यक चिंता का करू नये?

१७ सध्याच्या व्यवस्थीकरणाचा अंत जसजसा जवळ येईल, तसतशा बायबलमध्ये भाकीत केलेल्या “वेदना” मानवजातीला अधिकाधिक जाणवतील. (मत्त. २४:८) उदाहरणार्थ वाढती मागणी, हवामानातील असंतुलन किंवा आर्थिक अस्थिरता यांमुळे अन्‍नधान्याच्या किंमती आकाशाला भिडण्याची शक्यता आहे. नोकऱ्‍या मिळवणे कदाचित कठीण होईल आणि कर्मचाऱ्‍यांवर कदाचित जास्त वेळ काम करण्याचा दबाव आणला जाईल. काहीही झाले तरी, जे आध्यात्मिक कार्यांना आपल्या जीवनात प्राधान्य देतात आणि आपली जीवनशैली साधी ठेवतात त्यांना अनावश्‍यक चिंता करण्याची गरज नाही. कारण, त्यांना माहीत आहे की देवाचे त्यांच्यावर प्रेम आहे आणि तो त्यांची काळजी घेईल. (मत्त. ६:२२-३४) उदाहरणार्थ, सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेम शहराचा विनाश झाला त्याआधीच्या भयानक उलथापालथीच्या काळात यहोवाने यिर्मयाची कशा प्रकारे काळजी घेतली ते पाहा.

१८. जेरूसलेमला वेढा पडलेला असताना यहोवाने कशा प्रकारे यिर्मयाची प्रेमळपणे काळजी घेतली?

१८ बॅबिलोन्यांनी जेरूसलेम शहराला वेढा देऊन नाश केले त्याच्या आधीच्या काळात, यिर्मयाला “पहारेकऱ्‍यांच्या चौकात” बंदिस्त ठेवण्यात आले होते. त्याला अन्‍न कोठून मिळणार होते? तो अशा प्रकारे बंदिस्त नसता, तर त्याने स्वतः अन्‍नाचा शोध केला असता. पण, आता मात्र त्याला अन्‍नासाठी दुसऱ्‍यांवर अवलंबून राहावे लागत होते. आणि त्याच्या सभोवती असणारे बहुतेक लोक त्याचा द्वेष करत होते! पण, यिर्मयाने मनुष्यांवर नव्हे तर देवावर भरवसा ठेवला, ज्याने त्याची काळजी घेण्याचे वचन दिले होते. यहोवाने दिलेले वचन त्याने पूर्ण केले का? निश्‍चितच! ‘नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत रोज यिर्मयाला एक रोटी मिळेल’ अशी यहोवाने व्यवस्था केली. (यिर्म. ३७:२१) यिर्मयाप्रमाणेच बारूख, एबद-मलेख आणि इतर जण, दुष्काळ, रोगराई आणि संहाराच्या त्या भयानक काळातून सुखरूप बचावले.—यिर्म. ३८:२; ३९:१५-१८.

१९. भविष्यासंबंधी आपण कोणता दृढनिश्‍चय केला पाहिजे?

१९ होय, “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात.” (१ पेत्र ३:१२) आपला स्वर्गीय पिता आपल्यावर प्रेमळपणे नजर ठेवून आहे याचा तुम्हाला आनंद वाटतो का? तुमच्या भल्यासाठी त्याची नजर सतत तुमच्यावर असते या जाणिवेने तुम्हाला सुरक्षित वाटते का? तर मग, भविष्यात काहीही होवो, देवासोबत चालत राहण्याचा दृढनिश्‍चय करा. यहोवा एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्या सर्व एकनिष्ठ सेवकांवर दृष्टी ठेवेल हा भरवसा आपण बाळगू शकतो.—स्तो. ३२:८; यशया ४१:१३ वाचा.

[तळटीपा]

^ परि. 12 जरी ही पत्रे प्रामुख्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होत असली, तरी त्यांतील सल्ला देवाच्या सर्वच सेवकांसाठी उपयुक्‍त आहे.

^ परि. 16 देव आपल्या सेवकांना मेंढरांसमान लोकांपर्यंत पोचण्यासाठी मार्गदर्शन देतो याचे आणखी एक उदाहरण आपल्याला प्रेषितांची कृत्ये १६:६-१० यात सापडते. या वचनांत असे सांगण्यात आले आहे की पौल व त्याच्या सहकाऱ्‍यांना आशिया व बिथुनियामध्ये प्रचार करण्यास “पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध” झाला. त्याऐवजी, त्यांना मासेदोनिया येथे जाऊन प्रचार करण्यास सांगण्यात आले. तेथे पुष्कळ नम्र मनाच्या लोकांनी त्यांच्या प्रचार कार्याला प्रतिसाद दिला.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• ‘देवाबरोबर चालत’ आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?

• बारूखाबद्दल असलेले प्रेम यहोवाने कसे व्यक्‍त केले?

• ख्रिस्ती मंडळीचा मस्तक या नात्याने, येशू आपल्या पित्याच्या गुणांचे कशा प्रकारे अनुकरण करतो?

• या कठीण काळात आपण देवावर भरवसा असल्याचे कसे दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रे]

यिर्मयाप्रमाणेच, आज ख्रिस्ती वडीलही आपल्या वागण्या-बोलण्यातून यहोवाला त्याच्या लोकांबद्दल असलेली काळजी व्यक्‍त करतात

[१० पानांवरील चित्र]

यहोवा कोणत्या मार्गांनी योग्य वेळी आपल्याला साहाय्य पुरवू शकतो?